सत्तातुराणाम् न भयं न लज्जा...

.xxx काही वर्षापूर्वी रॉबर्ट ग्रीन या अमेरिकेतील ‘एस्क्वॉयर’ नियतकालिकाच्या संपादकाने लिहिलेले व (भरपूर मार्केटिंगचे तंत्र वापरून) गाजविलेले ‘48 लॉज ऑफ पॉवर’ हे पुस्तक म्हणजे 15व्या शतकातील निकोले मायकेव्हेलीचीच सुधारित आवृत्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘दि प्रिन्स’ या मायकेव्हेलीच्या गाजलेल्या पुस्तकात सत्ता कशी काबीज करावी, सत्ता कशी टिकवावी व विरोधकांच्यावर मात कसे करावे याबद्दलचे काही उपयुक्त सल्ला-वजा-डोज दिले होते. मुळात त्या काळच्या सरंजामशाहीत राजे-राजवाडे, त्यांचे वारसदार यांना मायकेव्हेलीचे हे पुस्तक म्हणजे जणू काही बायबलच होते. सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर सत्तेचा दीर्घकाळ उपयोग करून घेण्यासाठी व इतर सामान्यांच्या परिश्रमावर स्वतःचे शान-शौकीन चंगळवादी जीवन जगण्यासाठी दिलेला तो मंत्र होता. व पुढील दोन-तीनशे वर्षे या पुस्तकाची ‘राज’प्रियता तसूभरही कमी झाली नव्हती.

परंतु लोकशाहीचे वारे वाहू लागले. सर्व राजे/राजकुमार सत्ता काबीज करण्यासाठी वेगळी वाट चोखाळू लागले. या सर्वांना लोकशाहीचा भलताच उमाळा आला होता. त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी ‘मनी’ व ‘मसल्’ पॉवरचाच आधार घेत त्या त्या देशातील महत्वाच्या व मोक्याच्या पदावर विराजमान होऊन आपण काय काय करू शकतो याची चुणुक ते दाखवू लागले. राजा म्हणजे खुद्द परमेश्वरच वा परमेश्वराचा अंशच हे डोक्यात भिनवून घेतलेली भोळी-भाबडी प्रजा अजूनही, २१व्या शतकातसुद्धा, कुर्नीसात करत असल्याची उदाहरणं आपल्या देशातील राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या राज्यात सापडतील. इंग्लंडमधील राजघराणे व त्या घराण्यावर प्रेम करणारे अजूनही शिल्लक आहेत हे आपल्या बुद्धीच्या दिवाळखोरीचे जिवंत उदाहरणं आहेत. आपला लोकशाहीचा प्रवास सरंजामशाही, घराणेशाही यातून सरकत सरकत पुढे नेत नेत येथपर्यंत पोचली आहे. व ही लोकशाही नेहमीच सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालत असते, हे एक उघड गुपित आहे. इतरावर वर्चस्व गाजविण्यासाठी, इतरांच्या कमकुवतीचा फायदा घेण्यासाठी अधिकारपदाला पर्याय नाही, हाच मंत्र अशा प्रकारच्या व्यवस्थापनशास्त्रात शिकविले जात असावे.

