Skip to main content

शुभवर्तमान ........ ?

Maharashtra Covid Graph
महाराष्ट्रातील रुग्ण (प्रतिमा आंतरजालावरून साभार.)

कोरोनाची आपल्याकडील दुसरी लाट कशामुळे आटोक्यात येत असेल याविषयी चिंतातुर जंतू व मी काल खूप वाद घालत होतो.
दुसऱ्या लाटेचा मागोवा घेता घेता साथ आटोक्यात कशामुळे येते याबद्दल काही संदर्भ मिळत आहेत का हे बघत होतो. ते संदर्भ काही मिळेनात.

पण काही आकडेमोड केली . ती खाली देत आहे. अर्थात यात काही गृहीतके आहेत. ती चुकीची ठरली तर आकडेमोड निरर्थक ठरेल हा डिस्क्लेमर आधीच लिहून ठेवतो.

मूळ गृहीतक असे की
१. एकदा माणूस कोरोनाबाधित झाल्यावर किमान काही काळ म्हणजे काही महिने तरी त्याच्या शरीरात काही प्रतिकारक्षमता निर्माण होते. ( भले ती टिकेना का वर्षभर ) आणि
२. किमान एक डोस लसीकरण झाल्यानंतर दोनतीन आठवडयांनी किमान काही काळ टिकणारी तरी ( किमान ८४ दिवस तरी ?) प्रतिकारशक्ती निर्माण होते.

या गृहीतकांच्यावर पुढचा सारा डोलारा .

आपल्या पुणे जिल्ह्यापासून सुरु करूयात

पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ९४.३ लाख

पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात काल अखेरपर्यंत कोरोना इन्फेक्शन झालेल्या लोकांची संख्या १०,३१,६६३.
सरकारी आकडेवारीनुसार काल अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यात एक व दोन डोस मिळालेल्या लोकांची एकूण संख्या ३३,००,७६७.

म्हणजे एकतर कोरोना बाधित झाल्यामुळे , फार नाही पण थोडीतरी प्रतिकारक्षमता असलेले लोक आणि किमान एक डोस घेतल्यामुळे थोडीतरी प्रतिकारक्षमता निर्माण झालेले लोक यांचा मिळून अंदाजे आकडा येतोय ४३,३२,४३०.

म्हणजे पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या जवळ जवळ ४५ टक्क्यांच्या आसपास !!!

(१५ मार्चला म्हणजे दुसरी लाट सुरू होत होती तेव्हा बाधितांचा एकूण आकडा ४,४१,७४५ आणि एक व दोन डोस घेतलेल्यांची संख्या होती २,६०,७६०, म्हणजे संपूर्ण लोकसंख्येच्या फक्त ७ टक्क्यांच्या आसपास)

अजून एखाद्या महिन्याने तरी लसीचा तुटवडा संपेल असा अंदाज. त्यामुळे पुढच्या दोनतीन महिन्यात लसीकरणाचा आकडा झपाट्याने वाढत जाईल त्यामुळे हा ४५ टक्क्यांचा आकडाही त्याप्रमाणे वाढत जाणार.

पुणे जिल्ह्यात (डॉ. विनिता बाळ यांनी सांगितलेला उत्तम मराठी प्रतिशब्द म्हणजे) सांघिक प्रतिकारक्षमता म्हणजे हर्ड इम्युनिटी आली किंवा येऊ घातली....... असले कुठलाही शास्त्रीय पुरावा नसलेले ठोस आणि धाडसी विधान आत्तातरी नक्कीच नाही करणार.

परंतु किमान पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूविरोधी अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली susceptible जनसंख्या ही हळूहळू कमी होत चालली आहे असे शुभवर्तमान तरी आहे असे म्हणावे का?
काय मत ?

अर्थातच पुढच्या काही काळात अत्यंत वेगळी रचना असणाऱ्या आणि आत्ताच्या लसींना निरुपयोगी ठरवणाऱ्या एखाद्या variantने येऊन धुमाकूळ घातला तर सगळंच चित्र वेगळं होऊन ही आकडेवारी निरर्थक होऊ शकते.

आणि अर्थातच मास्क, सोशल डिस्टनसिंग इत्यादी त्रिसूत्रीला जोपर्यंत विषाणू endemic होत नाही तोपर्यंत पर्याय नाही हे विसरता येणार नाही.

(भाग दुसरा)

पर्स्पेक्टिव्ह Fri, 11/06/2021 - 21:29

म्हणजे एकतर कोरोना बाधित झाल्यामुळे , फार नाही पण थोडीतरी प्रतिकारक्षमता असलेले लोक आणि किमान एक डोस घेतल्यामुळे थोडीतरी प्रतिकारक्षमता निर्माण झालेले लोक यांचा मिळून अंदाजे आकडा येतोय ४३३२४३०

तुम्ही यात कोरोनाबाधित आणि लस मिळालेले हे दोन्ही गट पूर्ण वेगवेगळे (mutually exclusive) आहेत असे गृहीत धरले आहे का? कारण कोरोना होऊन गेल्यावर लस घेतलेले अनेकजण त्यात असू शकतात. तेव्हा या दोन आकड्यांची बेरीज करता येणार नाही.

पण त्याचबरोबर, कोरोना नकळत होऊन गेलेल्यांचीही संख्या माहीत नसल्याने हे सगळे अंदाजपंचे ठरेल ना?

अबापट Fri, 11/06/2021 - 21:41

In reply to by पर्स्पेक्टिव्ह

" सगळे अंदाजपंचे "
अर्थात ,
तसा डिस्क्लेमर आहेच दिलेला .
सगळा खेळ सरकारी आकडेवारीवर. तुम्ही म्हणता तसे काही नकळत बाधा होऊन गेलेले मोजले गेले नाहीत असं गृहीत धरलं तर शुभ वर्तमान अजून शुभ होईल का ?

आणि काही बाधित लोकांनी लस घेतली असेलही पण ज्यापद्धतीने प्रचार झाला त्यावरून त्यांची संख्या ३३ लाखांच्या मानाने खूप कमी असेल असा अंदाज. अर्थात " हा फक्त अंदाजच "
हा आकडा खूप मोठा असल्याचा काही अंदाज कुठे वाचनात आला असल्यास त्याचा विदा इथे देणे. लगेच करेक्शन करून टाकुयात.

पर्स्पेक्टिव्ह Fri, 11/06/2021 - 22:13

In reply to by अबापट

नाही, असली काही आकडेवारी नाहीये माझ्याकडे. पण कुठेतरी वाचल्याप्रमाणे दुसऱ्या लाटेच्या वेळी लॉकडाउन लागायच्या आधीच पुण्यातली रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती म्हणे. मग लॉकडाउनचा उपयोग तसा होत नाही की काय? तसे असेल तर ते एक अजून शुभ वर्तमान म्हणावे का ह्या विचारात पडलो आहे.

अबापट Fri, 11/06/2021 - 22:25

In reply to by पर्स्पेक्टिव्ह

तुम्ही म्हणता तस कुणीतरी लिहिल्याचं मीही वाचलं होतं. फक्त पुण्यातलीच नाही तर महाराष्ट्रातील पण . पण त्या थिअरी ला सपोर्टींग आकडेवारी काही मिळाली नाही .

राजेश घासकडवी Sat, 12/06/2021 - 12:58

याहीपलीकडे जाऊन, किंवा खरंतर अलीकडे येऊन असं म्हणता येईल की काही व्यक्तींच्या शरीरांत आधीपासूनच काही ना काही प्रतिकारशक्ती असली पाहिजे, जेणेकरून विषाणूची लागणच होत नाही किंवा झाली तरी बाधा होत नाही. उदाहरणार्थ १८ वर्षांखालचा गट. या गटाला रोग अत्यंत कमी प्रमाणात झाला आणि मृत्यूही जवळपास झाले नाहीत - जे झाले ते आधीच इतर व्याधीग्रस्तांचेच झाले. मुख्यत्वे वयोगटनिहाय हे काही ना काही वितरण आहेच. त्यामुळे ४५ टक्क्यांमध्ये अशा अंगभूत प्रतिकारकांचीही भर आहे. यात किमान २५% लोक असावे असा ढोबळ अंदाज बांधायला हरकत नाही.

अर्थात पुढच्या लाटेच्या उत्क्रांत विषाणूचं स्वरूप काय असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे तेच वितरण राहील अशी खात्री नाही.

पण सध्यापुरतं तरी, लाट ओसरतेय आणि लशीकरण वाढणार हे शुभ वर्तमान दिसतं आहे.

तिरशिंगराव Sat, 12/06/2021 - 15:53

In reply to by राजेश घासकडवी

याहीपलीकडे जाऊन, किंवा खरंतर अलीकडे येऊन असं म्हणता येईल की काही व्यक्तींच्या शरीरांत आधीपासूनच काही ना काही प्रतिकारशक्ती असली पाहिजे, जेणेकरून विषाणूची लागणच होत नाही किंवा झाली तरी बाधा होत नाही.

यावरुन एका जुन्या मॅन्ड्रेक आणि लोथरच्या चित्रकथेची आठवण झाली. एक लबाड माणूस एका इलेकट्रॉनिक उपकरणाच्या सहाय्याने लोकांना लुबाडत असतो. स्वत: जवळचे बटण दाबले की समोरच्या माणसाच्या मेटल भरलेल्या दांतातून प्रचंड कळ यायची, आणि तो माणूस सावरायच्या आंत त्याचे पाकीट मारता यायचे. मॅन्ड्रेकही या ट्रिकला बळी पडतो, पण लोथरला कांहीच होत नाही आणि तो या चोराला पकडतो. करण त्याचे सर्व बत्तीस दांत निरोगी असतात. कधीही फिलिंग केलेले नसते.

माचीवरला बुधा Sat, 12/06/2021 - 17:48

यासंदर्भात माझ्यापुरत्या खालील म्हणी आठवल्या:

“तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे”

“जेनु काम तेनु ठाय, बीजा करे सो गोता खाय”

बाकी चालूद्या

Rajesh188 Sat, 12/06/2021 - 20:59

अर्धवट लसीकरण केल्यामुळे विषाणू चे उत्परीवर्तन होईल (घातक)अशी भीती तज्ञा नी व्यक्त केली आहे.
अर्धवट लसीकरण म्हणजे काय?
काहीच लोकांना लस देणे आणि बाकी लोकांना न देणे.
किंवा लसी चा एक डोस दिल्या नंतर दुसरे न देणे किंवा दोन्ही डोस मधील अंतर प्रमाण पेक्षा जास्त असणे.
त्या मुळे वर्तमान शुभ आहे की अशुभ हे काळ च ठरवेल.
ब्रिटन मध्ये परत corona बाधित लोकांची संख्या वाढत आहे अशी बातमी आहे.
पूर्ण लसीकरण होवून सुद्धा संख्या वाढत आहे ह्याचा अर्थ काय?
मृत्यू चे प्रमाण खूपच कमी आहे इतके फक्त समाधान आहे.
पूर्णतः lockdown उठवणे हे धोकादायक ठरू शकतं.
संख्या कमी झाली म्हणजे आपण covid वर विजय मिळवला असा त्याचा अर्थ नाही.
अंशतः लॉकडाऊन उघडणे.विनाकारण गर्दी न करणे,सर्व खबरदारी चे उपाय चालूच ठेवणे .
अजुन काही महिने तरी गरजेचे आहे.