Skip to main content

ऑलिंपिक कशासाठी?

काल संध्याकाळी ऑलिंपिकमध्ये जिम्नॅस्टिक्सची फायनल बघत असताना घरी घडलेला संवाद -
"तुला माहित्ये, ऑलिंपिक भरवायला सुरुवात केली कारण त्यातून योद्धे निवडत असत."
"हो, मागे कधीतरी तू बोलला होतास."
"आताही ऑलिंपिक भरवून योद्धे निवडतात."
(रिकामा चेहरा)
"आता ऑलिंपिक-जिम्नॅस्टिक जसे एसीत होतात; तसे योद्धेसुद्धा एसीत बसतात. हॅकर्स!"
"ओह ... बरोबर आहे तुझं."

---

कोणत्याही खेळात पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक चांगले खेळतात असा माझाही बरीच वर्षं समज होता. लहानपणी मी व्यायामशाळेत जात असे, तिथे मुलींच्या खोखो आणि बास्केटबॉलच्या टीमचे कोचेस मोठे मुलगे असत. व्यायामशाळा सुटली, टेनिस बघायची सवय लागली; एका मॅचमध्ये सगळ्यात जास्त एस, सर्व्हीसचा स्पीड अशा बाबतीत पुरुष स्त्रियांच्या पुढे होते; अजूनही आहेत. पुढे मैत्रांबरोबर बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. बहुतेकांचा सुरुवातीचा उत्साह मावळल्यावर काही महिने मी आणि एक मित्र बॅडमिंटन खेळायचो; ही गोष्ट दोन देशांत घडली. माझ्या समवयस्क मुलांशी खेळताना मी कधीही जिंकू शकले नाही. त्यांची उंची माझ्यापेक्षा एक फूट जास्त असो वा काही इंच, मी हरणार हे निश्चित होतं. फार बरी खेळायचे त्या दिवशी स्कोर अगदी लज्जास्पद नसायचा एवढंच. खेळात पुरुष स्त्रियांपेक्षा खूप पुढे असतात ह्याचा फार विचार न करता मी मान्यच करून टाकलं होतं.

गेल्या दोनेक वर्षांत पुन्हा टेनिस बघायला सुरुवात झाली. सरीना विल्यम्स टेनिसची अनभिषिक्त साम्राज्ञी आहे हे वर्तमानपत्र वाचूनही समजत होतं. पुरुषांच्या टेनिसमध्ये 'सुपर-फोर' आहेत (फेडरर, मरे, नादाल आणि जोकोविच) पण सरीना विल्यम्सला तुल्यबळ स्पर्धा नाही. पण तिचा गेम मला कधीच फारसा आवडला नाही. मारीया शारापोवाचा ताण हाताळतानाही दिसणारा शांत चेहेरा, सिमोना हालेपचा बुद्धीमान खेळ, युजिनी बुशारची नेटजवळ खेळण्याची पद्धत अशा गोष्टी मला बघायला आवडतात. सरीना विल्यम्सने किती वेगाने सर्व्हीस केली आणि किती एस मारले ह्याचे मर्दानी आकडे मला आकर्षक वाटत नाहीत.

माझ्या एका मित्राच्या घरचे सगळे हौसेने कॅरम खेळतात. मी कधीतरी त्यांच्याकडे असताना मलाही खेळण्याचं आमंत्रण मिळालं. माझा खेळ थोडा वेळ बघून शेवटी काका म्हणाले, "दारासिंग कॅरम चँपियन नव्हता."

पण सरीना विल्यम्स जगातली अव्वल क्रमांकाची खेळाडू आहे. अव्वल क्रमांकावर असणं महत्त्वाचं नाही तर काय आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर गेल्या आठवड्यांपर्यंत मिळालं नव्हतं. आणि ही बातमी आली.

युसरा मार्दिनी सिरीयामधून जर्मनीत पळून आलेली शरणार्थी आहे. ऑलिंपिकमध्ये सगळे आपल्या देशाच्या झेंड्याखाली खेळतात. पण ह्या वर्षी ऑलिंपिकमध्ये १० खेळाडू असे आहेत ज्यांना देश नाही. युसरा मार्दिनी त्यांच्यापैकी एक. ती जलतरणपटू आहे. रिओ ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यासाठी जितक्या वेगात पोहोणं अपेक्षित होतं, त्यापेक्षा तिचा वेग कमी पडला; कमी आहे. १०० मीटर बटरफ्लाय आणि १०० मीटर फ्रीस्ट्रोक ह्यासाठी तिला अनुक्रमे १:०८ मिनीटं आणि १:०२ मिनीटं लागतात. ह्या स्पर्धाप्रकारांमध्ये ऑलिंपिकच्या मुख्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तिला अनुक्रमे ९ आणि ११ सेकंद अधिक लागतात; साधारण १०% कमी वेग.

आपसांतले मतभेद मारामाऱ्या करून सोडवायचे दिवस आता मागे राहिले; ऑलिंपिक सुरू झालं तेव्हा भाले आणि तलवारी घेऊन लोक युद्ध करायचे, आता युद्धांचं स्वरूप संपूर्ण बदलून सायबर-हल्ले, व्यापारी वर्चस्व, किंवा मिसाईल्सना अशा गोष्टींना महत्त्व आलंय; सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात शारीरिक ताकद थोर मानण्याजागी संपूर्ण आरोग्याबद्दल वाढणारी जागरुकता जगात येत आहे. मूल्यं बदललेली असताना कोणाला अधिक एस मारता आले किंवा कोण १०० मीटर अंतर कमीत कमी वेळात पार केलं ह्यात ऑलिंपिकचं महत्त्व मोजता येईल का?

ऑलिंपिक सुरू झाल्यापासून युद्धाची रीत बदलली आणि जगातली मूल्यं बदलली; योद्धे निवडण्यासाठी खेळांच्या स्पर्धा भरवल्या जाण्यापासून आता खिलाडूवृत्ती हा गुण मानला जाण्याच्या जगात आपण आलो आहोत. मग खेळांवर टेस्टोस्टिरॉनचं वर्चस्व का मान्य करावं? दारासिंग कॅरम चँपियन नव्हताच, आणि आर्नोल्डही चांगला अभिनेता नाही. एवढे शब्द खर्च करून मी खेळातल्या लालित्याची आठवण करून द्यायचा प्रयत्न करत होते; ह्याच आठवड्यात जिम्नॅस्टिक्स बघायला सुरुवात करूनही लॉरी अर्नांडेझचं लालित्य पुन्हा पुन्हा बघावंसं वाटलं -

https://youtu.be/BGgi7lzAAkU

जयदीप चिपलकट्टी Sat, 13/08/2016 - 06:19

> कोणत्याही खेळात पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक चांगले खेळतात असा माझाही बरीच वर्षं समज होता. ... टेनिस बघायची सवय लागली; एका मॅचमध्ये सगळ्यात जास्त एस, सर्व्हीसचा स्पीड अशा बाबतीत पुरुष स्त्रियांच्या पुढे होते; अजूनही आहेत.

हे मान्य आहे, पण त्यात एक मेख आहे. पहिले पाच पुरुष (जोकोविच, मरे, फेडरर, वावरिंका, नदाल) आणि पहिल्या पाच स्त्रिया (सेरेना, कर्बर, हालेप, मुगुरुझा आणि राडवानस्का) यांच्या उंचीच्या सरासरीची मी तुलना करून पाहिली. पुरुषांची उंची ७% जास्त आहे. आता समजा स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळी कोर्टस्् तयार केली आणि स्त्रियांच्या कोर्टच्या सगळ्या मिती ७% ने कमी केल्या तर कदाचित स्त्रियांच्या खेळातल्या एसेसची संख्या वाढू शकेल. (कारण बॉलला कमी अंतर जावं लागेल, आणि त्याप्रमाणात त्याचा वेग तितका कमी होणार नाही.) याचबरोबर अनफोर्सड एररसची संख्याही कदाचित कमी होऊ शकेल. प्रत्यक्षात असं कोर्ट आखूड करणं फार अडचणीचं आणि म्हणून अव्यवहार्य आहे, आणि त्यामुळे नक्की काय होईल हेही सांगणं अवघड आहे. पण मूळ मुद्दा असा की स्त्रिया सरासरीने लहान चणीच्या असतात हे कोर्टाचा आकार ठरवताना कुठेच हिशेबात धरलेलं नाही.

नितिन थत्ते Sat, 13/08/2016 - 08:19

In reply to by जयदीप चिपलकट्टी

एसेसची संख्या वाढेल पण एसचा स्पीड तुलनात्मक कमी राहील. अनफोर्स्ड एररची संख्या कमी का होईल ते कळले नाही.
---
मुळात अशी तुलनाच योग्य नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------------
ऑलिंपिक मधील बहुतांश खेळ हे शक्ती/वेग यांच्याविषयी असतात. क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात कमी वेगाने चेंडू टाकणारा खेळाडूही वर्चस्व गाजवू शकतो. पण अशा खेळाला ऑलिंपिकमध्ये स्थान नाही. (अर्थात अशा प्रकारच्या क्रिकेटचे क्रिकेटमधले स्थानही सध्या धोक्यात आहे).

जयदीप चिपलकट्टी Sat, 13/08/2016 - 09:24

In reply to by नितिन थत्ते

(१) टेनिसमध्ये शॉर्ट बॉल (म्हणजे कोर्टाच्या मधोमध) दिला तर समोरचा/ची धोपटू शकतो/ते. त्यामुळे पुष्कळदा खेळाडूंचा प्रयत्न कोर्टाच्या सीमारेषेलगत बॉलचा टप्पा पडावा असा असतो. जर कोर्टाच्या मिती थोड्या लहान केल्या तर कमी ताकदीच्या आणि लहान चणीच्या मंडळीना (म्हणजे स्त्रियांना) हे अधिक चांगलं जमू शकेल असा अंदाज आहे. कारण बॉल जितक्या ताकदीने मारावा लागेल तितका कंट्रोल कमी होतो.

(२) कोर्टाच्या सगळ्या मिती लहान करणं यात नेटची उंची कमी करणं हेही अध्याहृत आहे. यामुळे अनफोर्सड एररस कमी होतील हे पटण्यासारखं आहे.

पण या फार जरतरच्या गोष्टी आहेत हे मान्यच. प्रत्यक्षात काय होईल हे कित्येक वर्षांचा डेटा असल्याखेरीज कळणार नाही.

पिवळा डांबिस Sat, 13/08/2016 - 10:27

In reply to by जयदीप चिपलकट्टी

जर कोर्टाच्या मिती थोड्या लहान केल्या तर कमी ताकदीच्या आणि लहान चणीच्या मंडळीना (म्हणजे स्त्रियांना) हे अधिक चांगलं जमू शकेल असा अंदाज आहे.

पण हे का करायचं?
जर सेरेना ते न करता खेळ दाखवू शकते, मार्टिना दाखवू शकते, स्वीटी क्रिस एव्हर्ट दाखवू शकते, आणि स्टेफी दाखवू शकते, तर मग हे कोर्टाच्या मिती लहान करायचं वगैरे फॅड का?
ते देखील आजकालच्या महिला इक्वालिटीच्या जमान्यात? जोपर्यंत महिला महिलांबरोबरच सामने खेळत आहेत तोपर्यंत अशा गोष्टींची गरज काय?
फ्रॅन्कली सांगायचं झालं तर महिलांचे टेनिस सामने हे आजकाल पुरूषांच्या टेनिस सामन्यांपेक्षा जास्त प्रेक्षणीय असतात, कारण त्यात रॅलीज असतात. पुरूषांचं टेनिस हे आजकाल फक्त ताकदीवर अवलंबून असलेला पॉवर प्ले झालेलं आहे.
गेम आहे हा असा आहे, ज्यांना तो जमेल त्या तो जिंकतील!
क्रिकेटचं जसं वन डे, ट्वेन्टी-ट्वेन्टी वगैरे मातेरं केलं तसं अन्य स्पोर्ट्सचं का करायचं?

अनु राव Sun, 14/08/2016 - 15:14

In reply to by पिवळा डांबिस

महिलांचे टेनिस सामने हे आजकाल पुरूषांच्या टेनिस सामन्यांपेक्षा जास्त प्रेक्षणीय असतात

गेल्या दशकभर हिडींबाकन्यकांच प्रत्येक फायनल मधे असल्यामुळे माझ्या घरातुन महिला टेनिसचे उच्चाटन झाले.

राही Wed, 17/08/2016 - 18:05

In reply to by पिवळा डांबिस

केवळ तडाखेबंद सर्विस सोडून बूम बूम एसेसच्या जोरावर जिंकला गेलेला गेम कधीच प्रेक्षणीय नसतो. पण अर्थात प्रेक्षकांना आवडण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी ऑलम्पिक किंवा कोणताही खेळ खेळला जातो. जुनं क्रिकेट सोडून. स्पीड आणि शक्ती हाच आजचा मंत्र आहे आणि तो महिलांनाही लागू आहे. जोपर्यंत महिला महिलांशी लढत आहेत तोपर्यंत दोघांनाही लेवल प्लेइंग फील्ड आहे. शक्तिवान आणि थोडीफार कौशल्यवान महिला जिंकेल. एके काळच्या भारतीय हॉकीचं उदाहरण घेता येईल. १९५०-६० पर्यंत ड्रिब्लिंग करत करत प्रतिस्पर्ध्याला स्टिकच्या उलट सुलट हालचालींनी चकवत चकवत चेंडू गोलजाळ्यापर्यंत नेणं हा कौशल्याचा म्हणून चांगला खेळ मानला जात असे. पण नंतर जर्मन, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हे तंत्र पार बदलून टाकलं. वेग आणि शक्तीनिशी चेंडू जमिनीपेक्षा हवेत दूरवर समांतर टोलवला जाऊ लागला. नजाकतदार भारतीय हॉकी संपली ती संपलीच.

अनुप ढेरे Wed, 17/08/2016 - 18:18

In reply to by राही

१९५०-६० पर्यंत ड्रिब्लिंग करत करत प्रतिस्पर्ध्याला स्टिकच्या उलट सुलट हालचालींनी चकवत चकवत चेंडू गोलजाळ्यापर्यंत नेणं हा कौशल्याचा म्हणून चांगला खेळ मानला जात असे. पण नंतर जर्मन, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हे तंत्र पार बदलून टाकलं. वेग आणि शक्तीनिशी चेंडू जमिनीपेक्षा हवेत दूरवर समांतर टोलवला जाऊ लागला. नजाकतदार भारतीय हॉकी संपली ती संपलीच.

यात केवळ तंत्र बदललं म्हणून खेळ बदलला असं नाही तर खेळायचा सरफेस बदलला म्हणून तंत्र बदललं. ८०च्या दशकात खरी गवती मैदानं सोडून अ‍ॅस्ट्रो-टर्फवर हॉकी खेळलं जाऊ लागलं. यावर ड्रिबलिंंग स्किल्स खूप नसली तरी चाललं जाऊ लागलं. आपल्या खेळाडुंचा जो स्ट्राँग पॉईंट होता तो मूट झाला. खूप ताकद-स्टॅमिना आणि थोडसं स्किल यावर म्याचेस ठरायला लागल्या. अधिक ही मैदानं महाग होती बहुधा. त्यामुळे आपल्याकडे खूप ठिकाणी ती नव्हती.
ऑलिंपिकमध्ये अ‍ॅस्ट्रोटर्फ आल्यापासून, एकेकाळी हॉकीचे सम्राट असलेल्या आपल्या देशाने ३६वर्षात फक्त एकच मेडल मिळवलं आहे.

अनु राव Wed, 17/08/2016 - 18:31

In reply to by अनुप ढेरे

खूप ताकद-स्टॅमिना आणि थोडसं स्किल यावर म्याचेस ठरायला लागल्या

थोडेसे स्किल ह्या शब्दांवर जोरदार आक्षेप.

माझ्या बघण्यानुसार स्कील रीक्वायर्मेंट अजिबात कमी झाली नाहीये. अ‍ॅस्ट्रोटर्फ आल्यामुळे बॉल च्या हालचालीचा वेग वाढलाय. त्यामुळे ड्रीबलींग अवघड झालय. पण पासेस ची अचुकता, आणि पास कलेक्ट करण्याचे स्कील खुप जरुरीचे आहे. तसेच बॉल चा वेग वाढल्यामुळे जोरात पळायला पण लागते.

मुख्य म्हणजे आता तो गेम टीमवर्क चा जास्त झाला आहे. पूर्वी ध्यानचंद सारखा एक खेळाडु एकटाच गोल करु शकत होता. आता ते शक्य होत नाही. टीपीकल भारतीय मनोवृत्ती प्रमाणे आपण टीम-गेम पण वैयक्तीक अचिव्हमेंट साठी खेळतो त्यामुळे कॉर्डीनेशन, दुसर्‍यांना पास देऊन गोल करण्याची संधी देणे हे आपल्याला जमत नाही. म्हणुन हरतो.

ह्याच कारणांसाठी फक्त भारत हरत नाही तर पाकीस्तान सुद्धा हरतो.

------------
भारत हरायला लागल्यावर त्या खेळातले स्कील कमी झाले आहे असा जावईशोध नेहमीच्या एस्क्युज शोधण्याच्या आणि ब्लेम अदर्स च्या मनोवृत्तीतुन निर्माण झाला आहे.

अनुप ढेरे Wed, 17/08/2016 - 18:42

In reply to by अनु राव

आठ गोल्ड मेडल, चाळीस वर्षाच्या स्पॅनमध्ये आपण काय फक्त वैयक्तिक पर्फॉरमन्सवर जिंकली काय? कैच्याकै. ८०साली अ‍ॅस्ट्रोटर्फ आलं. त्याआधी ९ मेडल आणि त्यानंतर केवळ एक मेडल हा योगायोग नाही. यामागे शारिरीक आणि आर्थिक दोन्ही कारणं आहेत. आपले लोक पूर्ण निर्दोष आहेत असं नाहीच. पण आधीचं यश हे केवळ एखाद्या टालिस्मानमुळे होतं हे म्हणणं कैच्याकै आहे.

राही Fri, 19/08/2016 - 12:43

In reply to by अनु राव

हॉकी आणि फुटबॉलमध्ये (खरं तर सर्वच मैदानी सांघिक खेळांत) मैदानात प्रत्येक खेळाडूची जागा त्याच्या सर्वोत्कृष्ट कौशल्य आणि कामगिरीनुसार साधारणतः ठरलेली असते. फारच थोडे खेळाडू कोणत्याही जागेवरून त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळ खेळू शकतात. डिफेंडर्स मागेच असणार, मिड्फील्डर्स, विंगर्स हे त्या त्या पोज़िशनला असणार आणि फॉर्वर्ड्स पुढे असणार. ह्या मध्ये थोडी लवचिकता असू शकते. पण फार नाही. त्यामुळे गोल बहुधा फॉर्वर्ड्समधल्या स्ट्राय्कर्सकडून होतात म्हणजे त्यांच्या नावावर लागतात. बाकीच्यांनी त्यांना सुंदर पासेस देऊन गोलसंधी निर्माण करायच्या असतात. आणि हे असे खेळनियोजन (गेम-प्लॅन्) फार पूर्वीपासून आहे. ध्यानचंदच्या काळातही अगदी अस्सेच नसेल पण होते. गेली कित्येक वर्षे तर एकास एक मार्किंग असते. त्यामुळे बॉल फार वेळ ताब्यात ठेवताच येत नाही.

अनुप ढेरे Fri, 19/08/2016 - 14:52

In reply to by राही

सत्तरच्या दशकात टोटल फुटबॉल नामक संकल्पनेचा उदय झाला. ज्याचा पाया कोणताही खेळाडु कोणत्याही जागी खेळू शकेल/खेळेल हा होता. आयॅक्स( Ajax) नामक क्लबमध्ये त्याचा पाया घातला गेला. योहान क्रायफ हा खेळाडू त्या पद्धतीचा चेहरा होता. त्याने ही पद्धत खेळाडू म्हणून आणि नंतर कोच म्हनून स्पेनमध्ये बार्सिलोनामध्ये ही रुजवली. अत्यंत नेत्रसुखद असा फुटबॉल असतो हा.

१९७४ची हॉलंडची टीम या पद्धतीचा वापर करत असे. फायनल पर्यंत आरामात पोचलेली टीम प.जर्मनीसमोर हारली!

राही Wed, 17/08/2016 - 18:48

In reply to by अनुप ढेरे

होय. अ‍ॅस्ट्रोटर्फमुळे सगळे तंत्रच बदलून गेले हा मुद्दा महत्त्वाचाच आहे. पण अ‍ॅस्ट्रोटर्फ यायच्याआधीसुद्धा भारताची कामगिरी खालावलेली होती. साठीच्या दशकात असे म्हटले गेले की फाळणीमुळे उत्तम आणि उदयोन्मुख पंजाबी खेळाडूंचा पुरवठा भारत-पाकमध्ये वाटला गेला. पण युरोपीय वेगवान खेळापुढे भारतीय/पाकिस्तान्यांची दमछाक होत असे हाही मुद्दा आहेच.

adam Sat, 13/08/2016 - 21:11

In reply to by नितिन थत्ते

ऑलिंपिक मधील बहुतांश खेळ हे शक्ती/वेग यांच्याविषयी असतात

अहो पण चेस सारख्या बैठ्या खेळातही महिला नि पुरुषांचे म्याचेस वेगळ्या होतात ना म्हणे.

!!
ह्याचा विचारच केला नव्हता कधी. अधिक शोधल्यावर हा पुरुष आणि महिलांचे वेगळे सामने असा प्रकार नसून खुली स्पर्धा आणि केवळ महिलांची स्पर्धा असा प्रकार असल्याचे कळले. हा प्रकार मिपावरच्या अनाहितासारखा दिसतोय. ज्युदित पोल्गरने ह्या केवळ महिलांच्या स्पर्धांत क्वचितच भाग घेतल्याचे विकीवर लिहिले आहे.

=))

याचे जस्टिफिकेशन कशाच्या आधारावर देणार ते एक बोव्हारीणबाईच जाणे. =))

अनुप ढेरे Sat, 13/08/2016 - 09:31

हौशी खेळाडूंची स्पर्धा हे जाऊन उच्च दर्जाचा खेळ हा ऑलिंपिकचा मुख्य मुद्दा बनला आहे. बर्‍याच वर्षांपासून. सो हौशी ते कमर्शिअल/प्रोफेशनल हा प्रवास घडला आहे. हे मूल्यबदलांचं ऑलिंपिकवर उम्टलेलं प्रतिबिंंब आहे.

==
सेरेनाची आत्तापर्यंत एकमेव तुल्यबळ प्रतिस्पर्धी जस्टिन हेनिन (हा आमचा देशी उच्चार) हीच होती. मला सेरेनापेक्षा हिचा खेळ आवडायचा. वर घेतलेली बाकीची नावं, हालेप वगैरे अजून दखलपात्र देखील नाहीत सेरेनाच्या तुलनेत.

तिरशिंगराव Sat, 13/08/2016 - 10:44

ऑलिंपिकमधल्या विविध खेळांत, पात्रता फेरीची काय आवश्यकता असते ते माहित असते. तरी तेवढेही पार करु न शकणार्‍या खेळाडुंना भारतातून का पाठवण्यांत येते ?

दगड Sun, 14/08/2016 - 09:41

In reply to by तिरशिंगराव

तेवढेही पार करु न शकणार्‍या खेळाडुंना भारतातून का पाठवण्यांत येते ?

भारतात पात्रता कशी ठरवतात ते काही माहीत नाही. कदाचित भारतातल्या पात्रता स्पर्धेत आरक्षण असेल, म्हणजे १०० मीटर धावायच्या स्पर्धेत ३० मीटर स्टार्टअप द्यायचा, वजन उचलले त्यात २० किलो अधिक धरायचे, आर्चरीत १० अधिक संधी वगैरे वगैरे. जर अशी पद्धत नसेल, तर तशी सुरु करायची मागणी करायला चांगली सुसंधी आहे.

मिसळपाव Sun, 14/08/2016 - 00:55

आपसांतले मतभेद मारामाऱ्या करून सोडवायचे दिवस आता मागे राहिले; ऑलिंपिक सुरू झालं तेव्हा भाले आणि तलवारी घेऊन लोक युद्ध करायचे, आता युद्धांचं स्वरूप संपूर्ण बदलून सायबर-हल्ले, व्यापारी वर्चस्व, किंवा मिसाईल्सना अशा गोष्टींना महत्त्व आलंय; सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात शारीरिक ताकद थोर मानण्याजागी संपूर्ण आरोग्याबद्दल वाढणारी जागरुकता जगात येत आहे. मूल्यं बदललेली असताना कोणाला अधिक एस मारता आले किंवा कोण १०० मीटर अंतर कमीत कमी वेळात पार केलं ह्यात ऑलिंपिकचं महत्त्व मोजता येईल का?

हे लाख लिहिलंत. पण पुढच्या परिच्छेदातल्या "....मग खेळांवर टेस्टोस्टिरॉनचं वर्चस्व का मान्य करावं? .." या वाक्याने चक्रावून गेलो. तुम्हाला आजच्या जगात ऑलिंपिक संदर्भहीन वाटतंय की पुरूषांचं शारिरीक बलातलं वर्चस्व खुपतंय? !!

आणि तीन तास थंडगार पाण्यात पोहून, त्याआधी सिरिया सारख्या होरपळलेल्या देशात दिवस काढल्यानंतर, २० जणाना वाचवायला मदत करणार्‍या या मुलीला १०० मीटर पोहायला ९ आणि १० सेकंद जास्त लागतात म्हणून सेमीफायनल्स मधे भाग घेता आला नाही हे वाचून हसावं, रडावं, हतबुद्ध व्हावं, निर्विकारपणे पान उलटावं???.....

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 15/08/2016 - 22:29

In reply to by मिसळपाव

तुम्हाला आजच्या जगात ऑलिंपिक संदर्भहीन वाटतंय की पुरूषांचं शारिरीक बलातलं वर्चस्व खुपतंय? !!

ऑलिंपिक संदर्भहीन नाही; संदर्भ बदलले आहेत. संपूर्ण जगाची मूल्यं बदलली आहेत तशीच ऑलिंपिकचीही बदलली आहेत. मग एकेकाळची पुरुषसत्ताक मूल्यं असलेली भाषा ऑलिंपिकसंदर्भात अयोग्य का ह्याचा विचार करता, मला खेळाबद्दल, ऑलिंपिकबद्दल काय वाटतं ह्याचा विचार केला.

गोल्फ आणि टेनिसचा ऑलिंपिकमध्ये अलीकडेच पुन्हा समावेश झाला. युसरा मार्दिनीमुळे कदाचित मॅरेथॉन जलतरणाचीही त्यात भर पडेल.

---

"हम जैसा स्किल तो तुम ला पाओगे पर हम जैसा कमीनापन कहांसे लाओगे?" म्हणून कोचेस मुलगे असतील !!!

तेव्हा मोठे मुलगे शिकवायला असत; कारण तिथे मोठ्या मुली फारशा दिसतच नसत. वयात येणाऱ्या बहुतांश मुली व्यायामशाळा सोडून देत. मुलग्यांच्या तुलनेत, वय वर्षं १५ च्या पुढच्या फारच कमी मुली तिथे खेळताना दिसत. शिक्षकांमध्येही ५-६ पुरुष आणि दोन स्त्रिया असत; दोघींपैकी एक योगासनं शिकवणारी आणि दुसऱ्या बाई क्वचितच येत असत. त्या फक्त शिस्त लावणे, मुली नीट व्यायाम करतात की नाही हे पाहणे एवढ्यापुरताच. साडी नेसून धावणं वगैरे जिकीरीचं झालं असतं.

नितिन थत्ते Sun, 14/08/2016 - 08:41

>>तिथे मुलींच्या खोखो आणि बास्केटबॉलच्या टीमचे कोचेस मोठे मुलगे असत.

"हम जैसा स्किल तो तुम ला पाओगे पर हम जैसा कमीनापन कहांसे लाओगे?" म्हणून कोचेस मुलगे असतील !!! ;)

अनुप ढेरे Wed, 17/08/2016 - 20:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खेळ म्हणजे फक्त ताकद, वेग आणि स्नायूंची चढाओढ असं मानणाऱ्यांसाठी

काहीही हं. हे असं कोण मानतं? खेळायला भयंकर बुद्धी देखील लागते हे प्रत्येकाला मान्य असावं.

राही Fri, 19/08/2016 - 21:04

कटोकटीच्या खेळात सिंधूला दुसरे स्थान. १-२ हरली. पण मस्त खेळली.
अभिनंदन. रौप्यपदकासाठी.

.शुचि. Fri, 19/08/2016 - 21:18

In reply to by राही

छान खेळली. ती स्पेनची काय आक्रमक हावभाव करत होती :( .... उगाचच.
सिंधूचे रौप्यपदकासाठी अभिनंदन.
___
धाग्यावर मांडलेली मते काही का असेना, पण सिंधूने कॉलर ताठ केली :) छानच खेळली. नजरेत स्फुल्लिंग होते, चापल्यात वीज होती.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/08/2016 - 21:24

In reply to by राही

रौप्य पदकाबद्दल सिंधूचं अभिनंदन. पुढच्या स्पर्धांसाठी सिंधूला शुभेच्छा.

---

सामना संपल्यावर कॅरोलिना मरीन कोर्टावर आडवी होऊन आनंद पचवत होती; तेव्हा सिंधू अंपायरशी हात मिळवून मरीनच्या बाजूला गेली आणि तिचं अभिनंदन केलं. खेळातच नव्हे, तिच्या वर्तनातही ग्रेस आहे.

.शुचि. Fri, 19/08/2016 - 21:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सामना संपल्यावर कॅरोलिना मरीन कोर्टावर आडवी होऊन आनंद पचवत होती; तेव्हा सिंधू अंपायरशी हात मिळवून मरीनच्या बाजूला गेली आणि तिचं अभिनंदन केलं. खेळातच नव्हे, तिच्या वर्तनातही ग्रेस आहे.

स्पोर्टसमन्शिप. फारच सुयोग्य व चांगले वर्तन.

राजेश घासकडवी Fri, 19/08/2016 - 21:16

In reply to by राही

सिंधूचं रौप्यपदकाबद्दल अभिनंदन. मी पहिला गेम पाहू शकलो नाही, दुसरा आणि तिसरा पाहिला. दुसरा सिंधूने सोडून दिल्यासारखा वाटला. तिसऱ्या गेममध्ये चुरस होती.

राही Fri, 19/08/2016 - 21:33

In reply to by राजेश घासकडवी

खेचून आणला पहिला गेम. सहा सात पॉइंट्सनी पिछाडीवर होती. वाघासारखी खेळली. पण दमछाक दिसत होती स्पष्ट. तेव्हाच दुसर्‍या गेमबद्दल शंकेची पाल चुकचुकली.

मिलिन्द Fri, 19/08/2016 - 22:23

सिंधू हरल्यामुळे खिन्नता ! पण इथपर्यंत धडक मारल्याचा अभिमानही! येताना वर्ल्ड नं. 2 आणि 5 ला हरवून ती इथे पोचली होती! भारतात लोक हळहळतायत का रौप्य पदक सेलिब्रेट करतायत ?

घाटावरचे भट Mon, 22/08/2016 - 14:14

In reply to by मिलिन्द

सेलिब्रेशन तर आहेच. सिंधूचं विमानतळावरून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं.

http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/pv-sindhus-homeco…

संपादनः

झालंच तर हे ही वाचण्यात आलं.
http://zeenews.india.com/sports/rio-olympics-2016/live-grand-felicitati…