Skip to main content

धूमकेतू - C/2023 A3 Tsuchinshan-ATLAS

सध्या सुर्यास्तानंतर नुस्त्या डोळ्यांनी हा धूमकेतू दिसत आहे. दिवसेंदिवस धूमकेतू फिकट होत जाईल.

धूमकेतू नुकताच सुर्यामागून प्रदक्षिणा पुर्ण करून परतीच्या मार्गाला लागला आहे. 12 ऑक्टोबर दरम्यात धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ होता.

सध्या सुर्यास्तानंतर 30-40 मिनिटे साधारण सुर्यास्ताच्या दिशेला हा धूमकेतू पाहता येईल. काल मी घेतलेले फोटो इथे देत आहे. फोटो वर क्लिक केल्यास मोठा फोटो दिसेल.

Wide Angle

200 mm

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/10/2024 - 07:47

आभार निळोबा. फोटो आवडले.

गेले दोन दिवस बघायचं ठरवून राहून जात आहे. आता फोनमध्ये गजर लावून ठेवला आहे.

अस्वल Wed, 16/10/2024 - 02:37

खूपच भारी फोटू आहे.
आमच्याइथे ढगाळ हवा असल्याने (त्यात काय नवल!) हुकतोय.

'न'वी बाजू Thu, 17/10/2024 - 02:20

शीर्षक:

धुमकेतू धूमकेतू - C/2023 A3 Tsuchinshan-ATLAS

मजकूर:

सध्या सुर्यास्तानंतर सूर्यास्तानंतर नुस्त्या नुसत्या डोळ्यांनी हा धुमकेतू धूमकेतू दिसत आहे. दिवसेंदिवस धुमकेतू धूमकेतू फिकट होत जाईल.

धुमकेतु धूमकेतू नुकताच सुर्यामागून सूर्यामागून प्रदक्षिणा पुर्ण पूर्ण करून परतीच्या मार्गाला लागला आहे. 12 ऑक्टोबर दरम्यात धुमकेतू धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ होता.

सध्या सुर्यास्तानंतर सूर्यास्तानंतर 30-40 मिनिटे साधारण सुर्यास्ताच्या सूर्यास्ताच्या दिशेला हा धुमकेतू धूमकेतू पाहता येईल. काल मी घेतलेले फोटो इथे देत आहे. फोटो वर फोटोवर क्लिक केल्यास मोठा फोटो दिसेल.

काही नाही, एरवी चांगल्या लेखात या अशा टंकनदोषांमुळे पदोपदी ठेचकाळायला होत आहे. (आमच्या डोळ्यांची वाईट सवय, दुसरे काय!) तरी मेहरबानी करून इत:पर काळजी घेणार काय?

(लेख दखलपात्र नसता, तर तसदी दिली/घेतली नसती. समजूतदारपणाबद्दल आगाऊ आभार.)

--------------------

(अतिअवांतर: छायाचित्रांत टंकनाची चूक करण्याची काही सुविधा नाही, ही त्या विधात्याची समस्त मानवजातीवरील कृपा समजावी काय?)

गवि Thu, 17/10/2024 - 06:57

In reply to by 'न'वी बाजू

तरी मेहरबानी करून इत:पर काळजी घेणार काय?

अत:पर असा शब्द इथे असावा असे वाटते. इत:पर म्हणजे आतापर्यंत असे असावे. चूभूदेघे.

गवि Thu, 17/10/2024 - 07:30

In reply to by 'न'वी बाजू

हे चुकीचे वाटते. आतापर्यंत आणि आतापासून पुढे हे दोन वेगळे शब्द असावेत. अर्थात त्याला इतर कुठे सॉलिड आधार मिळायला हवा हेही मान्य.

परोक्ष आणि अपरोक्ष यांचाही असेच प्रत्यक्षापेक्षा उलट उपयोग होतो. ते मात्र स्पष्ट आहे.

गवि Thu, 17/10/2024 - 07:42

In reply to by 'न'वी बाजू

त्याच पेजवर

अत:पर याचाही अर्थ तोच दाखवतो आहे. डिक्शनरी कच्ची असावी.

'न'वी बाजू Thu, 17/10/2024 - 07:52

In reply to by 'न'वी बाजू

(थोडक्यात काय, अलाहाबाद, इलाहाबाद सारखेच. हं, आता त्याला तुम्ही प्रयागराजच म्हणायचे, म्हणालात, तर गोष्ट वेगळी.)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 17/10/2024 - 07:11

In reply to by 'न'वी बाजू

(अतिअवांतर: छायाचित्रांत टंकनाची चूक करण्याची काही सुविधा नाही, ही त्या विधात्याची समस्त मानवजातीवरील कृपा समजावी काय?)

तुम्हाला ना, जेन एआय वगैरे गोष्टी माहीत नाहीत असं दिसतंय!

'न'वी बाजू Thu, 17/10/2024 - 07:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

…म्हणजे, आता छायाचित्रांतसुद्धा टंकलेखनाच्या चुका करता येतात? प्रगती आहे!

(‘आमच्या वेळी’ असे नव्हते हो!)

Nile Thu, 17/10/2024 - 08:05

In reply to by 'न'वी बाजू

लेखन तितके शुद्ध नाही आणि ते सुधारण्यास वेळही नाही. मुख्य उद्देश माहिती पोहचवणे होता. तस्मात जमेल तितके करू अन्यथा आगाऊ माफी.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 18/10/2024 - 07:01

In reply to by Nile

माफी? तेही निळोबा मागत आहेत! कुठे नेऊन ठेवला आमचा मित्र!

सई केसकर Thu, 17/10/2024 - 17:04

In reply to by 'न'वी बाजू

दिवाळी अंकाचेही खूप मुद्रितशोधन करायचे आहे. तुम्ही नंतर इथे करणार त्या ऐवजी आधीच करा!
आमच्या 'दुआ' (दुआ की दुवा?) मिळतील तुम्हाला.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 18/10/2024 - 07:00

In reply to by सई केसकर

दुवा का दुआ कशाला, लकडी पुलावर अख्खा जाहीर मुकाही घेऊ. पण जरा प्लिस कामात मदत कराल का?

गवि Fri, 18/10/2024 - 11:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लकडी पुलावर अख्खा जाहीर मुकाही घेऊ.

दोन शंका.

१. पण यासाठी न बा पुलावर जाहीर प्रकट होतील का?
२. न बा स्त्री निघाले (म्हणजे आहेत असे उघड झाले) तर मग कोणाकडून खणा नारळाने ओटी भरणार?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/10/2024 - 07:46

In reply to by गवि

१. म्हणूनच वचने किं दरिद्रता.
२. ते स्त्री असले तरी लकडी पुलावर जाहीर मुका घेण्याची ऑफर तशीच आहे.

Nile Fri, 25/10/2024 - 00:24

In reply to by 'न'वी बाजू

जरा सवड मिळाली म्हणून थोडक्यात शोध घेतला तर धूमकेतू कसे लिहावे याबाबत एकमत दिसत नाही.

दाते, वझे, तुळपुळे-फेल्डहाऊस आणि मोल्सवर्थ मध्ये धूमकेतु आहे ( तु र्हस्व). काही कोशांमध्ये मूळ शब्द धुमकेतू आहे पण इतरत्र 'धुमकेतु' असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे.

सर्वच कोशांमध्ये 'केतु'च आहे. फक्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कोशात केतू आणि केतु दोन्ही आहेत. तर मग धूमकेतूतला केतु केतू कसा झाला?

धूम म्हणजे धूर वाफ वगैरे. त्यावरून धूमकेतू शब्द आला असावा. (गगनीं उगवले त्रिविध केतु । दंडकेतू धूमकेतू वगैरे.)
'
पण धूर शब्दावरून धुरकट जेव्हा होतो तेव्हा र्हस्व का होतो? (धूर चे धुराला होताना दुसरा दिर्घ आहे म्हणून पहिला र्हस्व हा नियम माहीत आहे. पण धुरकट मधे र दीर्ह आहे हे काय पटत नाही.) 'धूरकट' कोठे सापडला नाही.

हे र्हस्व दिर्घाचे राहू केतू कोणी दूर करेल काय?

जाता जाता: धूमकेतूतल्या धू चा उच्चार मी तरी दीर्घ धू (धूम ठोकण्यातला धू) करत नव्हतो, पण व्युत्पत्ती तरी तशी दिसते.

अतिअवांतर: साला लै वेळ गेला!

'न'वी बाजू Fri, 25/10/2024 - 03:16

In reply to by Nile

तर मग धूमकेतूतला केतु केतू कसा झाला?

महाराष्ट्र शासनाच्या (पक्षी: मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या तथा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या) तत्सम शब्द मराठीत लिहिण्यासंबंधीच्या शुद्धलेखनाच्या "नव्या" नियमाप्रमाणे.

(मराठी शुद्धलेखनाचे हे नियम "नवे" म्हटले, तरीसुद्धा गेला बाजार ५० ते ६० वर्षांपूर्वीपासून लागू असावेत. "केतु" हे संस्कृताप्रमाणे तथा मराठी शुद्धलेखनाच्या "जुन्या" (पक्षी: आमच्या आजोबांच्या जमान्यातील) नियमांप्रमाणे बरोबर; "केतू" हे संस्कृताप्रमाणे तथा (मराठी शुद्धलेखनाच्या) "जुन्या" नियमांप्रमाणे चूक, परंतु मराठी शुद्धलेखनाच्या "नव्या" (आणि तूर्तास प्रचलित असलेल्या) नियमांप्रमाणे बरोबर.)

संदर्भाकरिता येथील नियम क्र. ५ (आणि विशेषेकरून उपनियम क्र. ५.१) पाहावा. धन्यवाद.

दाते, वझे, तुळपुळे-फेल्डहाऊस आणि मोल्सवर्थ मध्ये धूमकेतु आहे ( तु र्हस्व).

दाते, वझे, तथा मोल्सवर्थ हे शब्दकोश हे प्रस्तुत नियम अस्तित्वात येण्याच्या कितीतरी पूर्वीचे आहेत. तुळपुळे-फेल्डहाउस हा शब्दकोश हा प्रस्तुत नियम लागू झाल्यानंतर जरी प्रकाशित झालेला असला, तरीसुद्धा, तो जुन्या मराठीचा शब्दकोश आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

बर्न्ट्सेनबाईंचा शब्दकोश हा प्रस्तुत नियम लागू झाल्यानंतरचा आहे, आणि त्यात 'धूमकेतू' अशीच नोंद दिसते.

----------

पण धूर शब्दावरून धुरकट जेव्हा होतो तेव्हा र्हस्व का होतो? (धूर चे धुराला होताना दुसरा दिर्घ आहे म्हणून पहिला र्हस्व हा नियम माहीत आहे. पण धुरकट मधे र दीर्ह आहे हे काय पटत नाही.) 'धूरकट' कोठे सापडला नाही.

हा नियम माझ्या समजुतीप्रमाणे आपण म्हणता तसा ("दुसरा दीर्घ आहे म्हणून पहिला ऱ्हस्व") असा नसावा.

कृपया वरील दुव्यावरील उपनियम क्र. ८.१ तपासावा.

उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई‑कार किंवा ऊ‑कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी र्‍हस्व लिहावा.

हा नियम माझ्या समजुतीप्रमाणे "धुराला" आणि "धुरकट" या दोहोंनाही लागू व्हावा. (तसेच, "तूप"पासून "तुपाला" किंवा "तुपकट".)

अपवाद – दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.

याची उदाहरणे म्हणून "परीक्षेला"/"परीक्षांना", "दूताला"/"दूतांना" वगैरे दिलेली आहेत. ते ठीकच आहे. परंतु मग "जिवाला धोका" किंवा "जिवात जीव येणे" हे कोठल्या नियमानुसार चालतात, हे कळत नाही. ("जीव" हा शब्द तत्सम नव्हे काय? की येथे त्याला मानद (मराठीत: ऑनररी) तद्भवाचा दर्जा देण्यात आलेला आहे? कारण, "हा अपवाद आहे" असे कोठेही म्हटलेले दिसत नाही. (चूभूद्याघ्या.))

----------

जाता जाता: धूमकेतूतल्या धू चा उच्चार मी तरी दीर्घ धू (धूम ठोकण्यातला धू) करत नव्हतो, पण व्युत्पत्ती तरी तशी दिसते.

खरे तर त्या उच्चारात 'धू' तर दीर्घ आहेच, परंतु, त्याशिवाय, 'म'सुद्धा पूर्ण आहे. (मराठीत, हं! दिल्लीछाप हिंदीची गोष्ट वेगळी.) पण लक्षात कोण घेतो?

----------

अतिअवांतर: साला लै वेळ गेला!

आम्ही तर वेळ घालविण्यासाठीच इथे येतो बुवा. आम्हाला फरक पडत नाही.

Nile Fri, 25/10/2024 - 09:57

In reply to by 'न'वी बाजू

पोटफोड्या र सुरवातीला कसा लिहतात इथल्या कि-बोर्डावर? म्हणजे वार्‍यावर बरोबर लिहला जातोय, तर्‍हा ही जमतंय पण सुरवातीला पोटफोड्या र असलेला र्हस्व कसा लिहायचा ते विसरलो.

'न'वी बाजू Fri, 25/10/2024 - 16:31

In reply to by Nile

‘तऱ्हा’ जमतोय तर मग ‘ऱ्हस्व’ का जमत नाही बुवा?

Nile Fri, 25/10/2024 - 23:42

In reply to by 'न'वी बाजू

माझ्या किबोर्डावर (भाषा इंडीया) शब्दाच्या सुरवातीचा अर्धा र आणि नंतरचा अर्धा र यासाठी वेगळं इनपुट आहे. किबोर्ड बदलून गमभनवर ऱ्हस्व लिहायला जमतंय. अधिक माहीती इथे पान 5 वर पहा.