बागकामप्रेमी ऐसीकर २०२०

मला २०१९ पर्यंत नारळाचं झाड आणि क्याक्टस - एवढा ढोबळ फरक ठाऊक होता.
आणि वडाचं झाड.
बाकी झाडं जवळपास सारखीच वाटायची. म्हणजे फार तर मोठी-मध्यम-छोटी इतका फरक समजायचा.
पण मोठे लोक जसं एखाद्या झाडाखाली उभं राहून - "कलमी आहे, पानंच बघा ना!" वगैरे म्हणून माना डोलावतात, तसलं काही कळत नाही.
निव्वळ पानं बघून झाड ओळखणं तर जादू वाटते.

तेव्हा सांभाळून घ्या.
-------------------------------
२०२० च्या मार्चमधे कोरोना व्हायरस आला आणि मला घरामागे गवत/झाडं/झुडपं आहे ह्याची जाणीव झाली.
माजी घरमालकांनी एका बाजूला वाफे करून ठेवले होते, त्यात मातीबिती घातली. थोडंफार खणून खुरपं वगैरे वापरून पाहिलं.
मेथी, पालक लावले एप्रिलमधे. पहिले काही दिवस तर मी रोज जाऊन पाहिलं की रोपं काही वाढतायेत का वगैरे. १ आठवडा वाट बघितल्यावर छोटी रोपं आली. मस्त वाटलं!
( इयत्ता दुसरीनंतर लावलेलं पहिलं रोप - तेव्हा समजून घ्या.)

१ महिन्यात मेथी चांगलीच वाढली होती. पण हाय! २७ मेचा तो दुष्ट दिवस आला. त्याआधी २ दिवस सतत डायनोसॉर मुतल्यासारखा पाऊस.
संध्याकाळी जाऊन पाहिलं तर मेथीची सगळी पानं खलास. फक्त थोडे छोटे कोंब (?) उरले होते. बाकी सगळं फस्त.
ससेच असणार. एरवी गवत खात फिरत असतात- मला वाटलेलं मेथी खाणार नाहीत म्हणून.

मग थोडं कुंपण वगैरे केलं आहे, त्यात आता पालक लावलाय- तो बरा उगवलाय सध्यातरी.
तर खूष झालो तेवढयात हे एवढ्या गोगलगायी आल्या- आणि पानं खाऊन गेल्या.
मग कुठेतरी वाचून मी अंड्यांची टरफलं आणि घरासमोरच्या मेपलच्या झाडांची वाळकी पानं पसरली पालकाभोवती.
परिणाम बघू काय होतो.

एका भांड्यात भोपळा, भेंडी आणि वांग्याच्या बिया हौतात्म्याची वाट बघताहेत.

पण झाडं लावणं हे एकंदरीत उत्तम आहे. जरा वेळ मिळाला तर लगेच बागेत पळायला आणि खुरपं घेउन झाडांची काळजी घ्यायला जाणाऱे लोक आता मला तितकेसे वेडे वाटत नाहीत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पण झाडं लावणं हे एकंदरीत उत्तम आहे. जरा वेळ मिळाला तर लगेच बागेत पळायला आणि खुरपं घेउन झाडांची काळजी घ्यायला जाणाऱे लोक आता मला तितकेसे वेडे वाटत नाहीत.

Tolerance असतो. किती टक्के वाया जातं ते पाहायचं आणि काम करायचं. कीडे, प्राणी, रोग नासधूस करतात किंवा निसर्ग कोपतो. थोडे पीक, फुलझाडं उरतात ती दिसतात. ते पाहून नवीन वेडे जॉईन होतात.

खरडफळ्यावरून इथे आणलं.
///
शरद गाडगीळ

मंगळवार, 02/06/2020 - 20:10

गरमा वाढल्याने बाल्कनीतला मिरी वेल कासावीस. बाथरूममध्ये ठेवून माठातले पाणी शिंपडत आहे.
-----------
सामो

मंगळवार, 02/06/2020 - 20:15

>>>>गरमा वाढल्याने बाल्कनीतला मिरी वेल कासावीस. बाथरूममध्ये ठेवून माठातले पाणी शिंपडत आहे.>>> अरे वा! खूप काळजी घेता तुम्ही रोपांची च्रट्जी. कौतुकास्पद आहे.
-----------------
शरद गाडगीळ

मंगळवार, 02/06/2020 - 20:51

माड पोफळीवर किनारपट्टीस वाढवतात तिथे गारवा असतो. तसा इथे बाल्कनीत करता येत नाही.
----------------- --
३_१४ विक्षिप्त अदिती

मंगळवार, 02/06/2020 - 21:46

हिवाळ्यात पेरलेलं गाजर काल उकरलं; पाला कोबीत ढकलून दिलाय; गाजर जेवणात असंच खाईन.

-–---------------------
सामो

बुधवार, 03/06/2020 - 01:29

>>>पाला कोबीत ढकलून दिलाय>>> गाजराचा पाला खातात हे माहीत नव्हते मला.
-------------------
'न'वी बाजू

बुधवार, 03/06/2020 - 01:33

ससे खातात.
-----------------
'न'वी बाजू

बुधवार, 03/06/2020 - 01:34

(ॲज़ इन, ससे गाजराचा पाला खातात, किंवा, लोक ससे खातात. टेक युअर पिक.)
-------------------------
'न'वी बाजू

बुधवार, 03/06/2020 - 01:35

(तसेही, ट्रॅन्झिटिविटीने, लोक गाजराचा पाला खातात असे म्हणता येईल.)
//////

गाजराचे मूळ वाढताना तिथे दगड/अडथळा आल्याने त्याने डायवर्शन घेतले आहे.
-----–-----------
गाजर किंवा मुळा, बीटरूट, सलगम यांच्या पाल्यातच भयानक पोषक तत्त्वे असतात.
(https://www.theguardian.com/food/2019/jan/12/carrot-tops-chimichurri-was...)

