विविध वस्तूंवरच्या व्हायरसमुळे संसर्गाचा धोका
डॉ. अनंत फडके
वाण्याकडून आणलेले पुडे, भाजी-फळे अशा गोष्टींबाबत काय काळजी घ्यावी? पालेभाज्या, कोथिंबीर यासारख्या वस्तू खाण्याआधी धुताना नेहमीपेक्षा अधिक/वेगळी काळजी घ्यावी का? जे पदार्थ धुणं शक्य नाही त्या बाबतीत काय काळजी घ्यावी?
आधी हे लक्षात घेऊया की बहुसंख्य बाबतीत कोव्हिड-१९ची लागण होते ती बाधित व्यक्तीशी ‘घनिष्ट’ संपर्क आल्याने. ‘घनिष्ट’ संपर्क म्हणजे बाधित व्यक्तीशी ६ फूट अंतराच्या आत १५ मिनिटापेक्षा जास्त वेळ संपर्क येणे. त्यातून होणाऱ्या लागणीपासून बचाव करण्यासाठी ६ फुटाचे अंतर व घराबाहेर पडतांना मास्क घालणे, घरी आल्यावर साबण-पाण्याने हात धुणे हे कटाक्षाने पाळले पाहिजे.
घराबाहेरील वस्तू आत आल्याने लागण होणे याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे त्या शक्यतेचा धसका घेऊ नये, पण योग्य, नेमकी काळजी घ्यावी. बाहेरून आणलेल्या सामानाची कापडी पिशवी थेट स्वयंपाकघरातील ओट्यावर ठेवावी. तसराळ्यात, ताटात रिकामी करावी. रिकामी झालेली कापडी पिशवी थेट साबण-पाण्यात टाकावी किंवा ‘अलगीकरण कक्षात’ ठेवावी. (‘अलगीकरण कक्ष’ म्हणजे घरातील असा एक कोपरा की ज्यात बाहेरून आलेली प्रत्येक वस्तू कमी-जास्त काळ अलग ठेवली जाईल.) आतील प्लास्टिकच्या पिशवीतील सामान (डाळ, तांदूळ इ.) थेट डब्यात भरून तसेच दूध आणल्यास ते भांड्यात काढून वरची प्लास्टिकची पिशवी साबण लाऊन धुवावी अथवा थेट कचऱ्याच्या डब्यात टाकावी.
फळभाज्या, फळे धुवून, कोरड्या करून नंतर फ्रीजमध्ये ठेवाव्या. मग आपले हात साबणाने धुवून टाकावे. साध्या पाण्याने धुतलेल्या पालेभाज्या, कोथिंबीर इ. कच्च्या खाल्याने कोव्हिड-लागण होते की नाही असे नेमके संशोधन झालेले नाही. पण शक्यता फारच कमी आहे. कोव्हिड-१९ हा श्वसन-संस्थेचा आजार असला तरी जादा काळजी म्हणून पालेभाज्या शिजवूनच खाव्या.
बाहेरून तयार जेवण मागवावे का? मागवले तर काय काळजी घ्यावी?
हरकत नाही. त्यासोबत आलेले वेष्टण कचऱ्याच्या डब्यात टाकल्यावर हात धुवून टाकावे. हे अन्न गरम करून खावे.
इमारतीचे फाटक, दरवाजे (हँडल्स), लिफ्टची बटणे, जिने इ. ठिकाणी – म्हणजे जिथे अनेक लोकांचा वावर असतो आणि जिथे अनेक लोकांचे हात लागतात – अशा वस्तूंना स्पर्श होतो तेव्हा काय काळजी घ्यावी?
त्यानंतर घरी किंवा ऑफिसमध्ये पोचल्यावर हात साबण-पाण्याने धुवून टाकावे. तोपर्यंत हात नाकाला न लावण्याचे पथ्य पाळावे.
---
डॉ. अनंत फडके गेली अनेक वर्षे सार्वजनिक आरोग्यसेवेतील प्रश्नांवर काम करत आहेत. ते पुण्यातील 'जन आरोग्य अभियाना'चे सहसंस्थापक आहेत. 'ऐसी अक्षरे'च्या विनंतीवरून त्यांनी जनप्रबोधनासाठी सामान्य माणसांच्या करोनाविषयक शंकांना उत्तर देण्याचे मान्य केले आहे.
(क्रमशः)