काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९

चला आता सगळी जय्यत तयारी झालेली. बो##र काका म्हणाले.
आता काय नाय ऑनलाईन फॉर्म भरायचा.
थोडा किचकट असतो तुला कसा भरायचा कळणार नाही.
एक काम कर बाहेर बसतात त्यातल्या कोणत्याही एका एजंट कडून भरून घे.
काय एक शंभर रुपये एक्स्ट्रा घेईल.

ठीक...
मी बाहेर छत्र्या लावून बसलेले असतात त्यातल्या एका कडे गेलो.
त्यानं पटापट "सारथी" ची वेबसाईट उघडली.
(तसं पाहता ही वेब साईट खूपच चांगली आणि फंक्शनल आहे.)
मी जय्यत तयारीत...
पण बॅजसाठी अर्ज करायचा ऑप्शनच दिसेना Sad

No_Badge_application_option

इकडे खरं तर "ISSUE OF PSV BADGE TO A DRIVER" ऑप्शन दिसायला हवा.
Badge_Service

माझा चेहरा पडला.
एजंट पोरगा म्हणाला त्या १० नंबरच्या खिडकीवर जा आणि त्यांना सांगा तुमचा प्रॉब्लेम.

आता अंधेरी आर. टी. ओ. ची १० नंबरची खिडकी म्हणजे नामांकित प्रकरण आहे.
पुढे बरेच महिने ह्या खिडकीशी संबंध आला.

बेसिकली इकडे खिडकीवर सकाळी ११ ते १ एक माणूस बसतो आणि तुमच्या लायसन्स संदर्भात ज्या पण काही अर्ज, तक्रारी, कैफीयती, दुरुस्त्या असतात त्या निकालात काढतो.
त्याच्या लेव्हलला नाही करता आलं तर वरती दुसऱ्या मजल्यावर असिस्टंट कमिशनर ग्रेडच्या सायबांकडे जायचं.
अशी सगळी हायरार्की.

म्हणजे आर. टी. ओ. ची हाय कोर्ट नी सुप्रीम कोर्ट म्हणावा हवं तर.

तर १० नंबर:
रांग बऱ्यापैकी होती फार लांब नव्हे एक १० माणसं.
पण प्रत्येक माणसाची आपापली किचकट केस.
त्यामुळे फारच हळूहळू पुढे सरकत होती.

कुणाचं लायसन्सवर नाव चूकीचं पडलेलं,
कुणाचा चेंज ऑफ ऍड्रेसचा रेकॉर्डच गायब,
कुणी सहा महिन्यांपासून लायसन्सची वाट पहातंय.

"सुखाचा बोअरींग एकच प्रकार असतो पण दुःख मात्र प्रत्येकाचं आपापल्या परीनं युनिक वेगळं असतं"
असं कोणीतरी म्हणालंयना ते इकडेही लागू पडावं.

जवळ जवळ तासाभरानी माझा नंबर आला.
जाळीदार खिडकीच्या पाठीएक उग्र चेहेऱ्याचा माणूस बसलेला.
आपण त्याला 'केतन' म्हणूया सध्या.

त्याला माझी केस सांगितली.
ट्रान्सपोर्ट लायसन्स दाखवलं.

चेहेरा उग्र असला तरी माणूस सेन्सिबल आणि चटपटीत होता.
त्यानं सिस्टीममध्ये बघितलं आणि एक करेक्शनची चिठ्ठी हातात कोंबली.
मग ४ नंबरला जाऊन तो अर्ज दाखवला.

आता ४ नंबर हे अजून एक नामांकित प्रकरण.
बेसिकली १० नंबरला तुमच्या अर्जाची स्क्रूटिनी होते.

पण ऍक्च्युअल सिस्टीमच्या डेटाबेसमध्ये एंट्री ही चार नंबरला होते.
४ नंबर ला जाऊन दहा नंबरच्या सायबांची (आपण त्यांना केतन म्हणूयात) चिठ्ठी दाखवली.

ह्या ४ नंबरच्या खिडकीपाठी का कोण जाणे ब्लॅकहोलसारखा गर्द अंधार आहे.
इकडचा माणूस त्या अंधारात पाच मिनटं गुडूप झाला आणि मग येऊन बोल्ला.

सिस्टममध्ये करेक्शन केलंय दोन अडीच तासांनी मेसेज येईल तुम्हाला.

आता पारंपरिक आर डी बी एम एस डेटाबेसेस ते नवीन नो एस क्यू एल डेटाबेसेस...
गूगलचे मॅप रिड्यूस अल्गोरिदम्स वगैरे आख्खी आय. टी. दुनिया अशा क्वेरीज सिस्टीममध्ये निमिषार्धात अपडेट करण्यासाठी झटत असते हे मला नीटच माहिती.

पण अडीच तास तर अडीच तास त्यांची काही प्रोसेस असू शकेल कदाचित.

मी लिंक रोडवरच्या एका कॅफेत टाईमपास केला आणि मेसेज आल्या आल्या परत आर. टी. ओ.त धावलो.
पुन्हा ऑनलाईन फॉर्म उघडला.
आता तर काय ऑप्शन दिसणारच.
पण हे राम... अजूनही ऑप्शन दिसेनाच.

पुन्हा दहा नंबर पुन्हा केतन.
आता त्यानंही हात वर केले.
हा सॉफ्टवेअर सिस्टीमचा घोळ आहे तुम्ही ऑनलाईन सपोर्टशी बोलून बघा. त्यानं सुचवलं.

हिंपुटी होऊन घरी आलो.

(क्रमशः)

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet