आजचे दिनवैशिष्ट्य - १८
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
Taxonomy upgrade extras
गॉसिनी
'अॅस्टेरिक्स'चा जनक चित्रकार रने गॉसिनी (१९७७)
खरे तर हे "'ॲस्टेरिक्स'च्या जनकद्वयांपैकी एक" असे पाहिजे. परंतु, त्याहूनही मोठी घोडचूक म्हणजे, 'ॲस्टेरिक्स'च्या जनकद्वयांपैकी, गॉसिनी हा चित्रकार (कधीही) नव्हता. गॉसिनीने स्वत:स पूर्णपणे 'ॲस्टेरिक्स'च्या कथा-संवाद-शब्दांकन यांना वाहून घेतले होते, तर सहजनक उदेर्झो हा चित्रकार होता; (निदान सुरुवातीच्या काळात तरी) चित्रे काढण्याचे खाते पूर्णपणे उदेर्झोकडे होते, नि उदेर्झोने चित्रे काढण्यास स्वत:स पूर्णपणे वाहून घेतलेले होते.
(पुढे गॉसिनी अकाली नि अचानक वारल्यानंतर, चित्रे काढण्याबरोबरच कथा-संवाद-शब्दांकन यांचीसुद्धा धुरा उदेर्झोच्या खांद्यांवर येऊन पडली.)
सारांश, गॉसिनी हा चित्रकार कधीही नव्हता. अर्थात, 'दिनवैशिष्ट्यां'मधील गलथानपणा हे आता 'ऐसी'चे वैशिष्ट्य झालेले आहे; त्यात आश्चर्यजनक असे काहीही वाटत नाही. परंतु, फ्रेंच गोष्टींमध्येसुद्धा असला गलथानपणा व्हावा, ही मात्र आश्चर्याची बाब आहे.
…
'ॲस्टेरिक्स'चा रेखाटनकार आणि लेखक अल्बर्ट उदेर्झो (२०२०)
दखल घेतली गेली, याबद्दल परमेश्वराचे आभार आहेत!
- रेखाटनकार: चेक.
- लेखक: चेक. (मात्र, मूळ लेखक रेने गॉसिनीच्या अकाली मृत्युपशचात, उर्वरित मालिकेकरिता.)
(अवांतर: या मालिकेच्या दोन्ही मूळ जनकांच्या (रेने गॉसिनीच्या तथा आल्बेर (आल्बेर्तो?) उदेर्झोच्या) मृत्युपश्चातसुद्धा ही मालिका अद्याप चालू आहे. उदेर्झोने त्याच्या वृद्धापकाळी, त्याच्या मृत्यूच्या काहीच वर्षे अगोदर, या मालिकेची धुरा एका पूर्णपणे नव्या (तथा तरूण) लेखक-रेखाटनकार जोडगोळीच्या खांद्यांवर सोपविली, तथा या मालिकेतून आपले अंग पूर्णपणे काढून घेतले. त्यामुळे, आता वेगळेच लोक ही मालिका चालवितात. (तो दर्जा, ती उत्स्फूर्तता आता राहिली नाही, परंतु तरीही, काहीकाही अंक अजूनही चांगले आहेत; नव्हे, उत्कृष्ट आहेत. परंतु, आता it’s a hit or a miss. अर्थात्, उदेर्झोच्या कारकीर्दीतसुद्धा अखेरीअखेरीस हे होऊ लागले होतेच म्हणा. चालायचेच. कालाय तस्मै नमः!)
(अतिअवांतर: ही मालिका मुळात फ्रेंचमध्ये आहे. त्यात पुन्हा मध्यंतरी या मालिकेचे इंग्रजीत (उत्कृष्ट) रूपांतर करणारे मूळ (ब्रिटिश) भाषांतरकारसुद्धा निधन पावले. (Anthea Bell & Derek Hockridge.) तशी फारा वर्षांपूर्वी Robert Steven Caron नावाच्या एका इसमाने या मालिकेची अमेरिकन-इंग्रजी आवृत्ती काढण्याचासुद्धा प्रयत्न केला होता, म्हणा; परंतु, (अमेरिकनांच्या सदभिरुचीच्या अभावामुळे) ती आवृत्ती फारशी न चालल्याकारणाने बंद पडली. तसाही त्या आवृत्तीचा दर्जा ब्रिटिश भाषांतरांच्या तुलनेत अगदीच सुमार होता. अलीकडे (या मालिकेची धुरा नवोदितांच्या खांद्यांवर पडल्यानंतर) पुन्हा या मालिकेस नवे इंग्रजी (ब्रिटिश तथा अमेरिकन) भाषांतरकार लाभले आहेत. (नव्या अंकांची) ब्रिटिश भाषांतरे (जुन्या ब्रिटिश भाषांतरकारांची सर कदाचित नसली, तरीही) अद्यापही सरस आहेत; उलटपक्षी, (जुन्या तथा नव्या अंकांच्या) नव्या अमेरिकन भाषांतरांचा दर्जा कित्येक पटींनी सुधारला जरी असला, तरीही, (जुन्या किंवा नव्या) ब्रिटिश भाषांतरांची सर त्यांना नाही.)
उच्चार: शंका
१६४० : पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगालच्या राजेपदी.
अधोरेखित शब्द हा Joãoच्या देवनागरी ट्रान्सलिटरेशनचा प्रयत्न असावा, अशी शंका येते. (चूभूद्याघ्या.)
तसे असल्यास:
१. रोमन लिपीतील Jचा उच्चार स्पॅनिश नियमांप्रमाणे 'ह' असा होतो खरा; परंतु, तसा तो (शेजारच्याच प्रदेशातली भाषा असली, तरीही) पोर्तुगीजमध्येसुद्धा होतो काय? (माझ्या कल्पनेप्रमाणे होत नसावा. पोर्तुगीज नियमांप्रमाणे, माझ्या अंदाजाप्रमाणे, त्या नावाचा उच्चार 'जुआंव' असा व्हावा. (चूभूद्याघ्या. याबद्दल अधिक तपास करून खात्री करून घ्यावी लागेल. ãचा उच्चार सानुनासिक व्हावा.))
२. उलटपक्षी, (त्यापूर्वी पोर्तुगाल हे स्पेनचे अंकित राष्ट्र असल्याकारणाने) स्पॅनिश नियमांप्रमाणे ट्रान्सलिटरेशन केले असावे, म्हणावे, तर हे अनेक कारणांकरिता शक्य नाही.
