आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ३

आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ३

डॉ. विष्णू जोगळेकर

या भागात आपण एक महत्त्वाचे प्रमाण पाहणार आहोत. ते म्हणजे अनुमान प्रमाण.

गणित या विषयामध्ये अनुमान प्रमाण युक्लिडने मोठ्या प्रमाणावर वापरले आणि गणिती प्रमेय म्हणजे खोडी न काढता येणारे अनुमान असा दृढ विश्वास लोकांना वाटू लागला. अर्थातच हे डिडक्टिव्ह प्रकारचे अनुमान असते. इंडक्टिव्ह प्रकारच्या अनुमानाचा जवळपास सर्वच विज्ञानशाखांमध्ये भरपूर वापर होतो. या दोन्हींमधील फरक सुधीर भिडे यांनी त्यांच्या लेखनात स्पष्ट केलाच आहे.

अनुमान प्रमाण आयुर्वेदात दोन्ही पद्धतीने वापरले जाते. एकेक उदाहरण घेऊन हे प्रकार पाहू.

बलम् व्यायामशक्त्या परीक्षेत।
– चरक संहिता विमानस्थान ८/४०

एखाद्या व्यक्तीचे बळ किती आहे याचे अनुमान औषधयोजना करताना माहीत असेल तर योजना बिनचूक व्हायला मदत होते. प्रत्यक्ष प्रमाणाने ते तपासणे फारच किचकट आहे. त्यापेक्षा ती व्यक्ती व्यायाम किती करू शकते यावरून बळाचे अनुमान करणे सोपे आहे. विशिष्ट व्यायाम करताना मनुष्य केव्हा थकतो हे मोजावे आणि त्यावरून बळाचे अनुमान करावे. आजकाल ट्रेडमिल, पायऱ्या चढणे या प्रकारच्या चाचण्या सर्रास केल्या जातात.

आता या चाचण्या आयुर्वेदात कुठे सांगितल्या आहेत, असा प्रश्न शास्त्रीयता ठरविण्यासाठी वापरला तर, उत्तर अर्थातच, सांगितल्या नाहीत, असेच येणार. पण त्या चाचण्यांमागील तत्त्व तर चरकसंहितेत आहेच आणि त्यांच्या पारंपरिक पद्धती आजही केरळमध्ये जपलेल्या आढळतात. रुग्णाने ठरावीक वस्तू उचलून मठाचे दार उघडले तर तो रुग्ण घरी जायला हरकत नाही, अशी पद्धत अष्टवैद्यम मठात आहे. डिस्चार्ज देण्याची तत्कालीन पद्धत.

दुसऱ्या प्रकारच्या अनुमानात फुलावरून फळाचे अनुमान येते. उदाहरणार्थ, मोहोर कसा आहे यावरून आंबे भरपूर येणार की कमी, लवकर येणार की उशिरा हे अनुमान करता येते. किंवा दिसणाऱ्या लक्षणांवरून कशा प्रकारे अपथ्य घडले असेल याचे अनुमान. उदाहरणार्थ, सकाळी जांभया येत असतील तर रात्री जागरण झाले असावे. ते वाताचा प्रकोप करते आणि डोक्याला मालीश केल्याने जागरणातून होणारे आम्लपित्तासारखे परिणाम नाहीसे होतील ही पुढची अनुमाने काढता येतात. यात वारंवार आढळणाऱ्या साहचर्याचा वापर केलेला असतो. (साहचर्य म्हणजे एकत्रितपणे आढळणे. जसे काळे ढग आभाळात येणे आणि पाऊस पडणे, किंवा स्त्रीच्या पोटाचा आकार वाढणे आणि गर्भधारणा झालेली असणे.) साहचर्याची व्याप्ती किती आहे हा अनुमानात कळीचा प्रश्न असतो. म्हणजे स्त्रीच्या पोटाचा आकार अनेक कारणांमुळे वाढू शकतो. उदा, गॅसेस होणे, चरबी वाढणे, जलोदर वगैरे. म्हणजे पोट वाढणे याचे गर्भारपणाशी साहचर्य असले तरी ते १००% नाही पण प्रत्येक गर्भार स्त्रीच्या पोटाचा आकार १००% वेळा वाढतोच वाढतो. म्हणजे साहचर्याची व्याप्ती एका दिशेने कमी आणि दुसऱ्या दिशेने जास्त असू शकते.

