एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ५

धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म

सुधीर भिडे

Religion must mainly be a matter of principles only. It cannot be a matter of rules. The moment it degenerates into rules, it ceases to be a religion.
– B. R. Ambedkar

राजकीय स्थिती आणि धर्म यांचा समाजावर मोठा परिणाम होत असतो. आधीच्या भागात आपण अठराव्या शतकात राजकीय आणि सामाजिक परिस्थिती कशी होती हे पाहिले. आता आपण १७२० ते १८१८ या शतकात धर्माचे स्वरूप काय होते ते पाहणार आहोत. परंतु त्या आधी त्या शतकातील धर्म ज्यावर आधारित होता ती धर्मशास्त्रे म्हणजे काय ते पाहू. जेव्हा आपण समाजातील बदलांचा विचार करू त्यावेळी धर्माचा संदर्भ येईल. कारण १८१८ ते १९२० या कालखंडात धर्माची समाजावर मोठी पकड होती.

या लेखमालेच्या पहिल्या भागात लिखाणासंबंधी जे विचार मी मांडले आहेत ते परत एकदा वाचकांसमोर मांडू इच्छितो. निरनिराळ्या स्रोतांमधून अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील घटनांबाबत जी माहिती मिळाली ती नोंदविली आहे. वरील सर्व विषयांची माहिती संदर्भग्रंथांतून आणि शोधनिबंधांमधून घेतली आहे. जेव्हा संदर्भग्रंथांतील माहिती शब्दश: उद्धृत केली आहे तेव्हा अशी माहिती तिरप्या ठशात (इटालिक्स) लिहिली आहे. मला हे लिखाण करीत असताना कोणत्याही मूळ कागदपत्राचा (primary source document) आधार मिळालेला नाही, वा घेतलेला नाही. ते मला शक्यही नव्हते. मी जेव्हा असे म्हणतो की राणी लक्ष्मीबाईने या साली इंग्रजांना असे पत्र लिहिले त्यावेळी मी दुसर्‍या कोणाच्या तरी लिखाणाचा आधार घेत असतो. जर दिलेल्या संदर्भात चूक असेल तर ती माझ्या लिखाणातही आली. आधुनिक इतिहासलेखनाचे शास्त्र सांगते की मिळालेल्या माहितीवरूनच निष्कर्ष काढावेत. जेव्हा विषयाचा अभ्यास चालू केला त्यावेळी जी माहिती मिळत गेली त्या माहितीच्या आधारे प्रत्येक क्षेत्रात ती स्थिती कशी निर्माण झाली, काय सुधारणा झाल्या याचे निष्कर्ष काढले आहेत. माझ्या मताप्रमाणे ते निष्कर्ष अपरिहार्य आहेत. अजून माहिती मिळाल्यास आणि त्यामुळे निष्कर्षांतमध्ये बदल करणे आवश्यक ठरेल, असे वाटल्यास तसे बदल मी जरूर करीन. लेखमालेत काही फोटो आणि नकाशे आहेत. ते इंटरनेटवरून घेतले आहेत.

मनुस्मृती आणि धर्मशास्त्रे

१८१८ ते १९२० या कालखंडाचा विचार करताना मनुस्मृती कुठे मध्ये आली असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तत्कालीन पुरोहित वर्गाने समाजावर जी बंधने आणली आणि ज्या रूढी पाळल्या त्या सर्वाचे समर्थन 'धर्मशास्त्रात असे लिहिले आहे' असे सांगून होत असे.

भारतरत्न पां. वा. काणे यांनी 'धर्मशास्त्राचा इतिहास' हे दोन खंड १९२९ आणि १९४१ साली प्रसिद्ध केले. मूळ इंग्रजीतील खंडांचे मराठी भाषांतर १९६७ साली प्रसिद्ध झाले (महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ). या ग्रंथात काणे लिहितात, 'धर्म वाङ्ग्मयामध्ये वेदांच्या खालोखाल स्थान धर्मसूत्रांना आहे. धर्मसूत्रांनंतर मनू आणि याज्ञवल्क्य ह्यांच्यासारख्या स्मृतींचा नंबर लागतो. धर्मसूत्रे ख्रिस्तपूर्व ६०० ते ख्रिस्तपूर्व ३०० या काळातील असली पाहिजेत. धर्मसूत्रांत गौतमसूत्र सर्वांत जुने आणि सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. गौतमसूत्रात चार आश्रम, चार वर्ण, राजधर्म, न्याय, प्रायःश्चित्ते, आहार, अशा प्रकारचे विषय आढळतात. (पृष्ठ क्र. ५ ते ११)

काणे यांच्या ग्रंथाचे विशेष म्हणजे आपण ज्या सामाजिक विषयांवर विचार करणार आहोत त्या विषयांवर आपल्या धर्मग्रंथांत काय लिहिले आहे याचे त्यांनी चांगले समालोचन केले आहे. या संदर्भाकडे आपण पुढील लिखाणात / भागात परत येऊ. यानंतर आपण स्मृतींकडे वळू.

श्रुति म्हणजे वेद समजावेत आणि स्मृती म्हणजे धर्मशास्त्र. या दोन्हींपासून संपूर्ण धर्म प्रगट झाला आहे. – अध्याय २, श्लोक ९, मनुस्मृती

असे समजले जाते की धर्मशास्त्रांची रचना दोन हजार वर्षांपूर्वी झाली असावी. मनुस्मृती आणि याज्ञवल्क्यस्मृती ही दोन महत्त्वाची धर्मशास्त्रे समजली जातात. या धर्मशास्त्रांत वागण्याचे नियम आहेत. ब्राह्मणी कर्मकांडी धर्माचे मूळ धर्मशास्त्रात सांगितले जाते. या धर्मशास्त्रात मनुस्मृतीचे महत्त्वाचे स्थान आहे. मनुस्मृतीची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. – मनुस्मृती भाषांतरकार विष्णुशास्त्री बापट.

मनुस्मृती हा काही गहन अध्यात्म सांगणारा ग्रंथ नव्हे. न्यायसंहिता (penal code) आणि संविधान (constitution) यांचे मिश्रण या ग्रंथात आहे. लोकांनी (बहुतेक करून राजाने आणि ब्राह्मणांनी) प्रत्येक परिस्थितीत कसे वागावे याचे नियम या ग्रंथात आहेत. बलात्काराच्या गुन्ह्याच्या शिक्षेपासून ते काय खावे आणि खाऊ नये याचेही नियम आहेत. पुरोहितांच्या कर्मकांडाचा आणि रूढींचा उगम या ग्रंथात आहे.

हिंदू धर्मात मनू हे नाव निरनिराळ्या संदर्भात येते. पहिला मानव मनू असे समजले जाते. अठरा मनू राजांचाही उल्लेख आहे. जेव्हा जगात भयंकर पूर आला तेव्हा मनू एका बोटीत बसला, आणि त्याने मानव जात वाचविली असाही उल्लेख आहे. बायबलमध्येही अशी नोआची गोष्ट आहे. या मनूंचा मनुस्मृतीशी काही संबंध नाही.

मनू नावाचा एक विचारवंत इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात होऊन गेला असावा. त्याने मनुस्मृती लिहिली. असाही उल्लेख येतो की भृगु ऋषीने ही वचने मनूकडून ऐकली आणि त्याची ग्रंथरचना केली. आज आपल्याला मनुस्मृतीच्या ज्या हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत त्या साधारण एक हजार वर्षांपूर्वीच्या. या प्रतींत थोडाफार फरक आढळतो. मनू ही एक व्यक्ती होती की ते कुळाचे नाव होते याविषयीही अंदाज आहेत. यावरून असे वाटते की प्रथम लिहिल्यावर या ग्रंथात पुढची ८०० वर्षे भर पडत गेली अशी शक्यता आहे. मनुस्मृती हे एक संकलन (compilation) आहे. (मनुस्मृती ही एका लेखकाची कृती नव्हे. ती मनूने प्राचीन काली लिहिली व मागाहून त्या त्या काळातील लेखकांनी सभोवतालच्या देशस्थितीकडे पाहून तिच्यात फेरबदल केले. त्याचे बावीसशे वर्षांपूर्वीचे स्वरूप आपण पाहातो; वा. कृ भावे, महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास, खंड १, पृष्ठ क्र. २०, वरदा प्रकाशन)

धर्मसूत्रांचा काळ ख्रिस्तपूर्व ५०० समजला आणि मनुस्मृती दुसर्‍या शतकात लिहिली गेली असे मानले तर या सातशे वर्षांच्या काळात ज्याला आपण न्यायसंहिता आणि घटना म्हणतो अशा स्वरूपाचे लिखाण झाले. त्यानंतर अंधःकार दिसतो. मनुस्मृतीने ब्राह्मणी धर्माचा पाया घातला.

विचारांचा समतोल ठेवण्यासाठी हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की दोन हजार वर्षांपूर्वी भारताबाहेरील निरनिराळ्या संस्कृतींत गुलामगिरी आणि स्त्रियांना मिळणारी वागणूक मनूच्या विचारांपेक्षा फार निराळी नव्हती. फार जुना इतिहास कशाला? सतराव्या शतकात अमेरिकेत गुलामगिरी होती आणि गुलामांना अतिशय वाईट वागणूक दिली जाई. १८६०मध्ये भारतात काय स्थिती होती? इंग्रज रस्त्यावरून जात असेल तर भारतीय लोकांस इंग्रजास जमिनीला हात लावून नमस्कार करावा लागे. इंग्रज रस्त्यावर असताना भारतीय मनुष्य घोड्यावरून जात असेल तर त्याला घोड्यावरून उतरून रस्त्याच्या बाजूस जावे लागे. थोडक्यात सांगणे हे की अनादी काळापासून जेत्यांनी हरलेल्यांवर असे अन्याय केले आहेत. हे लिहिण्याचा उद्देश अन्यायाचे समर्थन नसून हा जगाचा न्याय राहिला आहे हे सांगणे.

चार हजार वर्षांपूर्वी आर्यांचे भारतात आगमन झाले. इथे राहणाऱ्या लोकांना त्यांनी हरविले. हरलेल्या लोकांना आर्य दस्यु म्हणत. प्रस्तुत लिखाणात मनुस्मृतीच्या चार निरनिराळ्या प्रकाशनांचा आढावा घेतला.

 • George Bühler नावाच्या जर्मन अभ्यासकाने केलेले इंग्रजी भाषांतर
 • मैत्रेयी देशपांडे यांनी संकलित केलेली मनुस्मृती, न्यू भारतीय बुक कॉर्पोरेशन, २०१०
 • श्री मनू स्मृती, भाषांतरकार बापट, मोदवृत्त प्रेस, १९०७
 • सार्थ मनुस्मृती, अंबादास जोशी, गुरुदेव प्रकाशन, पुणे

या चारही प्रकाशनांत सारखीच वचने आढळून येतात. वचनाचे अंक लिहिण्याचा प्रकार निराळा दिसतो.

मनुस्मृतीमध्ये 'शूद्र' या शब्दाचा वापर झाला आहे. वैश्यांची कामे जी सांगितली आहेत त्यात शेती आणि पशुपालन येते. याचा अर्थ असा की मनूच्या सांगण्याप्रमाणे शेतकरी शूद्र नव्हते. अठराव्या शतकात ब्राह्मणांनी नंतर समाजाचे तीन भाग केलेले दिसतात – ब्राह्मण, शूद्र आणि अस्पृश्य. अर्थातच त्या काळाच्या ब्राह्मणांनी मनूच्या पुढे जाऊन सर्व समाजालाच शूद्र करून टाकले.

मनू शूद्रांविषयी काय लिहितो ते पाहू –

 • शूद्राचे नाव असे असावे ज्यावरून तो घाणेरडा माणूस आहे हे कळेल.
 • शूद्राला उपनयनाचा अधिकार आणि वेदपठणाचा अधिकार नाही.
 • शूद्राची बायको केवळ शूद्र स्त्री असू शकते. वैश्य आणि क्षत्रिय स्वतःच्या वर्णाबरोबर शूद्र बायका करू शकतात,परंतु शूद्र बाईशी लग्न केल्यास कुळाचा नाश होतो.
 • ब्राह्मणांनी शूद्राघरी शिजविलेले अन्न खाऊ नये पण कोरडा शिधा दक्षिणा म्हणून घेण्यास हरकत नाही.
 • शूद्रांनी मृत ब्राह्मणाचे शरीर स्मशानाकडे नेऊ नये. असे झाल्यास ब्राह्मण स्वर्गात जात नाही.
 • शूद्राने आपले डोके भादरलेले ठेवावे ज्यायोगे तो ओळखता येईल.
 • शूद्राने उच्चवर्णियांचा अपमान केला तर त्याची जीभ कापावी.
 • शूद्राने ब्राह्मणाला त्याचे कर्तव्य काय हे सांगितले तर त्याच्या तोंडात गरम तेल टाकावे.
 • उच्चवर्णीयाच्या जागी शूद्र बसला तर त्याच्या पृष्ठभागावर डाग द्यावा.
 • अन्न-वस्त्र देऊन पोषण केलेल्या किंवा पोषण न केलेल्या शूद्राकडून ब्राह्मणाने सेवा करून घ्यावी कारण शूद्र हा ब्राह्मणाच्या दास्याकरिताच निर्माण झालेला आहे.
 • शूद्रापासून ब्राह्मणाने धनग्रहण करावे कारण शूद्राचे असे काही धन नसते.


