कोविडनंतरची चिनी डिप्लोमसी; मास्क, व्हॅक्सिन आणि मैत्री - डॉ. अविनाश गोडबोले

कोविडनंतरची चिनी डिप्लोमसी; मास्क, व्हॅक्सिन आणि मैत्री

डॉ. अविनाश गोडबोले

(डॉ. अविनाश गोडबोले जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये साहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) आहेत. ते चीनचे अंतर्गत राजकारण, परराष्ट्र धोरण ह्या विषयांचे अभ्यासक आहेत.)

कोविड-१९ विषाणूची साथ आत्ता पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. एकीकडे लसीकरणाची मोहीम सुरू असताना दुसरीकडे कोविडची तिसरी किंवा चौथी लाट येताना दिसत आहे. कोविड विषाणू चीनमधल्या हुबेई प्रांतातील वूहान शहरात किंवा त्याच्या आसपासच्या परिसरातील wet marketमध्ये नोव्हेंबर २०१९मध्ये सुरू झाला होता. आणि त्यानंतर मोठ्या वेगाने जगभर पसरला. कोविडने फक्त आजार आणि मृत्यूच झाले असे नसून अर्थव्यवस्था, समाजकारणे, आणि लाखो लोकांचे वैयक्तिक आयुष्य उध्वस्त केले. त्याबरोबरच कोविडमुळे उजव्या विचारसरणीच्या सरकारांना आणि कार्यपद्धतीला मजबुती मिळाली.

कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही आणि आताचे युरोपमधील चित्र बघता कोविड कधी संपेल हे सांगणे जवळपास अशक्य आहे. कोरोनाव्हायरस किंवा कोविड-१९ची सुरुवात चीनमध्ये झाली हे आता जगजाहीर आहे. ह्याविषयी कुठला विवाद बाकी असेल तर हाच, की हा विषाणू नैसर्गिक कारणामुळे पसरला आहे की कुठल्याशा प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांच्या निष्काळजीपणामुळे बाहेर आला. ​आणि​ डब्ल्यू. एच. ओ.च्या वूहान तपास भेटीनंतरही हे पूर्णतः स्पष्ट झालेले नाही. ​ एकूणच चीनमधील प्राण्यांच्या बाजारपेठांचे व्यवस्थापन ढिसाळ आहे. विलक्षण आणि विचित्र (unique and exotic) गोष्टींचे सेवन करणे ही सवय असल्यामुळे ह्या प्रकारच्या रोगाचे संक्रमण चीनमध्येच सुरू होईल असा अंदाजही अनेक संशोधनात मांडण्यात आला होता. तरीही ह्या बाजारांचे व्यवस्थापन ढिसाळच राहिले आणि त्याचे परिणाम सगळ्यांसमोर आज दिसत आहेत. 

ह्या जागतिक महामारीत आता २५ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत आणि इतर लाखो लोक जरी बरे झाले असले तरी या आजाराचे दूरगामी परिणाम भोगणार आहेत. कोविडचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक परिणाम कुठे आणि कसे दिसतील याचा अजून हिशोब मांडणेही सुरू झालेले नाही. या सर्व गोष्टींमुळे जागतिक स्तरावर चीनच्या प्रतिष्ठेचे बरेच नुकसान झाले आहे. ​कोविडच्या प्रसारानंतर सोशल मीडियात चीनबंदीपासून वंशभेदापर्यंतचे मेसेजेस पसरवले गेले होते आणि त्यात चीनविरोधी जनमताचे प्रदर्शन दिसून आले होते. 

असा विरोध तात्कालिक नसून हा विरोध जागतिक व्यापार आणि चीनच्या भूमिकेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते आणि चीन यातून बाहेर पडेल की नाही हा एक प्रश्नच आहे. जागतिक संदर्भ लक्षात घेतला तर कोविडमुळे चिनी सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाची कार्यपद्धती यातील त्रुटी उघडकीस आणल्या आहेत. आणि त्यामुळेच कोविड हे क्षि जिनपिंग सरकार आणि एकूणच चीनसाठी सर्वात महत्वाचे वैचारिक आव्हान बनले आहे ज्यामुळे चीनच्या जागतिक महासत्ता बनण्याच्या इच्छेला लगाम लागू शकतो. म्हणूनच कोविडनंतर चीनने आपली स्वत:ची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
चिनी राजकारणाच्या वाईट बातम्या लपवून ठेवण्याच्या सवयीमुळे कोविडच्या सुरुवातीच्या काळात खरं काय होतंय आणि त्याचे  लोकांवर काय परिणाम होऊ शकतील ही माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली नाही. चीनने सुरुवातीच्या काळात कोविड-१९च्या हाताळणीत दडपशाही आणि माहिती नियंत्रणासारखे उपाय वापरले होते. सुरुवातीच्या काळात खरी माहिती दडपली गेली आणि त्यामुळे त्याला उत्तर कसे द्यायचे हे समजण्यासाठी फार जास्त वेळ वाया गेला. प्रारंभिक काळात मानवी संसर्ग होत असल्याची माहितीदेखील लपवून ठेवली होती. हे असे का झाले याचे उत्तर चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीत आहे. जे काही कठीण आणि गैरसोयीचे आहे ते सर्व दडपणे आणि चांगली बातमी अधिक रंगवून सांगणे हे तिथले नेहमीचे काम आहे. राजकीय ​बढत्या​ आणि मोठी पदे मिळवण्यासाठी तिथले राजकारणी हे नेहमीच करत आले आहेत.

सप्टेंबर २०२०मध्ये युनायटेड नेशन्समध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा मांडला होता की चीनने जेंव्हा देशांतर्गत विमानप्रवास बंद केला त्याच वेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर कुठल्याही प्रकारची बंदी आणली नव्हती ज्यामुळे हा रोग वेगाने जगभर पसरला. कोविड-१९ला जागतिक महामारी घोषित करण्यात झालेल्या उशिरासाठी आणि चीनला योग्य वेळी योग्य ते प्रश्न न विचारण्याच्या गुन्ह्यासाठी जागतिक आरोग्य संघटना देखील तितकीच जबाबदार आहे. 

कोविडची सुरुवात ही अमेरिका-चीन व्यापार युद्ध चालू असतानाच झाली हा एक योगायोग जरी असला तरीही दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर परिणाम झाला आहे हे स्पष्टच आहे. भरीस भर म्हणजे २०२० हे अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकांचे वर्ष होते आणि ट्रम्प यांच्याकडून कोविड हाताळणीत निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट होते.  अमेरिकेतील कोविड बळींची संख्या १ लाख झाली तेंव्हा याचे परिणाम व्यापारयुद्धावर दिसून आले आणि त्यानंतरच्या निवडणुकीच्या वातावरणात चीनविरोधी मताने अधिकच जोर धरला.

अमेरिकेने केलेल्या बऱ्याच गोष्टी चीनचा उदय रोखण्यासाठीच आहेत असे आज चीनला वाटते. हुआवे आणि पाश्चिमात्य जगातील विवाद याचाच एक भाग आहे याविषयी चीनला काहीही शंका नाही. हुआवे चीनच्या वाढत्या ज्ञान आणि तंत्रज्ञानशक्तीचे एक मोठे उदाहरण आहे आणि हुआवे जर पाश्चिमात्य देशातील कंपनी असती तर त्याचे स्वागत झाले असते असा एक सूर चिनी मीडिया आणि सरकारमध्ये दिसून येतो.

'सिल्क रोड' किंवा 'बेल्ट आणि रोड' (Belt and Road Initiative - BRI) या नावाने चीनद्वारे राबवण्यात येणाऱ्या कनेक्टिव्हिटी उपक्रमात आरोग्यसेवा प्रकल्पांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे हा एक भाग समाविष्ट आहे. ​या योजनेनुसार चिनी आरोग्य मंत्रालय २०१५पासूनच चिनी परराष्ट्र धोरणाचा भाग बनले आहे, ​ज्याचा​ फायदा त्याला कोविडनंतर झाला आहे. ​​कोरोनानंतरच्या काळातील  ​होणारी टीका कमी करण्यासाठी चीनने ह्या विषयावर अधिकच भर दिला असून असे आंतरराष्ट्रीय सहकार्य अपरिहार्य का आहे याचा विचार पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. building a community of common destiny म्हणजेच सामायिक भविष्याची एकत्र (चिनी विचारांनुसार) बांधणी करणे हे चिनी परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ह्याद्वारे जागतिक विषयांवरचे पाश्चिमात्य जगाचे वर्चस्व आणि नेतृत्व कमी करण्याची चीनची इच्छा आहे. ह्यात जागतिक आर्थिक नेतृत्व, जागतिक सुरक्षाव्यवस्था, पर्यावरणबदल, विकासाची रणनीती, उर्जा धोरण, जागतिक मानदंड असे अनेक विषय समाविष्ट आहेत.  एका वाढत्या जागतिक महासत्तेच्या वाढत्या आकांक्षांच्या आलेखानुसार ही इच्छा असणे स्वाभाविक आहे. 

२०२०मध्ये कोविडला सामोरे जाणाऱ्या १३० देशांना चीनने कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत केली होती. ​​एकूण ४३ देशांत चीनची वैद्यकीय पथके गेली आणि त्यांनी कोविडची हाताळणी, त्याचे मापदंड आणि इतर विषयांवर स्थानिक डॉक्टर्सना प्रशिक्षण दिले. तरीही एकूणच ही मदत पूर्णतः नि:स्वार्थी मानसिकतेनं केली नव्हती. कोविडदरम्यान मदत केल्यास मदत प्राप्त करणारे देश नंतर 'बेल्ट आणि रोड'विषयी आपले विचार बदलतील ही आशा चीनने नक्कीच बाळगली होती. बीआरआयमध्ये मालाची वेगवान वाहतूक होणे हा एक मोठा मुद्दा आहे ​आणि कोविड-साहाय्य ज्या वेगाने पोहोचले त्याच वेगाने जर व्यापार झाला तर देशाचं स्थान value-added chainsमध्ये मजबूत होतं याची एक झलक ह्या देशांना बघायलाही मिळाली.

कोविडच्या सुरुवातीच्या काळातली चिनी मदतीची पद्धत 'मास्क डिप्लोमसी' या नावाने प्रसिद्ध झाली होती. म्हणजेच मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स वाटून (आणि प्राधान्य देऊन विकूनही) मैत्री वाढविण्याचे राज्यशास्त्र. आता चीन 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' वापरत आहे आणि ज्यात भारत आणि चीनमध्ये एक प्रकारची स्पर्धासुद्धा दिसत आहे. (भारताने लस पुरवठ्याबाबत आखलेल्या योजनेला व्हॅक्सिनमैत्री #VaccineMaitri असे नाव दिले आहे.)   

China Vaccine Diplomacy
(प्रतिमा आंतरजालावरून साभार)

​आंतरराष्ट्रीय समुदायात आपल्याला मिळणाऱ्या मान आणि दर्जाविषयीदेखील चीन अतिशय संवेदनशील आहे. स्वतःची ओळख एक जबाबदार आणि निःस्वार्थी आंतरराष्टीय सत्ता अशी व्हावी यासाठी चीन नेहमीच प्रयत्नशील असतो आणि त्याची कोविडनंतरची मुत्सद्देगिरी हे दर्शवते. त्या काळात त्यांची एकही कृती तात्कालिक (ad hoc) नव्हती तर प्रत्येक कृतीद्वारे ह्या जबाबदारीचा दर्जा कसा मजबूत होईल हे पाहिले गेले.
 ​
​चीनने डिसेंबरमध्ये सिनॉफार्म नंतर जानेवारीत सिनोवेक आणि आत्ताच अलीकडे कॅनसिनो आणि वूहान इन्स्टिट्यूटच्या लसींना वापरासाठी मंजुरी दिली आहे.  डिसेंबर​ २०२०मध्ये बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती यांनी चीनमध्ये तयार झालेल्या ​sinopharm कोव्हिडच्या लशीला मान्यता दिली. ​​​​त्यानंतर इजिप्त, इंडोनेशिया, तुर्कस्तान आणि ब्राझील या देशांनी जानेवारीत ह्या लशीच्या ​वापरासाठी मान्यता दिली. दक्षिणपूर्व आशियात इंडोनेशिया चिनी लस स्वीकारणारा पहिला देश ठरला. ​अल्जेरिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलँड, फिलिपिन्स, पाकिस्तान, ब्राझील, युक्रेन आणि सर्बिया ह्या देशांसहित एकूण २४ देशांनी चीनकडे लस पुरवठ्यासाठी व्यावसायिक ऑर्डर्स दिल्या आहेत. चीन ह्या लसी व्यावसायिक आणि साहाय्य तत्त्वांवर पुरवणार आहे. 

​दक्षिण आशियातील पाकिस्तान वगळता इतर देशांनी आतापर्यंत चीनला लसीसाठी ऑर्डर दिलेल्या नाहीत. ​दुसरीकडे, मेड-इन-इंडिया लस अफगाणिस्तान​,​ मालदीव आणि नेपाळसह भारताच्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. ​ तसेच ही लस आता कॅनडा, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि युरोपमध्येदेखील पोहोचलेली आहे.

कुठलीही दुर्घटना, उदा. महापूर किंवा भूकंप किंवा विमान अपघात घडल्यास ​मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण​ करणे यात चीन अलीकडे मोठा पुढाकार घेताना दिसतो. यात तीन प्रकारचे फायदे असतात. आपले सैन्य किती लवकर आणि किती सफाईदारपणे तैनात करता येते आणि त्याची तयारी काय याचा अभ्यास करता येतो. दुसरा म्हणजे त्यानंतरच्या कामात अधिक सहभाग घेऊन आर्थिक आणि मुत्सद्दी प्रभाव वाढवता येतो आणि आणि मैत्रीशील आणि कार्यतत्पर अशी प्रतिमा निर्माण करता येते. 

कोविडनंतरच्या चीनच्या कामामुळे चीनला हे सगळे फायदे तर नक्कीच होत आहेत पण त्याबरोबरच कोविडसाठी जबाबदार असल्याची सामाजिक आठवण पुसून टाकायलादेखील याचा फायदा होईल अशी आशा चीनला नक्कीच आहे. ​

field_vote: 
0
No votes yet

अशा पद्धतीचे सखोल विश्लेषण कुठेही वाचनात आले नव्हते.
गोडबोले साहेबांचे आभार !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. चीनच्या हुआवे या कंपनीला पाश्चिमात्य देशात असलेला आक्षेप हा , त्यांच्या मोबाईल फोन मधल्या विशिष्ट फीचर द्वारे ते तुमच्यावर हेरगिरी करू शकतात, याला आहे. हे फीचर पाश्चिमात्य देशात तिथल्या कंपन्यांकडूनही आणले गेले तर त्याबद्दलही अर्थातच गहजब होईल. २. चीन मध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या कंपन्यांची बौद्धिक संपदा त्यांच्याकडून सक्तीने शेअर करून घेतली जाते हा अनुभव अनेक पाश्चात्य कंपन्यांचा आहे. अशा बौद्धिक संपदेच्या चोरीने त्या कंपनीच्या धंद्याचा मुख्य आधारच नष्ट होऊ शकतो. ३. चीनला जर जगात प्रतिष्ठा हवी असेल तर त्यांनी प्रथम त्यांच्याकडून होत असलेले मानवी हक्कांचे चाललेले प्रचंड उल्लंघन थांबवावे. केवळ कोव्हिड चा उल्लेख केला म्हणून अनेकांना 'गायब" करण्यात आले आहे. फालुन गॉन्ग , तिबेट, वीगर हे विषय तर सर्वज्ञातच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

चीनला जर जगात प्रतिष्ठा हवी असेल तर त्यांनी प्रथम त्यांच्याकडून होत असलेले मानवी हक्कांचे चाललेले प्रचंड उल्लंघन थांबवावे.

पण मानवी हक्कांचे उल्लंघन न थांबवताच प्रतिष्ठा हवी असते, सगळ्याच देशांना Smile
आणि, लेखात हे उल्लेख आले आहेत ते चिनी मीडिया आणि सरकारमध्ये काय दिसून येतं याविषयी आहेत. इतर अनेक देशांवरही अशा प्रकारची टीका जर परदेशात झाली तर देशांतर्गत ती रुचत नाही (मग मुद्दे रास्त असले तरीही) असाच अनुभव आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेख आवडला. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.