२अ. रोमनच्या स्पॅनिश आवृत्तीत ã असे अक्षरचिन्ह नाही. रोमनच्या स्पॅनिश आवृत्तीत nच्या डोक्यावर टिल्डा (~) बसू शकतो (जसे: ñ, उच्चारी: न्य.); मात्र, (पोर्तुगीज आवृत्तीप्रमाणे) aच्या टाळक्यावर तो बसू शकत नाही. (उलटपक्षी, पोर्तुगीज आवृत्तीत तो स्पॅनिश आवृत्तीप्रमाणे nच्या मस्तकावर आरोहण करू शकत नाही; मात्र, aकरिता तो शिरोधार्य असू शकतो, नि अनुनासिकासमान ठरतो.)
२ब. पोर्तुगीजमधील João या नावाचे स्पॅनिशमध्ये Juan (उच्चारी: हुआन) असे रूपांतर होते. त्यामुळे, स्पॅनिश नियमांप्रमाणे लिहायचे अथवा ट्रान्सलिटरेट करायचे असते, तर हे नाव Juan असे लिहावे (तथा हुआन असे ट्रान्सलिटरेट करावे) लागले असते. (स्पॅनिशमधील Juan, पोर्तुगीजमधील João, इंग्रजीतील John, फ्रेंचमधील Jean (उच्चारी: जाँ? चूभूद्याघ्या; याबद्दल येथील फ्रेंचतज्ज्ञच खात्रीलायक काय ते सांगू शकतील.), जर्मनमधील Johann (उच्चारी: योहान), अरबीतील यूहन्ना अथवा याह्या, ही सर्व एकाच नावाची विविध भाषांतील रूपे आहेत. अधिक माहितीसाठी येथे तथा येथे पाहा.)
सांगण्याचा मतलब, होआव हे कोठल्याही परिस्थितीत निखालस चुकीचे आहे. सबब, कृपया अधिक तपास करून दुरुस्त करणार काय?
इजा झाला, बिजा झाला, तिजा…
२०३२?
यापूर्वी २०१४मध्ये एकदा आणि २०१८मध्ये दुसऱ्यांदा सांगून झालेले आहे; आज तिसऱ्यांदा सांगतोय
लुई पाश्चर
लुई पाश्चरचा आज २००वा वाढदिवस. या निमित्तानं मटामध्ये पाश्चर आणि लिस्टर यांच्या मैत्रीबद्दल आलेला लेख -
मानवी सुरक्षेची वैज्ञानिक मैत्री
मॅक्डॉनल्ड्स…
कालच्या ‘दिनवैशिष्ट्यां’त पुढील बातमी होती:
(३० जानेवारी) १९९० : रशिआत पहिले मॅकडोनाल्ड्स खुले. १५,००० लोक रांगेत ताटकळले.
आजच्या ‘दिनवैशिष्ट्यां’त पुढील बातमी आहे:
(३१ जानेवारी) १९९० : मॉस्कोमध्ये पहिले 'मॅकडोनाल्ड्स' उघडले.
यावरून पुढील प्रश्न निर्माण होतात:
१. ३० जानेवारी १९९० रोजी उघडलेले रशियातील पहिलेवहिले मॅक्डॉनल्ड्स हे मॉस्कोव्यतिरिक्त इतरत्र उघडले होते काय?
२. त्याच्याच पुढच्या दिवशी, ३१ जानेवारी १९९० रोजी, मॉस्कोतसुद्धा (मॉस्कोतील पहिलेवहिले) मॅक्डॉनल्ड्स उघडले काय?
बाकी, मॅक्डॉनल्ड्सला ‘मॅकडोनाल्ड्स’ म्हणणाऱ्या/रीच्या बैलाला घो! (नशीब ‘मॅकडोलांड’ लिहिले नाही!)
पार्सिंग/वाक्यरचना…
१९९६ : कोलंबोमध्ये तमिळ अतिरेक्यांनी स्फोटके भरलेला ट्रक सेंट्रल बँकेच्या दारात उडवला; ९१ ठार; १,४०० जखमी.
ट्रकमध्ये स्फोटके तमिळ अतिरेक्यांनी कोलंबोमध्ये भरली, हे व्यवस्थित कळले. परंतु,
१. ट्रक उडवला नक्की कोणी?
२. ज्या सेंट्रल बँकेच्या दारात ट्रक उडवला, ती सेंट्रल बँक नक्की कोणत्या गावची?
५ फेब्रुवारी
जन्मदिवस: अभिनेता अभिषेक बच्चन (१९७६)
अभिषेक बच्चन ही इतकी महत्त्वाची व्यक्ती आहे काय, की जेणेकरून त्यांच्या जन्मदिवसाची 'दिनवैशिष्ट्यां'त नोंद व्हावी?
(उलटपक्षी, याच तारखेस नि आजच झालेल्या श्री. परवेज़ मुशर्रफ यांच्या निधनाची 'ऐसी'ने दखल घेतलेली दिसत नाही. चालायचेच.)
??
१९९९ : कोसोव्हो युद्धात युगोस्लाव्हियामध्ये बाँब टाकल्यामुळे नाटोचा युद्धात प्रथम प्रत्यक्ष समभाग.
समभाग??????
बोले तो, बाँब टाकून नाटोने युद्धाचे शेअर्स विकत घेतले काय?
(बहुधा सहभाग म्हणायचे असावे. परंतु, अर्थात, ‘ऐसी’कडून याहून बऱ्याची अपेक्षा नाही.)
(आणि आम्हीदेखील कसले दळभद्री! संध्याकाळची चढविल्यावर१ आम्हाला असल्याच गोष्टी प्रकर्षाने, पहिल्याप्रथम, लख्ख दिसतात.)
—————-
१ बोले तो, आम्ही रोज संध्याकाळी चढवीत नाही. (नाहीतर ‘दिनवैशिष्ट्य’कारांची धडगत नव्हती!) परंतु, जेव्हा केव्हा संध्याकाळी चढवितो, तेव्हा असल्या घोडचुका प्रकर्षाने जाणवितात! (शुद्धीत असतानासुद्धा जाणवितात; परंतु, शुद्धीत असताना क्वचित्प्रसंगी आम्ही त्यांजकडे दुर्लक्षसुद्धा करू शकतो. परंतु, चढविलेली असताना? Absolutely no tolerance!) (अर्थात, Not that I owe anybody an explanation, परंतु तरीही.)
!!!
१९९९ : कोसोव्हो युद्धात युगोस्लाव्हियामध्ये बाँब टाकल्यामुळे नाटोचा युद्धात प्रथम प्रत्यक्ष समभाग.
अगोदर एकदा लक्षात आणून देऊनसुद्धा ही भयंकर घोडचूक अद्याप दुरुस्त करण्यात आलेली नाही. काय म्हणावे?
(या दराने, कदाचित, ही चूक दुरुस्त होण्याअगोदर आमची गेलेली श्रेणिसुविधा परत येईलसुद्धा; कोणी सांगावे?)
टिनटिन’चा जनक
टिनटिन’चा जनक हर्जे (१९०७)
'एर्जे', नव्हे काय?
