एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ४
अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
सुधीर भिडे
इतिहासाची भुते वर्तमानाच्या पाठुंगळी बसतात.
१८१८ ते १९२० या शतकात असे काय घडले की ज्याचे समाजावर दूरगामी परिणाम झाले, हा आपला विषय आहे. त्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी त्या काळाच्या सुरुवातीला स्थिती काय होती याची माहिती करून घेणे जरूर आहे. १८१८ साली जी स्थिती उद्भवली ती त्याच्या आधीच्या शतकातील – १७२० ते १८१८ – घटनांचा परिणाम होती. अठराव्या शतकातील राजकीय घडामोडींविषयी दुसर्या भागात विचार केला. तिसऱ्या भागात अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती कशी होती ते पाहिले. या भागात त्या काळातील शासकीय यंत्रणा कशी होती याचा विचार करू.
केंद्रीय शासनव्यवस्था
शिवाजी महाराजांपासून केंद्रीय शासनात अष्टप्रधानांची व्यवस्था होती. याचे स्वरूप केंद्रातील मंत्रीमंडळासारखे होते. प्रतिनिधी, अमात्य, प्रधान, चिटणीस, न्यायाधीश, पुरोहित, सेनापती अशा बिरुदांचे प्रधान होते. ही पद्धत कोल्हापूर संस्थानात शेवटपर्यंत चालू होती. या अष्टप्रधानांत सेनापती मराठा जातीचे असत; बाकी सर्व पदे ब्राह्मणांकडे असत. पहिल्या शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर साताऱ्यात या व्यवस्थेला अर्थ राहिला नाही. कारण सर्व सत्ता पुण्यात पेशव्यांकडे गेली. पेशवे हे साताऱ्याच्या महाराजांचे प्रधान होते.
वतनदारी
दक्षिणेत जहागीरदारी आणि वतनदारी पद्धत सन १६००च्या आधीपासून चालू होती. महाराष्ट्रातील नगर आणि विजापूरची मुसलमान राज्ये, त्यानंतर शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यानंतर पेशवाई या दोनशे वर्षांत या व्यवस्थेत बदल झाला नाही. जहागिरीचा हक्क असलेल्या व्यक्ती स्वतःचे सैन्य ठेवून असत. राजाला जेव्हा जरूर पडेल त्या वेळी हे सैन्य द्यावे लागे. जहागीरदार शेतसारा जमा करून राजाकडे पाठवीत. त्यांच्या क्षेत्रात जहागीरदार प्रबळ असत. जहागीरदार जी संपत्ती जमा करीत ती त्यांच्या गढीत गुप्त जागी पुरून ठेवलेली असे; संपत्ती म्हणजे सुवर्ण मुद्रा आणि जड-जवाहीर.
वतन याचा अर्थ आनुवंशिकतेने मिळालेले हक्क. गावात पाटील आणि कुलकर्णी वतनदार असत. कुलकर्ण्यांचे काम नोंदी ठेवणे असे. या नोंदी जमिनींच्या हक्कांच्या आणि सार्याच्या असत. देशमुख, देसाई आणि देशपांडे हे वतनदार २५-५० गावांच्या भागांवर हक्क गाजवीत. सारा गोळा करणे हे यांचे प्रमुख काम असे. वर उल्लेखिल्याप्रमाणे हे वतनदार सैन्य बाळगून असत. हे जहागीरदार हळूहळू जास्त प्रबळ होत गेले. त्यांनी आपल्या गढ्या बांधल्या. त्यांची आपापसांत वर्चस्वासाठी कायम भांडणे होत. ही आनुवंशिक वतनदारी प्रथा समाजाचा भाग बनली. वतनदार हे समाजाचे कायमचे अंग होऊन बसले. मुसलमान गेले आणि मराठे आले. मराठे गेले आणि इंग्रज आले. राजकीय सत्तापालट झाला तरी वतनदार तसेच राहिले. कारण नवीन राज्यकर्त्यांना त्यांची गरज होती. जेव्हा नवीन राज्यकर्ते येण्याची शक्यता दिसे तेव्हा वतनदार आधी पक्ष बदलीत. यादव काळे यांनी वऱ्हाड प्रांत इतिहास हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक १९२३ साली प्रकाशित झाले. त्याची आवृत्ती पारस पब्लिकेशन्सने २०२१ साली प्रकाशित केली. वतनदारीविषयी ते काय लिहितात ते पाहू –
परगण्याचे अधिकारी म्हणजे देशमुख व देशपांडे हे होत. परगण्याबाहेर लहान मोठ्या कितीतरी वावटळी येऊन गेल्या आणि राजे, नवाब वगैरे उलथून पडले तरी पाटील, देशमुख ही लव्हाळी जीव धरून, वाटेल तो नवीन राजा आला त्यास नम्र होऊन इमानेइतबारे काम करीत. त्यांचे समाजावर इतके वजन असे की खरे 'सरकार' तेच असत. हल्लीप्रमाणे ते बदलणारे अधिकारी नसून कायमचे पिढीजात वतनदार असल्यामुळे त्यांचे वजनही कायमचे असे. अखेरीस त्यांची नीतिमत्ता खालावली आणि समाजात त्यांचे वजन मात्र राहिले पण आदर नाही.