भाजी बाजारात लहान मुळे आणि भरपूर पाला घेण्याचे गिऱ्हाइकं टाळतात. मोठे मुळे घेतात किंवा तो पाला तिकडेच काढून टाकायला सांगतात. हे पाहून वाइट वाटते.

दगड नाहीत, ते काढले होते. इथली माती चिकट आणि मुरमाड आहे. ती दरवर्षी उकरून त्यात गळलेली पानं मिसळून हलकी करण्याची गरज आहे. बागेच्या काही भागात हे काम केलं आहे; काही भागात बाकी आहे. उरलेला भाग हिवाळी भाज्यांसाठी चांगला आहे. (दिवाळी अंकाचा काळ ह्या कामासाठी योग्य असतो, पण तेव्हा मला जमत नाही. मग रोपं जमिनीत लावण्याची वेळ होते.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>>गाजर किंवा मुळा, बीटरूट, सलगम यांच्या पाल्यातच भयानक पोषक तत्त्वे असतात.>>>> अरेच्या असे आहे काय. यापुढे टाकणार नाही.

गाजर, बिटाचा पाला हमखास फार्मर्स मार्केटात असतो. गाजराचा पाला उग्र चवीचा असतो. म्हणून मला फार आवडत नाही. एकाच गाजराचा होता म्हणून खाल्ला. एरवी शेळी किंवा गायी खातात का, हे शोधलं पाहिजे. मग शेळी किंवा गाय शोधली पाहिजे.

किंवा गाढव पाळणाऱ्या मैत्रिणीला भेटून बरेच दिवस झाले. तिची गाढवं खाणार असतील तरच ८-१० गाजरांचा पाला आमच्याकडे संपेल. तसं असेल तर हौसेनं गाजरं लावेन.

गाजराचा आतला फोटो काढायचा राहिला. गाजर बाहेरून जांभळं आणि आत पांढरा रंग होता.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जांभळं? ऑर्गॅनिक असेल.

तुला बहुतेक गावठी वाणाचं किंवा heirloom म्हणायचं आहे.

सेंद्रिय किंवा organic निराळं. ज्यात रसायनं वापरलेली नाहीत ते सेंद्रिय. आमच्याकडची मूळ माती एवढी निकस आहे की खतं घालावीच लागतात; रासायनिक खतं वापरण्याजागी मी विकतची सेंद्रिय खतं वापरते. आणि तयार असेल तर घरचं कंपोस्ट.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हां गावठी वाणाचं बरोबर. मस्त शब्द आहे.

गाजराचा पाला उग्र चवीचा असतो. म्हणून मला फार आवडत नाही. एकाच गाजराचा होता म्हणून खाल्ला. एरवी शेळी किंवा गायी खातात का, हे शोधलं पाहिजे. मग शेळी किंवा गाय शोधली पाहिजे.

हम्म्म्म्म्... म्हणजे इन्डायरेक्ट पद्धतीने गाजराचा पाला खाता येईल. शेळी/गाय गाजराचा पाला खाईल, आपण मटण (गोट मीट) / बीफ खायचे. आहे काय, नि नाही काय!

किंवा गाढव पाळणाऱ्या मैत्रिणीला भेटून बरेच दिवस झाले. तिची गाढवं खाणार असतील तरच ८-१० गाजरांचा पाला आमच्याकडे संपेल. तसं असेल तर हौसेनं गाजरं लावेन.

अय्या! म्हणजे, आता तुम्ही गाढव खाणार?

प्रगती आहे!

चांगले आहे, नि काय!

असो चालायचेच.

अस्वल, फार उत्साह आणि आवड असल्यास टिप्स देऊ.

आता कुंपण घालतोय नीट- आणि पालक जगवणार आहे.
ते जमलं तर नक्कीच इथे सांगतो! मग भोपळा, भेंडी बघू जमतं का

टोमॅटो खात असलात तर तो जगवणं आणि वाढवणं बरंच सोपं आहे. विकतच्या टोमॅटोच्या थोड्या बियाच पेरून पाहा हवं तर प्रयोगासाठी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टॉमेटो - बघतो पेरून

नारळाचं झाड आणि क्याक्टस >>>>
Smile

मी बागेत आता चिकार काय-काय लावलंय. टोमॅटो, मिरच्या, वांगी, फुलं. आणि भरपूर घरातली झाडं आहेत. वेळ झाला की फोटो काढून डकवते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुन्नार ( केरळ) येथे passion flower ( कृष्णकमळ ) वेलाला फळे येतात बहुतेक. फळे आणि सरबत विकत मिळते.

पॅशन फ्रुटस मी खाल्ली आहेत.

नारळाचं झाड आणि क्याक्टस
- उँचे लोग उँची पसंद?

आमच्या  बागेची बढती आता बाल्कनीमधून परसातल्या अंगणातल्या जमिनीत झालीये.
ह्यावर्षी सक्रिय बागकामाला जरा उशीरच झाला. पण दिवाळीपासून कंपोस्टिंग करून ते जमिनीत ढकलणं चाललंय. 
अंगणात आधीपासूनच असलेली लिंबं आणि संत्री खाऊन, वाटून आता संपली. फोटो असले तर शोधून लावते.
बाकी फुलझाडं, तुळस वगैरे मंडळी कमी जास्त तब्ब्येतीत आहेत. मोगरा गेला.  परत नवीन मिळत नाहीये म्हणून सध्या जाई/जुईचं नवीन रोपटं आणलंय.
सालाबाद प्रमाणे बिग बॉय टोमॅटो आणि अजून एक बियांपासून केलेलं टोमॅटोचं रोप लावलंय. बाजारच्या पुदिन्याच्या काड्या एका कुंडीत टोचून दिल्या तर त्यांना फुट फुटून चांगला पुदिना आलाय.
मेथी लावली होती पण उंदीर खाऊन जायचा, मग आधी त्याचा बंदोबस्त केला आणि परत मेथी पेरलीये. हरभरापण पेरला होता तो छान आलाय, आई ह्या आठवड्यात हरभऱ्याच्या पाल्याची भाजी करणारे.
बटरनट स्क्वाशच्या बिया पण पेरल्या होत्या, उगवून आल्यात, भोपळे नाही आले तर पानांची भाजी किंवा वडी करून खाऊ.
आता मला नवीन कळलेल्या गोष्टी:
कांद्याचं पाणी : १-२ लाल कांद्यांच्या साली १ कप पाण्यात भिजवून ४ दिवस सावलीत ठेवायच्या. ४ दिवसांनी हे पाणी लालसर रंगाचं झालेलं दिसेल. तर हे पाणी गाळून , त्यात अजून एक कप पाणी मिसळून फुलझाडांच्या मुळात द्यायचं.
मी हे केल्यावर माझ्या जास्वंदीच्या झाडाला खूप पानं आणि कळ्या आल्या.

केळींच्या सालीचं पाणी - २ केळ्यांच्या साली बारीक चिरून किंवा वाटून २ कप पाण्यात ७ दिवस भिजवून ठेवायच्या. ७ दिवसांनी हे पाणी गाळून , डायल्युट करून झाडांना द्यायचं. ह्याने झाडांना गरजेची पोषणद्रव्यं मिळतात असं मला सांगितलंय. बघू. आमच्या झाडांवर काय परिणाम होतो ते सांगेन थोड्या दिवसांत.

-सिद्धि

मीही सुरुवातीला (काही वर्षांपूर्वी) बिग बॉय टोमॅटो लावले होते; आता फक्त गावठी वाणाचेच लावते. ते दुकानात सहज मिळत नाहीत; आणि कच्चे खायला छान लागतात म्हणून.

झुकिनीच्या पानांच्याही वड्या करतात का? मी ते लावलंय; एका रोपाला फळ धरलंय. पण आता आमच्याकडे तापमान वाढायला लागलं आहे. असंच ३० से.च्या वर राहणार असेल तर फळ धरणं कठीण आहे. मग पानांची भजी करेन.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बटरनट स्क्वाशच्या बिया पण पेरल्या होत्या, उगवून आल्यात, भोपळे नाही आले तर पानांची भाजी किंवा वडी करून खाऊ.

बटरनट स्क्वाश, कालाबाझा, आणि भोपळा (पंपकिन) यांच्यात नक्की फरक काय?

(की एगप्लांट, ऑबरजीन, आणि ब्रिंजल यांच्यात आहे तितकाच?)

कालाबाझा (झुकीनी, कूर्जेटं) साधारण काकडीच्या आकाराची, हिरवी किंवा हिरवट सालीची आणि आतून इतर दोन भोपळ्यांपेक्षा बरीच मऊ असतात. काकडीपेक्षा जास्त घट्ट.

लाल भोपळा आणि बटरनट स्क्वाशच्या आकारात बराच फरक असतो. चव आणि पोत तेवढे निराळे नसतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कालाबाझा वायला, नि झुकिनी/कूर्जेट वायले. तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला येवढी शिंपल गोष्ट समजू नये?

कालाबाझा:

Calabaza

झुकिनी/कूर्जेट:

Zucchini / Courgette

(चित्रे विकीवरून साभार.)

झुकिनीचा एक प्रकार असतो - calabacita (स्पॅनिश शब्द) किंवा calabasa (इंग्लिशमध्ये). तुम्ही दाखवलेल्या चित्रात आहेत त्यापेक्षा कमी आणि पांढुरके चट्टे त्यावर असतात. हे पाहा -
calabasa

आमच्यासारख्या लोकांना बऱ्याच निरनिराळ्या गोष्टी माहीत असतात! Tongue

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फळे,फुले ,भाजीपाला प्रदर्शनाला जातो तेव्हाचे फोटो काढून ठेवले आहेत.
तिथे पाटी लिहिलेली असते त्या पाटीसह झाडाचा फोटो काढण्याचा प्रयत्न असतो परंतू कधी फारच अंतर पडते. फोकसिंग होत नाही मोबाईल क्याम्राचे. पण एकूण उपयोगी. प्रदर्शनात असल्याने कॉपीराइटचा गुद्दा बसणार नाही.

भोपळ्यांचे प्रतिबिंब भोपळ्यासारखेच छान आहे.

अमेरिकेत अमेरिकी आकाराच्या घरांत राहणाऱ्या लोकांना घरातली झाडं वाढवायची हौस असेल तर 'फेसबुक मार्केटप्लेस'वर किंवा 'नेक्सडोअर'वर शोधा. बऱ्याच प्रकारची झाडं तिकडे "स्वस्तात" सापडतील. अवतरण अशासाठी की काही घरच्या, शोभेच्या झाडांच्या किंमती हजार-दोन हजार डॉलरही असतात.

थंडीत, बाहेर बहुतेक झाडांचे खराटे झालेले असताना ही झाडं घरात बघून बरं वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रान केळीचे बी रुजते का? मी लावली आहे, १० दिवस झाले लावून अजून कोंब फुटले नाही.

