वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया (पूर्वार्ध)

माणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हतोटी आहे. त्यानी केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षे जगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे.

अनेक प्रसंगी त्याच्या विचारातील, त्यानी घेतलेल्या निर्णयातील विसंगती प्रकर्षाने जाणवू लागतात. या विसंगतींचे मूळ शोधल्यास त्याच्या विचारप्रक्रियेला श्रद्धेची पार्श्वभूमी लाभलेली असल्यामुळे साहजिकच त्याच्या विचारात व घेतलेल्या निर्णयात कमालीची तफावत जाणवते. किंबहुना त्यानी जोपासलेल्या श्रद्धाच त्याचे निर्णय घेतात की काय असे वाटू लागते. जो दृष्टीकोन पुरावा नसतानासुद्धा खरा आहे असा वाटत असतो त्यालाच सामान्यपणे आपण श्रद्धा म्हणतो. माणूस जोपासत असलेल्या श्रद्धा विविध मार्गाने आलेल्या असतात. काहीवेळा तो स्वत:हूनच आकर्षित झालेला असतो. काही श्रद्धा वाड-वडिलांपासून, काही मोठ्या लोकांच्या दबावामुळे, काही लहानांच्या प्रेमाखातर, काही शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक वातावरणामुळे त्याच्या मनात घर करून बसलेल्या असतात. स्वत:चाच दृष्टीकोन खरा आहे असा समज करून घेत असल्यास, त्यानी घेतलेल्या निर्णयावर जोपासत असलेल्या त्याच्या श्रद्धा फार मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतात.

आपण रोज अनेक लहान - मोठे निर्णय घेत असतो, विविध प्रकारचे निर्णय घेत असतो. निर्णय घेत नसल्यास वा निर्णय घेणे टाळत असल्यास आपले जिणे खडतर झाले असते. निर्णय घेताना आपल्या हातून कळत न कळत चुकाही होत असतात. अनेक वेळा कुठेतरी चुकत आहोत हेसुद्धा कळत नाही. नंतर केव्हा तरी चूक उमगल्यास वेळ निघून गेलेली असती. या (घोड) चुका आपले श्रम, वेळ व पैसा वाया घालवत असतात. चुकीच्या निर्णयामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. प्रसंगी जीवावर बेतू शकते. देव - धर्म, तांत्रिक - मांत्रिक, बाबा - बुवा, फलजोतिषी, यांच्या क्षमतेवर आपली श्रद्धा असल्यास आपल्या काका - मामांचे भूत आपल्या मानगुटीवर बसले नाही ना , या विचाराने आपण अस्वस्थ होऊ लागतो. कुंडलीतील मंगळामुळे मन:शांती ढासळू लागते. बुवा - बाबांच्या नादी लागल्यामुळे घरातले वातावरण हळूहळू बिघडू लागते. जडी - बुटी, अंगार - धूप इत्यादींच्या उपचारामुळे आपण आपला जीव धोक्यात घालवतो. नवस - सायास, उपास-तपास, जत्रा - उरुस इत्यादीमुळे जीव हैराण होतो. श्रद्धेच्यापायी सारासार विचार करण्याची कुवतच हरवून बसतो.

आपण चुकीचा विचार का करतो, हा प्रश्न मनात आल्यास आपण खरोखरच मूर्ख तर नाही ना, असे वाटू लागते. सामान्यपणे तसे काही नसते. आपण मोठमोठ्या हुद्यावर असतो. अत्यंत जोखमीची कामं हाताळतो. आपल्या काही निर्णयामुळे हजारो हातांना रोजगार मिळतो, आपल्यामुळे गुंतागुंतीची यंत्रणा वा व्यवस्था विनातक्रार काम करत असते. अनेकांचे जीव वाचतात. तरीसुद्धा काही प्रसंगी आपल्यातील बहुतेकांच्या - डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योगपती, नोकरदार यांच्यासकट शिकलेले सवरलेले व अशिक्षितांच्यासुद्धा - विचार करण्यात, विचार करण्याच्या पद्धतीत काही उणीवा राहिलेल्या जाणवतात. व या उणीवांचे मूळ आपण जोपासत असलेल्या श्रद्धापर्यंत पोचते. श्रद्धेमुळे माहितीचे विकृतीकरण होते. मुळातच आपली पुरावे शोधण्याची व हाती आलेल्या पुराव्यांचे विश्लेषण करण्याची पद्धतच चुकीची असते. काही वेळा वेळ मारून नेण्यासाठी किंवा पुराव्यांच्या अभावी समस्यांचे सुलभीकरण केले जाते. विषयाकडे पुरेशा गंभीरपणे बघितले जात नाही. तर्कशुद्ध विचार करण्याचे वा अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य आत्मसात केलेले नसल्यामुळे आपण तोंडघशी पडू शकतो. आपल्या शिक्षणपद्धतीतच विचार करण्याचे, तर्कशक्ती लढवण्याचे, विश्लेषण करण्याचे साधे प्राथमिक धडेसुद्धा दिलेले नसतात. ही अकुशलता आपल्या आयुष्यावर फार दूरगामी परिणाम करू शकते, हेच आपल्याला माहित नसते.

यांच्याच जोडीला विज्ञान व आभासी विज्ञान यातील फरक न कळल्यामुळे वा त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या आकलनामुळे आपल्या विचारक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. टीव्हीसारख्या प्रसार माध्यमातून बहुतेक वेळा चुकीच्या, तर्कविसंगत, भ्रामक अशा गोष्टींचे उदात्तीकरण होत असते. आर्थिक लाभ हाच मुख्य उद्देश असलेल्या टीव्ही प्रसार माध्यमाच्या व्यवसायात फलजोतिष, अतींद्रिय शक्तीचे (ओंगळ) प्रदर्शन, परामानसशास्त्राचे उदात्तीकरण, भूत - भानामतीसारख्या अंधश्रद्धांचा आक्रमक प्रसार, दैवीशक्तीबद्दलच्या अफाट कल्पनांचा बाजार, चमत्कारांची धूळफेक, इत्यादींची रेलचेल असते. वास्तवतेचा, वस्तुनिष्ठतेचा पूर्ण अभाव तेथे असतो. त्यामुळे पडद्यावरील सत्य हेच वास्तवातील सत्य आहे अशी समजूत करून घेतल्यामुळे आपण आपली विचार क्षमता हरवून बसतो. निर्णय घेत असताना अक्षम्य चुका होऊ लागतात. त्या चुका निस्तरता निस्तरता माणूस हैराण होतो. परंतु श्रद्धेच्या जबरदस्त मगरमिठीतून आपली सहजासहजी सुटका होत नाही. उलट अशा अवैज्ञानिक गोष्टींच्या माऱ्यामुळे आपल्या श्रद्धा जास्त बळकट होऊ लागतात व क्रमेण विचारशक्ती कुंठित होऊ लागते. कुठलिही चिकित्सा न करता कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करण्याची सवय जडते. श्रद्धेच्या पूर्ण आहारी गेल्यामुळे विवेकी व तार्किक विचाराऐवजी रूढी, परंपरा, मानसिक समाधान, आत्मिक उन्नती, अध्यात्म, कथा-पुराणातील दाखले, इत्यादींच्या आधारावर आपल्या श्रद्धेचा मनोरा डोलत असतो. काही वेळा आपले आर्थिक व सामाजिक हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळेसुद्धा आपण श्रद्धेच्या विरोधात भूमिका घेवू शकत नाही.

मुळातच आपल्या समाजात चिकित्सेचा पूर्ण अभाव आहे. एवढेच नव्हे तर चिकित्सकतेबद्दल सुप्त घृणा आहे. चिकित्सा करणारे म्हणजे छिद्रान्वेशी, चांगल्या कामात खो घालणारे, नकारात्मक आयुष्य जगणारे, उत्साहावर पाणी टाकणारे अशी त्यांच्याबद्दलची एक प्रतिमा सश्रद्धांच्या मनात घर करून असते. या समाजात सश्रद्धांचाच वरचष्मा असल्यामुळे चिकित्सक नामोहरम होत असतात. बदनामीच्या भीतीमुळे चिकित्सकांना बहुतेक वेळा गप्प बसावे लागते. खरे पाहता चिकित्सक विश्लेषकाची भूमिका बजावत असतात. संभाव्य धोक्यांचा इशारा देत असतात. चिकित्सकता या गुणविशेषाची संवर्धन करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे आपले निर्णय अचूक होतात. नियोजनपूर्वकपणे त्या निर्णयांची अंमलबजावणी करता येते. अडचणीवर मात करता येते. श्रद्धेच्या जगात चिकित्सेला स्थान नाही. कारण चिकित्सक प्रत्येक श्रद्धाविषयांचा अभ्यास करून उलटतपासणी घेत त्यातील विसंगती उघडे पाडतो. आपल्या अविचारी वर्तनावर बोट ठेवतो. चिकित्सा हे शहाणपणाचे लक्षण आहे. पुराव्याविना कुठलिही गोष्ट चिकित्सक सहजासहजी स्वीकारत नाही.

श्रद्धेची गडद छाया असलेली ही मानसिकता कशा कशामुळे घडत असावी याचा थोडासा जास्त खोलात जाऊन विचार करू लागल्यास खाली नमूद केलेल्या गोष्टी ठळकपणे दिसू लागतील.

