महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी

महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी

परिचय : डॉक्टर विनय कुलकर्णी ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ आहेत. गेली अनेक वर्षे ते पुण्यात प्रॅक्टिस करतात अन काही नामवंत हॉस्पिटल्सशीही संलग्न आहेत. त्याशिवाय पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘प्रयास’ या संस्थेचे ते एक संस्थापक आहेत. ‘प्रयास’च्या आरोग्य विभागाद्वारे त्यांनी एचआयव्ही / एड्सवर अतिशय मौलिक काम केलेले आहे. व्हायरसच्या साथीचा अभ्यास, रोगावर उपचार आणि रोगाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचाही अभ्यास अशा वेगवेगळ्या अंगांनी ते अनेक वर्षे कार्यरत आहेत. आताही दीनानाथ हॉस्पिटल आणि खाजगी प्रॅक्टिसच्या माध्यमातून ते करोनाच्या रुग्णांचे समुपदेशन करत आहेत.

Dr. Vinay Kulkarni

प्रश्न : ‘चीनमध्ये काही तरी नवा व्हायरस आलेला आहे’ अशा बातम्या येऊ लागल्या इथपासून ते भारताचा जगात दुसरा नंबर आणि पुण्याचा भारतात पहिला नंबर इथपर्यंत आपण आलो आहोत. या दरम्यान साथ कशी उत्क्रांत होताना दिसली?

उत्तर : माझं प्रत्यक्ष शिक्षण आणि मी ज्या विषयावर बोलतोय (म्हणजे विषाणूशास्त्र), ह्याचा एकमेकांशी काही संबंध नाही हे आधी स्पष्ट करतो. आणि तरीदेखील गेली पस्तीसेक वर्षे मी या सगळ्याकडे बघतोय.

HIVच्या प्रत्यक्ष केसेस आपल्याकडे येण्यापूर्वी, आणि जसजशी त्याची साथ येत गेली तसा त्याबरोबर मी त्याबद्दल शिकत गेलो, त्याची मला कोविडची साथ समजून घ्यायला फार मोठी मदत झाली.

मला जे समजलं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सध्याच्या जगात एखादी साथ वूहानमध्ये चालू झाली आणि वूहानमध्येच संपली असं होणं शक्य नाही. HIV बाबतीत आपल्याकडे असं बोललं गेलं होतं की आपल्या नैतिकतेमुळे आपल्याकडे ही साथ येणार नाही. पण तसं काही झालं नाही.

ज्या प्रमाणात सध्या मानव समूह इकडून तिकडे प्रवास करत असतात, एकमेकांत मिसळत असतात, अशा परिस्थितीत असुरक्षित शरीरसंबंधांमधून पसरणाऱ्या रोगाची साथ जर सात-आठ वर्षात सगळीकडे पसरू शकत असेल तर एखादा विषाणू – जो मुख्यतः श्वसनमार्गावाटे पसरतो आणि तो आत्तापर्यंत आलेल्या विषाणूंच्यापेक्षा खूप जास्त संसर्ग करण्याची क्षमता असलेला आहे – त्याची साथ कुठे तरी थांबवता येईल असं कुणाला वाटलं असेल, तर तिथे पहिली चूक झाली. HIV किंवा आधी आलेल्या इतर साथींकडून आपण फारसे काही शिकलो नाही असं म्हणावं लागेल.

दुसरी गोष्ट (आपण काही शिकत नाही याचंच ते उदाहरण आहे) म्हणजे अशा पद्धतीच्या साथीला आपण कशा पद्धतीने तोंड द्यायला पाहिजे हे ठरवताना, त्याचं गांभीर्यच न कळल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये "ठीक आहे, आधी आपण आपल्या सामाजिक, राजकीय गोष्टी उरकून घेऊ आणि मग बघू याच्याकडे" अशा पद्धतीचा उशीर होत गेला.

तिसरी गोष्ट म्हणजे – सध्याचं जग हे 'एव्हिडन्स-बेस्ड मेडिसिन' आणि पुराव्यावर इतकं अवलंबून आहे, पण त्यातला कुठला पुरावा आपल्यासाठी महत्त्वाचा – कशासाठी महत्त्वाचा यामध्ये जरा गडबड झाली असं मला वाटतं. साधा कॉमन सेन्स आहे की जर हे प्रामुख्याने नाकातोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमार्फत (रेस्पिरेटरी ड्रॉप्लेट्समधून) पसरणारं इन्फेक्शन आहे, तर त्याला थोपवण्यासाठी मास्क वापरला पाहिजे. त्याउलट इथे मास्कवरती सहा महिने चर्चा, की तो कुठला वापरला पाहिजे, कधी वापरला पाहिजे, तीन पदरी असला पाहिजे का दोन पदरी पुरेल, साधा पदर चालतो की नाही, किंवा हे तुषार तीन फुटावर जातात की सहा, आणि जमिनीवर दहा सेकंदात पडतात का चाळीस सेकंदात पडतात, या आणि तसेच लाकडावर पडल्यावर जास्त काळ जिवंत राहतात की धातूवर, आणि किती तास, असल्या साऱ्या गोष्टींभोवती हे जग घोटाळत राहिलं. त्यामुळे आपला जो पहिला प्रतिसाद होता – लॉकडाऊन टाकण्याचा, (याबद्दल आपण नंतर बोलू) तो पूर्ण काळ आपण मास्कबद्दल बोलण्याऐवजी वाया घालवला, आणि त्यावेळी फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवर काय काय करता येईल एवढाच विचार केला गेला. त्या काळात लोकांना घरी बसवलं, लोकांनी हात धुतले, इमारती, गाड्या, वृत्तपत्रं, चपला इ. सॅनिटाईझ केल्या, बसेस सॅनिटाईझ केल्या, रस्ते पाण्याने की कुठल्या केमिकलनी धुतले. या सर्व गोष्टी करून आपल्याला संरक्षण मिळणार आहे अशी समजूत करून घेतली, आणि यात मग मास्क वापरणं अनिवार्य आहे इथपर्यंत पोचायला आपण खूप उशीर केला. त्याच्यानंतर जेव्हा विषाणू आपल्याकडे झपाट्याने पसरत गेला, त्या वेळी पुन्हा (म्हणजे मोठमोठ्या पातळीवर वेगवेगळे साथतज्ज्ञ इथे असूनही!) ज्या पद्धतीने हे हाताळलं गेलं त्याच्यामध्ये माझ्या मते आपण एक घोडचूक अशी केली, की ज्या वेळी ही साथ भारतभर पसरलेली नव्हती, त्या काळामध्ये भारतभरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी पसरलेल्या समूहांना एकत्र, गर्दीमध्ये एकमेकांच्या बरोबर राहण्याला आपण बाध्य केलं (जिथे दो गज दूरी अशक्य होती), आणि त्यांच्यामध्ये पुरेशा प्रमाणात साथ पसरल्यानंतर त्यांना आपापल्या घरी पाठवून दिलं. कदाचित एक्सपोजर कमी असताना हे लोक घरी गेले असते, तर साथ धीम्या वेगाने पसरली असती. लाखो लोक इन्फेक्ट झाल्यानंतर आपण लोकांना घरी सोडलं त्यामुळे आपल्याकडे ही साथ जास्त वेगाने पसरली असं मला वाटतं.

बदलत गेलेल्या गोष्टी : अर्थातच दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात, आणि त्याची कारणं त्या विषाणूमध्ये आहेत का त्या व्यवस्थांमध्ये आहेत हे मला आत्ता कळत नाही, पण भारतामध्ये, किंवा विशेषतः भारताच्या काही भागांमध्ये – जिथे साथ अत्यंत जोरात सुरू होती – तिथली साथ गेल्या आठ-पंधरा दिवसांत फार झपाट्याने ओसरू लागली आहे. ते सर्वत्र जाणवत आहे. काही लोकांना असं वाटत आहे की यात आकड्यांची लपवाछपवी आहे, टेस्टिंगच कमी की रोगी कमी. पण ते खरं नाही. हॉस्पिटल्सवरचा दबाव नक्कीच कमी झालेला आहे. परंतु आजही बघितलं तर भारतभरामध्ये जेमतेम १० ते १२ % जनसंख्या आत्तापर्यंत विषाणूला एक्सपोज झाली असायची शक्यता आहे म्हणजे जवळजवळ ८०-९० % जनता ही अजून एक्सपोज्डच नाही [संदर्भ : ICMRने केलेला दुसरा सीरो-सर्वे]

त्यामुळे ही साथ यापुढे पसरेल त्या वेळी भारतात ती कशा पद्धतीने पसरणार आहे, त्याचं स्वरूप काय असेल याबद्दल फार आकलन झालं आहे असं मला दिसत नाही. त्या वेळी कदाचित साथीचा पसरण्याचा मार्गही वेगळा असणार आहे. शहरांमध्ये, जिथे गर्दी खूप असते, लोक अत्यंत दाटीवाटीने जमलेले असतात, झोपडपट्टीसारख्या ठिकाणी राहत असतात, अशा ठिकाणी पसरणारी साथ, आणि जेव्हा ती खेड्यांमध्ये पसरायला लागेल, (जिथे घरं दूर असतात, एका घरामध्ये फार माणसं दाटीवाटीने नसतात, मोकळ्या हवेमध्ये लोकांना बसायची शक्यता असते), अशा परिस्थितीत साथ पसरण्याचे मार्ग, कारणं, आणि प्रसारामागचे ड्रायव्हर्स कदाचित वेगळे असणार. शहराशी संपर्क, शहरांतून गावांकडे आणि गावांतून शहरांकडे किती लोक येत आहेत, किती वेगाने परत जात आहेत, आल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात कसे येताहेत, किंवा गावागावांमधली एकत्र जमण्याची ठिकाणं कुठली, आठवडे बाजार असतील, उरूस असतील वगैरे या गोष्टींमुळे ती साथ पसरायची शक्यता आहे.

शिवाय, आतापर्यंत या सगळ्या प्रकारात सर्व निर्णय हे फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्हली घेण्यात आले आहेत, त्यात एपिडेमियॉलॉजीचा – रोगांच्या साथीचा - अभ्यास केलेले लोक – आणि प्रत्यक्ष लोक म्हणजे जनतेचा सहभाग अत्यंत कमी राहिलेला आहे. तुम्ही घरात बसा, बाहेर बसू नका; किंवा तुम्ही मास्क नाही लावला तर तुम्हाला दंड करतो या पातळीवरच सगळं चालू आहे. हे कुठं तरी समजून घ्यायला पाहिजे की या पद्धतीच्या साथी जेव्हा येतात, किंवा पुढच्या येणाऱ्या साथी, मुख्यतः वेगाने पसरणाऱ्या साथी या श्वसनमार्गाद्वारे पसरणाऱ्याच असणार. कारण बाकीच्या मार्गाने येणारे जंतू कसे रोखायचे हे आपण जाणतो, ते करू शकतो. त्याच वेळी, ही साथ आपल्याला मोठ्या प्रकारचे धडे देतीय. यापुढे त्याचं डॉक्युमेंटेशन असायला हवं आणि पुढच्या वेळी जर असं काही घडलं तर किमान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय तरी नीट घेतले जावेत.
बाधितांबाबतीत झालेला बदल म्हणजे मृत्यूदरही आता कमी झालेला आहे – आपल्याकडेच नाही तर युरोपमध्येही. एप्रिल-मेच्या सुमाराला जेवढ्या प्रमाणात इंग्लंड, स्पेन, इटली मध्ये रोजच्या रोज रोगी येत होते, तेवढेच आत्ताही तिथल्या दुसऱ्या लाटेत येताहेत, परंतु तेव्हा पाच हजार नवीन रोग्यांमध्ये ४००-५०० मृत्यू होत असतील तर आता ते ४०-५० वर आले आहेत. याची कारणं दोन-तीन असू शकतात. याबाबत कदाचित मतभेदही असू शकतात – की विषाणू हा सौम्य झाला आहे की काय, आपली प्रतिकार शक्ती जास्त वाढली आहे काय – याबद्दल काही माहिती नाही. आपण घरी राहून उपचार करू शकतो अशा गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित माहीत नव्हत्या त्यामुळे निदान झालेला प्रत्येक रोगी हा हॉस्पिटलमध्ये पोचत होता, आणि मग त्याला तीन-चार दिवस काही न करता ठेवलं जात होतं, त्यातून हॉस्पिटलमध्ये जागा कमी असणं, सिरीयस होऊ घातलेल्या रोग्यांना जागा न मिळणं, यामुळेही कदाचित मृत्यू जास्त झाले असतील. मी याबाबत फार अधिकारवाणीने सांगू शकत नाही. पण मृत्युदर निश्चित कमी झाला आहे. प्रोटोकॉल्स एस्टॅब्लिश झाले आहेत. तरीही दर पंधरा दिवसांनी काही तरी वेगळं येतं - म्हणजे NEJM मधलं आर्टिकल असं येतं की अमुक वेळेला रेमडेसिव्हीर वापरलं असता, मृत्युदरावर फरक पडत नसला तरी पाच दिवस हॉस्पिटलायझेशन कमी होतं. सॉलिडॅरिटी ट्रायल असं सांगते की रेमडेसिव्हीरचा फारसा फायदा नाही.

