Skip to main content

नैसर्गिक शेती - भाग ३

नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.
.....
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

याआधीच्या लेखनात शेती हा शब्द मी मानवनिर्मित अन्नोत्पादन व्यवस्था अशा जास्त व्यापक अर्थाने वापरला आहे, पण या मालिकेचा जो विषय आहे, तो वनस्पतींच्या शेतीबाबतच असल्यामुळे यापुढे आपण शेतीच्या या अंगाचाच विचार करूया.
अगदी प्राथमिक स्वरूपाच्या शेतीत जमीन मोकळी करून तिथे आपल्याला हव्या असलेल्या वनस्पतीचे बी पेरणे, यापालिकडे फारसे काही केले जात नाही. यापुढे पीक हाती लागणे किंवा न लागणे सर्वस्वी निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. आजही पारंपरिक कोरडवाहू शेती याच पध्दतीने केली जाते. यात फारसे उत्पन्न हाती लागत नाही, पण खर्चही फारसा झालेला नसतो. त्यामुळे ज्या वर्षी पाऊसपाणी स्थानिक निसर्गचक्राप्रमाणे सामान्य असेल, त्या वर्षीतरी शेतकऱ्याला स्वतःच्या घरासाठी धान्य निघून आणखी वरखर्चासाठी थोडेफार पैसेही हाती पडण्याची शक्यता असते. अर्थात यातही त्या त्या प्रदेशात तिथल्या निसर्गचक्राशी, मातीच्या प्रकाराशी अनुकूल अशी वाणे निरीक्षणातून आणि निवडीतून विकसित झालेली आहेतच.
मात्र या प्राथमिक स्वरूपाच्या शेतीतली अनिश्चितता हे माणसासाठी आव्हान होते. ही अनिश्चितता कमी करण्यासाठी त्याने विविध उपाय करायला सुरूवात केली. यातला सर्वात पहिला प्रयोग होता, सिंचनाचा. सिंचनव्यवस्था निर्माण करून पावसावरचे अवलंबित्व कमी करता येते. आपल्या पिकाला जेव्हा गरज आहे, तेव्हा आपण पाणी देऊ शकलो, तर त्याची वाढ चांगली होते, आणि उत्पन्न वाढते. माणूस स्थायिक झाल्यानंतर ज्या संस्कृती निर्माण झाल्या त्या साऱ्या नद्यांच्या खोऱ्यात होत्या. शेती हा त्यांचा मुख्य उद्योग होता आणि सिंचनव्यवस्था हा या उद्योगाचा कणा होता, याचे अनेक पुरावे उत्खननातून आणि लोककथांतून उपलब्ध आहेत.
वनस्पतींच्या वाढीमध्ये सूर्यप्रकाश आणि पाणी हे दोन महत्वाचे घटक आहेत, हे अनुमान कोणीही निरीक्षणातून काढू शकते. पण याखेरीज वनस्पतींच्या वाढीसाठी निसर्गातले कोणकोणते घटक कार्यरत असतात, याची जाण हळुहळू वाढत गेली. त्यातूनच विज्ञानाच्या वनस्पतीशास्त्र या शाखेचा उदय झाला.
वनस्पतींची वाढ प्रकाशसंश्लेषणावाटे होते. या क्रियेत सूर्यप्रकाश, हवेतला कार्बन डायॉक्साइड, आणि पाणी ही महत्वाची आदाने आहेत. कार्बन डायॉक्साइड आणि पाणी यांच्या संयोगातून कार्बोदके तयार होतात, आणि ऑक्सिजन हवेत बाहेर टाकला जातो. या क्रियेसाठी लागणारी ऊर्जा सूर्यप्रकाशातून मिळते. पण याहीपलिकडे वनस्पती ज्या जमिनीवर उभी आहे, त्या जमिनीचीही वनस्पतींच्या वाढीत काहीतरी महत्वाची भूमिका आहे, हेही आपल्या आजुबाजूच्या निसर्गाचे निरीक्षण केले तर जाणवते. ही भूमिका नेमकी कोणती, हे आपल्या विषयाच्या अनुषंगाने समजून घेणे फार महत्वाचे आहे.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/02/2016 - 19:42

लेखमाला वाचत आहे.

अवांतर - वनस्पती हा शब्द कितीतरी वर्षांनी वापरताना बघितला. काही शब्द माहीत असतात पण वापरात येतच नाहीत.

चिमणराव Tue, 09/02/2016 - 07:20

एक मोठा लेख टाका.या छोट्या छोट्या भागात काहीच विशेष नाही.किंवा आतापर्यंत "या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. " त्याच कामाचा आढावा एकाच लेखात दिलात तरी चालेल.

प्रियदर्शिनी कर्वे Tue, 09/02/2016 - 12:28

In reply to by चिमणराव

मलाही हे आवडले असते, पण वेळ काढून मोठा लेख लिहावा म्हणून काहीच लिहिले जात नाही, असा स्वानुभव असल्याने हा मार्ग वापरत आहे.

स्वधर्म Tue, 09/02/2016 - 17:13

लेख अावडले. सध्या होत असलेली द्राक्षशेती किंवा ग्रीनहाउस इ. पाहिले की याची खात्री पटते. शेतात द्राक्षे असणे म्हणजे ICU मधला पेशंट सांभाळण्यासारखे अाहे अाणि अापण बाजारातून अाणत असलेली द्राक्षे ही निवळ्ळ रसायनांचे बारीक गोड फुगेच अाहेत.
मागे ऋषी प्रभाकर यांचे भाषण ऐकले होते. त्यातले एक वाक्य लक्षात राहिले होते. Agriculture is the worst interference that man has imposed on the nature.