सत्तेची गुर्मी एकदा अंगात चढली की त्यातून बाहेर पडणे फारच अवघड ठरू शकते. म्हणूनच अगदी सामान्यातल्या सामान्यालासुद्धा सत्तेचा, एक तुकडा का होईना, हवा असतो. सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्यामुळे शहाणी सुरती माणसं सत्तेपासून चार हात दूर राहण्यास प्रयत्न करतात. परंतु ज्यांना सत्ता हवी असते व दीर्घकाळ निरंकुशपणे भोगावेसे वाटते त्यानी ‘48 लॉज ऑफ पॉवर’ वाचायले हवे. कारण या पुस्तकात सत्तेसाठी आपल्यात कुठले गुण अंगी बाळगावे, अधिकारप्राती व अधिकार टिकविण्यासाठी कुठल्या रणनीतीचा अवलंब करावा, आपले हितसंबंध कसे जपावेत, सत्तेच्या खेळातील फासे कसे उलटवावेत इत्यादींचा एक रेडीमेड आराखडाच दिला आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखक उघडपणे हे पुस्तक फसवेगिरीमार्फत कार्यसिद्धी करण्याच्या विषयातील प्रत्यक्ष मार्गदर्शक असे हँडबुक आहे. ... यातील सूत्रे प्रत्यक्ष वापरात आणल्यास आधुनिक जगामध्ये तुम्ही भरभराटी करू शकाल, आतून मात्र तुम्ही लबाडीने पुरते कह्यात ठेवणारे कावेबाज असलात तरी शिष्टसंमत चांगुलपणाचा आदर्श नमूना म्हणून वरकरणी तुमची छाप पडेल. या हँडबुकच्या मदतीने जोमाने प्रगती करणे तसेच उच्चपद गाठणे तुम्हाला शक्य होईल. असे म्हटलेले असल्यामुळे तुमच्या आधिकार लालसेच्या आड येणाऱ्यांच्या पाठीतून सुरा खुपसायचा तर हातावर मलमलीचा हातमोजा आणि चेहऱ्यावर अगदी गोड-प्रेमळ हसू आणायचा यावर येथे भर दिला जात आहे. आयन रँड या लेखिकेने ज्या प्रकारे Greed is Good चे समर्थन करून तिचाच एक पंथ निर्माण केल्यासारखे रॉबर्ट ग्रीनच्या या पुस्तकामुळे हा लेखकही अमेरिकेतील कल्ट फिगर झाला आहे. अमेरिकेतील तुरुंगातील कैद्यांच्या लायब्ररीत या पुस्तकाला प्रचंड मागणी असते.

‘48 लॉज ऑफ पॉवर’ या पुस्तकातील सत्तेच्या शिडीची एकेक पायरी चढत वरपर्यंत पोचण्यासाठी आपल्या अंगात कुठले कुठले गुण हवेत, कुठले कुठले डावपेच आखले पाहिजेत व त्यांची अंमलबजावणी कसे करता येईल याचा एक सुसज्जित योजनाच आपल्यासमोर ठेवत आहे. खरे पाहता सेल्फ-हेल्पची ढिगाने पुस्तकं असताना या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. कारण शंभर दिवसात कोट्याधीश कसे व्हावे, यशस्वी होण्याचे मंत्र अशा प्रकारचे शीर्षक असलेली पुस्तकं वाचून अमुक अमुक श्रीमंत झाला आहे असे ऐकीवात नसताना व खुद्द लेखकच प्रकाशकाकडे मानधनासाठी खेपा घालत असताना या पुस्तकाचा लेखक, रॉबर्ट ग्रीन सत्तेच्या शिखरावर का चढला नाही असे वाटणे साहजिकच आहे.

yyy हे 48 जीवनसूत्रं तरी कोणते हे समजून घेतल्यास सत्ता हाशील करण्याचा मार्ग सुकर होईल असे लेखकाला विश्वास वाटतो. त्याच्या मते सत्ता हाशील करण्यासाठी

