एक्स्पायरी डेट

आपल्याला मृत्यू गाठण्यापूर्वी कुठल्या कुठल्या अनुभवांची शिदोरी जमवावी?
या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अनेक पुस्तकातून, धर्मग्रंथातून वा टीव्हीवर (रतीब घालणार्‍या) विविध चॅनेल्समधून शोध घेतल्यास नक्कीच मिळू शकेल. आपल्या आयुष्यभरात कुठली प्रेक्षणीय स्थळं पहावीत, कुठली पुस्तकं वाचावीत, कुठल्या मैफलीत हजेरी लावावी, कुठले चित्रपट, कुठली नाटकं, लोककला (तमाशा!) पाहावीत, कुठल्या चित्तथरारक खेळांचा आस्वाद घ्यावा, कुठली छंदं जपावीत, कुठली भाषा शिकावी इत्यादींची एक लांबलचक यादी प्रत्येकाला नक्कीच करता येईल. नेमकी डेट माहित नसली तरी प्रत्येकाची एक्स्पायरी डेट ठरलेली असते. कधी ना कधी मृत्यू आपल्याला गाठतोच. त्यामुळे वेळ व उपभोगवायचे अनुभव यांचा मेळ बसविणे जिकिरीचे वाटू लागते.

हे सर्व वाचताना काही तरी खटकल्यासारखे (काहींना!) वाटेल. प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसारच या अनुभवांची गाठ बांधत असतो. तरीसुद्धा काही तरी राहून गेले अशी चुटपुट मनाला टोचत असते. परंतु अशा प्रकारचे अनुभव घेत राहण्यासाठी आपल्यावर कुठूनतरी दबाव येत असतो हे तरी माऩ्य करायला हवे. इतरांचे ऐकत असताना आपण अमुक अमुक एक गोष्ट केलेली नसेल तर आपले आयुष्य निरर्थक आहे असेसुद्धा वाटू लागेल.

एक मात्र खरे की आपले हे आयुष्य मर्यादित काळासाठी असते. त्यातूनही उत्स्फूर्ततेने बिनधास्तपणे अनुभव उपभोगण्यासाठी शरीराची साथ हवी असते. परंतु ती फार काळ टिकत नसते. त्यामुळेच आपला वेळ सार्थकी लावायला हवे हे पालुपद अगदी लहानपणापासून आपल्याला ऐकविले जात असते. चाकोरीबद्ध आयुष्य घालविण्यापेक्षा - थोडासा त्रासदायक असला तरी - नवीन नवीन अनुभवांना सामोरे जाण्यातच आयुष्य सार्थकी लागेल ही मानसिकता बळावत असते. भरमसाट वस्तूंची खरेदी करून राहत्या घराचे वस्तू संग्रहालय बनविण्यापेक्षा व त्यासाठी पैसा उधळण्यापेक्षा विविध अनुभवासाठी पैसा खर्च केल्यास माणूस जास्त समाधानी राहतो, असे संशोधकांचे मत आहे.

परंतु आपण अशा प्रकारच्या सांस्कृतिक/सामाजिक दबावाला बळी पडता कामा नये.

मुळात आपली अनुभव घेण्याची क्षमता आपले व्यक्तिमत्व, आपण जोपासत असलेली जीवनमूल्ये व त्यासाठी मोजावी लागणारी किंमत यावर निर्भर असते. एकच गोष्ट जास्तीत जास्त वेळा केल्यास वेळेचा सदुपयोग होतो, हे मात्र खरे नाही. याचप्रमाणे प्रत्येक वेळी अत्यंत नवीन चित्तथरारक अनुभवाच्या शोधात असल्यास त्याचाही कंटाळा येणे स्वाभाविक आहे. म्हणूनच रोजच्या कामातच थोडा फार वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या अनुभवात नक्कीच भर पडू शकेल. नाविन्यपूर्ण अनुभवात मन रमत असले तरी अशा अनुभवाव्यतिरिक्त करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत व त्यातूनही थोडे फार समाधान मिळू शकते, याचेही भान हवे. समृद्ध आयुष्य म्हणजे असल्या छोट्यामोठ्या अनुभवात आणि असले अनुभव मनापासून enjoy करण्यातच आहे हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

त्यामुळे शीर्षकातील प्रश्नाचे उत्तर यासाठी मुद्दामहून काहीही करायची गरज नाही असे असू शकेल. अनुभवातील विविधता ही एक अट ठरल्यास आपण कुठे थांबावे याची कल्पना येणार नाही. आपण अनेक गोष्टी करू शकतो हे कितीही खरे असले तरीही आपण या सर्व गोष्टी करायलाच हव्यात असे काही नाही. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टी करण्यातसुद्धा आपण आनंद मिळवू शकतो, समाधानी राहू शकतो.

आपली 'मुदत' संपायच्या आतच जास्तीत जास्त गोष्टी करण्याच्या हव्यासापोटी आपण जेव्हा rat raceमध्ये सहभागी झालो हेच कळत नाही. प्रत्येक सेकंदाचा हिशोब करत थराराच्या मागे लागल्यामुळे आपल्या हाती काहीच लागत नाही. मोठमोठे छिद्र असलेल्या भांड्यातून पेय पिल्यासारखी ती अवस्था असते. वर्तमान काळ आपल्या हातातून निसटून केव्हा भूतकाळ होतो याची कल्पनाच येत नाही.

प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला समृद्ध जीवन जगण्याची (सुप्त) इच्छा असते. परंतु जगत असलेले आयुष्य ही एक वर्तमानातील घटना असते. आपण भूतकाळ आठवू शकतो; भविष्याचा विचार करू शकतो. परंतु आपल्याला वर्तमानकाळातच पाय रोवून जगायचे आहे. कदाचित काहीना हे अर्धसत्य वाटेल. कारण वर्तमानकाळात जगत असतानासुद्धा आपण भूतकाळ विसरू शकत नाही. त्या उत्कट कडू/गोड आठवणी, आपल्या इच्छा - आकांक्षा, आपल्या अपेक्षा, आपण हाती घेतलेले प्रकल्प आपल्याला कायम सतावत असतात. काही क्षण रोमांचकारी अनुभवाचे असले तरी आयुष्याच्या रहाटगाडग्यातून कुणालाही सुटका नाही. त्याचबरोबर फक्त आजचाच विचार करत जिवंत राहत असल्यास तीच उद्याची डोकेदुखी ठरू शकते.

जगत असलेला प्रत्येक क्षण महत्वाचा असला तरी त्या क्षणाचे नेमके मूल्य किती याचा आपल्याला अंदाज येत नाही. आनंदाच्या परमोच्च बिंदूचे मूल्य वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळे असू शकेल. किंवा व्यक्तिसापेक्ष असू शकेल. चांगले जेवण म्हणजे अन्न घटकांचे तुमच्या taste bud शी होत असलेली रासायनिक प्रक्रिया एवढ्यापुरते ती मर्यादित नसते. तुमचे हे जेवण कुठे, कधी, कुणाबरोबर यावरही अवलंबून असते.

आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवायला हवे याबद्दल दुमत नसले तरी जिवंत अनुभवासाठी जीवनमार्गातील प्रत्येक टप्प्यावर थांबतच जावे याची गरज नाही!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

विचार करण्यासारखा विचार आहे!
तुर्तास पोच.. विस्ताराने प्रतिक्रीया नंतर देईन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'अनुभव' कधी आणि कसे येतील याचे गणित नाही हे खरेच. कधी चालण्याने अनुभव येतो तर कधी थांबण्यानेही येतो. ठरवून काही अनुभव घेता येतात तर काही ठरवूनही घेता येत नाहीत. 'मुदत संपणे' हे तत्त्वतः माहिती असले तरी तो अनुभव कधी येतो का? कदाचित त्याच्या जवळपास जाणारे अनुभव असतीलही - पण तो अनुभव? फक्त 'एक्सापायरी डेट' लक्षात ठेवून आपण अनुभव घेतो असं खात्रीशीर म्हणता येईल का? की ती विसरल्यानेच आपली अनुभव घेण्याची क्षमता ताजीतवानी राहते?

मला वाटतं 'एक्स्पायरी डेट'च्या पुढे काय - या प्रश्नाच्या उत्तरावर (म्हणजे आपल्या समजुतीवर, कारण उत्तर कोणाजवळही नाही) आपण कसे अनुभव घेतो हे अवलंबून असतं ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या वेळेचा लेख थोडा निगेटिव्ह वाटला. नानावटींच्याच पुर्वीच्या लेखात (पहा उद्दिष्टपूर्ती: http://aisiakshare.com/node/678 ) मात्र त्यांचा संदेश ह्या लेखा पेक्षा जास्त पॉसिटीव्ह आहे असं मला वाटतं. आयुष्यात काय काय मिळवायचं आहे, करायचं आहे याचे निर्णय उद्दिष्टपूर्ती या लेखात म्हणल्याप्रमाणेच घेतले तर या लेखात निर्माण झालेली द्विधा परिस्थिती निर्माण होणार नाही असे वाटते. (किंवा, निर्माण झाली तर त्यावर तोडगा कसा काढायचा हे माहित असेल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

भरमसाट वस्तूंची खरेदी करून राहत्या घराचे वस्तू संग्रहालय बनविण्यापेक्षा व त्यासाठी पैसा उधळण्यापेक्षा विविध अनुभवासाठी पैसा खर्च केल्यास माणूस जास्त समाधानी राहतो, असे संशोधकांचे मत आहे.

हे आवडलं.
आज आणखी एक मजेशीर विचार वाचनात आला.
कोणतंही पुस्तक एकदा वाचून झालं की, त्या व्यक्तीपुरतं त्याचं महत्त्व संपतं. (काही पुस्तकं ही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात, असं काही लोक म्हणत असतात. ते लोक जेवढ्या वेळा एकच पुस्तक परत परत वाचतात, तेवढी नवी पुस्तकं वाचण्यापासून दुरावतात हेही खरं.) अशा वेळी ते आपल्याकडेच ठेवण्यात पॉइंट नसतो. ते दुस-याला वाचायला देऊन टाकावं, त्यानंही त्याचं वाचून झालं की आणखी कुणाला तरी देऊन टाकावं. असं झालं तर पुस्तकांचा यथायोग्य उपयोग होतो आणि त्यांचा प्रसारही होतो. पण इथंच माणसाचा स्वार्थीपणा आड येतो. तो आपली कुठलीच गोष्ट सहसा इतरांना द्यायला तयार होत नाही. स्वत: विकत घेतलेलं पुस्तकही इतरांना देत नाही. यातून त्याचा हावरेपणा आणि चेंगटपणा उघड होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.