जंतूंचा नायनाट का त्यांच्याशी अटळ सह-अस्तित्व?

जंतूंचा नायनाट का त्यांच्याशी अटळ सह-अस्तित्व?
डॉ. अनंत फडके

Coronavirus renderings

मानवाला होणाऱ्या जंतुसंसर्गाकडे दोन दृष्टिकोनातून पाहता येतं. (या टिपणात जिवाणू, विषाणू इ. सर्वांना मिळून जंतू हा शब्द सर्वसाधारण अर्थाने वापरला आहे) एक दृष्टिकोन म्हणजे जंतूंशी आपल्याला सतत युद्ध करायचे असते आणि त्यासाठी आपल्याला सतत सतर्क राहायला पाहिजे; त्यासाठी सतत आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घेत राहिले पाहिजे, सतत जंतुनाशके वापरली पाहिजेत, जास्तीत जास्त लसी शोधून त्या जास्तीत जास्त लोकांना टोचायला पाहिजेत इ. इ. मुद्दे मांडणारा दृष्टिकोन. निरनिराळ्या कंपन्या आपापला माल खपवण्यासाठी हा दृष्टिकोन जाहीरातींच्या माध्यमातून जनमानसावर ठसवत असतात. उदा. टॉयलेटमधील जंतूंचा नायनाट करण्यासाठी औषधी रसायने वापरा, तसेच कातडीवरील, जंतु मारण्यासाठी डेटॉल किंवा लाईफबॉय किंवा तत्सम साबण वापरा इत्यादी ठसवले जाते. खरं तर याला काहीच अर्थ नसतो. कारण सर्वच जंतू हानिकारक नसतात. आपली त्वचा, नाक, तोंड, घसा, अन्नमार्ग, जननमार्गाचा काही भाग, इत्यादी ठिकाणी अगणित जंतू वास्तव्य करून राहतात. ते जोपर्यंत आपापल्या जागी आहेत तोपर्यंत त्यांच्यापासून आपल्याला धोका नसतो. उलट त्यापैकी काही जंतू उपकारक असतात. दुसरे म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या सर्व वस्तूंवर जिवाणू, विषाणू इ. असतातच. पण त्यांचा नायनाट करायचा प्रयत्न करण्याची गरज नसते. आपला श्वसनमार्ग, पचनमार्ग, डोळे इ. चे या जंतूंपासून संरक्षण करणे पुरते. त्यामुळे घरातील फरशी पुसून घेतांना त्यात फिनेल किंवा डेटॉल घालणे किंवा जंतुनाशक औषधे, साबण यांनी बाथरूम संडास धुऊन घेणे किंवा एखादे जंतुनाशक रसायन अंघोळीच्या, हात धुण्याच्या साबणात मिसळणे इ. कशाचीही गरज नसते. कारण मुळात आपली त्वचा निर्जंतुक करण्याची काहीही आवश्यकता नसते. उलट अशा निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे आपल्या कातडीला अपाय होऊ शकतो. धूळ,घाण, प्रदूषण इ. मुळे अस्वच्छ झालेले आपले शरीर आंघोळ करून स्वच्छ करणे, अन्न-पदार्थांना हात लावण्याआधी तसेच शौचाला जाऊन आल्यावर साबणाने हात धुणे पुरेसे असते.