पेशव्यांच्या काळात जसा राज्य विस्तार झाला, तसा काही भाग असा झाला की ज्यात वतनदारी नव्हती. अशा भागावर पुण्याहून कारभार चाले. अशा भागांसाठी पेशव्यांनी कमाविसदार या नावाचे अधिकारी नेमले. आजच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरसारखे त्यांचे काम असायचे. ते सारा जमा करून पुण्यास पाठवीत.
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील चलनाची आजची किंमत
(गेल्या भागातही ही माहिती दिली होती.)
आता थोडे विषयांतर आवश्यक आहे. लिखाणात काही ठिकाणी १७०० ते १९०० या काळातील खर्च किंवा उत्पन्न यांचे उल्लेख येतील. या रकमा किती वजनदार आहेत हे समजण्यासाठी सोन्याच्या किमतीतील बदल विचारात घेतला आहे. १९२५ सालापर्यंत सोन्याच्या किमतीत जास्त बदल झाला नाही. १७२० साली दहा ग्राम सोन्याची किंमत १४ रुपये होती. १९२५ साली ती १८ रुपये झाली आणि २०२०मध्ये ती ५०,००० झाली. त्या काळातील खर्च किंवा उत्पन्न यांचा आजच्या काळातील किमतीत अंदाज घ्यायचा असेल तर २७००ने गुणावे लागेल (५०००० / १८). हे गणित इतके सरळ नाही हे माहीत आहे. सोन्याप्रमाणे इतर वस्तूंत आणि चलनात त्याच प्रमाणात वाढ होते असे नाही. आपण थोडा खालच्या बाजूलाच विचार करून आजच्या किमतीचा अंदाज बांधण्यासाठी २७००ऐवजी २०००ने त्यावेळच्या रकमांना गुणू. त्याकाळातील १० रुपये आजच्या काळातील २०,००० रुपये.
जमीन महसूल
या भागात निरनिराळ्या संदर्भांतून शेतसाऱ्याविषयी जी माहिती मिळाली ती लिहिली आहे. वेळोवेळी आणि जागोजागी सारा बदलत असे. आजचा शेतकरी काहीही सारा भरत नाही तरी त्याची अवस्था वाईट आहे. या संदर्भात साऱ्याचे प्रमाण बघावे.
(पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक वा. कृ. भावे, प्रथम प्रकाशन १९३५, नूतन प्रकाशन २०१९)
शिवाजीच्या काळापासून शेतसारा धान्य अशा प्रकारे न घेता सारा पैशाच्या स्वरूपात घेणे सुरू झाले. पेशवाईत महसुलाची पद्धत नीट बसविली गेली. तीच पद्धत पुढे इंग्रजांनी चालू ठेविली. जमिनीच्या मगदुराप्रमाणे सारा निश्चित करण्यात आला.
अव्वल जमीन – बिघ्याला २ रुपये
मध्यम जमीन – बिघ्याला दीड रुपया
कनिष्ठ जमीन – बिघ्याला १ रुपया
बागाईत उस – बिघ्याला ६ रुपये.
(एक बिघा साधारण २००० चौरस मीटर असावा. आजच्या किमतीत चांगल्या जमिनीवर बिघ्याला ४००० रुपये कर. आजचा शेतकरी काहीही शेतसारा देत नाही, तरीही शेतकरी आत्महत्या करतात. यावरून त्या काळी शेतकऱ्यांची स्थिती किती वाईट होती हे लक्षात येईल.)
या पद्धतीचा एक वाईट भाग म्हणजे सारा म्हणून जो पैसा गोळा होत असे त्याचा समाजाच्या उपयोगी कामासाठी काहीही खर्च होत नसे. सैन्य उभे करणे आणि आपली मालमत्ता वाढविणे यातच राजा आणि वतनदार सगळा पैसा खर्च करीत.
वतनदारांना सरकारी सार्याचा साधारणपणे १५ टक्के हिस्सा जात असे. शेतसारा जागोजागी बदलत असे. गावचे पाटील ३० ते ४० टक्के जमिनीचे मालक असत. पाटीलकी आणि देशमुखी हक्क यांच्या बरोबर सारानिश्चिती, सारावसुली, न्यायनिवाडा, सैनिकभरती अशा जबाबदाऱ्याही असत. हे हक्क आणि जबाबदाऱ्या 'सनद' स्वरूपात लिहिल्या जाऊ लागल्या. सनद हा हक्कदार आणि सरकार यातील करार असे.
देशमुखाला आनुवांशिक हक्काने खेडी दिलेली असत. यातून होणार्या उत्पन्नावर कर वसूल करण्याचे अधिकार देशमुखाला असत. कराराच्या रकमेतील काही टक्के रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार असे. एका सनदेचा द मराठाज, स्टुअर्ट गॉर्डन, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, अनुवाद र. कृ. कुलकर्णी या संदर्भात दिलेला उल्लेख पाहा –
- ६० एकरामागे चार आणे कर (५०० रुपये आजच्या हिशोबाने)
- विणकराच्या उत्पादनापैकी २५% उत्पादन
- तेल्याकडून रोज २५ लिटर तेल
- आमराईतून १०० पैकी ५ फळे
- अडीच एकर जमिनीमागे दर वर्षी १०० ग्राम तूप, खवा, चक्का
- धान्य उत्पादनाच्या १७.५% उत्पादन
(लिटर आणि ग्राम हे जुन्या मापावरून समजण्यासाठी रूपांतर करून लिहिले आहेत. चार आणे म्हणजे २५ पैसे.)
यातील १० ते १५% स्वतःकडे ठेवून उरलेले राजाला द्यावे लागे. याशिवाय इतर हक्कदारांनाही कर द्यावे लागत. पाटलांना रोख वसुलीचा थोडा हिस्सा मिळे. परंतु शेतकरी, तेली, कारागीर यांजकडून वस्तूरूपात भेट मिळे. सामान्य जनांना एकूण उत्पादनापैकी ४० ते ५० टक्के उत्पादन सरकार आणि निरनिराळ्या हक्कदारांना द्यावे लागे.
गावात काही मूठभर लोकांकडे ६०-७० टक्के जमिनी असत. ही स्थिती सामान्यांच्या पिळवणुकीवर आधारित होती. अशी व्यवस्था चालू ठेवण्यामध्ये राजे आणि वतनदार यांचा फायदा होता. त्यामुळे यात ब्राह्मणांना सामील करून त्यास धार्मिक रंग देण्यात आला. सामान्यांची खात्रीच होती की जगाच्या अंतापर्यंत ही व्यवस्था चालू राहणार. असे सांगितले जाई की ही परमेश्वराचीच इच्छा आहे. या विचारांची सामान्य जनांवर पूर्ण पकड बसली होती त्यामुळे ही व्यवस्था शतके चालू राहिली.
गुन्हे आणि शिक्षा
(खालील माहिती महारांचा इतिहास, अनिल कठारे, सुगावा प्रकाशन २००२, आणि पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक वा. कृ. भावे या पुस्तकांतून घेतली आहे.)
या भागाला न्यायव्यवस्था असे नाव दिलेले नाही. कारण आज आपल्याला न्यायसंस्था म्हणून जे अपेक्षित आहे तशी न्यायव्यवस्था अस्तित्वात नव्हती. आजची न्यायव्यवस्था न्यायसंहितेवर (पिनल कोड) आधारित असते. अशी संहिता सर्वांना ज्ञात असते. अशी व्यवस्था त्या काळात नव्हती. त्या काळी गावातील न्याय पाटील करे. तक्रार आल्यानंतर पाटील बहुधा पाच ते दहा पंचांची नेमणूक करे. पंचांतर्फे चौकशी होई. दोन सुतारांतील वतनासंबंधीचा तंटा देशमुखांनी पंचायत बसवून सोडविला. नंतर पेशव्यांनी आज्ञापत्राने मंजुरी दिली; असा उल्लेख मिळतो.
मोठ्या केसेस पुण्यात न्यायशास्त्र्यांकडे जात. रामशास्त्री आणि त्यांचे मरणानंतर अय्याशास्त्री हे पुण्यातील न्यायाधीश होते. त्यानंतर (सुप्रीम कोर्ट) 'श्रीमंत' (पेशवे) न्याय करीत.
धर्मशास्त्राप्रमाणे ज्या कृती पातक समजल्या जायच्या त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावे लागे. याचा अर्थ गुन्ह्याची शिक्षा म्हणजे प्रायश्चित्त. ही प्रायश्चित्ते ठरविलेल्या पवित्र ठिकाणी जाऊन घ्यावयाची असत. नमुन्यादाखल काही पातके (गुन्हे) –
- एका ब्राह्मण गृहस्थाने आपली मुलगी म्हणून एका मुलीचे लग्न करून दिले. नंतर ती दासीची मुलगी निघाली. सबंध कुटुंबास प्रायश्चित्त घ्यावे लागले.
- एक गृहस्थ इंग्लंडला जाऊन आला. त्यास प्रायश्चित्त घ्यावे लागले.
- जे सदाशिवभाऊच्या तोतयाचे पंक्तीत जेवले त्यांस प्रायश्चित्त घ्यावे लागले.
- एका महाराने गाय मारली त्याबद्दल त्याची जमीन जप्त करण्यात आली.
एका ब्राह्मणाचा मुलगा अचानक तरुण वयात मृत्यू पावला. त्याची अंत्यक्रिया उरकण्यास आली. इतर ब्राह्मणांनी असा नियम काढला की अकाली मृत्यूबद्दल प्रायश्चित्त घेण्याची जरूर होती. ते प्रायश्चित्त घेतले नाही म्हणून दुसरे प्रायश्चित्त घ्यावे लागले.
राघोबादादा नारायणराव पेशव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्यांस प्रायश्चित्त सांगण्यात आले.
मुलकी सुरक्षा
मध्य हिंदुस्तानात आणि उत्तर महाराष्ट्रात पेंढाऱ्यांचा त्रास होता. शिंदे, होळकर आणि पवारांचा पाडाव झाल्यावर सुटे झालेले सैनिक पेंढारी लुटारूंना मिळाले. त्यांची संख्या अदमासे ३०,००० असावी. ते अतिशय क्रूरपणा करीत. गावोगावी लुटालूट करून पैसे मिळवीत. इंग्रज या प्रकाराकडे तटस्थ वृत्तीने पहात. त्यांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर त्यांनी १८२०मध्ये खऱ्या अर्थाने पेंढारी गुन्हेगारांविरुद्ध कार्यवाही चालू केली.
गावात गुन्हेगारीला आळा बसविणे, गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देणे याची जबाबदारी गावातील पाटलाकडे असे. पुणे शहरात माधवराव पेशव्यांनी कोतवालाची व्यवस्था १७६५ साली चालू केली. या विषयीची माहिती पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली, लेखक डॉक्टर शास्त्री, अपरांत पब्लिकेशन, २०१३ या पुस्तकातून घेतली आहे.
नागरी सुरक्षा, गुन्ह्यांचा शोध आणि गुन्हेगाराला शिक्षा या शिवाय कोतवालाची इतर कामे असत –
- बाजारात वापरल्या जाणार्या वजनांवर ती योग्य आहेत याचा शिक्का मारणे.
- शहरातील स्वच्छता
- बेवारशी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार
- घरांच्या खरेदी-विक्रीचे खरेदीखत
- शहरात दवंडी देणे.
कोतवालीच्या कामात हळूहळू वाढ होत गेली. पुण्यातील कोतवालाची मुख्य कचेरी बुधवार पेठेत शिवाजी रस्त्यावर होती. त्याला कोतवाल चावडी म्हणत. त्याशिवाय शहरात निरनिराळ्या ठिकाणी चावड्या होत्या (पोलीस चौकी). ज्या पोलिसांकडे शस्त्र असे त्यांना शिबंदी म्हणत. शस्त्र न बाळगणार्या शिपायास प्यादे म्हणत. नजरबाज हे हेरगिरी करत.
पुण्याचे पहिले कोतवाल केतकर नावाचे गृहस्थ होते. १७८१मध्ये घाशीराम सावळदास कोतवाल बनला. घाशीराम कोतवाल याने आपल्या काळात बरीच चांगली आणि वाईट कृत्ये केली. नाना फडणवीस यांची त्याच्यावर मर्जी होती. मराठी राज्याच्या नाशिक, वाई, जुन्नर या शहरांतूनही कोतवाली होती. शिंद्यांनी ग्वाल्हेर शहरातही कोतवाली सुरू केली होती.
कोतवालाचा वर्षाचा पगार ३०० रुपये (आजच्या हिशोबांनी सहा लाख), पोलिसांचा वर्षाचा पगार २० रुपये (चाळीस हजार) असे. रात्री गस्त घालताना पोलिसांच्या बरोबर मशालवालेही असत. वर्षात साधारणपणे १५,००० रुपये दंड वसुली होई. (आजच्या हिशोबाने तीन कोटी रुपये) माधवरावांच्या मृत्यूनंतर या व्यवस्थेत बिघाड होत गेला. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात कोतवालीच्या पदाचा लिलाव होऊ लागला. बाजीरावाला जो एक लाख रुपये देईल त्यास कोतवाली दिली जाई. साहजिकच कोतवाल लोकांकडून अवैध मार्गाने पैसे जमवू लागले. सर्वांत शेवटचे कोतवाल बाळकृष्ण मराठे यांची १८१४ साली नेमणूक झाली.
प्रवासाची साधने
मुख्य वाहन घोडा होते. दहा-वीस मैलांचा प्रवास घोड्यावरूनच होत असे. स्त्रिया आणि मुले दूर जाण्यासाठी डोली किंवा पालखी वापरीत. मोठ्या गावातून डोल्या किंवा पालख्या भाड्याने मिळत. पुण्यात डोलकर आळी असा भाग आहे. येथे त्या काळी डोल्या आणि भोई भाड्याने मिळत. याशिवाय बैलांनी ओढलेल्या गाड्या आणि छकडे यांचाही वापर होत असे. पटवर्धनांची भार्या मिरजेस गरोदर होती. तिचे माहेर पुण्यात भिडे यांचेकडे होते. भिड्यांनी मुलीस आणण्यासाठी पालखी पाठविली असा उल्लेख मिळतो. एका पालखीबरोबर आठ भोई असत. ते दर तासाने बदली करून काम करीत. मिरज ते पुणे अंतर आठ ते दहा दिवसांत पूर्ण केले जाई.
पालखी आणि भोई
वैद्यकी
(Journal of Family Medicine and Primary Care, 2016 Jul-Sep; Physicians of colonial India (1757–1900), Anu Saini)
अठराव्या शतकात भारतात दोन प्रकारच्या वैद्यकीय प्रथा चालू होत्या. वैद्य हे हिंदू असायचे आणि आयुर्वेदाच्या प्रथेप्रमाणे औषधे देत. हकीम मुसलमान असून युनानी प्रथेप्रमाणे औषधे देत. वैद्य आणि हकीम जास्त करून वंशपरंपरागत काम करीत. भारतासारख्या मोठ्या देशात या दोन्ही प्रथांमध्ये जागोजागी भिन्नता असे. (ती आजही आहे, आजच्या तारखेलादेखील केरळमधील वैद्य आणि बनारसमधील वैद्य एकाच रोग्याचे एकच निदान करतील आणि एकच औषध देईल असे सांगता येत नाही.) भारतातील तत्कालीन संस्थानिकांच्या पदरी राजवैद्य आणि हकीम असत. गाव पातळीवर तांत्रिक-मांत्रिक असे पूर्णपणे भोंदू लोक औषधपाणी करीत. साप चावला की रोग्यास भैरवाच्या देवळात आणले जाई. मांत्रिक धूर करून झाडपाला आपटून नाटक करे. साप विषारी नसेल तर रोगी बरा होई. अंगात येणारी बाई आजारी व्यक्तीला अंगारा देई.
ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील काम जसे वाढू लागले तशी इंग्रज लोकांची भारतातील वस्ती वाढू लागली. त्यांच्या नोकरांसाठी कंपनीने इंग्लंडमधून डॉक्टर्स आणले. शतकाच्या सुरुवातीस पाश्चिमात्य वैद्यकीदेखील शास्त्रावर आधारित झालेली नव्हती. शतकाच्या अखेरीस पाश्चिमात्य वैद्यकीस शास्त्रीय आधार आला. १७९२ साली कलकत्यास सर्व लोकांसाठी हॉस्पिटल चालू करण्यात आले. मुंबईतही याच सुमारास इंग्रजांसाठी एक हॉस्पिटल चालू करण्यात आले. हळूहळू येथील लोकांस लक्षात येऊ लागले की शास्त्रीय आधारावरची पाश्चिमात्य पद्धती आजार बरे करते.
उद्योगधंदे
भारताचा सर्वात मोठा उद्योग कापड उद्योग होता. भारतातील कापड, मलमल, सिल्क हे जगभरात निर्यात होत असे. कापड उद्योगात बंगालचा पहिला क्रमांक होता. त्याशिवाय भारतातून नीळ, अफू, मसाले यांचीही निर्यात होत असे. कापडउद्योग हातमागावर चालत असे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची मशीन्स आली नव्हती. महाराष्ट्रामध्येही हातमाग उद्योग चांगल्या प्रमाणावर होता. (Handlooms of Maharashtra, कोमल पोतदार, २०१८)
पैठणला रेशमाचा उद्योग असल्याचे दोन हजार वर्षांपासून उल्लेख सापडतात. इथे बनलेले रेशीम रोमन साम्राज्यात निर्यात होई. दुर्दैवाने एकोणिसाव्या शतकापासून या उद्योगाची पीछेहाट चालू झाली. स्वातंत्र्यानंतर हा उद्योग परत वाढीला लागला आहे.
सोलापूरच्या कापडउद्योगाचा उल्लेख दोनशे वर्षांपासून मिळतो. या उद्योगाला जेथे सुरुवात झाली त्या भागाला माधवराव पेठ असे म्हणत. त्यावरून असे वाटते की थोरल्या माधवराव पेशव्यांनी या उद्योगाला चालना दिली असावी. हा उद्योग येथे इतका मोठा झाला की निजामाच्या क्षेत्रातून कारागीर येथे येऊन वसले. सोलापूर जिल्ह्यातच नारायणपेठ येथेही सुमारे तीनशे वर्षांपासून कापड उद्योग चालू आहे. याशिवाय विदर्भातली कापड उद्योगाची नोंद १७७२च्या सरकारी गॅझेटमध्ये सापडते.
१७६६ साली ईस्ट इंडिया कंपनी भारतातून जेवढी निर्यात करे त्यातील ७५% निर्यात कापडाची होत असे. त्या काळात ढाक्यात ८०,००० हातमाग होते तर सुरतेला १५,००० हातमाग काम करीत. १७९०पर्यंत आठ कोटी यार्ड कापड दर वर्षी युरोपला निर्यात होत होते.
खानदेश आणि गुजरात येथील कापसाच्या निर्यातीसाठी मुंबई हे सोयीचे बंदर होते. त्यामुळे पुढच्या शतकात मुंबई आशियातील कापडधंद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ झाली.
निष्कर्ष
शासनयंत्रणेचा पाया वतनदारीत होता. आनुवंशिकतेने चालत आलेली वतनदारी सामान्य जनांचा जराही विचार करत नसे. जमा झालेला सारा सामान्यांच्या कल्याणासाठी वापरला जात नसे. संहितेवर आधारित न्यायव्यवस्था नव्हती. न्यायनिवाडा गावातील पंचांतर्फे होत असे. जे गुन्हे धर्माविरुद्ध समजले जात त्यांची शिक्षा प्रायश्चित्त ही असे. मुलकी सुरक्षेसाठी कोतवाली थोरले माधवराव यांनी चालू केली.
घोडे, पालखी किंवा मेणे ही प्रवासाची साधने होती. वैद्यकीच्या दोन प्रथा चालू होत्या. आयुर्वेद जाणणारे वैद्य आणि युनानी औषधे देणारे हकीम. या दोन्ही पद्धती शास्त्रावर आधारित नव्हत्या. कपडा उद्योग हा सर्वात मोठा उद्योगधंदा होता.
पुढचा भाग – भाग ५ मध्ये धर्मशास्त्रांवर आधारित कर्मकांडी धर्माचे स्वरूप समजून घेऊ.
मागचे भाग -
भाग १ - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ - अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ - अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.
सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.
लेख आवडला
महसूल आणि चलनाबद्दल दिलेली माहिती रोचक आहे.
हेहि हवे होते
लेखमालिका आवडली. १८व्या आणि १९व्या शतकातील सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचा चांगला आढावा लेखकाने घेतला आहे असे दिसते.
एका गोष्टीचा अनुल्लेख मात्र आश्चर्य निर्माण करतो. आत्तापर्यंत ह्या लेखमालेचे ४ भाग वाचनात आले पण मेकॉलेचे १८३४ साली लिहिलेले प्रसिद्ध 'मिनट' आणि त्याचा दूरगामी परिणाम ह्याबद्दल अजून काही ह्या मालिकेत समोर आलेले नाही. हे 'मिनट' आणि तदनुषंगाने आलेले Wood's dispatch (https://en.wikipedia.org/wiki/Wood%27s_dispatch) ह्याशिवाय मालिका अपूर्ण वाटते.
आता वाचनमात्र उपलब्ध असलेल्या 'उपक्रम' ह्या जुन्या संस्थळावरील मेकॉलेच्या 'मिनट' बद्दलचा 'मेकॉले आणि शिक्षणपद्धति' हा माझा लेख (http://mr.upakram.org/node/3416) पहावा.
तत्कालीन प्रवासाबद्दल '१८२६ सालातील प्रवासीमित्र' (https://aisiakshare.com/node/3690) हा लेख पहावा. डाकेने प्रवास करण्याचे वर्णन लेखामध्ये आहे.
काही प्रश्नांचा उलगडा झाला
मागच्या लेखात पडलेल्या काही प्रश्नांचा उलगडा झाला.