आपण प्रत्यक्ष आकडेवारीपेक्षा ऐकीव माहिती व मनोरंजक गोष्टीवर विश्वास ठेवतो.

माणसांना त्यांच्या आदिम अवस्थेपासूनच गोष्टी सांगण्याची वा गोष्टी ऐकण्याची सवय जडलेली आहे. उत्क्रांत काळातील ही सवय अजूनही टिकून आहे. रानटी अवस्थेतील माणूस गुहेपाशी, उघड्यावर जाळ करून आपल्या टोळीतील लोकांपुढे गोष्टी सांगत वा ऐकत असे. आजचा आधुनिक माणूस क्लबमध्ये, टीव्हीसमोर, गोल्फच्या मैदानावर, चहा - कॉफी - दारूचे घुटके घेत घोळका करून गप्पा रंगविण्यात वेळ घालवत आहे. जसजसे प्रसार माध्यमांचा - मौखिक, हस्तलिखित, मुद्रित, फोन, रेडिओ, टीव्ही, संगणक, इंटरनेट, मोबाइल फोन, - विकास होऊ लागला, तसतसे आपल्यातील गोष्टीवेल्हाळपणाला ऊत येत आहे. त्यामुळे बिनबुडाच्या गोष्टीसुद्धा खरे आहेत असे वाटू लागतात. गप्पा - गोष्टी मनोरंजन करतात, कल्पनाशक्तीला वाव देतात हे मान्य करतानाच त्यांचा पुरावा म्हणून स्वीकारता येत नाही. माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे एकमेकातील नातेसंबंध घट्ट करण्यासाठी अनुभवजन्य गोष्टींच्या देवाण - घेवाणीला पर्याय नाही, हे आपण समजू शकतो. परंतु त्यानाच पुरावे म्हणून मान्यता देत असल्यास आपली तार्किकशक्ती कुंठीत होत जाईल व आपले निर्णय चुकीचे ठरू लागतील. ज्या माहितीच्या आधारे आपण निर्णय घेत असतो, ती माहितीच चुकीची, अर्धवट, सापेक्ष वा बिनपुराव्याची असल्यास आपल्या निर्णयामुळे अनेक कटकटी निर्माण होण्याची शक्यता असते.

आपण एखादी कार घ्यायची ठरवत असल्यास कारसंबंधीची इत्थंभूत माहिती गोळा करण्याच्या मागे लागतो. वेगवेळ्या कंपनीच्या कार्सची, त्यांच्या मॉडेल्सची व आपल्या अपेक्षेची (कुवतीची!) चिकित्सक व तुलनात्मकरित्या अभ्यास करतो. कंपनीची बाजारातील पत, देखभालीची सुविधा, विक्रीपश्चात सेवा, गॅरंटी, वॉरंटी इत्यादी अनेक मुद्याचे विश्लेषण करून पूर्ण विचारांती अमुक कंपनीचे अमुक मॉडेल घेण्याच्या निर्णयापर्यंत पोचतो. सहज म्हणून गप्पांच्या ओघात एखाद्या मित्रासमोर आपल्या निर्णयाचा उल्लेख केल्यावर "ती गाडी ना! अजिबात घेऊ नकोस. तसली गाडी घेऊन मला पश्चात्ताप झाला. एकदा क्लच बदलावा लागला. ब्रेकचे प्रॉब्लम्स आहेतच. त्याऐवजी ही गाडी घे. एकदम फर्स्ट क्लास! " यावर आपली प्रतिक्रिया काय असणार? बहुतेक जण मित्राच्या वैयक्तिक अनुभवावर विसंबून आपले निर्णय बदलून टाकतील. मित्रानी शिफारस केलेली गाडी घेतील.

खरे पाहता आपला आधीचा निर्णय अधिक वस्तुनिष्ठ, आकडेवारी व प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित होता. परंतु आपली मानसिकताच कचखाऊ असल्यामुळे शेवटच्या क्षणी निर्णय फिरवून मित्राच्या अनुभवावर श्रद्धा ठेऊन भलताच निर्णय घेतो. मित्राचा अनुभव वैयक्तिक स्वरूपाचा होता. त्यानी घेतलेल्या गाडीत खरोखरच क्लच वा ब्रेकच्या समस्या असू शकतील. म्हणून सर्वच गाड्या तशाच असावेत हा समज अत्यंत चुकीचा आहे. अनुभवाचे बोल, आकर्षक संभाषण शैली, जाहिरातबाजी, आकडेवारीची जागा घेऊ शकत नाहीत. आकडेवारीचे विश्लेषण कंटाऴवाणे, दुर्बोध, वा अमूर्त असे वाटले तरी त्याच्यातून मिळणारी माहिती अचूक व निर्णय घेण्यास अत्यंत उपयुक्त असते. आपण मात्र आकडेवारी बाजूला सारून भलत्याच अनुभवाच्या ऐकीव गोष्टीवरून आयुष्यातील अत्यंत महत्वाचे निर्णय घेत असतो. कारण आपली मानसिकताच श्रद्धेच्या गडद छायेत अडकून पडलेली असते.

अपूर्ण....

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

@निर्णयातील विसंगती - प्रत्येक वेळी माणूस संपूर्ण तार्किक विचार करू शकत नाही त्यामागे "भावना"हेही एक कारण असू शकेल ना? कितीही तर्कसंगत वाटले तरी काही निर्णय आपण घेऊ शकत नाही.
.
@ऐकीव गोष्टींवर विश्वास + निकटवर्तीयांचा प्रभाव - व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकी जमान्यात हे रोज दिसून येतंय. वाट्टेल ते निरर्थक मजकूर "अरे पण ते फेसबुकवरपण पाठवलेलं बर्‍याच जणांनी" ह्या सदराखाली विश्वासनीय समजले जातात. शिवाय असलं काही आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून आलंय तर ते खोटं कसं असेल- असलाही एक अँगल असतो.
अवांतर-आलेल्या प्रत्येक फॉरवर्डमधे एक तरी शंका/खुसपट्/चूक काढणं हा सध्या आमचा आवडता खेळ आहे Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्युत्तम लेख आहे. श्रद्धेची व्याख्या केलेली आहे. श्रद्धेमुळे सामोरे जावे लागणार्‍या तोट्यांकडे अंगुलीनिर्देश केलेला आहे.
विज्ञान आणि आभासी विज्ञान यातील फरक कळला नाही. उदाहरण दिल्यास स्पष्ट होइल.
लेख अतिशय आवडला.
या सार्वजनिक मंचाचा उपयोग श्री. नानावटींपेक्षा अधिक परिणामकारक कोणाला जमला आहे असे मला वाटत नाही. हे वैयक्तिक मत आहे. आपले मत वेगळे असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फलजोतिष, अतींद्रिय शक्तीचे (ओंगळ) प्रदर्शन, परामानसशास्त्राचे उदात्तीकरण, भूत - भानामतीसारख्या अंधश्रद्धांचा आक्रमक प्रसार, दैवीशक्तीबद्दलच्या अफाट कल्पनांचा बाजार, चमत्कारांची धूळफेक, इत्यादींची रेलचेल असते. वास्तवतेचा, वस्तुनिष्ठतेचा पूर्ण अभाव तेथे असतो.

या गोष्टींचा उल्लेख आभासी विज्ञान असा केला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हां मेटॅफिजिक्स असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@प्रभाकर नानावटी,

तुम्ही स्पॉक आहात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला! अनेकांच्या अनेक गोष्टींवर असलेल्या ठाम श्रद्धा पाहून मी स्वतःला आत्यंतिक शंकेखोर आणि सिनिकल समजू लागलो आहे. आता लेखातलंच उदाहरण घ्या ना, एखादी गाडी खरेदी करताना वेगवेगळ्या ठिकाणाहून आकडेवारी जमा करताना ती आकडेवारी निष्पक्षपणे गोळा केलेली आहे यावर आपण श्रद्धा ठेवतो.
किंवा इन्व्हेस्टमेन्ट बँकांनी काढलेल्या अनेक गुंतागुंतीच्या प्रॉडक्ट्सना रेटिंग एजन्सीजनी दिलेले रेटिंग नीट अभ्यास करुन दिले आहे यावर श्रद्धा ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला, पण गाडी खरेदीचे उदाहरण पटले नाही. कुठल्याही कारच्या उत्पादनात, दर्जा तपासणे ही एक अत्यावश्यक स्टेप असते. जर एखाद्या लॉटमधे काही कमतरता राहिली असेल तर ती लक्षांत येते.ती लक्षांत येऊनही तो लॉट दडपून बाजारात पाठवला, तर प्रत्येक गाडीलाच ती समस्या येण्याची शक्यता असते. अशा वेळेस जर कोणी दर्जाबद्दल तक्रार करत असेल तर, आपल्या गोळा केलेल्या माहितीपेक्षा, या नवीन माहितीलाच जास्त महत्व दिले पाहिजे. त्यांत मित्रावरच्या श्रद्धेचा प्रश्नच येत नाही.
कामाचा दर्जा सांभाळणार्‍या कंपन्यांच्या बाबतीत, अमुक गाडी चांगली लागली, अमुक वाईट लागली अशा शक्यताच रहात नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0