आय.आय.टी.तील गणितविभागाचा प्रमुख असताना - भाग १

आय.आय.टी.तील गणितविभागाचा प्रमुख असताना

बालमोहन लिमये

भाग १

मी विभागप्रमुख झालो त्या गोष्टीला यंदा तीस वर्षे होतील. या सगळ्या वर्षांत कोणी ना कोणी विभागप्रमुख बनतच आला आहे. मग हा लेख लिहिण्यात काय औचित्य आहे असे वाटणे साहजिक आहे. टि.आय.एफ.आर. (TIFR: Tata Institute of Fundamental Research) किंवा आय.आय.टी. (IIT: Indian Institute of Technology) अशा बड्या संस्थांची नावे बऱ्याच जणांच्या ऐकिवात असली तरी त्यांचा कारभार कसा चालतो, तेथे निर्णय कसे घेतले जातात व त्यांची अंमलबजावणी कशी करावी लागते याबद्दल फारसे कोणाला माहीत नसते. त्यातील काही बारकावे पुढे आणण्यासाठी एखादा कालावधी घ्यायचा म्हणून माझ्या प्रमुखपदाचा निवडला आहे, कारण त्या काळात माझा वेगवेगळ्या अनेक व्यक्तींशी जवळून संबंध आला. शिवाय याच काळात आमच्या विभागाने एक नवा शिक्षणक्रम सुरू केला. तो गणिताशी संबंधित असला तरी गणिताच्या बाहेरचा होता! त्यासाठी काय करायला लागले व त्याची नुकतीच सांगता कशी झाली हेदेखील लिहिणार आहे. हे सर्व लिखाण माझ्या अनुभवांना धरून असल्याने त्यांत सगळ्या आय.आय.टी.च्या कारभाराचे, किंबहुना गणितविभागाच्या कामकाजाचे सर्वच पैलू समाविष्ट होणार नाहीत हे उघड आहे. विभागप्रमुख या नात्याने काय करणे शक्य असते यापेक्षा काय करणे अशक्य असते याचीही कल्पना येईल. काही गोष्टींचे स्मरण करून दिल्याबद्दल मी माझ्या तत्कालीन सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो, पण त्या सगळ्यांचा नामनिर्देश इथे करत नाही.



गणितविभागाची इमारत व तिच्यासमोरील छन्नमार्ग (corridor)

विभागप्रमुख

आय.आय.टी.मधील कुठल्याही विभागात काम करताना संशोधन, अध्यापन आणि प्रशासन या तीन गोष्टी अपेक्षित असतात. यांपैकी पहिल्या दोन महत्त्वाच्या, कारण तुमची पदोन्नती त्यांवर अवलंबून असते. पण कुठलाही गाडा सुरळीत ठेवण्यासाठी आणि त्याच्या यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्यासाठी व्यवस्थापनाची जरूर असतेच. ती जबाबदारी सोपवली जाते विभागप्रमुखावर. आय.आय.टी.मध्ये विभागप्रमुखाची नेमणूक जरी आय.आय.टी.चा निदेशक (Director) करत असला तरी त्या आधी विभागातील सर्व शिक्षकांचा कौल लक्षात घेतला जातो. एखाद्याला विभागप्रमुख नेमण्यासाठी तशी एकच अट असते : ती व्यक्ती पूर्ण प्राध्यापक (full professor) असली पाहिजे, म्हणजे शिक्षकांच्या चढत्या कमानीचा सर्वात वरचा दर्जा त्या व्यक्तीने मिळवला असला पाहिजे.

आय.आय.टी.मध्ये विभागप्रमुखाची नेमणूक फक्त तीन वर्षांसाठी असते. या गोष्टीचा दुहेरी फायदा होतो. एक तर कुठल्याच व्यक्तीचे, तिच्या दृष्टिकोणाचे, आवडीनिवडींचे फार काळ वर्चस्व राहत नाही, व दुसऱ्या बाजूने बघितले तर त्या व्यक्तीवर प्रशासनाचा कायमचा भार न पडता तिची संशोधन व अध्यापन या मुख्य कामांतील प्रगती खुंटत नाही. तरीही आय.आय.टी.तील खूपसे प्राध्यापक विभागप्रमुख व्हायला नाखूषच असतात. लष्कराच्या भाकरी भाजणे त्यांना नको असते. पण दर तीन वर्षांनी कुणा एकाला विभागप्रमुख बनावेच लागते. काही थोडे प्राध्यापक विभागप्रमुख बनायला उत्सुक असतातही, हातात येणाऱ्या अधिकाराच्या लालसेने. पण असा कोणी प्राध्यापक ज्येष्ठ (senior) असला तरी त्याला इतर शिक्षकांचा पाठिंबा सहसा मिळत नाही व तो बाजूलाच पडतो.

गणितविभागाचा प्रमुख बनण्याआधी माझ्या आय.आय.टी.मधील कामकाजाबद्दल थोडक्यात सांगतो. दक्षिण मुंबईतील टि.आय.एफ.आर. या संस्थेमध्ये सुमारे पाच वर्षे काम केल्यानंतर 1975 मध्ये मी पवई येथील आय.आय.टी.च्या गणितविभागात सहायक प्राध्यापक (assistant professor) म्हणून रुजू झालो. त्यावेळी प्राध्यापक मनोहर नरहर वर्तक विभागप्रमुख होते. ते अतिशय सौम्य स्वभावाचे आणि सगळ्यांना प्रोत्साहन देणारे होते. त्यांच्या संशोधनाचा विषय सांख्यिकी (Statistics) होता. या विषयांतील आणखी एक-दोन सदस्य आणि आधुनिक गणितात काम करणारे दोन-तीन सदस्य सोडले तर गणितविभागातील चौदा-पंधरा सदस्य द्रायु यामिकी (Fluid Mechanics) व स्थायु यामिकी (Solid Mechanics) या विषयांत काम करत. या विषयांना सध्याच्या काळांत गणितविभागात स्थान क्वचितच मिळते; ते आता अभियांत्रिकीचा (Engineering) भाग झाले आहेत. जुन्या ब्रिटिश परंपरेमुळे भारतातील गणितविभागांत हे विषय समाविष्ट झाले होते.

माझ्याबरोबर भरती झालेले मधुकर देशपांडे आणि कपिल जोशी हे सदस्य गणिताच्या आधुनिक शाखांत काम करणारे असल्याने आमचे विभागात काहीसे थंडे स्वागत झाले. अर्थात प्राध्यापक वर्तकांनी नव्या प्रकारच्या गणिताची गरज ओळखली होती आणि त्यांना प्राध्यापक रामचंद्र राव यांच्यासारख्या लांब पल्ल्याचा विचार करणाऱ्या काही थोड्या जणांचे सहकार्य होते, म्हणूनच आमचा प्रवेश शक्य झाला होता. हा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता, परंतु तो तडीस नेणे महाकर्मकठीण होते. आधीच्या सदस्यांना आपण ज्या विषयांत काम केले आहे व अजूनही करतो आहोत त्यांतच रस असणे साहजिक असले तरी नव्या विषयांत हात घालण्याची त्यांची तयारी वा कुवत नव्हती. शिवाय त्यांच्यात्यांच्यात हेवेदावे खूपच होते. परिमाणत: आपण आपले काम उत्तम रितीने करत राहायचे व इतर काही फंदात पडायचे नाही असेच धोरण मला ठेवावे लागले. नोकरीला लागल्यापासून आठ वर्षांत मला गणिताच्या वेगवेगळ्या शाखांत बरेच संशोधन करता आले. तसेच बी.टेक., एम.एस्सी आणि पीएच.डी. या वर्गांना निरनिराळे विषय शिकवता आले. शिवाय चार विद्यार्थ्य़ांनी माझ्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे प्रबंधही लिहिले. या कामगिरीच्या जोरावर मला 1983 साली पूर्ण प्राध्यापकाचा दर्जा मिळाला. नंतर हे काम असेच चालू ठेवायचे होते. त्याखेरीज आमच्या गणितविभागाचा चेहरामोहरा बदलण्यांत हातभारही लावायचा होता.

बीजगणितज्ञांची भरती

आधुनिक गणिताचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे बीजगणित (Algebra). शाळेतच हा विषय शिकवायला सुरुवात होते, पण महाविद्यालयांत बीजगणिताचे रूप पालटून अधिकाधिक अमूर्त (abstract) होत जाते, आणि विश्वविद्यालयात तर हा विषय नवीन संशोधनाच्या पायरीवर येऊन पोहोचतो. इतक्या अनेकविध संरचना (structures) या विषयांत बांधता येतात की त्या गणिताच्या इतर भागांना समृद्ध तर करतातच, पण पदार्थविद्यान, रसायनशास्त्र अशा इतर शास्त्रांतही एक प्रकारची शिस्त आणून देतात. दुर्दैवाने आमच्या गणितविभागात बीजगणितात संशोधन करणारा एकही सभासद 1990पर्यंत नव्हता. ही उणीव भरून काढण्यासाठी आम्ही काही जणांनी चंग बांधला. पण विभागातील जुनाट विचारसरणीच्या सदस्यांच्या मताधिक्यामुळे ते शक्य होत नव्हते. शेवटी आम्ही निवडपूर्व समितीपुढे आमचे म्हणणे-गाऱ्हाणे प्रभावीपणे मांडले. त्यांत आमचा कुणाचा वैयक्तिक आपमतलब बिलकुल नव्हता. फक्त गणितविभागाच्या विकासाची आच होती. शेवटी आधुनिक बीजगणितात संशोधन करणाऱ्या फक्त एका उमेदवाराला निवडण्याची सूचना मान्य झाली. मला आठवते की 1989 साली भरलेल्या निवडसमितीपुढे तीन चांगल्या बीजगणितज्ञांनी अर्ज केला होता. किती जणांना निवडायचे हे निवडसमितीच्या अखत्यारीत असल्याने एक सोडून दोन बीजगणितज्ञांची निवड झाली – सुधीर घोरपडे आणि जुगल किशोर वर्मा यांची. दोन्ही डोळ्यांपुढे सगळा काळोख असणाऱ्या आंधळ्याला वाटत असते की आपल्याला एका डोळ्याने तरी दिसावे. पण कधी क्वचित प्रसंगी त्याच्या दोन्ही डोळ्यांना दृष्टी येते. तसाच हा प्रकार होता. येथे एक गोष्ट नमूद करायला हवी, ती अशी की आय.आय.टी.तील एखाद्या विभागामधील सदस्यांची संख्या विश्वविद्यालयांप्रमाणे निश्चित ठरवून दिलेली नसते. त्यामुळेच एकाऐवजी दोघांना घेता आले. मात्र विभागातील काही जणांना ही जास्तीची ब्याद कशाला आली आहे असे वाटणे साहजिक होते. भक्कम सुरुवातीनंतर आमचा गणितविभाग बीजगणितात इतका ताकदवान होत गेला की तो आता भारतातील कुठल्याही विद्यापीठातील किंवा संशोधनसंस्थेतील गणितविभागाच्या तोडीचा झाला आहे.

गणितविभागातील शिक्षणक्रम

आय.आय.टी.च्या गणितविभागातील सदस्य बी. टेक. ह्या अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले गणित शिकवतातच, पण इतर ठिकाणी बी. ए. अथवा बी.एस्सी. पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी एम.एस्सी. हा शिक्षणक्रम (academic programme) पण चालवतात. 1968पासून चालत आलेल्या ह्या शिक्षणक्रमामध्ये वेळोवेळी बदल होत गेले होते. 1984 ते 1994 ह्या दशकामध्ये विद्यार्थ्यांना काही गाभ्याचे समान विषय शिकल्यानंतर चारपैकी एक विशेषीकरण (specialization) निवडता येत असे: शुद्ध गणित (Pure Mathematics), उपयोजित गणित (Applied Mathematics), संगणकशास्त्र (Computer Science) आणि सांख्यिकी व संक्रिया संशोधन (Statistics and Operations Research). यांच्यापैकी ‘शुद्ध गणित’ आणि ‘उपयोजित गणित’ या एक प्रकारच्या अपसंज्ञा (misnomers) होत्या, कारण गणिताचे असे दोन भाग करणे उचित नाही व ते शक्यही नाही. पण ही ब्रिटिश काळापासून चालत आलेली परंपरा होती. ह्या दोन्ही विशेषीकरणांना एकत्र करून एक संतुलित व मजबूत शिक्षणक्रम तयार करणे जरूर होते व ते सहज शक्यही होते.

उरलेल्या दोन विशेषीकरणांची, म्हणजे एकीकडे संगणकशास्त्र व दुसरीकडे सांख्यिकी व संक्रिया संशोधन यांची स्वरुपे वेगळी होती, प्रत्येकाच्या काही खासियती होत्या. परंतु दोघांचा वास्तव जगताशी (real world) जवळचा संबंध होता. त्यामुळे ह्या दोन्ही विशेषीकरणांत विद्यार्थी अहमहमिकेने प्रवेश घेत होते. पण त्यांची सांगड कशी घालायची ते स्पष्ट नव्हते. ती कशी घालता आली ते आता सांगतो.

नव्या शिक्षणक्रमाची जडणघडण

मुंबईच्या आय.आय.टी.तील संगणकशास्त्र व अभियांत्रिकी (Computer Science and Engineering) या विभागात दीपक फाटक आणि नंदलाल सारडा हे नावाजलेले प्राध्यापक काम करत. दोघेही माझे उत्तम मित्र होते व अजूनही आहेत. दोघांच्याही संशोधनाचे प्रधान विषय होते विदागार व्यवस्थापन प्रणाली (Database Management Systems) आणि माहिती प्रणाली (Information Systems). आय.आय.टी.बाहेरील अनेक संस्थांचे ते दोघे सल्लागार (consultants) होते. मला वाटते 1993 सालातील जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या एका शनिवारी ते दोघे आय.आय.टी.तून दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटमधील एका कार्यालयात मोटारने जाणार होते. मलाही त्याच बाजूला जायचे असल्याने मी त्यांच्याबरोबर निघालो. वाटेत माझ्या मनात घोळत असलेले प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले: संगणकशास्त्र आणि सांख्यिकी यांच्यामध्ये कोणते दुवे आहेत व ते परस्परांना पोषक ठरू शकतात का, असे. फार विचार करायला न लागता दोघांनीही सांगितले की तत्त्वत: ही दोन्ही शास्त्रे भिन्न असली तरी सध्याच्या आणि येत्या काळात या दोघांचा मिलाप करणे ही एक जरुरीची बाब होणार आहे. संगणकांचा वेग आणि त्याची स्मृती (speed and memory of computers) कितीही वाढत असली तरी उपलब्ध होत असलेली विदा किंवा आधारसामग्री (data) इतकी प्रचंड आहे की प्रथम सांख्यिकी तंत्रे (Statistical Techniques) वापरून तिचे वर्गीकरण केल्याशिवाय संगणकांना ह्या विदा हाताळणे दुरापास्त होत जाणार आहे. यंत्राध्ययनामधील नियतरीती (Algorithms in Machine Learning) कशा चालतात व त्यांत सुधारणा कशा करता येतील ते समजण्यासाठी संभाव्यताशास्त्र (Probability Theory) आणि सांख्यिकी यांचा वापर अत्यावश्यक आहे. या दोघांकडून मला माझ्या प्रश्नांची उत्तरे तर मिळाली होतीच, पण गणितविभागातील दोन विशेषीकरणांचे एकत्रीकरण का व कसे करायचे याचा मार्गही स्पष्ट झाला होता. शिवाय हे दोघे संगणकशास्त्र विभागातील नामवंत असामी असल्याने त्यांनीच सुचवलेल्या प्रक्रियेला त्यांच्या विभागाकडून हातभार लागणे ओघानेच आले. विशेष म्हणजे, प्राध्यापक फाटक तेव्हाचे विभागप्रमुख होते आणि प्राध्यापक सारडा नंतरचे विभागप्रमुख होऊ घातले होते. ही नामी संधी वाया घालवता कामा नये असे मी पक्के ठरवले.

आता प्रश्न होता गणितविभागातल्या माझ्या सहकाऱ्यांना हे सगळे कसे पटवून द्यायचे आणि त्यांचे संपूर्ण सहकार्य कसे मिळवायचे. मी काही तेव्हा गणितविभागाचा प्रमुख नव्हतो. त्यामुळे माझे म्हणणे किती जण व कितपत गांभीर्याने घेतील हे नक्की नव्हते. त्यावेळी गणितविभागाचे प्रमुख होते प्राध्यापक मधुकर देशपांडे, माझ्याबरोबरच आय.आय.टी.त रुजू झालेले. मी त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या आधी विभागप्रमुख असलेले प्राध्यापक रामचंद्र राव, देविदास पै व गिरीश पटवर्धन यांच्यासोबत तात्त्विक आणि व्यावहारिक दृष्टींनी चर्चा केली, आणि त्यांची अनुकूलता मिळवली. एखादा महत्त्वाचा मुद्दा बहुसंख्य सदस्यांकडून मान्य करून घ्यायचा असला (किंबहुना त्यांच्या गळी उतरवायचा असला) तर त्यासाठी एक नामी युक्ती वापरता येते, ती म्हणजे या कामासाठी काही समित्या नेमायच्या, व मुख्य म्हणजे त्यांचे आमंत्रक (convener) सोयीस्करपणे नेमून घ्यायचे. झाले, विभागप्रमुखांनी दोन समित्या नेमल्या. पहिली होती सैद्धांतिक शिक्षणक्रमासाठी (Theoretical Programme) आणि दुसरी होती व्यवहारोपयोगी शिक्षणक्रमासाठी (Utilitarian Programme). पहिलीचे आमंत्रक म्हणून प्रा. देविदास पै आणि दुसरीचे आमंत्रक म्हणून प्रा. गिरीश पटवर्धन यांची नेमणूक झाली. मी मुद्दामच बाजूला राहायचे ठरवले, ज्यायोगे मला स्वतंत्रपणे काही अनौपचारिक चर्चांना चालना देता यावी. दोन्ही समित्यांच्या कित्येक बैठका झाल्या, खलबते झाली.

सैद्धांतिक शिक्षणसमितीच्या सदस्यांमध्ये दुमत होते ते फक्त तथाकथित ‘शुद्ध’ व ‘उपयोजित’ (pure and applied) अंगांना किती किती महत्त्व द्यायचे, आणि कोणते अभ्यासक्रम (courses) आवश्यक (core) समजायचे व कोणते ऐच्छिक (elective) ठेवायचे एवढ्यापुरतेच. पण लवकरच तडजोड करता आली. ती काहीशी तात्त्विक स्वरूपाची तर काहीशी गणितविभागातील सदस्यांच्या संख्याबळावर आधारित होती. पण प्रत्येक समझोत्यामागे ह्या दोन कारणपरंपरा असतातच. त्या शिक्षणक्रमाला काय नाव द्यायचे याबाबत काहीच वाद नव्हता : M.Sc. in Mathematics, म्हणजे गणितातील पदव्युत्तर शिक्षणक्रम.

त्या मानाने व्यवहारोपयोगी शिक्षणक्रम हाताळणाऱ्या समितीचे काम बिकट होते. संगणकशास्त्र आणि सांख्यिकी यांची जोड घालण्याला मुख्य विरोध झाला तो सांख्यिकी क्षेत्रात सैद्धांतिक काम करणाऱ्या सदस्यांकडून. त्यांना वाटत होते की कोणत्याही व्यवहारोपयोगी शिक्षणक्रमात सखोल निपुणतेला वाव मिळणार नाही, व त्यातून पुढे पीएच.डी. करणारे विद्यार्थी मिळणार नाहीत. या सदस्यांना दिलासा देण्याची गरज होती. शेवटी समितीच्या आमंत्रकाने मूलभूत अभ्यासक्रमांत संभाव्यताशास्त्र (Probability Theory) समाविष्ट करुन घेतले आणि काही सैद्धांतिक स्वरूपाचे नवीन अभ्यासक्रम निर्माण करायचे ठरवले. यानंतरचा मुख्य प्रश्न असा होता की उपयोजित सांख्यिकी शिकवू शकणारे कोणीच सभासद गणितविभागात नव्हते. तेव्हा अशा सदस्यांची नव्याने भरती करणे अनिवार्य होते. पुढचा मुद्दा म्हणजे संगणकशास्त्रातील प्राथमिक अभ्यासक्रम जरी आय.आय.टी.तील बी.टेक.च्या विद्यार्थ्यांबरोबर शिकवता आले तरी त्यानंतरचे अभ्यासक्रम शिकवणारे विशेषज्ञ गणितविभागात घ्यावे लागणार होते. एकंदरीत ही फारच मोठी कामगिरी होती, शिवधनुष्य पेलण्यासारखी. संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापक फाटक आणि सारडा यांनी वेळोवेळी दिलेल्या निविष्टींच्या (inputs) जोरावर शेवटी एक व्यवहारोपयोगी शिक्षणक्रम उभा करता आला, त्यांत मूलभूत गणित, सांख्यिकी आणि संगणकशास्त्र यांचा त्रिवेणी संगम झाला होता. आता त्याला नाव काय द्यायचे ते ठरवणे आले. कुठल्याही नावात सांख्यिकीचा (Statistics) उल्लेख होणे जरुरीचे होतेच, पण त्याखेरीज संगणकशास्त्राचाही (Computer Science) समावेश हवा होता. पण एकंदरीत पाहता असे लक्षात आले की संगणकशास्त्रविभागाच्या बाहेरील कुठल्याही शिक्षणक्रमाच्या नावात संगणकशास्त्राचा उल्लेख त्या विभागाला मानवणारा नव्हता. मग मी एक शक्कल लढवली. फ्रेंच भाषेतील Informatique या शब्दाचा अर्थ इंग्लिश भाषेत Computer Science असा आहे. तेव्हा Computer Science ऐवजी Informatics असा शब्दप्रयोग केला तर आमच्या विभागाचे काम होईल व संगणकशास्त्रविभागातील सदस्यांची काही हरकत नसावी असे वाटले. शेवटी या नव्या शिक्षणक्रमाचे नामकरण ‘Statistical Informatics’ म्हणजे `सांख्यिकीय संगणकशास्त्र’ असे करायला मी सुचवले. काही चर्चेनंतर गणितविभागाच्या सर्वसामान्य सभेत त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले.

प्रमुखपदी नेमणूक

या सगळ्या घडामोडी होईपर्यंत 1993 सालचा ऑगस्ट महिना उलटून गेला होता, म्हणजे माझ्या डोक्यात आलेली सांख्यिकी व संगणकशास्त्र यांचा मेळ घालण्याची कल्पना सात आठ महिन्यांची झाली होती, व ती मूर्त स्वरूपात येण्याची लक्षणे दिसू लागली होती. मात्र आता प्राध्यापक देशपांडे यांच्या प्रमुखपदाचा अवधी संपायला दोन-तीन महिनेच उरले होते, आणि नवीन विभागप्रमुख कोण असावा असे वारे वाहू लागले होते. सामान्यत: विभागप्रमुख होणे मला नापसंतच होते, पण यावेळी मात्र एक नवा शिक्षणक्रम उभारण्याची संधी आली होती. तसेच अनेकांच्या विरोधाला दाद न देता कठीण प्रसंगातून वाट काढण्याची हातोटी आपल्यात आहे का याचा अंदाजही घ्यायचा होता. मी हे जेव्हा माझ्या पत्नीजवळ – निर्मलाजवळ – बोलून दाखवले तेव्हा तिचा संपूर्ण पाठिंबा मिळाला. याखेरीज तिने आणखी एक गोष्ट लक्षात आणून दिली. कधी ना कधी तीन वर्षांसाठी गणितविभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारायला लागणारच होती; ती याच वेळी घ्यावी, कारण पुढच्या वेळेपासून प्राध्यापक रामचंद्र राव निवृत्त झाले असतील. मला बळ द्यायला, सांभाळून घ्यायला त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नव्हता.

नोव्हेंबर 1993च्या सुरुवातीला नेहमीच्या रितीप्रमाणे आय.आय.टी.चे तत्कालीन उपनिदेशक (Deputy Director) प्राध्यापक अरविंद कुडचडकर गणितविभागातील सदस्यांचा कौल घेण्यासाठी आले, व प्रत्येकाला स्वतंत्रपणे भेटून त्याची पसंती त्यांनी नोंदवली. आठवड्याभरात मला आय.आय.टी.चे निदेशक प्राध्यापक बिश्वजित नाग यांचे बोलावणे आले. पाचच मिनिटांच्या भेटीत त्यांनी सांगितले : गणितविभागातील बहुसंख्य सदस्यांनी विभागप्रमुख म्हणून तुमचे नांव सुचवले आहे; मात्र नेमक्या किती जणांनी हे मात्र विचारू नका, कारण आता तुम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालायचे आहे.



वर्तमान विभागप्रमुख प्राध्यापक देशपांडे यांच्याशी विचारविनिमय झाल्यावर 18 नोव्हेंबर 1993 रोजी त्यांनी मला विभागप्रमुखाच्या खुर्चीवर नेऊन बसवले. आणखी बारा दिवसांतच ते आय.आय.टी.मधून सेवानिवृत्त होणार होते. कदाचित म्हणूनच गणितविभागाने त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या तीन वर्षांत त्यांच्याकडून विभागप्रमुखाचे काम करून घेतले होते. मात्र असे वाटून गेले की एखाद्याला त्याच्या पदावधीच्या (tenure) अगदी शेवटी विभागप्रमुख करणे हितावह नसावे, कारण अशी व्यक्ती तिने घेतलेल्या निर्णयांबद्दल उत्तरदायी ठरत नाही. विभागप्रमुख म्हणून करायचे माझे पहिले काम होते प्राध्यापक देशपांडे यांचा निरोप समारंभ आयोजित करणे. महिन्याच्या कुठल्याही दिवशी साठ वर्षे पुरी होत असली तरी निवृत्तीचा दिवस महिनाअखेरीचा असतो. म्हणून 29 नोव्हेंबर 1993 रोजी संध्याकाळी एक छोटी सभा विभागाच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली. बऱ्याच जणांनी प्राध्यापक देशपांडेंच्या आठवणी प्रेमादराने सांगितल्या. त्यामुळे भारावून जाऊन की काय, ते उत्तरादाखल चांगले अर्धा-पाऊण तास बोलले. सभा यथासांग, अपेक्षेपेक्षाही चांगली झाली. त्या दिवशी मी ठरवले की एखाद्या सत्रांत निवृत्त होणाऱ्या सर्वांना त्या सत्राच्या शेवटी सामूहिक निरोप द्यायचा, कारण त्या सत्रांत शिकवत असलेले अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी निवृत्तीच्या दिवसानंतरही सदस्य विभागात येतच असतात. मी प्रमुखपदावर असताना आमच्या विभागातील आणखीन सात सदस्य सेवानिवृत्त झाले

पहिल्यावहिल्या निरोप समारंभानंतरच्या आठवड्यांत मला एक औपचारिक काम करायचे होते. आमच्या विभागातील अनंत शास्त्री, मुरली श्रीनिवासन, जुगल किशोर वर्मा आणि सुधीर घोरपडे या चार प्राध्यापकांनी 1993 साली वर्षभर चालणारे चर्चासत्र (Year Long Seminar) सुरू ठेवले होते, बीजगणित (Algebra), समचयशास्त्र (Combinatorics) व संस्थिती (Topology) या विषयांवरचे; म्हणून त्याची आद्याक्षरसंज्ञा (acronym) होती ACT. त्यासंबंधात डिसेंबर 1993मध्ये एक तीन आठवड्यांची अनुदेशात्मक परिषद (Instructional Conference) भरत होती. तिच्या पहिल्याच दिवशी या चर्चासत्राच्या सगळ्या टिपण्या सर्वांना मिळाल्या. माझे काम फक्त परिषदेची सुरुवात करून द्यायचे होते. माझ्या कारकीर्दीचा आरंभ अशा प्रशिक्षणपर दीर्घ परिषदेने झाल्यामुळे खूप बरे वाटले.

आय.आय.टी.च्या विद्यार्थ्यांना सबंध डिसेंबर महिना सुट्टीचा असतो. त्यामुळे आम्हाला कुणाला काहीच शिकवायचे नसते. तेव्हा संशोधनकार्याला वेग मिळावा अशी अपेक्षा असते. विभागप्रमुखाला पुढच्या वर्षाच्या सत्रांची, पुऱ्या शैक्षणिक वर्षाची आखणी करायला संधी मिळते. बारीक-सारीक गोष्टींचा शिरस्ता पाडायला सुरुवात करता येते. मी असे ठरवून टाकले की मी फक्त सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान आणि दुपारी चार ते पाचच्या दरम्यान विभागप्रमुखाच्या कार्यालयात उपस्थित राहायचे, आणि तशी दरवाज्याच्या बाहेर पाटीही लावून टाकली. त्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर व्हायला फार उशीर करता येईनासा झाला आणि फार लवकर घरी किंवा दुसरीकडे कुठे निघून जाता येईनासे झाले. तसेच विभागाच्या सर्व सदस्यांना मी नक्की कधी उपलब्ध असू शकतो ते लक्षात आले. शिवाय माझे संशोधन करायला वेळ मिळवणे मला शक्य झाले; माझ्या आणि प्राध्यापक रेखा कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली पीएच.डी. करणाऱ्या रफिकुल आलम या विद्यार्थ्याकडे ठरावीक लक्ष पुरवता आले. याच काळात मी माझ्या फलीय विश्लेषणावरील (Functional Analysis) पुस्तकाची दुसरी आवृत्ती तयार करत होतो. पण माझ्या वैयक्तिक दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी दुपारी घरी जाऊन जेवल्यानंतर वामकुक्षी घेत राहू शकलो. आय.आय.टी.तील शिक्षकाच्या नोकरीची ही सर्वात आकर्षक उपलब्धी (perquisite) होती माझ्यासाठी.

कोणी काय शिकवायचे

विभागीय वेळापत्रक समिती (Timetable Committee) फक्त दोन सदस्यांची असे. त्यातला एक अनुभवी, आधी असे काम केलेला व दुसरा होतकरू. कुठल्याही सत्रात कोणते आवश्यक (core) आणि कोणते ऐच्छिक (elective) अभ्यासक्रम (courses) शिकवायचे हे निश्चित करून त्यांची यादी विभागातील सर्व सदस्यांकडे जायची. प्रत्येकाला त्याच्या पसंतीचे तीन किंवा चार अभ्यासक्रम नोंदवण्याची संधी मिळे, त्यांचा प्राधान्यक्रम (order of preference) लावून. शक्यतो त्यांपैकीच एक अभ्यासक्रम प्रत्येकाला शिकवायला मिळावा असा प्रयत्न वेळापत्रक समितीने करायचा असतो, पण एकापेक्षा जास्त सभासदांना तोच अभ्यासक्रम शिकवायला हवा असला, तर काही आडाखे पाळावे लागत. जर कोणी प्राध्यापक एखादा अभ्यासक्रम पहिल्यांदाच शिकवायला पुढे आला असेल तर त्याला अग्रक्रम मिळे. तसे करूनही काही मतभिन्नता असली तर विभागप्रमुखाला निर्णय घ्यावा लागे. वेळापत्रक समितीचे काम विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि काही अंशी जोखमीचे असे. त्यामुळे विभागप्रमुखाला या समितीच्या सभासदांची नेमणूक काळजीपूर्वक करावी लागे. शिकवण्याच्या बाबतीत विभागप्रमुखाला काही मुभा मिळू शकते. कुठले अभ्यासक्रम मी शिकवायचे व कुठल्या वेळेला शिकवायचे हे फक्त मी वेळापत्रक समितीशी बोलून ठरवत असे इतकेच.

आय.आय.टी.तील कुठलाही शिक्षणक्रम ठरावीक सत्रांमध्ये (semesters) विभागलेला असतो. प्रत्येक सत्रात चौदा आठवडे तरी (सुट्या न धरता) शिकवायला मिळावेत अशी अपेक्षा असते. एका अभ्यासक्रमासाठी दर आठवड्याला तीन तर कधी चार संपर्क तास (contact hours) नेमून दिलेले असतात. विद्यार्थ्यांना एका सत्रात पाच किंवा सहा अभ्यासक्रम शिकावे लागतात. शिकवणाऱ्याला मात्र एका सत्रात एक किंवा दोनच अभ्यासक्रम हाताळायचे असतात, म्हणजे प्रत्येकाने दर आठवड्याला सरासरी चार ते पाच तास शिकवायचे. अर्थात त्यासाठी भरपूर तयारी करावी लागते. पण महाविद्यालयांतील शिक्षकांपेक्षा ही सरासरी फारच कमी आहे, त्यांना याच्या तिप्पट-चौपट शिकवावे लागते. या तफावतीचे कारण असे की आय.आय.टी.तील शिक्षकांना संशोधनावर भर देता यावा अशी अपेक्षा केली जाते. प्रत्यक्षात तसे बरेच जण करत असले तरी काही गणंग असतातच.

अभ्यासक्रमाची टिपणवही

एखाद्या अभ्यासक्रमात काय काय शिकवायचे ते त्याच्या पाठ्यक्रमामध्ये (syllabus) लिहिलेले असते. एका विभागीय समितीने ते ठरवलेले असते आणि त्याला आय.आय.टी.च्या अधिसभेने (senate) मान्यता दिलेली असते. त्या पाठ्यक्रमामध्ये पाठ्यपुस्तक (Text Book) कोणते आणि संदर्भग्रंथ (Reference Books) कोणते यांचाही उल्लेख असतो. परंतु त्यांबाबत अभ्यासक्रम शिकवणाऱ्याला बरेच स्वातंत्र्य असते. तो दुसरे कुठले पाठ्यपुस्तक वापरू शकतो, तसेच कुठल्या भागाला कमी किंवा जास्त महत्त्व द्यायचे ते तो ठरवू शकतो. तोच अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्राध्यापकांनी शिकवला तर त्याचे स्वरूप अगदी वेगवेगळे असू शकते. अनुभवी शिक्षकाने शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा लाभ नंतर नव्याने शिकवणाऱ्यांना व्हावा म्हणून मी एक नवीन पायंडा पाडायचे ठरवले. प्रत्येकाने आपला अभ्यासक्रम शिकवताना एक धारिका (file) तयार करत जायचे. तिच्यात पाठ्यपुस्तकाची नावे, प्रकरणांची यादी, आपण रचलेल्या प्रश्नपत्रिकांच्या प्रती कालक्रमानुसार लावून ठेवायच्या. मी त्याला अभ्यासक्रमाची टिपणवही (Course File) असे नांव दिले. समजा गणितीय विश्लेषण (Mathematical Analysis) हा अभ्यासक्रम मी यंदा शिकवत आहे. मग त्याच्या टिपणवहीत मी भर टाकत जायचे. मग पुढच्या वेळी जो कोणी हाच अभ्यासक्रम शिकवणार असेल त्याच्याकडे ती टिपणवही जाणार व तो तिच्यात भर घालणार. याप्रमाणे प्रत्येक अभ्यासक्रम समृद्ध होत जावा अशी अपेक्षा. शिकवणाऱ्याला आधीच्या अनेक वर्षांत तो अभ्यासक्रम कसा शिकवला गेला, कोणत्या प्रश्नपत्रिका काय स्वरूपाच्या होत्या ही सगळी माहिती एकत्रित मिळणार होती. मी ही प्रथा सुरू केल्यावर खूपशा प्राध्यापकांनी तिचे स्वागत केले. त्यांनी भर घातलेल्या टिपणवह्या सत्राच्या अखेरीस विभागीय कार्यालयात जमा होऊ लागल्या. मात्र काही प्राध्यापकांनी सहकार्य दिले नाही. मी कितीही वेळा सुचवले तरी आपण शिकवलेल्या अभ्यासक्रमाच्या टिपणवहीत भर घालायचे ते टाळत असत. मी विभागप्रमुख असलो तरी त्यांच्यावर सक्ती करू शकत नव्हतो, व तसे काही करायची माझी इच्छाही नव्हती. एखादा प्राध्यापक वारंवार असा असहकार करू लागला तर मी फक्त त्यांनी बनवलेल्या प्रश्नपत्रिकांच्या प्रती माझ्याकडे पाठवायला सांगत असे. त्या प्रश्नपत्रिकांवरुन त्यांनी काय काय शिकवले याचा चटकन अंदाज येऊ शकत होता. पण जेव्हा तेही मिळणे दुरापास्त झाले, तेव्हा तो अभ्यासक्रम त्या सत्रात शिकलेल्या विद्यार्थ्यांशी बोलणे भाग पडले. तसे केल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की त्यांना शिकवला गेलेला अभ्यासक्रम फारच तुटपुंजा होता. आय.आय.टी.सारख्या संस्थेत शिकवणाऱ्याला जी मोकळीक मिळते तिचा असा दुरुपयोग केलेला पाहून मी खजील झालो. पण मला जास्त काही करता येण्यासारखे नव्हते. कदाचित मी विभागप्रमुख असलो तरी हा कोण जाब विचारणारा, आम्हाला हवे तेच व तेवढेच आम्ही शिकवू असे या प्राध्यापकांना वाटत असावे. अभ्यासक्रमात काय शिकवायचे याबद्दलची मोकळीक महत्त्वाची मानली तरी काही किमान गोष्टी शिकवणे जरुरीचे असतेच. तसा अंकुश अनाठायी नसतो अशी माझी धारणा होती.

आर्थिक व तांत्रिक परिस्थिती

भारतातील इतर महाविद्यालये आणि विश्वविद्यालये यांच्या मानाने आमच्या संस्थेला किती तरी जास्त सरकारी मदत मिळत असे हे निश्चित. पण ही मदत 1991-1992 सालाच्या स्तरावर गोठवण्यात आली होती. त्यामुळे नवे उपक्रम हाती घेताना टंचाई निर्माण होऊ नये म्हणून काही खास प्रकल्प (projects) लिहून त्यांच्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडून (DST: Department of Science and Technology) किंवा काही उद्योगसमूहांकडून वेगळी मदत मिळवणे क्रमप्राप्त होते. असे प्रकल्प लिहून पाठवण्यास फारच थोडे प्राध्यापक तयार होते. त्यांना प्रोत्साहन देणे माझे काम होते, पण याबाबत माझी बाजू लंगडीच पडत असे. उदाहरणार्थ, सांख्यिकीमध्ये संशोधन करणाऱ्या काही प्राध्यापकांना SAS (Statistical Analysis System) नावाच्या मृदुसामग्रीची (software) गरज भासत होती, पण ती फार महागडी असल्याने गणितविभागाला परवडणे शक्य नव्हते. शेवटी संस्थेतील काही इतर विभागांतील प्राध्यापकांची मोट बांधून त्यांनीच तिचे वार्षिक परवाने मिळवले.

विभागातील बहुतेक सगळे सदस्य छोट्या-मोठ्या नियमांचे पालन करत असत. पण काही वेळा आय.आय.टी. ही एक दुभती गाय आहे, आणि जितके दूध काढून घेता येईल तितके काढून घ्यायचे अशी प्रवृत्ती दिसून आली. उदाहरणार्थ, मुंबईतल्या मुंबईत कुणा प्राध्यापकाला त्याच्या संशोधन वा अध्ययन कामासाठी जावे लागले तर जाण्यायेण्याचा खर्च संस्था देत असे. पण शैक्षणिक कामाचा लांबचा संबंध लावून आपल्या खाजगी कामासाठी संस्थेचा पैसा वापरला जायचा. या अयोग्य गोष्टीला चाप लावण्यासाठी मी शहानिशा करून मगच त्या देयकांवर (bills) सही करायचे ठरवले. तसेच गणितविभागात दस्तऐवजांची प्रत काढण्याचे एकच यंत्र होते, झेरॉक्स कंपनीचे. त्याचा वापर केवळ अधिकृत कागदपत्रांसाठी करावा अशी अपेक्षा होती. पण कधी कधी सोईस्कर पडते म्हणून खाजगी कागदपत्रांच्या प्रती काढल्या जात. एकदा एक नेहमी सचोटीने वागणारे प्राध्यापक आपल्या प्रमाणपत्राची प्रत काढत होते. कर्मधर्मसंयोगाने मी तिथून जात होतो. ‘खाजगी काम चाललं आहे वाटतं’ एवढेच म्हणून मी काढता पाय घेतला. ही अगदी क्षुल्लक बाब होती, आणि एका रुपयाचे काम करण्यासाठी कुठे तरी पायपीट करायला लावणे बरोबर नव्हते, कारण त्यामुळे या प्राध्यापकांचा बहुमोल वेळ वाया गेला असता. तेव्हा तिकडे कानाडोळा केलेलाच बरा, असा विचार मी केला.

संगणक व त्यांच्यासाठी लागणारी परिस्थितीही कठीण होती. आमच्या विभागात 1993 साली प्रथम काही व्यक्तिगत संगणक पीसी/एटी (PC/AT: Personal Computers/Advance Technology) घेण्यात आले, जरी आय. बी. एम. (IBM, International Business Machines) या कंपनीने ते 1984 सालीच प्रसारित केले होते. त्या वेळी संपूर्ण विभागासाठी उपलब्ध असणाऱ्या कोठाराची धारणक्षमता (disk space) फक्त 20 एमबी (MB: Mega Bytes) होती. सगळ्या प्राध्यापकांमध्ये आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये तिचे थोडे थोडे वाटप करण्यासाठी एक समिती नेमावी लागली होती. हे सध्या किती जुनाट वाटते, कारण आता आपण संगणकाद्वारे पाठवत असलेली प्रत्येक फाईल 20 एमबीपेक्षा जास्त अंकीय माहिती (digital information) धारण करू शकते. मला आठवते की आज सगळे गणिती सदासर्वदा वापरतात ती लेटेक्स (LaTex) नावाची संगणकप्रणाली आमच्या विभागाला युरोपमधून कुठून तरी अनेक फ्लॉपी डिस्कवर आणावी लागली होती. दूरध्वनी (telephone) वापरता येण्याबाबत देखील एक श्रेणीबंध (hierarchy) होता: सगळ्या शिक्षकांना त्यांच्या कार्यालयांतून फक्त मुंबईतल्या मुंबईत बोलता यायचे, विभागप्रमुखांना फक्त भारतातल्या भारतात बोलता यायचे, आणि अधिष्ठाते व निदेशक यांना जगात कुठेही बोलता यायचे. अर्थात बाकीच्या संस्थांत याहीपेक्षा हलाखीची परिस्थिती होती. पण यातून मार्ग काढत राहणे जरूर होते.

कर्मचारी आणि कार्यालय

विभागाच्या कर्मचारी वर्गाबरोबर माझे संबंध सुरुवातीपासूनच खेळीमेळीचे होते; मी विभागप्रमुख झाल्यावर त्यांत जास्त जवळीक आली. संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ आणून आम्ही एकमेकांना देत असू. दोन प्राध्यापकांतील संबंध मात्र त्या मानाने औपचारिक असत. त्यांनी एकमेकांच्या खोलीत जाऊन तिळगूळ दिला आहे असे क्वचितच व्हायचे. त्या काळी विभागप्रमुखाने पाठवायची पत्रे लघुलिपीत (short hand) कोणी तरी लिहून घेऊन मग त्यांचे टंकलेखन (typing) करावे लागे. या प्रक्रियेत सर्वस्वी गुप्तता पाळण्याबाबत एम. परमेश्वरन् नावाच्या माझ्या साहाय्यकावर मी पूर्णपणे भिस्त ठेवू शकत होतो. जवळजवळ तीस वर्षांनंतर आजही आम्हा दोघांमध्ये आपुलकी आहे. आम्हा सगळ्यांचा एक संघ (team) बनून गेला होता. दर वर्षाच्या शेवटी
विभागप्रमुखाला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाबद्दल एक गोपनीय अहवाल (confidential report) लिहायचा असतो. त्यात कोणाच्या विरोधात एकही अवाक्षर मला लिहावेसे वाटले नाही.

मी विभागप्रमुख झालो तेव्हा विभागाचे कार्यालय व त्याला लागून असलेली विभागप्रमुखाची खोली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होती. काही प्राध्यापकांच्या खोल्या आणि शिकवण्याचे वर्ग पहिल्या मजल्यावर, तर काही दुसऱ्या मजल्यावर होत्या. काही काळाने पहिल्या मजल्यावरील संगणकशास्त्रविभागातील प्राध्यापकांच्या खोल्या गणितविभागाच्या ताब्यात आल्या. इमारतीत उद्वाहक (elevator) नसल्याने बाहेरून येणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने विभागाचे कार्यालय पहिल्या मजल्यावर असणे सोईस्कर होते, म्हणून मी ते हलवायचे ठरवले. त्याला आणखी एक कारण होते. दुसऱ्या मजल्यावरील विभागप्रमुखाच्या खोलीतील खिडक्या बाहेरच्या परिसरांत उघडत असल्याने चांगली हवा खेळत असे. परंतु त्या खोलीला लागून असलेल्या खोलीत कर्मचारी काम करत, व त्यांना बाहेरची स्वच्छ हवा मुळीच मिळायची नाही. शिवाय त्यांच्या खोलीत वातानुकूलक (air conditioner) लावायला संस्थेची परवानगी नव्हती. त्यामुळे, विशेषत: उन्हाळ्यात, सर्वच कर्मचाऱ्यांची पंचाईत व्हायची. पंखे सतत फिरत ठेवले तरी कोंडल्यासारखे व्हायचेच. म्हणून पहिल्या मजल्यावर स्थलांतर करताना कर्मचाऱ्यांच्या भागातील खिडक्यासुद्धा बाहेरील परिसरात उघडतील अशी काळजी घेतली. हा नवा आराखडा पाहिल्यावर सगळे कर्मचारी खूष झाले. ही गोष्ट लहान वाटत असली तरी आपलाही कोणी वाली आहे असे त्यांना वाटणे जरुरीचे होते. मी विभागप्रमुखाची आधीची जागा चर्चासत्राच्या कक्षासाठी व विभागीय ग्रंथालयासाठी राखून ठेवली. प्रत्यक्ष स्थलांतर करण्यापूर्वी व ते होत असताना अनेक छोटे-मोठे निर्णय मलाच घ्यावे लागत होते; काही गोष्टी नव्याने जाणून घ्याव्या लागत होत्या. त्या काळात मी वास्तुविद (architect), सुतार, नळकारागीर (plumber), वीजतंत्री (electrician) यांच्या भूमिका एकाच वेळी निभावत होतो; निदान त्यांचे तंत्रज्ञान मलाही अवगत असल्याचे दाखवत होतो. एकदा स्थलांतर पूर्ण झाल्यावर सर्व कर्मचाऱ्यांबरोबर चहापानाचा एक कार्यक्रम केला तेव्हा खरोखर हुश्श झाले.

(क्रमशः)
---

बालमोहन लिमये

(balmohan.limaye@gmail.com)

Balmohan Limaye 2020

लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर आता गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus). पवईलाच रहिवास.

बालमोहन लिमये यांचे इतर लिखाण

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख आवडला. एक प्रश्न आहे. केवळ संशोधन करण्याच्या पोस्ट असतात का? की कायम शिकवणे + संशोधन असे एकत्रच येतात IIT मध्ये ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शिकवणे + संशोधन असे एकत्रच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर ओघवत्या शैलीतील लेख वाचून पूर्ण केल्यावरच थांबलो. माहितीपूर्ण आणि रंजक लेखासाठी धन्यवाद. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप छान. जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा दिला. एखाद्या विभागाची शैक्षणिक रचना पुन्हा तयार करणे हे एक कठीण काम आहे, जे तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे पूर्ण केले. विभागाचा आधुनिक आत्मा पुन्हा शोधण्यात तुम्ही मदत केली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दीपक फाटक

छान लेख. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विभागप्रमुख होणे म्हणजे हौसिंग सोसायटीतील सेक्रेटरी पद घेणे यामध्ये फरक नसेल. विकतची दुखणी घेणे. तरीही तुम्ही प्रमुखपद गुण्यागोविंदाने पार पाडलेलं दिसतंय.
एक प्रश्न - इतर डिग्री कॉलेजांत शिकवणे म्हणजे शिक्षक एकतर्फी पाठ सांगत जातो. तासांच्या शेवटी एक प्रोफेसर समजलं का (understand?) नाही तर पुढच्या तासाला म्हणत असे. एकदा मात्र 'पुढच्या वर्षी' म्हणाला. डिसेंबरचा शेवटला आठवडा नव्हता पण विषय फारच सोपा होता. सगळे हसले. तर आइआइटीमध्ये शिक्षक एकतर्फी शिकवत जातात का प्रश्नोत्तरे पद्धत वापरतात? म्हणजे पुढच्या तासाला काय शिकणार आहोत ते विद्यार्थ्यांनी अगोदरच वाचून यायचे असते? अभ्यासक्रम दिलेला असतोच. फक्त ती प्रकरणे वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांतून वाचून यायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिकवणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बोलते करावे, त्यांच्याकडून प्रश्न मागवावेत अशी खूप अपेक्षा असते आय.आय.टी.त, पण प्रत्यक्षात हे फार थोड्या वेळा घडते. कारणे अनेक आहेत. एक तर अभ्यासक्रम अनेकदा इतका ठासून भरलेला असतो की मनमोकळी चर्चा म्हणजे एक चैनीची गोष्ट ठरते. दुसरे असे की अगदी थोड्या विद्यार्थ्यांना विषय नीट समजून घेऊन पुढचा विचार करण्यात रस असतो. पुष्कळांना फक्त चांगली ग्रेड हवी असते. नंतरच्या तासाला काय शिकवणार आहे हे सुचवले असले तरी कोणी विद्यार्थी तो भाग वाचून वर्गात आल्याचा माझा अनुभव नाही. शिवाय सगळे शिक्षक आयत्या वेळी वेगवेगळी चर्चा करायच्या तयारीत नसतात ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा चांगल्या उद्दिष्टाची अंमलबजावणी दूरच रहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषत:आपण ईंग्रजी शब्दांना जे प्रतिशब्द दिले आहेत ते माहितीपूर्ण आहेत. हल्ली असा प्रयत्नंही कोणी करीत नाही. असे करणे खुप जरुरी आहे.
धन्यवाद. या लेखाच्या दुव्यासकट मी आमच्या मित्र मंडळींना पुढे पाठवत आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. चांगले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<चौदा-पंधरा सदस्य द्रायु यामिकी (Fluid Mechanics) व स्थायु यामिकी (Solid Mechanics) या विषयांत काम करत. या विषयांना सध्याच्या काळांत गणितविभागात स्थान क्वचितच मिळते; ते आता अभियांत्रिकीचा (Engineering) भाग झाले आहेत. जुन्या ब्रिटिश परंपरेमुळे भारतातील गणितविभागांत हे विषय समाविष्ट झाले होते.>

जुन्या ब्रिटिश परंपरेतून चालत आलेले गणित आणि 'नव्या' प्रकारचे गणित ह्यांच्यामधील अंतराचा माझ्या स्मरणातील अनुभव अशा स्वरूपाचा आहे. १९६२मध्ये मी बीए परीक्षेसाठी जे गणित शिकलो त्यापेक्षा १९६३मध्ये एम ए च्या वर्गातील गणित जाणविण्याइतके वेगळे होते. पूर्वीच्या गणितामध्ये problem solving ला महत्त्व होते. नंतरच्या गणितामध्ये concepts वर अधिक भर होता. येथे आमची ओळख Set Theory, Groups, Rings, Fields, Modern Abstract Algebra ह्यांच्या बरोबर झाली, Topology ही गणिताची नवीनच शाखा आम्हाला माहीत झाली. हे विषय शिकवणारे आमचे प्राध्यापक (गोपालकृष्णन आणि वेणुगोपालराव) तरुण आणि TIFR मधून बाहेर पडलेले असे होते. हे शिकल्याला आता ६०हून अधिक वर्षे लोटल्यामुळे हे सर्व आता स्मृतिमात्र उरलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0