दुसरा दृष्टिकोन म्हणजे जंतूंच्या आणि जंतुजन्य आजारांच्या सोबत मानवाचे जीवन बांधलेले आहे. जंगलातील वास्तव्यातून कीटकजन्य आजार (उदा. डासातून पसरणारे आजार) आले. शेतीसोबत पशुपालन आल्यामुळे काही प्राण्यांशी संबंध वाढला आणि त्यांच्यातील आजार मानवामध्ये आले. (उदा. देवी, कांजिण्या, क्षयरोग, रेबीज, प्लेग इ. इ.) त्यामुळे आपल्याभोवतीच्या सर्व जिवाणू-विषाणूंचा नायनाट करणे, त्यांच्याशी संपर्क अजिबात टाळणे इ. गोष्टी शक्य नाहीत आणि आवश्यकही नाहीत. जंतुसंसर्गाकडे केवळ नकारात्मक दृष्टीने बघून चालणार नाही; जंतुनाशकांचा वापर गरज असेल तेव्हाच आणि जपून करायला हवा. हा दुसरा दृष्टिकोन मला योग्य वाटतो. आपल्या जन्मापासून वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू, जिवाणू यांची आपल्याला लागण होत असते आणि आपले शरीर त्यांचा मुकाबला करत असते. पण अनेकदा हे आपल्या नकळत होते. बहुतांश वेळा जंतुलागणीमुळे आपल्याला त्रास किंवा आजार होत नाही. आपल्या नकळतच शरीर त्यांचा बंदोबस्त करते, आपले संरक्षण करते. दुसरे म्हणजे अनेक रोगांच्या बाबतीत जेवढ्या रुग्णांना त्रासदायक आजारपण येते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांना किरकोळ त्रास होतो, सौम्य लक्षणे येतात. फक्त थोड्याच लोकांना कमी जास्त तीव्रतेचा आजार होतो. उदाहरणार्थ, पोलिओ विषाणूच्या लागणीमुळे जेव्हा एखाद्या बाळाचा पाय लुळा पडतो तेव्हा त्याच्यामागे सुमारे शंभर बाळांना या विषाणूची लागण होऊन त्यांना केवळ काही किरकोळ लक्षणे येतात. तीच गोष्ट सध्याच्या कोव्हिड-१९ या आजाराच्या साथीबाबत खरी आहे. ‘सार्स कोव्हिड-२’ या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराला कोव्हिड-१९ असे म्हणतात. या विषाणूची लागण झालेल्यांपैकी सुमारे निम्म्या लोकांना काहीच आजार, त्रास याला तोंड द्यावे लागत नाही; त्यांना कोणताही आजार न होताच शरीर या लागणीचा यशस्वी प्रतिकार करते त्यामुळे त्याना लागण झाल्याचे कळतही नाही. ज्यांना कोव्हिड-१९ हा आजार होतो त्यांच्यापैकी फक्त सुमारे दहा-पंधरा टक्के रुग्णांनाच कोव्हिड-१९चा कमी-जास्त तीव्रतेचा आजार होतो; बहुतांश रुग्णांना सौम्य आजार होतो.

रोगप्रतिकारशक्ती व समूह संरक्षण
जंतूलागणीचा दुसरा एक भाग म्हणजे जंतूलागण झाल्यावर आपल्या शरीरात त्याच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि त्यामुळे अनेक जिवाणू-विषाणूंच्या बाबतीमध्ये त्याच जिवाणू किंवा विषाणूमुळे सहसा आपल्याला परत आजार होत नाही. उदाहरणार्थ, लहानपणी आपल्याला कांजिण्या किंवा गोवर झाला असेल तर सहसा आपल्याला परत कधी हा आजार होत नाही. कारण या विषाणूंच्या विरोधात आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. लागण होणे म्हणजे नैसर्गिकरीत्या होणारे लसीकरणही असते. कृत्रिम लसीकरणाने आपल्याला गंभीर आजार किंवा जादा त्रास होत नाही. या उलट हे नैसर्गिक लसीकरण अनेकांना त्रास, आजार देते. आपल्याला नेहमी होणारी सर्दी किंवा फ्लू हे किंवा आपण ज्याला व्हायरल फीवर असे म्हणतो त्या विषाणूजन्य तापाच्या बाबतीतही त्यांच्या लागणी सोबतच त्या विषाणूच्या विरोधात आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. मात्र सर्दी-तापाच्या किंवा फ्लूच्या बाबतीत दरवेळेस थोडाश्या वेगळ्या प्रजातीचा सर्दीचा/फ्लूचा/विषाणू-तापाचा विषाणू आपल्यावर आक्रमण करतो. या नव्या विषाणूच्या विरोधात आपल्यात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसते. त्यामुळे आपल्याला नवनवीन विषाणूमुळे अधूनमधून सर्दी येते किंवा विषाणू-ताप येत राहतो!

विषाणू-जंतूंच्या लागणीसोबत त्यांच्या विरोधात ही जी प्रतिकारशक्तीही निर्माण होते यामुळेच मुख्यत: त्यांच्या साथी काही दिवसांनंतर ओसरतात. असे होताना 'हर्ड इम्युनिटी' किंवा 'समूह संरक्षण' नामक प्रक्रियेची महत्त्वाची भूमिका असते. हर्ड इम्युनिटी किंवा समूह संरक्षण म्हणजे जेव्हा एखाद्या संसर्गजन्य आजारामध्ये लागण पसरत जाऊन समाजातील ६० ते ८० टक्के लोकांना लागण झाल्यावर, या लागणीमुळे त्यांच्यामध्ये त्या आजाराच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यावर, उरलेल्या लोकांना ते केवळ या समूहाचा भाग आहेत म्हणून जे आपोआप संरक्षण मिळते असे संरक्षण. समजा शंभर लोकांच्या टोळीमध्ये ८० लोकांकडे स्व-संरक्षणासाठी हत्यारे असतील तर उरलेल्या शस्त्रहीन लोकांनाही आपोआप संरक्षण मिळते. असे काहीसे जंतुविरोधी संरक्षणाबाबत होते. हे समूहसंरक्षण उर्फ हर्ड इम्युनिटी निर्माण होण्याची प्रक्रिया अशी असते – कोणताही विषाणू एखाद्या मानवी समूहात नवा असताना त्याच्या विरोधात सुरुवातीला कोणामध्येच प्रतिकारशक्ती नसते. त्यामुळे त्यांची लागण वेगाने पसरते. उदाहरणार्थ, तीस-चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे गोवरविरोधी लस येण्याआधी, लहान मुलांमध्ये नेहेमी गोवराची साथ येई. गोवरग्रस्त मुलांच्या संपर्कात आलेल्या सर्वच इतर लहान मुलांना त्याची लागण होई. पण त्याचबरोबर लागण झालेल्या सर्वांमध्ये या विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होई. त्यामुळे या साथीमुळे होणाऱ्या लागणीच्या प्रसारासोबत अशा ‘प्रतिकारक्षम’ मुलांची संख्या वाढत जाई. त्यामुळे या विषाणूंना दिवसेंदिवस ‘प्रतिकारशक्तीरहित’ मुले कमी कमी प्रमाणात सापडू लागत. माणसाच्या शरीराच्या बाहेर हे विषाणू फार वेळ जिवंत रहात नाहीत. त्यामुळे त्यांची संख्या, प्रसार घटून ही साथ आपोआप ओसरू लागे. कांजिण्याची साथ आल्यावरही असेच होई. दहा वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूची साथ आली होती तिचेही हेच झाले. त्याप्रमाणेच कोव्हिड साथही काही महिन्यांमध्ये ओसरणार आहे व त्यात 'समूह संरक्षणा'चा महत्त्वाचा वाटा असणार आहे. हे सर्व पाहता लक्षात येईल की लागण पसरणे हे व्यक्ती म्हणून आपल्याला नको असले तरी समाज म्हणून विचार केला तर लागण पसरणे म्हणजे केवळ संकट वाढणे असे नसते; लागण पसरल्यामुळेच साथ आटोक्यात येते!

या कोव्हिड-१९ साथीमध्ये लसीचा उपयोग मर्यादितच!
या नैसर्गिक लसीकरणात भर म्हणून साथ चालू असतानाच वेळेवर लस देऊन कृत्रिम लसीकरण केल्यास साथ ओसरायला मदत होते. पण आतापर्यंत कोणत्याही साथजन्य आजाराबाबत असे झालेले नाही की त्याच्या पहिल्याच साथीमध्ये कृत्रिम लसीकरण करून साथ आटोक्यात आणली गेली आहे. कारण कोणत्याही साथीच्या जिवाणू/विषाणूचा पुरेसा अभ्यास करून काही महिन्यातच, पहिली साथ चालू असतांनाच तिच्या विरोधात लस बनवणे हे वैज्ञानिकांपुढचे अशक्यप्राय आव्हान समजले जाई. 'सार्स कोव्हिड-२' या विषाणूच्या बाबतीत हे घडते आहे ते अभूतपूर्व आहे. सुरुवातीला शास्त्रज्ञ म्हणत होते की ही लस यायला कमीतकमी एक-दीड वर्ष लागेल. पण आता ते म्हणू लागले आहेत की एक वर्षाच्या आतच ही लस उपलब्ध होईल. असे झाले तरी कोव्हिड-१९च्या साथीवर विजय मिळण्यामध्ये या लसीचा उपयोग मर्यादितच असणार आहे. असे का, हे थोडक्यात समजावून घेऊया.

प्रा. डॉ. जयप्रकाश मुलीयिल या भारतातील जेष्ठ साथ-रोग तज्ञांनी सांगितले आहे की भारतातील शहरात व ग्रामीण भागात अनुक्रमे सुमारे ६०% व ४०% लोकांना कोव्हिड-१९ची लागण झाल्यावर 'समूह संरक्षणा'ची अवस्था येऊन साथ ओसरू लागेल. ही लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन मोठ्या प्रमाणावर टोचायला २०२१ उजाडेल. तोपर्यंत ज्यांना कोव्हिड-१९ची लागण होऊन गेली आहे अशा कोव्हिड विजेत्या लोकांमध्ये आधीच प्रतिकारशक्ती आली असेल. त्यामुळे अशा लोकांना कोव्हिड-१९ची लस देण्याची गरज नाही. कारण ज्यांना कोव्हिड लागण झाली आहे अशांना (अपवाद वगळता) येते काही महिने तरी कोव्हिड-१९ची लागण होण्याची शक्यता नसते. जानेवारी २०२१पर्यंत भारतात सुमारे ४०-५० कोटी लोकांना कोव्हिड-१९ची लागण झाली असेल असे आतापर्यंतच्या 'सीरो सरव्हेलन्स' या प्रकारच्या शास्त्रीय पाहणी-अहवालांवरून दिसते. त्यामुळे सरसकट सर्वांना लस टोचावी, का ज्यांच्या अंगात कोव्हिड-१९विरोधी प्रतिकारशक्ती नाही असे एखाद्या चाचणीमार्फत शोधून त्यांना ही लस टोचावी असा विचार करावा लागेल. नाहीतर, कोट्यवधी लोकांना गरज नसताना कोव्हिड-१९ विरोधी लस टोचण्याचे काम व त्यासाठीचा खर्च करावा लागेल व त्यापैकी थोड्या लोकांना का होईना कोव्हिड-१९ विरोधी लसीच्या साईड-इफेक्टना अकारण तोंड द्यावे लागेल.

*************
डॉ. अनंत फडके गेली अनेक वर्षे सार्वजनिक आरोग्यसेवेतील प्रश्नांवर काम करत आहेत. ते पुण्यातील 'जन आरोग्य अभियाना'चे सहसंस्थापक आहेत. 'ऐसी अक्षरे'च्या विनंतीवरून त्यांनी जनप्रबोधनासाठी सामान्य माणसांच्या करोनाविषयक शंकांना उत्तर देण्याचे मान्य केले आहे.

field_vote: 
0
No votes yet

पोलिओची लस मुलांना पहिली पाच वर्षं देत राहतात. त्यात बहुतेक एवढ्या बूस्टर डोसची गरज नसते; पण कुणी मूल लशीविना राहू नये म्हणून हे करत असावेत. मग तीच बाब कोव्हिड-१९बद्दल लागू नाही का? खर्च, दुष्परिणाम हे सगळं पोलिओच्या लशीसाठीही होतंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याच उत्तर 'अजून ठरलं नाहीये ' . लसीमुळे किंवा आजार होऊन गेल्यानंतर तयार झालेली प्रतिकारक्षमता किती कालावधीकरिता सक्षम राहते हे अजून माहित नाही . पोलिओ जुना आजार , भरपूर संशोधन झालेला , त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती आहे . हा विषाणू आणि आजार दोन्ही नवीन. म्हणून ' अजून माहित नाही ' . लस आली तरीही लसीकरिता चालू झालेल्या चाचण्या पुढे चालूच राहतात , त्या याकरिताच. त्यामुळे याचे उत्तर म्हणजे ' अजून ठरले नाहीये ' असेच देता येईल. एखाद्या वर्षाने ठरेल कदाचित , तेव्हा निर्णय होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण फ्रान्समध्ये जो काही हाहाकार उडाला त्यातून भयभीत झाले लोक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

जंतू आणि माणूस हा अंनिस वार्तापत्रामधे डॉ सुभाष आठल्ये यांचा लेख हा असाच आहे.
https://drive.google.com/file/d/1NKEfHHUy924eImW1YmbxY-9CiP_y817K/view?u...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सध्या भारतात तरी मास्क लावणे बऱ्यापैकी पाळले जात असले तरी सॅनिटायझरने हात धुणे, बाहेरून घरी आल्यावर आंघोळ करणे (मास्कला हात न लावणे) या गोष्टी फारशा पाळल्या जात आहेत असे वाटत नाही. आणि गर्दी न करणे एकमेकांपासून अंतर राखणे ही व्यवधाने ठेवणे जवळजवळ नसल्यागतच आहे. दुकानातून आणलेल्या वस्तू दूऱ ठेवणे इत्यादि सुरुवातीस होणारे अतिरेक आता थांबले आहेत. तरी भारतात करोना प्रसार कमी होत आहे. (सरकारी पातळीवर प्रोटोकॉल सतत बदलत आहेत त्यामुळे त्या आकड्यांना "ट्रेण्ड" म्हणून पाहणे चुकीचे ठरेल तरीही) इतक्या हलगर्जीपणात देखील करोना हाहा:कार माजवत असलेला दिसत नाही.

यावरून मला दोन हायपोथेसिस मांडावे वाटतात.
१. विविध पृष्ठभागांवर असलेल्या विषाणूंद्वारा प्रसार सहजपणे होत नाही. कदाचित पृष्ठभागावरील विषाणू फार काळ पोटंट रहात नसतील.
२. हे खरे असेल तर लक्षणे नसलेल्या रुग्णांद्वारा रोग प्रसार होणे कठीण आहे. सुरुवातीच्या काळात लक्षणे नसतील तरी रोगी विषाणूचा प्रसार करतात म्हणून लक्षणे नसलेले रुग्ण देखील जास्तीतजास्त टेस्ट करून शोधले पाहिजेत असा प्रोटोकॉल होता. तसे करण्याची आवश्यकता रहात नाही.
३. मास्क हे पुरेसे आणि परिणामकारक संरक्षण आहे.

दुसरीकडे सरकारी प्रोटोकॉलप्रमाणे लक्षणे नसतील तर टेस्ट केली जात नाही (जरी करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असेल तरीही). अशावेळी रोगाचा प्रसार सरकारी आकड्यांपेक्षा बराच जास्त असू शकतो. तरीही मृत्यू फार होत नसतील तर (भारतात) करोना संपला* आहे.

*संपला आहे म्हणाजे त्याची फार दखल घ्यावी असा तो उरलेला नाही. दर वर्षी करोडो लोकांना सर्दी होते, आपण काही त्यासाठी टेस्ट करणे/आयसोलेशन करणे कॉण्टॅक्ट ट्रेसिंग करणे या गोष्टी करत नाही. करोना त्या स्थितीला पोचला आहे असे वाटते.

डिसक्लेमर: मी यातला तज्ञ नाही त्यामुळे वरची विधाने अतिरेकी आणि सरसकटीकरणात्मक वाटतील. पण मग "शो मी द बॉडीज" असे मी म्हणेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आमचा अनुभव असा आहे की, लॉकडाऊन संपल्यावर, रोज बाहेर पडूनही मास्क वापरणे, घरी आल्यावर हात साबणाने धुणे आणि सोशल डिस्टन्सचे पालन करणे, फक्त या गोष्टी करुन आत्तापर्यंत कोरोनापासून वाचलो आहोत. घरी आणलेल्या वस्तु कधीच बाजूला ठेवल्या नाहीत. भाज्या कधीही सोडा वा साबणाने धुतल्या नाहीत, बाहेरचे खाद्यपदार्थ भरपूर वेळा खाल्ले. एकच महत्वाची गोष्ट म्हणजे, कधीही तोंडाला,डोळ्याला आणि एकूणच चेहेऱ्याला चुकूनही हात लावला नाही. घरी असतानाही डोळ्याला वा चेहेऱ्याला हात लावायची वेळ आलीच तर आधी साबणाने हात स्वच्छ हात धुवूनच लावायचा, हे कटाक्षाने पाळले.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0