Dead Man's Hand - ५

आधीचे भाग : , , ,

पहाटे साडेचार वाजता मोबाईलच्या रिंगने रोहितला जाग आली. एवढ्या पहाटे कोणाचा फोन असावा या विचारात त्याने मोबाईलवर नजर टाकली असता स्क्रीनवर नाव दिसलं - संजय कदम! ज्या अर्थी एवढ्या पहाटे कदमनी फोन केला त्या अर्थी नक्कीच काहीतरी मोठी भानगड असणार याची त्याला कल्पना आली.

"गुड मॉर्निंग कदम! काय झालं?"

"सर......"

"व्हॉ SS ट?" रोहित ताडकन बेडवरुन खाली उतरला, "आर यू शुअर कदम?"

"येस सर! खुद्दं किरण चव्हाणने १०० नंबरला ही इन्फॉर्मेशन दिली आहे! अंधेरी पोलीस तिथे आल्यावर आपल्या माणसाने चौकशी केली असता ही बातमी कळली सर!"

"कदम, तुम्ही ताबडतोब तिथे जा आणि अंधेरी पोलिसांकडून सगळी सूत्रं तुमच्या हाती घ्या. कोणी विचारलं तर माझं नाव सांगा! आणि मी आल्याशिवाय कोणीही तिथून जाणार नाही याची काळजी घ्या!"

रोहितने फोन कट् करुन टेबलवर टाकला आणि बाथरुमकडे धाव घेतली. मोजून विसाव्या मिनीटाला त्याची कार रात्रीचा अंधार चिरत वार्‍याच्या वेगाने अंधेरी इस्टला असलेल्या जम्बो गार्डन सोसायटीच्या दिशेने धावत होती. कारला स्पीड देताना कदमनी सांगितलेली ती बातमी त्याच्या डोक्यात गरगर फिरत होती. धीरज सक्सेनाच्या मृत्यूला पंधरा दिवस उलटतात तोच त्याच्या मित्रांपैकी आणखीन एकाला मृत्यूने गाठलं होतं....

.....कौशल संपत त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता!

************

मध्यरात्रीचा सुमार ....

दिवसभर गर्दीने ओसंडून वाहत असलेल्या अंधेरी स्टेशनच्या परिसरात बर्‍यापैकी शांतता होती. परिसरातली दुकानं तर कधीच बंद झाली होती, पण अगदी एखाद-दोन अपवाद वगळता विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या, फेरीवाले यांनीही आपला धंदा आवरुन घर गाठलं होतं. रात्री उशिरा घरी परतणारे तुरळक लोक, रात्रभर स्टेशनबाहेर उभे असणारे रिक्षावाले आणि तिथल्या परिसरात आश्रयाला असणारे भिकारी यांचाव्यतिरिक्त तिथे फारसं कोणीही दिसत नव्हतं. बेस्टच्या बसेसही आपल्या शेवटच्या काही फेर्‍या पूर्ण करत होत्या. मधूनच पोलीसांची एखादी गाडी 'राऊंड' मारत होती.

स्टेशनपासून पाच मिनिटांवर असलेल्या लहानशा गल्लीतून एक व्यक्ती झपाझप चालत होती. ती सुमारे पंचविशीची एक तरुणी होती. काळ्या रंगाची जीन्स, टी-शर्ट आणि त्यावर भला मोठा ओव्हरकोट तिने घातला होता. ओव्हरकोटला असलेलं हूड तिने डोक्यावरुन ओढून घेतलेलं होतं. रात्रीची वेळ असूनही तिच्या डोळ्यांवर गॉगल होता. पाठीवर लॅपटॉप बॅग असते तशी सॅक होती. तिचा एकंदर अवतार पाहून कामावरुन परत येण्यास उशीर झाल्यामुळे लवकरात लवकर घर गाठण्याची तिला घाई झाली असावी अशी कोणाचीही समजूत झाली असती. मेन रोडने भराभर पावलं उचलत ती त्या सोसायटीपाशी आली. सोसायटीच्या गेटवर असलेल्या वॉचमनच्या केबिनकडे एक दृष्टीक्षेप टाकून तिने सोसायटीच्या शेजारी असलेल्या बागेकडे मोर्चा वळवला. बागेचं लोखंडी दार नुसतंच लोटलेलं होतं. तिने हलकासा धक्का देताच किंचितसं करकरत ते उघडलं. बागेत एका बाकड्यावर झोपलेल्या म्हातार्‍या भिकार्‍याची झोप बहुधा त्या आवाजाने चाळवली असावी, पण तिला त्याची पर्वा नव्हती. सोसायटीच्या कंपाऊंडच्या भिंतीला समांतर चालत अखेर तिने ती जागा गाठली. डोळ्यावर असलेल्या नाईट व्हिजन गॉगलमुळे कंपाऊंडच्या भिंतीवर बसवलेले काचांचे तुकडे तिच्या तीक्ष्ण नजरेने अचूक टिपले होते. पाठीवरच्या सॅकमधून तिने जाड रबराचे हँडग्लोव्हज काढून दोन्ही हातांवर चढवले आणि अवघ्या दहा - पंधरा सेकंदांत ती चार फूट भिंत चढून तोल सावरत ती त्यावर उभी राहीली. एकदा ती भिंत सर केल्यावर आणखीन दोन फूट चढून पाण्याच्या टाकीवर पोहोचण्यास तिला अजिबात अडचण आली नाही.

एक क्षणभर तिने बागेत झोपलेल्या त्या म्हातार्‍याकडे नजर टाकली आणि दुसर्‍याच क्षणी टाकीच्या दुसर्‍या टोकाला असलेली लोखंडी शिडी गाठली. कोणताही आवाज होणार नाही याची काळजी घेत ती शिडी उतरुन खाली आली आणि एक क्षणही न दवडता समोरच्या बिल्डींगमध्ये शिरली. लिफ्टचं बटण दाबल्यावर लिफ्ट खाली येण्यास काही सेकंद लागले. लिफ्टमध्ये शिरताच तिने टॉप फ्लोरचं बटण दाबलं. बाराव्या फ्लोरवर पोहोचल्यावर ती लिफ्टमधून बाहेर आली आणि शक्य तितक्या वेगाने पॅसेजच्या टोकाला असलेला जिना गाठून तिने बिल्डींगच्या गच्चीवर धाव घेतली. सुदैवाने गच्चीचं दार उघडंच होतं. एका बाजूला असलेली सोलार पॅनल्स तिच्या नजरेने टिपली. आयत्यावेळी वॉचमन किंवा इतर कोणी गच्चीवर टपकलंच तर त्या सोलार पॅनल्सचा आडोसा घेता येणार होता. आपल्या रिस्टवॉचवर तिने नजर टाकली. साडेबारा वाजले होते. काही क्षण विचार केल्यावर अजून तासभर तरी कोणतीही हालचाल करण्यात अर्थ नाही या निष्कर्षाला येत तिने दारापासून दूर, सोलर पॅनल्सच्या जवळ बसकण मारली.

घड्याळाचा काटा एक वाजून पंचवीस मिनिटांवर आला तशी ती उठली आणि सावकाशपणे गच्चीच्या दारापाशी आली. एक क्षणभर कानोसा घेतल्यावर पावलांचा आवाज येणार नाही याची काळजी घेत एकेक पायरी उतरुन ती पुन्हा बाराव्या मजल्यावर आली. लिफ्टचा मोह टाळून एकेक जिना उतरुन पाच मिनिटांत तिने सहावा मजला गाठला. तिच्या अपेक्षेप्रमाणेच पॅसेजमध्ये सामसूम होती. कमालीच्या सावधपणे ती पॅसेजच्या मधोमध असलेल्या फ्लॅटपाशी पोहोचली आणि जीन्सच्या खिशातून चावीचा बंच काढून त्यातली एक किल्ली तिने फ्लॅटच्या दाराला लावली. दोन-तीन वेळा प्रयत्नं करुनही दार उघडेना तेव्हा तिने दुसरी किल्ली लावली, परंतु पुन्हा तोच प्रकार! अखेर चौथ्या किल्लीने दार उघडल्यावर तिने सुटकेचा नि:श्वास टाकला. अलगदपणे आत शिरत तिने दार लावून घेतलं.

समोरच सोफ्यावर कौशल संपत दारुच्या नशेत अस्ताव्यस्तं पसरलेला होता.

******

रोहितची कार जम्बो गार्डन सोसायटीत शिरली तेव्हा सव्वा पाच वाजले होते. कार पार्क करुन तो खाली उतरत असतानाच अंधेरी पोलीस स्टेशनचे सब् इन्स्पे. साळवी त्याला सामोरे आले. साळवींच्या पाठोपाठ रोहित कौशलच्या फ्लॅटकडे निघाला असताना बिल्डींगसमोरच्या बेंचवर किरण चव्हाण सुन्न अवस्थेत बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. साळवींबरोबर येत असलेल्या शिपायाला त्याच्याकडे लक्षं देण्याची खूण करुन तो लिफ्टमध्ये शिरला आणि साळवींसह सहाव्या फ्लोअरवर आला.

कौशलच्या फ्लॅटमध्ये शिरण्यापूर्वी रोहितने मजल्यावरच्या पॅसेजचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं. प्रत्येक मजल्यावर एकूण सहा फ्लॅट्स होते. पॅसेजच्या दोन्ही टोकाला दोन-दोन असे चार फ्लॅट्स होते तर मधोमध दोन फ्लॅट्स समोरासमोर होते. मधल्या फ्लॅट्सच्या दोन्ही बाजूला बिल्डींगच्या दोन लिफ्ट्स होत्या. पॅसेजच्या एका टोकाला असलेल्या दोन फ्लॅट्सच्या दारांशी काटकोनात जिना होता. कौशलचा फ्लॅट मधल्या दोन फ्लॅट्सपैकी ६०६ नंबरचा फ्लॅट होता. पॅसेजचं निरीक्षण आटपून रोहित फ्लॅटमध्ये शिरला. अंधेरी पोलीस स्टेशनचे इन्स्पे. म्हात्रे आणि कदम डेडबॉडीचा पंचनामा करत होते. पोलीस फोटोग्राफर आवश्यक त्या सर्व अँगल्समधून फोटो काढत होता. फिंगर प्रिंट्स एक्सपर्ट्सही आपल्या कामात मग्नं होते. रोहितला पाहताच म्हात्रे, कदम आणि इतरांनी खाडदिशी सॅल्यूट ठोकले.

कौशलचा मृतदेह सोफ्याखाली कार्पेटवर उताण्या अवस्थेत पडला होता. त्याच्या सर्वांगाला दारुचा वास येत होता. सोफ्याशेजारी असलेल्या कॉर्नर टेबलवर रमची जवळपास पूर्ण रिकामी बाटली, सोड्याची अर्धवट भरलेली बाटली, आईस बकेट आणि एका बशीत काजू दिसत होते. हा सगळा सरंजाम आणि त्याच्या मृतदेहाला येत असलेला दारुचा दुर्गंध यावरुन तो भरपूर प्यायलेला असावा असा सहजपणे अंदाज करता येत होता. रोहितने पूर्ण हॉल फिरुन पाहिला. १५ बाय ११ च्या त्या हॉलमधली प्रत्येक वस्तू जागच्या जागी होती. कुठेही काहीही झटापट झाल्याची एकही खूण दिसत नव्हती. एका कोपर्‍यात बार होता. तिथलीही एकही बाटली आडवी झालेली दिसत नव्हती. रोहितने दोन्ही बेडरुम्सही नजरेखालून घातल्या, पण तिथेही सगळं नॉर्मल दिसत होतं.

"गुड मॉर्निंग म्हात्रे! नेमकं काय झालं?" हॉलचं निरीक्षण आटपतं घेत त्याने म्हात्रेंना विचारलं.

"सर आम्हाला पहाटे चारच्या सुमाराला कंट्रोलरुमकडून फोन आला. चव्हाणसाहेबांनी १०० वर फोन करुन याची बातमी दिली होती. आम्ही पंधरा मिनीटांत इथे पोहोचलो, पण त्यापूर्वीच हा आटोपला होता. भरपूर प्यायलेला आहे असं दिसतं आहे सर! मरुन फारसा वेळ झाला नसावा!"

"किरणला कसं कळलं याच्याबद्दल?"

"आम्ही त्यांचं स्टेटमेंट अजून घेतलेलं नाही सर! आम्ही आलो तेव्हा ते काहीही बोलण्याच्या कंडीशनमध्ये नव्हते. त्यांना जबरदस्तं शॉक बसलेला आहे असं वाटतंय सर! म्हणून साळवींबरोबर मी त्यांना खाली पाठवून दिलं तेवढ्यात कदम आलेच!"

"ठीक आहे! तुमचं काम चालू राहू देत. मी जरा किरणशी बोलतो..."

"एक मिनीट सर....."

कदमनी कौशलचा मोबाईल त्याच्यापुढे केला. रोहितने त्याचं कॉल रजिस्टर तपासलं. साडेअकरा वाजता उदयचा कॉल येऊन गेलेला दिसत होता. त्याने डायल केलेला शेवटचा नंबर किरणचा होता. पहाटे सव्वातीनला हा कॉल करण्यात आला होता. त्यानंतर सव्वातीन ते चारच्या दरम्यान किरणचे दहा - बारा मिस कॉल्स होते. कॉल रजिस्टर पाहून झाल्यावर त्याने मेसेजची इनबॉक्स उघडली. पहिलाच मेसेज ज्या नंबरवरुन आला होता तो नंबर त्यालाच काय पण कदम आणि नाईकनाही एव्हाना तोंडपाठ झाला होता!

घाईघाईने त्याने मेसेजवर क्लिक केलं....

Game over. Your time is up – Swapna.

रात्री साडेतीन वाजता हा मेसेज पाठवण्यात आला होता!

रोहित अविश्वासाने काही क्षण कौशलच्या मोबाईलकडे पाहत राहीला. गेले पंधरा दिवस पोलीस ज्या मुलीचा चौफेर शोध घेत होते, ती अचानक एखाद्या धूमकेतूसारखी अवतरली होती आणि पोलिसांसाठी आणखीन एक मृतदेह मागे सोडून अदृष्यं झाली होती!

"सर...." कदमांच्या हाकेने तो एकदम भानावर आला, "साडेतीन वाजता तिचा मोबाईल इथे ट्रेस झाला होता, पण दहा-पंधरा मिनीटांत ती अंधेरी स्टेशनला पोहोचली आणि फोन ऑफ झाला आहे!"

रोहितने समोरच्या भिंतीवर असलेल्या घड्याळावर नजर टाकली. घड्याळाचे काटे पावणेसहा वाजल्याचं दर्शवत होते. पावणेचारला अंधेरी स्टेशनवर असलेली स्वप्ना गेल्या दोन तासांत आरामात मुंबईबाहेर सटकली असणार हे तो समजून चुकला होता. आता तिच्यामागे जाण्यात काहीही अर्थ नव्हता. एक दीर्घ नि:श्वास सोडून तो म्हणाला,

"म्हात्रे, तुमचं काम आटपल्यावर बॉडी पीएमला पाठवाल तेव्हा डॉ. भरुचांनी स्वत: पीएम करावं अशी माझी रिक्वेस्ट आहे अशी त्यांना चिठ्ठी पाठवा! इथे असलेली प्रत्येक वस्तू अगदी कितीही क्षुल्लक वाटली तरीही त्यांच्याकडे पाठवून द्या. बेडरुममध्ये सर्वकाही व्यवस्थित दिसत असलं तरी काही कॅश वगैरे गेली आहे का हे चेक करा. आय हॅव अ फिलींग धीरज सक्सेनाप्रमाणेच या कौशलचाही खून करण्यात आला असावा!"

"एक मिनिट सर ...."

कदमनी हातातला पत्ता त्याच्यापुढे केला. इस्पिकची अठ्ठी!

आता मात्रं तो विचारात पडला. ही काय भानगड आहे? धीरज सक्सेनाच्या घरात किलवरची अठ्ठी आढळली होती आणि इथे इस्पिकची. कदमांच्या हातात असलेल्या त्या पत्त्याचं त्याने बारकाईने निरिक्षण केलं. पत्त्याच्या मागच्या बाजूवर असलेल्या डिझाईनवरुन धीरजच्या घरात सापडलेली किलवर अठ्ठी आणि ही इस्पिक अठ्ठी दोन्ही एकाच कॅटमधल्या आहेत हे त्याच्या लगेच लक्षात आलं. पण या पत्यांचं नेमकं प्रयोजन काय होतं? आणि कॅटमधल्या बाकी पत्त्यांचं काय?

