जे.एन.यू मेरा प्यार: आमच्या परीक्षा

JNU

(भाग १)

माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमात झालं. कॉलेजमध्ये शिक्षणाचं, परीक्षेचं माध्यम इंग्रजी होतं, तरी बर्‍याचशा शिक्षकांना, मित्रमैत्रिणींना मराठी किंवा हिंदी तरी येत होतं. इंग्रजीत बोलायची वेळ फार येत नसे. मीही त्यावेळी इंग्रजी भाषेशी विशेष मैत्री करायला उत्सुक नव्हते. त्यामुळे जे.एन.यू.त गेल्यावर सुरुवातीला नाही म्हटलं तरी इंग्रजी भाषेचं दडपण यायचं. मित्रमैत्रिणी, शिक्षक गप्पासुद्धा इंग्रजीत मारायचे. अनौपचारिक-बोली-इंग्रजीतले काही शब्द माहीत नसायचे. इंग्रजीतले लेख, पुस्तकं वाचायला जास्त वेळ लागायचा. माझ्यासारखे भारतीय भाषांत शालेय शिक्षण घेतलेले थोडे विद्यार्थी माझ्या वर्गात होतेच, पण जिथे इंग्रजी फार बोललं/वापरलं जात नाही, अशा छोट्या छोट्या देशांतून आलेलेही विद्यार्थी होते. त्यांचीही इंग्रजीशी झटापट चाललेली होती. 'माझ्या वर्गातले सगळे हुशार, खूप वाचन केलेले, ज्ञानी आहेत, मी एकटी/टाच अडाणी आहे' असं त्यावेळी आमच्या वर्गातल्या प्रत्येकी/कालाच वाटत होतं. अशा सुरुवातीच्या बिचकलेल्या काळात, एका सरांनी आमच्या अभ्यासक्रमाचा, तसंच मूल्यमापनाचा (परीक्षेचा) एक भाग म्हणून आम्हाला (वाचिक) प्रेझेंटेशन्स करायला सांगितली. आमच्या वर्गात एक मंगोलियाची मुलगी होती. ती तयारी करून आली होती, पण सादर करताना वारंवार अडखळू लागली. तिनं त्या विषयातलं वाचन केलं होतं, टिपणं काढली होती. पण ते तिला इंग्रजीत मांडता येईना. त्यामुळे ती आणखीनच बावरली. अचानक सरांनी तिला विचारलं, "तुला तुझ्या मातृभाषेत करायचंय का हे सादरीकरण?" आम्ही सगळे चकित झालो. मंगोलियन भाषेत सादरीकरण? सरांना ही भाषा येते? ती मुलगीही चक्रावली. सर म्हणाले, "तुझी भाषा मला समजत नाही. पण तुला विषय नीट कळला असेल तर तो तुला तुझ्या भाषेत अस्खलितपणे मांडता येईल. भाषा समजली नाही तरी तुझे हावभाव, बोलण्याची पद्धत, हेल, किती वेळ बोललीस त्यावरून तुला विषय किती समजला आहे, तू किती अभ्यास केला आहेस याचा मला नक्की अंदाज येईल. तुला किती, कसं इंग्रजी येतंय हे या क्षणी माझ्या दृष्टीनं म्हत्त्वाचं नाही." सरांनी आश्वस्त केल्यावर तिने लगेचच तिच्या मातृभाषेत तेच सादरीकरण केलं. आम्ही सगळ्यांनी, अवाक्षरही समजत नसताना ते पूर्ण सादरीकरण शांतपणे ऐकलं. तिच्या आत्मविश्वासात पडलेला फरक पाहिला. त्या दिवशीच्या प्रसंगाने फक्त तिलाच आत्मविश्वास दिला असं नाही, तर आम्हाला सगळ्यांनाच एक बळ दिलं. आपल्याला, आपल्या चुकांना, आपल्या उणिवांना इथे समजून घेतलं जाईल असा विश्वास आला. त्यांच्यावर मात करण्याचं बळ इथून मिळालं.

एकदा कुठली तरी अंतर्गत लेखी परीक्षा होती. अंतर्गत परीक्षा कशा घ्यायच्या, याचं पूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असतं. आमचे एक सर आले, आम्हाला प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वाटल्या आणि म्हणाले, "मला बरीच कामं आहेत. मी तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकतो आहे. तुमच्यावर कोणीही पर्यवेक्षक असणार नाही. तुम्ही पेपर लिहा. मी दोन तासांनी येईन पेपर गोळा करायला." आम्ही शांतपणे पेपर लिहिले. कॉपी करायची इच्छा कोणालाही झाली नाही.

याच सरांच्या दुसर्‍या एका परीक्षेत, वेळ संपली तरी काही महाभाग पेपर लिहितच बसले. शेवटी एक एक जण गळून दोघे उरले. सरांनी त्यांना अजिबात घाई केली नाही. आपली हुशारी दाखवण्याच्या नादात दोघे खुन्नसमध्ये लिहायचे थांबेतच ना. बर्‍याच वेळाने त्यांनी आपापले पेपर जमा केले. सर त्यावेळी काहीच बोलले नाहीत. पण नंतर हळुहळू आमच्या सगळ्यांच्या लक्षात येत गेलं, की आतापर्यंतच्या इतर परीक्षांप्रमाणे आपण किती लांबीची उत्तरं लिहितोय, याला इथे कोणी महत्त्व देणार नाही. त्यामुळे 'सगळ्यात आधी कोण पुरवणी घेतो' आणि 'सगळ्यात जास्त पुरवण्या कोण वापरतो' अशा सुप्त, बालिश स्पर्धा आपोआप बंद पडल्या.

आधुनिक भारतातील राजकीय विचार/विचारवंत यावर आधारित एक पेपर आम्हाला होता. त्याच्या मूल्यमापनाचा एक भाग म्हणून आम्हाला प्रत्येकाला एका विचारवंतावर प्रेझेंटेशन द्यायचं होतं. त्या त्या विचारवंताचे समग्र लिखाण, आणि त्यावर विद्वानांनी लिहिलेली पुस्तकं, लेख असे आम्हाला वाचायचं होते. आम्ही सगळ्यांनी आपापल्या आवडीचा विचारवंत निवडला.पण प्रेझेंटेशन मात्र त्या त्या विचारवंतावर टीका (मल्लिनाथी या अर्थी नव्हे, तर निंदा या अर्थी) करणारे करायचे होते. मुख्य सादरीकरण करणारा टीका करत असे, तेव्हा त्या विचारवंताची बाजू लढवण्याची सामूहिक जबाबदारी बाकीच्या विद्यार्थ्यांवर होती. त्यामुळे ज्या विचारवंतावर प्रेझेंटेशन असे, त्याचं लिखाण (प्रेझेंटेशन न करणार्‍या) इतर विद्यार्थ्यांनाही वाचून यावं लागायचं. आवडणार्‍या विचारवंताविषयी उलटा विचार, त्याच्या विचारातील उणिवा शोधण्याचा बौद्धिक व्यायाम आम्हाला याद्वारे करायला लागला. आपण जी विचारसरणी मानतो/ आपलीशी/ बरोबर वाटते, तिच्याविषयीही स्वतंत्र विचार करता यायलाच हवा, प्रसंगी परखड टीका करता यायला हवी; तसंच विरुद्ध/ न पटणार्‍या/ इतर विचारसरणीच्या विचारांतील सकारात्मक मुद्दे शोधता यायला हवेत हा डोस या प्रेझेंटेशनमधून आम्हाला मिळाला.

'सदासर्वदा मूल्यमापन' म्हणजे रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग. सेमेस्टरभर झोपा काढू, शेवटी एकदा परीक्षेत दिवे पाजळू असं करायला वावच नाही. माझ्या एका आवडत्या प्राध्यापकांनी तर आम्हाला 'क्लासरूम डायरीज' लिहायला सांगितल्या होत्या. नाव फॅन्सी असल्याने आवडलं तरी रोजच्या रोज क्लासरूम डायरी लिहिणं हे तेव्हा तितकंसं कूल वाटत नव्हतं. क्लासरूम डायरी म्हणजे त्या प्राध्यापकांच्या वर्गात ज्या विषयावर चर्चा होईल, त्या चर्चेवर आधारित, किंवा काही अधिक वाचन, विचार करून टिपणं लिहायची. सुरुवातीला काही दिवस रोजच्या रोज टिपणं लिहिण्याची शिकस्त केली. नंतर नंतर, दहा पंधरा दिवसांनी एकदाच (वेगवेगळी पेनं घेऊन) मागचा 'अनुशेष' भरून काढणं व्हायचं. आम्हाला प्रत्येकाला या सरांनी या डायरीज लिहायला लावल्याच, पण वर्गातल्या प्रत्येकाच्या डायरीतलं पान अन् पान वाचून त्यावर तपशीलवार शेरेही त्यांनी लिहिले. आमच्या टिपणांविषयी त्यांनी दाखवलेल्या आस्थेमुळे आम्ही आमच्या अभ्यासविषयात अधिक गांभीर्याने गुंतलो, असं मला आज वाटतं.