असे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावर नवनवे घोळ चालू आहेत. शास्त्रज्ञांनी या साथीचा मोठ्या प्रमाणावर फायदा उचलला आहे असं मला वाटतं. शास्त्रज्ञ आणि सुडो-शास्त्रज्ञ. ज्याला कुणाला पेपर पाडायचा होता त्या सगळ्यांनी पेपर लिहून घेतले आहेत. त्यामुळे चांगल्या दर्जाचे पेपर कुठले हे शोधणं कठीण झालं आणि त्यामुळे गोंधळ खूप वाढला. शास्त्रज्ञांनी कन्फ्युजन्स वाढवली, मिडीयानी वाढवली, आणि सोशल मिडीयानी तर प्रचंड प्रमाणात वाढवली. आणि मग अशा पद्धतीचं संकट आपल्याकडे येतं त्यावेळी सगळ्यात छान छंद लोकांना जडतो तो म्हणजे कॉन्स्पिरसी थिअरीज. हा कुणाचा तरी मानवजातीविरुद्धचा कट आहे अशा थिअरीज. किंवा कोविड असं काही नाहीच आहे. हे सगळं एचआयव्हीच्या काळातही झालं होतं. या सगळ्यांनी खूप घोळ झाले. पण आता असं दिसतं आहे की लोकांना त्याची जाणीव होऊन गेली कदाचित. पुण्यातही मास्कच्या बाबतीतलं माझं प्रत्यक्ष निरीक्षण असं आहे की जोपर्यंत लोकांच्या आसपासचे, परिचयातले कुणी बाधित होऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन सिरीयस झाले नव्हते किंवा मृत्यू पावले नव्हते तोपर्यंत लोकांना मास्कचं महत्त्व कळत नव्हतं. आणि आता मात्र सुशिक्षित मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांमध्ये मास्कचा वापर वाढला आहे. दुसऱ्या पातळीवर गरीब वस्त्यांमध्ये आपण गेलो तर लक्षात येतं की आपल्यावर येणारं संकट आता टळून गेलं आहे, हे त्यांना कळून चुकलेलं आहे. वस्त्यांमधले ६०-७०टक्के लोक इन्फेक्ट होऊन गेलेले आहेत, हर्ड इम्युनिटी म्हणजे काय हे त्यांना कळत नसेल पण त्यांनी मास्क वापरणं सोडून दिलेलं आहे कारण नव्यानं लागण होण्याचं प्रमाण कमी झाल्याचे त्यांना दिसतं आहे.

त्यामुळे हे सगळंच गडबडीचं आहे. आणि या अशामध्ये कधीही लोकांना कुठे सामील करून घेतलं नाही ही मोठी त्रुटी राहिली आहे. ही माझी प्राथमिक निरीक्षणं आहेत.

प्रश्न : इथे एका गोष्टीचा तुम्ही जाता जाता उल्लेख केलात की सतत प्रोटोकॉल्स बदलत होते. काही प्रमाणात असे बदल अपरिहार्य होते कारण विषाणू नवीन होता किंवा सारख्या नवीन गोष्टी समोर येत होत्या. पण बाधित रोगी तर सारखे येत होते. या वारंवार होणाऱ्या बदलांना डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स कशी सामोरी गेली?

उत्तर : वर मी म्हटल्याप्रमाणे एका विशिष्ट पातळीवरती शास्त्रज्ञांनी खूप गडबडी केल्या असं म्हणलं तरी शास्त्रज्ञांमध्ये एक प्रकारचं नेटवर्क होतं. मी फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच काम केलं त्यामुळे मी तिथला अनुभव सांगतो. दीनानाथमध्ये काय प्रकारांनी औषधोपचार करावेत यासाठी जवळजवळ रोजच्या रोज – आमच्या व्हाट्सॲप ग्रुपवर असेल किंवा इतरत्र असेल - अमेरिकेत, इटलीत, स्पेनमध्ये डॉक्टरांचे अनुभव काय आहेत याची देवाणघेवाण सातत्याने चालू होती. सर्वच जण अंधारात चाचपडत होते पण काहीएक प्रोटोकॉल्स हे इव्हॉल्व्ह होत गेले. काही तर्कांवरती होते – म्हणजे उदाहरणार्थ सॅच्युरेशन कसं मोजायचं, ३-मिनिट वॉक टेस्ट करणं अशा सगळ्या गोष्टी लोक शिकत गेले. त्यानंतर बऱ्याच बाधित रोग्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज नसते हे समजत गेलं. त्याच्या पलीकडचे जे उपचार आहेत, म्हणजे स्टिरॉइड्स वापरणं, डेक्झामेथासोन काम करतं, हे अनुभवातून लोकांनी शेअर केलं होतं म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जात होतं. मला माहीत नाही की ते अभ्यासावर आधारित होतं का. सगळी व्हायरसवरची औषधं पणाला लावली होती – शिवाय HCQS असेल किंवा आयव्हरमेकटिन असेल – मी त्या काळी गमतीने म्हणायचो की कुठलाही घोडा उचलायचा आणि कुठल्या तरी बैलगाडीला लावायचा आणि ती गाडी व्यवस्थित चालेल अशी अपेक्षा आपण करतो आहोत. शिवाय प्रत्येक जण छातीठोक सांगणार की मी सांगतोय ते गेम चेंजर आहे. यादीच काढायची म्हटली तर तीस-चाळीस औषधं त्या आजाराच्या अंगावर फेकून बघण्यात आली. हे ठीक आहे – म्हणजे, जेव्हा नवीन विषाणू असतो तेव्हा प्रतिसाद त्याच प्रकारचा असतो. मी एक दिवस कुणाला तरी म्हटलं की अरे कुष्ठरोग्यांमध्ये अमुकअमुक औषध वापरलं जातं, ते अजूनपर्यंत कसं वापरून बघितलं नाही? साधारण पंधरा मिनिटांच्या आत मला कुणी तरी एक पेपर दाखवला की हे पण आम्ही ट्राय करून बघितलं आहे. त्यामुळे सर्वच जण चाचपडत असताना, या प्रकारचे ट्रायल अँड एरर करत लोक शिकले. त्या काळामध्ये औषधंच उपलब्ध नव्हती. पण रेमडेसिव्हीरसारखं औषध, ज्यात लॉजिक असं सांगतं की ते जर अँटीव्हायरल औषध असेल, तर ते खूप उशिरा वापरण्याने त्याचा काही फायदा होणार नाहीये, ते सरसकट वापरलं गेलं. त्या आजाराचे दोन टप्पे दिसतात – पहिला टप्पा विषाणूमुळे असतो आणि दुसरा टप्पा विषाणूला शरीराकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे असतो (सायटोकाईन स्टॉर्म). ७०-८० टक्के बाधित लोकांमध्ये CT Scan केला तर त्यांच्या फुफ्फुसांमध्ये व्हायरल न्यूमोनिया दिसतो. पण त्यातल्या ८०-९० टक्के लोकांचा जर आपोआप बरा होणार असेल, तर त्यांना काही करायची गरज नाही. पण ज्या क्षणी तुम्हाला असं दिसतं की या माणसाचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागलंय, किंवा दम लागायला लागला आहे, तेव्हा तो न्यूमोनिया वाढायला लागलेला असतो. हा व्हायरल न्यूमोनिया असतो. त्या काळामध्ये ज्यांना ज्यांना रेमडेसिव्हीर मिळालं त्यांना त्यांना चांगला फायदा झाला. जो माणूस रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये गेलेला आहे, ज्याला व्हेंटिलेटर लागतो आहे, त्याच्यामध्ये आधीच उशीर झालेला आहे – म्हणजे विषाणूमुळे होणारे दुष्परिणाम संपलेले आहेत आणि आता सायटोकाइन स्टॉर्म सुरू झालेलं आहे. अशा वेळी ते औषध घेण्यात काही अर्थ नाही. पण अर्थातच ही औषधं इतकी महाग असल्यामुळे असंही झालं की उच्च आर्थिक गटातले जे लोक हॉस्पिटलमध्ये जाऊन सिरीयस व्हायला लागले त्यांच्या बाबतीत तेव्हा दोन्ही बाजूचं प्रेशर होतं – की पेशंट सिरीयस होतोय, मग पुन्हा त्याच्या अंगावर जे मिळतंय ते औषध फेका, रेमडेसिव्हीर देऊन बघा, प्लास्मा देऊन बघा – कारण शेवटी आपल्याला काहीच कळत नाही की कशाचा उपयोग किती होतो. दुसऱ्या बाजूला लोकांकडूनही दबाव, कारण सतत वाढती मृत्युसंख्या. त्यामुळे आपण सगळंच देऊन बघू. यातून साहजिकच असं होतं की रिझल्ट्स येतात तेव्हा असं लक्षात येतं की ज्या वेळी सगळेजणच चाचपडत असतात त्या वेळी कशामुळे काही फरक पडतो हे कळायला देखील खूप वेळ लागतो. तेवढा वेळ आणीबाणी सदृश परिस्थितीत हातात नसतो. हे सगळं काही प्रमाणात अपरिहार्य होतं. कारण सगळं प्रकरण नुसतंच नवीन नाही तर अनपेक्षितपणे अंगावर आदळलं होतं.

पण मला असं वाटतं की योग्य वेळेला वापरलेल्या योग्य औषधांनी फरक पडत होता. हे प्रोटोकॉल्स हळूहळू इव्हॉल्व्ह झाले. हॉस्पिटल्सनी त्यांचे त्यांचे प्रोटोकॉल्स केले. यात मोठा भाग खाजगी हॉस्पिटल्सचा आहे असं म्हणत नाही – KEM (मुंबई) सारख्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणावर या साथीला तोंड द्यायला लागलं, जिथे हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय एकत्रच आहे (उदा. KEM), तिथल्या डॉक्टरांनी आपापल्या अनुभवातून नवीन प्रोटोकॉल्स केले. ते दर पंधरा दिवसांनी रिव्हाईज केले. अन लोकांचे अनुभव शेअर केले.

प्रश्न : या काळात काही लोकांच्या गोंधळाच्या प्रतिक्रिया यायला लागल्या, यातली एक अशी होती की समजा काही लक्षणं दिसू लागली तर अनेक डॉक्टर्स सांगत की तुम्ही टेस्ट करू नका, घरात बसा. तर अनेक लोक हे विचारायचे की टेस्ट करू नका हे का सांगताहेत हे कळत नाहीये. किंवा, काही लोकांकडून अशीही माहिती आली की जे वयाने थोडे मोठे डॉक्टर्स आहेत ते थोडे निश्चिंत आहेत आणि त्या मानाने तरुण डॉक्टर्स थोडे जास्त व पटकन ओव्हररिॲक्ट होताहेत. हे तुम्हाला पाह्यला मिळालं का?

उत्तर : याच्यात दोन भाग आहेत. पहिला भाग आहे की टेस्ट करू नका. जर तुम्ही संशयित बाधित असाल, आणि लक्षणं /आजार सौम्य असेल तर तुम्ही जाऊन टेस्ट करून काय करणार? तो प्रश्न फक्त आयसोलेशन का क्वारंटाईन असा मर्यादित, थोडासा शब्दच्छल आहे. संशयित बाधित माणसाला क्वारंटाईन केलं जातं आणि पॉझिटिव्ह माणसाला आयसोलेट केलं जातं. दोघांना काय करायला सांगितलं जातं, तर तेच करायला सांगितलं जातं. कुणाच्या संपर्कात येऊ नका वगैरे. अशा वेळेला, उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये कुणाला संसर्ग झालेला आहे, तर घरातल्या इतरांना "ह्यांच्याशी संपर्क येऊ देऊ नका" असं सांगितलं जाई. आता ज्यांना होम आयसोलेशन सांगितलं आहे त्यांना मुद्दाम बाहेर जाऊन टेस्ट करून यायला सांगण्यात काय अर्थ होता?

शिवाय टेस्टची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसीफिसिटी हेही प्रश्न होते. ज्यांना लागण आहे अशांपैकी फक्त ७०-८० टक्के लोकांमध्येच नक्की कळतं, तीस टक्के लोकांमध्ये लागण असूनही कळतच नाही. मग टेस्ट आधी करायची की काही दिवसांनी? मग RTPCR जाऊन रॅपिड अँटीजेन टेस्ट आली. मग त्याची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसीफिसिटी याच्याइतकीच आहे का, कमी आहे, जास्त आहे हे आपल्याला माहीत नव्हतं. म्हणजे तुम्ही घरीच आहात, तुमचा संपर्क कुणाशी तरी आलेला आहे, तुमचा घसा खवखवतो आहे, तुम्हाला वास येईनासा झालेला आहे, तर अशा वेळेला तुम्हाला पुढचे चौदा दिवस तसंही घरातच बसायचं आहे तर तुम्ही जाऊन टेस्ट कशाला करायची?

पण तुम्हाला काही झालेलं नाहीये आणि तुम्ही टेस्ट करायची नाहीये हा चुकीचा संदेश आहे.

फिव्हर OPD मध्ये त्यांनी एक प्रोटोकॉल केला होता की कुणाला टेस्ट करायला सांगायची, कुणाला नाही सांगायची.

यावेळी अनेकांच्या बाबतीत असं झालं की लक्षणं आहेत, मला झालंय का, तर काही डॉक्टर सांगत "झालं नाहीये तुम्ही टेस्ट करून घेऊ नका", पण त्यासोबत क्वारंटाईन करण्याचा संदेश दिलाच गेला नाही. किंवा संदेश मिळूनही त्याकडे कानाडोळा केल्यामुळे लोक बाहेर फिरत राहिले, त्यांच्यामुळे आजार पसरत गेला. त्यानंतर सिरीयस झाल्यांनतर टेस्ट केल्या त्या पॉझिटिव्ह आल्या. या पद्धतीचे घोळ झाले. ती साखळी आहे – तुम्ही सस्पेक्ट करता, टेस्ट करता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता, आयसोलेट किंवा हॉस्पिटलायझेशन करता – ही सगळी साखळी पाळली जाणार असेल, तर टेस्ट करायला सांगणं वेगळी गोष्ट. नाही तर "तुम्ही घरातल्या सगळ्यांनी १४ दिवस आयसोलेट करा, सगळ्यांचं (ऑक्सिजन) सॅच्युरेशन चेक करत रहा, थोडा फार ताप आला तर क्रोसीन घ्या" एवढं पुरेसं आहे. एखाद्याला लक्षणं दिसली तर, आणि त्याचं जर ट्रायेजिंग वेगळं असेल तर टेस्ट कर/करू नको हे सांगणं वेगळी गोष्ट. पण असा बेफिकीरपणा (टेस्ट करू नका आणि क्वारंटाईन करू नका असं सांगणं) ही चुकीची गोष्ट होती.

दुसरा भाग आहे तो फार सोशोलॉजिकली इंटरेस्टिंग आहे. वयस्कर डॉक्टर्सना इन्स्टिट्यूशन्सनीच सांगितलं होतं की तुम्ही या साथीत उपचारांच्या भानगडीत पडू नका. बऱ्याच हॉस्पिटल्सनी ६०-६५च्या वर वय असणाऱ्या कन्सल्टंट्सना सांगितलं होतं की तुम्ही कोविडमध्ये पडायचं नाही. कालांतराने, जेव्हा पेशंट्सची संख्या बरीच वाढली तेव्हा काही जणांना यात पडायला लागलं. काही खाजगी हॉस्पिटल्समध्ये काही वयस्क वरिष्ठ डॉक्टर्स उपचार करत होते, पण तरुण मंडळी घाबरलेली होती. अर्थात याचं असंच वर्गीकरण करावं असं वाटत नाही. परंतु त्यातला एक भाग लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या पद्धतीने वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय उपचार बदललेले आहेत त्याच्यामध्ये तरुण वर्ग हा जास्त प्रमाणामध्ये इन्वेस्टीगेशन्स करणं, पटापटा इन्वेस्टीगेशन्स करणं आणि जास्त आक्रमक पद्धतीने उपचार करणं, याच पद्धतीने ट्रेन झालेला आहे. आणि या कारणाने त्यांचा कल त्याकडे झुकला, तर तो त्यांच्या शिक्षणाच्या संस्कारांचा भाग आहे असं म्हणू शकतो, हा दोष नाही. त्या मानाने वयस्कर आणि जुने डॉक्टर्स असतील ते "तुला अमुकअमुक झालेलं आहे, अशीअशी काळजी घे, मग पुढे काही झालं तर बघू आपण" असा अप्रोच ठेवून होते. वयस्कर डॉक्टर्स घरी बसले का? तर खूप जण घरी बसले हे खरं आहे, पण काही जणांनी कामही केलं.

तरुण डॉक्टर्सच्या बाबतीत दुसरा एक भाग होता : आपल्याला आकडेवारीमध्ये असं दिसेल की ६० वयाच्या वरच्या लोकांना जोखीम जास्त आहे, पण हे थोडं अर्धसत्य आहे. याचा अर्थ ६० वयाच्या खालच्यांना जोखीम कमी आहे का? तर असं नाहीये. विशेषतः वैद्यकीय व्यवसायातल्या लोकांच्या एकमेकांशी होणाऱ्या चर्चेत असं दिसून येत होतं की आमचे अनेक सहकारी, जे ३०-३५ वर्षाचे होते ते नुसते सीव्हीयरली इन्फेक्ट नाही झाले, तर त्यांच्यातल्या काही लोकांचा जीवही गेला. आणि अशा बातम्या जेव्हा येत असतील तेव्हा ६०-६५च्या वरचा माणूस असतो त्याला असं वाटू शकतं की माझं सगळं झालेलं आहे. पण जो माणूस करियरमध्ये नवीन आहे, घरात मुलं आहेत, कुटुंबाची जबाबदारी आहे, तो जास्त घाबरलेला असतो. हे साहजिकच आहे. पण बहुतेक सर्व ठिकाणी (काही अपवाद वगळता) डॉक्टरांनी पुरेसं योगदान दिलं, झोकून देऊन काम केलं यामध्ये शंका नाही.

त्याच्याच बरोबरीने असा एक मुद्दा मांडतो (ज्याच्याकडे आपण परत येऊ) : आपली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अगदी मुडदूस झालेल्या बाळाप्रमाणे कुपोषित, खिळखिळी झालेली होती. तिचं जे काही स्वरूप होतं, त्या व्यवस्थेने माझ्या मते, त्यांच्याकडून जेवढ्या अपेक्षा होत्या, त्याच्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चांगलं काम केलं. चांगल्या प्रकारची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था नसलेल्या देशामध्ये काय होऊ शकतं, त्याचं भयावह उदाहरण म्हणजे अमेरिका.

केरळसारखी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, (जी चांगली आहे) किंवा आपल्याकडे आहेत तशा आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, जे जे काही उपलब्ध आहे, त्यातून लोकांपर्यंत मेसेजेस पोचणं, वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत मेसेज पोचणं, काही प्रमाणामध्ये आकडेवारी गोळा करणं, तात्पुरती हॉस्पिटल्स उभी करणं, त्यात मोठ्या प्रमाणावर आपल्याला जमेल तेवढी रोग्यांची सोय करणं हे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेनी निश्चितच केलं. मुंबईमध्ये KEM सारख्या रुग्णालयाचं योगदान प्रचंड आहे. ते आपण नाकारून चालणार नाही. बऱ्याचदा सरकारला आपण बेदखल करतो. जणू काही पुण्यात सर्व काम केलं आहे ते खाजगी हॉस्पिटल्सनीच केलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्यांच्या मर्यादांमध्ये ससून, नायडू इत्यादी सरकारी रुग्णालयांनीदेखील उत्तम काम केलं. त्यांनी जी कोविड केअर सेन्टर्स उभी केली, (उदा. बालेवाडी, सिंहगड कॉलेज) ती फार चांगली होती. कुठलीही सरकारी व्यवस्था म्हटल्यावर काही गबाळेपणा असतो तरीही तिथली व्यवस्था चांगली होती. "मला तिथे चांगलं जेवायला मिळालं नाही, हे मिळालं नाही ते मिळालं नाही" असा प्रचार जास्त झाल्यामुळे त्याबद्दल अनाठायी भीती जास्त प्रमाणात पसरली. याच्याऐवजी तिथला कारभार नीट करण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित जास्त लोक तिथे गेलेही असते. मला लोकांनी सांगितलेला अनुभव तरी अतिशय उत्तम होता. माझ्या ओळखीची एक येरवडा भागातली कार्यकर्ती होती, ती चार दिवस घाबरत होती, मला घरी राहू देत, मला तिथे फार भीती वाटते, तिथे फार वाईट असतं म्हणत होती. नंतर तिला नायडूमध्ये ॲडमिट करावं लागलं. तिथे चार दिवस राहिल्यानंतर तिचं मत बदललं. तिच्या मते तिथे व्यवस्था अतिशय चांगली होती. चादरी स्वच्छ आहेत, सगळं चांगलं आहे. आता जिथे पाचशे लोक ॲडमिट होतात तिथे कदाचित शौचालयं घरातल्यासारखी स्वच्छ नसतील पण तरी ठीक होतं एकंदरीत असं तिचं मत पडलं. अशा सगळ्या अनुभवांमुळे माझ्या मते सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेने या सर्व काळात अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि आपली जबाबदारी पार पाडलेली आहे.

प्रश्न : तुम्ही हे बोललात हे फार महत्त्वाचं आहे. पुण्यात याविषयी फार बोललं गेलं नाही. मुंबईत KEM वगैरेबद्दल बोललं गेलं. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊयात. सरकारी धोरण आणि लॉकडाऊनबद्दल बोलूयात. ज्या पद्धतीने लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी ते करणं खरंच अपरिहार्य होतं का? की काही वेगळं करता आलं असतं? मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं? आणि त्या वेळीही काय वाटलं होतं?

उत्तर : एक गोष्ट महत्त्वाची आहे : आत्ता आपण जे विच्छेदन करणार आहोत ते अखेर "मागे वळून पाहताना" आहे हे विसरता कामा नये. हे पोस्ट-मॉर्टेम आहे. आणि आपण जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपण निश्चितच थोडे जास्त शहाणे झालेले असतो.

आपल्याकडे जेव्हा केसेस यायला सुरुवात झाली, तेव्हा परदेशामध्ये परिस्थिती अतिशय भीषण होती. त्यामुळे आपली प्रतिक्रिया ही नी-जर्क अशा पद्धतीचीच असणार होती आणि तशीच झाली. त्यामुळे जो आजार लोकांच्या एकमेकांशी मिळण्यामुळे पसरतो, (मास्कमुळे ही शक्यता ६०-७०-८० टक्के कमी होऊ शकते हे तेव्हा माहीत नव्हतं?) आणि आपल्याकडे किती प्रमाणात पसरला गेला आहे याबद्दलही माहिती नव्हती अशा वेळेला साहजिकच धोरणकर्त्यांची पहिली प्रतिक्रिया ही "लोकांना घरी बसवा, म्हणजे लोकांचा एकमेकांशी संपर्क टळेल" अशी असणार होती. मला ही खात्री आहे की त्या जागी त्या वेळी कुणीही असते तर त्यांनी जोखीम घेतली नसती. जेव्हा जगातील सर्व देश लॉकडाऊन टाकत आहेत तेव्हा भारत म्हणतोय की आम्ही नाही लॉकडाऊन टाकणार, हे तर शक्यच नव्हतं. तसं केल्यामुळे त्या वेळी जर साथीचा मोठा विस्फोट झाला असता तर त्याची जबाबदारी कुणीही घेतली नसती. त्यामुळे लॉकडाऊन हा सगळ्यांनी केलेला उपाय आहे असंच जबाबदार माणसाने म्हणणं योग्य आहे. लोकांना स्वतःच्या घरी बसवण्यासाठी लॉकडाऊन ही प्राथमिक पायरी आहे. सरकारनी ते केलं.

अर्थात माझं वैयक्तिक मत त्या वेळेपासून असंच आहे की आपल्याकडे लॉकडाऊन उशिरा घातला गेला. म्हणजे जेव्हा आपल्याकडे बाधित रुग्ण बाहेरून येणार ही खात्री होती त्याच वेळेला बॉर्डर सील करणं, बाहेरून येणाऱ्या लोकांचं नीट स्क्रिनिंग स्कॅनिंग करणं, त्यांना होम आयसोलेशनमध्ये टाकणं, हे करायला हवं होतं. हा आजार परदेशातूनच येणार होता, आपल्या इथे निर्माण होणार नव्हता. त्यामुळे तिथे पहिली तटबंदी करायला हवी होती. ती आपण बऱ्यापैकी उशिरा केली. दुसरा भाग म्हणजे ती तटबंदी फार ढिसाळ केली. म्हणजे त्यावेळच्या सच्छिद्र भिंतीमधून बरंच काही पाझरून गेलं आणि त्यामुळे व्हायरस सगळीकडे पोचला. पण तरीदेखील मला हे वाटतं की हे लोक जिथपर्यंत पोचायची शक्यता होती, ते पाहून फक्त तिथला स्थानिक लॉकडाऊन करायला हवा होता, आणि नंतर आपण बघत राहायला हवं होतं की इतर कुठे रुग्ण सापडत आहेत का? वगैरे.

कारण, जे उद्रेक होणार होते ते ठिकठिकाणीच होणार होते. आणि ते मॉनिटर करता आले असते. त्यामुळे जेव्हा बाहेरून आलेले लोक जेव्हा संपूर्ण भारतभर पसरलेले नाहीयेत ही माहिती आपल्याला निश्चितपणे होती, तेव्हा सर्व भारतभर लॉक डाऊन करणं खरंच बरोबर होतं का? मला वाटतं कदाचित नाही. तो स्थानिक लॉक डाऊन करता आला असता. आणि मोठ्या शहरांमध्ये – जिथे बाहेरून आलेले / येणारे लोक जास्त आहेत अशा ठिकाणी – फक्त केला असता तर बाकीच्या ठिकाणी मॉनिटर करता आलं असतं.

तिसरी गोष्ट म्हणजे लॉकडाऊन ही अचानक करण्याची गोष्ट नाहीये ना? आपल्याला हे का करावं लागत आहे? याचे परिणाम काय असायची शक्यता आहे? त्यांना तोंड देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? याविषयी तज्ज्ञांशी, सामान्य लोकांशी बोलून धोरण आखायला हवं होतं. हे काहीही न करता जेव्हा तो लॉकडाऊन केला जातो तेव्हा दोन गोष्टी होतात, एक म्हणजे लोकांच्या मनामध्ये आजाराबद्दल प्रचंड भीती निर्माण होते. आणि भीतीतून कुठलाही मानवी व्यवहार बदलत नाही हे आत्तापर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे.

तर, तुम्ही घरात राहा नाहीतर तुम्ही मरणार आहात अशी प्रचंड भीती एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांचं अति-आत्मविश्वासपूर्ण वर्तन, – १४ दिवसात संपणार आहे, २८ दिवसात संपणार आहे वगैरे, आणि मग त्याचे साजरे केले गेलेले गौरव दिवस आणि विजय दिवस – हे पण अतिशय प्रीमॅच्युअरली केलं गेलं. पुण्यात थाळ्या वाजवायच्या असतील तर खरं त्या आज वाजवायला पाहिजेत, की गेले सहा महिने तुम्ही जे आमच्याकरता केलंत, त्यासाठी तुमचे आम्ही आभार मानतो. ज्या काळात आजार पसरलेलाही नव्हता त्या काळामध्ये जे काही कार्यक्रम केले जात होते तिथे द्यायला हवी होती ती सूचना न देणं – जी सूचना आता नवरात्रीच्या आधी आपण दिली की "संसर्ग कमी झालेला आहे, सण साजरे करा, पण काळजी घेऊन साजरे करा" - हे आपण थाळ्या वाजवणार होतो तेव्हा पण सांगायला हवं होतं. त्यावेळी हे लोकांना सांगितलं गेलं नाही, लोकांनी रस्त्यावर येऊन मिरवणूका काढल्या. हे अशा गोष्टी करायचे सल्ले देणारे जे लोक होते त्यांचं आकलन फार चुकीचं होतं.

त्यामुळे मग अत्यंत कोंदट, छोट्या घरांमध्ये एकत्र राहिलेले, घराबाहेर पडता न येणारे लोक एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात ते पसरत गेलं. पसरल्यानंतर ती साथ आटोक्यात येण्याच्या अगोदरच लोक घरी चालू लागले. या काळात त्यांचे जे हाल झाले, ते सर्वांना माहीत आहेत. म्हणजे आपण एकीकडे लोकांना सांगितलं की आम्ही तुमचं संरक्षण करण्यासाठी हे करत आहोत, त्यात संरक्षण तर झालं नाहीच, पण ते आणखीनच हलाखीत गेले. आणि ड्रॉपलेटमधून पसरणाऱ्या इन्फेक्शनसाठी चेहरा, नाक, डोळे, तोंड झाकायला पाहिजे, हे नक्की आहे. पण या सगळ्या काळात मास्कबद्दल फार काही बोलणं नाही. सगळं बोलणं होतं ते फक्त घरात राहा आणि हात धुवा. याच्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या फोमाइट्सच्या माहितीचा भडीमार केला गेला, की लोक (त्याच्यावर विश्वास ठेवून) अजूनही वेड्यासारखे वागत आहेत. वर्तमानपत्र आल्यानंतर त्याला हातही न लावणारे, बाहेरून आलेल्या भाज्या दोन-दोन दिवस बाहेर ठेवणारे, दोन-दोनदा धुवून घेणारे लोक मला आजही माहीत आहेत. फोमाइट्सची भीती वाटते म्हणून रस्त्यामधून ग्लोव्हस घालून जाणारे लोक मी अजूनही बघतो. त्यांना विचारलं की तुम्ही ग्लोव्हस का घातले आहेत? तर ते सांगतात, हाताला काही लागू नये म्हणून. अहो पण मगाशी तुम्ही ग्लोव्ह्ज घातलेल्या हातानेच नाक पुसलं! (अशाच पद्धतीने वापरायचे असतील तर) ग्लोव्ह घातलेला हात आणि नुसताच हात यात काहीच फरक नाही. इन फॅक्ट आपण जास्त निष्काळजी होतो, आणि आपण शंभर ठिकाणी हात लावत सुटतो. त्यापेक्षा "हा विषाणू तुमच्या नाकातोंडातून आत जाणार आणि तिथूनच बाहेर येणार, त्याची काळजी घायला पाहिजे", इथपर्यंत आपण अजूनही (१०० टक्के) पोचलो नाहीयेत. यात मी कुणाला जबाबदार-बेजबाबदार ठरवत नाहीये, पण मी करत असलेल्या कृतीचं लॉजिक मला जोपर्यंत समजावून सांगितलं गेलेलं नाही, तोपर्यंत माझ्याकडून योग्य कृतीची अपेक्षा करणं गैर आहे.

या बाबतीत प्रयास संस्थेने मधल्या काळात रिस्क पर्सेप्शनचा जो अभ्यास केला, त्याच्याबद्दल मी इथे थोडक्यात सांगतो. [पीडीएफ इथे वाचता येईल] माणसाचं जे वर्तन असतं, ते दोन गोष्टींवरून ठरतं : एक म्हणजे एखाद्या गोष्टीची जोखीम आपल्याला किती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा जोखीम कळली की त्याच्याशी सुयोग्य कृती करण्याची माझी क्षमता किती आहे. (रिस्क पर्सेप्शन आणि सेल्फ एफिकसी) अर्थात या दोन्ही गोष्टी असल्यानंतरही ही कृती करण्यासाठी अनेक सामाजिक अडचणी असू शकतात. म्हणजे मला रिस्क माहीत आहे, मला सेल्फ एफिकसी आहे, पण मला दररोज लोकलनीच कामाला जायला लागतं, त्यामुळे मला कितीही कळलं, की मला गर्दी टाळायला पाहिजे, तरी मी टाळू शकत नाही. परंतु आम्ही हा अभ्यास केला त्याच्यामध्ये हे दोन मुद्दे घेतले तर आपल्याला चार गट दिसतात :

  • ज्यांचं रिस्क पर्सेप्शन चांगलं आहे आणि सेल्फ एफिकसी चांगली आहे;
  • रिस्क पर्सेप्शन चांगलं आहे पण सेल्फ एफिकसी कमी आहे;
  • रिस्क पर्सेप्शन कमी आहे पण सेल्फ एफिकसी चांगली आहे; आणि शेवटचा गट म्हणजे
  • रिस्क पर्सेप्शन सेल्फ एफिकसी दोन्ही कमी आहे.

यात ज्यांचं रिस्क पर्सेप्शन चांगलं आहे आणि सेल्फ एफिकसी चांगली आहे अशा लोकांना जर योग्य वातावरण मिळालं तर त्यांच्याकडून सुयोग्य वर्तन घडण्याची शक्यता जास्त आहे. ऑनलाईन सर्व्हेमध्ये बहुसंख्य सुशिक्षित लोक आहेत, पण त्यातही जेमतेम १४ टक्के लोकांमध्ये या दोन्ही गोष्टी आढळून आल्या. ज्यांना रिस्क पर्सेप्शन चांगलं आहे पण सेल्फ एफिकसी कमी आहे, त्यांच्याकडून योग्य वर्तन होणार नाही. ज्यांच्यामध्ये रिस्क पर्सेप्शन कमी आहे पण सेल्फ एफिकसी चांगली आहे असे लोक चुकीच्या गोष्टी करत बसतील. आणि ज्यांना दोन्हीही नाही त्यांचं आयुष्य नेहमीच रामभरोसे असतं. आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही हतबल आहोत, जे काय व्हायचं ते बघूयात, काय फरक पडतो? फार फार तर मरू, याच्या पलीकडे तर काही होणार नाही ना?

नीट वर्तन घडण्यासाठी नुसती माहिती पुरत नाही. ती माहिती त्या गटासाठी सुयोग्य पद्धतीने पोचावी अशी व्यवस्था व्हायला हवी, त्यांच्याशी नीट संवाद व्हायला हवा, शंकानिरसन होण्यासाठी आधाराची सोय असली पाहिजे, आणि सामाजिक व्यवस्था नीट असल्या पाहिजेत. इथे एक विशेष बाब सांगावीशी वाटते : या सगळ्या काळामध्ये पुण्यातल्या आणि सांगलीतल्या सेक्स वर्कर्सशी आम्ही मोठ्या प्रमाणावर बोलत होतो., त्यांना आधार देत होतो. त्यांची काही ट्रेनिंग्स घेत होतो. आणि सर्वसाधारण निरीक्षण असं आहे की या स्त्रियांमध्ये एकंदरीत कोविडचं प्रमाण खूप कमी राहिलं आहे. खरं तर, त्यांचा व्यवसाय बंदिस्त जागांमध्ये होतो, त्या दिवसभरामध्ये बारा-चौदा गिर्‍हाईक घेत आहेत, आणि लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांच्या धंद्यामध्येही काही फरक पडला नाही असं त्या सांगतात. आणि तरीही लागण होण्याचं किंवा सिरीयस होण्याचं प्रमाण त्यांच्यात का कमी आहे, याचा शोध जेव्हा आम्ही घेतला तेव्हा असं लक्षात आलं की भल्याभल्या लोकांना अजून व्हायरस म्हणजे काय, तो कसा पसरतो वगैरे लक्षात येण्यापूर्वीच या सेक्स वर्कर्सच्या ते लक्षात आलं आहे. कारण, गेली पंचवीस-तीस वर्षं HIVमुळे काय होऊ शकतं हे त्यांनी समजून घेतलेलं होतं. त्यांना विषाणू म्हणजे काय हे कळणार नाही, RNA DNA न कळू देत त्यांना. पण एखादी अतिशय सूक्ष्म गोष्ट आपल्याला या पद्धतीने जीवघेणी ठरू शकते ही गोष्ट त्यांना नक्की कळली आहे. HIV हा सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे, म्हणून त्याला थांबवायला आपण कॉन्डोम वापरतो. आणि हा कॉन्डोम आपल्याला सुरक्षित ठेवतो. मग हा विषाणू जर तोंडा-नाकावाटे पसरतो, तर आपण नाकाला काही गुंडाळलं तर आपण त्याच्यापासून वाचू शकतो. ही जी आपल्या आयुष्याशी जोडून घेणारी गोष्ट आहे, ती त्या सेक्स वर्कर्स तातडीने समजून घेऊन त्यानुसार योग्य वागू शकल्या असं मला वाटतं. कारण त्यांचं रिस्क पर्सेप्शन चांगलं आहे आणि त्यांची सेल्फ एफिकसी पण वाढलेली आहे. वर्षानुवर्षे त्या गिऱ्हाईकाला सांगत आल्या आहेत की कॉन्डोम वापर. तसं आता ‘नो मास्क नो सर्व्हिस’ हे सांगणं ‘नो कॉन्डोम नो सर्व्हिस’ इतकंच त्यांना सोपं होतं.

याउलट मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग : तो विस्कळीत असतो, तो स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि आपल्या मतांना-पूर्वग्रहांना पूरक असणाऱ्या व्हाट्सॲप मेसेजेसवर फार अवलंबून राहतो. त्या लोकांना हे समजायला जरा जास्त वेळ लागला. उलट ज्यांच्या जीवनाशी ते निगडित होतं, त्यांनी ते पटकन समजावून घेतलं. आणि तेच डॉक्टरांच्या बाबतीतही झालं. सुरुवातीला सर्व ठिकाणी जाताना PPE वापरणारे लोक, म्हणजे आजही OPDमध्ये PPE घालून बसणारे लोक मी पाहतोय, पण तरीदेखील ते अपवादात्मक आहेत. हॉस्पिटलमध्ये मिनिमम इसेन्शिअल PPE काय असायला पाहिजे या निष्कर्षापर्यंत मात्र पहिल्या महिन्या-दोन महिन्यात लोक आलेले होते. म्हणजे कोविड वॉर्ड मध्ये जाताना तुमच्या चेहऱ्यावर N-९५ मास्क पाहिजे, फेस शिल्ड पाहिजे आणि अंगावर एक गाऊन असला तरी तो पुरे आहे. त्या प्लास्टिकच्या रेनकोट मध्ये दिवसभर उभं राहायचं काही कारण नाहीये, इथपर्यंत लोक फार लवकर आले. कारण तो जगण्याचा अनुभव होता. काय घडतं काय नाही इथपर्यंत पोचायला स्वतःचा अनुभव जो लागतो तो इथे कामाला आला. माझ्याही दवाखान्यात हे जाणवलं होतं – नवीन डॉक्टरला घ्यायचं झालं तर पूर्वी ते ‘प्रयास’मध्ये यायला तयार नसायचे. कारण ते “एचआयव्हीचं क्लिनिक आहे, तिथे येणाऱ्या ३०-४०% टक्के लोकांना एचआयव्ही असतो”. आमच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या एका मुलीनं लग्नासाठी मुलं बघायच्या वेळी नोकरी सोडून दिली होती, कारण ती एचआयव्हीमध्ये काम करते ह्या कारणावरून आधी बऱ्याच जणांनी नकार दिला होता. याउलट आता, एचआयव्हीमध्ये काम करताना पण आपण काळज्या घेतो, इथे वेगळ्या काळज्या घ्यायच्या आहेत हे लोकांच्या लवकर लक्षात आलं. एकदा प्रोटोकॉल सेट केल्यानंतर एकही दिवस माझं क्लिनिक बंद राहिलं नाही. माझ्या डॉक्टरांनी कधी तक्रार केली नाही की आम्ही येणार नाही, आमच्या इतर स्टाफनीही कधी तक्रार केली नाही. म्हणजे असं नाही की ते सगळे अगदी योग्य वागतायत – मला आठवड्यातून एकदा तरी अजूनही त्यांना सांगावं लागतं की अरे संध्याकाळच्या चहाच्या वेळी जरा लांब लांब बसा, अगदी एकमेकांच्या डोक्यावरच बसू नका… जरा काळजी घ्या, हे सांगावं लागतं. काही काळज्या घेतल्या तर आपण वाचू शकतो, ह्या प्रकारची जाणीवजागृती आता लोकांमध्ये झाली आहे.

प्रश्न : पुढचा प्रश्न राजकीय आहे – चीनमध्ये लोकशाही नाही, केंद्रीय पातळीवर निर्णय घेतले जातात आणि स्थानिक पातळीवर त्यांची कडक अंमलबजावणी केली जाते म्हणून तिथे साथ लवकर आटोक्यात येऊ शकली; युरोप-अमेरिका-भारत यांसारख्या देशांत लोकशाही असल्यामुळे हे शक्य नाही असं म्हटलं जातंय. यात कितपत तथ्य आहे?

उत्तर : मी काही राजकीय विश्लेषक नाही, त्यामुळे माझी मतं ही माझी आहेत असा एक डिस्क्लेमर मी इथे लावतो. मूळ विधान हे अर्धसत्य आहे – चीनमधून येते ती माहिती, ते आकडे, कितपत खरे आहेत ह्याविषयीच शंका असतात. त्यामुळे ते आजारी माणसांची खरी संख्या लपवतही असतील. शिवाय, हे आधी वुहानमध्ये झालं असेल तर त्या गावात कुणी बाहेरून यायचं नाही, गावातून कुणी बाहेर जायचं नाही, वगैरे पद्धतीनं ते साथीवर नियंत्रण मिळवू शकत असतीलही. तसं ते सांगतायत, ते खरं आहे असं जरी आपण क्षणभर गृहीत धरलं तरीही जसं केरळमध्ये झालं तसंच तिथेही होईल : ज्या वेळी बंदिस्त गावातल्या लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क येईल (म्हणजे चीनमधल्याच) त्यावेळी – आणि तोपर्यंत व्हॅक्सिन देऊन त्यांनी सगळ्या जनतेला सुरक्षित केलेलं नसेल तर – लोक व्हायरसला व्हल्नरेबल असतील आणि त्यामुळे साथ वाढेल ही एक शक्यता. त्याउलट, चीन सोडून इतर ठिकाणी जिथे जिथे साथ नियंत्रणात आली आहे तिथे पाहिलं तर दिसेल की साथ नियंत्रणात ठेवायला अशी पोलादी यंत्रणा असणं हे काही अनिवार्य नाही. उदा. न्यू झीलंडसारखा देश आहे, युरोपमधले अनेक देश आहेत. आणि साथ सगळीकडेच पुन्हा वाढणार आहे, कारण त्या विषाणूचा प्रवास असाच होत राहणार आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलंय. अर्थात, काही जणांनी पूर्वी मांडलं होतं त्याप्रमाणे विषाणूची क्षमताच कमी झाली, तो कमजोर झाला आणि लागण होण्याची क्षमता कमी झाली, असं काही जर झालं तर चित्र वेगळं दिसेल. पण ह्या विषाणूची लागण करण्याची क्षमता सध्या इतकी प्रचंड आहे की किमान ४०-५०% लोकांपर्यंत पोचेपर्यंत तरी ह्या विषाणूचा प्रवास काही थांबणारा नाही. त्यापासून संरक्षण करण्याची आपली क्षमता दोनच प्रकारे वाढू शकते – एक म्हणजे लस आली तर, किंवा संसर्ग होऊन गेला तर. थोडक्यात, जोपर्यंत आपल्याला लागण झालेली नाही तोपर्यंत आपण ससेप्टिबल आहोत हे लक्षात ठेवायलाच हवं. ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे ही साथ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असे जगात अनेक देश आहेत – अगदी भारतातही मला वाटतं की अमेरिकेपेक्षा अधिक बऱ्या पद्धतीनं आपण साथीवर नियंत्रण ठेवलेलं आहे. युरोपमध्ये वगैरे पुन्हा साथ पसरते आहे म्हणून त्यांचा पुन्हा लॉकडाऊनकडे प्रवास सुरू आहे. पण तिथे सामाजिक सुरक्षितता योजना आहेत, कल्याणकारी राज्यव्यवस्था (वेलफेअर स्टेट) आहे. जिथे संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला, पण सार्वजनिक आरोग्यव्यवस्था चांगली आहे, अशा ठिकाणी साथीला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देणं त्या सरकारांना शक्य झालं असं चित्र दिसतं. काही काळासाठी जरी आरोग्यव्यवस्था कोलमडली, तरी जिथे लोकांना स्वतःच्या खिशातून ह्यावर खर्च करायला लागत नाही त्या व्यवस्थेत त्यांना नीट मदत मिळत गेली असं दिसतं. ह्याउलट ज्या पूर्णपणे खाजगी आणि निओलिबरल व्यवस्था आहेत तिथे जास्त त्रास झालेला आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषण केवळ इतक्या काळ्या-पांढऱ्या रंगात करून चालणार नाही. आणि सगळे लोकच हे करतायत – म्हणजे डावीकडे झुकलेले लोक म्हणतायत की जिथे वेलफेअर स्टेट आहे आणि लेफ्ट-ऑफ-सेंटर सरकारं आहेत तिथे सगळं चांगलं झालं. तर जे एकाधिकारशाहीवादी आहेत ते म्हणतायत की जिथे एकाधिकारशाही होती तिथेच चांगलं झालं. पण तीन नोव्हेंबरला आपल्याला कळणार आहे की लोकांना कशा पद्धतीचं नेतृत्व हवंय. जग फार वेगळ्या प्रकारे चालतंय आणि त्याचं ह्या पद्धतीनं आकलन करून घेणं अवघड आहे.

प्रश्न : खासगी विरुद्ध सरकारी वैद्यकीय सेवा, कॅश विरुद्ध insurance ह्यातून साथीचं अर्थकारण कसं बदलत / मार्ग काढत गेलं? ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ यांसारख्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी आहे?

उत्तर : माझ्या अनुभवानुसार सांगायचं तर सुरुवातीला काही प्रमाणात उचक्या लागत होत्या, पण नंतर ह्या यंत्रणा चांगल्या पद्धतीनं काम करायला लागल्या. मोठ्या हॉस्पिटलमध्ये आता महानगरपालिकेतर्फे ऑडिटरच येऊन बसतात. ते प्रत्येक बिल तपासून बघतात. सकाळपासून संध्याकाळपर्यत ते तिथे असतात. जास्त बिल दिसलं तर ते कमी करून देतात. इस्पितळांनाही सुरुवातीच्या काळात ह्या योजनांचे पैसेच मिळत नव्हते. तुम्ही योगदान द्या, रुग्णांना ट्रीटमेंट द्या, पण पैसेच मिळणार नसतील तर ती व्यवस्था कशी चालणार, असाही भाग होता. पण आता योजनांचे पैसे कदाचित लवकर मिळताहेत. तक्रारीही अर्थात आहेत, कधी लोकांना लाभ मिळत नाहीत. ज्यांना म. फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळायला हवा अशांना बिलं लावली जातात. अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर येतात. त्यातून गैरसमजही पसरतात. ज्यांना ह्या योजना लागू होतात त्यांना त्याचा लाभ देण्याची व्यवस्था किमान मी जिथे काम करतो तिथे तरी नक्की होती. लोकांनी आपले अनुभव शेअर केलेले आहेत की आम्ही डिपॉझिट भरलेलं होतं, दोन दिवसांनी त्या योजनेखाली आमची तरतूद झाली, डिसचार्ज घेताना बिल शून्य आलं आणि दोन दिवसांत डिपॉझिटही परत मिळालं. अर्थात, वेगवेगळ्या रुग्णालयांनी ह्यात हात धुऊनही घेतलेला असेल, त्यामुळे आपण फार सरसकट विधान करू शकत नाही. हे अनेक पातळ्यांवर झालं उदा. काही रुग्णालयांनी आपल्या परिसरातल्या फाईव्ह स्टार हॉटेल्सचं बुकिंग करून ठेवलेलं होतं. होम आयसोलेशन नको म्हणणारे जे श्रीमंत घाबरट लोक होते त्यांना तिथे ठेवून हॉटेलमधली बडदास्त हॉटेलनं ठेवावी, आमचे डॉक्टर दोनदा येऊन तपासून जातील, ऑक्सिजन तपासतील, काय कसं काय आहे विचारतील. जे मी अनेकांसाठी विनामूल्य रोज फोनवर करत होतो – तेच करण्यासाठी त्यांनी पैसे घेतले. पण हा आपल्या खाजगी आरोग्य व्यवस्थेचाच दोष आहे.

थोडक्यात, अनेकांना ह्या सरकारी योजनांचा फायदा झाला, पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की ह्या सेकंडरी आणि टर्शियरी पातळीवरच्या मदतीसाठीच्या योजना आहेत. म्हणजे तुम्ही आजारी पडलात, इस्पितळात गेलात, तर तुमची फी भरण्याची व्यवस्था शासन करतं. ह्याला आपण चांगली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था म्हणू शकत नाही. ती प्राथमिक आरोग्यापासून सुरू व्हायला हवी. ह्या साथीनं केवळ आपल्यालाच नाही, तर सगळ्या जगालाच हा धडा शिकवलेला आहे. ते शहाणपण आपण घेणार आहोत की नाही, हे मला माहीत नाही. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अतिशय बळकट असायला हवी. पुन्हा नवीन संकट आलं तर लोकांपर्यंत लवकर पोचता यायला हवं. लोकांचा त्यात सहभाग व्हायला हवा. त्यावर लोकांचं नियंत्रण असायला हवं. हे सगळं आपण वर्षानुवर्षं म्हणतो आहोत. आरोग्य व्यवस्थेवरचा खर्च वाढवायला हवा. आता येत्या काही काळात त्याविषयी काही विचारमंथन झालं तर जग त्या दिशेला जाईल. पण तशी अपेक्षा करता येत नाही. कारण आपण लवकर शिकतो असा काही माझा अनुभव नाही. पूर्वीच्या काळची अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे आपल्याला घेता येण्यासारखे धडे होते, पण आपण ते घेतले नाहीत. पण हे विचारमंथन आपण तरी करायला हवं. कोव्हिडने ग्रस्त किंवा कोव्हिडला बळी पडू शकतील असे लोक, किंवा मधुमेह वगैरे असणारे लोक, अशा लोकांसाठी जेव्हा एखाद्या कार्यक्रमाची आखणी केली जाते त्या वेळी सगळा फोकस त्या त्या आजारावर असतो. म्हणजे कोव्हिडला प्रतिसाद द्यायचा तर कोव्हिडकडे बघा. पण लोकांकडे बघणं हा भागही त्यात असायला हवा. ‘पीपल विथ एचआयव्ही’ असं जर पाहिलं तर जेवढं महत्त्व ‘एचआयव्ही’ समजून घेण्याला आहे, तेवढंच ‘पीपल’ ह्या भागाला समजून घेण्यालाही आहे. कोव्हिडच्या बाबतीतही लोकांचा सहभाग, लोकांची निर्णयक्षमता, लोकांचं त्यावर नियंत्रण असणं, हे व्हायला हवं. अशा पद्धतीनं बळकट होणारी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था जोवर आपण उभी करत नाही तोवर आजच्यासारख्या गोष्टींना तोंड द्यावं लागणारच. माझ्या मते ह्यानंतरच्या साथी मुख्यतः मानवी वर्तनातून निर्माण होणाऱ्या असतील, त्या श्वसनमार्गाद्वारे पसरणाऱ्या जंतूंच्या असतील. कुठले जंतू कोणत्या प्रकारे बदलतील आणि त्यांची संसर्गक्षमता कशा प्रकारे बदलेल, त्या जास्त तीव्र प्रमाणात संसर्ग करणाऱ्या असतील का, हे बघायला लागेल. त्या मानाने हा विषाणू तितका मारक नाही. प्रसार करणारा आहे, पण मारक नाही. आता असं जाणवतंय की हजारांत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतोय. आकडे जरी शंभर (निदान झालेल्या) केसेस मागे एक-दोन मृत्यू दिसत असले तरी प्रत्यक्षात इन्फेक्शन मॉरटॅलिटी रेट कमी आहे. ह्यापेक्षा अधिक तीव्रतेनं मारणाऱ्या साथी आपण पाहिलेल्या आहेत. तीव्र मारक जंतू असतो तेव्हा त्याला आटोक्यात आणणं सोपं जातं. हे आधीच्या साथींमध्ये आपल्याला लक्षात आलं होतं. पुढचे जंतू कसे असतील हे आपल्याला माहीत नाही. निव्वळ माणसाला दोष देणं – तुम्ही जंगलात जाता आणि जंतू घेऊन येता – हे योग्य नाही. एचआयव्हीच्या बाबतीतही आफ्रिकेतल्या माकडांकडून स्थानिक लोकांकडे, तिथून परदेशी लोकांकडे आणि मग परदेशात तो पोचला. तसं वटवाघळांमध्ये जर विषाणूंच्या हजारो प्रजाती असतील, तर तुमचा संपर्क कधी तरी येणारच आहे. आपल्याला निसर्गही वाचवायचाय, माणसाचा निसर्गाशी संपर्कही येऊ द्यायचा नाही – असं काही होणार नाही. त्यामुळे हे घडत राहणार. हा विषाणू नवीन नाही. तो वटवाघळांमध्ये होता. अपघाताने तो प्रयोगशाळांमधून बाहेर पडलेला असूही शकेल. पण प्रयोगशाळेतच तो निर्माण केला गेला, बाहेर सोडला गेला, असं आता तरी वाटत नाही. हा मानवी क्षमतेवर फारच जास्त विश्वास ठेवणारा दावा आहे. इतके काही आपण प्रगत नाही आहोत! त्यामुळे त्या कॉन्स्पिरसी थिअरीज सोडून द्याव्यात. आपल्या जगण्यातली आपली जबाबदारी काय आहे, ह्याकडे आपण लवकरात लवकर वळावं.

प्रश्न : पुढचा प्रश्न आहे तो प्रसारमाध्यमांच्या संबंधातला आहे. अनेक पद्धतींनी प्रसारमाध्यमं यांच्याकडे बघत होती. म्हणजे जम्बो कोविड सेंटरमध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला, त्या वेळी खूप आरडाओरडा झाला. किंवा इतरही अनेक गोष्टी झाल्या. तर एकंदरीत प्रसार माध्यमांनी हे कसं हाताळलं आणि कसं हाताळायला पाहिजे होतं. याच्याबद्दल काही सांगाल का?

उत्तर : मला वाटतं की प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण अतिशय वाईट प्रकारे हाताळलं. ज्या वेळेला कुठलीही साथ येते आणि ती या वेगाने पसरत असते तेव्हा लोकशिक्षणाचं जे मुख्य काम प्रसारमाध्यमांनी करणं अपेक्षित आहे, ते बाजूला ठेवून, (कदाचित TRP साधण्यासाठी असेल), त्यांनी त्यांची एकंदरीत भाषाच बदललेली आहे. लोकशिक्षण जेवढं करायला हवं होतं तेवढं त्यांनी केलं नाही. आणि त्यांचं वार्तांकन सनसनाटीपणाकडे कायमच झुकलेलं होतं.

डॉक्टर मंडळी म्हणतात की भारतात सुमारे पावणे तीनशे डॉक्टरांचा कोव्हिडने मृत्यू झाला आणि सरकार आमच्याकडे लक्षच देत नाहीये. तर हो, मी म्हणतो या पावणेतीनशेंपैकी माझे काही मित्र असतील, तर मला होणारं दुःख, हे पुण्यातल्या इतर तीन हजार मृत्यू पावलेल्या लोकांपेक्षा थोडंसं वेगळं असतं. कारण ते माझे आप्त असतात. पण आपण त्याला स्टॅटिस्टिक्स लावलं – म्हणजे खूप डॉक्टरांचे मृत्यू होताहेत का? तर तुम्हाला बघायला लागेल, की भारतामध्ये समजा १,२४,००० मृत्यू झाले आणि त्यात फक्त ३५० जर डॉक्टर्स असतील, तर डॉक्टरांच्यामधलं मृत्यूचं प्रमाण किती आहे? तुम्ही मागण्या वेगळ्या करू शकता. म्हणजे कोविड सेंटर सुधारलं पाहिजे, किंवा डॉक्टरांना विमा मिळाला पाहिजे, अशा मागण्या हव्यात. पण स्वतःवर जेव्हा येतं त्यावेळी गाजावाजा करणं यात माध्यमांचा बेजबाबदारपणा दिसतो. तसंच काहीसं पत्रकाराच्या बाबतीत.

पत्रकाराच्या मृत्यूच्या या प्रकरणात पहिल्याच डॉक्टरने टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही सांगितलं असेल का? की ‘टेस्ट निगेटिव्ह आली असेल तरीही लक्षणं दिसत आहेत त्यामुळे तुम्ही घरात आयसोलेट व्हा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन चेक करत रहा, आणि त्रास होत असल्यास नजीकच्या हॉस्पिटलमध्ये लगेच दाखल व्हा’? किंवा असं सांगूनही आम्ही जर ते करणार नसू, कारण आमचा विश्वास जर आमच्या शौर्यावर, आरसेनिक अलबम, किंवा काढे किंवा वाफारे किंवा इतर सिद्ध न झालेल्या कुठल्याही गोष्टीवर असेल, आणि मग असा भरवसा ठेवून आमची नैय्या तरेल असा विश्वास ठेवून आम्ही जर फिरणार असलो, तर आपली नैय्या बुडली ह्याचं फार आश्चर्य वाटून घेऊ नये. किंवा, तुम्ही मुलाखती घेताना रस्तोरस्ती मास्क न लावता गर्दीमध्ये शिरून मुलाखती घेत असाल, तर त्यांच्यातल्या काही लोकांना तरी लागण होणार, आणि लागण झाली तर त्यातले काही जण सिरीयस होणार आणि त्यातल्या काही जणांना उपचार न मिळण्याची शक्यता आहे. जेव्हा हजारो लोकांना उपचार मिळत नव्हते तेव्हा तुम्हाला जाग आली नसेल, पण तुमच्यातल्या एकाला झाल्यावर तुम्हाला एकदम व्यवस्थेतल्या सगळ्या त्रुटी दिसायला लागल्या, तर मग ह्यात काहीतरी गफलत आहे. हा बघण्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.

प्रश्न : पुढे साथ कोणत्या दिशेने जाईल असं तुम्हाला वाटतं? पुण्यातल्या हॉस्पिटल्समधे आता जागा व्हायला लागली आहे. इतरही ठिकाणी परिस्थिती आता सुधारत आहे. पण आता दसरा दिवाळीचे दिवस आहेत, थंडी येऊ घातली आहे. आता काय होईल असं वाटतं?

उत्तर : मी गमतीने म्हणतो की आत्ताच्या काळात इथे आपल्याला तारलेलं आहे, ते अधिक मासाने. गणपती-गौरीच्या नंतर आपल्याला आणि विषाणूला श्वास घ्यायला हा अधिक मास मध्ये मिळाला. तो जर आला नसता, आणि नवरात्री आणि दसरा-दिवाळी जर पाठोपाठ आले असते, तर आता जे चित्र दिसत आहे ते कदाचित दिसलं नसतं. अधिक मासामुळे सणवारांना एक महिन्याची सुट्टी मिळाली.

आता पुढे कसं जाईल तर सणवार, लोकांचं एकमेकांत मोठ्या प्रमाणावर मिसळणं, आणि थंडी, या गोष्टी या विषाणूच्या प्रसाराला अनुकूल आहेत. आता प्रश्न असा आहे, की या परिस्थितीत, आपला संपर्क बाधित व्यक्तीशी येण्याची शक्यता कितपत आहे ते बघणं. म्हणजे गणिती ठोकताळा असा, की समजा ०.१ टक्के मॉरटॅलीटी असेल आणि पुण्यात २,५०० ते ३,००० लोकांचा मृत्यू झाला असेल, त्याला हजारने गुणलं तर तो आकडा पंचवीस-तीस लाखाच्या आसपास जाईल. याचा अर्थ पुण्यात आता (active) बाधित रोग्याच्या सहवासात आपण येण्याची शक्यता कमीकमी होत जात आहे. अर्थात या शक्यता कमी असल्या तरी काही प्रमाणामध्ये, स्थानिक पातळीवर, घरांमध्ये लोकं मिसळल्यामुळे, याच्यापुढे बहुधा घरं, ऑफिसेस मॉल्स आणि समारंभ ही साथीची केंद्रं असतील. कालच कुणी सांगितलं की आता ज्या नवीन केसेस येत आहेत त्यात पार्टी केलेले अनेक लोक आहेत. आता सगळं मोकळं झाल्यावर लोकं पार्ट्या करू लागले आहेत. यात एकमेकांच्या जवळ येण्याची शक्यता वाढते. नवरात्र चालू झाल्यापासून लोकांचं एकमेकांच्या घरी जाणंयेणं पण चालू झालं आहे. तुमच्या घरातलेच लोक असतील आणि त्या सगळ्यांना होऊन गेला असेल तर छान, धोका नाही. परंतु कुणालाही लागण होऊन गेली नसेल आणि एखादी जरी बाधित व्यक्ती येऊन मिसळून गेली तर इथे एक क्लस्टर तयार होणार.

माझं वैयक्तिक मत विचाराल तर पुण्यात the worst is over. पूर्वी असं वाटत होतं की ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत साथ चालू राहील, पण ऑक्टोबरच्या मध्यालाच प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे इतर ठिकाणी पीक्स येत असले, तरी पुण्यात आता आटोक्यात आले असावेत असं माझं वैयक्तिक मत.

पुण्याच्या ग्रामीण भागात आता असं चित्र आहे की साधारण हजार खेड्यांपैकी फक्त शंभर खेड्यांमध्ये साथ जोरात आहे. ८० टक्के केसेस तिथे आहेत. याचा अर्थ, इतर साडेआठशे-नऊशे खेडी आहेत ती एकतर वेगळ्या प्रकारची खेडी आहेत, जिथे लोकांची आवक-जावक नाही किंवा ती अजूनही vulnerable आहेत. कारण हे सगळे तालुके हायवेमुळे पुण्याशी जोडलेले आहेत. तिथून अंतर्भागामध्ये साथ कशी पसरेल, तिथे आरोग्य सेवा कशा असतील हे आपल्याला माहीत नाही. आणि भारताच्या पातळीवर मला असं वाटतं की साथ वेगवेगळ्या ठिकाणी पेटत जाईल. ज्या भागात पुणे किंवा मुंबईप्रमाणे लागण होऊन गेली तिथे आता दुसरी लाट कमी तीव्रतेची असेल कदाचित, पण मुंबईची मला चिंता वाटते, कारण मुंबईत मुख्य साथ येऊन गेली ती फक्त vulnerable लोकांमध्ये येऊन गेली (उदा : धारावीसारख्या गरीब वस्त्यांत), त्या मानाने उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्ग या साथीपासून दूर राहिला. लोकांशी बोलताना मला हे जाणवत होतं. त्या मानाने पुण्यात तसं नव्हतं. आधी भवानी पेठ भागात चालू झालेली साथ मग कोथरूड, औंध, विमाननगर या भागात पसरली. तिथलेही पीक्स आता येऊन गेले. तिथे काही तुरळक प्रमाणात केसेस येत जात राहतील. (पण साथीची तीव्रता कमी राहील) पुण्यातील कोविडचा प्रसार जास्त सर्वसमावेशक होता. मुंबईमध्ये तसा होता का नाही हे नक्की सांगता येत नाही. त्याशिवाय मुंबईची रचनाही वेगळी आहे. आता एकदा लोकल चालू झाल्या की सोशल डिस्टंसिंग कसं पाळणार, हा एक मोठा प्रश्न आहे. (अर्थात हे पुण्यात बसमध्येही होऊ शकतं, पण कमी प्रमाणात)

थोडक्यात म्हणजे (देश पातळीवर) आपली एवढ्यात सुटका आहे असं वाटत नाही. अजून एक म्हणजे भारतात जेव्हा एखादा नवीन विषाणू किंवा जिवाणू प्रवेश करतो, तेव्हा तो बहुधा कायमचा मुक्कामाला येतो. तो असा दोन महिन्यांत, सहा महिन्यांत, दोन वर्षांत संपेल असं नसतं. ज्या पद्धतीने दहा वर्षांपूर्वी आपल्याकडे आलेला स्वाईन फ्लू आता एंडेमिक झाला. त्याच्या केसेस अधून मधून येत राहतात. तशाच याच्याही होत राहण्याची शक्यता आहे. HIV आला, आपला झाला; स्वाईन फ्लू आला, आपला झाला; आता कोविड आला, तोही आपला होणार. ज्याला आम्ही differential diagnosis म्हणतो – एखाद्याला लक्षणं असतात : सर्दी-खोकला, ताप, घसा दुखणं, वास आणि चव जाणं – असं जर का पुढे सात-आठ महिन्यांनी, दोन वर्षांनी कुणाला झालं तरी अशा माणसाला कोविडची टेस्ट करावी लागणार आहेच, आणि मग काही प्रमाणात सांगितलं जाणार, की घरामध्ये काळजी घ्या, विलगीकरण करा वगैरे. हा पाहुणा लवकर बाहेर पडणारा नाही असं मला वाटतं. साथ, आजाराचा पीक ओसरलेला असेल. अशा आजारांच्या संदर्भात मी लशीबाबतीत फार उत्साही नसतो, पण तरीही लस यावी अशीच माझी इच्छा आहे. कारण लस असणं आणि ती उपयुक्त ठरणं, ती लोकांपर्यंत आपण पोचवू शकणं, त्या यंत्रणा आपण निर्माण करू शकणं हे सगळं उपयुक्त आहेच. पण व्हॅक्सिन सुरक्षित असणंही गरजेचं असतं. आणि आपण जे शॉर्टकट्स मारत तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय, (लस उपलब्ध करण्याची घाई, लशीची परिणामकारकता आणि सुरक्षितता, दोन्ही तपासण्यात घाईघाईत घेतलेले शॉर्टकट) त्यावेळी त्यात जोखमी आणि धोकेही जास्त असू शकतात असं मला वाटतं. फ्लू व्हॅक्सिनसारखं चांगलं व्हॅक्सिन यावं, तोपर्यंत हर्ड इम्युनिटी आलेली असावी असं मला वाटतं. आपल्या देशात फ्लू व्हॅक्सिन कोण घेतं? ज्याला परवडतं तोच घेतो ना ते? म्हणजे एक उत्तम व्हॅक्सिन, ते ज्यांना परवडतं अशा लोकांना, किंवा साठीच्या वरच्या लोकांना आपण देत राहू. लवकरात लवकर व्हॅक्सिन आणावं आणि आपण यातून लवकरात लवकर बाहेर पडावं अशीच माझी सदिच्छा आहे. निदान नाकाला फडकी गुंडाळण्यापासून तरी सुटका होईल!

प्रश्न : श्रोत्यांकडून एक प्रश्न आलाय, की प्रत्येक पेशंटमागे हॉस्पिटलला दीड लाख रुपये मिळत आहेत असा एक समज पसरला आहे, यात कितपत तथ्य आहे?

उत्तर : मी याच्यावर टिप्पणी करू शकणार नाही. असं काही आहे असं मला वाटत नाहीये – म्हणजे लंपसम, आला पेशंट की दीड लाख अशी काही ती लॉटरी नाहीये. तो पेशंट कुठल्या वॉर्डमध्ये ॲडमिट झाला? त्याला ऑक्सिजन लागला का? लागला तर किती लागला? म्हणजे याचं गणित असं नसेल होत कदाचित, की एकाला १३ लिटर लागला, दुसऱ्याला १८ लिटर लागला त्यानुसार वगैरे. पण एखाद्याला कायमस्वरूपी दोन तीन आठवडे ऑक्सिजन लागला त्याचं वेगळं असेल, ज्याला व्हेंटिलेटर लागला त्याचं वेगळं असेल. सरकारी योजनांबद्दलही मला अचूक माहिती नाही. जम्बो सेंटरमध्ये एकदा ॲडमिट केलं की दीड लाख रुपये मिळत आहेत का? याबद्दल मला नक्की माहिती नाही. पण ही जी अफवा आहे – की दीड लाख रुपये मिळतात म्हणून लोकांना खोटे रिपोर्ट देऊन उगाचच ॲडमिट करत आहेत – हे मात्र नक्की खोटं आहे. दोन-चार जणांनी केलंही असेल असं कदाचित, पण "हा एक मोठा कट आहे आणि कंत्राटदारांचे आणि यांचे काही लागेबांधे आहेत आणि दिसला पेशंट की घाल हॉस्पिटलमध्ये, कारण दीड लाख मिळत आहेत," असं होत नाही हे नक्की.

प्रश्न : एकंदरीत हे सगळे जे उपाय होते म्हणजे वाफ, आयुषचे काढे, ते पार प्लाझ्मा थेरपी वगैरे हे खूप पसरत होतं, अजूनही पसरतंय. तर तुम्ही जेव्हा रुग्णांचं समुपदेशन करायचात, त्यावेळी हे कसं दिसलं तुम्हाला?

उत्तर : लोक त्याच्यामागे अजूनही जात आहेतच हे मला दिसतंय. लोकांचा भाग मी नंतर सांगतो. या बाबतीत माझं इव्होल्यूशन कसं झालं ते आधी सांगतो. पहिल्यापासूनच मला याच्याबद्दल खात्रीच होती, की या कशानेही फरक पडणार नाही. नाकावाटे जाणारा विषाणू असेल तर नाकाची स्वच्छता ज्या गोष्टींमुळे होते, त्या गोष्टींनी फरक पडायची शक्यता असते. वाफेचं तापमान, ज्या तापमानाला तो जंतू मरतो, त्या तापमानाची वाफ घशात नाकात जाते का?, गेली तर फक्त नाकामध्येच जाते की घशात पण जाते, जिथे विषाणू जातो तिथे ती जाते का? ती फुफ्फुसात पण जाते का? गरम पाणी प्यायल्याने फक्त ओरोफॅरिंक्स कदाचित स्वच्छ होईल, पण त्याच्यामुळे श्वसनमार्ग कसा काय निर्जंतुक होईल? माझ्या मनात अशा शंका होत्या आणि आहेतही अजून. आयुष काढ्यांच्याबद्दल तसंच आहे. मी पेशंट्समध्ये आयुष काढ्यांमुळे साईड इफेक्ट्स (दुष्परिणाम) जास्त बघितले आहेत. ते काढ्यामुळे होत आहेत हे लोक मान्य करत नाहीत, पण बद्धकोष्ठ होणं, रक्ती आव होणं, अंगावरती रॅश येणं इत्यादी काही साईड इफेक्ट्स आम्ही खूप लोकांमध्ये बघितले.

आर्सेनिक अल्बम : किमान दीनानाथमधला डेटा तरी असं सांगतो की लागण होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या लोकांपैकी ३२-३५ टक्के लोकांनी आर्सेनिक अल्बम आधी घेतलेलं होतं. त्यामुळे त्या औषधामुळे संरक्षण मिळालं का? तर बहुतेक नाही. त्यामुळे मी शेवटी अशा निष्कर्षाला आलो की दिवसाला ५०-६० लोकांना हे समजावून सांगत बसण्यापेक्षा "हे फायदेशीर आहे का ते माहीत नाही, तुम्हाला घ्यायचं आहे का नाही हे तुम्ही ठरवा" असं सांगू लागलो. ती निरुपद्रवी गोष्ट आहे. म्हणजे समजा एखाद्याने दिवसभर थर्मास बरोबर बाळगला आणि दिवसभर गरम पाणी प्यायलं, तर मला त्याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. पण माझ्या एका मित्राची आई – तिला कोविड झाला, घरामध्येच आयसोलेटेड होती, त्यातून बाहेर आली, पण त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी 'नाकामध्ये खूप आग होतीय, नाक दुखतंय वगैरे तक्रार करत होती. त्या दर अर्ध्या तासाने वाफ घेत होत्या, इतकी की त्यांच्या नाकाची अंतर्त्वचा जळायला लागली. असेही अनुभव होते. पण ‘वाफ घेऊ नका’ हे सांगण्यापेक्षा, ‘तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या,’ एवढं मी सांगतो. कोविडला फरक पडत नाही. काही डॉक्टर मित्र होते. ते कोविड किंवा ICU ड्युटीला जायच्या आधी वाफ घ्यायचे. मी त्यांना विचारायचो की हे जे तुम्ही करत आहात त्याचं लॉजिक तुम्हाला पटतंय का? आधी वाफ घेऊन तुम्ही कोविड वॉर्डमध्ये गेलात तर नक्की काय संरक्षण मिळणार आहे? त्यातही करायचंच असेल तर निदान कोविड ड्युटी करून आल्यावर तरी करा. म्हणजे विषाणू मारायचेच असतील (आणि ते वाफेने मरतात असा तुमचा विश्वास असेल तर) ते निदान ड्युटी करून आल्यावर तरी मारा. ड्युटीला जाताना नाकामध्ये मारलेली वाफ ही काही vaccine नाहीये, की ज्याच्यामुळे तुम्हाला पुढचे चार तास प्रोटेक्शन मिळेल!

मी अनेक वर्षं HIV झालेल्या लोकांना एक गोष्ट सांगतोय (तो प्रतिकारशक्तीच कमी करणारा आजार असल्यामुळे) : ज्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती नीट राहते अशा चारच गोष्टी असतात – उत्तम आहार, किमान झेपेल एवढा व्यायाम, मनःशांती, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्रासदायक व्यसनं टाळणं. या चार गोष्टी मूळ. या व्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टींबाबत काही सिद्ध झालेलं नाही. आणि त्यामुळे या चार गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. अर्थात, मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे हे सगळं शहाणपण असतं – ते कळणं, वळणं आणि वळल्यानंतर ते प्रत्यक्ष कृतीत येणं यात अडचणी असतात. अनेक गोष्टी आपण लोकांना करायला सांगतो पण आपण करत नाही. मानवी वर्तनाचाच तो भाग आहे. म्हणून ‘लोक बेजबाबदार वागत आहेत’ असं म्हणण्याऐवजी मी म्हणेन ‘लोकांना तो आजार व्यवस्थित कळत नाहीये’. म्हणून योग्य निर्णय घ्यायला लोकांना त्रास होतो आहे. तिथपर्यंत लोकांना न्यायला पाहिजे.

प्रश्न : डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि नेते मंडळी, किंवा शासन आणि नेते, या तिघांचा असा काही सेतू असतो का? आणि त्यांच्यात आणि तुमच्यात काही (माहितीची, विचारांची) देवाणघेवाण होत असते का? तुमच्या कुठल्या फोरमकडून काही सूचना जातात का – की आता नेत्यांनी कसं वागायला हवं? किंवा काय सांगायला हवं? (संदर्भ : मघाशी तुम्ही सांगितलंत तसं मास्कविषयी आधी सांगायला हवं होतं) तर असा काही सेतू, काही फोरम्स आहेत का, आणि असल्यास त्याचा कितपत फायदा होतो?

उत्तर : मी सुरुवातीपासून सांगतो आहे की हा वैद्यकीय प्रश्न आहे, अशा बाजूनेच बघितलं गेल्यामुळे हॉस्पिटल्स किती लागतील, ऑक्सिजन किती लागेल, बेड्स किती लागतील, प्रोटोकॉल काय असायला हवा वगैरे बाबतीत डॉक्टरांचा सहभाग होता – टास्क फोर्स वगैरे. हा सेतू ॲडमिनिस्ट्रेशन आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये होता. कारण नेते हे फक्त ॲडमिनिस्ट्रेशनला सांगण्यासाठी खुर्चीवर असतात. योजना कशा असायला पाहिजेत, कशा राबवायला पाहिजेत या संदर्भात डॉक्टरांशी ॲडमिनिस्ट्रेशनचा संपर्क होता. नेते हे खरं तर (या सगळ्या प्रक्रियेचा) लोकांशी असलेला दुवा असायला पाहिजेत. यात लोकसहभागाला पहिल्यापासून फारसं महत्त्व दिलं गेलं नाही, नेत्यांकडूनही दिलं गेलं नाही. तरुण नेते मंडळी बऱ्यापैकी घरात बसलेली दिसत होती त्या मानाने वयस्कर मंडळी समाजात मिसळत होती.

लोकांचा सहभाग करून घेणं : कदाचित तुम्ही ऐकलं असेल – एक छोटा प्रयत्न आहे, पुण्याच्या पातळीवर एक मोहीम सुरू केली गेली आहे. ‘आपलं कुटुंब आपली जबाबदारी’च्या पलीकडे जाऊन, ‘पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार’ म्हणून. यात हेतू असा होता की आपलं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे; दुसऱ्या कुणी तरी करून ते होणार नाही. नेत्यांचंच म्हणालात म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपल्या इथले एक आमदार आहेत, त्यांचा एक whatsapp गट आहे. त्या गटामध्ये त्या आमदारांच्या स्वीय सचिवाने एक दिवस एक मेसेज टाकला होता, पावतीसकट, की ‘पोलीस पाचशे रुपये दंड करत आहेत, म्हणून मास्क वापरा!!’ मी त्या सचिवाला प्रश्न विचारला की "तू आमदाराचा स्वीय सचिव आहेस तर तू रस्त्यावर मास्क न घालता का हिंडत होतास?" पोलीस पकडत आहेत म्हणून मास्क वापरा असं तू लोकांना सांगत आहेस, तू मुळात रस्त्यावर मास्कशिवाय होतासच कशासाठी?

पुण्यातले दुसरे एक नेते वेगळ्या पक्षाचे आहेत म्हणून ते सगळ्या फोरम्सवर आरडाओरडा करायचे, की पुण्याचा प्रतिसाद योग्य नाही, पुण्याचा प्रतिसाद योग्य नाही, पुण्यामध्ये कसा पसरतोय, सरकार निष्काळजी आहे, पण तुम्ही स्वतः लोकांपर्यंत योग्य माहिती पोचवण्याची काहीच जबाबदारी घेत नाहीत (मास्क वापरला पाहिजे, स्वच्छता पाळली पाहिजे, अंतर ठेवायला पाहिजे). यात राजकारण आहे. त्यात आपण पडायला नको. आधी जे विचारलं होतं की पहिला लॉकडाऊन कधी व्हायला पाहिजे होता? In a lighter vein, ट्रम्प भारतात यायच्या आधीच लॉकडाऊन व्हायला हवा होता आणि ट्रम्पना येऊ द्यायला नको होतं. इतकं साधं गणित आहे हे. मी राजकीय विश्लेषक नाही, परंतु एक सामान्य माणूस म्हणून मला असं वाटतं की हे असं व्हायला हवं होतं कदाचित. आता नेते घराबाहेर पडू लागले असतील तर त्यांनी जनजागृतीचं काम खरोखर करावं.

प्रश्न : सतत PPE किट आणि मास्क घालूनही डॉक्टरांचे मृत्यू का होत असतील?

उत्तर : इन्फेक्शन कुठे होतं हे आपल्याला नक्की कळत नाही. PPE आपण चोवीस तास घालत नाही. ते बाहेरही जातात त्यांचा इतर माणसांशीही संपर्क येतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे वॉर्डमध्ये, ICUमध्ये, जिथे पेशंट संख्या खूप जास्त आहे, तिथे ते असतात आणि PPE किट घालण्यात काही गफलत झाली असेल तर त्यातूनही लागण होऊ शकते. डॉक्टरांनाही डायबिटीससारख्या इतर व्याधी असतात, कदाचित त्यांच्यामध्ये व्हायरल लोड जास्त असू शकतं, त्यांना कोमॉर्बिडीटीज असू शकतात. आणि एकदा लागण झाली त्यांचा पुढचा प्रवास हा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे होतो, ज्यात काही वेळा मृत्यूही होतो. अर्थात गणपतीनंतर केवळ डॉक्टर्स असल्यामुळे जास्त बाधा झाली यावर मी विश्वास ठेवणार नाही. डॉक्टर माणूसही असतात, त्यांच्या घरी आरत्याही होतात, त्यांच्याकडेही आरतीला नातेवाईक येतात. आणि तिथे संसर्ग झालेला असू शकतो.

प्रश्न : हा अखेरचा प्रश्न तुम्हाला फिलॉसॉफिकल आणि व्हेग वाटण्याची शक्यता आहे, पण कोरोना आणि HIVच्या संदर्भात तुम्ही माणसांच्या संपर्कात आलात, लोकांशी बोललात. तुम्हाला कोरोनामध्ये विशेषतः,एकूण मानव जमातीबद्दल काय वाटतं? काय आहोत आपण? काही वेगळी निरीक्षणं, तुमची काही विशेष टिप्पणी असं काही आहे का?

उत्तर : तुम्ही प्रश्न विचारताना जेवढा धीर धरताय, त्याहून जास्त धीर धरून मला याला उत्तर द्यायला लागेल. मला मनुष्य जमात म्हणजे काय आहे हे अशा पद्धतीने सांगता येणार नाही. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जेव्हा आपल्याला एखाद्या अगम्य स्वरूपाची भीती वाटते, त्यावेळी आपण प्रचंड प्रमाणात सैरभैर होतो आणि विचित्र वागायला लागतो – हा पहिला धडा आहे यावेळचा. दुसरी गोष्ट म्हणजे जगभरामध्ये, (आपण काही वेगळे नाहीत) आपण दुसऱ्याला कलंकित करण्यात माहिर असणारे लोक आहोत. We are a highly stigmatizing community. आपल्याला सगळ्यासाठी कुणीतरी बळीचा बकरा लागतो. त्याला दोष दिला, कलंकित केलं की आपल्याला बरं वाटतं. स्त्री म्हणून स्टिग्मा, जात म्हणून स्टिग्मा, रंगावरून, धर्मावरून, हे चालूच आहे. HIVमधला एक धडा खूप पूर्वी जोनाथन मान नावाच्या एका माणसाने दिला होता : मानवी मूल्यं, मानवी हक्क आणि non-stigmatizing attitude जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही, तोपर्यंत या साथीला आपला प्रतिसाद कधीच योग्य असणार नाही. हे विधान आत्तादेखील लागू आहे. HIVमधला स्टिग्मा हा नैतिक स्टिग्मा होता. HIV आहे म्हणल्यावर वर्तनाशी संबंधित स्टिग्मा होता. कोविड मध्ये स्टिग्मा नैतिक नव्हता, परंतु मृत्यूचं भय असा होता. त्यामुळे आपला समाज विविध पद्धतींनी विचित्र वागला. सोसायट्यांमध्ये लोकांना येऊ न देणं, अजूनही काही ठिकाणी लोक मोलकरणींना घरात येऊ देत नाहीत, का तर म्हणे मोलकरणीमुळे आम्हाला आजार होईल. एक साधा प्रश्न असतो की मोलकरणीला पण तुमच्यापासून लागण होऊ शकते, तिला पण संरक्षण मिळायला पाहिजे – या जाणिवेचा अभाव होता. अर्थात HIVच्या मानाने कोविडच्या बाबतीत दूषणं देणं हे लवकर कमी होताना दिसतंय. कदाचित सर्वांनाच आसपास बघून / स्वानुभवामुळे असेल. दुसऱ्याला दूषणं देताना आपण स्वतः त्या जागी असण्याची शक्यता कमी असेल तर दूषणं देताना आपण जास्त धीट होतो. पण जेव्हा लक्षात येतं की आज सुपात असणारे उद्या जात्यात असणारेत, तेव्हा उद्या मलाही हे अनुभवायला लागणार असेल, तर आपण जास्त संतुलित / बरा प्रतिसाद देतो. आणि तिसरं म्हणजे : मनुष्यप्राणी हा निसर्गातलाच एक प्राणी आहे आणि तो इतर प्रजातींच्या इतकाच highly vulnerable आहे, हा धडा जरी आपल्याला या महासाथीतून मिळाला तरी खूप झालं! मानवजातीला असं वाटतं की आपण अजिंक्य आहोत. हे अजिबात खरं नाहीय. आपण प्राणिजगतातलेच एक सामान्य प्राणी आहोत आणि तसंच आपलं भवितव्य असणार. ते सांभाळूनच आपल्याला जगायचं आहे.

ऐसी अक्षरे : डॉ. कुलकर्णी, तुम्ही आमच्यासाठी इतका वेळ दिलात, तपशीलवार आणि सोप्या भाषेत मार्मिक उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार!

(समाप्त)

मुलाखतीत सहभागी प्रश्नकर्ते : अबापट, डॉ. विनायक जोशी (पॅथॉलॉजिस्ट, सोलापूर), मनीषा कोरडे, चिंतातुर जंतू, भूषण पानसे. तांत्रिक साहाय्य : भूषण पानसे, अनुपम बर्वे

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)