स्वत:शीच विचार करत रोहित लिफ्टने खाली आला. किरण अद्यापही तो त्या बेंचवर बसला होता, पण आता तो तिथे एकटा नव्हता. त्याच्या जोडीला उदय आणि रिझवानही तिथे पोहोचले होते. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहूनच कौशलच्या अकाली मृत्यूचा किरणप्रमाणेच त्यांनाही जबरदस्तं धक्का बसला होता हे कोणीही ओळखलं असतं. दबक्या आवाजात तिघं आपसात बोलत असतानाच रोहित त्यांच्यासमोर येऊन उभा राहीला. त्याला पाहताच त्यांची चर्चा एकदम बंद पडली.

"किरण, कौशलच्या मोबाईलमधल्या कॉल रजिस्टरप्रमाणे शेवट्चा कॉल तुम्हाला आला होता," तो शक्यं तितक्या शांतपणे म्हणाला, "तुम्हा दोघांचं नेमकं काय बोलणं झालं? तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला काय दिसलं?"

"कौशलचा फोन आला तेव्हा मी झोपेत होतो." किरण बोलू लागला, "अर्धवट झोपेतच मी त्याचा फोन उचलला. त्याचा आवाज अडखळत येत होता. त्याला खूप त्रास होत असावा कारण तो बराच विव्हळत होता. 'किरण, मला वाचव' एवढेच शब्दं एकदा धडपणे ऐकायला आले आणि त्याचा फोन एकदम कट् झाला. मी परत दोन - तीनदा त्याला फोन केला पण त्याने उचलला नाही. काहीतरी गडबड आहे असं मला वाटलं म्हणून मी गाडी काढून इथे आलो. ड्राईव्ह करतानाही मी त्याला फोन करत होतो, पण त्याने एकही कॉल उचलला नाही. इथे आलो तर त्याच्या फ्लॅटचं दार अर्धवट उघडंच होतं आणि तो कार्पेटवर पडला होता!"

"तुम्ही इथे पोहोचलात तेव्हा कौशल जिवंत होता?"

"नाही! मी वर येताना गरज भासली तर वॉचमनला मदतीसाठी घेऊन आलो होतो. कौशलची परिस्थिती पाहिल्यावर त्याने शेजारी राहणार्‍या डॉ. सानेंना बोलावून आणलं. त्यांनी त्याला तपासून तो एक्स्पायर झाल्याचं कन्फर्म केल्यावर मी १०० नंबर डायल करुन पोलिसांना इन्फॉर्म केलं!"

"एक मिनीट किरण, तुम्ही इथे पोहोचलात तेव्हा किती वाजले होते?"

"चार वाजत आले असावेत...."

"आणि त्या वेळेस कौशलच्या फ्लॅटचं दार उघडं होतं?"

"येस!"

"इंट्रेस्टींग.... उदय, तुम्ही रात्री साडेअकराला कौशलला फोन केला होतात ना?"

"येस सर! पण काही खास असं बोलणं झालं नाही. जस्ट रुटीन!"

"प्रधानसाहेब, हे सगळं काय चाललं आहे?" किरणने विचारलं, "पंधरा दिवसांपूर्वी धीरज त्याच्या घराच्या बाल्कनीतून खाली पडला. त्याचा खून झाला असं कानावर आलं आहे. अद्याप पोलीस त्याच्या खुन्यांना का पकडू शकलेले नाहीत? त्याच्या दु:खातून आम्ही जेमतेम सावरतो आहोत तो आज कौशलचं हे असं झालं. आमचे दोन मित्रं काहीही होत नसताना असे अचानक कसे गेले? पोलीस डिपार्टमेंट काय करत आहे?"

"माझाही तुम्हाला तिघांना हाच प्रश्नं आहे, हे, सगळं काय चाललं आहे?" किरणवर नजर रोखत रोहित अशा काही आवाजात म्हणाला की तिघांचीही हालत खराब झाली.

"धीरजचा खून झाला आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी कौशलचाही मृत्यू झाला आहे. आता ही नॅचरल डेथ आहे, अ‍ॅक्सिडेंट आहे का खून आहे हे अजून कन्फर्म झालेलं नाही. पण तुमच्याच दोन्ही मित्रांच्या बाबतीत असं का व्हावं? तुम्ही तिघं या दोघांचेही मित्रं होतात पण या दोघांचीही ज्याच्याशी दुष्मनी होती अशी व्यक्ती कोण आहे? लेट मी पुट इट लाईक धिस - या दोघांच्याही वाईटावर असणारं कोण होतं? तुम्ही काही सांगू शकता?"

या प्रश्नावर तिघंही एकदम गप्पं झाले. रोहितची धारदार नजर आळीपाळीने तिघांच्याही चेहर्‍यावरुन फिरत होती. तिघांच्याही डोळ्यांतली चलबिचल त्याने अचूक टिपली होती.

"त्या दोघांचंही वैर असेल असा एकही माणूस माझ्या माहितीत तरी नाही!" किरण सावकाशपणे म्हणाला, "आय डोन्ट थिंक या दोघांनाही काही माहित असेल. ते दोघेही तसे अगदी सरळ होते. त्यांचा कोणाशी कधी फारसा वाद झाल्याचंही मी ऐकलेलं नाही."

"धीरज किंवा कौशल स्वप्ना देशमुख नावाच्या मुलीला ओळखत होते?"

"स्वप्ना देशमुख...."

या नावाची कोणालाच अपेक्षा नव्हती. तिघेही एकदम ब्लँक झाले.

"नाही साहेब!" किरण कसाबसा सावरत उत्तरला, "आमच्या माहितीत तरी स्वप्ना देशमुख नावाची कोणतीही मुलगी नाही. आता ती कौशलची कस्टमर असली किंवा धीरजच्या इन्स्टीट्यूट्शी किंवा प्लेसमेंट एजन्सीशी संबंधीत असली तर आम्हाला माहीत नाही."

"स्ट्रेंज!" रोहित त्याच्यावर नजर रोखत धारदार स्वरात म्हणाला, "धीरजचा खून होण्यापूर्वी सुमारे दोन - अडीच तास तो स्वप्नाबरोबर होता अशी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली आहे. इनफॅक्ट त्याच्या खुनामागे स्वप्नाच प्राईम सस्पेक्ट आहे. इंट्रेस्टींगली, कौशलने तुम्हाला सव्वातीन वाजता फोन केल्यानंतर साडेतीनच्या सुमाराला त्याला स्वप्नाचा मेसेज आला आहे. आता पहाटे साडेतीनला ती कौशलला मेसेज करते याचा अर्थ दोघांची चांगलीच जवळीक होती हे उघड आहे. तुम्ही इथे पोहोचण्यापूर्वी ती इथे येऊन गेली असावी अशीही शक्यता आहे. आय अ‍ॅम सरप्राईज्ड...तुमच्यापैकी कोणीही तिला ओळखत कसं नाही..."

रोहितने आपलं वाक्यं अर्धवट सोडलं. किरण वेड्यासारखा त्याच्याकडे पाहत होता. उदय आणि रिझवानचीही अवस्था तशीच होती. स्वप्नाने धीरजचा खून केला आणि ती कौशलच्या घरीही येऊन गेली होती हे ऐकून तिघांनाही अक्षरश: घाम फुटला होता. त्यांची अवस्था पाहूनच इथे काहीतरी पाणी मुरत आहे हे रोहितने ओळखलं. या तिघांनाही स्वप्नाबद्दल निश्चित काहीतरी माहीत आहे, पण ते लपवण्याचा प्रयत्नं करत आहेत हे तो समजून चुकला.

"ऑलराईट! यू मे गो नाऊ! गरज भासली तर आम्ही पुन्हा तुम्हाला भेटायला येऊच! एक मात्रं लक्षात ठेवा, पोलिसांची परमिशन घेतल्याशिवाय मुंबई सोडून कोणीही जायचं नाही!"