1. तुमच्या वरिष्ठापेक्षा जास्त चमकू नका.
2. मित्रावर जास्त विसंबू नका. शत्रूंचा वापर करायला शिका.
3. तुमचे प्रयोजन झाकून ठेवा.
4. नेहमी आवश्यकतेपेक्षा कमी बोला.
5. कीर्तीवरच सर्व काही अवलंबून आहे. प्राणपणाने त्याची जपणूक करा.
6. कुठलीही किंमत मोजून लक्ष वेधून घ्या.
7. इतराकडून कामे करवून घ्या. त्याचे श्रेय मात्र तुमच्या खात्यात जमा होऊ दे.
8. गरज पडल्यास आमिश दाखवा. इतरानाच तुमच्याकडे येऊ द्या.
9. विवाद्य बडबडीपेक्षा कृतीने जिंका.
10. साथीच्या रोग्यासारख्या असणाऱ्या दुःखी व दुर्दैवी यांचा सहवास टाळा.
11. लोक तुमच्यावर अवलंबून असू देत.
12. निवडकपणे प्रामाणिकता व औदार्य यांचा वापर करा. तुमच्या सावजाला निःशस्त्र करा.
13. तुम्हाला मदत करण्यात इतरांचे फायदे काय आहेत यावर भर द्या. लोकांच्या दया व औदार्याला आवाहन करू नका.
14. मित्रासारखे रहा. हेरासारखे पाळत ठेवा.
15. शत्रूचा संपूर्ण बिमोड करा.
16. आदर आणि सन्मान वाढविण्यासाठी अनुपस्थितीचा (उशीरा येण्याचा) वापर करा.
17. इतरांना अंधारात ठेवा.अकल्पनीय खेळीची हवा वाढीस लावा.
18. स्वतःच्या बचावासाठी किल्ले बांधू नका. एकांत धोकादायक ठरतो.
19. कोणाबरोबर वाटाघाटी करताय ते जाणून घ्या. चुकीच्या माणसाला दुखवू नका.
20. कोणालाही वचन देवू नका
21. दुधखुळे वागून दुधखुळ्यांना आकर्षित करा. तेच तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, हे ठसवा.
22. शरणागतीची युक्ती वापरा. दैन्याचे बलामध्ये परिवर्तन करा.
23. तुमच्या शक्तीवर चित्त एकाग्र करा.
24. खुशामतीचे तंत्र वापरा.
25. स्वतःत बदल घडवून आणा.
26. तुमचे हात निष्कलंक असू द्यात.
27. विश्वास ठेवण्याच्या लोकांच्या गरजेचा फायदा घ्या. व्यक्तिपूजक अनुयायांचा पंथ निर्माण करा.
28. कृतीच्या रिंगणात बेधडक उतरा.
29. अंतिम परिणतीच्या क्षणापर्यंत नियोजन करा.
30. तुमचे संपादित सामर्थ्य हे विनासायास आहे, असे वाटू द्या.
31. पर्यायावर तुमचे नियंत्रण राहू द्या. तुमच्या कामाचे पत्ते इतरांनी पिसू द्या.
32. लोकांच्या स्वप्नांचा व्यापार करा.
33. प्रत्येकाचा कमकुवतपणा शोधून काढा.
34. पेहेराव व थाटमाट राजेशाही ठेवा.इतरांनी तुम्हाला ‘राजा’ गणण्यासाठी राजासारखे वागा
35. वेळ साधण्यात नैपुण्य मिळवा.
36. तुम्ही प्राप्त करू शकत नाही त्या गोष्टींची तुच्छता बाळगा. दुर्लक्ष हीच शत्रूवर मात करण्याची उत्कृष्ट रीत आहे.
37. नजरेला कैद करणारा भव्य देखावा निर्माण करा.
38. रुचेल तसा विचार करा; पण आचरण मात्र इतरांसारखेच असू दे.
39. मासे पकडण्यासाठी पाणी ढवळून काढा.
40. मोफतच्या जेवणाचा तिरस्कार करा.
41. महान व्यक्तीची भूमिका गिरविणे टाळा.
42. मेंढ्या विखुरण्यासाठी मेंढपाळाला दणका हाणा.
43. इतरांच्या हृदयाचा ठाव घ्या. त्यांच्या मनावर प्रभुत्व मिळवा.
44. प्रतिबिंब-प्रभावाचा परिणाम साधा. शत्रूला क्रोधाविष्ट करून त्याला निःशस्त्र करा.
45. बदलाच्या आवश्यकतेचा उपदेश करा. पण एकाएकी खूप सुधारणा करू नका.
46. कधीही अतिप्रवीण व पारंगत दिसू नका.
47. हेतूच्या नक्की केलेल्या निशाणापलीकडे जाऊ नका. विजयाच्या क्षणी कुठे थांबायचे ते शिका.
48. निराकारत्वाचा बहाणा करा.
('सत्ता' पुस्तकाचे अनुवादिका अनघा दिघे यांच्या सौजन्याने)

या पुस्तकातील एकेक सूत्राबद्दल वाचत गेल्यास यात काय चूक आहे, असेच वाटण्याची शक्यता आहे. परंतु थोडेसे विचार केल्यास पुस्तकातील या सूत्रांचे समर्थन करत असताना आपल्याला माहित असलेले सत्य, प्रामाणिकपणा, औदार्य, अनुकंपा, सहानुभूती, पारदर्शिकत्व, मैत्रीचे पावित्र्य, मानवीयता, चांगल्या गोष्टींचे अनुकरण, साधेपणा, साधन शुचिता, इत्यादी प्रकारच्या जीवन मूल्यांना पायदळी तुडवूनच अधिकार गाजविता येते हाच संदेश दिला जात आहे. परस्पर सहकार, समाजाशी बांधिलकी, त्याग, कारुण्य, यांचा या लेखकाच्या व्यवस्थापनशास्त्रात स्थान नाही.

