समाज माध्यम आणि खिन्नमनस्कता

जात-पंथ-धर्म, रूढी-परंपरा, वेद-उपनिषद, आयुर्वेद – होमिओपथी, थोरा-मोठ्यांचा इतिहास, संस्कृती, देशप्रेम-देशभक्ती, प्रादेशिक-भाषिक अस्मिता, पक्ष-पक्षनेतृत्व, इत्यादीसारख्या कुठल्याही (अती) संवेदनशील विषयाबद्दल थोडीशी जरी टीका केली तरी डोके फोडून घेण्याची तयारी हवी. कारण तुमचे कुठले तरी शब्द वा वाक्य कुणाच्या भावना कसे दुखवतील याचा नेम नाही. काही प्रमाणात समाज माध्यमसुद्धा याच पंक्तीत जाऊन बसत आहे की काय असे वाटत आहे. वाट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रॅम वा ट्वीटरसारख्या समाज माध्यमातून मत प्रदर्शित करण्यात काही चूक नाही; आलेले मेसेजेस न वाचता वेळ न दवडता ताबडतोब लाइक शिक्का मारणे वा फॉर्वर्ड करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे; वेळी-अवेळी, रात्री-अपरात्री, घरात नाष्टा-जेवण (वा नैसर्गिक विधी) करत असताना, सार्वजनिक समारंभ – कार्यक्रमाच्या वेळी वा कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मीटिंगमध्ये असताना, (हॉस्पिटल-स्मशानाच्या ठिकाणीसुद्धा!) मोबाइलवरील मेसेजेस वाचण्यात (व ताबडतोब प्रतिसाद देण्यात) काही गैर नाही; अशा प्रकारच्या ' टेकन फॉर ग्रँटेड' मानसिकतेमुळे कुणालाही काहीही वाटेनासे झाले असून यात काहीतरी चुकत आहे याची पुसटशी शंकासुद्धा कुणाला शिवत नाही. उठल्या-बसल्या, दिवस-रात्र त्या निळ्या प्रकाशात आपले डोके खुपसून बसलेले असताना या नील किरणांचे आपल्या डोळ्यावर काही दुष्परिणाम होऊ शकेल याचे भानही नसल्यामुळे हा अव्यापारेषु-व्यापार अव्याहतपणे चालू आहे. नीटपणे स्वतःचे नाकही पुसता न येणाऱ्या २-३ वर्षाच्या अजाण मुला-मुलींपासून धूसर दृष्टी असलेल्या म्हाताऱ्या-कोताऱ्यापर्यंतच्या सर्वांना आवडणाऱ्या या स्मार्टफोनच्या वापराविषयी एक अवाक्षरही उच्चारले तरीही तडीपार होण्याची तयारी हवी. समूह माध्यमाचे हत्यार हाती असल्यामुळे बदनामीकारक मजकूर लिहून विरोधकांचा मानसिक छळ करणे हा तर या समाज माध्यमाच्या वापरकर्त्यांचा हातचा मळ झाला आहे.
xxxसमाज माध्यमं व खिन्नमनस्कता यांचा एकमेकाशी काही संबंध आहे का हा प्रश्न नेहमीच विचारला जात आहे. काही मानसतज्ञांच्या मते समाज माध्यमाच्या अतीव वापरामुळे खिन्नमनस्कता (depression) या मानसिक रोगाचे आपण शिकार होऊ शकतो. परंतु अशा प्रकारे घाईने कुठलेही निष्कर्ष न काढता नेमके कुठे चुकत असावे याचा शोध घेणे शहाणपणाचे ठरेल.

खरे पाहता ही समस्या वाटते तितके सोपी नसून फार गुंतागुंतीची आहे. करोडपती अमिताभ बच्चन स्टाइलने ‘होय’ किंवा ‘नाही’ असे एका दमात उत्तर देणे शक्य नाही. वाट्सअ‍ॅपवरील कोरोना महामारीच्या संदर्भातील मजकूर स्क्रोल करत असताना मन विषण्ण होऊन जाते. प्रसंगाचे गांभीर्य न ओळखता केलेली मल्लीनाथी वाचताना मेसेज पाठविणाऱ्यांची कीव कराविशी वाटते. अनेक वेळा मित्रांचा हेवा वाटू लागतो. आपण इतके तडफडत आहोत; ते मात्र किती कूल आहेत हा विचार शिवून जातो. समाज माध्यमावर झळकणारे चित्र-विचित्र फोटो व/वा व्हीडीओ बघत असताना आपण कुठल्या जगात वावरत आहोत असे वाटू लागते. समाज माध्यमावरील अफव्यामुळे व या अफव्यावर नको तितका विश्वास ठेवल्यामुळे आर्थिक व जीवित हानी होत असलेले पाहून मन विषण्ण होते.
परंतु त्याच वेळी एखाद्या लहान बाळाचे स्मित हास्याचा फोटो वा त्याच्या खोडकरपणाचा व्हीडीओ बघत असताना मनातला शीण भुर्रकन उडून जातो. कुत्र्या-मांजरांचा खेळ, जंगलातील क्रूर प्राण्यांची अस्तित्वासाठीचा झगडा, दूरच्या कुठल्या तरी देशातील पर्यटन ठिकाणांचे धबधबे, सूर्योदय-सूर्यास्तासारखे दृश्य स्क्रीनवर पाहतांना मन हरवून जाते. आवडलेले जुने चित्रपट, कार्टून्स पहात असताना आपण पुन्हा भूतकाळात शिरतो. फक्त या एकमेव कारणासाठी तरी समाज माध्यमाची ही सुविधा हवीहवीशी वाटू लागते. समाज माध्यमातून आलेल्या हास्यमय प्रसंगाच्या फोटो/व्हीडीओंना आपण मनस्वी दाद देतो; हसतो; शेर करू लागतो. त्यामुळे समाज माध्यम तितके वाईट नाही, असे वाटू लागते.