याही अगोदरच्या काळात सुरत मधले व्यापारी पोर्तुगिजांबरोबर व्यापार करत होते. सुरत लुटली गेली तेव्हाचा व्यापारी (विरजी व्होरा) हा त्याकाळचा अंबानी होता. आणि त्याही अगोदर सुरतच्या व्यापार्यांनी परदेशी व्यापाराच्या सुरक्षिततेसाठी मोघलांबरोबर आणि पोर्तुगिजांबरोबर (त्यानंतर इंग्रजांबरोबर) व्यापारी सामंजस्य केले होते (जहांगीरच्या काळात बहुतेक. अवांतरः असा एक एपिसोड भारत एक खोज मध्ये पाहिल्याचा आठवतो. व्यापार्याची भूमिका केलेला कलाकार मला खूप आवडला होता, त्यानेच टिळकांचीही भूमिका केली होती. थंड डोक्याचा व्यापारी आणि जहालमतवादी मराठी नेता या दोन विरुद्ध भूमिका त्याने छान रंगवल्या होत्या. पण त्याचे नाव इतके परिचयाचे नाही). महाराष्ट्रातल्या व्यापारी वर्गाचे तितके संदर्भ आहेत का इतिहासात? का पैठण, सोलापूर मधल्या मालाची मालकी ही शेवटी पेशव्यांकडे/वतनदारांकडेच होती? जे शेवटी परदेशी व्यापारासाठी हा माल ह्या सुरतच्या व्यापार्यांना विकत असावेत?
पालखीच्या भोईंचे फोटो पाहून एक आठवले, की भारतीयांकडे अंगभर पुरेसा कपडा नसला तरी डोक्यावर कपडा/मुंडासे नसणे ही लाजिरवाणी बाब होती. (याचा संदर्भ गीतारहस्य मध्ये होता वाचलेला).
कोल्हटकरांचा लेख आवडला. काही प्रश्नांचा उलगडा झाला. इंग्रजांपूर्वी अंतर्गत दीर्घ प्रवासी वाहतूकीचे प्रमाण कमी असावे. तरी किमान गरजेपुरता व्यापारी वाहतूक होतच असावी. (पैठण सोलापूरला लागणारा कापूस/रेशीम इतर ठिकाणाहूनच येत असेल ना? वा पैठणला तयार झालेला माल इतर ठिकाणी नेण्यासाठी). आपल्याकडे वाहतूकीसाठी बैलगाडीचा / पालखीचा वापर जास्त दिसतो. पण इथे युरोपासारखी जलद प्रवासासाठी घोडागाडी प्रचलित का झाली नसावी (बैलगाडी उलटी होण्याची शक्यता कमी असते, वा छोटी नदी वा ओहोळ ओलांडायला ही सोयीची म्हणून?). मागे एकदा अठराव्या शतकातली अमेरिकन सार्वजनिक वाहतूकीची एक डॉक्यूमेंट्री पाहिलेली. न्यूयॉर्क ते बॉस्टन प्रवासासाठी लोकं रात्री वा भल्या पहाटे निघत. प्रवासात लुटारुंचा धोका असायचा. शिवाय रस्ते खराब असायचे. गाडी उलटी होण्याचा संभव असायचा. वाटेत थांबण्यासाठीच्या सोयी (हॉटेल्स) असत. आपल्याकडे धर्मशाळा होत्या पण सार्वजनिक प्रवासी वाहतूक असा काही प्रकार होता का? का तो इंग्रजांबरोबरच आला?
"ते प्रायश्चित्त घेतले नाही म्हणून दुसरे प्रायश्चित्त घ्यावे लागले." प्रायश्चित्त घेणे हे ऐच्छिक असावे असे वाटते. पण बंडखोरी म्हणून प्रायश्चित्त न घेतल्यास समाजातून / स्वजातीयांकडून वाळीत टाकण्याची भीती अधिक असावी.
(अवांतर शंका)
‘डोलकर’ बोले तो जर ‘डोल्या आणि भोई भाड्याने देणारा’ असेल, तर मग ‘डोलकर’ हा ‘दर्याचा राजा’ कसा काय होऊ शकतो?
त्या काळातील डोल्या या समुद्रमार्गानेसुद्धा जात असत काय? (नेमक्या कशा? डोळ्यांसमोर चित्र उभे करण्याचा प्रयत्न करतोय; जमत नाहीये.)
(आणि, पुण्यात कोठला समुद्र मरायला कडमडला?)
(की ‘डोलकर दर्याचा राजा’ ही आपल्या शांताबाईंची ढुसकुली असावी? ‘पब्लिकला कोठे समजतेय? द्या ठोकून!’ ‘पोएटिक लायसन्स’?)
(अत्यंत अवांतर प्रतिसाद)
सहमत!!
त्याच गीतातील दुसरी एक ओळ - "नेतो बाजारा भरून म्हावरा ताजा" - हे आणखी एक उदाहरण.