या सरांच्या प्रश्नपत्रिकाही फारच कल्पक, डोक्याला चालना देणार्‍या असायच्या. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जे वाचलं, त्याच्यावर स्वतंत्रपणे विचार करायचा, त्याचा आमच्या सभोवतालच्या परिस्थितीशी संबंध जोडायचा धडा त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रश्नपत्रिकांमधून दिला. एकोणिसाव्या शतकातील बंगालमधील एका स्त्रीची आत्मकहाणी आम्ही अभ्यासक्रमात वाचली होती. त्यात तिने तिच्या आईवर काही लिहिले होते. सरांनी आम्हाला पेपर म्हणून काय दिलं, तर चक्क शुभेच्छापत्रं विकणार्‍या एका कंपनीने 'मदर्स डे' निमित्त प्रकाशित केलेली एक जाहिरात. त्याखाली त्यांनी प्रश्न लिहिला होता - 'तुम्ही अभ्यासक्रमात वाचलेल्या आत्मकथेच्या लेखिकेने तिच्या आईबद्दल व्यक्त केलेल्या भावना आणि आजच्या काळातील या जाहिरातीत दिसणार्‍या आईबद्दलच्या संकल्पना यांच्या आधारे गेल्या शंभर वर्षात बदललेली स्त्रियांची परिस्थिती यावर निबंध लिहा.' ही प्रश्नपत्रिका पाहून आम्ही प्रचंड उत्तेजित झालो होतो. या सरांच्या पेपरच्या जितक्या म्हणून परीक्षा दिल्या, त्या सगळ्या परीक्षांत विचारलेले प्रश्न आणि त्यांची मी लिहिलेली उत्तरं मी अजून तरी विसरलेली नाही.

जे.एन.यू.त वेगवेगळ्या पेपर्सच्या मूल्यमापनाचा भाग म्हणून कधी परीक्षेच्या एक आठवडा आधीच प्रश्नपत्रिका हातात देऊन प्राध्यापकांनी आम्हाला धक्का दिला, तर कधी ओपन बुक परीक्षा घेऊन. या अशा परीक्षांमुळे न समजता घोकणं, रट्टा मारणं, कॉपी करणं असे प्रकार आमच्या बाबतीत घडूच शकले नाहीत. लेखी परीक्षा हा मूल्यमापनाचा फक्त एक भाग होता. विषयाशी संबंधित असलेल्या पुस्तकांची परीक्षणं करणं, लहान लहान शोधनिबंध लिहिणं, ते सादर करणं, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर जाऊन, तिथे राहून प्रकल्प करणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा तर सतत चालू असायच्याच, पण रोजचा वर्गातल्या चर्चेतला सहभागही महत्त्वाचा असायचा. त्याचंही मूल्यमापन व्हायचं. त्यामुळे, आदल्या दिवशी त्या त्या विषयाशी संबंधित काही लिखाण वाचणं आम्हाला आवश्यक होतं. 'अभ्यासक्रम शिकणं/ लेक्चर्स ऐकणं' आणि 'त्यावर परीक्षा देणं' या दोन वेगळ्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे वाचन करणे, त्याच्यावर विचार करणे आणि ते व्यक्त करणे हे आम्ही रोजच्या रोज करू लागलो.

इथे मी माझ्या विभागातल्या, आणि मी ज्या इतर विभागांतले पेपर मी घेतले होते, तेव्हढ्याच परीक्षांविषयी लिहिलं आहे. पण जे.एन.यू.त शिक्षकांना बरीच स्वायत्तता असल्यामुळे असेच प्रयोगशील प्राध्यापक इतर विभागांतही असतील, असं मला वाटतं.

आमच्या डोळ्यांना लावलेली झापडं बाजूला करण्यात या वेगवेगळ्या परीक्षांप्रकारांचा मोठाच हात आहे.

(पुढचा भाग : एक स्त्री म्हणून)

field_vote: 
3.625
Your rating: None Average: 3.6 (8 votes)

म्हणजे हे जेएनयु अगदी हारवर्ड च्या वरताण दिसतंय, वर्णनावरुन. आम्ही उगाचच त्या नतद्रष्ट मुंबई युनिव्हर्सिटीला चिकटून राहिलो, त्यामुळे आमची झापडं कधी उघडलीच नाहीत. असो, पुढला जन्म असला आणि तो याच महान देशांत असला, तर चूक सुधारता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी माझ्या मनातला प्रतिसाद आहे.
आवडला भाग. असं विद्यापिठ, शिक्षक आपल्याही देशात आहेत याचा अभिमान वाटला. जेएनयु बद्द्ल सध्या जे सर्रास बोललं जातंय त्याचा काहिही उल्लेख न करताही त्याला छेद देणारे लिहीत आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खरच आवडले. उत्तम स्मरणरंजन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बौद्धिक व्यायामाचा भाग फारच आवडला.

चार्वी लिहित रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचे लेखन नि शैली फार आवडते आहे. लिहीत राहावे ही विनंती.

---
परीक्षांबद्दल वाचून पुणे विद्यापीठातले दिवस आठवले. मी मुंबई सोडून पुण्याला शिकायला जाण्यामागे परीक्षापद्धती हे प्रमुख कारणांपैकी एक कारण होते. पुण्याला सत्र पद्धती असल्याने वर्षभर घोका नि परीक्षेत ओका हा प्रकार नव्हता. त्यातही, शेवटच्या वर्षी माझ्या आवडत्या शिक्षकांनी त्यांच्या विषयाच्या परीक्षेतही बदल केले. त्यांचा विषय घेणारे आम्ही फक्त पाच विद्यार्थी होतो. पाच ही एखादा विषय शिकवला जावा की नाही यासाठीची किमान विद्यार्थीसंख्या होती, त्यामुळे तो विषय तगला. ह्या शिक्षकांनी पहिल्या लेखी परीक्षेऐवजी आम्हाला अभ्यासक्रमाशी संबंधित एका पुस्तकातल्या पहिल्या तीन पाठांचे सार लिहून आणायला सांगितले. दोन आठवड्यांची मुदत पुष्कळ होईल असे त्यांचे मत. आम्ही पुस्तक उघडून पाहतो तर ते पुस्तकच मुळात त्या विषयाचे सार होते असे दिसले. म्हणजे उदा. प्रत्येक परिच्छेद असा असायचा की त्याला विचारचक्रात घालून काही बाहेर काढावे तर मू़ळ परिच्छेदच पुन्हा वेगळ्या शब्दांत लिहावा लागेल अशी परिस्थिती. एक आठवडा झटापट करूनही सगळ्यांचीच अवस्था बिकट झाली. मग आम्ही शिक्षकांना आमची अडचण सांगितली. ते मंदस्मित करत म्हणाले की, सार नाही लिहू शकत ना मग असं करा की त्या पाठांतल्या सिद्धतांमधील प्रत्येक गणिती पायरी लिहून काढा नि तेच द्या मला. त्या पाठांत काही सिद्धता होत्या नि त्यांतल्या फक्त महत्त्वाच्या पायर्‍या लेखकाने दिल्या होत्या. हे म्हणजे 'करने को गया एक और हुवा भल्ताच' प्रकरण होते हे आम्हांला त्या गणिती पायर्‍या सोडवायला बसल्यावर कळले. शेवटी दोन आठवड्यांऐवजी जवळापास दोन महिन्यांनी आम्ही त्या तीन पाठांतली प्रत्येक गणिती पायरी सोडवून दिली. त्यानंतर शिक्षकांनी त्यावरच तोंडी परीक्षा घेतली नि त्या गणिती पायर्‍यांतून काय निष्पन्न होते हे आमच्याकडूनच सूचक प्रश्न विचारून काढून घेतले.

गणिती पायर्‍या सोडवताना किती प्रत्येक चिन्ह किती महत्त्वाचे आहे नि त्याचे जरा डावे-उजवे झाले की अपेक्षित उत्तर येत नाही हे चांगलेच समजले. गणिती अचूकता नि पराकोटीचा काटेकोरपाणा हा किती आवश्यक असतो हे प्रत्ययास आले. पुन्हा त्या चिन्हांत गरजेपेक्षा अधिक न गुंतता, जे साध्य आहे त्याकडे कुठल्या पायर्‍यांनी सोपे नि कुठल्या वाटेने क्लिष्ट होत जाते याचाही धडा मिळाला.

अर्थात असे शिक्षक विरळाच.
---
अवांतर : तुमच्या लेखनात आलेल्या 'शिकस्त' या शब्दाचा अर्थ 'मात' असा आहे. शत्रूला शिकस्त दिली म्हणजे मात दिली, शत्रूचा पराभव केला. या शब्दाचा 'पराकाष्ठा' असा अर्थ कसा झाला असावा हे एक कुतूहलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे 'अवांतर'ही भलतेच रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत शिकस्त हा शब्द पराकाष्ठा या अर्थानेच वापरला जातो.
शत्रुला शिकस्त दिली हे मराठी वाक्य न वाटता हिंदीतील "शत्रु को शिकस्त दी" याचे शब्द टू शब्द भाषांतर आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहित रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडल्या आठवणी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काय मस्त. मी इथे पहिल्यादिवशी कॉलेजमधे गेले तेव्हा फिलॉसॉफीच्या शिक्षकांनी तू प्रादेशिक माध्यमातून आलेली असल्यामुळे हा विषय घेऊ नकोस, तुला जमणार नाही, कठीण जाईल असं सांगून लडिवाळ लाथ मारली. तर पोलिटकल सायन्सच्या शिक्षिकेने कोणकोण प्रादेशिक भाषातून आलेले विद्यार्थी आहेत विचारलं. मग काही कळतंय का काय बोलतेय ते असं विचारून थोबाडीत मारली. एल्फिन्स्टन कॉलेज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेखन, खरं सांगायचं तर हेवा वाटला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जे.एन.यु.मध्ये इंजिनियरींग शिकवतात का हो? एकूण जे.एन.यु.मध्ये किती विद्यार्थी असतात आणि इंजिनियरींगमध्ये किती विद्यार्थी असतात? वेबसाइटवर इतकीच माहिती मिळाली. On an average 28 students for M.Tech & 46 students for M.C.A. are selected every year.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे.एन.यू.त इंजिनियरींग शिकवत नाहीत. फक्त विद्यापीठातील School of Computer and Systems Sciences येथे MCA आणि M.Tech. हे दोन कोर्सेस आहेत. तुम्ही दिलेली विद्यार्थीसंख्या School of Computer and Systems Sciences मधील विद्यार्थ्यांची असावी. हे School इतर Schools च्या तुलनेत खूप छोटे आहे. जे.एन.यू.च्या सगळ्या Schools मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांची एकूण संख्या निदान सात हजार तरी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभवकथन आणि शैली, दोन्ही खास!

सरांनी आम्हाला पेपर म्हणून काय दिलं, तर चक्क शुभेच्छापत्रं विकणार्‍या एका कंपनीने 'मदर्स डे' निमित्त प्रकाशित केलेली एक जाहिरात. त्याखाली त्यांनी प्रश्न लिहिला होता - 'तुम्ही अभ्यासक्रमात वाचलेल्या आत्मकथेच्या लेखिकेने तिच्या आईबद्दल व्यक्त केलेल्या भावना आणि आजच्या काळातील या जाहिरातीत दिसणार्‍या आईबद्दलच्या संकल्पना यांच्या आधारे गेल्या शंभर वर्षात बदललेली स्त्रियांची परिस्थिती यावर निबंध लिहा.'

अतिशय कल्पक! ('हॉलमार्क' हे विशेषण वापरण्याचा मोह टाळतो आहे Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

या प्राध्यापकांनी (Avijit Pathak) लिहिलेले Recalling the Forgotten: Education and Moral Quest हे पुस्तक कदाचित तुम्हाला आवडेल. [मी वाचलेले नाही]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0