प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था

अमेरिका... विकासाचा चर्मबिंदू!!, अमेरिकेतील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कलात्मिक तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा संपुर्ण जगावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. इतर देश एखाद्या क्षेत्रातील आपला विकास किती झाला आहे हे दर्शवण्यासाठी अमेरिकेच्या प्रमाणाची फूटपट्टी वापरतात. अमेरिकेला सर्दी झाली की जगाला ताप येतो वगैरे म्हणी सहज बोलताना वापरल्या जातात, आणि जागतिक मंदीच्या काळात त्या जाणवतात देखील.

१७७६ साली जन्माला आलेला (स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर) आणि अवघ्या २४५ वर्षातच जागतिक नेतृत्व पदापर्यंत पोचलेल्या ह्या देशामध्ये काहीतरी विलक्षण जादू आहे हे नक्की. नावाप्रमाणेच युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे एक संघराज्य आहे. १७८७ सालच्या पहिल्या डेलावेर राज्यापासून १९५९ साली संघराज्यात विराजमान झालेल्या हवाई बेटांपर्यंतच्या प्रवासातून आधुनिक अमेरिकेच्या सीमा तयार झाल्या आहेत. ह्या प्रवासात काही राज्ये संघराज्यात सामील झाली, काही संघर्षानंतर येऊन मिळाली तर काही राज्यांना चक्क पैसे मोजून "विकत" घेतले गेले आहे; उदा अलास्का.

२४५ वर्षाच्या इतिहासात १७७५ - १७८३ च्या स्वातंत्र्ययुद्धा व्यतिरिक्त १८१२ चे युद्ध, १८३५-३६ चे टेक्सास - मेक्सिको युद्ध, १८४६ - १८४८चे मेक्सिको - अमेरिका युद्ध, १८६१ - १८६५ ची अमेरिकन यादवी, १८९८ - १८९९ चे स्पॅनिश - अमेरिका युद्ध, त्यानंतर २० व्या शतकातील पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि अलीकडचे आतंकवादाविरुद्धचे अफघाण/इराक - अमेरिका युद्धांचा समावेश मोठ्या युद्धांमध्ये करता येईल. ह्याशिवाय आधुनिक संघराज्याच्या निर्मितीमध्ये विविध राज्यात तात्कालिक कारणावरून चकमकी/युद्ध घडून आलेलीच आहेत.

या व्यतिरिक्त सामाजिक बदलांसाठी झालेल्या चळवळी आणि आंदोलनांची यादीही मोठी आहे. अगदी महिलांच्या मतदानाच्या अधिकारापासून, कायद्याने गुलामगिरी रद्द करण्यासाठी; ज्यातूनच पुढे यादवी युद्ध झाले, तसेच डॉक्टर मार्टिन लुथर किंग यांच्या अहिंसात्मक मार्गाने उभ्या राहिलेल्या नागरी हक्क चळवळींचा उल्लेख करता येईल.

ह्या युद्ध, चळवळी आणि संघर्षांमधून तयार झाली आहे ती अमेरिकन आयडेंटिटी (ओळख). स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची, वेगळेपणाची जाणीव. त्याची नीव आहे; अमेरिकन मूल्य आणि तत्वांमध्ये.

बाहेरून वाटत; तितका सामान्य अमेरिकन माणूस ऐशो-आरामात गादया गिरद्यांवर लोळत (!!) आयुष्य नक्कीच जगत नाही. भारतीयांच्या स्थैर्यांच्या संकल्पनेपेक्षा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अमेरिकनांच्या जीवन-पद्धती आणि अपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. परिस्थितीनुरूप कुठल्याही क्षणी, मांडलेला संसार मोडून/ किंवा उखडून देशाच्या दुसऱ्या कोपर्यात जाऊन परत उभा करण्याची तयारी सामान्य अमेरिकन माणसाकडे नक्कीच असते. अमेरिकन माणसाला नाविन्याची कास आहे. जन्मजातच हाडात मुरलेल्या "individualism" मुळे स्वतःच्या पसंतीच्या-आवडीच्या गोष्टी करण्याकडे त्याचा जास्त कल असतो. उद्योग धंद्यांमध्ये प्रचंड मोठे धोके (रिस्क्स) घेण्याचे धाडस तो दाखवतो, कारण तो जीवनाविषयी आशावादी आहे. अमेरिकन ड्रीम त्याच्या हाडीमाशी मुरलेले आहे.

अमेरिकन संस्कृतीबद्दल कितीही प्रचार, अपप्रचार असले तरी काही गोष्टीचा उल्लेख करणे ह्या लेखमालेच्या संदर्भात गरजेचे आहे. कुटुंब (फॅमिली), वृद्ध, लहान मुले, स्त्रियांच्या बाबतीत झालेली कुठलीही हेळसांड समाज सहन करू शकत नाही.

सामान्यतः अमेरिकन माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, विचार करण्याची पद्धत रचनात्मक, संरचित (structured & methodical), योजनात्मक (planned), संस्थात्मक (organizational) आहे. कुठलेही रचनात्मक काम करताना, संस्थात्मक पातळीवर (systemic) विचार करण्याची प्रवृत्ती जागोजागी, अगदी साध्या साध्या गोष्टीतही दिसून येते. तसेच प्रत्येक गोष्टीचे; सार्वजनिक असो वा खाजगी; प्रमाणीकरण (Standardization) करण्यामागे कलही दिसून येतो. हीच गोष्ट त्यांच्या उद्योग-धंद्यांमध्येही डोकावते.

अमेरिकन माणूस तसा एकदेशीय नक्कीच नसतो, पोटापाण्याच्या नौकरी-व्यवसायाव्यतिरिक्त जीवनाच्या अनेक वेगळ्या क्षेत्रातील गोष्टींमध्ये सहभाग (volunteerism) असतो. म्हणूनच अपारंपारिक (unconventional) अश्या विविध अनवट क्षेत्रांचा विकास इथे झालेला दिसून येतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे अश्या विविध अनवट क्षेत्राचे उद्योगीकरण तितक्याच झपाट्याने झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने व्यवसायाचे विस्तारीकरण आणि उत्पन्नाचे स्रोत वाढविताना सद्यकाळात अनेक व्यवसायांचे जागतिक कॉर्पोरेटायझेशनमध्ये रूपांतर झाले आहे.

नाविन्याची कास धरताना, इथे श्रम/ज्ञान-प्रतिष्ठा आहे. उपयुक्त नावीन्यपुर्ण कल्पना / उत्पादनांना समाजा कडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो, कारण अमेरिकन समाज एकंदरीतच चोखंदळ आहे. सातत्याने नव-नवीन कल्पना आणि उपयुक्त उत्पादनांची निर्मिती करत राहणे हे आव्हानात्मक काम आहे. म्हणूनच जितक्या वेगात नवीन कंपन्या येतात, उभ्या राहतात, तितक्याच वेगाने त्या लयालाही जातात. ह्यातून कुणाचीही सुटका नाही, अगदी ज्यांना टायकून वगैरे समजले जाते त्यांचाही कालौघात टायटॅनिक झालेला आहे.

स्वातंत्र्यानंतर अमेरिकन आयडेंटिटी (ओळख) तयार करण्याचे महत्वाचे काम अत्यंत सजगपणे केले गेले आहे. त्याचाच परिपाक म्हणून बेसबॉल, बास्केटबॉल, अमेरिकन फुटबॉल सारख्या अमेरिकन खेळांचा विकास झाला. ह्यातील बेसबॉल आणि बास्केटबॉल जगभर पोचले आहेत. अमेरिकन फुटबॉल ह्या खेळामध्ये अमेरिकन मानसिकतेचे प्रतिबिंब पडले आहे. शारिरीक सामर्थ्याबरोबर, बौद्धिक नीती, युक्ती आणि योजनेशिवाय हा सांघिक खेळ खेळणे अशक्य आहे. १०० यार्डच्या मैदानात तुम्हाला चेंडू तुमच्या विभागातून, प्रतिस्पर्ध्याच्या विभागाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचवल्या नंतरच गुण मिळतात. जरी खेळाडू मैदानावर सर्व शक्ती पणाला लावून झुंजत असले तरी (मैदान) पटावरचे डाव कसे टाकावे ह्यावर प्रशिक्षकाच्या रणनीतीचा कस लागत असतो. सर्व शक्तीनिशी प्रत्येक यार्डासाठी झुंजत असताना, प्रतिस्पर्धीही तेव्हढ्याच ताकदीने तुम्हाला थोपवण्याचे (मागे रेटण्याचे) हर प्रकारे उपाय करत असतो. तुम्हाला प्रत्येक पाऊलावर प्रत्येक यार्ड जिंकण्यासाठी स्वतःला सिद्ध करावेच लागते. परंतू गुण फक्त १०० यार्ड पार केल्यावरच मिळतात...!!! कला - क्रीडा - संस्कृती - जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अमेरिकन आयडेंटिटीचे प्रतिबिंब आणि त्याची केलेली जोपासना दिसून येते.

अमेरिकेची स्वातंत्र्य घोषणा, राष्ट्रगीत, अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या प्रतिज्ञापत्रावरील काही वाक्ये लक्षपुर्वक वाचा; व्यक्ती-स्वातंत्र्य, व्यक्ती-समानतेचा उद्घोष सर्वत्र केलेला दिसून येतो. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि समान असून, तिला तिच्या आनंदाचा मार्ग शोधण्याची मुभा देण्याचे आश्वासन हा देश देतो.

Declaration of Independence
All men are created equal, that they are endowed by their creator with certain unalienable rights, that among these are Life, Liberty and the pursuit of happiness.

American Anthem
Land of the free and the home of the brave.

Pledge of Allegiance
One nation under god, indivisible, with liberty and justice for all.

American Belief System
Liberty, Equality and Justice for all
People over government
Individualism
Volunteerism
Mobility
Growth
Patriotism
Progress
Diversity

अमेरिकन समाजमनाची भूमिका जेत्याची आहे, आपले जगातील सर्वोत्तम स्थान राखण्यासाठी जे कष्ट पडतील ते केलेच पाहिजेत, कितीही संकटे आली तरी आपण त्यावर मात करू ह्याचा विश्वास त्यात आहे. "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।" ची झलक त्यात नक्कीच आहे.

राष्ट्राच्या मुळ संकल्पना आणि धारणांचे प्रतिबिंब त्याच्या कायदे, न्यायिक प्रणालीमध्ये पडत असते. मुळ संकल्पनांना छेद देणारे कायदे सामाजिक कसौटीवर जास्त काळ टिकू शकत नाहीत आणि म्हणूनच अमेरिकन समाजमनाच्या मूळ संकल्पना आणि धारणा आधी समजून घेणे गरजेचे आहे.

पण अमेरिकन, अमेरिकन म्हणजे तरी काय? कारण भारत किंवा युरोपसारखी हजारो वर्षांची संस्कृती तर ह्या देशाला नाहीये. जे इथले नेटिव्ह!! होते, ते आधुनिक अमेरिकन संस्कृतीत सामावून गेले आहेत.
२४५ वर्षाची कारकीर्द असलेला हा देश आजही समुद्र-मंथनातून जातोय, पुढील काही काळ तरी जात राहील. अमेरिकन म्हणजे नक्की कोण? ह्या प्रश्नाला आजही; इथे सगळेच बाहेरून आलेले आहेत हे उत्तर दिले जाते. मग सगळेच स्थलांतरीत असतील तर नवीन / मागाहून आलेल्यांवर निर्बंध का?

इथे प्रत्येकाला संघर्ष करूनच गोष्टी पदरात पाडून घ्यायला लागतात. कुणीही दान पदरात टाकत नाही. परंतु तुमच्या संघर्षाला कालांतराने मान मिळतो, केलेले श्रम वाया जात नाहीत हे नक्की. हा आशावादच प्रत्येकाला त्याचे अमेरिकन ड्रीम चेस करायला भाग पाडतो..

https://en.wikipedia.org/wiki/List_of_U.S._states_by_date_of_admission_t...

https://www.hasdk12.org/cms/lib3/PA01001366/Centricity/Domain/854/Americ...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदर लेख. खूप आवडला.

अमेरिकन फुटबॉल ह्या खेळामध्ये अमेरिकन मानसिकतेचे प्रतिबिंब पडले आहे. शारिरीक सामर्थ्याबरोबर, बौद्धिक नीती, युक्ती आणि योजनेशिवाय हा सांघिक खेळ खेळणे अशक्य आहे. १०० यार्डच्या मैदानात तुम्हाला चेंडू तुमच्या विभागातून, प्रतिस्पर्ध्याच्या विभागाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचवल्या नंतरच गुण मिळतात.

अमेरिकन फुटबॉल हा प्रकार कधीच समजला नाही. पण लोक त्यासाठी अगदी क्रेझी म्हणावे असे होते हे बघितल्याचे आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

American Belief System
Liberty, Equality and Justice for all
People over government
Individualism
Volunteerism
Mobility
Growth
Patriotism
Progress
Diversity

हा हा हा.

बादवे, अमेरिकेची घटना हे आजमितीस इंग्रजी भाषेत आजतागायत निर्माण झालेले भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकांखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम फिक्शन आहे. (तेवढी ती दुसरी घटनादुरुस्ती सोडून - ती तेवढी खरी आहे. तेसुद्धा तुम्ही गौरवर्णीय असाल तर.)

- (अमेरिकन) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0