निसर्गात तरी रुजतं.
शेणखाडा करा ( शेण आणि माती) कुंडीत भरून फार खोल पेरू नका. पाणी हवे पण साचता कामा नये. उकाडा, गरमा हवा.
बिया असलेल्या गुलाबी केळी केरळात आहेत. ठाण्यात दत्ताजी साळवी उद्यानात. संपर्क - विजय पाटील(ठेकेदार) सकाळी साडे नऊला बाग बंद होते तेव्हा येतात. फोन बदलला नसल्यास 9820646982

धन्यवाद! मी कोकोपीट मध्ये ह्या बिया लावल्या आहेत, त्यात शेण टाकल्यास उष्णतेने जळतील का? मी सागरगोटे कोकोपीट मध्ये लावून मित्राच्या शेतातील बांधावर लावले होते,चांगले काटेरी कुंपण झाले , जनावरे,कुत्रे अजिबात शिरत नाही त्यातून.

बियांमध्ये सुरुवातीला पुरेल इतपत ऊर्जा आणि पोषक तत्त्वं असतात; काही बिया फक्त पाण्यामुळे आणि काही पाणी+सूर्यप्रकाशामुळे रुजतात. एकदा रोप जरा स्थिरावलं की नंतर खत, दिवसभरात किती उजेड हवा वगैरे विचार करावा लागतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रानात उगवणाऱ्या वनस्पती मी घरी वाढवायचा प्रयत्न करतो. घरी रुजले की पुन्हा रानात किंवा ओसाड जागेत पावसाळ्यात लावतो. आता गुंजा आणल्या आहेत जंगलातून. त्याही रुजतात का बघतो.

ह्या सगळ्या प्रयोगांचे फोटो दाखवाल का?

मीही घरी तणासारखी वाढणारी आणि सुंदर फुलं येणारी झाडं वाढवायला सुरुवात केली आहे. वाढली की लोकांना देऊन टाकते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो, फोटो काढून टाकतो इथे.

मला हा फोटो दिसत नाहीये; परमिशन बदलायला हव्ये का?

दिसला, दिसला. इथे टेक्सन हवेत आणि मुरमाड जमिनीत 'प्राईड ऑफ बार्बेडोस' नावाचं झाड झकास फुलतं. फुलं बरीचशी गुलमोहरासारखी दिसतात. त्याची पानं अशीच दिसतात; छोटी रोपंही अशीच दिसतात.

प्राईड ऑफ बार्बेडोस

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही फुलं आणि झाड संकासूर/शंकासुराचे आहे. बार्बाडोसच नाही तर एकेकाळी पुण्यात याची झाडं सर्वत्र होती. आता कमी दिसत असावीत कारण बंगले आणि मातीचे पट्टे कमी होत चालले आहेत. या नावाची उत्पत्ती कोणताही आसुर नसून समकेसर या संज्ञेचा अपभ्रंश आहे असं ऐकून होते.

हे झाड महाराष्ट्रात दिसत असणार ह्याबद्दल मला खात्री होती. इथे टेक्सासात महाराष्ट्रातली बरीच झाडं दिसतात. मोगरा, अनंत वगैरे "आपली" झाडं इथल्या हवेत मजेत असतात. त्यामुळे ह्या झाडाचं मराठी नाव मला कधीपासून हवं होतं.

इथे हे झाड फार मोठं होत नाही; थंडीत फ्रीज झालं की वरचा सगळा भाग जातो, मुळं टिकून राहतात. हवा पुन्हा उबदार झाली की पुन्हा वाढतात, फुलतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सागरगोट्याची रोपं

धन्यवाद ! हे कसे केले? मला नाही जमले. ४००×६०० साइज टाकली असता फोटो कधी तरी दिसतो, कधी दिसत नाही.

तुमच्या फोटोतून
https://photos.app.goo.gl/iz5pUb8uLG65DCuK6
ही लिंक मिळाली.
पण ही 'इमेज लिंक' म्हणून चालत नाही.

मी ओनर नाही पण दिलेली लिंक शेअरिंग असल्याने ती दुसऱ्या एका असिस्ट साइटमध्ये टाकून इथे /वेबसाईटवर चालणारी direct link मिळवता येते. ती वापरायची. लिंकच्या शेवटी w2400 असते.
ते w4800 किंवा w7200 बदलल्यास इथे उमटणारा फोटो अधिक रेझलूशनचा ( अपलोड केलेल्या फोटोएवढा) दिसू शकतो.

असिस्ट साइट =
https://ctrlq.org/google/photos/

________________

तुम्ही फोटोशेअरिंग लिंक जेनरेट केली की तो फोटो ओपन इन न्यु विंडो करायचा. पण अड्रेसबारमधली लिंक न घेता फोटोवर क्लिक करून ' कॉपी इमेज लोकेशन' लिंक घेऊन इथे वापरायची. त्या लिंक च्या शेवटी उदाहरणार्थ
=w720-h960-no?authuser=0
असे काही width, height चे अंक दिसतात
त्यांत
w1420-h1860
w2120-h2760
असा बदल केल्यास फोटोचे रेझलूशन वाढवता येते.

हे लिंक मधले बदल आहेत पण ऐसीसाठी इमेज tag width 80% किंवा 100% च ठेवा.

--------------------------
फोटो कधी तरी दिसतो, कधी दिसत नाही.

याचं कारण फोटो शेअर झालेला नसतो. हे असिस्ट साइटमध्ये लगेच कळते. " Try another link" हा मेसेज येतो.

आणखी शेण नको. हाच प्रयोग राहू दे.

ह्यांतलं सूर्यफूल तणासारखं आलं आणि सुरुवातीला कुतूहलापोटी उपटलं नाही. आता सहा फूट उंचीचं झालंय आणि १०-१५ फुलं आलेत.

हा सगळा ताजा माल; अजून झाडावर आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान!
----------
आज एक पालेभाजी आणली. ( बंगाली लोक ही खातात असं भाजीवालीने सांगितलं. कोलमी शाक किंवा water spinach.
इथे दिसतीय ती . याची रेसिपीही आहे.

शोभेचे झाड होते का पाहणार आहे.

तर एकेकाळी ऐसीवर बागकामाचे धागे धुव्वांधार (!) चालायचे. तेव्हा मला अदितीने आणि अचरटबाबांनी अळू, बेसिल वगैरे लावण्याचे सविस्तर समजावले होते.
ते सगळं ज्ञान उपयोगात आणण्याची सवड मला तीन वर्षांनी मिळाली. मग मागचे धागे चाळून आणि वेळोवेळी अदितीला मेसेज करून (गलिच्छ दिसणार्या) अळुकुड्या पेरल्या. पंधरा दिवसांत पहिलं पान फुटलं. मग ह्या यशामुळे अजुन तीन कुड्या आणून पुरल्या. त्यांना पण पानं फुटली आहेत. कालच घरच्या अळुच्या वड्या केल्या.

बटरनट स्क्वाशला भरपुर फुलं आली पण फळ काही धरेना. मग पानांच्या वड्या, डाळ-दाणे घालुन भाजी असं काय काय करतोयं.

बिग बाॅय टोमॅटो टोणगेपणा करतोय. व्यवस्थित ऊन, पाणी, खत मिळत असुन फक्त तीन फळं धरलीयेत. बाकीच्या कळ्या सुकून जातायंत.
का बरं?

लिंबाला आणि मोसंबीला त्यांच्याच सालींचं कंपोस्ट दिलं, ते झाडांना जास्त फायद्याचं (असं कळालंय).

बाकी मेथी, हरभरा - आठवड्याला एकवेळची भाजी निघतेय.

बेसिल लावलंय - त्याची टोकाची पानं कापुन पेस्तोसाठी वापरतेय. बेसिलची अजून काय काळजी घेऊ? पेस्तोशिवाय अजुन काय करता येईल?

-सिद्धि

कशा पेरल्या?
मी पेरून महिना उलटला. आईला अळू काहीतरीच आवडतं, म्हटलं होमग्रोन अळू वापरू ह्या वर्षी. अळकुड्या पाण्यात घालून ठेवल्या तर त्या कुजू लागतात, मुळे फुटत नाहीत.
शिवाय काही कुंड्या अशा जागी आहेत ज्यांच्यात मुसळधार पाऊस पडतो. एक तशा कुंड्यांत, एक मध्यम पाऊस पडतो तिथे, एक अगदीच पाऊस नाही पडत अशा ठिकाणी पेरली. नो इफेक्ट.
मुंबईत ऑगस्ट महिन्यात अगदीच संततधार आहे. अजिबात ऊन नाही. ते कारण असावं का?
@शरद गाडगीळ ग्रु प्लीज्ज हॅल्प.

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

कुठल्याही बी किंवा कंदामध्ये आपला आपण फुटवा येण्याइतपत ऊर्जा असते. फक्त सोयीची हवा मिळाली की फुटवा येतो. कडधान्यं भिजत घालतो, त्यासाठी पाणी लागतं. बियांना पाणी आणि उबदार हवा लागते. कंदांना किंचित दमटपणा आणि उबदार हवा पुरते कारण कंदांमध्ये पाणीसुद्धा असतं. आणि सुरुवातीला, मुळं नसताना पाणी असलं तरी ते शोषून घेण्याची काही सोय कंदांकडे नसते. उलटपक्षी काही झाडांच्या फांद्यांना बारके केस असतात, उदाहरणार्थ टोमॅटो; काही झाडांना हवेत मुळं येतात, आपलं मनीप्लांट किंवा फिलोडेंड्रॉन अशी विषुववृत्तीय, सावलीत वाढणारी झाडं. ती थेट पाण्यातही वाढतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भोपळा जातीच्या झाडांना फळ धरायला त्रासच होतो; त्यांना नर-मादी दोन्ही फुलं एकदम लागून नंतर परागीभवन व्हावं लागतं. मी तीन कूर्जेटं लावली होती; गेल्या तीन महिन्यांत दोन कूर्जेटं मिळालीत. फुलं चिकार येतात. पानांचं काही करायचा-खायचा आम्हां दोघांना कंटाळा आहे.

मी घरी एक कॅलॅमोंडीन लावलंय; लिंबू आणि कमक्वाटचं संकर आहे. त्याला बाजारातून आणून सेंद्रिय खतं घालते. आमच्याकडची माती अगदीच टुकार आहे. आता त्याची पानं टवटवीत हिरवी दिसतात; काल दोन फुलंसुद्धा दिसली. पण सध्या फळं धरली तरी टिकवणं कठीण आहे. गेल्या चार दिवसांपासून, आणखी पुढे किमान १० दिवस रोज ३८ सेल्सियसच्या पुढे तापमान आहे.

अळकुड्यांना नंतर पोरंसुद्धा होतील. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला खोदून पाहा. फार गर्दी झाली तर काहीच नीट वाढणार नाही.

बाझिलची पानं सुंदर फ्रीज होतात. धुवून बर्फाच्या ट्रेमध्ये भरून फ्रीजरमध्ये टाकायची. मग ते तुकडे काढून डब्यांत किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांत भरता येतात.

मला कालच शोध लागला. इथे मलाबार स्पिनच मिळतं; ते आपलं मायाळू. मला परवा त्याची दोन क्लिपिंग मिळाली; ती जगली तर बाहेरच, जमिनीत लावेन. इथल्या हवेत टिकतं म्हणे!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो ते नर- मादी फुलं प्रकरण वाचलं मीपण. बघू . माझा मेक्सिकन मित्र फुलांचं काहीतरी करून खातो ( बहुतेक भजीसारखं  काहीतरी. विचारते त्याला). 

टोणग्या टोमॅटोला मोजून सात फळं धरलीयेत. आणि एक जरा लाल होऊ घातलंय. आमच्याकडे पण प्रचंड उष्णता आहे सध्या - स्वयंपाकघरातलं, भाज्या-तांदूळ धुतलेलं पाणी पुरत नाहीये झाडांना. 
कष्टानं मिळवलेला कढीपत्ता जरा वाढीला लागलाय. प्रत्येक झाडाच्या वाफ्यात, कुंडीत किंवा मुळापाशी एक एक हरभरा पेरलाय त्यामुळे छोटी रोपटी (तुळस कढीपत्ता ) तरारून वाढलीयेत. 
बाकी माती आमचीपण टूकारच आहे पण सध्या घरच्या कंपोस्टवर जास्त भिस्त आहे. अळूकुड्यांची गर्दी झाली तर पानं छोटी येतात का ? बेसिल सध्या पेस्तो नाही जमला तर सलाडमध्ये टाकतीये . एकंदरीत साठवणुकीचे पदार्थ करण्याचा अनुभव फारसा सकारात्मक नाहीये! 
मायाळू खाल्ल्याचं आठवत नाहीये. काय करतात त्याचं ? मला किती दिवस झाले शेवग्याचं झाड लावायचंय पण मीच ते मनावर घेत नाहीये. Smile

-सिद्धि

आमच्याकडेही भीषण उन्हाळा आहे. बहुतेक छोट्या झाडांना दर दिवसाआड किंवा दररोज पाणी घालायला लागतंय. आणि रात्री अंधार पडायला आला तरीही बाहेरच्या उकाड्यामुळे पाच मिनीटं बाहेर राहिलं तर दमायला होतंय. झाडं जगवायची तर पाणी खर्चायला लागणारच. ह्या पाण्यातून अन्न तयार होणार म्हणून मला नळाचं पाणी घालताना त्रास कमी होतो. सध्या टोमॅटो, वांगी, मिरच्या काहीही धरत नाहीये, उन्हामुळेच. आणखी महिन्याभरात हवा बरी होईलच! Smile

अळकुड्यांची किंवा कुठल्याही मुळांची गर्दी झाली तर पानं छोटी होतात; फुलं-फळं कमी धरतात, इत्यादी. खणून थोड्या खाऊन टाका किंवा नवीन ठिकाणी लावा. बाझिलची पानं धुवून मिक्सरमधून काढून बर्फाच्या ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये घातली की झालं. पेस्तो करायच्या आधी हे काम केलं की मिक्सर धुवायचे कष्टही कमी.

मायाळू खाल्ल्याचं मलाही आठवत नाहीये. नवनवे पदार्थ खाण्याचा माझा उत्साह भरभक्कम आहे! Wink पण नाव ऐकलंय. गूगलून पाककृती मिळेलच. किंवा पालक-डाळ करते तशीच मायाळूची पानं ढकलून द्यायची.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मागील बागकामाचे धागे शोधा. अचरटबाबांनी मस्त मोठ्ठा प्रतिसाद दिलायं. मला आत्ता सापडेना. मिळाला तर देते.
अदितीने सांगितलं त्याप्रमाणे मी कोंब आलेल्या अळकुड्या फक्त जमिनीत खोचून दिल्या.

-सिद्धि

अळू वाढवणे.
>>अचरटबाबांनी मस्त मोठ्ठा प्रतिसाद दिलायं. मला आत्ता सापडेना. मिळाला तर देते. >>
पुन्हा लिहितो. शोधू नका.
---–-----
आता बाजारात अळकुड्या विकायला येतील तेव्हा त्यामधल्या कोंब असणाऱ्या घेऊन या. त्या एका टोपलीत किंवा ट्रेमध्ये ठेवून मातीने झाका. कोंब थोडासा वरच्या दिशेला राहील अशा आडव्या असाव्यात .
माती कोरडी ठेवायची आहे. पाणी घालू नका. आणि धीर धरा.
जमिनीत खाली वाढणारे कंद, कांदे, गड्डे ( bulbs, roots, and stems) या सर्वांना एक दोन महिने सुप्तावस्तेत जाण्याची सवय असते. एक द़न महिन्यांनी अळकुडी वाळल्यावर किंचित पाणी शिंपडायचे. मग ते कोंब वाढल्यावर मुळ्याही आलेल्या असतात. ते कुंडीत लावा.
तर असे ठेवल्यानंतर इकडे काही अळकुड्या उकडून खाऊन खाजऱ्या नाहीत याची खात्री करा. असल्यास प्रोजेक्ट सांपल रद्द करून दुसरीकडून नवीन लॉट आणा.
बाजारातल्या मिळणाऱ्या अळकुड्या 'भाजीच्या पानाच्या ' असतात. याची अळुवडीही होते. पण अळुवडीचे कंद भाजीवाल्या बायकांना सांगितल्यास त्या आणून देतील. तीन किंवा सहा हवेत.
--------
दुसरी जलद पद्धत - कुणाकडे अळू लावलेले असल्यास त्याला आजुबाजूस फुटवे येतात त्या अळकुड्यांना मुळे आणि पानेही असतात. त्या लावल्यास लगेच अळू मिळेल.

इजिप्तात पपायरसपासून कागद, किंवा कागदाचा पूर्वज बनवला गेला; आणि त्यावर हिशोब, जमिनीचे तेव्हाचे ७-१२चे उतारे वगैरे लिहिले गेले असं म्हणतात. मला हे झाड अपघातानंच, फेसबुकवर सापडलं. शहराच्या दुसऱ्या टोकाला एक बाई तिच्या घरी अंदाधुंद वाढलेला पपायरसचे शेंडे विकायला काढत होती. तोवर हे झाड कसं दिसतं, इथे ऑस्टिनात ते उगवतं, कसला काहीही पत्ता नव्हता. पण तिनं तिच्या घरी वाढलेल्या पपायरसचे फोटो दाखवले होते. मग मी लगेच हौशीहौशीनं गूगल केलं.

आठ दिवसांपूर्वी पपायरसचे हे शेंडे पाण्यात टाकले होते. आज बारकी मुळं दिसली. इंटरनेटवर लोक खोटं बोलतात - कुणीसं म्हणालंय, तीन आठवडे लागतात. ही ती मुळं -

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेजारचा डेटा बोका येतो; त्याचं मूळ घर सापडलं. मग समजलं की त्याची नोकर के हीसुद्धा हौशीनं बागकाम करते. तिनं मला काही कर्दळीचे कंद देऊ केले. पण तेव्हा उन्हाळा वाढत चालला होता. मी सुचवलं की उन्हाळा कमी झाला की हे काम करू.

आज सकाळी तिला मी काही इतर कंद दिले. नेकेड लेडी, असं त्या फुलांचं नाव आहे. तिच्याकडे अंजीराचं झाड आहे, त्याची अंजीरं उन्हाळ्यात मिळाली होती. तिथेच खाली लाल यका वाढत होते, पण त्याला पुरेशी जागा नव्हती. तो मोठा पहाड दोघींनी खोदला. शिवाय कर्दळ, पुदिना आणि इतर काही झाडं तिनं दिली. कर्दळ वगळता बाकीची सगळी झाडांच्या सावलीखाली वाढणारी.

हा लाल यकाचा फोटो, जालावरून. एवढं बागकाम करून आता माझे हात, पाय, पाठ, सगळंच मोडलं आहे. तिनं दिलेल्या यकाचा फोटो नंतर कधीतरी.
यका

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुंदर आहेत गं फुलं. मस्त रंग आहे.

अवकाडोच्या बिया आणि साली बरेच वर्षे कंपोस्टात ढकलुन देतेय. एकंदर जमिनीचा कस सुधारावा म्हणून कंपोस्ट जमिनीत ढकलुन देतेय. तर त्या कंपोस्टातल्या न कुजलेल्या बिया रूजुन चार अवकाडोची रोपं आलीयेत.

-सिद्धि

अरे मस्त!! जीजीविषा Smile

अरे मस्त!! जीजीविषा Smile

तुमच्याकडे एवढी झाडं वाढवायला जागा नसेल तर फेसबुकवर वगैरे विचार. अशी रोपं मी स्थानिक लोकांत वाटून टाकते.

आव्होकाडोच्या बिया, बिया कसल्या बाठीच म्हणल्या पाहिजेत आणि साली लवकर कुजत नाहीत. इतर बिया पेरण्यासाठी आव्होकाडोच्या साली वापरता येतील. सालीला भोक पाडायचं आणि त्यात बी पेरायची. रोप वाढलं की सालीसकट जमिनीत, कुंडीत लावायचं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजुन पिटकी पिटकी आहेत ग. कालच त्यांतलं एक छाटलं. अजुन थोड्या महिन्यांनी त्याला जास्त जागा लागेल. तेंव्हा जागा करू किंवा कुंडीत हलवू.
चारही नीट जगली, वाचली, वाढली तर कदाचित एखादं देईन कुणाला तरी. बघु,
चांगलं कुटुंब सापडलं तर.

-सिद्धि

मी तशी काही वाईट कुटुंबातली नाही, पण माझ्याही हातून काही झाडं मेली आहेत. एकेकाळी घरातली चिकार झाडं मी मारली होती; आता तो दर फारच कमी आहे; कदाचित शून्याखाली गेला असेल.*

मी झाडं देताना बहुतेकदा वस्तुविनीमय पद्धत वापरते. "माझ्याकडे हे झाड आहे, कुणाकडे ते झाड आहे का?" छाप.

* आहेत त्या झाडांची कलमं करते, किंवा बियांपासून नवीन तयार करते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुला देईन मग!

-सिद्धि

प्रत्यक्षात तुला भेटून तुझ्याकडून झाड घ्यायला मला फार आवडलं असतं. पण मुडदा बशिवला ह्या करोनाचा!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग काय आता पोष्टाने पाठवणार काय?

बॅलटं वेळच्यावेळी पोचवणार नाहीये म्हणे यावेळी पोष्टखाते. तुमच्या झाडाचे काय होणार ते तुम्हीच ठरवा बुवा.

माझ्याकडे आता दोन मोठे मोगरे आहेत. पाच वर्षांपूर्वी व्हर्जिनियातून चारेक इंची रोप आलं होतं ते एवढं वाढलंय.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डबलमोगरा आहे की एकेरी फूल येणारा? फोटो टाक फुलं आली की.

हा साधा मोगरा आहे. सध्या दोन-चार कळ्या आहेत. खरा हंगाम जूनमध्ये. दोन्ही मोठाली झुडपं मिळून रोज ५०-१०० फुलं येतात.

सुरुवातीला हे एकच झुडूप होतं, बारकं होतं आणि कुंडीत होतं. माझ्या हातून चुकून एक मोठीशी फांदी मोडली. हिवाळा होता. ती पाण्यात ठेवून जगवली आणि वश्या आल्यावर मातीत खोचली. आता मूळ झाड कुठलं हेच विसरून गेल्ये. आता पुन्हा दोन्ही झुडपं भादरायची वेळ आल्ये, खूप वाढल्येत. त्या सगळ्या काटक्या, फांद्या जमिनीत खोचून नवीन झाडं बनवून लोकांत वाटून टाकेन.

फेसबुकवर असे खूप स्थानिक, उत्साही लोक भेटलेत. ह्या शनिवारी एकीकडून आयरिस देऊन कर्दळीचे कंद घेऊन येणारे. गेल्या रविवारी डेटा बोक्याच्या घरचे दोन मोठे, कर्दळीचे कंद मिळाले.

डबलमोगरासुद्धा आहे. पण त्याची परिस्थिती फार थोर नाहीये. जिवंत आहे, फुलं येतात. पण पानं फार हिरवीगार दिसत नाहीत. तोही जमिनीत लावून द्यायचा विचार करत्ये. जमिनीत घरचं कंपोस्ट वगैरे घालून त्यातच तो लावून दिला की त्याला जास्त नियमितपणे पाणी मिळत राहील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके. आयरीस अफाट सुंदर फूल आहे.

त्यावेळचे पोष्टखाते वायले, नि आताचे वायले. एवढेच निदर्शनास आणून मी आता खाली बसतो.

धन्यवाद.

हे लक्षात आलं नाही. सहमत आहे.

सक्युलंटं (घायपात?) मागवायला भीती वाटत नाही; पण एरवी ज्या झाडांना जास्त पाणी लागतं ती झाडं पोस्टानं मागवणं नको वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बागेत खूप फुलझाडे(चाफा, पाच वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद,गोकर्ण, गुलाब ईई.), पपई, चिक्कू, शेवगा,दोन लिंबू, कढीपत्ता, आंबा, नारळ, कोथिंबीर, पुदिना, आणि मोठ्ठे प्राजक्ताचे झाड आहे.
फोटो डकवले असते, पण स्वतः कधी बागेत जाऊन काम कोरोना आधी केले नसल्याने राहू दे. माझं क्रेडिट नव्हच ते.

पण ताळेबंदीमध्ये बागकाम आवडू लागले मलापण.

तुम्ही फोटो डकवाच; लोकांच्या बागांचे फोटो बघून आणखी कल्पना सुचतात.

मी बागकाम सुरू केलं कारण मला तेव्हा नोकरी करता येत नव्हती. मग गूगलून बागकाम सुरू केलं. बऱ्यापैकी जमलं. ह्याचं कारण माझ्याकडे कला किंवा विशेष काही कौशल्य आहे असं नाही. गूगलवर चिकार माहिती असते; मी ती नीट वाचून समजून घेते; त्यात डोकं घालते आणि नियमितपणे कष्ट करते म्हणून झाडं जगतात. झाडांना मानवणारी हवा आली की झाडं फुलतात, फळतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. पहिले चित्र दिसत नाही.
२. फुलांची, झालेच तर त्या निळ्याहिरव्या कीटकाची, रंगसंगती सुंदर. फुलांचे क्लोज़अपही छान.
३. तो पुदिन्याची पाने खाणारा जो कोणी प्राणी (गाय? बकरी?) आहे, तो क्यूट आहे.
४. मागच्याच अंकात क्यूट हा शब्द वापरल्याने, मांजरांबद्दल पुन्हा तो वापरला, तर तोचतोचपणा येईल, म्हणून दुसरा पर्यायी शब्द आठवेपर्यंत प्रतिसादस्थगिती. अन्यथा, क्यूट हा शब्द दुसऱ्यांदा चालत असल्यास तूर्तास तोच गोड मानून घ्या.

एखादं जास्वंद वगळता माझ्याकडे ह्यांतलं एकही झाड नाही. फारच असूया वाटली. एक तिर्री मांजर तेवढी घरी आहे, अधूनमधून फोटो काढायला पोझ देते.

मांजरांच्या मागचा चाफाही काय सुंदर आहे! माझ्या शेजारच्या डेबीकडे चाफ्याची वेगवेगळी झाडं आहेत. पण हिवाळ्यात ती सगळी घरात न्यावी लागतात, त्यामुळे ती एवढी छान कधीच दिसत नाहीत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्राजक्ताचा सडा, जास्वंदी, हिरवा मोरपंखीरंगी बीटल, फार आवडले. पिवळळ्या लिलीचे बी मिळाले आहे. सध्या पांढरी आहे. फुले नसतानाही ही लिली छान दिसते.
बागेत जात नाही म्हणता मग कोणाची कमाल आहे?
मांजरीही छान आणि जास्वंद ओरबाडऱ्या गायीचा फोटो आवडला.

.

लिलीचे बी सहज रुजते का ? की बी रुजण्यासाठी बीजप्रक्रीया करावी लागते ?

लीलीचे कांदे असतात म्हणजे कांद्याप्रमाणेच लावले पाहिजे. पांढरी लीली आहे त्याचे कांदेच मिळाले होते. त्यामुळे काम सोपं झालं होतं.
पण बिया लावायच्या झाल्यास थोडी माती भाजून घेतलेली बरी. आणि माती भरलेला खोका / कुंडी टांगून ठेवणे सेफ.
शिवाय पाणी एकदाच दिल्यावर रोपे उगवेपर्यंत परत पाणी टाकायचे नाही.

बी रूजायला किती दिवस लागतात ?

कर्दळीचं बी मात्र हट्टी असतं .वेगवेगळ्या कुंडीत दुसऱ्या झाडांत टाकून विसरून जायचं. कधीतरी अचानक दोन महिन्यांनी झाडं दिसू लागतात आणि विचार केल्यावर आठवतं - अरेच्चा कर्दळ उगवली वाटतं. कुंडीत दुसरं झाड अगोदरच असल्याने कुंडी रिकामी दिसत नाही आणि पाण्यावर नियंत्रण आपोआपच राहातं. कांदे वाढवणं मात्र फारच सोपं.