अश्वत्थामा

रोज रात्री झोपताना गोष्टी ऐकायची सुश्रुतला सवय झालीय. किंबहुना आम्हीच ती लावलीय. रोज रोज नवनवीन गोष्टी कुठून आणायच्या हाही एक प्रश्नच असतो. यातून आमच्या कल्पनाशक्तीचा कसच लागतो. वर त्या बोधप्रद असाव्यात, त्यांचं काही तात्पर्य असावं असा आमचाच आग्रह. असंच एकदा कुठली गोष्ट सांगता येईल याचा विचार करीत असताना अश्वत्थामा आठवला.

अश्वत्थामा लहान असताना एकदा त्याला भूक लागली होती आणि त्यानं दूध प्यायचा हट्ट धरला होता. घरी दूध नव्हतं. “बाबा, ते वॉलमार्टला जाऊन का आणत नाही?”, सुश्रुतचा निरागस प्रश्न. काहीही हवं असल्यास वॉलमार्ट मधून ते आणता येतं हा त्याचा आजवरचा समज; पण वॉलमार्ट मधून वस्तू विकत घ्याव्या लागतात, त्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि तेच बऱ्याच लोकांकडे नसतात, हाच खरं तर ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश. गोष्टीत अश्वत्थाम्याची आई दूध म्हणून कणिक पाण्यात मिसळून त्याला पाजते. दूध पिल्याचं समाधान होऊन शेवटी अश्वत्थामा शांत झोपी जातो. गोष्ट संपली. सुश्रुत रडायला लागला. अगदी हमसून हमसून. मी सुश्रुतला घट्ट मिठी मारली, पाठीवरून हात फिरवला. पण सुश्रुतच्या रडण्याचं नेमकं कारण काय बरं असावं? ते रडणं अश्वत्थाम्याला खरं दूध मिळालं नाही याबद्दल तर नव्हतं ना? अश्वत्थाम्याच्या आईची अगतिकता त्याला कळली असेल? गरिबांना स्वतःच्या अगदी लहानसहान इच्छा मारून कसं जगावं लागतं हे त्याला समजलं असेल? सुश्रुतला त्याचं रडण्याचं कारण विचारलं. “कारण ते गरीब होते”, सुश्रुत हुंदके देत म्हणाला. मी मिठी आणखी घट्ट केली, त्याचे भरपूर पापे घेतले. आपल्याला जे समजावून सांगायचं होतं, ते सुश्रुतला समजलं याच्या समाधानाचं स्मित माझ्या चेहऱ्यावर आलं.

कसलीही दैन्यावस्था आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये अशी सर्व आई-वडिलांची इच्छा असते, अपेक्षा असते. पण गरिबी प्रत्यक्ष अनुभवली नसली तरी मुलांना गरिबांप्रती करुणा असावी, त्यांच्या संघर्षांची जाण असावी, पैशांचं मूल्य कळावं अशी सुजाण पालकांची आशा असते. आई-बाबांनी माझ्या बाबतीत असे भरपूर प्रयत्न केलेत. बाजारातून मुद्दाम समोर गर्दी नसणाऱ्या गरीब शेतकऱ्याकडून भाजी घ्यायची, भाव करायचा काही, हे लहानपणापासून बघितलं होतं. बाबा तर हमखास लहान दुकानातून कुठलीही खरेदी करायचे. कपडे लहान-मोठे करायला, गुंड्या लावायला बाबांचा एक ठरलेला शिंपी होता. एका बोळात अतिशय लहान असं त्याचं दुकान होतं. तिकडे जाताना तो शिंपी किती गरीब आहे हे वारंवार सांगायचे. प्रत्यक्षपणे आणि स्वतःच्या वागण्यातून अप्रत्यक्षपणे त्यांनी हे माझ्या मनावर बिंबवण्याचा सतत प्रयत्न केला.

आता मोठं झाल्यावर मी स्वतः देखील अशीच दुकानं निवडतो हे नुकतंच मला जाणवलंय. बाबांना अपेक्षित असणारी जाणीव माझ्यात निर्माण झाली असावी. हीच जाणीव आता पुढे सुश्रुतमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याची पहिली पायरी यशस्वी झाली या आनंदात सुश्रुतला कुशीत घेऊन, बिलगून झोपी गेलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet