करोना काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग ३)

तीनचार महिन्यांत हे सगळं आटोक्यात येईल आणि गणपती अगदी नेहमीप्रमाणे नाही तरी खूपशा उत्साहात साजरा करता येईल अशी अनेकांची धारणा सुरुवातीला होती, ती किती चुकीची होती ते सध्या दिसतंय. भीतीचं सावट अधिक गडद झालंय. कोणालाही विचारलं, तुमच्या ओळखीतल्या कोणाला लागण झालीय का वा मृत्यू झालाय का, याचं उत्तर १००% 'हो' येतंय. अनेक लोक बरे झाल्याचेही अनुभव आहेतच पण भीतीदायक जास्ती आहेत असं वाटतंय. एकदा झाल्यानंतर त्यातून सुटका झाली एकदाची, ही भावनाही चुकीची ठरते आहे. शिवाय बरं झाल्यानंतर अनेक दिवस त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसतायत. आणि लक्षणं नसणारे लाखो लोक असणार आहेत हे वाचून तर आपल्याला नक्की झाला असणार असं वाटणारे लोकही अनेक असणार आहेत.

सुरुवातीला असं ऐकलं होतं की आताच होऊन गेलेला बरा, नंतर हॉस्पिटलमध्ये बेड नसणार, आरोग्य यंत्रणेचे बारा वाजलेले असतील, वगैरे. पण मुंबईत तरी बेड उपलब्ध आहेत असं दिसतंय, आरोग्य यंत्रणा बऱ्यापैकी सुरळीत सुरू आहे. अर्थात सगळं काही उत्तम आहे असं म्हणायचं नाही पण अगदी बोऱ्या नाही वाजलेला. अँटीजेन अँटीबॉडी टेस्ट करून घ्यावी का हाही प्रश्न अनेकांच्या मनात आहेच. 

School
छायाचित्र प्रातिनिधिक. आंतरजालावरून साभार.

शैक्षणिक क्षेत्राची अवस्था त्याहून अधिक वाईट असावी की काय अशी शंका घ्यायला मात्र वाव आहे. सरकार/न्यायालयाने मुलांसाठी तास किती घ्यायचे हे ठरवून दिले असले तरी अशी ऑनलाइन शिकणारी मुलं गावांमध्ये दिसणं जरा दुर्मिळच आहे. परवाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकाची पोस्ट पाहिली की त्याच्या ओळखीच्या एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याने त्याच्याकडे सेकंड हॅन्ड मोबाइल मिळेल का असं विचारलं होतं. दोन मुलं असलेल्या या शेतकऱ्याला दोन नवीन स्मार्टफोन घेणं कठीण झालं होतं. चंद्रपूरातल्या एका कॉलेजात शिकवणारी मैत्रीण सांगत होती, शहरातल्या मुलांकडे आहेत स्मार्टफोन पण बहुतेक मुलं गावाहून येतात रोज, त्यांच्याकडे फोन नाहीत, वीज नाही, नेटवर्क नाही. ती सध्या फक्त नोट्स काढतेय. वर्ग सुरू नाहीतच. ठाण्यातली एक सुखवस्तू म्हणावी अशी मैत्रीण. मोठी मुलगी आणि धाकटे जुळे मुलगे. नवरा घरून काम करणारा. एका वेळी चार लॅपटॉप/स्मार्टफोन घरात सुरू असतात काही वेळ तरी. वायफाय मग हाय खातं अनेकदा. अगदी लहान मुलांकडे फोन नसतो, आईच्या फोनवर त्यांचं शिक्षण सुरू. मग आईचे कामाचे फोन बाबाच्या फोनवर येतात, वगैरे वगैरे. 

पहिल्या भागात उल्लेख केलेली अमेरिकेत शिकत असलेली छोटी मैत्रीण आता परत येतेय, तिला नोकरी नाही मिळाली. ती म्हणाली, दिलासा एवढाच की मी कमी पडतेय म्हणून नोकरी मिळत नाहीये अशी परिस्थिती नाही. कोणालाच नोकरी मिळत नाहीये. त्याच भागात उल्लेख केलेले, जबलपूरला अडकलेले ज्येष्ठ नागरिक नातलग गेल्या आठवड्यात परत येऊ शकले. त्यांची टेस्ट करून घेतली, विमान प्रवासात लागण होण्याची शक्यता वाटत होती म्हणून. तिच्यासाठी खाजगी लॅबने ५ दिवसांनंतरची वेळ दिली होती, रिपोर्ट नंतर दोन दिवसांनी मिळाला. नेगेटिव्ह आलाय. 
परदेशातून येणाऱ्या लोकांची हॉटेल quarantine वगैरेची बरी सोय मुंबईत तरी होत असल्याचं कळतंय. 

मुंबईत अनेक ठिकाणी अजूनही मदतनीस बायका येत नाहीयेत, काही ठिकाणी स्वयंपाकिणी येऊ लागल्यात इतकंच. बायकांच्या/ घरातील सर्वांच्या काम करण्याच्या, स्वयंपाकाचे प्रयोग करण्याच्या उत्साहाला ओहोटी लागली आहे. मी पहिले तीन महिने एक दिवसाआड लादी पुसत होते आता १५ दिवस होऊन गेलेत, लादी पुसलेली नाही!

एकीकडे परिस्थिती हळूहळू सुरळीत होतेय असा दिलासा वाटतोय, दुसरीकडे प्रचंड भीतीदायक, निराश, आणि उदासवाणं वातावरण अशा कात्रीत अनेक लोक आहेत.

---
याआधीचे भाग :
भाग १
भाग २

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा कोरोनामुळे झालेला दैनंदिन जीवनाचा खेळखंडोबा किती दिवस/महिने/वर्षे चालेल हे कुणालाच माहीत नाही. आता त्याच्या बरोबरच दिवस काढावे लागणार, हे सामान्य जनतेच्या लक्षांत आलंय, पण राज्यकर्त्यांच्या आलं नसावं! ताज्या राऊत-ठाकरे मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणतात, ' कुणाला कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन काढणार नाही. म्हणजे रोजगार बुडून कासावीस झालेली गरीब जनता यांना दिसत नाही का ? हे तर टिपिकल ममव स्टेटमेंट झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.