उदाहरणार्थ, एखादे लक्षण घेतले तर ते अनेक रोगांमध्ये असू शकते. अशा वेळी वैद्य लक्षणांचे साहचर्य रोग निदान करण्यासाठी वापरतात. म्हणजे ठरावीक लक्षणे एकमेकांच्या सोबतीने असतील तर विशिष्ट रोगाकडे बोट दाखवतात तर वेगळी लक्षणे दुसराच रोग दाखवतील. उदाहरणार्थ, दम लागणे हे लक्षण झोपल्यावर कमी होते की बसल्यावर याने निदान बदलते. बसल्यावर बरे वाटते हे लक्षण श्वास (अस्थमा) दाखवते तर झोपल्यावर बरे वाटत असेल तर हृदयरोगाची शक्यता जास्त.

या प्रकारच्या अनुमानाला स्वार्थानुमान किंवा स्वतः पुरता काढलेला निष्कर्ष असे म्हणतात. हे तुलनेने खूपच सोपे असते. पण त्यात चुका होणेही खूप सोपे असते. आपल्याला जे पटले आहे ते दुसऱ्या कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला पटवून देणे ही मात्र अवघड गोष्ट आहे. लग्न झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपले म्हणणे नवऱ्याला/बायकोला पटवून देणे किती अवघड आहे याचा अनुभव दांडगा असतो. या प्रकारच्या अनुमानाला परार्थानुमान म्हणतात. यासाठी पञ्चावयवी वाक्य हे साधन वापरले जाते. प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन ही पाच वाक्ये यात असतात.

  • प्रतिज्ञा म्हणजे साध्य किंवा जे सिद्ध करायचे आहे ते
  • हेतू म्हणजे निष्कर्ष काढण्यामागचे कारण.
  • उदाहरण किंवा दृष्टांत म्हणजे कारण ज्याने सर्वसामान्य माणसाला पटेल अशा प्रकारच्या व्यवहारातील गोष्टी.
  • उपनय म्हणजे दृष्टांतात जसे दिसते तसेच साध्यवस्तू किंवा पक्षावर दिसते हे सांगणे.
  • निगमन म्हणजे अशा प्रकारे साध्य सिद्ध झाले असा प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करणे.

भारतात पूर्वापार वाद होत असत. त्यात पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष या वाक्यांच्या चौकटीत आपली बाजू मांडत असत. याची विस्तृत मांडणी येथे (दुवा) मिळेल. चरक, सुश्रुत, काश्यप या संहितांमध्ये अशा प्रकारचे वाद आपण पाहू शकतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सुश्रुत संहितेत आलेला हा वाद :

औषधात काय मुख्य आहे? यावर असलेला एक सुंदर वाद सुश्रुत सूत्रस्थान अध्याय ४० मध्ये आला आहे.

एक पक्ष म्हणतो द्रव्य (पदार्थ, वस्तू). महत्वाचे कारण औषध हे द्रव्य आहे ते बदलले तर औषधाचे कामच होणार नाही

दुसरा पक्ष म्हणतो की एकच काम करणारी अनेक औषधे आहेत. त्यांच्यामुळे शरीरात होणारे बदल ते जिभेवर पडताक्षणी चालू होतात आणि चवीवरून आपल्याला कळते की हे अन्न किंवा औषध शरीरात काय बदल करेल त्यामुळे रस किंवा चव महत्त्वाची

तिसरा पक्ष म्हणतो की फक्त चव पुरेशी नाही तर द्रव्यातला कोणती चव पचन होताना शेवटपर्यंत टिकते ती महत्त्वाची (तांत्रिक शब्द विपाक).

चौथा पक्ष म्हणतो की चव किंवा विपाक हे फक्त परिणामांची दिशा दाखवतात. काम तर स्निग्ध, रूक्ष वगैरे गुणच ठरवतात (ओशटपणा आणि कोरडेपणा) तेंव्हा गुण महत्त्वाचे, विशेषतः सामर्थ्य जास्त असलेले गुण ( तांत्रिक शब्द वीर्य) महत्वाचे.

पाचवा पक्ष म्हणतो चव विपाक वीर्य सारखेच असताना गहू वजन वाढवतात तर यव वजन घटवतात तेंव्हा प्रत्येक द्रव्याचा जो विशिष्ट परिणाम किंवा प्रभाव आहे तोच महत्त्वाचा.

शेवटी समारोप करताना काही द्रव्ये चवीने परिणाम करतात तर काही विपाकाने तर काही वीर्याने आणि काही प्रभावाने असे म्हणून शेवटी हे सर्व परिणाम द्रव्याशिवाय घडून येत नाहीत त्यामुळे अंतिमतः द्रव्यच महत्त्वाचे असे म्हटले आहे.

आपापली बाजू मांडत असताना पंचावयव वाक्याचा उपयोग केला आहे.

या थोड्या विषयांतरानंतर आपण मूळ विषयाकडे वळू. पंचावयव वाक्य ही एक साखळी आहे. त्यातला सगळ्यात कच्चा दुवा म्हणजे हेतू. अनुमान ज्या निरीक्षणावरून उद्भवते ते निरीक्षण चुकीचे असण्याची शक्यता भरपूर असते. शेरलॉक होम्सच्या गोष्टींमध्ये डॉ. वॉटसन अशी चुकीची अनुमाने करण्यात अगदी तरबेज दाखवला आहे. अशा भ्रामक हेतूला म्हणतात हेत्वाभास.

त्यांचे सविस्तर वर्णन पुढील लेखात पाहू.

(क्रमशः)
लेखकाचा अल्पपरिचय :
डॉ. विष्णू जोगळेकर आयुर्वेदाचे प्राध्यापक आहेत (आता निवृत्त). पुणे येथील टिळक आयुर्वेद विद्यालयाशी ते संलग्न होते. J-AIMच्या (Journal of Ayurveda and Integrative Medicine) संपादकीय समितीवर ते होते.

field_vote: 
0
No votes yet

उत्तम आरोग्य राखण्यासाठी काय आहार असावा ह्या पासून काय दिनचर्या असावी .

ह्या विषयी मार्ग दर्शन आयुर्वेद, किंवा अनुभव,नी लोकांकडे आलेले पारंपरिक ज्ञान हेच उच्च प्रतीचे आहे.
आधुनिक शास्त्र शरीरात विविध यंत्रणा आहेत हेच विसरतात.
काही ही खा जे हवं ते ,हवं तितकेच शरीर घेते आणि बाकी सर्व बाहेर टाकते..ही नैसर्गिक यंत्रणा आहे हेच आधुनिक शास्त्र विसरते.
आज च्या काळातील आहार तज्ञा चे सल्ले ह्याचे एकत्रित करण केले आणि ते प्रसिद्ध केले तर मस्त विनोदी लेख होईल..
हवामान मधील विविधता, गुण सूत्र मधील विविधता
हवामान नुसार वेगळी असणारी लाईफ स्टाईल.
शरीराला लागलेली सवय .हे सर्व हे आधुनिक तज्ञ विसरतात .ह्यांचे सर्व सल्ले युनिव्हर्सल law असल्या सारखे सर्व जगातील लोकांना एक च असतात.
पण ह्या वर कोणी आक्षेप घेत नाही पण प्राचीन ज्ञान
खरे की खोटे ह्याची शहानिशा न करता लगेच आक्षेप घेतात.

सुधारित विचाराची लोक.