समाजमाध्यमाविषयी अनेक प्रकारचे उलट-सुलट मतप्रवाह व्यक्त होत आहेत. ट्रोलिंग, सायबर बुलिंग, स्क्रीनची व्यसनाधीनता इ.इ.मुळे समाज माध्यमाबद्दल टोकाची विखारी मतं व्यक्त केले जात आहेत. अत्याधुनिक फोटोशॉपिंग व फिल्टरिंग तंत्रामुळे समाज माध्यमावरील माहितीची सत्यासत्यतेची शहानिशा करणे जमेनासे झाले आहे. शिवाय समाज माध्यमांचा पुरेपूर वापर करणाऱ्यांच्या मनावर होणारे, त्यांच्या कामावर होणारे परिणाम इत्यादी गोष्टीसुद्धा ऐरणीवर आहेत.

अलीकडेच JAMA या वैद्यकीय विषयक अमेरिकन नियतकालिकात Association of Screen Time and Depression in Adolescence या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. नुसते शीर्षक वाचूनच तरुणं - तरुणींमधील स्क्रीन अ‍ॅडिक्शनच्या वाढत्या सवयीविषयी समाजाची काळजी करणाऱ्या अनेकांना समाज माध्यमाचा धक्का बसत आहे. अनेकांच्या मनात स्क्रीनसाठी वेळ खर्ची घालणे धोकादायक असे वाटू लागले आहे. परंतु समाज माध्यम व विषण्णता यांच्यात खरोखरच काही संबंध आहे का या विषयी अभ्यास करताना संशोधकांनी काही सावधानतेचे इशारेही दिले आहेत.

मादक द्रव्य व मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या सुमारे 3800 पौगंडावस्थेतल्यांचा अभ्यास करत असताना त्यांच्या स्क्रीन अ‍ॅडिक्शनविषयीसुद्धा अभ्यास केला गेला. हा अभ्यास सुमारे चार वर्षे चालला होता. अभ्यासकांच्या मते या वयातील तरुण-तरुणींच्यात खिन्नमनस्कतेचे प्रमाण वाढण्यात स्क्रीन अ‍ॅडिक्शनचाही वाटा आहे. एक समूह म्हणून केलेले संशोधन व व्यक्ती म्हणून केलेले संशोधन या दोन्ही बाबतीतही हेच निष्कर्ष निघत असल्यामुळे हा चिंतेचा विषय होत आहे, असे लेखात नमूद केले आहे.

या निष्कर्षाप्रत येण्यास घाई तर होत नाही ना? समाज माध्यम वाईटच आहे असे म्हणत या विषयीची चर्चा थांबविण्यापूर्वी संशोधकानी स्क्रीन अ‍ॅडिक्शन व खिन्नमनस्कता यांच्यातील संबंधाविषयी नमूद केलेल्या सावधानतेच्या इशाऱ्यांकडेही लक्ष वेधणे तितकेच गरजेचे आहे म्हणून हा लेखनप्रपंच.

JAMAच्या लेखात पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्यातील समाज माध्यमाच्या वापरामुळे खिन्नमनस्कतेच्या निर्देशांकात वाढ होत असून स्क्रीन समोरील वेळेत एक तास जरी वाढ केल्यास हा निर्देशांक 0.64 ने वाढत आहे, असे नमूद केले आहे. मुळात मानसतज्ञांच्या मते वेगवेगळ्या निकषानुसार खिन्नमनस्कता 0 ते 28 या निर्देशांकानुसार ठरविले जाते. गंमत म्हणजे या वयोगटातील मुलींच्या खिन्नमनस्कतेच्या 2.79 निर्देशांक पोचण्यासाठी मुलींना दर दिवशी 4-5 तास स्क्रीनसमोर बसावे लागेल. त्या तुलनेने ही वाढ नगण्यच म्हणावे लागेल. समाज माध्यमांच्या वापरामुळे हा वयोगट पूर्णपणे वाया जात आहे असे समजण्यात हशील नाही.

समाजमाध्यमात फक्त वाट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम वा ट्वीटर एवढेच प्रकार नसून टिक् टॉक् लिंकडेन, स्नॅपचॅट, यूट्यूब, क्वोरा, रेड्डिट् पिंटरेस्ट, फ्लिपबोर्ड असे अनेक प्रकार आहेत व यातील प्रत्येक प्रकाराला प्राथमिकता दर्शविणारे अनुयायी वेगवेगळ्या गटात विभागलेले असतात. एवढे वेगवेगळे प्रकार असले तरी समाज माध्यमामुळे मानसिक संतुलन बिघडते व ही एक समस्या आहे याबद्दल मात्र सर्वांचे एकमत असते.

