लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर...?

फार थोड्या ठिकाणी नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसते आहे. किंबहुना बहुतेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल होणं, आणि रुग्णसंख्या वाढणं हे बरोबरीने होत आहे. देश ‘खुला’ करून आपण व्हायरसच्या आगीत तेल ओतणार आहोत. आपल्याला आवडो न आवडो, हे घडणारच आहे. त्यामुळे धोका कमी कसा करायचा यासंबंधी मार्गदर्शन करायचा इथे प्रयत्न केला आहे.

मूळ लेखक : डॉ. एरिन ब्रोमेज, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स, डार्टमथ येथे जीवशास्त्राचे असोसिएट प्रोफेसर
टीप : प्राण्यांमधील संसर्गजन्य रोग, त्यांच्या साथी, आणि इम्युनॉलॉजी यावर ब्रोमेज यांचे संशोधन आहे. सदर लेख त्यांच्याच संकेतस्थळावर नुकताच प्रकाशित झाला आहे. त्या लेखाचा हा स्वैर अनुवाद. मूळ लेखातील काही संदर्भ भारतातल्या परिस्थितीला लागू नसल्याने त्यातले तपशील अनुवादित केले नाहीत.

मराठी अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर

-------------------

सध्या कोव्हिड-१९च्या संकटाचा धोका बराच कमी झाला आहे, अशी अनेकांची भावना झालेली दिसते आहे. असं खरं तर असायचं कारण नाही. एखादी साथ आली, की रुग्णांची संख्या कशी वाढेल (‘अपस्लोप’) याचा अंदाज बांधता येतो, त्याचप्रमाणे उच्चतम संख्या (‘पीक’) झाल्यानंतर काय घडेल (‘बॅकस्लोप’), याचाही अंदाज बांधता येतो. इटली आणि चीनमधल्या आकडेवारीवरून आपल्याला माहीत आहे की ‘बॅकस्लोप’ हळू हळू खाली येतो – पीकनंतर मृत्यू पुढे अनेक महिने होत राहतात. उच्चतम मृत्यूसंख्या जर ७०,००० आहे असं गृहीत धरलं, तर पुढच्या दीड-एक महिन्यात आणखी ७०,००० लोकांचा मृत्यू होणं शक्य आहे.

लॉकडाऊन शिथिल केल्यावर व्हायरसला जणू नवी उर्जा मिळणार आहे. नेमकं काय घडेल याचा अंदाज बांधणं अवघड होणार आहे. अर्थव्यवस्था महत्त्वाची आहेच, पण जीवशास्त्राकडे दुर्लक्ष करून अर्थव्यवस्था सुधारणार नाही हे लक्षात घ्यायला हवं.

New York May 3 Covid Graph

फार थोड्या ठिकाणी नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसते आहे. किंबहुना बहुतेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल होणं, आणि रुग्णसंख्या वाढणं हे बरोबरीने होत आहे. अमेरिकेतली एकूण रुग्णसंख्या स्थिरावल्यासारखी वाटते आहे, कारण न्यूयॉर्क मधला लोंढा आता थोपविला गेला आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिका ‘खुली’ करून आपण व्हायरसच्या आगीत तेल ओतणार आहोत. आपल्याला आवडो न आवडो, हे घडणारच आहे. त्यामुळे धोका कमी कसा करायचा यासंबंधी मार्गदर्शन करायचा मी इथे प्रयत्न केला आहे.

लोकांना संसर्ग कुठे होतोय?
बहुतेकांना आपापल्या घरातच संसर्ग होतोय. कुटुंबातल्या एखाद्याला बाहेरच्या वातावरणात व्हायरसचा संसर्ग होतो, आणि मग त्याच्या घरच्यांना तो होतो. पण बाहेर इन्फेक्शन नेमकं कुठून होतं? लोकांना किराणा दुकान, सायकलीवरून बाहेर जाणं, मास्क न लावता जॉगिंग करणारे लोक वगैरेंची भीती वाटते. पण असं नाहीये. इन्फेक्शन होण्यासाठी ठराविक संख्येनं व्हायरसचा आणि तुमचा संपर्क यायला हवा. याला व्हायरल डोस म्हणतात. ‘मर्स’ आणि ‘सार्स’ साथींच्या अभ्यासानुसार इन्फेक्शन व्हायला केवळ १००० व्हायरस कण पुरेसे असतात असं दिसतं. (संदर्भ आणि ) अर्थात करोनाच्या बाबतीत अजून प्रयोग व्हायला हवेत, पण सध्या चर्चेपुरतं आपण हे गृहीत धरू. हे १००० व्हायरस कण तुम्हाला एका श्वासात, किंवा एकदा डोळे चोळून, किंवा एका श्वासात १०० कण असे दहा श्वास घेऊन, वगैरे पद्धतीने संसर्ग करू शकतात.

हवेत किंवा वातावरणात किती व्हायरस सोडले जातात?

बाथरूम : बाथरूममध्ये नळ, हँडल्स, वगैरे कुठूनही तुम्हाला संसर्ग होण्याला भरपूर वाव आहे. माणसाच्या शौचातून जिवंत व्हायरसचा विसर्ग होतो की नाही हे अजून आपल्याला माहित नाहीये. पण सार्वजनिक शौचालय किंवा मूत्रालयांपासून सावधान!
संदर्भ : Aerodynamic analysis of SARS-CoV-2 in two Wuhan hospitals

खोकला : एकदा खोकल्यावर सुमारे ३००० द्रवकण ताशी ८० कि.मी. वेगाने हवेत फेकले जातात. यातले बहुसंख्य कण मोठे असल्याने थोड्याच वेळात जमिनीवर पडून जातात. पण उरलेले मात्र काही सेकंदात खोलीत पसरू शकतात.
संदर्भ : Natural Ventilation for Infection Control in Health-Care Settings Annex CRespiratory droplets

शिंकणे : एका शिंकेत ३०,००० पर्यंत द्रवकण ताशी ३२० कि.मी. वेगाने हवेत फेकले जातात. यातले बरेच कण लहान असतात आणि वेगाने खोलीभर किंवा आणखी दूर पसरू शकतात. इन्फेक्शन झालेली व्यक्ती जर शिंकली, तर ती एका शिंकेत किंवा एकदा खोकल्यावर सुमारे २० कोटी व्हायरस कण हवेत फेकू शकते.
संदर्भ : The Gross Science of a Cough and a Sneeze

एक श्वास : एका श्वासातून ५०-५००० द्रवकण भर पडतात. यातले बरेचसे कण चटकन जमिनीवर पडून जातात. नाकाने श्वासोच्छवास करतांना याहीपेक्षा कमी कण फेकले जातात. शिवाय श्वासोच्छवास संथ गतीने होत असल्याने फुफ्फुस किंवा श्वसनसंस्थेच्या अगदी खोलवरचे द्रवकण बाहेर पडत नाहीत. शिंकणं किंवा खोकण्याच्या तुलनेत श्वासोच्छवासातून खूपच कमी व्हायरस कण बाहेर फेकले जातात. या बाबतीत करोनाविषयीचे आकडे उपलब्ध नसल्याने आपण इन्फ़्लुएन्झाच्या माहितीचा आधार घेऊ. इन्फ़्लुएन्झा झालेली व्यक्ती श्वासोच्छवासादरम्यान प्रति मिनिट ३ – २० व्हायरस कण हवेत फेकते.
संदर्भ : Factors involved in the aerosol transmission of infection and control of ventilation in healthcare premises

एका श्वासातून ५० – ५००० द्रवकण भर पडतात. यातले बरेचसे कण चटकन जमिनीवर पडून जातात. नाकाने श्वासोच्छवास करतांना याहीपेक्षा कमी कण फेकले जातात. शिवाय श्वासोच्छवास संथ गतीने होत असल्याने फुफ्फुस किंवा श्वसनसंस्थेच्या अगदी खोलवरचे द्रवकण बाहेर पडत नाहीत. शिंकणं किंवा खोकण्याच्या तुलनेत श्वासोच्छवासातून खूपच कमी व्हायरस कण बाहेर फेकले जातात. या बाबतीत करोनाविषयीचे आकडे उपलब्ध नसल्याने आपण इन्फ़्लुएन्झाच्या माहितीचा आधार घेऊ. इन्फ़्लुएन्झा झालेली व्यक्ती श्वासोच्छवासादरम्यान प्रति मिनिट ३ – २० व्हायरस कण हवेत फेकते.
संदर्भ : Infectious virus in exhaled breath of symptomatic seasonal influenza cases from a college community

‘यशस्वी’ इन्फेक्शन = व्हायरस संख्या x काळ असं गणित आहे.

खोकल्यावर किंवा शिंकल्यावर बाहेर पडणारे २० कोटी व्हायरस कण सर्वत्र पसरतात. काही कण हवेतच तरंगत राहतात, काही आसपासच्या वस्तूंवर स्थिरावतात, तर बहुसंख्य कण जमिनीवर पडतात. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की एखाद्या व्यक्तीशी समोरासमोर बोलत असताना जर ती व्यक्ती तुमच्यावर खोकली किंवा शिंकली, तर १००० व्हायरस कण तुमच्या श्वासाबरोबर तुम्ही आत घेऊन तुम्हाला लागण होणं किती सोपं आहे.

अगदी तुमच्याकडे तोंड करून जरी अशी व्यक्ती खोकली किंवा शिंकली नसली तरी, व्हायरसयुक्त द्रवकण काही मिनिटांत मध्यम आकाराच्या खोलीत सर्वत्र पसरतात. अशी व्यक्ती शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही त्या खोलीत गेलात आणि काही श्वास घेतलेत, तरी इन्फेक्शन होण्याइतपत व्हायरस कण तुमच्या शरीरात शिरण्याची शक्यता असते.

याउलट नेहमीप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या श्वासोच्छवासातून दर मिनिटाला २० व्हायरस कण हवेत फेकले जातात. या परिस्थितीत तिथला प्रत्येक व्हायरस कण जरी तुम्ही तुमच्यात घेतलात, तरी संसर्ग व्हायला ५० मिनिटे लागतील (आवश्यक असलेले १००० व्हायरस कण भागिले २० प्रति मिनिट = ५०).

बोलण्याच्या क्रियेत मिनिटाला २०० व्हायरस कण हवेत फेकले जातात. त्यामुळे इथे संसर्ग व्हायला तुम्हाला समोरासमोर साधारण ५ मिनिटेच बोलणं पुरेसं आहे.

संदर्भ : Aerosol Emission and Superemission During Human Speech Increase With Voice Loudness

‘व्हायरसशी संपर्क x काळ’ या स्वरुपाची समीकरणं म्हणजे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चा पाया. तुमच्याबरोबर समोरासमोर १० मिनिटांपेक्षा जास्त काळ जो कोणी घालवेल, त्याला संसर्ग झाला असल्याची शक्यता गृहीत धरावी लागते. त्याचप्रमाणे तुमच्याबरोबर एकाच ऑफिसमध्ये दीर्घ काळ घालविलेल्या कोणाही व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता गृहीत धरावी लागते. आजाराची लक्षणं असलेल्या व्यक्तीने घराबाहेर न पडणं किती महत्त्वाचं आहे, हे यावरून लक्षात येतं – तुमच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने खोलीभर लोकांना संसर्ग व्हायची शक्यता असते.

आजार पसरविण्यात लक्षणं नसलेल्या व्यक्तींचा कितपत वाटा असतो?

आपल्याला माहीत आहे की एकुणात सुमारे ४४ % इन्फेक्शन्स, आणि सामाजिक पातळीवरची (कम्युनिटी ॲक्वायर्ड ट्रान्समिशन्स) बहुसंख्य इन्फेक्शन्स ही लक्षणं नसलेल्या (एसिम्पटोमॅटिक आणि प्री-सिम्पटोमॅटिक) व्यक्तींकडून झालेली असतात. लक्षणं दिसू लागण्याच्या ५ दिवस अगोदरपासून तुम्ही व्हायरस श्वासोच्छवासातून हवेत सोडत असता.

संसर्ग झालेले लोक कोणत्याही वयोगटाचे असू शकतात, आणि ते वेगवेगळ्या प्रमाणात व्हायरस हवेत सोडत असतात. एकच व्यक्ती आजाराच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात व्हायरस हवेत सोडते. व्यक्ती-व्यक्तीतही फरक असतो. साधारणपणे लक्षणं सुरु व्हायच्या थोडंसं आधी सर्वाधिक प्रमाणात व्हायरस शरीरातून हवेत सोडला जातो. गंमत म्हणजे २० % बाधित हे लोक ९९% व्हायरल लोड हवेत सोडण्याला जबाबदार असतात.

संदर्भ : Temporal dynamics in viral shedding and transmissibility of COVID-19 आणि Analysis of SARS-CoV-2 viral load by patient age

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तुम्हाला कोणते धोके संभवतात?

नर्सिंग होम्स मधून सुरु झालेल्या काही भयानक साथी वगळता, मोठ्या प्रमाणात ‘आउटब्रेक्स’ कुठून होतात? तर तुरुंग, धार्मिक समारंभ, ऑफिसेस, मीट-पॅकिंगसारखे उद्योग, आणि कॉल सेन्टर्स. जिथे हवा पुरेशी खेळती नसते, अशा बंदिस्त जागा आणि जिथे दाटीवाटीने लोक असतात अशा जागा सर्वाधिक धोक्याच्या.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कुठे कुठे काय काय होऊ शकतं?

उपाहारगृहे : एखाद्या उपाहारगृहात एका बाधित (पण लक्षणे नसलेल्या) व्यक्तीने जर ९-१० मित्रांबरोबर तास- दीडतास जेवण केलं, तर त्यापैकी ५०% लोक पुढच्या ७ दिवसात बाधित होतात. अर्थात यामध्ये हा समूह कुठे बसला, तिथे पंखा किंवा ए.सी. च्या हवेचा झोत कुठल्या दिशेने होता, वगैरे गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हवेच्या मुख्य झोताबाहेर असलेल्या इतर लोकांना संसर्ग होणार नाही.

संदर्भ : COVID-19 Outbreak Associated with Air Conditioning in Restaurant, Guangzhou, China, 2020

कामाच्या जागा, उदा. कॉल सेंटर : एका उदाहरणात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका बाधित व्यक्तीकडून त्याच्या मजल्यावरच्या २१६ पैकी ९४ लोकांना एका आठवड्यादरम्यान संसर्ग झाला. याच ऑफिसच्या वेगवेगळ्या मजल्यावरचे लोक लिफ्टमध्ये किंवा लॉबीमध्ये एकमेकांच्या संपर्कात आले, पण संसर्ग झाला तो एकाच मजल्यावरच्या लोकांना.
संदर्भ : Coronavirus Disease Outbreak in Call Center, South Korea

New York May 3 Covid Graph

अशाच प्रकारची उदाहरणं इनडोअर खेळ, आणि बर्थडे पार्ट्यांच्या बाबतीत आज अभ्यासली गेली आहेत. शिकागो शहरात कोव्हिड-१९चा प्रसार (घराच्या आत, आणि तिथून पुन्हा समाजात) मयतीचे कार्यक्रम, वाढदिवस, आणि चर्चच्या माध्यमातून झाला असावा असं दिसलं.
संदर्भ : A choir decided to go ahead with rehearsal. Now dozens of members have COVID-19 and two are dead
How an Edmonton curling tournament became a hotspot for the COVID-19 outbreak in Canada
Community Transmission of SARS-CoV-2 at Two Family Gatherings — Chicago, Illinois, February–March 2020

यावरून हे स्पष्ट होतं की सर्व इन्फेक्शन्स बंदिस्त जागांमध्ये, लोकांची गर्दी असलेल्या ठिकाणी झाली आहेत. त्यात भर म्हणजे भरपूर गप्पा, नाच-गाणी, आणि आरडाओरडा. घर, ऑफिस, सार्वजनिक वाहतूक, सभा-समारंभ, आणि उपाहारगृहे ९०% इन्फेक्शन्सला कारणीभूत आहेत. त्यामानाने शॉपिंग दरम्यान खूपच कमी इन्फेक्शन्स होतांना दिसतात. ज्या देशांनी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ व्यवस्थित केलं, तिथे सर्व मिळून केवळ एक ‘आउटब्रेक’ हा बाह्य वातावरणातून (आउटडोर एन्व्हायरनमेंट) झाला असल्याचं आढळून आलं. म्हणजेच एकूण इन्फेक्शन्सपैकी ०.३% हून कमी.

संदर्भ : Indoor transmission of SARS-CoV-2 - १ आणि

----
चार भिंतींच्या अंतर्गत सोशल डिस्टंसिंगचे नियम लागू होत नाहीत. बाह्य जगतात त्याला थोडंफार महत्त्व असलं, तरी बाधित व्यक्तीकडून पुरेसे व्हायरस कण तुमच्यापर्यंत पोचण्याइतका वेळ तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात नसता. शिवाय हवा खेळती असते, तुम्ही ६ फुट अंतर ठेवता. या खेरीज सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता वगैरे गोष्टींचा प्रभाव असतो तो वेगळा.

दुकानात किंवा मॉलमध्येही तुम्हाला कमी धोका असतो. पण तिथल्या कर्मचारी वर्गाला मात्र संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.
एवंच, तुम्ही घराबाहेर पडू लागल्यावर तुम्हाला तुमच्या विशिष्ट परिस्थितीचा अंदाज घेऊन – तुमच्या भोवती किती लोक असणार आहेत, तिथली हवा खेळती आहे का, तुम्ही किती वेळ तिथे असणार आहात – तुम्हाला असलेल्या धोक्याचा अंदाज बांधावा लागेल. थोडक्यात,

मोकळी, हवेशीर जागा, कमी लोक = कमी धोका.

इथे श्वासोच्छवासातून होणाऱ्या संसार्गावर भर दिला असला तरी द्रवकण कुठे विसावतात ते विसरू नका. वारंवार हात स्वच्छ धुवा, आणि चेहऱ्याला हात लावू नका! मास्क लावा!

----------------------

(अनुवादक पुण्यातील एका नामवंत वाहननिर्मिती कंपनीतून वैद्यकीय अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.)

निवेदन : सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे. प्रताधिकार उल्लंघन करण्याचा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.

मूळ लेखाचा दुवा

लेखामागची प्रेरणा - COVID-19 Superspreader Events in 28 Countries: Critical Patterns and Lessons

© 2020 Erin S. Bromage, Ph.D., Associate Professor of Biology at the University of Massachusetts Dartmouth.
This translation and the images accompanying it are provided on a not-for-profit basis and only meant for educational purposes. Neither Aisi Akshare nor the translator stand to gain anything on a commercial basis by this.

field_vote: 
0
No votes yet

सर्वसामान्य लोकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची सोप्या भाषेत थेट उत्तरे.
म्हणून खूप उपयुक्त लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूयॉर्क टाइम्झ मध्ये या ब्लॉग लेखाची लिंक मिळाली होती. अनुवादासाठी सुचविणार होतो, पण वाटलं की यूएस मधल्या लोकांना जास्त सूट होतोय आणि त्यांनी वाचलाही असेल कदाचित. पण अनुवाद आला ते उत्तम झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी म्हणेन सोप्या भाषेत जास्तीत जास्त शंकाचे समाधान लेखात केले आहे. .
मनात प्रश्न तर खूप आहेत.
लेखात दिलेल्या आकडेवारीत सामान्य लोकांनी guntnyachi गरज नाही ती आकडेवारी सामान्य लोकांसाठी नाही तर संशोधक लोकांसाठी आहे.
आपण फक्त एवढेच लक्षात ठेवायचे .
Physical antar राखायचे.
हात स्वच्छ धुवायचे, sanitize करायचे
मास्क वापरायचा.
चेहऱ्याला हात लावायचा नाही.
पोष्टिकं आहार घेणे,आणि नियमित व्यायाम करणे.
थोडी जरी शंका आली तरी डॉक्टर कडे जावून चेक करणे.
बस

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1