या सद्गृहस्थाचे खरे नाव जॉर्जऽ रेमी (Georges Remi); आद्याक्षरे (उलट्या अनुक्रमाने) RG ((फ्रेंचमध्ये) उच्चारी एर् जे), म्हणून याचे टोपणनाव एर्जे. (बेल्जियन सद्गृहस्थ; फ्रेंचभाषक.) इतका साधा मामला आहे हा.
फ्रेंच उच्चारांच्या बाबतीतसुद्धा 'ऐसीअक्षरे'च्या 'दिनवैशिष्ट्यां'त घोडचुका होऊ लागल्या, बोले तो लानत आहे. संबंधितांकरिता शरमेची बाब आहे. (उद्या त्या दुसऱ्या सुप्रसिद्ध (काल्पनिक) फ्रेंचभाषक बेल्जियन सद्गृहस्थाचे नाव 'पॉयरॉट' म्हणून लिहाल! काही सांगवत नाही.)
असो चालायचेच.
(खरे तर 'टिनटिन' म्हणजेसुद्धा मुळात (फ्रेंचमध्ये) 'तँतँ'; परंतु, इंग्रजीभाषक जगतात त्याचा 'टिनटिन' हाच उच्चार प्रचलित असल्याकारणाने चालून जाते.)
सर्वांना
सर्वांना
नवरात्रीच्या शुभेच्छा !
'शनाल'??????
फॅशन डिझायनर आणि शनाल ब्रँडची निर्माती कोको शनाल (१९७१)
Chanelमधल्या eचा उच्चार 'आ' फ्रेंचच्या नक्की कोणत्या नियमानुसार व्हावा बरे?
फ्रेंचमध्ये eचा उच्चार 'आ' होण्याकरिता गेला बाजार त्या eपुढे एखादे अनुनासिक कडमडावे लागत नाही काय?
----------
इथे पाहा. उच्चार 'कोको शनेल' असा असल्याचे म्हटले आहे.
चोप्य-पस्ते
१९७१ : नाईल नदीवरच्या आस्वान धरणाचे लोकार्पण.
इथे जानेवारी महिन्यातल्या सगळ्या दिवसांचं दिनवैशिष्ट्य दिसेल.
कारण!
१९६६ : एअर इंडियाचे विमान आल्प्स पर्वतराजीत कोसळले. ११७ ठार. त्यात वैज्ञानिक होमी भाभा यांचा मृत्यू.
कोसळले, की डोंगरावर जाऊन आदळले? (अर्थात, डोंगरावर जाऊन आदळल्यावर gravity would have taken its course आणि विमान त्यानंतर कोसळले असणारच, परंतु, 'म्हशीच्या मृत्यूचे कारण "मोटारीखाली सापडून"च्या ऐवजी "बुडून"' असे नोंदविले जाऊ नये, इतकेच.)
इंजिनसहित सर्व उपकरणे
इंजिनसहित सर्व उपकरणे व्यवस्थित चालू असताना, सर्व कंट्रोल्स हातात आणि व्यवस्थित ऑपरेट होत असताना, विमानात कोणताही तांत्रिक दोष नसताना पायलटने विमान जमिनीवर आदळणे, पाडणे, पडू देणे, पडण्यास कारणीभूत होणे.
यात मोजण्यातील चूक, अंदाज चुकणे, इम्पल्सिव्ह निर्णय, थकवा आणि अनेक कारणे असू शकतात. या १९६६ वाल्या फ्लाईटबाबतीत पायलटला असे वाटले की माँ ब्लों (उच्चारी चुभूदेघे) पर्वत आपण पर केला आहे, आणि त्याने आधीच खाली उतरायला सुरुवात केली
दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि चिल्लरखुर्दा
प्रस्तुत अपघातानंतर पन्नासेक वर्षांनी सापडलेले अनपेक्षित अवशेष: https://www.bbc.com/news/magazine-26436090
It's a plot line that wouldn't be out of place in a Tintin comic - a French mayor, an Alpine climber, a historian, a wealthy Jewish stone merchant from London, and their tenuous connections to a bag of lost jewels discovered on the peak of Mont Blanc.
. . .
The London-based Issacharoff family are not the only claimants to the jewels. Another set of Issacharoffs from Spain - no relation, but apparently also stone merchants - are reportedly approaching the French authorities in an attempt to gain access to the letter that Francoise Rey speaks about.
Bouquin, of the Mayor's office, says he has seen the packaging in which the stones were found, but it is not necessarily possible to make out a name from it.
"Maybe we might be able to identify the name on the parcel, but it is very hard to see. It has been 50 years beneath the ice."
अवांतर: Bizarrely, this was the second Air India crash in the same area. Sixteen years earlier another plane, a Constellation known as the Malabar Princess, had gone down on the mountain, also on its approach to Geneva. So the wreckage of two aircraft is scattered over the area.
'ब्रिटिश इंडिया ॲक्ट'??????
१९३५ : 'ब्रिटिश इंडिया अॅक्ट'न्वये भारताला संघराज्यात्मक दर्जा मिळाला.
१९३५ साली पारित झालेल्या संबंधित कायद्याचे अधिकृत नाव 'गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९३५' असे होते ना? हा 'ब्रिटिश इंडिया ॲक्ट' कोठून आला?
दुसरे म्हणजे, या ॲक्टान्वये हिंदुस्थानला संघराज्याचा दर्जा कधीपासून मिळाला? हं, पुढेमागे कधीतरी 'फेडरेशन ऑफ इंडिया' स्थापित करण्याची तरतूद ('प्रस्ताव' म्हणा ना!) या कायद्यात होती खरी, परंतु प्रत्यक्षात ही तरतूद कधीच अंमलात आणली गेली नाही. विकीवरील माहितीनुसार:
Unlike the provincial portion of the Act, the federal portion was to go into effect only when half the states by weight agreed to federate. This agreement was never reached, and the federation's establishment was indefinitely postponed after the outbreak of the Second World War. The federal part of the Act only entered into effect in modified form, separately in respect of the Dominion of India and Dominion of Pakistan, pursuant to the Indian Independence Act 1947.
(प्रत्यक्षात ही तथाकथित 'फेडरल' तरतूद हिंदुस्थानकरिता कशी 'पॉयझन पिल' होती, याचे विवेचन विकीवरच येथे वाचावयास मिळेल.)
(माझ्या त्रोटक नि ऐकीव माहितीप्रमाणे, 'पुण्याच्या मंडईत अंजिराचे भाव काय आहेत सध्या?' हा सुप्रसिद्ध प्रश्न पु.लं.नी न.वि.गाडगिळांना न.चिं. केळकरांना याच 'फेडरेशन'च्या मुद्द्याच्या संदर्भात विचारला होता. असो.)
बोथा
३ फेब्रुवारी १९८९: दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे श्वेतवर्णी राष्ट्राध्यक्ष पी.डब्ल्यु. बोथांचा राजीनामा.
आँ!!!!!!
आम्ही तरी एफ. डब्ल्यू. डीक्लर्क असे कायसेसे नाव ऐकले होते ब्वॉ.
(हं, आता, हे डीक्लर्कमहोदय ब्लॅकफेस लावून हिंडत असल्यास कल्पना नाही — निदान, आमच्या तरी वाचनात तसे कधी आले नाही. मात्र, कितीही ब्लॅकफेसने झाकले, तरीही पांढरे कातडे उगवल्यावाचून राहात नाही, म्हणतात. असो चालायचेच.)
——————————
किंबहुना, ‘दिनवैशिष्ट्यां’तील वरील नोंदीत (अपेक्षेप्रमाणे) असंख्य घोडचुका आहेत. या संदर्भात योग्य माहिती (बरीचशी विकीवरून संकलित केलेली) पुढीलप्रमाणे:
- सर्वप्रथम, पी. डब्ल्यू. बोथा हे दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे श्वेतवर्णी राष्ट्राध्यक्ष किंवा अपार्थाइड राजवटीचे अखेरचे राष्ट्राध्यक्ष यांपैकी काहीही नव्हेत. अगोदर म्हटल्याप्रमाणे, दोन्ही मान(?) श्री. एफ. डब्ल्यू. डीक्लर्क यांना जातात.
- दुसरे म्हणजे, ३ फेब्रुवारी १९८९ रोजी श्री. पी. डब्ल्यू. बोथा यांनी जो राजीनामा दिला, तो राष्ट्राध्यक्षपदाचा नव्हे, तर केवळ (सत्ताधारी) पक्षाध्यक्षपदाचा. (खरे तर (विकीवरील माहितीप्रमाणे) ३ फेब्रुवारीला नव्हे, २ फेब्रुवारीला, परंतु ते असो. घोडचुकांच्या या मांदियाळीत एका दिवसाच्या एवढ्याश्या फरकाने काय फरक पडतो? सबब, तो फरक सोडून देऊ.) मात्र, राष्ट्राध्यक्षपदी ते कायम राहिले.
- त्यापुढे, मार्च १९८९मध्ये त्यांच्या पक्षाने राष्ट्राध्यक्षपदाकरिता श्री. डीक्लर्क यांची निवड केली; मात्र, त्या वेळेस श्री. बोथा यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडण्यास (राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास) नकार दिला; त्याचबरोबर, मार्च १९९०पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा आपला घटनादत्त अधिकार असल्याचाही दावा केला. त्यानंतर झालेल्या वाटाघाटींत, तडजोड म्हणून, श्री. बोथा यांनी सप्टेंबर १९८९मध्ये होणाऱ्या पुढील निवडणुकींपर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहावे, आणि त्यानंतर ‘निवृत्त’ होऊन, श्री. डीक्लर्क यांना राष्ट्राध्यक्षपदी रुजू होऊ द्यावे, असे ठरले.
- मात्र, १४ ऑगस्ट १९८९ रोजी, काही राजकीय कुरबुरींच्या निमित्ताने, श्री. बोथा यांनी तडकाफडकी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला, आणि श्री. डीक्लर्क यांची सुरुवातीस हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून, आणि त्यानंतर महिन्याभराने नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. श्री. डीक्लर्क यांच्या राजवटीत पुढे हळूहळू अपार्थाइड शासनपद्धतीच्या समाप्तीस सुरुवात होऊन मतदान आणि निवडणुका सर्व वंशांच्या नागरिकांकरिता खुल्या झाल्या, आणि १९९४ साली झालेल्या पुढील निवडणुकीत श्री. नेल्सन मंडेला यांचा पक्ष बहुमताने निवडून येऊन श्री. मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले. आणि अशा रीतीने श्री. डीक्लर्क हे दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष तथा अपार्थाइड राजवटीखालील अखेरचे राष्ट्राध्यक्ष ठरले. (पुढे श्री. मंडेला यांच्या राजवटीत त्यांनी (श्री. थाबो म्बेकी यांच्यासमवेत) सह-उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काही काळ पदभार सांभाळला.)
असो चालायचेच.
१८ फेब्रुवारी (संकीर्ण)
आधुनिक बॅटरीमागचं तत्त्व शोधणारा भौतिकशास्त्रज्ञ अलेस्सांद्रो व्होल्टा (१७४५)
विद्युत्घट (बॅटरी, किंवा खरे तर इलेक्ट्रिक सेल) या संकल्पनेचा शोध व्होल्टाने लावला, हे बरोबर. मात्र, आधुनिक बॅटरीमागील तत्त्व त्याने शोधले, असे म्हणणे कितपत सयुक्तिक आहे?
व्होल्टाचे जे काँट्रॅप्शन होते, ते म्हणजे एका काचेच्या भांड्यात सल्फ्यूरिक ॲसिड, त्यात एक तांब्याची आणि एक जस्ताची काडी बुचकळलेली, नि त्या दोन काड्यांना तारा जोडलेल्या, असला प्रकार होता. (एकंदरीत, अवजड, आणि हिंडताना वगैरे बरोबर बाळगायला अत्यंत धोकादायक (सल्फ्यूरिक ॲसिडमुळे) असले प्रकरण होते ते.) आधुनिक विद्युत्घटाची संरचना तथा घटना (म्हणजे, घटक वगैरे) याहून पूर्णपणे वेगळी असते.
(अवांतर: एकच विद्युत्घट असेल, तर तो सेल. अनेक विद्युत्घट एकमेकांना (श्रेणीमध्ये किंवा समांतर) जोडले, तर जे बनते, ती बॅटरी.)
१९२६ : युकातान (मेक्सिको) येथे माया संस्कृतीतील पाच शहरांचा शोध.
ही पाच शहरे म्हणजे नक्की कोणती?
१९३० : प्लुटो ग्रहाचा शोध.
पण… प्लूटो तर ग्रह नाही, म्हणून ठरले ना?
वचन?
१६७९ : सम्राट औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
प्रस्तुत हिंदूचे नाव, गाव, पत्ता काही समजू शकेल काय?
आणि, फक्त एकाच (अनामिक) हिंदूवर लावला, तर त्याबद्दल आजतागायतसुद्धा इतकी बोंब का मारून राहिलेत हिंदुत्ववादी लोक?
की (चेन्नईच्या) ‘हिंदू’ वर्तमानपत्रावर लावला, असे म्हणायचे आहे? (तरीसुद्धा, ‘हिंदू’ वर्तमानपत्राचे मालक-चालक नि औरंगजेब, आपापसात पाहून घेतील ना काय ते! हिंदुत्ववाद्यांना काय पडलेय त्याबद्दल?)
भूस्थिर??????
१९ एप्रिल
१९७५ : 'आर्यभट्ट' हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह रश्याच्या साहाय्याने अवकाशात सोडला गेला.
‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह: बरोबर. (मी प्राथमिक शाळेत असताना ‘आज की ताज़ा ख़बर’ होती ही!)
‘रश्या’च्या साहाय्याने: ‘रश्या’ची आता सवय झाल्याकारणाने ‘रश्या’बद्दल खुसपट काढणार नाही, परंतु, तत्वतः, हे साहाय्य रशियाचे नसून सोविएत संघाचे होते. परंतु, तेही एक वेळ सोडून देऊ.
पण… पण… पण… हा उपग्रह भूस्थिर नव्हता हो!!! उगाच उत्साहाच्या भरात वाटेल ते ठोकून देऊ नका!!!
(नक्की खात्री नाही, परंतु भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह बहुधा १९८१ साली सोडलेला ‘ॲपल’ (APPLE - Ariane Passenger PayLoad Experiment) हा असावा. (चूभूद्याघ्या.))
——————————
आणखी दुरुस्ती: या उपग्रहाचे नाव, झालेच तर ज्या प्राचीन भारतीय गणिती-ज्योतिर्विदाचे नाव या उपग्रहास दिले गेले, त्या गणिती-ज्योतिर्विदाचे नाव, हे ‘आर्यभट्ट’ असे नसून ‘आर्यभट’ असे होते.
सायगॉन
३० एप्रिल
१९७५ : सायगाववर कम्युनिस्ट फौजांचा ताबा. व्हिएतनाम युद्धाची अखेर.
सायगाव??????
Saigon हे नाव संस्कृतोद्भव नसावे!!! (चिनी-उद्भव असण्याची शक्यता अधिक. (चूभूद्याघ्या.))
——————————
तसेच, Chittagongचे देवनागरीकरण ‘चितगाव’ करणारे डोक्यात जातात! (इंग्रजांची री ओढून) ‘चिट्टगाँग’ असे (अपभ्रष्ट) रूप न लिहिणे समजू शकतो, परंतु, ‘शुद्ध’ लिहिण्याची एवढीच जर का पडलेली असेल, तर मग एक तर (‘अधिकृत’ बंगालीतल्याप्रमाणे) ‘चट्टग्राम’ असे तरी लिहा, नाही तर मग (चट्टग्रामीय स्थानिकांप्रमाणे) ‘चाटगांव’ असे तरी लिहा. परंतु, हे ‘चितगाव’ काय आहे? (त्यापेक्षा मग ‘चिट्टगाँग’ काय वाईट?)
'री' बोले तो...
...'सारेगमपधनि'मधील 'रे' हा स्वर. (त्याला विकल्पाने 'री' असेही म्हणतात. ('रिषभ'चा संक्षेप?))
दात्यांच्या शब्दकोशातून:
री rī —स्त्री. १ गायनांतील स्वरसप्तकांपैकीं दुसरा स्वर. २ मुख्य गायकाचें गायन चाललें असतां त्याचा हस्तक किंवा साथी- दार त्याच्या मागोमाग त्याचेच सूर म्हणत जातो ते. (क्रि॰ नेणें; धरणें; ओडणें). [ध्व.] ॰ओढणें-१ दुसर्याच्या सुरांत सूर मिळविणें. २ दुसर्याच्या म्हणण्यासारखेंच म्हणणें; पुनरुच्चार करणें.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
आज सव्वाशे वर्षांनंतर (१२३ वर्षांनंतर, to be precise) त्या महाविद्यालयाची काय प्रगती आहे, कुणाला ठाऊक आहे का?
विकीवर याची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे, पण ठिकाण दिलेले नाही.
On 5 May 1901, Pandit Vishnu Digambar Paluskar founded the Gandharva Mahavidyalaya, a school to impart formal training in Indian classical music with some historical Indian Music.
२ जून १९६६चे मंगळयान???
१९६६ - मंगळावर पहिले अवकाशयान उतरले.
हे कोठले?
व्हायकिंग-१ तर माझ्या आठवणीप्रमाणे १९७०च्या दशकाच्या मध्याच्या आसपास कधीतरी (१९७५? १९७६? नक्की साल नि तारीख विकीवर पडताळून सांगतो, परंतु बहुधा १९७६.) मंगळावर उतरले. बराच गाजावाजा झाला होता तेव्हा, मला चांगलेच आठवते. मी शाळेत होतो तेव्हा.
मग १९६६ साली उतरलेले हे मंगळयान कोठले? आणि, १९६६ साली बोले तो, चंद्रावर पहिला मानव १९६९ साली उतरला, त्याच्याही अडीच-तीन वर्षे अगोदर. मग त्याचा गाजावाजा कसा झाला नाही?
Something just doesn’t add up.
…
(तसेही, चंद्रावरसुद्धा उतरलेले हे पहिलेवहिले अवकाशयान नसून, चंद्रावर उतरलेले अमेरिकेचे पहिले अवकाशयान होय, असे कळते. त्याच्या चार महिने अगोदर सोव्हिएत संघाचे लुना-९ हे यान चंद्रावर उतरले होते. (लुना-९ हेसुद्धा चंद्रावर उतरलेले पहिलेवहिले अवकाशयान नसून, चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलेले पहिलेवहिले अवकाशयान म्हणता येईल. लुना-९च्या अगोदर सोव्हिएत संघाची नि अमेरिकेची अनेक अवकाशयाने चंद्रावर जाऊन कोसळली होती. असो चालायचेच.)
गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा "चमत्कार"…
१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा "चमत्कार".
हा ‘चमत्कार’ एटीअँडटी या अमेरिकन टेलिफोन कंपनीने घडवून आणला (किंवा गेला बाजार स्पॉन्सर केला), अशी एक किंवदंता/(कॉन्स्पिरसी) थियरी तत्कालीन अमेरिकास्थित भारतीयांच्या गोटांतून प्रचलित होती.
(मोबाइलपूर्व जमाना होता तो. शिवाय, लँडलाइनवरूनसुद्धा, लाँग डिस्टन्स कॉलिंग/इंटरनॅशनल कॉलिंग (मराठीत: एसटीडी/आयएसडी) हे आजच्यासारखे स्वस्त नव्हते. त्यात पुन्हा एटीअँडटी, स्प्रिंट, तथा (आता दिवंगत) एमसीआय हे तीनच (प्रमुख) सेवादाते. (इतरही छोटेमोठे होते, परंतु ते रीसेलर होते.) त्यातला एटीअँडटीचा वाटा (मार्केट शेअर) सिंहाचा. अशा परिस्थितीत, अमेरिकेत राहणारा/री प्रत्येक भारतीय जर आपापल्या साप्ताहिक ‘इंडिया कॉल’वर ‘गणपतीने दूध पिण्याच्या चमत्कारा’ची (भारतीयांनाच साजेश्या उत्साहाने) चावूनचावून चर्चा करू लागला/ली, आणि त्यातून प्रत्येक कॉलची लांबी जर (कॉलवर दोन्ही बाजूंना असलेल्या व्यक्तींची संख्या गुणिले तीन मिनिटे) एवढी जरी वाढली, तरी त्यातून एटीअँडटी कंपनीचा रेव्हेन्यू तथा नफा किती वाढला असेल! शिवाय, knowing Indians, अशा चर्चा या काही तेवढ्या एका आठवड्यापुरत्याच मर्यादित नसणार, गेला बाजार काही आठवडे तरी चालत राहणार. त्यामुळे… चालायचेच.)
अतातुर्क
मृत्युदिवस: १० ऑक्टोबर: तुर्कस्तानाचे निर्माते कमाल अतातुर्क (१९३८)
हे सद्गृहस्थ दररोज दिवसाकाठी अर्धा लिटर राकी रिचवायचे, म्हणे! त्यातून मग जे व्हायचे, तेच झाले — यकृत खराब होऊन सद्गृहस्थ वारले.
असो चालायचेच.
१९७७ : देवीरोगाचे उच्चाटन
१९७७ : देवीरोगाचे उच्चाटन. हे लशीकरणाचे मोठे यश मानले जाते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या संदर्भात खूप जोरदार तथा concerted प्रयत्न झाले.
१९७७ साली महाराष्ट्रात गावोगावी, खेड्यापाड्यांतून भिंतीभिंतीवर ‘देवीचा रोगी कळवा, १००० रुपये मिळवा’ असे (शासकीय) संदेश रंगविलेले असत, असे आठवते. (१००० रुपये ही रक्कम १९७७ साली खूपच मोठी होती.)
(अतिअवांतर: यावरून आठवले. महात्मा गांधी हे एक मोठे anti-vaxxer होते. “देवीची लस टोचून घेणे हे दुसऱ्याची ओकारी चाटण्याइतके गलिच्छ आहे; देवी हा रोग मुळात जंतुसंसर्गामुळे होतच नाही, तर पोटातील संतुलन बिघडल्यामुळे होतो; लसीकरण हे एक पाश्चिमात्य थोतांड असून खुद्द पाश्चिमात्य विचारवंतांचा त्यास विरोध आहे; सरकारने लोकांवर लसीकरण लादणे हे गर्हणीय असून, प्रत्येक जागरूक नागरिकाने त्याचा सविनय कायदेभंगाने विरोध केला पाहिजे, नि वेळप्रसंगी त्याकरिता तुरुंगात जाण्यास सज्ज राहिले पाहिजे” वगैरे वगैरे काहीबाही लिहून ठेवलेले आहे त्यांनी!
नाही म्हणजे, गांधीजींना एक थोर राजकीय नेता म्हणून आम्ही मानतो. परंतु, इतर अनेक क्षेत्रांत (अर्थकारण, आरोग्य, वगैरे) ते असे अक्कल गहाण टाकल्यासारखे का करायचे, ते समजत नाही. आणि, लोकांनीसुद्धा त्यांना नको तिथे ‘बापू वाक्यं प्रमाणम्’ म्हणून कसे काय उचलून धरले, याचेही आश्चर्य वाटते. असो चालायचेच. किंवा, ‘चलता है, हिंदुस्तान है’.)
अयोय्यो!
ट्रंप्या, मंडेला, गोपीनाथ मुंडे, मेदेवदेव, सिरिमाओ बंदारनायके…
अयोय्यो! तुम्ही तर ही म्हणजे पार गाढवाची गांड करून टाकलीत. (बोले तो, गाढवाच्या गांडीत नाही का, काय/कोणी वाटेल ते शोधा, हमखास सापडते (कारण कोणी ना कोणी कधी ना कधी ते तेथे धाडलेले असतेच), तद्वत्. अत्यंत सर्वसमावेशक ठिकाण!) ट्रंप, मंडेला, नि गांधी (नि आणखी कोणकोण) एकसमयावच्छेदेकरून हजेरी लावून राहिले की हो!) चालायचेच.
…ह्यांच्यासारखे लाखो पुढारी असेच लोक दिसले की काही पण बडबडायचे. गांधी वेगळे का असतील.
ते ठीक आहे हो! इथे त्याहून वाईट प्रकार आहे. म्हणजे, इथे हे लोकांसमोर बडबडत नाहीयेत, तर संकीर्ण रोग आणि त्यांचे उपचार यावर पुस्तक लिहून बसलेत. नि त्या पुस्तकात देवीरोगावर एक आख्खे स्वतंत्र प्रकरण आहे.
आता तुम्ही म्हणाल, की आजकाल कोणी वाटेल तो सोम्यागोम्या — अगदी ‘फॉक्स न्यूज़’वरच्या शॉन हॅनिटी/(कै.) रश लिम्बॉ/ग्लेन बेक-प्रभृती गावगुंडांपर्यंत नि भडभुंज्यांपर्यंत (गावगुंड नि भडभुंजे यांची क्षमा मागून) — उठतो नि पुस्तक लिहितो, ‘बार्न्स अँड नोबला’त नाहीतर ‘ॲमेझॉन’वर (किंवा अगदीच तिथेही जर जमले नाही तर लेखकाच्या स्वतःच्या वेबसाइटीवर) ते काही महिने झळकते, नि मग यथावकाश सगळेजण (दस्तुरखुद्द लेखकापर्यंत) त्याबद्दल विसरून जातात, त्यापेक्षा हे वेगळे कसे? तर त्याला उत्तर असे, की जमाना बघा ना! छापील शब्दावर विश्वास ठेवण्याचा काळ होता तो! आजकाल पुस्तके किती जण विकत घेतात, विकत घेतलीच तर किती जण वाचतात, वाचलेच तर त्यात काय लिहिलेय ते किती जणांना समजते, समजलेच तर किती जणांना ते लक्षात राहते, नि लक्षात राहिलेच तर किती जण त्यावर विश्वास ठेवतात? माझ्या अंदाजाप्रमाणे खूपच कमी! (गावगुंडांची पुस्तके तर गावगुंडाचे खिसे भरण्यासाठी बकरे विकत घेत असावेत. नि गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ, अरुंधती रॉय, सलमान रुश्दी, झालेच तर अगदी एन रँड वगैरे असल्या तात्कालिक “लै भारी” कॅटेगरीतल्या लेखकांची पुस्तके चारचौघात सांगण्यासाठी, किंवा मग ‘नाहीतर लोक काय म्हणतील?’ या लोकलज्जेस्तव.)
दुसरी गोष्ट म्हणजे, उपरोल्लेखित गावगुंडांना त्यांच्या मर्यादित (उजव्या) इकोसिस्टमबाहेर कोण कुत्रा विचारतो? गांधीजींची तशी अवस्था होती काय?
सांगण्याचा मतलब, गावगुंडांकडून तशीही वेगळी अपेक्षा आम्ही करत नाही. गांधीजींकडून किमान जबाबदारीची (आमची) अपेक्षा अंमळ अधिक आहे, इतकेच.
(अर्थात, हा आमचा प्रॉब्लेम आहे, गांधीजींचा नव्हे, हे आगाऊ मान्य आहेच. अपेक्षांचे ओझे!)
…
(साधेच उदाहरण घ्या. इथेच बाजूला ‘तर्कतीर्थ’ नामक कोणीतरी ‘मेंदूचे आरोग्य आणि विवेक’ या विषयावर काही लेख पाडलेला आहे. कोणी तरी तो गंभीरपणे घेत आहे काय? फार कशाला, कोणी त्याकडे ढुंकून पाहत तरी आहे काय?
आता, हाच लेख जर गांधीजींनी पाडला असता, तर?
एक प्रयोग करून पाहा. (शक्यतो लेखकाच्या पूर्वपरवानगीने) तो लेख गांधीजींच्या नावाखाली फेसबुकावर डकवून पाहा. पाहा ‘लाइकां’चा धोधो पाऊस कोसळतो की नाही ते!
असो चालायचेच.)
गांधी फक्त एका गोष्टीसाठी
गांधी फक्त एका गोष्टीसाठी पटतात- ते म्हणजे, स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ते सर्वसमावेषक, सर्व घटकांच्या सहभागातून चाललेल्या आणि अहिंसक आंदोलनातून मिळेल या विचारासाठी.
बाकी, माझी मूळ प्रतिक्रिया अशा अर्थाने होती की जो जो पुढारपण आलं की ज्या विषयाची अक्कल नाही ते पण बोलावसं वाटतं आणि ते चालून जातं.
+
गांधी फक्त एका गोष्टीसाठी पटतात- ते म्हणजे, स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ते सर्वसमावेषक, सर्व घटकांच्या सहभागातून चाललेल्या आणि अहिंसक आंदोलनातून मिळेल या विचारासाठी.
नेमके! म्हणूनच म्हटले, राजकीय नेते म्हणून आम्ही त्यांना मानतो.
परंतु म्हणून, नको त्यात वाटेल ते?
बाकी, माझी मूळ प्रतिक्रिया अशा अर्थाने होती की जो जो पुढारपण आलं की ज्या विषयाची अक्कल नाही ते पण बोलावसं वाटतं आणि ते चालून जातं.
खरे आहे म्हणा. दोष गांधींचाही नाही, आणि नको तिथे त्यांना उचलून धरणाऱ्या पब्लिकचाही नाही. आधी म्हटल्याप्रमाणे, दोष आमच्या अपेक्षांचा आहे.
चालायचेच.
(लंडन) ‘टाइम्स’
१८१४ : लंडनचे वृत्तपत्र 'टाइम्स' स्वयंचलित, बाष्पशक्तीवर चालणाऱ्या छापखान्यात छापला जाऊ लागला. वृत्तपत्रे आम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
त्यापूर्वी काय करायचे?
(‘टाइम्स’बद्दल कल्पना नाही, परंतु इंग्लंडात वृत्तपत्रे माझ्या कल्पनेप्रमाणे गेला बाजार शिवाजीमहाराजांच्या काळापासून तरी अस्तित्वात असावीत. (कोणास ठाऊक, कदाचित त्याही आधीपासूनसुद्धा.) आता, ही वृत्तपत्रे जर हाताने छापीत असतील, तर कठीण आहे! बोले तो, हाताने रोज अश्या किती प्रती छापणार, नि त्या किती जणांपर्यंत पोहोचणार? म्हणजे, चौथ्या इष्टेटीचे सर्क्युलेशन तेव्हा मूठभर लोकांपुरतेच मर्यादित होते की काय?)
?
१८२९ : लॉर्ड बेंटिकने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला.
जाहीरनामा न काढता सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांबद्दल प्रस्तुत कायद्यात काहीच तरतूद नव्हती काय?
असो; हेही नसे थोडके. सुधारणा ही टप्प्याटप्प्यानेच होते, म्हणतात.
(तसेही, जाहीरनामा नक्की कोणी काढायचा (किंवा काढायचा नाही), सती जाणारीने, की मदत करणाऱ्यांनी, ते नीटसे समजले नाही.)
——————————
माझ्या मते, एका अधिकच्या स्वल्पविरामाने काम भागण्यासारखे आहे.
“१८२९ : लॉर्ड बेंटिकने जाहीरनामा काढून, सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला.”
(चूभूद्याघ्या.)
घोडचुका (नेहमीप्रमाणेच)
(३१ डिसेंबर)
१६०० : ब्रिटनच्या राणीने ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला भारतीय उपखंडात व्यापारासाठी अधिकृत परवानगी आणि एकाधिकार दिले.
यात तपशिलाच्या दोन घोडचुका आहेत. (ओळखा पाहू!)
(बाकी कोणाला नाही, तरी, एके काळी इंग्लंडला आपले माहेर म्हणविणाऱ्या अदितीला तरी त्या लक्षात येतील, असे वाटले होते. परंतु… चालायचेच.)
.
(जाऊद्यात. कोणीच च्यालेंज उचलत नाही, तर (प्रथेस अनुसरून) मीच सांगतो.)
The Queen under question would be Queen Elizabeth (commonly referred to as Queen Elizabeth I). She was the Queen of England, but not that of Great Britain.
As a matter of fact, there did not exist a political entity called Great Britain in her days. (There did exist a geographical entity by that name, as it had existed since centuries before, an island comprising of the countries of England, Scotland, and Wales. However, it was not a united political unit. In any case, Scotland was not a part of Queen Elizabeth’s domains; so, she cannot be construed to be “Queen of Great Britain” under any stretch of logic. Neither was such her official title.)
Her immediate successor could be said to rule over the entire territory of what constitutes Great Britain (and possibly even the United Kingdom) today; However, he could not be termed as a King of Great Britain, either. (Technically, he was a ruler of Scotland and England separately; these two countries existed as two separate entities which shared a common king.)
The united political entity of Great Britain came into existence almost a century later. (And the United Kingdom, even later.)
Consequently, the commercial enterprise that was given the charter could be referred to, variously, as the Honorable East India Company, the English East India Company, or simply the East India Company. Or, it could be referred to as the Governor and Company of Merchants of London trading into the East Indies, as it was listed in the charter. However, referring to it as the British East India Company would be inaccurate, and inappropriate. It did not officially become the British East India Company until more than a century later, when Great Britain herself came into existence as a single, united political entity.
अवांतर: ‘इंग्लंड’, ‘(ग्रेट) ब्रिटन’, तथा ‘युनायटेड किंग्डम’ या तीन संज्ञा आजमितीस अनेकदा समानार्थी (albeit loosely) जरी वापरल्या जात असल्या, तरीसुद्धा, (तांत्रिकदृष्ट्या) त्यांना आपापले विशिष्ट अर्थ असून, (आजमितीससुद्धा) या तीनही संज्ञांचे अर्थ एकमेकांहून भिन्न आहेत.
अतिअवांतर: स्कॉटलंडला जाऊन ‘१६०० साली ब्रिटनच्या राणीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला…’ एवढेच रस्त्यात मोठ्याने बोंबलून पाहा. स्कॉटिश लोकांनी धरून जिवे जर नाही मारले, तर स्कॉटिश लोकांना ‘पराकोटीचे सहिष्णू तथा क्षमाशील’ असे बिरूद द्यावे लागेल.
असो चालायचेच.
शिराज खूप ड्राय तथा कडवट नाही
शिराज खूप ड्राय तथा कडवट नाही का वाटत? सुला लेट हार्वेस्ट जरा गोडसर असते ती ट्राय केली का? (हे सर्व भारतात असणे गृहीत धरून. युरोपात काही ठिकाणी सुला बघितली पण अमेरिकेत कधी न गेल्याने कल्पना नाही.)
बाकी अनेक फ्रेंच आणि स्विस वाईन्स तिथे गेलेले असताना पिऊन बघितल्यावर आपली सुला त्याहून काही वेगळी अथवा कमी नसते असे मत झाले. ते अभ्यासपूर्ण नसू शकेल.
.
शिराज खूप ड्राय तथा कडवट नाही का वाटत?
नाही हो. शिरा कडवट कसा असेल? शिरा गोड असतो. (नाही म्हणायला, शिर्यात जर बदाम घातलेत, नि त्यातला जर एखादा कडू निघाला, तर गोष्ट वेगळी.)
(नाही म्हणायला, तिखटामिठाचा शिरा असाही एक प्रकार असतो, म्हणा. सांजा म्हणतात त्याला. आठवा: 'तिन्हीसांजा सखे मिळाल्या'.)
(अतिअवांतरः एखाद्याच्या 'तोंडात शिरा पडो' असे का म्हणतात? त्यात नेमके काय वाईट आहे? (ज्याच्या तोंडात पडायचा, त्याला मधुमेह असल्याखेरीज?))
युरोपात काही ठिकाणी सुला बघितली पण अमेरिकेत कधी न गेल्याने कल्पना नाही.
युरोपाबद्दल कल्पना नाही. (युरोपात माझे जाणेयेणे सहसा होत नसते.) मात्र, अमेरिकेत अनेक वर्षांपूर्वी एकदा(च) एका देशी रेष्टारंटात सुला मिळाली होती. (गेऽले ते रेष्टारंट आता!) बाजारात अन्यत्र मात्र पाहिलेली नाही.
(ओल्ड मंक मात्र तुलनेने सहजगत्या मिळते.)
बाकी अनेक फ्रेंच आणि स्विस वाईन्स तिथे गेलेले असताना पिऊन बघितल्यावर आपली सुला त्याहून काही वेगळी अथवा कमी नसते असे मत झाले. ते अभ्यासपूर्ण नसू शकेल.
माझेही मत अभ्यासपूर्ण असल्याचा दावा नाही; मात्र, एकदाच (त्या रेष्टारंटात) सुलाची कॅबर्ने प्यायल्यावर जे काही वाटले, ते सांगतो. चवीमध्ये अधिकउणे काही जाणवले नाही; मात्र, सुला (तुलनेने) अंमळ लवकर चढते, असे वाटले. (चूभूद्याघ्या.)
असो चालायचेच.
१६ फेब्रुवारी
मृत्युदिवस : ‘ए ग्रामर ऑफ द मरहट्ट लँग्वेज’ या मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचे लेखक व्याकरणकार जेम्स रॉबर्ट बॅलेंटाईन (१८६४)
‘मरहट्ट’, की ‘मराठा’?
माझ्या समजुतीप्रमाणे, इंग्रजी ‘Mahratta’ बोले तो ‘मराठा’. इंग्रजांच्या जमान्यात हा शब्द साधारणतः ‘महाराष्ट्र’ अशा अर्थाने (इंग्रजीतून) वापरला जात असे. (म्हणजे, ‘महाराष्ट्र’ अशी कोणतीही राजकीय एंटिटी तेव्हा – किंवा एकंदरीतच १९६०पूर्वी – अस्तित्वात नसली, तरीही. राजकीय एंटिटी नव्हती; धूसरशी का होईना, परंतु भौगोलिक/सांस्कृतिक संकल्पना होती.)
- लोकमान्य टिळकांनी (मराठीतून) ‘केसरी’ आणि (इंग्रजीतून) ‘मराठा’ अशी दोन वर्तमानपत्रे स्थापन केली. त्यातला ‘मराठा’ हा.
- ‘मद्रास अँड सदर्न मराठा रेल्वे’तला ‘मराठा’ हाच.
- फार कशाला, ‘पंजाब सिंधु गुजरात मराठा’मधलासुद्धा ‘मराठा’ हाच.
Mahratta मराठा.
किल्ला
(२५ फेब्रुवारी) १५१० : पोर्तुगीज व्हाइसरॉय अल्बुकर्क याने पणजीचा किल्ला जिंकला
पोर्तुगीज व्हाइसरॉय अल्बुकर्क याच्या पणजीकडे असा नेमका कोणता किल्ला होता? आणि, त्याने (पक्षी: तिच्या पणतवंडाने) तो साक्षात आपल्या रक्ताच्या पणजीशी लढून जिंकून घेतला? का? त्याला तो वारसाहक्काने मिळू शकला नसता काय? की, धाकटा भाऊ/औरंगजेब सिंड्रोम हा प्रकार मुघलांप्रमाणे पोर्तुगीजांतही होता?
५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोध दिन (sic)
'आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोध दिन' की 'आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायविरोध दिन'?
बोले तो, आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायाला विरोध आहे (पक्षी: राष्ट्रांतर्गत वेश्याव्यवसाय चालेल), की वेश्याव्यवसायाला आंतरराष्ट्रीय विरोध आहे?
(अर्थाचा अनर्थ होतो हो! जरा जपून लिहा की.)
असो, हेही दिवस जातील.