समाज माध्यमाच्या वापराच्या समस्येचा अल्कोहॉलच्या समस्येशी करता येईल असे जाणकारांना वाटत आहे. सीमित प्रमाणात अल्कोहॉल घेत असल्यास ती समस्या होत नाही; फक्त त्याचे अती सेवन केल्यास ती समस्या होऊ शकते. हाच निकष समाज माध्यमाच्या वापरालाही लावता येईल. दारू पिणे हे कुठले तरी (काल्पनिक) दुःख विसरण्यासाठी सातत्याने होत असल्यास त्याचे अ‍ॅडिक्शनमध्ये रूपांतर झल्यास ते एक मानसिक रोगाचे लक्षण ठरू शकेल. त्याच प्रमाणे फेसबुक, ट्वीटरसारख्या समाज माध्यमांचा वापरसुद्धा काही विसरण्यासाठी होत असल्यास वा समोरच्या प्रश्नांचा विसर पडावा म्हणून सतत स्क्रीनसमोर बसण्याचा पर्याय निवडत असल्यास ती एक मानसिक समस्या ठरू शकेल. परंतु समाज माध्यमांचा विवेकशील वापरामुळे आपले जीवन अधिक फुलवण्यासाठी होत असल्यास त्याचे स्वागतच करायला हवे.

पौगंडावस्थेतल्यांच्यातील खिन्नमनस्कतेला समाज माध्यमच पूर्णपणे कारण आहे असे निर्विवादपणे JAMAच्या लेखात वा इतर ठिकाणी सिद्ध झालेले नाही. कदाचित या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे त्यांच्यात परस्पर संबंध आसावा अशी अटकळ बांधली जात असावी. समाज माध्यमाच्या (अतीव) वापरामुळे खिन्नमनस्कतेत वाढ होत आहे हे मान्य केले तरी खिन्नमनस्कतेला तेच एकमेव कारण आहे असे म्हणता येणार नाही.

याच लेखातील उदाहरण घेतल्यास पौगंडावस्थेतील खिन्नमनस्थितीतील रुग्णांचे बालपण तितके सुखाचे गेले नसेल व त्यामुळे ते स्क्रीन अ‍ॅडिक्शनचे बळी ठरलेले असावेत. काही कारणामुळे ही मुलं बालपणी बळजबरी, हिंसा, अत्याचारसारख्या प्रसंगांना सामोरे गेलेले असल्यामुळे मोठेपणी ते अशा प्रकारच्या समाज माध्यमातून हरवलेले सुख शोधत असावेत. मानसतज्ञांच्या मते प्रौढ व्यक्तीतील खिन्नमनस्कतेचे एक कारण त्यांच्या बालपणातील कटु अनुभवात शोधता येते. खिन्नमनस्कतेची अनेक कारण असू शकतात व त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे.

यावरून समाज माध्यम तितकेसे वाईट नाही असे आपल्याला वाटत असल्यास आपण योग्य दिशेने विचार करत आहात असे म्हणता येईल. 2018 सालच्या एका अभ्यासानुसार 21व्या शतकातील समाजसुद्धा बहिष्कृत करत असलेल्या समलिंगी व तृतीयपंथी (LGBTQ) व्यक्तींना समाज माध्यमाचा फार मोठा आधार वाटत आहे. समाज माध्यमावरील त्यांच्याबद्दल घृणा व्यक्त करणारी जहरी टीका, टिंगल, टवाळी, कुटाळक्यांच्या बरोबरच त्यांच्या विषयी सहानुभूतीचे पोस्टसुद्धा त्यात असल्यामुळे त्यांचे जीवन सह्य होत आहे. समूह माध्यमातून त्यांना एकमेकाशी संवाद साधणे शक्य होत आहे. कदाचित या समाज माध्यमामुळेच अशा व्यक्ती संघटित होऊ शकले व अशा व्यक्तींबद्दलची विषम वर्तणूक गुन्हा समजला जावे यासाठी कायदा करून घेणे शक्य झाले आहे.
तरीसुद्धा समाज माध्यमाचा वापर करणाऱ्यांना खालील धोक्याच्या इशाऱ्यांबद्दल जास्त जागरूक असणे गरजेचे आहेः

• समाज माध्यमाच्या वापरामुळे रोजच्या व्यवहारातील परस्पर संबंध बिघडणे,
• वास्तव जगातील सुखद प्रसंगांचे आनंद अनुभवताना समाज माध्यमावरील तुमच्या प्रोफाइलला धक्का पोचण्याच्या भीतीमुळे त्रस्त होणे,
• समाज माध्यमाचा वापर कमी करण्यास अशक्यप्राय आहे असे वाटणे.

मुळात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास पश्चात्तापाची पाळी नक्कीच येत असते. त्यामुळे समाज माध्यमाच्या अती वापराबरोबरच वरील पैकी एखादा जरी धोक्याचा इशारा तुम्हास लागू होत असल्यास समाज माध्यमापासून व/वा स्क्रीनपासून काही काळ दूर राहून कुणाशी तरी प्रत्यक्ष संवाद साधणे किंवा कुणाच्या तरी हास्य विनोदात सहभागी होणे हाच (एकमेव) उपाय तुम्हाला समाज माध्यमाच्या धोकादायक वावरापासून वाचवू शकेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नीटपणे स्वतःचे नाकही पुसता न येणाऱ्या २-३ वर्षाच्या अजाण मुला-मुलींपासून धूसर दृष्टी असलेल्या म्हाताऱ्या-कोताऱ्यापर्यंतच्या सर्वांना आवडणाऱ्या या स्मार्टफोनच्या वापराविषयी एक अवाक्षरही उच्चारले तरीही तडीपार होण्याची तयारी हवी.

तडीपार व्हा!!!

कृपया तडीपार व्हा. ताबडतोब.

अलीकडेच JAMA या वैद्यकीय विषयक ब्रिटिश नियतकालिकेत Association of Screen Time and Depression in Adolescence या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे.

१. JAMA = Journal of the American Medical Association. हे नियतकालिक ब्रिटिश कसे काय बरे असू शकेल?
२. नियतकालिकात.
३. बाकी चालू द्या.

जात-पंथ-धर्म, रूढी-परंपरा, वेद-उपनिषद, आयुर्वेद – होमिओपथी, थोरा-मोठ्यांचा इतिहास, संस्कृती, देशप्रेम-देशभक्ती, प्रादेशिक-भाषिक अस्मिता, पक्ष-पक्षनेतृत्व, इत्यादीसारख्या कुठल्याही (अती) संवेदनशील विषयाबद्दल थोडीशी जरी टीका केली तरी डोके फोडून घेण्याची तयारी हवी. कारण तुमचे कुठले तरी शब्द वा वाक्य कुणाच्या भावना कसे दुखवतील याचा नेम नाही.

उपरोक्त अमेरिकन नियतकालिकास ब्रिटिश म्हणून संबोधल्याने माझी अमेरिकन राष्ट्रीय अस्मिता दुखावली आहे. तसेच, 'नियतकालिकात' हा शब्द 'नियतकालिकेत' असा व्याकरणदृष्ट्या अशुद्ध लिहून (आणि तदनुषंगे 'नियतकालिका'च्या लिंगाचा चक्काचूर करून) आपण माझ्या मराठी भाषिक अस्मितेसही जबरदस्त धक्का पोहोचविला आहेत. सबब, तडीपार होण्याचे वरील कळकळीचे आवाहन.

काही प्रमाणात समाज माध्यमसुद्धा याच पंङ्तीत जाऊन बसत आहे की काय...

पंक्तीत.

...याचे भानही नसल्यामुळे हा अव्यापारेशू-व्यापार अव्याहतपणे चालू आहे.

अव्यापारेषु व्यापार.

(थोडक्यात, मराठी भाषिक अस्मितेची पदोपदी पायमल्ली. इतकी तर मोरारजीभाईंनीसुद्धा केली नसेल!)

सीमित प्रमाणात अल्कोहॉल घेत असल्यास ती समस्या होत नाही; फक्त त्याचे अती सेवन वा गैरवापर केल्यास ती समस्या होऊ शकते.

Abuseकरिता 'गैरवापर' हे शब्दांतर भयंकर आहे. (अन्यथा, अल्कोहोलचा 'अधिकृत वापर' म्हणजे नक्की कसा, ते समजावून सांगावे.) अर्थात, 'अल्कोहोलला शिवीगाळ' असा (त्याहूनही भयंकर) पर्याय सुचवू इच्छीत नाही, परंतु...

(Abuseकरिता या संदर्भात उचित पर्याय कोणता, हा प्रश्नच आहे.)

समाज माध्यमावरील अफव्यामुळे व या अफव्यावर नको तितका विश्वास ठेवल्यामुळे आर्थिक व जीवीत हानी होत असलेले पाहून मन विषण्ण होते.

१. अफवेमुळे/अफवेवर (एकवचनी). अफवांमुळे/अफवांवर (अनेकवचनी).
२. जीवितहानी.

गंमत म्हणजे या वयोगटातील मुलींच्या खिन्नमनस्कतेच्या 2.79 निर्देशांक पोचण्यासाठी मुलांना दर दिवशी 4-5 तास स्क्रीनसमोर बसावे लागेल.

हं?????? मुलांनी दररोज ४-५ तास स्क्रीनसमोर बसल्यामुळे मुलींच्या खिन्नमनस्कतेचा निर्देशांक कसा काय वाढेल बुवा? यात काही कार्यकारणभाव असल्यास - आणि, तसा तो आहे, असे आपण सुचवीत असल्याची शंका येते - निदान मला तरी तो समजू शकला नाही.

त्यामुळे समाज माध्यम तितके वाईट नाही, असे वाटू लागते.

"There is nothing either good or bad, but thinking makes it so."

(शेक्सपिअरच्या 'हॅम्लेट'मधून (अंक दुसरा, प्रवेश दुसरा), साभार.)

(काहीसे सवांतर: हे वाक्य ठाऊक होते, परंतु संदर्भ ठाऊक नव्हता. चटकन गुगलून 'हॅम्लेट' मुखोद्गत असल्याचा भास निर्माण करता आला, नि गूगल/विकीपांडित्य मिरविता आले. कोण म्हणतो जालमाध्यमे सरसकट वाईट म्हणून?

किंबहुना, जालमाध्यमे नसती, तर प्रस्तुत लेखकास तरी 'जामा'मधला हा लेख समोर उघडा ठेवून भयंकरभाषांतरायला इतक्या सहजी मिळाला असता काय?

आय रेस्ट माय केस.)

.

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

प्रत्येक शब्द न शब्द वाचून लेखातील (घोड)चुका दाखविल्याबद्दल शतशः प्रणाम व दंडवत!
(कदाचित जगलो वाचलो तर ) लेख लिहिताना जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करेन.
तडीपार होण्याची शिक्षा सुनावल्यामुळे जालमाध्यमाचा वापर करता येईल की नाही याबद्दल साशंक आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद..

आपल्या कुठल्याही लेखनावर नबांच्या टीकेची भीति वाटत असेल तर, कायम वर्तुळाकृती अर्थात गोल गोल लिहावे. म्हणजे त्यातील नवी बाजू शोधताच येणार नाही.

न बा यांच्या कंमेंट्सची भीती का वाटावी ?
आनंद वाटावा .
आपला लेख चुका काढण्याइतपत सखोल वगैरे कुणीतरी वाचला आहे याचा अतीव आनंद मानावा (याचा उपरनिर्दिष्ट लेखाशी काहीही संबंध नाही. एकंदरीत लोकांचे वाचन वरवरचे असते याच्याशी आहे)
न बा यांच्या कंमेंट्स रोचक असतात.
त्यातील मजा (लेखकानेसुधा) घ्यावी.
नानावटी काकांनी असेच लिखाण करावे आणि न बा यांनी त्यावर अशा पद्धतीच्याच कंमेंट्स माराव्यात.

.

न बा यांच्या कंमेंट्स रोचक असतात.

या विधानाशी पूर्ण सहमत, पण हे विधान अत्यंत तोकडे आहे. म्हणजे ते विधान १००% सत्य असले तरी १००% सत्य हे केवळ ते विधान नाही. न बांच्या कंमेंट्स रोचक, विचारप्रवण, विचारप्रवर्तक, कौतुकास्पद, कमालीच्या विश्लेषक, ... खरोखरच नवी बाजू / नव्या बाजू दाखवणाऱ्या असतात. अर्थात आता मी हे सांगतो आहे आणि म्हणून येथील सदस्यांना ते पहिल्यांदाच समजते आहे / आधी माहीत नव्हते / जाणीव (realization) नव्हती असे नाही पण... मी प्रकट चिंतन करतोय असे समजा.

विशेषतः न बा यांचे आणि एकूणच अनेक मिपाकरांचे लिखाण यांचा माझ्या विचारशैलीवर खरंच खूप प्रभाव पडला आहे / पडतो. अर्थात याची जाणीव मला नेमकी केंव्हा झाली हे निश्चित सांगता येणार नाही, पण हा प्रभाव केवळ आंतरजालाच्या (किंवा कोणत्याही) लेखन-वाचनापुरताच मर्यादित नाही / मर्यादित राहिलेला नाही. माझ्या व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक बाजूंवरही (aspects) इथल्या लेखनशैलीचा प्रभाव आहे. (न बा सहित) इथल्या अनेकांचे काही विचार मला पटत नसले तरी त्यांचा लेखनशैलीचा मी खरंच चाहता आहे.

अवांतर: रोचक या शब्दाचा नेमका अर्थ (connotation) मला समजला आहे याची मला खात्री नाही.
अवांतर: वर मी वापरलेल्या इंग्लिश शब्दांना योग्य मराठी प्रतिशब्द मिळाले तर बरे होईल.

ॲस्पेक्ट - पैलू,
रियलायझेशन - साक्षात्कार(?)
कनोटेशन - छटा(?)

लेख वाचून मनात आलेले काही विचार.

सोशल मीडियाबद्दल सातत्याने नकारात्मकच वाचायला मिळतं. (या लेखात काही सकारात्मक बाबीही लिहिल्या आहेत हे मान्य करूनही.) सोशल मीडिया हे व्यसन आहे, त्यामुळे नैराश्यच येतं, आसपासच्यांशी संबंध तुटतातच, डोळ्याला त्रास होतो, झोप उडते वगैरे.

पण या माध्यमाची जादू खरोखरच प्रेमात पडण्यासारखी आहे असं कोणाला खरंच वाटत नाही? माझा मुलगा त्याला एकदाच भेटलेल्या व कायम दिल्लीत राहाणाऱ्या मित्राशी संपर्कात राहू शकतो, हे तीस वर्षांपूर्वी शक्य नव्हतं. सोशल मीडियापोटीच अनेक लोकांना - बहुतेकांना त्यांच्या जुन्या तोटलेल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटता आलं. कित्येक लोकांना अभिव्यक्त होता आलं, येतंय. हे सग्गळे फायदे आहेत म्हणूनच तर लोक चिकटतात. उगीच फक्त वाईट परिणामांबद्दल शिव्या का दिल्या जातात?

माझा मुलगा त्याला एकदाच भेटलेल्या व कायम दिल्लीत राहाणाऱ्या मित्राशी संपर्कात राहू शकतो, हे तीस वर्षांपूर्वी शक्य नव्हतं.

'पत्रमैत्री' नावाचा प्रकार आमच्या लहानपणीसुद्धा (बोले तो, १९७०च्या दशकात) उपलब्ध होता. (फॉर्दॅट्मॅटर, इंग्रजाने टपालखाते एकोणिसाव्या शतकातच आणले असावे; चूभूद्याघ्या.) (शालेय वयोगटातल्या) इच्छुकांना देशीविदेशीचे (खास करून विदेशीचे) पत्रमित्र/पत्रमैत्रिणी मिळवून देणाऱ्या संस्थासुद्धा तेव्हा अस्तित्वात होत्या. (अर्थात, हे सर्व हौशी मंडळींकरिता. आम्ही व्यक्तिशः या भानगडीत कधीही पडलो नाही. आम्हाला मुळात लिहिण्याचा कंटाळा! पत्रमित्र कसले शोधतोय? परंतु, शाळेतल्या वर्गात, झालेच तर विस्तृत नातेगोतावळ्यात, हे उद्योग करणारे - आयुष्यात एकदाही न भेटलेल्या स्वीडिश नाहीतर ऑस्ट्रेलियन मैत्रिणी असणारे - महाभाग होते; त्यामुळे, असे काही अस्तित्वात असते, याची ऐकीव, सांगोवांगीची का होईना, परंतु माहिती होती. हं, आता, माहिती सांगोवांगीची असल्याकारणाने तिची 'विदा' म्हणून गणना करता येणार नाही, असा आक्षेप आपण घ्यालच. परंतु, आमच्या एका वर्गमित्राने त्याच्या स्वीडिश पत्रमैत्रिणीचे पत्र आम्हांस एकदा दाखविले होते, आणि आम्हीही, 'लोकांची पत्रे वाचू नयेत', हा शिष्टाचार धाब्यावर बसवून ते वाचले होते. (आम्हाला हे असले शिष्टाचार तेव्हा चुकून माहीत जर असलेच, तर ते केवळ सांगोवांगीनेच असल्याकारणाने, ते गंभीरपणे घेण्याचे काहीच कारण आम्हांस तेव्हा दृग्गोचर होत नव्हते. आणि हो, तसेही त्या पत्रात 'ज्यूसी बिट्स' वगैरे काहीही नव्हते. सातवीआठवीतल्या पोरापोरींच्या पत्रांत 'ज्यूसी बिट्स' ते काय असणार? 'मी रोज सकाळी थंडीत कुडकुडत शाळेत जाते. तू कसा जातोस?' हे?) हं, तर, असे (दुसऱ्याचे) एक पत्र आम्ही प्रत्यक्ष वाचले असल्याकारणाने, 'चक्षुर्वै सत्यम्' अर्थात 'आँखों देखा हाल'वाला काँपोनेंटही त्यात होता; सबब, यास 'विदा' नाही, तरी गेला बाजार 'विदाबिंदू' मानण्यास प्रत्यवाय नसावा. (अगदी तुम्हालाही.) तर ते एक असो.)

सांगण्याचा मतलब, आपल्या ध्येयपूर्तीबाबत जे लोक गंभीर होते, अशांकरिता (इच्छा असल्यास) मार्ग तेव्हाही उपलब्ध होते!

हं, त्या मार्गांना मर्यादा होत्या, हे खरेच आहे. (एका एअरोग्राममध्ये, किंवा अगदी डोक्यावरून पाणी गेले तरी एका पाकिटात कोंबलेल्या वहीच्या दोनतीन पानांत (पाकिटावरच्या ष्टांपाचा दर पाकिटाच्या वजनाप्रमाणे वाढत असे.), असा कितीसा मजकूर कोंबणार? शिवाय, ती पत्रे पोहोचायलासुद्धा भरपूर वेळ लागत असे - एकदोन आठवडे, वगैरे. (टू पुट थिंग्ज़ इन पर्स्पेक्टिव, सूर्यमालिकेच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलेल्या यानाकडून आलेला (रेडिओ)संदेश ह्यूस्टनला पोहोचायला (सरकारी दिरंगाईविनासुद्धा) सुमारे साडेचार तास लागतात, असे नुकतेच कोठेतरी वाचले.) त्यानंतर मग त्या पत्राला उत्तर लिहिणार, मग ते पोष्टात टाकणार, मग ते पोहोचायला तितकाच वेळ लागणार... गंमत म्हणजे, तोवर पत्रमैत्रीण टिकून राहात असे, कंटाळून सोडून जात नसे, असे ऐकून आहे. (अर्थात, सांगोवांगीची गोष्ट. विदा नव्हे.))

परंतु, त्या मार्गांच्या मर्यादा हेच एका दृष्टीने त्या मार्गांचे सामर्थ्य होते. म्हणजे, मार्ग कठीण असल्याकारणाने, ध्येयपूर्तीसाठी जे गंभीर असत, असेच लोक हे मार्ग गंभीरपणे चोखाळण्यामागे लागत असत. त्यामुळे, आउटपुटच्या प्रमाणावर तसेच दर्जावरसुद्धा आपोआपच नियंत्रण राहात असे.

सामाजिक माध्यमे बोकाळल्यापासून हे चित्र बदलले. आता, कोणीही, कोठेही, काहीही, ताबडतोब आणि जवळजवळ फुकटात लिहू शकू लागले. फेसबुकामुळे 'आज सकाळी मला पातळ शी झाली' ही बातमी ('स्टेटस') अर्ध्या जगाला क्षणार्धात कळविता येण्याची सोय झाली. (आणि, त्याचबरोबर, त्याला ताबडतोब 'लाइक' करण्याची अर्ध्या जगाचीही सोय झाली.) त्यामुळे, असल्याच बातम्या रुंजी घालू लागल्या. झालेच तर, व्हॉट्सॲपद्वारे कोण्या अनामिकाने अक्षरशः ढुंगणातून काढलेले तथ्यहीन मजकूर पंचवीस जणांना (फुकटात!) 'फॉर्वर्ड' करण्याची सोय झाली, जेणेकरून अफवांचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढले. (पूर्वीच्या काळी, लेखी मजकुराच्या पंचवीस झेरॉक्स - पैसे देऊन! - काढाव्या लागल्या असत्या, नि त्या पंचवीस पाकिटातं कोंबून, त्यावर पंचवीस ष्टांप डकवून, त्या पोष्टाच्या पेटीत टाकाव्या लागल्या असत्या. (पाकिटे नि पोष्टाची तिकिटे काही फुकटात येत नाहीत, म्हटले!) त्यानंतर ती पोहोचायला पोष्टकृपेने वेळ लागणार. त्यानंतर पुढच्या बॅचने ती 'फॉर्वर्ड' करण्यासाठी पुन्हा तीच यातायात - नि पुन्हा तोच खर्च! एवढे सगळे कोण करतो?) फार कशाला, 'ऐसी'सारखी संस्थळे आल्यापासून आमच्यासारख्या ट्रोलांची (१) कोठेही (या प्रतिसादासारखे) रटाळ, काहीबाही, नि शब्दजुलाबी प्रतिसाद टाकण्याची, (२) कोणाच्याही लेखाला वा कवितेला, काहीही कारण नसताना, केवळ वेळ जात नाही म्हणून खरडून काढण्याची, तथा (३) एकसमयावच्छेदेकरून अनेक जणींवर तथा जणांवर (वय-लिंग-निरपेक्षतः) घरबसल्या लायनी मारण्याची (म्हणजे, निदान आमच्यावर तसा आरोप तरी आहे. ('हम जो थोडी सी पी के ज़रा झूमे...')), सोय झाली. पूर्वी हे शक्य नव्हते. त्यामुळे, समाजजीवनाचा दर्जा तुलनेने का होईना, जरा बरा होता. तत्कालीन तंत्रज्ञानाच्या मर्यादांचे हे असे फायदे होते.

किंवा, अगदी टोकाचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर प्रस्तुत लेखाचेच घ्या ना! पूर्वीच्या काळी, लेखकास हा लेख पंचवीस मासिकांस पोष्टाने पाठवावा लागला असता. त्यानंतर, पैकी चोवीस मासिकांच्या संपादकांकडून 'साभार परत' (अर्थात, आगाऊ टपाल हशील भरल्यानंतरच!) आल्यानंतर, एखाद्या ऑब्स्क्युअर मराठी मासिकात (तेही, तो संपादक बहुधा लेखकाच्या उठब'स्की'तला असल्याकारणाने) तो छापून आला असता. नि त्यानंतर बहुधा तो कोणीही वाचला नसता. उलट, आजमितीस लेखकास 'ऐसी'सारख्या संस्थळावर महिन्याकाठी असले दोनतीन लेख स्वतःच टाकून 'स्वयंप्रकाशी' बनण्याची सोय आहे. तरीही ते लेख कोणी वाचत नाही, ही बाब अलाहिदा. मात्र, आमच्यासारख्या (नि तुमच्यासारख्यासुद्धा) ट्रोलांची त्या लेखांवर (ते लेख न वाचतासुद्धा, किंवा, फार फार तर वरवर वाचून) उलट्यासुलट्या प्रतिक्रिया देऊन स्वतःचेच मनोरंजन करून घेण्याची चांगली सोय होते, हीच काय ती त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. (कोण म्हणतो ट्रोलांना खायला घालू नका, म्हणून? ट्रोल आपली खानपानव्यवस्था उपलब्ध स्रोतांतून स्वतःच जमवितात!)

----------

मला वाटते, 'सामाजिक माध्यमे वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ट!!!' असण्याबाबतचा लेखकाचा जो (गर्भित) दावा आहे, त्याचे सक्षमपणे समर्थन करण्यात हा प्रतिसाद यशस्वी झाला असावा. (म्हणजे, निदान मला तरी तशी आशा आहे.)

"आम्हाला मुळात लिहिण्याचा कंटाळा!" हे वाचून खिन्नमनस्कता अनुभवता आली. धन्यवाद.

तरीही ते लेख कोणी वाचत नाही, ही बाब अलाहिदा.

५७३ वेळा हा लेख वाचला गेला आहे अशी विदा दिसते आहे. असो. चालायचेच.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लोल. न.बा. उभे पेटले.

उगीच फक्त वाईट परिणामांबद्दल शिव्या का दिल्या जातात?

खरं आहे तुमचं! एवढ्या लोकांचा शेतकरी बिलाला पाठिंबा असेल असे दावे केले जातात. असे लोक असते तर त्यांच्याही ट्रॅक्टरवर तिरंगे लावून रॅल्या लागलेल्या दिसल्या नसत्या का! त्या रॅल्या नव्हत्या म्हणजे सगळ्यांचा विरोधच आहे शेतकरी बिलाला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग समाजमाध्यमे बंद पडावीत म्हणुन देव पाण्यात घालून ठेवायचे का आता? या माध्यमांबद्दल, सतत नकारात्मक ऐकूनच कंटाळा आलेला आहे. उपयोग आणि या माध्यमांचे फायदे याकडे 'अतिपरिचयात अवद्न्या' होते आहे. ही माध्यमे एक साधन आहे. पेन्सिल तुम्ही लिहायला वापरता की कान कोरायला तो तुमचा प्रश्न आहे.
डोन्ट शूट द मेसेन्जर टूल.

'द सोशल डिलेमा' नावाचा अत्यंत सुंदर माहितीपट नेटफ्लिक्सवर आहे. बघूनच टाक. समाजमाध्यमं पेन्सिलसारखी ढ नाहीत; त्यात चिकार उपद्रवक्षमता आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नबांच्या प्रतिक्रियांचे संकलन करुन त्याचे एखादे पुस्तक (वा कमीतकमी ई पुस्तक) करावे, असे मी सुचवतो. त्यांच्या तळटीपा हेच त्याचे खास आकर्षण असेल. फक्त ऐसी वरील वाचकांनाच तो आनंद मिळतो त्याऐवजी सर्वच लोकांना वा जालाला त्याचा फायदा मिळावा!

खिन्नमनस्विता असेल की काय माहिती नाही, पण फेसबुक आणि विषेशत: ट्विटरपासून फारकत घेतल्यानंतर बरंच सुसह्य वाटतं आहे.
म्हणजे काय की आपल्या डाव्या-किंवा उजव्या विचारांचा कल पाहून फेसबुक आपल्याला तसलाच मजकूर दाखवणार- मग त्याला पाहून आपण डावे असलो तर मोदी चोर म्हणून-उजवे असलो तर खांग्रेस म्हणून चेकाळणार.
मधल्या मधे फेसबुकला जाहिराती मिळाल्या, आपल्यालाही हवा तसा माल फेसबुक दाखवत राहिल्याने आपणही पुन्हापुन्हा ती नशा अनभवायला येणार.
डिट्टो ट्विटर.
आपण कितीही संतुलित असलो -आणि दोन्ही (पक्षी डावे-उजवे) लोक फॉलो केले तरी शेवटी तो मसणा अल्गोरिथम जो आहे, तो आपल्याला अधिकाधिक भडक असा मजकूरच दाखवत रहातो.
आणि आपण अडकत जातो.

पूर्वी लोकं निदान फेबुवर "आज मी पातळ शी केली" असं स्वत: लिहून वगैरे पोस्ट टाकत (खरंच.) आता नुसते लाईक्स आणि शेअर येतात. मीम्स वगैरे. म्हणजे तिथेही पुन्हा भाड्याचाच मामला.

------------------------------------------------------------------------------
पेपरांच्या ई-आवृत्तीतही तेच आहे- "हिने घातली बिकिनी" किंवा "ह्याचा राग पाहाल तर थक्क व्हाल" वगैरे क्लिकबेट्सशिवाय फुकट असलेला मजकूर टिकणार तरी कसा?
मग त्यांना अधिकाधिक भडक बातम्या द्याव्या लागतात.
-----------------------------------------------------------------------------------------
फेबु,ट्विटर,इन्स्टाग्राम, इ.इ. - फुकट आहे, जहिरातींवर चालतात - म्हणजे आपण नुसते जाहिराती चिकटवण्याचे बिलबोर्ड आहोत.
पैसे भरून जर कोणी सोशल मिडिया काढला, तर त्यावर आपल्या ओळखीचे कितीसे लोक येणार?

ट्विटरवर तिमनित गेब्रूसुद्धा असते. फेसबुकनी २०१६च्या निवडणुकांची जबाबदारी गपचूप स्वीकारल्यानंतर अगदीच लेमळट झालंय!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेम + (नेभ)ळट = लेमळट

हे असे बरेच शब्द माझ्या कोकणी नातेवाईक - परिचितांमध्ये वापरात असायचे. (भूतकाळ - हल्ली यांतले बरेचसे लोक साध्या शब्दांसाठीसुद्धा इंग्रजी घुसडायला लागले आहेत.)

लेम + (नेभ)ळट = लेमळट

हे असंच माझ्या तोंडी आलं का, ते मलाही आठवत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो, तसे बरेच लोकं असतात ज्यांना फॉलो केलं तर बऱ्यापैकी चांगली माहिती मिळते, पण - पण - पण -
ट्विटरचा अल्गोरिथम मधे येतो. म्हणजे मग तुम्ही फॉलो केलेल्या व्यक्तीने लाइक केलेल्या ट्विट्स, किंवा त्या प्रकारचे इतर ट्विट्स - असला प्रकार ट्विटर दाखवू लागतो आणि मग लुडबुड करतो.

तसं जर संशोधन, छंद वगैरेशी निगडीत अकाऊंटस फॉलो केली तर मग ट्विटर बेस्ट आहे- बराच कचरा गाळला जातो. जेवढ्या तुमच्या निवडी नेमक्या असतील तेवढा ट्विटरचा फायदा जास्त आहे.

---------
फेसबुक सध्या "मोलाची मौक्तिके" गोळा करायला वापरतो. (भारत कसा ग्रेट आहे, दवणीय फॉर्वर्डस वगैरे)

खांग्रेसी, भक्तुल्ले, फुरोगामी, अर्णवी इ. मौलिक शब्द वाचून खिन्नता निघून जाते

गेमस्टॉप च्या स्टॉक मध्ये काही दिवसात जे काही घडले तो सुद्धा एक समाजमाध्यमांचा परिणाम आहे.

फेसबुक, ट्विटर, आणि व्हॉट्सअ‍ॅपला पण रामराम म्हणून तीन एक वर्ष झाली. खूप वेळ मिळतो दुसर्‍या कामांसाठी.