(बाजारात कोळणी जातात कोळी नव्हे! आणि तसेही, कोळ्यांनी मासे पकडायचे आणि विकायचेही आणि कोळीणींनी काय फक्त कोळी नृत्ये करायची??)
असो, मालिका उत्तम चाललेली आहे. राहवले नाही म्हणून ही अवांतर प्रतिसादाची पिंक.
.
आणि तीसुद्धा, पिवळी चोळी आणि अंजिरी साडी असले काहीतरी भयंकर रंगसंगती असलेले कपडे घालून!
नाही म्हणजे, कोळिणींशी माझा उभ्या आयुष्यात संबंध आला नाही, त्यामुळे, मी खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. (चूभूद्याघ्या.) परंतु, तुम्ही तरी कधी असले कपडे घातलेली जिवंत कोळीण पाहिलेली आहेत काय? सांगा!
(असो. या विषयावरून अधिक अवांतर करीत नाही.)
सैलाब
तुमचा कोळणींशी संबंध आला नाही हे उघड आहे. कारण तुम्हाला पिवळ्या पोलक्यातली सैलाबमधली माधुरी दीक्षित आठवते आहे.
नाही!!!
मी 'सैलाब' पाहिलेला नाही; मी टरफले उचलणार नाही!
माझा रोख केवळ 'चोली पिवली गो, नेसलय अंजिरी सारी'कडे होता.
(पुढे त्या (शांताबाईंच्या) कोळणीने फुललेला चाफासुद्धा केसांत माळलेला असतो, परंतु ते जाऊद्या. येथे फारच अवांतर होईल.)
असो चालायचेच!
डोलकर
मोल्सवर्थ कोशाप्रमाणे (पान ४३२) डोल = 1) A bucket or a pail, 2) A mast of a ship or boat. तसेच डोलकाठी = A mast of a ship or boat. तेव्हा डोलकर शब्दाचा जहाजाशी लावलेला संबंध अगदीच अस्थानी म्हणता येत नाही. मात्र तेथेच डोलकर = A dooly bearer इतकाच अर्थ दाखविलेला आहे हेहि लक्षात येते.
…
तत्कालीन युरोपीय उपचारपद्धती तरी कोठली ‘शास्त्रावर आधारलेली’ वगैरे होती? (आणि, मी होमेपदीबद्दल बोलत नाहीये. ती बकवास होतीच, परंतु ते माझे सध्याचे टार्गेट नव्हे. मी ‘त्या दुसऱ्या पद्धती’बद्दल बोलतोय.) जळवा लावणे, न्हावी हाच सर्जन असणे, ‘हायजीन’ नावाच्या प्रकारचा गंधही नसणे, हे असले प्रकार ‘त्यांच्यात’ही होतेच! पाश्चात्त्य ‘मॉडर्न मेडिसीन’ हे ‘शास्त्रावर आधारलेले’ बहुधा खूप नंतर झाले असावे. (चूभूद्याघ्या.) (किंबहुना, तत्कालीन पाश्चात्त्य उपचारपद्धतींतील अघोरी प्रकारांवर प्रतिक्रिया म्हणूनच होमेपदी, बाराक्षारपद्धती यांच्यासारख्या तद्दन बकवास, छद्म-‘शास्त्रा’वर आधारलेल्या ‘पर्यायी’ पद्धती उदयास येऊन लोकांच्या गळी उतरू शकल्या असाव्यात, असा (अत्यल्पवाचनावरून) कयास आहे.)
करवसुलीचे हे औटसोर्सिंगमॉडेल (बोले तो, महसूलअधिकाऱ्याने आपल्या अधिक्षेत्रात (हवा तसा आणि हवा तितका) कर वसूल करून, त्यातील काही हिस्सा राजास देऊन उरलेला स्वतःच्या खिशात टाकणे) हे पेशवाईपुरते/हिंदुस्थानापुरतेच मर्यादित नसून, बहुधा सार्वत्रिक नसावे काय? रोमन साम्राज्यातसुद्धा थोड्याफार फरकाने असाच प्रकार चालत नसावा काय? (चूभूद्याघ्या.)
(तरीही, पेशवाईतील महसूलअधिकारी हा गोळा केलेल्या महसुलापैकी फक्त पंधरा टक्केच जर (इमानेइतबारे) खिशात टाकत असेल, तर हे प्रमाण तितकेही वाईट नाही म्हणायचे!)
—————
(बाकी, लेखमाला उत्तम चालली आहे. आमची ब्याकबेंचरगिरी, नसत्या शंकाकुशंका वगैरे नॉटविथष्ट्याण्डिङ्ग.)
(आमच्या ब्याकबेंचरी शंकाकुशंकासुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे विचारलेल्या आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.)