महासाथींचा इतिहास

कोव्हिड-१९ पॅन्डेमिकचे (महासाथ) आणि त्याच्या परिणामांचे पडसाद नेमके काय असतील हे आत्ता सांगणं कठीण आहे. हा लेख म्हणजे एक ऐतिहासिक संदर्भ देण्याचा प्रयत्न आहे.

-----------------
मूळ इंग्रजी लेख ‘द व्हिजुअल कॅपिटलिस्ट डॉटकॉम’वर १४ मार्च २०२० रोजी प्रथम प्रकाशित. यातील कोव्हिड-१९ची आकडेवारी सतत अपडेट केली जाते.
लेखक: निकोलस लपॅन.
मराठी अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर

-----------------

महासाथींचा इतिहास

‘पॅन्डेमिक’ : संपूर्ण देशभर किंवा विशेषतः जागतिक पातळीवर जेव्हा एखादा रोग पसरतो, तेव्हा त्याला ‘पॅन्डेमिक’ म्हणतात.

मानवाची पाऊले जसजशी पृथ्वीतलावर विस्तारत गेली, तसतसे त्याच्याबरोबर संसर्गजन्य रोगही पसरले. सध्या चर्चेत असलेल्या कोव्हिड-१९च्या प्रमाणात जरी नाही, तरी प्राचीन काळापासून सुरू झालेले साथीचे रोग अगदी आजच्या काळातही आढळून येतात.

प्रस्तुत लेखात मानवी इतिहासातल्या काही प्रमुख जीवघेण्या महासाथींचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

The History of Pandemics

ऐतिहासिक महासाथींची ‘टाइमलाइन’

विविध प्रकारच्या आजारांनी आणि रोगांनी अगदी सुरुवातीपासून मानवाचा पिच्छा सोडलेला नाही. आजार होणं हे जणू मानवातलं वैगुण्यच ठरलं आहे. तथापि मोठ्या प्रमाणावर शेतीप्रधान समाज निर्माण झाल्यावरच खऱ्या अर्थाने रोगांचं प्रमाण आणि विस्तार नाट्यमयरीत्या वाढलेला दिसून येतो.

व्यापाराच्या विस्ताराबरोबर मनुष्य आणि प्राणिमात्र यांच्यातले परस्परसंबंध वाढले आणि साथीचे रोग पसरायला नव्या संधी उपलब्ध झाल्या. या सुरुवातीच्या काळातच मलेरिया, टीबी, महारोग, इंफ्ल्यूएन्झा, देवी इत्यादी रोगांनी आपापलं बस्तान बसवायला सुरवात केली. मानव जसा सुसंस्कृत होऊ लागला, तसा व्यापार वाढू लागला, शहरं वाढीस लागली, आणि माणूस-प्राणी, तसेच भिन्न जाती-वंशाच्या माणसांमधले संबंधही वाढू लागले. अशा परिस्थितीत महासाथी व्हायची शक्यता वाढू लागली.

गत काळात झालेल्या काही प्रमुख महासाथी :

महासाथीचे नाव काल (ई.स.) प्रकार / मनुष्याअगोदरचा रोगजंतूचा यजमान मृतांची संख्या
ॲन्टोनाइन प्लेग १६५-१८० बहुधा देवी किंवा गोवर असावा ५० लाख
जपानी देवीची साथ ७३५-७३७ व्हॅरिओला मेजर व्हायरस १० लाख
जस्टिनियन प्लेग ५४१-५४२ यरसिनिया पेस्टिस बॅक्टिरिया / उंदीर, पिसवा ३–५ कोटी
ब्लॅक डेथ १३४७-१३५१ यरसिनिया पेस्टिस बॅक्टिरिया / उंदीर, पिसवा २० कोटी
न्यू वर्ल्ड देवी १५२०- व्हॅरिओला मेजर व्हायरस ५.६ कोटी
ग्रेट प्लेग, लंडन १६६५ यरसिनिया पेस्टिस बॅक्टिरिया / उंदीर, पिसवा १ लाख
इटालियन प्लेग १६२९-१६३१ यरसिनिया पेस्टिस बॅक्टिरिया / उंदीर, पिसवा १० लाख
कॉलरा महासाथी १-६ १८१७-१९२३ व्हिब्रिओ कॉलरी बॅक्टेरिया १० लाख+
तिसरा प्लेग १८८५ यरसिनिया पेस्टिस बॅक्टिरिया / उंदीर, पिसवा १.२ कोटी (चीन व भारत)
यलो फीव्हर १८०० उत्तरार्ध व्हायरस / डास १-१.५ लाख (यू.एस.ए.)
रशियन फ्लू १८८९-१८९० एच.२एन.२ (पक्ष्यांकडून) १० लाख
स्पॅनिश फ्लू १९१८-१९१९ एच.१एन.१ व्हायरस / डुक्कर ४-५ कोटी
आशियाई फ्लू १९५७-१९५८ एच.२एन.२ व्हायरस ११ लाख
हॉंगकॉंग फ्लू १९६८-१९७० एच.३एन.२ व्हायरस १० लाख
एच.आय.व्ही./एड्स १९८१- व्हायरस / चिम्पान्झी २.५-३.५ कोटी
स्वाइन फ्लू २००९-२०१० एच.१एन.१ व्हायरस / डुक्कर २ लाख
सार्स २००२-२००३ करोनाव्हायरस / वटवाघूळ / उदमांजर ७७०
ईबोला २०१४-२०१६ ईबोला व्हायरस / रानटी जनावरे ११,०००
मर्स २०१५- करोनाव्हायरस / वटवाघूळ / उंट ८५०
कोव्हिड-१९ २०१९- करोनाव्हायरस / कदाचित खवल्या मांजर ५१,४०० (जॉन्स हॉपकिन्स, यू.एस., २ एप्रिल, २०२०)

टीप: वर दिलेली आकडेवारी उपलब्ध संशोधनावर आधारित बांधलेला अंदाज आहे. हाती नवीन आलेल्या पुराव्यांमुळे जस्टिनियन प्लेग आणि स्वाइन फ्लूचे आकडे विवाद्य आहेत.

आणखी एक गोष्ट या आकडेवारीवरून दिसून येते, ती ही – मानवी इतिहासात सुरुवातीपासून साथीचे रोग असत आले आहेत, परंतु मृत्यूदर हळूहळू का होईना, निर्विवाद कमी होत गेलेला दिसतो. आरोग्यसेवांमधील सुधारणा आणि साथीच्या रोगांमागच्या कारणांचा अभ्यास आणि निष्कर्ष ही यामागची कारणे आहेत.

दैवी कोप

अनेक प्राचीन समाजांमध्ये दैवी कोप ही संकल्पना रूढ होती. त्यामुळे देव आणि वाईट शक्ती कोप पावल्यामुळे मानवावर रोग आणि दुर्दशेची वेळ येते असं समजलं जायचं. या अंधश्रद्धेमुळे एखादी साथ आली तर तिच्यावरचे उपाय हे भयंकर असायचे, आणि या अघोरी उपायांमुळेसुद्धा हजारोंचा बळी घेतला गेला आहे.

जस्टिनियन प्लेगच्या बाबतीत बायझनटाइन (आताचे तुर्कस्तान) इतिहासकार प्रोकोपिअस ऑफ सीझेरिया प्लेगचे मूळ (जे खरंतर बॅक्टेरिया होतं) भूमध्यसागराच्या बंदरांशी जोडू शकला. हा रोग या बंदरांपासून बायझनटाइन साम्राज्यात शिरला, तो मुळात चीन आणि ईशान्य भारतातून, जमीन आणि सागरी व्यापार मार्गाने ईजिप्तला धडकला. भौगोलिक परिस्थिती आणि व्यापाराचे ज्ञान असूनही त्याने या साथीचे खापर सम्राट जस्टिनियनच्या माथी फोडले, आणि तो सैतान तरी आहे, किंवा स्वतःच्या दुष्कृत्यांमुळे त्याने दैवी कोप ओढवून घेतला आहे, असं जाहीर केलं. काही इतिहासकारांच्या मते, लयाला गेलेल्या रोमन साम्राज्याचे पूर्व आणि पश्चिमी अवशेष पुन्हा जोडण्याचे जस्टिनियनचे प्रयत्न यामुळे फसले, आणि इथेच युरोपातल्या ‘डार्क एजेस’ना सुरवात झाली.
सुदैवाने साथीच्या रोगांच्या बाबतीतली कारणे मानवाला जास्त चांगली समजू लागली आहेत आणि अशा परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि कशा प्रकारे त्याला प्रतिसाद द्यायचा यात भरपूर सुधारणा झाल्या आहेत – भले त्या कधी कधी अपुऱ्या आणि संथ गतीने होत असल्या तरी.

रोगांची आयात

क्वारंटाइनची पद्धत १४व्या शतकात सुरु झाली, ती प्लेगच्या साथींपासून किनारपट्टीवरच्या शहरांचा बचाव करण्याकरता. बाधित बंदरांमधून व्हेनिसला आलेल्या जहाजांना धक्क्याला लागण्याअगोदर ४० दिवस समुद्रातच नांगर टाकून थांबविलं जाऊ लागलं. इटालियन भाषेत ‘क्वारंटा जिऑरनी’ म्हणजे ४० दिवस.

भौगोलिक माहिती आणि संख्याशास्त्रीय विश्लेषणावर भरोसा ठेवल्याच्या पहिल्या काही उदाहरणांपैकी एक, म्हणजे १९व्या शतकाच्या मध्यात लंडनमध्ये आलेली कॉलराची साथ. हा रोग दूषित पाण्याच्या माध्यमातून पसरतो, असा निष्कर्ष डॉ. जॉन स्नो यांनी १८५४मध्ये काढला. आसपासच्या परिसरात होणाऱ्या मृत्यूंची माहिती थेट स्थानिक नकाशावर दर्शवायचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे जिथे सर्वात जास्त रुग्ण एकत्रितपणे आढळले, तिथल्या एका विशिष्ट पाण्याच्या पंपात या साथीचं मूळ असल्याचं ते दाखवून देऊ शकले.

शहरी जीवन आणि व्यापारादरम्यान येणारे मानवी परस्परसंबंध यांना जरी खूप महत्त्व असलं तरी, एखाद्या आजाराचे स्वरूप किती ‘जहाल’ आहे, यावरसुद्धा त्याच्या साथीची मार्गक्रमणा अवलंबून असते.

संसर्गक्षमतेचा पाठपुरावा

एखाद्या संसर्गजन्य रोगाची संसर्गक्षमता (इन्फेक्शसनेस) मोजायला आणि तिचा पाठपुरावा (ट्रॅकिंग) करायला वैज्ञानिक मंडळी ‘रिप्रोडक्शन नंबर’ अर्थात ‘आर झीरो’, अथवा ‘आर नॉट’ हा मापदंड वापरतात. प्रत्येक बाधित व्यक्ती सरासरी आणखी किती व्यक्तींना संसर्ग देईल, हे या आकड्यावरून समजतं.

R0 (Basic Reproduction Number) of diseases

या यादीत पहिला क्रमांक लागतो तो गोवराचा. म्हणजेच गोवराची संसर्गक्षमता सर्वात जास्त आहे. याचा ‘आर झीरो’ १२ ते १८ च्या दरम्यान आहे. थोडक्यात, गोवर झालेली एक व्यक्ती सरासरी १२ ते १८ लोकांना संसर्ग देऊ शकते. इथे लसीकरण न झालेला समूह गृहीत धरला आहे.

असं असलं तरी लसीकरण आणि सामूहिक प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड इम्युनिटी) गोवराचा प्रसार आटोक्यात आणता येतो. जितक्या जास्त लोकांमध्ये एखाद्या रोगाविरुध्द प्रतिकारशक्ती असेल, तितका तो रोग पसरण्याची शक्यता कमी. यामुळेच ज्ञात आणि उपचार उपलब्ध असलेल्या रोगांचं पुनरागमन टाळण्यासाठी लसीकरणाला खूप महत्त्व आहे. सद्यःस्थितीत कोव्हिड-१९चे दूरगामी पडसाद नेमके काय व कसे असतील याचं गणित मांडणं किंवा भाकीत करणं अवघड आहे. याचं कारण ही साथ अजूनही चालू आहे, आणि संशोधक अजूनही करोनाव्हायरसच्या या नव्या अवताराचा अभ्यास करत आहेत.

शहरीकरण आणि रोगांचा फैलाव

आपण पुन्हा येऊन पोचलोय ते सुरुवात झाली तिथे – महासाथींच्या मागे असलेला जागतिकीकरणाचा आणि मानवी परस्परसंबंधांचा रेटा. शिकार करून आणि अन्न गोळा करून पोट भरणाऱ्या (हंटर-गॅदरर) टोळ्यांपासून ते शहरी माणसांपर्यंत, मानवाचं परस्परावलंबित्व म्हणजे रोगांच्या प्रसाराला संधीच होय.
विकसनशील देशांमध्ये ग्रामीण जनता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहे, आणि शहरांत लोकांची गर्दी होत आहे. शिवाय लोकसंख्यावाढीमुळे पर्यावरणावरही दबाव येत आहे. गेल्या दशकात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. रोगप्रसारावर या सर्व गोष्टींचा प्रचंड प्रभाव पडतो.
एकीकडे कोव्हिड-१९च्या संसर्गाचा दर थोपविण्याच्या दृष्टीने जगभरातील सरकारे आणि विविध संस्था लोकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चं आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे डिजिटल जग लोकांना एकमेकांशी संबंध ठेवणं आणि व्यापार करणं या दोन्ही गोष्टी कधी नव्हे इतक्या सुलभ करतंय.

-----------------

(अनुवादक पुण्यातील एका नामवंत वाहननिर्मिती कंपनीतून वैद्यकीय अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.)

निवेदन : सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे . प्रताधिकार उल्लंघन करण्याचा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.

मूळ लेखाचा दुवा
Copyright © 2020 Visual Capitalist
This translation and the image accompanying it are provided on a not-for-profit basis and only meant for educational purposes. Neither Aisi Akshare nor the translator stand to gain anything on a commercial basis by this.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गणिती मॉडेल नी आकडेवारी काढली असली पाहिजे.
इसवी सन पूर्व किंवा इसवी सन नंतर १०००
पर्यंत तरी रीतसर लोकसंख्या मोजण्याची पद्धत होती का ह्या विषयी शंका आहे.
आणि जगाची पूर्ण ओळख सुद्धा त्या वेळी नसेल.
तर आकडेवारी कोठून असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इसवी सन पूर्व किंवा इसवी सन नंतर १०००
पर्यंत तरी रीतसर लोकसंख्या मोजण्याची पद्धत होती का ह्या विषयी शंका आहे.

येशूजन्माची कथा वाचा, इतकेच सांगून खाली बसतो.

(अर्थात, त्याही जनगणनेचे परिणाम (मराठीत: रिझल्ट्स) कोठेही प्रसिद्ध झालेले नसून ते मोठ्या शिताफीने गुलदस्तात ठेवण्यात आलेले आहेत, ही बाब लक्षात घेता, त्याही जनगणनेची ती लोणकढी थाप असावी, हीदेखील शक्यता राहतेच. सबब, जनगणना-बिनगणना काही नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान माहितीपुर्ण लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0