दोन गाड्या सोसायटीच्या कंपाऊंडमधून बाहेर पडल्या तसे नाईक त्याच्याजवळ आले.

"साहेब, त्या तिघांनाही काहीतरी नक्कीच माहीत आहे त्या स्वप्नाबद्दल! तिघंही सरळ-सरळ खोटं बोलत होते. एकेकाला आत घेऊन विचारलं असतं तर सगळं भडाभडा ओकले असते!"

"जाऊ दे नाईक! एकदा स्वप्ना हातात सापडली की तिघांनाही पोपटासारखं बोलावंच लागेल. जरा सोसायटीच्या वॉचमनना आणि शेजारच्या त्या डॉक्टरना इथेच बोलवून घ्या."

डॉ. साने पन्नाशीचे होते. रोहितने त्यांच्याकडे कौशलबद्दल चौकशी केली. त्यांचं स्टेटमेंट किरणच्या स्टेटमेंटशी तंतोतंत जुळणारं होतं. पहाटे चारच्या सुमाराला वॉचमनने त्यांना कौशलच्या फ्लॅटमध्ये बोलावून नेलं होतं. कौशलला तपासून पाहताच त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी किरण आणि वॉचमनला सांगितलं होतं. त्यांच्या समोरच किरणने पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन या घटनेची माहीती दिली होती. कौशलचे आई-वडील भोपाळला राहत होते आणि ते मुंबईला येण्यास निघाले होते. मुंबईत तो एकटाच राहत होता हे त्यांनी स्पष्टं केलं. डॉक्टरांकडून अधिक काही माहिती मिळण्यासारखी नसल्याने रोहितने त्यांना घरी पाठवून दिलं आणि दोन्ही वॉचमनना बोलावण्याची नाईकना सूचना केली. मिनीटभरातच पंचवीशीची दोन पोरं त्याच्यासमोर हजर झाली.

"बद्रीप्रसाद आणि रामाश्रय, तुम्ही दोघंच इथे वॉचमन आहात?"

"जी साब!"

"काल रात्री काय झालं?"

"साब मी पुढच्या गेटवर होतो आणि हा बद्री मागच्या गेटवर." रामाश्रय म्हणाला, "रात्री बारा वाजता ए विंगला राहणारे पटेलसाहेब परत आल्यानंतर सगळं शांतच होतं. आम्ही दोघंही गेटवर होतो आणि अधून-मधून सोसायटीत चक्कर काटत होतो. पहाटे चारच्या सुमाराला मी पुढच्या गेटवर असतानाच संपत साहेबांच्या त्या मित्राची गाडी आली. संपत साहेबांकडे ते नेहमी येत असल्याने मी त्यांना ओळखत होतो, पण ते अशा वेळेस आलेले पाहून मला आश्चर्यच वाटलं. मी गेट उघडून त्यांची गाडी आत सोडली. गाडी पार्क करुन ते माझ्याकडे आले आणि संपत साहेबांचं काहीतरी बिनसलं आहे असं सांगून स्वत:बरोबर मला वर घेऊन आले. संपत साहेबांच्या घराचं दार उघडंच होतं. आम्ही दोघांनी आत जाऊन पाहीलं तर ते खाली पडलेले दिसले. मग मी शेजारी राहणार्‍या डॉक्टरसाहेबांना घेऊन आलो आणि त्यांनी संपतसाहेब मेल्याचं सांगितलं. मग किरण साहेबांनी फोन करुन पोलिसांना बोलावलं."

"काल रात्री कौशल किती वाजता परत आला होता?"

"संपतसाहेब रात्री अकराच्या सुमाराला परत आले होते साहेब!"

"अकरा वाजता.... कौशल परत आल्यानंतर पटेल सोडून कोणी आलं होतं? सोसायटीत राहणारं किंवा सोसायटीचे रहिवासी नसलेलं?"

"नाही साहेब!" रामाश्रय नकारार्थी मान हलवत म्हणाला, "निदान पुढच्या गेटमधून तरी कोणीच आलं नव्हतं!"

"मागचं गेटही रात्रंभर उघडावं लागलं नाही साहेब!" इतका वेळ गप्प बसलेला बद्रीप्रसाद म्हणाला.

रोहित काहीसा विचारात पडला होता. रात्री बाराला पटेल आल्यानंतर पहाटे चार वाजता किरण येईपर्यंत दोन्ही गेट्समधून कोणीही आलेलं नव्हतं. परंतु स्वप्नाचा मोबाईल सोसायटीच्या आवारातच ट्रेस झाला होता आणि त्यानंतर तो अंधेरी स्टेशनच्या दिशेने गेली होती. पण स्वप्ना सोसायटीत आली कुठून आणि बाहेर कशी पडली?"

दोन्ही वॉचमनना जोडीला घेऊन रोहितने सोसायटीला पूर्ण चक्कर मारली. सोसायटीच्या बाजूला सुमारे आठ फूट उंचीची कंपाऊंडची भिंत होती. या भिंतीच्या वरच्या बाजूला काचांचे तुकडे बसवलेले होते. या भिंतीला लागूनच सोसायटीच्या दोन्ही गेट्सच्या मधोमध सुमारे दहा फूट उंचीची पाण्याची टाकी होती. या टाकीवर जाण्यासाठी लोखंडाची शिडी होती. रोहित शिडीवरुन चढून टाकीवर पोहोचला आणि पलीकडे नजर जाताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. टाकीच्या पलीकडे भिंतीला लागूनच एक लहानशी बाग होती. सोसायटीच्या बाजूला आठ फूट उंचीची असणारी कंपाऊंडची भिंत या बागेच्या बाजूने जेमतेम चार - साडेचार फूट उंच होती. थोडी सावधगिरी बाळगल्यास भिंतीवर चढून आणखीन दोन फूट वर चढून टाकीवर पोहोचणं सहज शक्यं होतं. एकदा टाकीवर चढल्यावर वॉचमनच्या नजरेस न पडता बिल्डींगमध्ये घुसणं अशक्यं नव्हतं!

टाकीवरुन पलीकडच्या बागेत उडी टाकून रोहितने बारकाईने तिथली जमिन पाहण्यास सुरवात केली. काही क्षण निरीक्षण केल्यावर त्याचा चेहरा उजळला. टाकीच्या बाजूलाच भिंतीला लागून असलेल्या बागेच्या भागात एके ठिकाणी थोडासा चिखल झाला होता आणि या चिखलात स्पष्टं उमटलेले दोन प्रिंट्स त्याला आढळले होते...

हाय हील्सच्या टोज् !

क्षणार्धात त्याच्या नजरेसमोर धीरजच्या बाल्कनीमध्ये सैंदाणेंना आढळलेला हाय हील्सच्या टो चा ठसा उभा राहीला. ह्या प्रिंट्स त्याच्याशी मॅच होणार याबद्दल त्याला कोणतीच शंका नव्हती. कदमना फोन करुन फिंगर प्रिंट्स एक्सपर्ट्सना तिथे पाठवून देण्याची त्याने सूचना दिली आणि सँडल्सचे आणखीन ठसे आढळतात का याचा शोध घेण्यास सुरवात केली. पण चिखलात उमटलेल्या त्या प्रिंट्सच्या व्यतिरिक्त भिंतीच्या आसपास येणारा किंवा जाणारा एकही ठसा त्याला आढळला नाही.

रोहित पुन्हा सोसायटीत परतला तेव्हा इन्स्पे. म्हात्रेंनी कौशलचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्याने पोलीस हर्सबरोबर नाईकना हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. कौशलचं पोस्टमॉर्टेम डॉ. भरुचांनी करावं अशी त्याने चिठ्ठी दिलेली असली तरीही त्याने नाईकना काही सूचना देऊन डॉक्टरांची गाठ घेण्यास बजावलं होतं. कदम म्हात्रेंबरोबर अंधेरी पोलीस स्टेशनला गेले होते. अंधेरी पोलिसांनी कंट्रोलरुमकडून मिळालेल्या माहितीची नोंद केलेली एफआयआर घेऊन ते क्राईम ब्रँचमध्ये येणार होते. कौशलवर वॉच ठेवण्यासाठी नेमण्यात आलेला कदमचा माणूस हा सर्व तपास सुरु असताना एकदाही समोर आलेला नव्हता. तो नंतर ऑफीसमध्ये येऊन आपला रिपोर्ट देणार होता.

आपल्या कारने ऑफीसकडे निघालेल्या रोहितच्या डोक्यात दोन प्रश्नं गरगर फिरत होते.....

धीरजपाठोपाठ स्वप्नाने कौशलचाही खून का केला? केवळ पैशांसाठी की आणखीन काही कारण होतं?
आणि
प्रिया मल्होत्राच्या खुनाचा या सगळ्याशी नेमका काय संबंध होता?

************

कोणीतरी आपल्याला गदागदा हलवून जागं करत आहे ही कौशलला जाणीव झाली तसे त्याने डोळे उघडले ....

"कौशल, युवर टाईम इज अप!"

जहरी आवाजातले ते शब्दं त्याच्या कानात शिरले तसा तो नखशिखांत हादरला. धडपडत उठण्याचा तो प्रयत्नं करत होता, पण त्याचं सगळं शरीर बधीर झालं होतं जणू!

"कोण.... कोण आहेस तू?" त्याने कसंबसं विचारलं.

एक चेहरा अचानक भर अंधारातून त्याच्यासमोर अवतरला....
जबरदस्तं हादरला तो ....

"ओळखलंस कौशल मी कोण ते? का विसरलास इतक्यात?"

"तू SSS .... " कौशलच्या तोंडून शब्दं फुटत नव्हता. "ओ माय गॉड.... "

"शट अप!" ती गरजली, "आता देव आठवला काय? निष्पाप, निरागस मुलींच्या आयुष्याचा सत्यनाश करताना तुला कधी देव नाही आठवला तो? आज मी इथे आले आहे ते तुझ्या सगळा मागचा-पुढचा हिशोब पूर्ण करण्यासाठीच! युवर गेम इज ओव्हर कौशल! धीरज गेला आणि आता तुझी पाळी आहे! तुझे हात-पाय आधीच लुळे पडले आहेत, आता हळूहळू तुझं सगळं शरीरच निकामी होणार आहे! फक्तं तुझं हृदय तेवढं काही वेळ धडधडत राहील! आणि मग थोड्यावेळाने ते पण आपोआप बंद पडेल! तडफडत मरणार आहेस तू!"

"नाही SSS .... " कौशलच्या चेहर्‍यावर प्रचंड भिती दाटून आली होती, "प्लीज, मला मारू नकोस! माझ्या हातून फार मोठी चूक झाली... मला हे सगळं त्याने करायला भाग पाडलं! प्लीज फरगीव्ह मी!"

ती भयानक आवाजात हसली. तो एक्झॅक्टली धीरजच्याच मार्गाने चाललेला होता!

"त्याने भाग पाडलं तरी तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का रे? तरीही मी तुला एक शेवटची संधी देते ..."

कौशलची आशा पालवली....

"तुला सुरवातीपासून प्रत्येक गोष्टं सांगावी लागेल कौशल! तुम्ही सर्वांनी काय काय केलंत, कसं केलंत सर्व काही .... आणि याद राख, तू एक शब्दं जरी खोटं बोलतो आहेस असा मला नुसता संशय आला तरी तो तुझा शेवटचा शब्दं ठरेल! तू खरं बोललास तर मात्रं मी तुला सोडून देईन आणि इथून निघून जाईन! मी इथून गेल्यावर थोड्या वेळाने तू आपोआप नॉर्मल होशील!"

कौशलचा चेहरा उजळून निघाला. आपण वाचू शकतो!

सुमारे तासाभराने तो बोलायचा थांबला, तेव्हा जे काही झालं त्याचा सर्व दोष इतरांवर ढकलून मोकळा झाला होता. कोणत्याही प्रकारे का होईना आपला जीव वाचवणं महत्वाचं, त्यासाठी इतरांचा बळी द्यावा लागला तरी बेहत्तर असा त्याचा साधा हिशेब होता! बोलणं संपून ओ आशेने तिच्याकडे पाहत असतानाच बर्फासारख्या थंड आवाजात ते शब्दं त्याच्या कानावर आले,

"सॉरी कौशल! मी तुला जिवंत सोडू शकत नाही ...."

कौशल हादरुन तिच्याकडे पाहतच राहीला. तिचा कावा आता कुठे त्याच्या ध्यानात आला होता! जिवंत सोडून देण्याचं आमिष दाखवून तिने त्याच्या तोंडून सर्व काही वदवून घेतलं होतं, आणि आता ती त्याला खलास करणार होती! त्याच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली.

".... बट लाईक आय सेड अर्लीयर, मी तुला अजून एक संधी देते ...."

अचानक एक आकृती अंधारातून पुढे सरकली. शेजारीच पडलेला त्याचा फोन उचलून तिने कौशलसमोर ठेवला. थरथरत्या हाताने त्याने सिक्युरीटी कोड टाकल्यावर तिने एक नंबर डायल केला आणि फोन स्पीकर वर ठेवला. बराच वेळ रिंग वाजत होती, पण कोणी फोन उचलत नव्हतं!

"बहुतेक तुझा मृत्यू आजच लिहीलेला आहे कौशल!" ती छद्मीपणे हसत म्हणाली.

पुन्हा तिने तोच नंबर डायल केला. त्याचे प्राण कंठाशी आले होते. यावेळी मात्रं फोन उचलला गेला.

"कौशल? अरे ही काय वेळ आहे का फोन करण्याची? काय झालं?"

"किरण... मी... मला... " त्याला एकेक शब्दं उच्चारताना कष्टं पडत होते.

"कौशल?? काय झालं? आर यू ऑलराईट?"

"किरण... ती.. ती.... किरण मी..."

"कौशल, काय झालं ते स्पष्टं सांगशील का? कोण ती?" किरणने वैतागून विचारलं.

"किरण ...." अंगातलं सगळं बळ एकवटून कौशल म्हणाला, "किरण, मला वाचव...."

त्या आकृतीने त्याच्या हातातून फोन खेचून घेतला आणि कट् केला.

"दॅट्स इनफ!" तिने फोन समोर असलेल्या टी-पॉयवर ठेवला, "आय होप, किरण इथे पोहोचेपर्यंत तू मेलेला असशील!"

ती खुनशी स्वरात म्हणाली. त्याच्या मोबाईलची रिंग वाजू लागली. तो अगतिकपणे फोनकडे पाहत होता. स्क्रीनवर किरणचं नाव दिसत होतं, पण फोन घेण्यासाठी हाताचं बोटही हलवता येत नव्हतं! तिने शांतपणे आपला फोन काढला आणि एक मेसेज केला. जीन्सच्या खिशात हात घालून तिने एक कार्ड काढलं आणि टी-पॉयवर ठेवलं. आपली सॅक पाठीला लावून तिने एकदा त्याच्याकडे नजर टाकली. तो भयव्याकूळ नजरेने एकदा तिच्याकडे तर एकदा मोबाईलच्या स्क्रीनवर उमटलेल्या किरणच्या नावाकडे पाहत होता. शांतपणे दार उघडून ती बाहेर पडली.

बाहेरच्या पॅसेजमध्ये सामसूम होती. किंचीतही आवाज होणार नाही याची काळजी घेत सहा मजले उतरुन खाली येत तिने सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेली पाण्याची टाकी गाठली. मिनिटभरापेक्षाही कमी वेळेत ती पुन्हा त्या बागेत उतरली. तो म्हातारा अद्यापही त्या बाकड्यावरच झोपलेला होता. त्याने आपल्याला पाहीलं असावं अशी पुन्हा तिला शंका आली, पण त्याकडे लक्षं देण्यास तिला वेळ नव्हता. बागेचं दार उघडून ती बाहेर पडली आणि रमतगमत अंधेरी स्टेशनच्या रोखाने निघाली.

******

रोहित गंभीरपणे डॉ. भरुचांच्या ऑफीसमध्ये बसलेला होता. आदल्या दिवशी दुपारीच त्याच्या खास विनंतीवरुन त्यांनी कौशलच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम आटपलं होतं, पण त्यात काही अनपेक्षित गोष्टी समोर आल्यामुळे त्यांनी काही टेस्ट्स पुन्हा करण्याचा निर्णय घेतला होता. भल्या सकाळपासून ते त्याच कामात गुंतले होते. टेस्ट्स आटपल्यावर आणि सुरवातीचे काही रिझल्ट्स पाहिल्यावर त्यांनी रोहितला फोन करुन आपल्या ऑफीसमध्ये बोलावून घेतलं होतं. परंतु तो ऑफीसमध्ये येऊन अर्धा तास होत आला तरी अद्याप डॉ. भरुचांचा पत्ता नव्हता. त्यांच्या असिस्टंटने ते अद्याप त्यांच्या 'व्हिला' मध्येच असल्याचा त्याला निरोप दिला होता. हा डॉक्टरांचाच खास शब्दं होता. आपल्या लॅबला ते व्हिला म्हणत असत!

सुमारे तासाभराने अखेर डॉ. भरुचा आपल्या 'व्हिला' मधून बाहेर पडून ऑफीसमध्ये आले तेव्हा ते चांगलेच थकलेले दिसत होते. ऑफीसमध्ये आल्यावर त्यांनी आपल्या डेस्कच्या खणातून 'चिवास रिगल'ची बाटली काढली आणि स्वत:साठी एक पेग बनवला. एका सेकंदात बॉटम्स् अप करुन त्यांनी तो पेग संपवला आणि मिनीटभर ते डोळे मिटून बसून राहिले. रोहितने हे सगळं पाहून एक चकार शब्दही काढला नाही. डॉ. भरुचा स्वत:च सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती देतील हे त्याला अनुभवाने माहीत होतं.

"या माणसाला कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने मृत्यू आलेला आहे!" डॉ. भरुचांनी डोळे उघडून बोलण्यास सुरवात केली, "मात्रं हा कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट त्याला अचानक आलेला नाही. इन फॅक्ट हिज हार्ट वॉज हेल्दी अ‍ॅज अ हॉर्स! त्याच्या ऑटोप्सीमध्ये मला त्याच्या रक्तात एका केमिकल सोल्यूशनचे ट्रेसेस मिळाले आहेत. त्या केमिकलमुळेच त्याला कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट आलेला आहे. इन शॉर्ट, धिस इज अ‍ॅन इंड्यूस्ड कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट. इट्स अ मर्डर, बट डन इन अ व्हेरी सोफीस्टीकेटेड वे!"

"कोणतं केमिकल वापरलं आहे?"

"सोडीयम थिओपेन्टल! हे एकप्रकारचं अ‍ॅनेस्थेटीक आहे. साधारणपणे ऑपरेशनपूर्वी जनरल अ‍ॅनेस्थेशिया देण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्रं जास्तं प्रमाणात डोस दिला तर कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने मृत्यू येऊ शकतो. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आणि सर्जनकडे हे उपलब्धं असतं. जनरली हे इंजेक्शनने व्हेन्समध्ये म्हणजे हाताच्या नसांमध्ये दिलं जातं, मात्रं या केसमध्ये तसं झालेलं नाही. या माणसाला दारूमध्ये बर्‍याच मोठ्या प्रमाणात मिसळून ते पाजण्यात आलं आहे! त्या दृष्टीने ही केस अगदीच युनिक आहे!"

रोहित डॉ. भरुचांकडे पाहतच राहीला. असं काही ऐकायला मिळेल हे त्याला अजिबात अपेक्षित नव्हतं.

"हे केमिकल पोटात गेल्यावर किती वेळाने त्याला मृत्यू आला असावा डॉक्टरसाहेब?" काही वेळाने सावरुन त्याने विचारलं.

"अनफॉर्चुनेटली, आय कॅन नॉट से दॅट! त्याची नर्व्हस सिस्टीम डॅमेज झाली आहे. त्यामुळे त्याला पॅरॅलिसीसचा मॅसिव्ह अ‍ॅटॅक आला आहे. स्वत:चं बोटही हलवणं त्याला शक्यं झालं नसणार. अल्टीमेटली कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने तो मरण पावला आहे. आता हे सगळं काही मिनीटांतही होऊ शकतं किंवा काही तासही लागू शकतात. सोडीयम थिओपेन्टल किती प्रमाणात दिलं होतं तसंच त्याची डेन्सिटी किती होती यावर डेथ किती वेळात झाली हे अवलंबून आहे."

"ऑलराईट! पण डेथ किती वाजता झाली असेल हे तर सांगू शकाल?"

"पहाटे तीन ते चारच्या दरम्यान! त्याच्या पोटात आम्हाला अर्ध्याच्या वर डायजेस्ट झालेलं फूड मिळालं आहे. आय हॅव अ फिलींग, डिनर घेतल्यावर त्याच्या ड्रिंक्समध्ये ड्रग मिसळण्यात आलं आहे!"

रोहित विचार करत होता. डॉ. भरुचांनी सांगितलेली वेळ बरोबर असेल तर स्वप्ना धीरजप्रमाणेच कौशलच्या फ्लॅटमध्ये घुसून त्याची वाट पाहत असण्याची शक्यता होती. कौशल रात्री अकरा वाजता घरी आला होता. त्यानंतर त्याने ड्रिंक घेतलं असणार आणि त्याच वेळेस स्वप्नाने ते ड्रग त्याच्या ड्रिंक्समध्ये मिसळलं असावं. पण मुळात स्वप्ना त्याच्या फ्लॅटमध्ये शिरली कशी? त्याला एकदम धीरजचे शेजारी मालवणकरांचं स्टेटमेंट आठवलं. स्वप्नाकडे धीरजच्या फ्लॅटची किल्ली होती तशी कौशलच्या फ्लॅटचीही किल्ली तर नसेल? तसं असल्यास ती आरामात त्याचा फ्लॅट उघडून आत येऊ शकते!

"एक लक्षात घे रोहित," डॉ. भरुचा म्हणाले, "ज्या कोणी माणसाने याचा खून केला आहे त्याने तो वेदनादायक मृत्यू असावा या हेतूनेच सोडीयम थिओपेन्टल व्हिस्कीत मिसळून दिलं आहे. त्याला केमिस्ट्रीची चांगली माहिती आहे. किती प्रमाणात हे ड्रग दिल्यास किती वेळात मृत्यू येऊ शकतो हे त्याला व्यवस्थित माहीत आहे. कदचित तो रेग्युलरली हे ड्रग वापरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही! त्या दृष्टीने एखादा डॉक्टर किंवा नर्सही यात असू शकेल!"

"डॉक्टर किंवा नर्स...." रोहित विचारात पडला. अचानक काहीतरी आठवल्यासारखं त्याने विचारलं, "हाऊ अबाऊट अ फार्मसिस्ट डॉ. भरुचा? एक फार्मसिस्ट हे ड्रग देऊ शकतो? आय मिन फार्मसिस्टला ड्रगच्या इफेक्स्ट्सची कल्पना असणारच ना?"

"ऑफकोर्स!" डॉ. भरुचा उत्तरले, "इनफॅक्ट फार्मसिस्टचीच शक्यता जास्तं आहे, कारण डॉक्टर किंवा नर्स इंजेक्ट करतील!"

डॉ. भरुचांचा निरोप घेऊन रोहित बाहेर पडला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एका माणसाचं नाव आलं होतं....

महेश त्रिवेदी!

सुनेहा त्रिवेदीचा मोठा भाऊ महेश एक फार्मसिस्ट होता. त्याचं स्वत:चं मेडीकल शॉप होतं. कौशलला मारण्यासाठी वापरण्यात आलेलं सोडीयम थिओपेन्टल हे त्याला अगदी सहज उपलब्धंही होऊ शकत होतं. या सगळ्या प्रकरणाचा नीट विचार केला तर महेशचा केसशी तसा जवळचा संबंध होता. सुनेहाचा खून झाला होता. सुनेहा आणि प्रिया या जिवलग मैत्रिणी होत्या तर स्वप्ना प्रियाची ऑफीसमधली सिनीयर होती. प्रियाचाही खून झाला होता आणि दोन्ही खुनांचा बारकाईने अभ्यास केला तर दोघींच्याही खुनात किरण आणि त्याच्या मित्रांचा कुठे ना कुठेतरी निश्चित संबंध असण्याची बरीच शक्यता दिसून येत होती.

एकच प्रश्नं होता तो म्हणजे महेश आणि स्वप्नाचा परस्परांशी काही संबंध होता का?