बसु चटर्जी यांच्या 'छोटी सी बात' या गाजलेल्या चित्रपटात अशोक कुमार यानी अमोल पालेकरला विद्या सिन्हाला वश करण्यासाठी अशाच प्रकारचे व्यवस्थापनाचे धडे दिलेले आपल्यापैकी काहींना आठवत असेल. ज्या आक्रमक रीतीने अमोल पालेकर त्यांची तंतोतंत अंमल बजावणी करतो, त्याला तोड नाही. व या शास्त्रापुढे टिकू न शकल्यामुळे असरानी नामोहरम होतो. खरे पाहता अमोल पालेकर व असरानी या दोघांच्यात ही स्पर्धा असते. फेअर प्ले असल्यास कदाचित विद्या सिन्हा असरानीशीच लग्न केले असते. परंतु अशोक कुमारच्या मतलबी सल्ल्यामुळे अमोल पालेकर असराणीवर मात करून विद्या सिन्हाला पटकावतो. साध्या भोळ्या अमोल पालेकरला स्ट्रीट स्मार्ट बनविण्यात अशोक कुमारच्या धड्यांचा फारमोठा वाटा आहे, यात शंकाच नसावी. अशाच प्रकारचे थीम असलेले कित्येक चित्रपट व सिरियल्स पडद्यावर नक्कीच पहायला मिळतील. व यात काही तरी चुकत आहे याची पुसटशी शंकासुद्धा मनाला शिवत नाही. राजकारण्यांची सत्तालालसासुद्धा कमी जास्त प्रमाणात याच सूत्रांचाच अवलंब करत असेल. कुठलाही विधी निषेध न बाळगता अत्युच्च शिखरावर ते कदाचित शिखरापर्यंत पोचतही असतील.

कदाचित व्यवस्थापन संस्कृती वाढविण्यासाठी अशाच प्रकारचे धडे घेऊन व्यवस्थापनाच्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेले देशाची धुरा संभाळत असावेत. त्यांना स्वतःच्या स्वार्थाव्यतिरिक्त दुसरे काही दिसत नसल्यामुळे येनकेन प्रकारे ते वरपर्यंत पोचत असावेत. म्हणूनच ‘सत्तातुराणाम् न भयम् न लज्जाम्….’ असे म्हणावेसे वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या पुस्तकाचे पहीले प्रकरण ऑडिओ बुकवर ऐकले व किळस आली. गंमत म्हणजे जवळचे काहीजण याचे समर्थन करताना पाहीले. आश्चर्य वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉलेजमध्ये असताना इंग्रजी पुस्तक डिक्शनरी सोबत घेऊन वाचण्याचा एकदा निष्फळ प्रयत्न केला होता. तेव्हा फार बोअरिंग वाटत होते.
नंतर युट्युबवर समरी व्हिडीओ पाहिला या पुस्तकाचा. सीकेन नावाचे बरे चँनल आहे सारांशरुपात पुस्तके समजून घ्यायला.
मनुष्य स्वभावातच सहजासहजी सत्ता सोडली जात नाही. माझ्या मनासारखेच झाले पाहिजे असा दुधखुळा समज घरातल्या वडीलधाऱ्यांंपासून, ऑफिसमध्ये सिनियरपर्यंत, गावपुढाऱ्यापासून ते देशव्यापी नेतृत्वापर्यंत सगळ्यांचाच असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

जेवढा हलकट तेवढा वरचढ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा पद्धतीने सत्ता काबीज करता आली तरी ती कितपत टिकाऊ असेल?
कारण एकदा लोकांचा भ्रमनिरास झाला की सगळ्याचा शेवटच होणार ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

उजेडात होते पुण्य - अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे - कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी- घडे लोकसेवा
उघड दार देवा आता.......