काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३० मे २०२०

शुक्रवारी मित्राशी पुन्हा एकदा कन्फर्म केलं.
तो म्हणाला आज थोडं काम असल्यामुळे शनिवारी निघेल त्या पोरांना घेऊन.
म्हटलं ठीक आहे तीनही मजूर पोरांचं आधार-कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट वगैरेचे फोटोज वगैरे रेडी करूयात तोवर.
सगळी तयारी करून मी शेळ्यांची स्वप्नं बघत पुन्हा शुक्रवारी झोपलो.

शनिवारी उठल्या उठल्या मित्राचा मेसेज,
"बायको अजिबात हो म्हणायला तयार नाहीये, सॉरी"

भरोशाच्या म्हशीला टोणगा #$%^

माझ्या घरी पण थोडीफार हीच परिस्थिती असल्यामुळे त्याच्यावर रागवताही येईना.
घरी धीर करून सांगून टाकलं मलाच जावं लागेल म्हणून.
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग वगैरे...

बायकोनी साथ सोवळ्याचे नियम वदवून घेऊन कशीबशी परवानगी दिली.
(बाय द वे "साथसोवळे" हा शब्द मित्रवर्य पंकज भोसले याने जगात रूढ केला असावा असा माझा दाट संशय आहे.)
आता आधी इ-पास काढणं आलं त्यासाठी आधी माझं मेडिकल सर्टिफिकेट लागणार.
ते जवळच्याच एका हॉस्पिटलनी वाजवी दरात (१००) झटपट काढून दिलं.
(मजूर पोरांना ऑलरेडी गोव्यातूनच मिळालं होतं.)

मग इ-पास काढायला बसलो.
ही प्रोसेस बऱ्यापैकी स्मूथ आहे.
मुख्य ड्रायव्हरचे मेडिकल सर्टिफिकेट + फोटो अपलोड करावा लागतो.
शिवाय गाडी नंबर आणि सहप्रवाशांचे आधार नंबर इत्यादी.
ते सगळं तासभर बसून नीट भरलं आणि सबमिट मारलं.
लगेच एक कोड आला ये SSS य!

application

नॉर्मली इ-पास ऍप्लिकेशन केल्यावर पोलिसांचं होय / नाही दिवसभरात कळून जातं असं ऐकून होतो.
(आपले मराठी प्रकाशक ह्यातून काही बोध घेतील काय?)

पण आय. टी. वाला असल्याने जरा जास्त भाव मारत लगेच लाडात कोड टाकून ऍप्लिकेशन स्टेटस शोधायला लागलो.
आणि घात झाला चक्क "धिस आय डी नॉट फाउंड" मेसेज यायला लागला.
कोड तर बरोबर होता बाकी डिटेल्सही बरोबर होते.
पुन्हापुन्हा चेक केलं... सेम मेसेज...

सरकारी सॉफ्टवेअरवरचा विश्वास डळमळायला लागला.

पुन्हा ऍप्लिकेशन भरलं तर च्यायला सांगतंय "ऍप्लिकेशन इज ऑलरेडी अंडर प्रोसेस नवीन ऍप्लिकेशन अलाऊड नाय!"

आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना!

माझं ऍप्लिकेशन कुठच्या तरी लिम्बो मध्ये त्रिशंकू सारखं लटकत होतं बहुतेक.

मला माझ्या टॅक्सी बॅज ऍप्लिकेशनच्या वेळचा घोळ आठवायला लागला.
( https://aisiakshare.com/node/7558 )

दोन तास ह्याच्यातच गेले.
दुपारचे चार वाजलेले.
ती पोरं तिकडे आशा लावून बसलेली.
आज ऍप्लिकेशन गेलं नाही तर उद्या सकाळी निघणं अशक्य.
सोमवारी पुन्हा गांडफाट काम... सुट्टी मारणं जवळ-जवळ अशक्य.

काय करावं कळेना.

'कॅबेज'शी नाम-साधर्म्य असलेल्या एका सॉफ्टवेअर कंपनीने सॉफ्टवेअर बनवल्याचं खाली वेबपेजच्या कोपऱ्यात दिसलं.
लगेच तिकडच्या एका मित्राला फोन लावला.
त्याला उगीचच घाल घाल शिव्या घातल्या असं सॉफ्टवेअर बनवतात का वगैरे वगैरे.
आता दहा हजार एम्प्लॉयीतला तो एक बिचारा, त्याचं प्रोजेक्टपण नाही ते.
पण तरी बिचार्याने ऐकून घेतलं.
तो स्वतः: उत्तम सॉफ्टवेअर टेस्टर असल्याने दोन तीन कॅपिटल / स्मॉल वगैरे कॉम्बिनेशन्समध्ये ऍप्लिकेशन आयडी टाकून बघायला सांगितलं.
ते सगळं केलं पण नो लक्क.

वैतागून फोन कट केला आणि तेवढ्यात व्हाट्सऍपवर मेसेज आला:

"सगळे डॉक्युमेंट्स नीट कॅरी करा तुमचा अर्ज मंजूर झालाय - पुणे पोलीस"

Smile

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet