कालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या.

सुशोभना - १
जेहेत्तेकाळाच्या ठायी, बृहदाकार वनखंडाच्या गर्भागारात एक जनपद. नांव मंडुक जनपद. नाना आकारांच्या नाना रूपांच्या जलाशयानी चितारलेल्या वनस्थलीत ते वसले आहे. मंडुक हे त्यांचे दैवत. एक महाकाय मंडुक, मानवसदृश व्यवहार, मंडुकरूप असे या दैवताचे ध्यान आहे. कधीकाळी अशाच महाकाय मंडुकापासून आपली उत्पत्ती झाली असे जनपदवासी मानतात. जळी स्थळी सारख्याच चपळतेने वावरणा-या या मानवांचा मुळपुरूष एक मंडुक असेल यावर कोणाचाही विश्वास बसतो. कारण यांचा जनवेश मंडुकासारखा, आणि गणवेशही मंडुकाचा आहे. अनायास प्राप्त झालेल्या विस्तीर्ण जलशेतीवर ते आपली उपजीविका करतात. मंडुकासारखे विहरतात.
या गणराज्याचा गणपती राजा आहे आयु. वनस्थलीच्या मध्यभागी विशाल जलाशयाच्या एका तटावर त्याचा पाषाणी प्रासाद आहे. दुस-या तटावर त्याच्या कन्येचे उपवन. लताकुंज, तलावाटिका आणि स्फटीकसुंदर सरोवरांनी नटलेले उपवन. राजकन्या सुशोभना आपल्या सख्यांसह तेथे अखंड विहार करीत असते. लावण्यसपंन्न, कला-विद्या-निपुण, आनंदाउल्हासाची मूर्ती, नाचरी, हसरी, खटयाळ, खोडकर, राजकन्येची नाना रूपे. पण प्रत्येक रूप पुरूषालाच काय पण सख्यांनाही मोहवणारे.
वैशाखाची रणरणती दुपार. तांब्याचा पत्रा तापावा तसे आकाश तापलेय. त्यातून लसलसते सूर्यकिरण वनस्थलीवर बरसताहेत. आकाशातील नित्याच्या बगळयांच्या माळा, नयनरम्य रचना करून दिगंतराला जाणारे पक्षी लुप्त आहेत. शिकारीसाठी रिंगणे घेत फिरणारे श्वेत पक्षी, फार काय गिधाडांनीही आपली तोंडे दिवाभीताप्रमाणे कोटरांतून लपविली आहेत.
त्या विशालकाय सरोवराच्या नानाविध हंसानी, बदकांनी, अन्य नानाविध पाणपक्षांनी पंख समेटून कमलपुष्पांच्या जाळीत आसरा घेतला आहे. नेहमी नेत्रसुखद वाटणारा जलाशयाचा निळसर पृष्ठभाग, बिलोरी आरशासारखा सूर्यकिरण पीत, पहाणा-याच्या नजरेवर भक्कम आग बरसत आहे.
या तटावरील शेवाळाने लिंपलेला आयुमहाराजांचा पाषाणी प्रासाद तेवढा नजरेला बोथटपणे भिडत आहे, शांतवीत आहे. पैलतटावरील वनलतांनी वेढिलेल्या वाटिका, कुंज, शीतल सौम्य वायुच्या पंख्याने आपल्या आश्रयाला असलेल्या, फुला पाखरांना, भ्रमर पतंगाना, वसंतपालवीला आश्वस्त करीत आहे.
शांत निद्रिस्त दिसणा-या राजप्रासादात मंडुकराज आयु अशांत आहे. कित्येक दिवस मंडुकराज आयुने आपल्या कन्येच्या विवाहाची स्वप्ने पाहिली. मातृविहीन, लावण्यमयी, कलावती, सुकुमार कन्या, तिचे स्वयंवर रचावे. वरसंशोधनास देशोदेशी दूत पाठवावेत, असे नाना बेत त्याने आखले. राजकन्येने ते नेहमीच उधळून लावलेत, कधी लाडीकपणे, कधी रूसून रागावून, तर कधी फुत्कारूनही.
का? सुशोभना अशी का वागते? उलगडा झाला तेव्हा मंडुकराज हादरून गेला. आपल्या कन्येचे मुलखावेगळे चरित्र जगभर होईल, सारा मंडुकवंश बदनाम, नामशेष होईल. या भीतीने राजा काळवंडला आहे. आयुच्या महालात आताशा दीप प्रज्वलितच होत नाही. मळकट, भयग्रस्त महाल. विझलेला राजा.
इकडे सुशोभनातील कक्षातील मणीदीप वेळोवेळी विशेष प्रखरतेने पेटतात. शत्रूला नामोहरम करून, कोमेजलेल्या पुष्पमालांसह, सुशोभना जेव्हा प्रासादात परतते; तेव्हा तिच्या महालात जणू विजयोत्सव सुरू होतो. दासी सारसी तिचा वेश उतरवून अंगमर्दन सुरू करते. आणि हसत खिदळत सुशोभनाची विजयकथा सुरू होते. मी मी म्हणणा-या पुरूषसिंहाच्या पराभवाच्या कथा.
आकाशातून चंद्रकोर खाली उतरावी, मेघमालेतील विद्युतरेखा कामिनी बनून यावी. अशी ती अयाचीत प्रिया एखाद्या नरसिंहापुढे प्रकट होते. शालीन तरी प्रणयचतुर नायिका, बघता बघता सारा सुखावेग घेऊन त्याच्या अंगावर झेपावते. त्याला फुलवते, सुखवते, अखेर उन्मत करते. आणि तत्क्षणी आली तशीच अंतर्धान पावते. प्रेमभंगाच्या आघाताने गोंधळलेले, हताश झालेले, फजित पावलेले ते नरसिंह. त्यांच्या कथा राजकन्येच्या कानावर येतात. ती सुखावते माधवीरसाचे घुटके घेत मत्तपणे नृत्य करते. नृत्यावेश संपल्यावर थकून राजकन्या मंचावर विश्रांतीसाठी पहुडते, तेव्हा तिच्या कपाळावरील धर्मबिंदू टिपताना, दासी सारसीच्या अंगावर काटा उभा राहिलेला असतो.
दासी सारसीच्या हातात प्रसाधनाचे अतुल कौशल्य आहे. मस्तकात शहाणपण आहे, हृदयात ओतप्रोत स्नेह आहे - राजकन्येसाठी, कष्टी राजा आयुसाठी. मंडुकराज आयुप्रमाणे राजकन्येच्या बदनामीची, मंडुक वंशाच्या क्षयाची भीती मात्र तिचे मन कुरतडत नाही. कारण राजकन्येची सारी रहस्ये तिला माहीत आहेत.
सुशोभनाची बदनामी होत नाही, होणारही नाही. अभिनयकुशला सुशोभना आपल्या आकर्षणाने पागल झालेल्या पुरूषाला आपला जरासुध्दा थांगपत्ता कधी लागू देत नाही. देणार नाही. याची सारसीला खात्री आहे. आपल्याला भेटलेली, अतूलनीय सुखाचा वर्षाव करणारी, प्रणयाच्या नाना रंगात धुंद करणारी कोणी जीतीजिवंत स्त्री होती, की आपल्याला झालेला भ्रम, इथवर संभ्रमात हे प्रेमिक पडतात हे सारसीला गुप्तचराकरवी कळले आहे.
तरीपण सारसी सुशोभनेवर नाराज आहे ’मायविनी, नको खेळू हे खेळ.’ असा इशाराही सुशोभनेला ती वारंवार देते.
मंडुक जनपदाला, मंडुक वनस्थलीला वेढून असणा-या निबीड अरण्यात इक्ष्वाकु परिक्षित आला आहे. प्रजावत्सल राजा वनांतील ऋषीमुनींचे कुशल विचारायला आला आहे. हिंस्त्र पशुंपासून हरणे गायींचा फार मोठा संहार तर होत नाही ना याची खात्री करून घ्यायला आला आहे.
जवळच त्याची छावणी पडली आहे. हिंस्त्र पशुंची शिकार करायला, वनविहाराला तो नित्य हिंडत आहे.
वार्ता ऐकताच खटयाळ सुशोभना हरखून गेलीय. ती आज वनमार्गावर अभिसाराला जाणार. सारसीच्या मनातही आशा पालवलीय. इक्ष्वाकु वंशाचा गौरव परिक्षित, अयोध्यापति, प्रजावत्सल इंद्रासारखा पराक्रमी इ.इ. पुरूष याच्या मोहात सुशोभना नक्की पडेल. प्रेमळ सारसीला आनंद झालाय.
सुशोभनाचे लावण्य अनेकपटीने लखलखून काढणारे प्रसाधन तिने मोठया तन्मयतेने करून दिले. यौवन अंगोपांगी लगडलेल्या त्या तनूला फुल्लकुसुमिता अधीरकामिनीचे वेधक रूपडे चढवले. प्रसन्नतेने निरोप दिला. सुशोभना अभिसाराला निघाली. जलीस्थली सारख्याच चपळ हालचाली करण्याचे मंडुक कौशल्य सुशोभनेकडे अंगभूत होते. परिक्षिताला अरण्यात जाताना हेरून त्याच्याआधीच ती अरण्यात पोचणार होती.
..............................
ऋतु वसंत. प्राचीन, जणू कालातील, भासणारे अरण्य. डेरेदार जुनाट वृक्षांना आणि त्यांना वेढणा-या अक्राळविक्राळ लतांनाही वसंताने नाजूक पुष्पित गंधीत रूप दिलेय. फळभारांनी कृतार्थ बनवलेय. कीर्र रानात, वैशाख उन्हे हिरवट शीतल होऊन झिरपताहेत. नानारंगी प्रकाश फाकलाय. पक्षांचे प्रणयी कुंजन चालले आहे. रंगीत पिसारे मिरवीत प्रणयाराधन चालले आहे. रंग गंध रसांची एक मायावी दुनिया उभी राहिलीय. त्यामुळे सारेच कसे मधुरमधूर वाटतेय. सा-यांचा सुखेनैव आस्वाद घेत, शीळ घालीत अश्वारूढ परिक्षित वनविहार करतोय. घोडा डौलात पण संथ गतीने चाललाय. पाण्याच्या शोधात, जलाशयाच्या दिशेने.
विशाल अरण्याला जल पयोपान करविणारे तेवढेच विशाल सरोवर. नानाप्रकारच्या कमललतांनी आच्छादलेले, नाना पाणपक्षांना आश्रय देणारे सरोवर. भोवताली थंडगार सावलीत तृणे तृणपुष्पे रसरसून डोलताहेत. सुवर्णरंगी चानगवताचे विस्तीर्ण पट्टे झळकताहेत. परिक्षित मोहरला. त्याचा अणू रेणू उत्तेजित झाला. आणि अशावेळी वा-यावरून सुरेल संगीतलहरी येताहेत याचे भान त्याला आले. वीणेचा झंकार, त्याच्या जोडीला मानवी कंठातील सुरेल सूर. चंचल वाराही जणू त्या स्वरमाधुरीने भारावला आहे. कुठून येताहेत सूर?
जरा दूर खडकावर प्रफुल्ल चंद्रकमळे माळलेली एक कन्या. वीणेच्या तारांवरून सुकुमार बोटे फिरताहेत. कंठातून निघतेय स्वर्गीय आलापी. आणि खाली अळिता रचलेल्या पायांनी ताल धरलाय. सरोवराच्या पाण्यावर त्या आघाताने तरंग उठताहेत. सुबक चक्राकार.
इश्वाकू परिक्षित मुग्ध होऊन जागच्या जागी थबकला.
आलापीची उत्कटता वाढत होती. शिगेला पोचली, तेव्हा आतापर्यंत हळूवार ताल धरणारी पावले नाचू लागली. जणू आनंद दुथडी भरून वहातोय. निखळ आनंदाचे कारंजे थुईथुई करतेय. राजाच्या सर्वागात आनंदाचे भरते आले. अद्भुत अनुभव, केवळ स्वर्गीय.
चुंबकाने आकर्षाचे तसा परिक्षित नर्तकीला सन्मुख झाला. गीत थांबले. नर्तन थांबले. राजनंदिनीने नाना गूढ भाव मिश्रित नजरेने राजाकडे पाहिले. आपल्या उदंड यौवनाचा, अलौकिक लावण्याचा आणि स्वर्गीय कलागुणांचा अभिमान तिच्या गात्रागात्रातून झिरपत होता. पण नजरेत होते एक गूढ आमंत्रण, एक स्वागत.
“यावेळी, या स्थळी, निवांत विहरणारी तू, कन्यके कोण आहेस?” राजाने नितांत कौतुकाने विचाराले.
शालीन सौम्य स्वरात सुशोभना म्हणाली, ’हे शस्त्रसज्जित वीरबाहू, तुला देण्यासारखी ओळख, परिचय माझ्याकडे नाही. या वनप्रदेशात तुला भेटलेल्या अनेकांपैकी मी एक. तशीच अनाम, परिचयहीना.’
’तुझे माता पिता, तुझा वंश, तुझा देश?’ परीक्षित
सुशोभनेने दीर्घ निश्वास सोडला. उदास स्वरात ती म्हणाली ’मला यातले काहीच नाही.’
हा कलापूर्ण शृंगार, ही अव्दितीय वीणा. दैवी संगीत आणि निर्भर नृत्य. वन्यजीवाची ही लक्षणे नव्हेत; परिक्षित मनाशी म्हणाला. आणि एकटक राजकन्येला न्यायाळीत राहिला.
’काय पहाताय नरवीर? कोण आहात आपण?’ सुशोभना.
’मी इक्ष्वाकु परिक्षित, पहातोय समोर जगातील कोणते आश्चर्य आहे ते,’ राजा स्मितपूर्वक म्हणाला.
’काय आपण महाराज परिक्षित? महाप्रतापी प्रजावत्सल नृपवरा, माझ्यासारखीच्या परिचयाचा आपणास उपयोग नाही. आपण याक्षणीच पुढे जावे ते बरे’. सुशोभना.
’उपयोग? नसेल, उपयोग नसेल; पण कर्तव्य तर आहे?’ परिक्षित.
सुशोभनेच्या मुखावर तेज चमकू लागले. किंचित कठोर स्वरात ती म्हणाली.
’ओहो, सम्राट परिक्षित आपले राजकर्तव्य पार पाडू इच्छितात तर! पण मी सम्राटांची प्रजानन नव्हे, राजांच्या कृपादृष्टिची मला आवश्यकता नाही नृपती.’
गर्वोव्दत सुशोभनेने परिक्षितीला क्षणभर निरूत्तर केले. हे मृगशवक नव्हे, सिंहाची बछडी आहे, त्याच्या मनात आले; आणि तिच्याबद्दलचे आकर्षण अनिवार झाले. आर्जवून तो म्हणाला, ’लावण्यलतिके, कृपादृष्टीची आवश्यकता मला आहे. ललने, तू माझे स्वप्न आहेस, तुझ्या मनप्रासादात मला जागा दे. मला धन्य कर.’
सुशोभनाचा अविर्भाव क्षणात बदलला. करूण कातर स्वरात ती म्हणाली, मलाही खूप आवडेल नृपती, तुझी संगती. पण मी तुझ्यासाठी खरोखरीचे स्वप्न ठरू शकेन. सुशोभना किंचित थांबली राजाच्या नजरेतील प्रश्न उमजून पुढे म्हणाली, मी अभिशप्त आहे. बहुधा फार काळ जगणार नाही, माझे प्रतिबिंब मी पाहीन, त्याक्षणी माझ्या जीवनाची इतिश्री होणार आहे.’ सुशोभनेचा आर्त विव्हळ स्वर, चेह-यावरील भय आणि उदासी. राजाचे मन द्रवले. तिला आपल्या जवळ घेत तो म्हणाला, ’ कोणी दिला तुला हा शाप राजसे? हा तुझा भ्रम तर नव्हे? ये, माझ्या बाहुपाशात असताना कोणी तुला अपाय करील ते मी पहातो. प्रिये निःशंक रहा.’ मृगाच्या पावसाने कोळपलेली गवते तरारून उठावी, तशी परिक्षिताच्या चुंबनवर्षावाने सुशोभनाची तनु हर्षनिर्भर होऊन उठली. वसंतऋतु भरात होताच. सुशोभना परिक्षिताचे प्रणयाराधनही ऋतुच्या जोडीने भरात येत राहिले.
वैशाखातील कित्येक संध्या परिक्षिताने सुशोभनेबरोबर घालविल्या आहेत. आजही काननगर्भातील संकेतस्थळी निश्चितच तो येईल. सुशोभना व सारसी दोघींनाही याची खात्री आहे.
उपवनातील आपल्या आवडत्या लताकुंजात राजनंदिनी प्रसाधन करून घेत आहे. अभ्यंग नुकतेच आटोपले आहे आता नाना अंगरंगाच्या द्रोणातून रंग पारखून घेत सारसी सखीला सजवीत आहे. पण सखीची, सुशोभनाची नजर लागलेय उपवनाला वळसा घालून बृहदारण्याकडे जाणा-या वाटेकडे
राजकुमारीचा विपुल केशसंभार एका विलोभनीय चक्राकारात रचून, सारसीने तो तिच्या मस्तकावर बांधला. राजकुमारीची हनुवटी हातात घेऊन, किंचित दूर सरून, सारसी सुशोभनेचे रूप न्यहाळू लागली. कौतुकाचे प्रसन्न भाव उमटून बहरून हळुहळु ओसरले. राजकन्येच्या हनुवटीखालून आपला हात काढून घेत, सारसीने दिर्घ निश्वास सोडलो.
’का ग? काही उणे राहिलेय?’ सुशोभनाने कुतुहलाने विचारले.
’रूपराशी तू. तुला गं काय उणे?’ सारसी.
’मग तो निश्वास? तो कां?’ सुशोभना.
’सांगू राजतनये? अनेक दिवस माझ्या मनात एक इच्छा पालवलीय. तुला नाना रूपात मी सजवले, कधी वनदेवता, कधी परी, कधी अप्सरा, कधी देवकन्या तर कधी वनकन्या. मनांत आहे तुला वधूवेशात सजवावे. तुझ्या विपुल केशसंभारावरून पुष्पमंडले मस्तकावर चढावीत, अन् तेथून अवखळपणे कपाळावर झेपावीत. संुदर सुगंधित पुंडलिकांची वरमाला तुझ्या हाती द्यावी. आळत्याने रंगवलेल्या सुबक पावलांनी तालबध्द सरकत तू तूझ्या नटवराला संमुख व्हावेस..........
’पुरे, पुरे’ हसत सुशोभना म्हणाली. ’ते होण्यासारखी नाही’.
’कां? सखे, कां? तुला भेटलेल्या एकाहून एक सरस प्रेमिकांच्या प्रेमाचा सन्मान करावा असे तुला कधी वाटले नाही? तुझ्या पे्रमाच्या अधीन अनेक झाले, तुला कोणाच्याही अधीन व्हावेसे वाटले नाही?
’नेमकं बोललीस सखे तू. मी कोणाच्याही आधीन होत नाही. कधी होइनसे वाटत नाही. प्रणयाराधनेचा हा खेळ मात्र मला खूप आवडतो. मला अंगोपांगी हरखून टाकतो तो’ सुशोभना.
’खेळ? तुझे हृदय गुंतत नाही त्यात?’ सारसीने अधीरपणे विचारले.
’माझे हृदय? आदिमायेच्या गाभा-यात सुरक्षित आहे ते. अभिसाराच्या वेळी ते घेऊन हिंडत नाही मी. या कनकलतेसारख्या तनुनेच मी बलदंड पुरूषांना नाचवते, खेळवते. त्यांच्याजवळ तरी कुठे हृदय असते? त्यांना असते फक्त अंग. तारूण्याने रसरसलेला लिंगदेह. तेच त्यांचे पौरूष. या पौरूषाला सामोरे जाते माझे स्त्रीत्व. माझ्या देहाचे अनेक भाग-विभाग. त्याच्या जोडीला पुरूषांना वेडावून टाकणारा भावभंगिमा. तोही या नाना भागांचा.’
सुशोभना आता क्षुब्ध झाली होती. आपल्या अधरांवरून तिने हलकेच जीभ फिरवली आणि पुन्हा उसळून म्हणाली, ’माझ्या कटाक्षाने घायाळ होते ते पुरूषाचे हृदय? ती तर असते त्याची कामेच्छा. त्यातून जन्मते ती कामपिपासा - प्रेम नव्हे. पुरूष प्रणयी तर खराच पण प्रेमिक मात्र त्याला म्हणू नकोस. पुरूष स्त्रीवर प्रेम करीत नाही, तिचे रक्षण करायला कटीबध्द असत नाही, तिने सुखी व्हावे म्हणून बेचैन होत नाही तो असतो हपापलेला. तिला भोगायला, आणि तेही स्वताःचे काही न त्यागता.’
सुशोभनेने परत एकदा क्षणभर विसावा घेतला. मग शांत स्वरात म्हणाली, ’त्या एका भोगासाठी त्याला त्याचे सर्वस्व त्यागायला लावते मी. सांग सखे, स्त्रीच्या जीवनात यापरता सार्थक आनंद, गौरव आणखी काही असतो?’ याहून अन्य काही हवे असते नारीला?’
’होय, हवे असते, हवे असते पवित्र विवाहबंधन, हवा असतो लहानग्यांचा कमरेभोवती पाश, हवे असते कुटूंबिनी बनून राज्य करणे.’ सारसी ठासून म्हणाली.
’याचा अर्थ पुरूषाची दासी होणे. स्वतः दासी असूनही त्या क्षुद्र जीवनातील दुःखाची कल्पना तु कशी करू शकत नाहीस, सारसी? चल, मला अंधःपाताची वाट दाखवू नकोस.’
बोलता बोल ता सुशोभना पुन्हा क्षुब्ध झाली. सारसी मौनपणे सुशोभनेच्या मस्तकी चवरी ढाळू लागली.
असेच काही क्षण गेले. उपवनाच्या वाटेवर अश्वाच्या टापा वाजू लागल्या. सुशोभना अंगोपांगी चंचल होऊन उठली. सारसीचा खांदा प्रेमाने दाबीत म्हणाली, सखे मला आनंदाने निरोप दे. तुला प्रतिदेव वाटणारा इक्ष्वाकु परिक्षित संकेत स्थळी माझी वाट पाहील.
’राजनंदिनी, म्हणूनच मला हे बोलायला हवेय. आज चैत्र पोर्णिमा. प्रेमिकांची रात्र. हृदय दानांचा मुहूर्त. सखये, आज तूही हृदयदान कर.’ सारसी.
राजकुमारी मिस्किलपणे हसली; “सांगितले ना? ही हृदय नावाची भानगड मला माहीत नाही म्हणून? माझ्याकडे आहेत प्रणयरंग, एकाहून एक रमणीय प्रणयरंग. सा-या प्रेमिकांवर ते मी मुक्त मनाने उधळलेत. यापेक्षा अधिक माझ्याकडे नाही. ते मी कसे कोणाला द्यायचे गं? बोलता बोलता सुशोभनेने एक चंद्रकमळ उचलून आपल्या केशमुकुटात खोचले. मंडुकचापल्याने सुशोभना संकेतस्थळी रवाना झाली.
सारसी कष्टी मनाने जागीच बसून राहिली. ’माझ्या या प्रिय सखीच्या जीवनात हृदयाचा प्रादुर्भाव होवो.’ सारसीने मनोमन इष्टदेवतेची प्रार्थना केली.

क्रमशः

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचतो आहे क्रमश:.
मंडुकोपनिषद हेच का? शेवाळ्यात लडबडलेल्या पामराला बाहेर काढण्याची कृपा करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपनिषदे ललित लेखन मानावीत का? मनोरंजनासाठी वाचावीत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी! पुभाप्र!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सुशोभना - 2

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0