अर्जुन आणि सुभद्रा - राजा रवि वर्मा
अर्जुन आणि सुभद्रा - राजा रवि वर्मा

स्त्रियांना कसे वागवावे या विषयी धर्मशास्त्रात लिहिले आहे. मनू सुरुवातीलाच हे वचन लिहितो – 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता.' त्यानंतर मनू स्त्रियांसंबंधी जी विधाने करतो त्यावरून त्याचे बोलणे आणि आकलन यात किती फरक आहे ते दिसते.

 • मासिक पाळीच्या वेळी स्त्रिया अशुद्ध होतात.
 • स्त्रियांना कोणतेच स्वातंत्र्य देऊ नये. स्त्रियांनी आपले वडील, नवरा किंवा मुलगा यांच्या आज्ञेत राहावे. स्त्रियांना पुरुषांनी कायम धाकात ठेवावे. स्त्री स्वतंत्र राहण्यास कधीही योग्य नसते.
 • स्त्रियांनी घरकाम, स्वयंपाक करावा आणि भांडी नीट साफ ठेवावीत.
 • नवरा जिवंत असेपर्यंत आणि मेल्यावर त्याच्या विषयी आदराने बोलावे. नवरा मेल्यावर दुसर्‍या पुरुषाचे नावही घेऊ नये.
 • स्त्रियांनी नवरा मेल्यावर दुसरे लग्न करू नये. (ही अट पुरुषाला नाही. एक बायको मेली तर पुरुष परत लग्न करू शकतो.)
 • नवरा मूर्ख असला तरी नवर्‍याची सेवा करावी.
 • स्त्रीने दुसर्‍या पुरुषाशी संबंध ठेवला तर मृत्यूनंतर ती भयंकर हालास योग्य होते.
 • ज्यांना मूल नाही अशा स्त्रिया आणि विधवा यांची समाजाने काळजी घेतली पाहिजे. (यावरून असे वाटते की मनू सती जाणे सांगत नाही. महाभारतातील पांडू राजाबरोबर त्याची पत्नी माद्री सती गेली असा उल्लेख आहे; यावरून काय समजावे?)
 • बायको, गुलाम आणि विद्यार्थी यांनी काही चूक केली तर त्यास बांबूने झोडपून काढावे.
 • स्त्रिया वेद समजण्या-शिकण्यायोग्य नाहीत.
 • जर नवर्‍यापासून मूल होत नसेल तर नियोगाने स्त्री दुसर्‍या पुरुषापासून मूल जन्म देऊ शकते.
 • तीस वर्षांच्या पुरुषाने बारा वर्षांच्या मुलीबरोबर लग्न करावे.
 • भार्या, पुत्र आणि दास जे काही मिळवतील ते त्यांच्या धन्याचे होते. या तिघांचे स्वतःचे असे काही धन नसते.

स्त्रियांसंबंधी मनूची आणखी काही वचने माहीत करून घ्यायची असल्यास मंगला आठलेकरांच्या 'महापुरुषांच्या नजरेतून स्त्री' या पुस्तकातील पृष्ठे १२ ते १९ पाहावीत; (कारण मनुस्मृतीचे पुस्तक वाचावयास मिळणे सोपे नाही).

मनूची सर्व वचने वाचली तर अंगावर काटा येतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या काळातल्या पुरोहितांनी या सर्व वचनांचा कायदा बनविला. समाज अस्पृश्यांना आणि स्त्रियांना जी भयंकर वागणूक देत होता त्याचा उगम हा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाडमध्ये मनुस्मृतीच्या पुस्तकाचे दहन केले याचे आश्चर्य वाटायला नको. खरे तर अस्पृश्य आणि स्त्रिया यांना जी वाईट वागणूक देण्यात येत असे त्याची सुरुवात मनूच्या आधीपासून झाली. गीतेतील हा श्लोक पाहा –

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येपिस्तू पापयोनय:I स्त्रियो वैश्य: तथा शूद्र: तेपि यांति परां गतिमII
भगवंताने स्त्रिया, वैश्य आणि शूद्र यांना समान लेखले आहे. (अर्थातच ब्राह्मण आणि क्षत्रिय पुरुष उच्च आहेत.)

मनुस्मृतीनंतर लिहिल्या गेलेल्या पुराणांपैकी मत्स्य पुराणात सत्तराव्या अध्यायात एक अनंगदान व्रत सांगितले आहे. त्यात ब्राह्मण्याच्या नीच, हीन वृत्तीचा कळस झाला आहे. ज्या रविवारी हस्त, पुष्य अथवा पुनर्वसु यातले नक्षत्र येईल त्या दिवशी स्त्रीने स्नान करून विद्वान ब्राह्मणाला बोलावून त्याला भोजन द्यावे आणि मग त्याला कामदेव समजून त्याला आपला देह अर्पण करावा. या प्रमाणे तेरा महिने करावे. मागून त्या ब्राह्मणास दक्षिणा देऊन हे व्रत पूर्ण करावे.

वरील माहिती 'ब्राह्मणांना अकारण कोण कशाला झोडपणार?' या पुस्तकातून घेतली आहे. (लेखक आनंद घोरपडे, जिजाऊ प्रकाशन, २००६)

मनुस्मृती हा स्त्रियांच्या दुःखाचा आरंभबिंदू होता. [...] तरीही पुढे इतकी वर्षे 'मनुस्मृती' हा हिंदूंनी मानवी व्यवहारासाठी आदर्श प्रमाणग्रंथ मानावा व त्यानुसार समाजाचे आचरण राहिलेच पाहिजे म्हणून आग्रही असावे याचे आश्चर्य वाटते. – मंगला आठलेकर, महापुरुषांच्या नजरेतून स्त्री, राजहंस प्रकाशन, २०१८, पृष्ठ ९

शांतता, स्वातंत्र्य, विकास, समान हक्क आणि मानवी आत्मसन्मान ही सार्वत्रिक नैतिक मूल्ये (universal moral values) आहेत. ही मूल्ये जर आपण वरील वचनांना लावली तर हे ध्यानात येईल की या मूल्यांची कल्पना मनुस्मृती लिहिली गेली त्या काळी नव्हती.

मार्क जॉन्सन (Morality for Humans,University of Chicago Press, 2014) यांच्या म्हणण्याप्रमाणे आपली नैतिक मूल्ये आपल्या गरजा आणि हित यांवर अवलंबून असतात. आपल्या गरजा आणि हिताच्या कल्पना बदलल्या की आपली मूल्ये बदलतात. मनूच्या काळातील गरजा निराळ्या होत्या आणि आजच्या समाजाच्या गरजा निराळ्या आहेत. मनूच्या वचनांचा वापर एकोणिसाव्या शतकात करणे दुर्दैवी होते. स्वतंत्र भारताच्या संविधानात सत्तर वर्षांत १०५ बदल करणे जरूर पडले. (संदर्भ : भारत सरकारचे पोर्टल). दोन हजार वर्षांपूर्वीच्या स्मृतीत लिहिलेले नियम ब्राह्मणांनी तसेच कसे लागू केले?

उत्तर रामायणातील एक गोष्ट आपल्याला विचार करावयास भाग पाडते. रामाच्या राज्यात कोणा एका ब्राह्मणाचा मुलगा मरतो. ब्राह्मण रामाकडे येतो आणि म्हणतो, "रामा, तुझ्या राज्यात पाप वाढले आहे. एक शंबुक नावाचा अतिशूद्र माणूस तपश्चर्या करतो आहे. त्यामुळे माझा मुलगा मयत झाला." शंबुक तप करीत बसलेला असतो तिथे राम जातो आणि त्याचे मस्तक उडवितो. मग ब्राह्मणाचा मुलगा जिवंत होतो.

या गोष्टीतून निरनिराळे प्रश्न मनात येतात. रामाने कोणत्या नैतिक मूल्यांचा आधार घेऊन अशी वर्तणूक केली? रामायणाचा काल मनुस्मृतीच्या आधीचा समजला तर रामायणकालीन समाजातील रूढींचा मनुस्मृतीत नुसता अंतर्भाव करण्यात आला. वर उल्लेख आल्याप्रमाणे मनुस्मृती हे एक संकलन आहे.

मनुस्मृती आणि त्यातील लिखाणाचा हिंदू धर्मावर झालेला परिणाम या विषयावर पुष्कळ मोठ्या लेखकांनी लिखाण केले आहे. मनुस्मृती हा अभ्यासाचा विषय राहिला आहे. मनुस्मृती लिहिणारी व्यक्ती क्षत्रिय होती (पर्यायाने ब्राह्मणांची जबाबदारी नाही असे हात झटकणे) इथपासून ते 'भारताच्या सध्याच्या संविधानापेक्षा मनुस्मृतीत जास्त सामाजिक समता आहे' अशा प्रकारचे चष्मे घालून लिखाण झाले आहे. अशा प्रकारच्या लिखाणात मूळ मुद्दा बाजूलाच राहतो – दोन हजार वर्षांपूर्वी बनविलेले कायदे एकोणिसाव्या शतकात समाजाला लागू करण्यात आले हे कितपत योग्य होते?

पुरोहितांचा कर्मकांडी धर्म

या लिखाणात 'ब्राह्मणी धर्म', 'ब्राह्मणी कर्मकांडी धर्म', 'ब्राह्मणां'नी असे शब्द प्रयोग आले आहेत. तत्कालीन हिंदू धर्माला ब्राह्मणी धर्म असे नाव स्वामी धर्मतीर्थ यांनी दिले आहे. स्वामी धर्मतीर्थ यांनी १९४१मध्ये History of Hindu Imperialism या नावाचे पुस्तक लिहिले. त्याचा अनुवाद शशिकांत हुमणे यांनी २०१२मध्ये प्रकाशित केला. त्या पुस्तकात, हिंदूंच्या अवनतीची कारणे – 'ब्राह्मणी धर्म' या प्रकरणातील मजकूर –

नाशाची बीजे काही हजार वर्षांपूर्वी पेरली गेली जेव्हा समाजातील पुरोहितांनी स्वतःस इतर समाजापासून वेगळे केले. जन्म श्रेष्ठत्वाच्या बढाईने धार्मिक शिक्षण घेण्याचा एकाधिकार प्रस्थापित केला. पुरोहितांनी सामाजिक आणि धार्मिक बाबतीत निर्णय घेण्याच्या अधिकाराचा दावा केला आणि क्षत्रिय राज्यकर्त्यांना नियंत्रित केले. त्यामुळे राज्य कधीही जनतेच्या उत्थानासाठी काम करू शकले नाही.

पुरोहितांनी लबाडीने आणि जबरीने समाजावर जातीव्यवस्था लादली. त्यामुळे पुरोहितांचे श्रेष्ठत्व जपण्यात आले. त्यांनी समाजाला शेकडो जातींत विभाजित केले. सर्व मानव जन्माने समान आणि स्वतंत्र आहेत या सत्यास हिंदू समाजव्यवस्था नाकारणारी आहे. ब्राह्मण पुरोहितांनी सामान्यांची गुलामगिरी घट्ट करण्यासाठी खोट्या शास्त्रांची निर्मिती केली. अस्पृश्यांना देवळात प्रवेश करण्याची बंदी केली. कोट्यवधी हिंदूंना ब्राह्मणांनी शिक्षण, विहिरीचा आणि रस्त्याचा उपयोग नाकारला.

धर्माच्या नावावर स्त्रियांवर मानहानी लादली. त्यांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला. स्त्रियांना देवळातून वेश्याव्यवसायास भाग पाडले. समाजाला कर्मकांडी धर्माच्या अवस्थेत नेले. हिंदूंना स्वतःच्या अधोगतीबद्दल सांगणे आणि समाजाला जागृत करणे या संतांच्या प्रयत्नाला ब्राह्मणी लोकांनी यशस्वीपणे विरोध केला.

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातील संतांच्या प्रयत्नालाही ब्राह्मणांनी यशस्वी विरोध केला.

हिंदूंची अवनती ब्राह्मणी कर्मकांडी धर्मामुळे झाली.

ब्राह्मण या अध:पतनास जबाबदार होते हे रमाबाई रानड्यांच्या लिखाणात येते. जेव्हा स्त्रिया विद्वान होतील तेव्हा या पंडितास चरण संपुष्टान्नी पूजा अर्पण करतील यात संशय नाही. परंतु याच कारणास्तव ब्राह्मण लोक स्त्रियांस शहाण्या करण्यास प्रतिकूल आहेत. (महापुरुषांच्या नजरेतून स्त्री, मंगला आठलेकर, राजहंस प्रकाशन, पृष्ठ ४६)

ब्राह्मणी कर्मकांडी धर्म असा शब्दप्रयोग करताना सर्व ब्राह्मण जातीवर टीका होत आहे असे समजू नये. जेव्हा समाजात अनिष्ट वागणे आणि प्रथा चालू होतात तेव्हा गैरवर्तन करणार्‍यांची संख्या मोजकीच असते. ज्याला इंग्लिश भाषेत silent majority म्हणतात ती सभ्यच असते. ब्राह्मण समाजातील पुरोहितांनी स्वतःचे महत्त्व टिकविण्यासाठी धर्मशास्त्राचा आधार घेतला असे वरील सर्व संदर्भांवरून प्रतीत होते. पुरोहित असे सांगत की धर्मशास्त्रात असे लिहिले आहे म्हणून तसे वागायचे. सर्वांत प्रसिद्ध धर्मशास्त्र मनुस्मृती. त्याविषयी माहिती वर आली आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की २००० वर्षांपूर्वीचे कायदे एकोणिसाव्या शतकात लागू करण्यात आले. कालाबरोबर कायदे बदलावे लागतात हे आपल्या संविधानात सत्तर वर्षांत शंभराहून अधिक बदल करावे लागले त्यावरून प्रतीत होते.

गो. नी. दांडेकरांनी 'मोगरा फुलला' हे ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले आहे. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना आणि भावंडांना ब्राह्मण वर्गाने धर्मशास्त्रे आणि स्मृति यांचा आधार घेऊन जी अमानुष वागणूक दिली त्या संदर्भात त्यांनी एका स्त्रीपात्राच्या तोंडी ही वाक्ये घातली आहेत.

"स्मृति तर मानवांनीच रचिल्या ना? त्यांनी प्रतिक्षणी घडणार्‍या नवनव्या अपराधांचा विचार केला हे कसे गृहीत धरावे? ते काय त्रिकालतज्ञ होते?

जळले तुमचे कर्मकांड! आग लागो त्यास. अरे लेकरू जन्मते त्यास कोठली रे जात असते? त्यास छळणारांचे हात का झडले नाहीत म्हणते मी."

काळाप्रमाणे कायदे बदलावे लागतात हेच गो. नी. दांडेकर सुचवित आहेत.

प्रस्तुत लिखाणामध्ये पुरोहित या शब्दाचा वापर केला आहे. पुरोहित म्हणजे पौरोहित्य करणारी व्यक्ती. ब्राह्मणांच्या घरी आणि ज्या जातींना ते शूद्र म्हणत यांच्या घरी जाऊन पुरोहित धार्मिक कर्मकांडे करीत. अस्पृश्यांना काही धर्मकृत्ये करण्याचा अधिकारच नव्हता.

पुरोहितांच्या वरची श्रेणी वेदशास्त्रसंपन्न पंडित / शास्त्री ही होती. या व्यक्ती पौरोहित्य करीत नसत. त्यांच्याकडे जमीनजुमला असे आणि काही जण सावकारीही करीत. धर्मशास्त्राचे ज्ञान ब्राह्मणास देण्याचे ते काम करीत. एखाद्या व्यक्तीचे वागणे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे किंवा नाही याचा निवाडा याच व्यक्ती करीत. त्या अर्थाने या व्यक्ती स्थानिक न्यायाधीश होत्या.

पुरोहितांच्या धर्माचे दोन भाग होते. पहिला भाग विधी आणि संस्कार – rites of passage. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत निरनिराळे विधी आणि संस्कार केले जातात; जसे की नामकरणविधी, उपनयनविधी, लग्नविधी, अंत्यसंस्कार. हे विधी करण्याचा अधिकार पुरोहितांचा, ज्यातून त्यांना पैसे मिळत आणि अन्नधान्य मिळे.

दुसरा भाग रूढी. काही रूढी समाजावर लादल्या गेल्या. पुरोहितांनी असे सांगणे चालू केले की अमुक गोष्ट धर्मशास्त्रात आहे म्हणून करायची आणि तमुक गोष्ट करायची नाही असे सांगितले आहे म्हणून करायची नाही. एखाद्या कृतीविषयी धर्मशास्त्रात काय सांगितले आहे हे ठरविणारे कोण? वेदशास्त्रसंपन्न पंडित! त्या 'पवित्र' ग्रंथांवर इतरांची दृष्टीसुद्धा पडलेली चालत नसे.

रूढी आणि धर्मशास्त्र ग्रंथ

भारतरत्न पां. वा. काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात रूढी आणि धर्मशास्त्रे या विषयावर काय लिहिले आहे ते पाहू. (पृष्ठ ५७२ – ५७५)

मनुस्मृती – ज्या मार्गाने आपले वाडवडील चालत आले अशा मार्गाने चालावे. पूर्वीच्या चालीरीतींत फेरबदल करू नये. ज्या ठिकाणी एखाद्या विषयासंबंधीचा नियम वेदात सांगितलेला नसेल, त्या ठिकाणी देशातील विशिष्ट प्रथांना अनुसरून चालावे.
बृहस्पती स्मृति – राजाने पुष्कळ काळापर्यंत चालत आलेल्या रूढीत फेरफार न करता रूढिंचे पालन करावे.
कात्यायन स्मृति – वादांचा निर्णय देशाचाराला अनुसरून करावा.

वरील सर्व वाचनांचा फायदा घेऊन पुरोहित म्हणू लागले की 'शास्त्रात रूढिर्बलियसी' याचा अर्थ शास्त्र काहीही म्हणो, रूढीप्रामाण्य हेच मानायचे. थोडक्यात, 'मी म्हणेन ती पूर्व दिशा.'

दोन हजार वर्षापूर्वीच्या समाजाला जे नियम घालण्यात आले तेच दोन हजार वर्षांनंतर पाळणे योग्य आहे? समाजात काहीही बदल होणे अपेक्षित नाही? अस्पृश्यांना आणि स्त्रियांना आपण आज तशीच वागणूक देऊ इच्छितो?

निष्कर्ष

अठराव्या शतकात धर्माच्या आचरणात धर्मशास्त्रांना फार महत्त्व आले होते. एखादी गोष्ट का करायची किंवा का करायची नाही याचे उत्तर एकच असे – धर्मशास्त्रांत असे सांगितले आहे म्हणून! सर्वात महत्त्वाचे धर्मशास्त्र – मनुस्मृती. मनुस्मृतीत स्त्रिया आणि अस्पृश्य यांसंबंधी जे सांगितले आहे ते घृणास्पद आहे. या आधारावर पुरोहितांनी कर्मकांडी धर्म उभारला. त्यापलीकडे जाऊन 'शास्त्रात रूढिर्बलियसी' अशी विधाने करून पुरोहितांची पूर्ण मनमानी सुरू होती.

भागाच्या सुरवातीला आंबेडकरांचे एक विधान उधृत केले आहे. Religion must mainly be a matter of principles only. It cannot be a matter of rules. The moment it degenerates into rules, it ceases to be a religion. आंबेडकरांचे हे विधान बरोबर मानले तर हिंदू धर्माला उपनिषद काळानंतर उतरती कळा लागली असे म्हणावे लागेल. उपनिषदांत माणूस आणि त्याचे विश्वातील स्थान यावर सखोल विचार झाला. उपनिषद काळानंतर रचलेली धर्मसूत्रे आणि त्या मागून रचलेले स्मृति हे ग्रंथ म्हणजे फक्त नियमावली होती. मनूच्या लिखाणाविषयी वर उल्लेख आला आहेच. धर्मसूत्रे काय आहेत? या सूत्रांचे तीन भाग असतात. श्रौतसूत्रे यज्ञाचे नियम सांगतात. गृह्यसूत्रे गृहस्थाश्रमाचे नियम सांगतात आणि धर्मसूत्रे व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे नियम सांगतात. थोडक्यात rules, rules आणि rules. धर्मसूत्रांनंतर सुमारे तीनशे वर्षांनी रचलेल्या मनुस्मृतीत हा प्रकार चालू राहिला.

अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की दलित आणि स्त्रिया यांच्या संदर्भात मनूने जे लिहिले आहे त्यावरून असा समज होण्याची शक्यता आहे की त्या आधी समाजात अशी विकृती नव्हती. मनूने असे लिहिल्याने समाज दूषित झाला. हे आकलन बरोबर नव्हे. त्यावेळच्या समाजातील रूढी मनूने लिहिल्या एवढेच!

पुढच्या भागात – भाग ६ अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप कसे होते ते पाहू.

मागचे भाग -

भाग १ - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ - अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ - अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ - अठराव्या शतकातील शासनयंत्रणा

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet