जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..1

जगरहाटीला अत्यंत वेगळे वळण देणारे अनेक तत्वज्ञ, वैज्ञानिक, तंत्रज्ञ व द्रष्टे उद्योजक जगभर होऊन गेलेले आहेत. त्यांनी शब्दबद्ध केलेले ग्रंथ आजही काही प्रमाणात मार्गदर्शक ठरत आहेत. परिस्थितीचा रेटा व कालमान स्थिती-गतीमुळे प्रत्येक समाजगटाचे प्रश्न व अग्रक्रम बदलत असले तरी थोड्या-फार प्रमाणात या तत्वज्ञांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच जग पुढे जात असते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या, अखंड जगाला समावून घेतलेल्या व जग बदलू पाहणाऱ्या अशा काही विचारवंतांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या माहितीबद्दलचे हे नवे सदर.

प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (1687)
लेखकः आयझॅक न्यूटन (1642-1727)

book 1
न्यूटनचे प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे पुस्तक मुळात लॅटिन भाषेत लिहिलेले आहे. 1642च्या क्रिसमस सणाच्या दिवशी इंग्लंडमधील एका खेडयात जन्मलेला न्यूटन जन्माआधीच पोरका झाला होता. काहीसा एकलकोंडा व अशक्त प्रकृतीचा न्यूटन काहीना काही विचार करत असे. त्याचा मेंदू हीच त्याची प्रयोगशाळा. केंब्रिजमध्ये शिकत असताना अल्केमीने त्याला झपाटले. याच वेडापायी नैसर्गिक सत्याचा शोध घेणे हेच त्याचे जीवन साध्य झाले. प्लेगच्या साथीत केंब्रिज विश्वविद्यालय काही काळ बंद पडल्यामुळे न्यूटनला पुढील दोन वर्षे आपल्या खेडयात जावून रहावे लागले. त्याच काळात स्वत:च्या प्रतिभाशक्तीने त्यानी नैसर्गिक सत्याचा पाठपुरावा केला. प्रकाशाचे स्वरूप काय असू शकेल, झाडावरील फळं जमीनीवर का पडतात, आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे भ्रमण कशामुळे होते, इत्यादी नैसर्गिक घटनामागील सत्य जाणून घेण्यासाठी तो सतत विचार करत असे. त्याच विचारामंथनाचे फलित म्हणजे त्यानी शोधलेले गुरुत्वाकर्षणासंबंधीचे व गतीसंबंधीचे ते प्रसिध्द नियम.

जग आहे तशी कल्पना करत त्या कल्पनांना गणितीय भाषेमध्ये मांडण्याचा त्यानी प्रयत्न केला. तार्किक मांडणी व आवश्यक पुराव्यांची जोड त्यांना दिली. नैसर्गिक घडामोडींचा विचार करताना काही गृहितकांची कल्पना करावी लागते. गृहितकांची सत्यासत्यता तपासावी लागते. अपवादांचा मागोवा घ्यावा लागतो. त्यातून सूत्रबध्दता आकार घेऊ लागते. त्यातून नियमांची मांडणी करता येते. न्यूटनचे पुस्तक वाचत असताना या सर्व गोष्टींचा आपल्याला प्रत्यय येतो. हे पुस्तक लिहून काढण्यासाठी वीस वर्षाहून जास्त काळ त्याला लागला. पुराव्यासकट मांडणी हे प्रथमच घडत होते. न्यूटनने शोधलेले नियम भूचर व खगोलीय, जड व हलके अशा कुठल्याही प्रकारचे वस्तू असू देत, या सर्वांना लागू होतात.

या पुस्तकाने जग कसे काय बदलले? ज्ञानाच्या संदर्भातील यापूर्वीच्या कोत्या विचारांना या पुस्तकाने जबरदस्त धक्का दिला. बुध्दीचा वापर करून तर्कनिष्ठ मांडणी करत जगाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या पुस्तकामुळे मिळाली. सृष्टीतील क्रिया-प्रक्रिया यांचे वर्णन गणितीय समीकरणांच्या आधारे अचूकपणे करता येते, हे या पुस्तकाने दाखवून दिले. वैज्ञानिक पध्दत म्हणजे नेमके काय याची स्पष्ट कल्पना य पुस्तकाने दिली. या पुस्तकामुळेच प्रत्येक सिध्दांत, नियम वा तत्त्व यांना वैज्ञानिक कसोटीला उतरल्यानंतरच त्यांचा स्वीकार करावा हा संकेत रूढ झाला. जगात घडत असलेल्या नैसर्गिक घटनांच्यामागे कुठलिही दैवीशक्ती नसून नैसर्गिक नियमानुसार त्या घडत असतात व त्यांचा अंदाज घेणे शक्य आहे हे सप्रमाण न्यूटननी दाखवून दिले. अवकाशातील ग्रहांचा भ्रमण काळ, त्यांचे स्थान-मान शोधण्यासाठी न्यूटनचे नियम उपयोगी पडू लागले. फलजोतिषाचे दावे खोटे पडले. न्यूटन हा स्वत: आस्तिक होता. परंतु त्याच्या सत्यान्वेषणात ईश्वराचा मागमूसही नव्हता. या जगातल्या घडामोडी नैसर्गिक नियमानुसार घडत असून त्यासाठी ईश्वराच्या कुबडींची गरज नाही, हेच या पुस्तकाने दाखवून दिले. हे सुंदर जग देवाची सृष्टी आहे, स्वर्ग-नरक अशा गोष्टी विश्वात आहेत, ग्रहांच्या भ्रमणांचे नियंत्रण जगन्नियंता करतो, पापाचा घडा पूर्ण भरल्यानंतर धूमकेतूना ईश्वर पाठवतो, इत्यादी भाकड कल्पनांना न्यूटनच्या या पुस्तकाने बाद ठरविले.

न्यूटनच्या गतिनियमांच्या अभ्यासातून रॉकेट व अवकाश तंत्रज्ञानाचा विकास झाला. माणूस चंद्रावर पाऊल ठेऊन परत आला. न्यूटनच्या प्रकाशकिरणांच्या सिध्दांताने अनेक वैज्ञानिकांना अतीनील व अवरक्त किरण, छायाचित्र तंत्रज्ञान, प्रकाश व्यतीकरण, प्रकाश विवर्तन, अणूंची रचना, रेडिओ लहरी, ग्रहांची रचना, डॉप्लर परिणाम, रडार तंत्रज्ञान, महाकाय टेलिस्कोप, इत्यादी अनेक विषयावर संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळाले. काचतंतू तंत्रज्ञानाची प्रगती झाली. आइन्स्टाइनचा सापेक्ष सिध्दांत हा न्यूटनच्या सिध्दांताचा पुढील टप्पा आहे. अशाप्रकारे याच पुस्तकाने औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. घरं, इमारती, रस्ते, पूल, धरणं इत्यादींच्या बांधकाम तंत्रज्ञानात गुरुत्वाकर्षणाचे नियम, बळ, शक्ती, वेग, प्रवेग, घर्षण इत्यादी संकल्पनांचा वापर होत गेल्यामुळे त्यांच्या रचनेतील गुणवत्ता, आयुष्य, यांचा नीटसा अंदाज येऊ लागला.

क्रमशः

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम विषय. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूटन सर नी कृती मधून जग बदल आहे.
फक्त विचार व्यक्त करून काहीच बदल होत नाही .
जो पर्यंत विचारला कृतीची जोड दिली जात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0