रोहित क्राईम ब्रँचमध्ये परतला तेव्हा कदम त्याची वाटच पाहत होते. आदल्या रात्री त्यांनी अंधेरी स्टेशनच्या परिसरात चहा आणि इतर खाद्यपदार्थ विकणारे फेरीवाले. रिक्षावाले, रात्री स्टेशनच्या परिसरात आश्रयास येणारे भिकारी इतकंच नव्हे तर रेल्वे कर्मचारी आणि हमाल या सगळ्यांना गाठून त्यांच्याकडे स्वप्नाबद्दल चौकशी केली होती. परंतु आश्चर्याची गोष्टं म्हणजे अशी मुलगी आदल्या रात्री त्यांच्यापैकी कोणाच्याही दृष्टीस पडली नव्हती! परंतु सोसायटी शेजारच्या बागेत असा एक माणूस सापडला होता ज्याने कोणाला तरी बागेत शिरताना आणि बाहेर पडताना पाहीलं होतं.

रोहितने त्या माणसाला आपादमस्तक न्याहाळलं. तो सुमारे साठीचा एक कळकट म्हातारा होता. दिवसभर तो अंधेरी स्टेशनच्या परिसरात वेगवेगळ्या सिग्नलपाशी थांबलेल्या गाड्या पुसण्याचं काम करत असे. कोणी पाच तर कोणी दहा रुपये देत असे. दिवसभरातून मिळालेल्या पैशातून काहीबाही खाऊन रात्री झोपण्यासाठी रोज तो या बागेत येत असे. पोलिसांनी उचलून आणल्यामुळे तो चांगलाच अस्वस्थं झालेला दिसत होता. हेड कॉन्स्टेबल नाईकनी त्याला केबिनमध्ये आणल्यावर तर तो अधिकच घाबरला आणि दीनवाण्या चेहर्‍याने हात जोडून उभा राहीला.

"बोला मामा, काय झालं परवाच्या रात्री?" रोहितने अगदी सहज स्वरात विचारलं.

"सायेब, माझी कायबी चुकी नाय हो," म्हातारा अगदी काकुळतीला येत हात जोडत म्हणाला, "मी नेहमीसारखा बागेत झोपलो होतो. स्टेशनवर झोपलो तर तिथले लोक लई तरास द्येतात म्हून मी बागेत झोपतो रोज. परवा रात्रीपन असाच बाकड्यावर निजलो होतो, पण बराच येळ झाला तरी झोप येईना. तेवढ्यात मी पायलं तर येकजण बागेत शिरला अन भिंतीवर चढून त्या टाक्यावर गेला. त्यो चोर असावा असं मला वाटलं सायेब. लय भीती वाटली म्हून मी तसाच गप पडून र्‍हायलो. बर्‍याच येळाने त्यो पुन्हा टाक्यावरुन उडी मारुन बागेत उतरला आणि निघून गेला. त्या टायमाला मी नीट पायलं तर.... ती बाई होती सायेब!"

"बाई? नीट पाहिलंत ना मामा? नक्की बाईच होती?"

"खंडोबाची आण बाईच होती सायेब! मला तिचा चेहरा दिसला नाही, पण तिचे लांब केस मी पाहिले. ती बागेतून बाहेर गेली अन स्टेशनचा दिशेने निघून गेली. मला कायतरी गडबड असल्याची शंका आली म्हून मी बागेतून निघून गेलो आणि हनुमानाच्या देवळाच्या ओट्यावर जाऊन झोपलो."

"साधारण किती वेळाने ती परत आली सांगू शकाल?"

"माझ्याकडे घड्याळ नाही सायेब, पण तीन-चार तास सहजपणे गेले असतील."

म्हातार्‍याकडून आणखीन काहीही कळणार नाही याची रोहितला कल्पना आली. त्याने काहीही न बोलता नाईकांकडे पाहिलं तसे नाईक त्याला बाहेर घेऊन गेले.

"या म्हातार्‍याने पाहिलेली बाई स्वप्नाच असणार सर!" कदम म्हणाले, "पण ती तीन-चार तास कौशलच्या घरात काय करत होती?"

"सोडीयम थिओपेन्टलचा परिणाम होण्याची वाट पाहत होती!"

कदम आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहीले. रोहितने डॉ. भरुचांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट थोडक्यात कदमना सांगितला.

"धीरज आणि कौशलच्या मृत्यूमध्ये अगदी जाणवण्याइतकं साम्यं आहे कदम! कौशलला सोडीयम थिओपेन्टल व्हिस्कीमध्ये मिसळून देण्यात आलं, ज्यामुळे पॅरॅलिटीक होऊन अखेर कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने मृत्यू आला. धीरजही पॅरॅलिटीक झाला, पण बहुतेक त्याच्या पोटात कमी प्रमाणात ते ड्रग गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोणताही चान्स न घेता त्याला वरुन खाली फेकण्यात आलं. धीरजच्या मृत्यूपूर्वी किमान चार तास स्वप्ना त्याच्या घरात होती. कौशलच्या बाबतीत तिला त्याच्या घरात शिरताना किंवा बाहेर पडताना कोणी पाहिलं नसलं तरी मोबाईल लोकेशन आणि इतर सर्व परिस्थिती ती त्याच्याही घरात अडीच - तीन तास आधी घुसली असावी असं मानण्यास जागा आहे. दोघांनाही स्वप्नानेच मारलं आहे हे नि:संशय! तसंच दोघांनाही चटकन मरण न देता हळूहळू वेदनात्मक मृत्यू येईल अशा प्रकारे मारलेलं आहे. मला आता वेगळाच संशय येतो आहे कदम .... स्वप्नाने हे दोन्ही खून पैशासाठी न करता बदला घेण्यासाठी म्हणून तर केले नसतील? शक्यं आहे की प्रिया आणि सुनेहाप्रमाणे तिलाही रेप करण्यात आलं असेल आणि ती त्याचा सूड उगवते आहे...."

"पण सर, तसं झालं असलं तर स्वप्नाने पोलिसांत तक्रार का केली नाही?" कदमनी शंका प्रगट केली.

"कोणत्या तोंडाने तक्रार करणार? प्रियाच्या खुनात ती स्वत:च अशी काही अडकली आहे की तिच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? दुसरं म्हणजे ज्यांनी प्रियाचं तोंड कायमचं बंद केलं ते स्वप्नाचं करु शकणार नाहीत? काल किरण, उदय आणि रिझवान स्वप्नाचं नाव काढल्यावर कसे घाबरले होते हे तुम्ही पाहयला हवं होतं कदम. अक्षरश: भूत पाहिल्यासारखा चेहरा झाला होता!"

"त्या पत्त्यांचा काय संबंध असेल सर? धीरजच्या घरात किलवरची अठ्ठी सापडली आणि आता कौशलच्या घरात इस्पिकची! हे दोन्ही पत्ते एकाच कॅटमधले आहेत हे उघड आहे, पण दोघांच्याही घरात पूर्ण पणे शोधाशोध करुनही आम्हाला आणखीन एकही पत्ता सापडलेला नाही."

"त्याबाबतीत मी सुद्धा तुमच्याइतकाच कन्फ्यूज्ड आहे कदम!" रोहित विचार करत म्हणाला, "ते दोन पत्ते स्वप्नाने मुद्दामच तिथे टाकले आहेत यात कोणतीच शंका नाही, पण तसं करण्यामागे तिचं नेमकं काय इन्टेन्शन असावं हे विचार करुनही माझ्या लक्षात येत नाही!"

"पण मग, आपण आता काय करायचं सर?"

"अर्थात स्वप्नाला शोधून काढायचं...." रोहित थंडपणे म्हणाला, "धीरजचा खून केल्यावर स्वप्ना पवईहून बोरीवली स्टेशनपर्यंत गेली आहे तर कौशलचा खून केल्यावर अंधेरीला. याचा अर्थ ती वेस्टर्न लाईनलाच कुठेतरी दडून बसलेली आहे हे नक्की! माझ्या अंदाजाप्रमाणे ती मुंबईत राहत नसावी. ती पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरते आहे याचा अर्थ ती एकटीच ट्रॅव्हल करत असावी आणि ट्रेन किंवा बसच्या गर्दीत ओळख लपवून वावरणं तिच्या दृष्टीने अगदी सेफ आहे. एक काम करा कदम, आपण रेल्वे पोलिसांना आधीही अ‍ॅलर्ट केलेलं असलं तरी चर्चगेटपासून ते डहाणूपर्यंतच्या सर्व रेल्वे पोलीस स्टेशनना पुन्हा एकदा अर्जंट नोटीस पाठवा. दुसरं म्हणजे त्या महेश त्रिवेदीला गाठून त्याच्याकडे नीट चौकशी करा. त्याच्या मेडीकल शॉपमधले औषधांच्या स्टॉक्समध्ये काही गडबड आढळते का तपासून पहा. आपला एक माणूस त्याच्या मागावर राहू देत. ऑलरेडी स्वप्नाने दोन खून केले आहेत. तिसरा खून होण्याच्या आधी आपण तिला गाठायलाच हवं!"

"तिसरा खून सर?" कदमनी आश्चर्याने विचारलं.

"ऑफकोर्स कदम! स्वप्ना धीरज आणि कौशलला मारुन गप्प बसेल असं मला वाटत नाही. ती उरलेल्या तिघांपैकी कोणाला तरी गाठण्याचा प्रयत्नं करणार हे उघड आहे. तसं झालंच तर आपल्याला कदाचित बदाम किंवा चौकटची अठ्ठी सापडेल! त्यांच्यावर लक्षं ठेऊन असलेल्या आपल्या माणसांना पुन्हा सूचना द्या! एक क्षणभरही कोणालाही नजरेआड करु नका. स्वप्नाने तिघांपैकी कोणावरही हल्ला केला तरी ती आपल्या हातून निसटता कामा नये!"

******

कौशलच्या मृत्यूला आठवडा उलटून गेला होत....

रोहितच्या सूचनेनुसार सब् इन्स्पे. कदमनी महेश त्रिवेदीची तपशीलवारपणे चौकशी केली. सुनेहाची मैत्रिण म्हणून महेश प्रियाला ओळखत होता, पण प्रियाच्या खुनात नाव येईपर्यंत स्वप्नाबद्दल तो पूर्णपणे अनभिज्ञ होता. कदमनी त्याच्या दुकानातल्या औषधांचे सर्व साठे काळजीपूर्वक तपासले, परंतु त्यात कणभरही अनियमितता नव्हती. त्याच्या दुकानाचं आणि मोबाईलचं फोन रेकॉर्डही तपासण्यात आलं, परंतु त्यातूनही काहिही निष्पन्नं झालं नाही. गेल्या महिन्याभरात आणि त्यापूर्वीही कधीही कोणत्याही प्रकारे त्याचा स्वप्नाशी संपर्क झाल्याचं आढळून आलं नाही. सीआयडीनी किरण, उदय आणि रिझवान यांच्यावरही बारीक नजर ठेवली होती. त्यांचं रोजचं रुटीन व्यवस्थित सुरु असलं तरी धीरजपाठोपाठ कौशलचाही मृत्यू झाल्यामुळे तिघंही पार हादरलेले होते. मिडीयामध्येही अपेक्षेप्रमाणे पोलिसांविरुद्ध ओरडा-आरडा सुरु झाला होता. काही टी.व्ही. चॅनल्सवर मृत धीरज आणि कौशलचे जवळचे मित्रं असलेल्या किरण, उदय आणि रिझवान यांच्या मुलाखती दाखवल्या होत्या. कमिशनर मेहेंदळेंनीही रोहितला लवकरात लवकर केस निकालात काढण्याची ऑर्डर सोडली होती.

स्वप्नाच्या बाबतीत पोलिसांचा तपास पुन्हा एकदा खुंटला होता. कौशलचा खून करुन पळून जाताना बागेत झोपलेल्या त्या म्हातार्‍याने तिला पाहिलं होतं आणि तिच्या मोबाईलचं अखेरचं लोकेशन अंधेरी स्टेशन हे होतं याव्यतिरिक्त तिच्याबद्दल सीआयडीना काहिही माहिती मिळालेली नव्हती. तिच्या सर्व नातेवाईकांची पुन्हा चौकशी करण्यात आली होती, परंतु त्यातूनही काहीही निष्पन्न झालं नव्हतं. गेल्या नऊ - दहा महिन्यांत तिने कोणाशीही संपर्क साधला नव्हता. ज्या चॅनलमध्ये ती काम करत होती त्या चॅनलमधल्या तिच्या सहकार्‍यांकडूनही काही हाती लागलं नव्हतं. तिचा नंबर ट्रेस केला जात होता, परंतु अंधेरी स्टेशनवरुन गायब झाल्यावर तिचा मोबाईल स्विच ऑफच होता. बरीच डोकेफोड करुनही तिने मागे ठेवलेल्या त्या दोन पत्त्यांचं नेमकं काय प्रयोजन होतं हे कोणाच्याही ध्यानात येत नव्हतं. संपूर्ण मुंबईभर सीआयडीनी आपल्या खबर्‍यांचं जाळं पसरलं होतं पण त्यांच्याकडूनही कोणतीही बातमी येत नव्हती....

स्वप्ना पुन्हा एकदा हातावर तुरी देऊन निसटली होती!

******

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आता बाकीच्यांचे खून होईपर्यंत काही ट्विस्ट येतोय का, ह्याची वाट पाहतोय...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पत्त्यांच्या कॅटमध्ये चारच अठ्ठ्या असतात. पैकी दोन वापरून झालेल्या आहेत (किलवर आणि इस्पिक), नि दोन कॅटमध्ये शिल्लक आहेत (चौकट आणि बदाम). खून मात्र आणखी तीन करायचे शिल्लक आहेत. (उदय, रिझवान, आणि किरण.) मग उरलेल्या दोन अठ्ठ्या वापरून झाल्यावर शेवटच्या खुनाच्या वेळी फिर स्वप्ना क्या करेगी?

म्हणजे एक तर (शोलेतल्या अमिताभच्या नाण्यासारखा) पाच अठ्ठ्या असलेला हा स्पेशल ऑर्डर कॅट असावा, किंवा पाचव्या खुनाच्या वेळी रमीतल्याप्रमाणे जोकर वापरण्याचा स्वप्नाचा इरादा असावा. (किंवा, 'चॅलेंज'च्या डावाप्रमाणे, भलतेच कोठलेतरी पान ठेवून 'और एक अठ्ठी' म्हणून ब्लफ कॉल.)

बाकी, स्वप्नाचे म्हणाल, तर 'स्वप्ना' ही दुसरीतिसरी कोणीही नसून, रोहित किंवा डॉ. भरुचा यांच्यापैकीच कोणीतरी असावी, असा आमचा प्राथमिक (परंतु दाट) संशय आहे. (त्यातही, त्यातल्या त्यात तो रोहितच असण्याची शक्यता अधिक वाटते. अर्थात, शेवटच्या भागात कळेलच म्हणा, परंतु पेशन्स नसल्याकारणाने रहस्यकथा उर्दू पद्धतीने वाचणारांकरिता आमची ही आगाऊ हिंट.)

असो. आगे आगे देखेंगे होता है क्या।

(जमल्यास - नि वेळ झाल्यास - क्रमशः)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"Dead man's hand"ला गूगलले असता विकीवर हे मिळाले:

"The makeup of poker's dead man's hand has varied through the years. Currently, it is described as a two-pair poker hand consisting of the black aces and black eights. These and an unknown hole card were reportedly held by Old West folk hero, lawman, and gunfighter Wild Bill Hickok when he was murdered."

आणि त्यासोबतचे चित्र येणेंप्रमाणे:

Dead man's hand

हे ठाऊक नव्हते. माय बॅड!

म्हणजेच, उर्वरित तीन खून करताना 'स्वप्ना' (उर्फ रोहित) (की रोहित (उर्फ 'स्वप्ना')?) खुनाच्या ठिकाणी अनुक्रमे किलवर एक्का, इस्पिक एक्का आणि एक असेच कोठलेतरी झाकलेले पान ठेवून जाणार तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक पान झाकलेले आहे त्याच काय, पाचवा वाचेल म्हणजे. कुनून के लंबे हात स्वप्नाच्या गल्यात पडणार मग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी