मुंबई ते लंडन, १९६४ साली बोटीने व रेल्वेने

मुंबई ते लंडन, १९६४ साली बोटीने व रेल्वेने

बालमोहन लिमये

गणित विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण होण्याअगोदरच मी न्यू यॉर्क राज्यातील रॉचेस्टर येथील विद्यापीठात पीएच. डी. करण्यासाठी प्रवेश मिळवला होता. फीची माफी आणि तिथे मुलांना शिकवायला मदत करण्यासाठी (teaching assistantship) दरमहा काही रक्कम त्यांनी मला देऊ केल्यामुळे तिकडे जाणे सुकर झाले. आई-बाबांनी विमानाच्या प्रवासावर बंदी घातली होती, म्हणून मुख्यतः बोटीने जावे लागले (पाहा : आई-बाबांच्या आठवणी - भाग २). त्यामुळे पाश्चिमात्य रीति-रिवाजांची तोंडओळख जरा आधी झाली. शिवाय मला भरपूर सामान बरोबर नेता आले : तीन मोठ्या सूटकेसेस आणि जाडजूड पत्र्याची एक भली मोठी ट्रंक! मी सगळा संसारच तिकडे नेत होतो. तिकडे विकत घ्यायला परवडणार नाही म्हणून अभ्यासासाठी काही गणिताची पुस्तके आणि तिकडे मिळणार नाहीत म्हणून विरंगुळ्यासाठी थोडे मराठी व संस्कृत ग्रंथ बरोबर होते. शिवाय वेगवेगळ्या प्रकारांची औषधे, खायचे अनेक पदार्थ (अगदी लोणची, चटण्या, मेतकूटसुद्धा), लहान-सहान कपडे, नेहमीच्या वापरातील सर्व वस्तू, जे म्हणाल ते सामानात होते, अगदी विचारू नका! कुठले औषध कशासाठी घ्यायचे याची आणि कुठला पदार्थ कोणत्या डागात ठेवला आहे याच्या तेव्हा आईने करून दिलेल्या याद्या अजूनही माझ्याकडे आहेत!

पुण्याहून मुंबईला मी प्रथम गेलो तो पासपोर्ट आणि व्हिसा काढण्यासाठी. त्या आवश्यक पण तापदायक गोष्टी करण्यात जवळजवळ महिना गेला. आणखी एक महत्त्वाचे खटले होते ते कपड्यांचे. आमच्या घरातले सगळे नेहमीच खादीधारी होते. खादीशिवाय इतर कुठल्या कपड्याचा अंगाला स्पर्शही नाही. आता तर पूर्णपणे घूमजाव करायची पाळी आली. माझ्या मामाच्या ओळखीचा एक कापणे नावाचा म्हातारा किडकिडीत शिंपी पुण्याच्या कँप भागात रहात असे. त्याच्याकडे मापे द्यायला व तो शिवत असलेले कपडे घालून बघायला कित्येकदा जावे लागले. शेवटी नऊ शर्ट, पाच पँट व दोन सूट असा जामानिमा तयार झाला. एव्हाना मात्र मी खूपच अस्वस्थ झालो होतो.

पुण्याच्याच इंडिया फौंडेशन या संस्थेने प्रवासखर्चासाठी हातभार लावला होता. मी एका पत्रात आईला लिहिले होते की माझ्या कल्पनेप्रमाणे तिकिटाचा खर्च २६६३ रुपये झाला असावा. एक अमेरिकन डॉलर म्हणजे पाच रुपये आणि एक ब्रिटिश पौंड म्हणजे तेरा रुपये चाळीस पैसे असे भाव होते. (१ जून १९६४ पासून ‘नये पैसे’ हे नाव रद्द झाले होते.) त्यावेळी विदेशी चलन घेण्यासाठी फक्त चाळीस रुपये बरोबर नेता येत असत. मी मात्र जास्तीचे डॉलर व पौंड नेण्याची खास परवानगी काढली होती. पुण्याहून पोचवायला आलेल्या लहान-थोर मंडळींचा अश्रुपूर्ण निरोप घेऊन मी माझ्या विसाव्या वाढदिवशी, ८ ऑगस्ट १९६४ रोजी, मुंबईहून प्रस्थान ठेवले, लॉइड त्रिस्तिनो या इटालियन कंपनीच्या मार्कोनी नामक नव्या कोऱ्या बोटीने. या गडबडीत मी बरोबर न्यायचे चाळीस रुपये तसेच माझ्याकडे राहून गेले. बोटीवर चढण्यापूर्वी त्यांचे साधारण पाच हजार इटालियन लिरा आले असते. पण आता त्यांना बोटीवर कोणी विचारेना. मात्र एका पौंडाचे मला सतराशे चाळीस लिरा मिळाले. आदल्याच वर्षी या बोटीने आपली पहिली-वहिली सफर पुरी केली होती, इटालीतील जिनोआ बंदरापासून ऑस्ट्रेलियातील सिडने बंदरापर्यंत. आताही ती ऑस्ट्रेलियातील प्रवासी घेऊन आली होती व इटालीकडे चालली होती. पहिल्या वर्गाचे सुमारे दीडशे प्रवासी आणि त्याच्या दसपट म्हणजे पंधराशे पर्यटक वर्गाचे (tourist class) प्रवासी नेण्याची तिची क्षमता होती. माझ्या केबिन नंबर ५६४मध्ये अजून तीन जण होते, तिघेही भारतीय विद्यार्थीच.एस. एस. मार्कोनी या आमच्या बोटीचे पोस्टकार्डावरील चित्र

सुरुवातीचे दोन दिवस अरबी समुद्र खवळलेला असल्याने व आम्ही बरेच जण अगदीच नवखे असल्याने फार त्रास झाला. सतत ओकाऱ्या येत राहिल्या आणि कुठून या प्रवासाला निघालो असे होऊन गेले. त्यात इटालियन स्टुअर्टसचे मोडके-तोडके इंग्लिश बोलणे आणि त्यांची उपरोधिक दृष्टी. फक्त फलाहार मानवत होता; मुख्यत्वे सफरचंदांवरच मी भूक भागवत होतो. चौथ्या दिवशी तांबड्या समुद्रात शिरण्याआधी एडन हे शुल्कमुक्त बंदर लागले. मला माझ्याजवळचे चाळीस रुपये इथे वापरता आले. खरे तर पूर्वी एडन हा इंग्रजांच्या हिंदुस्थानावरील राज्याचाच भाग होता व रुपया हेच तिथले चलन होते. पण १९५१पासून पूर्व आफ्रिकन शिलिंग तेथे चलनात आले. १९६४ साली दोन रुपये म्हणजे तीन शिलिंग असा भाव होता. पण मला निकड असल्याने एका रुपयाला एक शिलिंगावरच भागवावे लागले. सुएझ कॅनाल सुरू होताना बोटीवरचे काही जण खाली उतरले व कैरो या इजिप्तच्या राजधानीजवळचे पिरॅमिड्स बघायला गेले. तिकडे हवा खूपच गरम व कोरडी असेल म्हणून मी बोटीवरच राहिलो. शिवाय या ट्रिपसाठी दहा डॉलर्स मोजावे लागले असते. तो कॅनॉल संपता संपता इजिप्तमधील पोर्ट सैद बंदरात आमची बोट उभी राहिली, व तेथे ते लोक परत बोटीवर चढले. (माझ्यासारख्या अशी संधी सोडणाऱ्याला काय म्हणावे?) पोर्ट सैदमध्ये मात्र मी खाली उतरलो. तिथल्या एका दुकानात एका वृद्ध इजिप्ती माणसाशी बोलताना त्यांचे नासर आणि आपले नेहरू यांच्या मैत्रीसंबंधी सहज बोलणे निघाले. नेहरूंना जाऊन तीन महिनेही झाले नव्हते. त्या वृद्धाची हळहळ पाहून नेहरू कुठपर्यंत पोचले होते याची कल्पना करता आली.

१९४२ची ‘चले जाव’ चळवळ चालू असताना माझ्या आईने राष्ट्रीय निशाणाचे एका पिस्तुलधारी ब्रिटिश अधिकाऱ्यासमोर रक्षण केले होते (पाहा : आई-बाबांच्या आठवणी - भाग १). तेव्हापासून आमच्या घरी पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाला विशेष महत्त्व असे. यंदाच्या झेंडावंदनाला मी घरी नव्हतो, पण मार्कोनी बोटीवर ते साजरे झाले, इटालीला पोचायच्या आदल्या दिवशी. सांस्कृतिक कार्यक्रमही झाले, हस्तकलावस्तूंचे प्रदर्शन पण भरवले होते. एक गोष्ट मात्र मला फारच खटकली. आमच्या बोटीवर पहिल्या वर्गाने जाणारा एकच भारतीय प्रवासी होता. नेमक्या त्याच्याच हस्ते झेंडा उभारला गेला. उमरावशाहीचाच हा प्रकार होता. दुपारच्या जेवणानंतर आम्ही पाच-सहा भारतीयांनी बोटीच्या इटालियन सामग्रीप्रमुखाबरोबर (Chief Steward) बातचीत केली, जेवणाच्या वेळी हिंदी लोकांना वेगळे का बसवतात याबद्दल विचारले. त्याने काही व्यावहारिक कारणे सांगितली. त्यातले एक असे होते की एतद्देशीय लोक जेवताना सूप किंवा सॅलड यासारखे पदार्थ केव्हाही मागवतात, सूप फक्त जेवायच्या सुरुवातीलाच द्यायचे असले तरी. यांत काही प्रमाणात तथ्य असले तरी ही विलग्नता (segregation) नक्कीच बोचरी होती. पण आम्हाला जेवायला जाऊन बसणे जरूरच होते. डिनरच्या वेळी प्रत्येकाने कोट आणि टाय घातलेच पाहिजे असा दंडक होता. मला तोही जाचकच वाटायचा, पण इलाज नव्हता. तरुण मुले-मुली एकत्र करत असलेले नाच आम्ही जरा दुरूनच पाहत असू.

अठरा ऑगस्टला बोट इटालीतील जिनोआ बंदराला पोचल्यावर आम्ही आमच्या दहा दिवसांच्या सरकत्या घराला रामराम केला. तिथून लंडनपर्यंत मी रेल्वेने गेलो. लंडनला माझ्या पंडित नवाथे नावाच्या शाळेतील मित्राचे मुकुंद व प्रमोद हे बंधू हॉटेल चालवत. तिथे तीन दिवस शांतपणे राहिलो. त्याने प्रवासाचा शीण तर गेलाच, शिवाय आईला मी एक सविस्तर पत्र लिहित होतो ते पुरे करायची संधी मिळाली, इटालीतील मेसीना बंदरापासून लंडनपर्यंतच्या सफरीबद्दल. ते पत्र आईने (व नंतर मी) जपून ठेवले होते. त्यात थोडेसे बदल करून, काही इंग्लिश शब्दांचे व वाक्यांचे मराठी भाषांतर करून, खाली देत आहे. शुद्धलेखन मुळाबरहुकूम आहे.सकाळी ११ वाजता, १४ ऑगस्ट १९६४
ती. सौ. आईस,
शि. सा. न. वि. वि.

कोण म्हणतं बोटीवर सगळं निळं निळं, खाली-वरती निळं निळं अन् आजूबाजूला निळंच निळं! छे, ही निळी मिथ कोणी रुढ केली कोण जाणे! इथे तर काल सकाळपासून रंगांची करामत कुछ और ही मजा आणत आहे. मुंबईतील बॅलॉर्ड पिअरवरचे पाणी होते मचूळ मचूळ, जरा समुद्राच्या आत गेल्यावर ते झाले गचूळ गचूळ! नंतर एक-दोन दिवस ओकाऱ्यांमुळे पाण्याच्या बहुरंगी स्वरूपाकडे बघून हरखून जायला वावच मिळाला नाही. तेरवा रात्री एडन सोडल्यावर हे रंगांचे धंदे सुचायला लागले अन् कालचा दिवस तर त्यांतच गेला.

काल सकाळी जरा डेकवरून बाहेर डोकावलो, तो काय, तांबड्या समुद्राचे नेव्ही ब्लू पाणी लहान लहान तरंगांनिशी थयथयत होते. याआधी समुद्र आणि आकाश कुठे मिळतात हे नेमके सांगता येत नव्हते. आकाशाचा व समुद्राचा रंग वेगवेगळा, पण ते एकमेकांना मिळू लागले की त्यांना जणू आपापल्या रंगांचे भानच रहात नसावे! पण आता ‘तांबड्या समुद्रा’मध्ये अगदी क्लिअरकट सीमारेषा दिसतेय. स्काय ब्लू आकाश आणि नेव्ही ब्लू समुद्र. सुवेझ कॅनॉलमधील पाण्याचा रंग तर चक्क मोरपंखी होता. मधूनमधून लाटांचे पांढरे चकचकणारे शेंडे दिसायचे. ते बोटीच्या जवळ यायला लागले की त्या पांढऱ्या चकत्या वाढू लागतात, पुढे त्यांचा एक पांढरा प्रवाहच बनतो. हा पांढरा फोम कलर फारच बहारदार दिसतो : गोलाई असलेला, कलाकुसरीचे बुदबुद बाळगणारा, आणि विशेष म्हणजे त्याला फिकट हिरव्या रंगाची कमान. बोट पाणी कापत पुढे गेली की आपला मार्ग अशा रंगांच्या छटांनी रेखून टाकते. बोटीच्या मागच्या बाजूला आहे प्रोपेलर. त्यावरच्या डेकवर उभे राहून समुद्राकडे नजर टकली की पांढऱ्या रंगातून गडद निळ्या रंगाकडे आपण कसे जातो हे कळतदेखील नाही. पण हा नुसता वरवरचा फरक नाही, हा आहे खळखळता बदल.

बोटीवर ब्रेकफास्ट, लंच, डिनर यांच्या वेळा अगदी ठरलेल्या. त्या आधी एक-दोन मिनिटे ‘टिंग टिंग डुंग – डुंग टिंग’ असे म्युझिक सुरू होते. आपण त्याच्याही आधी गेलो तर डेकवर फेरफटका मारुन यायचा! खाणे-पिणे झाल्यावर दोन हातात सफरचंद, पेअर घेऊन ‘एक लिंब झेलू बुवा दोन लिंबं झेलू’ असे करत माझे नुकतेच झालेले मित्र बसले असतील त्या टेबलाजवळ जाऊन ‘लेकांनो किती खाताय, वसुली करायची करायची म्हणजे किती?’ अशा चाटा मारायच्या. कसे कुणास ठाऊक, सुधाकर देशमुख, नारायण सरदेसाई आणि मी यांची चांगलीच गट्टी जमली. ते दोघे इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला जात आहेत. आम्ही तिघे वेगवेगळ्या केबिनमध्ये झोपत असलो तरी केबिनबाहेरचा आमचा बराचसा वेळ एकत्रच जाई. माझ्या हातांतील आणि केबिनमध्ये साठवून ठेवलेली सफरचंदे पाहून त्यांनी माझे नाव ॲपलमोहन असे ठेवले. एक बोट भरून सफरचंदे मी अमेरिकेला पाठवू शकलो तर मला पीएच. डी.देखील मिळून जाईल अशी त्यांची थट्टा चाले. तेही बेटे वेगवेगळ्या प्रकारांच्या चीजवर ताव मारत असत, कारण ते महागाईचे असते ना, मग हाणा दाबून! या मैत्रीमुळे एक अनपेक्षित अडचण दूर होणार असे दिसते आहे. मी व नारायण प्रथम लंडनला जाऊन मग अमेरिकेला जाणार आहोत. बोटीतून जिनोआला उतरल्यावर माझी भली मोठी ट्रंक लंडनपर्यंत इतर सामानासह जाऊ शकत नाही असे कळल्यामुळे ती बरोबर नेणे जिकिरीचे व महागाईचे होते. सुधाकर मात्र जिनोआच्या आधीच नेपल्स बंदरावर उतरून दुसऱ्या एका कंपनीच्या बोटीने थेट न्यू यॉर्कला कूच करणार आहे. आमच्याबरोबरच प्रवास करणाऱ्या मिस्टर ईपन या जरा वयस्क व अनुभवी माणसाने सुचवले की माझी ट्रंक सुधाकरच्या सामानाबरोबर पाठवणे सोयीचे होईल, आणि पठ्ठ्या सुधाकर याला राजीही झाला.

सध्या एक अगदी नवा अनुभव येतोय, तो म्हणजे स्वप्नांबाबत. स्वप्नात सगळे सरमिसळ होतेय, आपले घर, बोटीवरचे खाणे, डॉलर-पौंड-इटालियन लिरा, एडनमधील बाजार, आपल्या घरातील माणसांचे चेहरे व आवाज, सर्व गोष्टी एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी येतात! जाग येताच या सगळ्या गोष्टींचे योग्य विभाजन होऊन जाते. काही वेळा ते दुःखदायी असू शकते!

काल तीन-चार वाजल्यापासून दूरवर कसली तरी किरमिजी सावली दिसू लागली. खरोखर ती निव्वळ रेखाकृति होती, भरीवपणाचा भास देखील नव्हता. जवळपासचे ऑस्ट्रेलियन लोक दुर्बिणी लावून लावून पहात होते. मी ते मुद्दाम टाळले. (माझ्याकडे दुर्बिण नव्हती हे खरे, पण मी कुणाची तरी मागू शकलो असतो.) पोकळ आकृती भरीव कशी होते ते मला पहायचे होते. बराच काळ ती पोकळच राहिली. मी ही कंटाळलो. माझ्या केबिनमधील तुरखिया नावाचा विद्यार्थी शेजारी होता. त्याच्या पाठीवर थाप मारुन ‘क्यों बे’ असे नेहमीच्या पठडीतील शब्द उच्चारले अन् मागे वळून पहातो तो चक्क डोंगर दिसत होता. बोटीच्या दुसऱ्या डेकवर जाऊन पाहिले तर तेथून आणखी एक पहाड आ वासून बघत होता. ओफ्! उजवीकडे आशिया आणि डावीकडे आफ्रिका. झोप चाळवली की माणूस जसा उठतो, तसे उठू पहाणारे खंड. उजवीकडे मला दिसत होता सौदी अरेबियाचा पांढरा गाऊन अन डावीकडे जवळपास नासरचा घुमणारा आवाज व लांबवर कांगोच्या लुमुंबाचे भूत!

समुद्रावरचा सूर्यास्त मी कधीच पाहिला नव्हता. समुद्र तरी असा किती वेळा पाहिला होता म्हणा! सूर्यास्त पाहिला होता तो फक्त पुण्याच्या हनुमान टेकडीवरून. सूर्यास्ताच्या आधी दोनच मिनिटे मी त्या बाजूच्या डेकवर पोहोचलो. बघतो तर सूर्य कितीतरी लांबुडका होता! उदय व अस्त होताना चंद्र-सूर्य मोठे व अंडाकृती होतात असे म्हणतात. सूर्यबिंब ज्या डोंगरावर टेकले, तो डोंगर गोलाकार होता. त्यामुळे निम्मा-शिम्मा सूर्य खाली गेल्यावर सूर्याची कोर (crescent) दिसू लागली. मग तिची झाली वक्र रेषा, मग लहानशी सरळ रेषा, मग एक ठिपका, आणि मग काहीच नाही.

नेव्ही ब्ल्यू रंगाच्या ‘तांबड्या समुद्रा’नंतरचा रॉयल ब्ल्यू रंगाचा भूमध्यसमुद्र कितीही वैभवशाली वाटला तरी त्यात उत्कटतेची चमक नव्हती. सभोवताली फळफळावळीने लगडलेला हा भूमध्यसमुद्र बराच क्षुब्ध होता. त्यामुळे काही जणांना मुंबई सोडल्यानंतरच्या एकदोन दिवसांची चुणूकही मिळाली. मला फक्त डोकं जरासं हल्लक झाल्यासारखं वाटत होतं, व तेही ‘इतरांना इतकं काही होत असूनही आपल्याला काहीच कसं होत नाही’ याचा परिणाम म्हणून असावे.

दुपारी एक वाजता मेसीना आले, इटालीच्या सिसिली बेटावरील आम्हाला लागलेले पहिले बंदर. पाश्चिमात्य जगाची पहिली झलक इथे मिळणार. यापुढे प्राच्य जग दिसणार नाही. मेसीनात उतरलो, डॉक्समधून बाहेर पडलो आणि काय करावे, कुठे जावे असा प्रश्न पडला. रविवार असल्याने व त्यातही दुपारची वेळ असल्याने साऱ्या शहरालाच कुलुप लावून ठेवल्यासारखे वाटत होते. जरी कोणी दिसले, तरी त्याला किंवा तिला इंग्लिश बोलायला येत नव्हते. त्यामुळे ‘कापितो इंग्लिश?’, म्हणजे ‘इंग्लिश समजते का?’ असे विचारताच मान पहिल्या मणक्यावर अगदी एकशे ऐशी अंशातून हलायची. मग सगळी कामे खुणा वापरून! कुठून तरी, कसे तरी आम्ही काही जण एका उंचीवरच्या चर्चपाशी येऊन पोचलो. तेथून आमच्या बोटीवर एक विहंगम दृष्टि टाकली, ते आमचे हालते घर होते. मात्र इथले चर्च बंदच होते. फक्त एक सैनिक पहारा करत होता. त्याला इंग्लिश येत नव्हते व आम्हाला इटालियन येत नव्हते, तरी आम्ही गप्पा मारायचा प्रयत्न करत होतो, इतकेच नव्हे तर तो आम्हाला इटालियन शिकवत होता आणि आम्ही त्याला इंग्लिश शिकवत होतो. किती मजेदार अनुभव होता तो, थेट शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा लागत होता. थोड्या वेळाने आमच्या बोटीवरचे आणखीही काही लोक या चर्चपाशी येताना दिसले, अन् मग बरेच जण गोळा झाले. एकूण आम्ही फारच चांगली जागा शोधून काढली होती तर. खाली उतरताना आम्ही आडवळणाचा, गल्ली-बोळांतून जाणारा रस्ता धरला, कारण आम्हाला इटालिय़न घरे बघायची होती. हे इटालियन लोक घरासमोरच्या फूटपाथवर चक्क खुर्च्या टाकून बसतात व घराबाहेर दोऱ्या बांधून कपडेही वाळत घालतात. एका कामकऱ्याच्या लहानशा पडक्या घरासमोर पाच-सहा मध्यमवयीन बायका बसल्या होत्या. त्या आमच्याकडे, विशेषतः आमच्याबरोबरील एका पंजाबी मुलीकडे, कुतूहलाने बघत होत्या. आम्हीहि त्यांच्याकडे चोरट्या नजरा टाकत होतो. इतक्यात आमच्यापैकी एकाने – नारायण सरदेसाईने – ‘बोना सेरा, बोना सेरा’ असे म्हटले अन् काय आनंदित झाल्या त्या स्त्रिया! बोना सेरा म्हणजे गुड इव्हिनिंग! संध्याकाळ चांगली की वाईट हा प्रश्न नव्हता. प्रश्न होता अगदी परक्या, नवख्या मुलुखातील माणसांशी संपर्क साधण्याचा! ‘बोना सेरा’ने तेवढे काम केले.

आम्हा इष्टुडंट लोकांजवळ मुळात पैसा कुठला व त्यातून विदेशी चलन तर नाहीच नाही. त्यामुळे बोटीवर काय किंवा इटालीतील शहरांतून काय ‘यत्र यत्र लिरा तत्र तत्र प्रवेश बंदी’ असे आमचे सूत्र! इटालीतील शहरांतून चौकाचौकात उघड्यावर कॅफे आहेत. प्रथम आम्हाला ते पार्कच वाटले. पण जरा नजर जाताच पांढऱ्या पोशाखांतील वेटर्स दिसले व आपण तिथे फुकटात बसूही शकणार नाही याची खात्री पटली. अशाच टवाळक्या करत मुख्य रस्त्याने हिंडत असताना एकदम ‘बोना सेरा‘ असे शब्द कानी पडले. तो एक इटालियन कॉन्ट्रॅक्टर होता नि एक दिवसाकरता मेसिनात आला होता. त्याने आपण होऊन आम्हाला एका कॅफेत नेले. नको नको म्हणत असता कोल्ड कॉफी मागवली. पण ती होती ब्लॅक! ते कडू औषध आम्हाला पिता पिववेना. एक तर फुकटात मिळालेली, शिवाय अनोळखी इटालियन गृहस्थाने अगत्याने दिलेली. पण ती कॉफी फारच महागात पडली. जवळून आमच्याच बोटीवरील एक गट आमच्याकडे बघत चालला होता. त्या इटालियन माणसाकडे बोट दाखवून ‘इटालियन मित्र’ असे शब्द मोठ्या दिमाखात आम्ही उच्चारले. मग त्याच हमरस्त्याने दूर दूर चालत गेलो. बोट नऊ वाजता सुटणार होती, पण डिनरसाठी आठला परत जाणे भाग होते. तोपर्यंत टिवल्याबावल्या! जवळून कोणी आपल्याकडे बघत बघत जात असेल तर ‘बोना सेरा’ टाकायचे. नारायणला ही नॅक छान साधली होती. मी एका सौंदर्यवतीकडे बघून ‘बोना सेरा’ असे कापरत कापरत उच्चारले. पण काहीच प्रतिसाद आला नाही. नारायणने इतकी टर उडवली माझी! मेसीना खरोखरच अगदी शांत टुमदार शहर वाटले आम्हाला. ती संध्याकाळ तर एक निवांतपणाचा ठसा उमटवून गेली.

मेसीना सोडले नि रात्री दहाच्या सुमारास बोटीवरील डेकच्या एका कोपऱ्यात एक मलेशियन जोडपे टरबूज खाताना दिसले. मी चटकन माझ्या केबिनमध्ये गेलो आणि काजू-बेदाणे घेऊन वर आलो. मी स्वत:च माझी ओळख करून दिली नि माझ्या जवळची सामग्री देऊ केली. ‘तुम्ही मलेशियन वाटता. मी आहे भारतीय. आपण तुमच्या देशातील राजकीय परिस्थितीबद्दल बोलू या का? आपले दोन्ही आशियाई देश लोकशाही मानणारे आहेत’ याने सुरुवात केली नि तब्बल साडेअकरा वाजेपर्यंत गप्पा चालल्या. तो म्हणाला की त्याला काही त्याच्या सरकारची मते पसंत नाहीत. मग मी विचारले की तुम्ही इंडोनेशियाच्या सोकार्नोच्या बाजूचे आहात का. त्याला माझ्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले. ‘तुमच्या या उत्स्फूर्त प्रश्नावरून मलेशियन सरकारचा प्रचार किती प्रभावी आहे हे सरळ-सरळ दिसून येते. टुंकू अब्दुल रहमानशी मतभेद असणारा पण सोकार्नोचा पक्षपाती नसणारा माणूस असू शकतो याची आमचे सरकार कल्पनाहि करू शकत नाही’ असे तो उद्गारला.

हळूहळू मी त्या गृहस्थाची माहिती जमवली. त्या गृहस्थाचे नाव होते मिस्टर टॅन. त्याचे विचार खूपच समतोल वाटले. गेल्याच वर्षी मलेशियन महासंघ स्थापन करण्यांत झालेल्या घाईमुळे सिंगापूरला विनाकारण जादा अधिकार दिले गेले व त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता आहे असे त्याचे मत होते. (तसेच झाले, पुढच्याच वर्षी सिंगापूरला महासंघातून काढून टाकण्यात आले.) खूप उशिरा माझ्या लक्षात आले की तो एक चायनीज् आहे. पण त्याला चायनीज भाषा व लिपी येत नव्हती. तो वाढला मलायात नि त्यामुळे तो मलेशियनच म्हणायचा. पण तरीही त्याच्या समाजवादी प्रवृत्ति लपू शकत नव्हत्या. मी त्याचा पत्ता घेतला, त्याला माझा दिला नि ‘उद्या भेटू’ म्हटले. तोही जिनोवाला उतरणार होता. आमच्या बोटीवर एक अगदी कोवळी, सालस, निष्पाप व साधी मुलगी होती. बसके पण निमुळते नाक, बारीक तिरके डोळे व गोंडस बॉबकट. लंच डिनरला याच मलेशियन जोडप्याबरोबर असायची. रात्रीच्या राजकीय चर्चेने तिची ओळख करून घ्यायची तयारी केली होती.

दुसऱ्या दिवशी सतरा ऑगस्टला उजाडता नेपल्स. मला माझी एक मोठी ट्रंक नेपल्सहून थेट न्यू यॉर्कला रवाना करायची होती, माझ्या सुधाकर देशमुख या मित्राबरोबर. त्याकरता त्याला दहा डॉलर्स दिले, बोटभाडे व साठवण (porterage and storage), आणि त्याची स्वतःची जबाबदारी म्हणून. त्या दिवशी सकाळची धावपळ व गडबड विचारू नकोस! पर्सरचे ऑफिस इतके उदासीन होते की सोलायची बोय नाही. पोर्टर्स युरोपियन्सच्या मोठमोठ्या सामानामागे जात. वाट पाहून पाहून शेवटी मी, सुधाकर व नारायण सरदेसाई यांनीच सुधाकरचे सामान व माझी ट्रंक खाली उतरवायचे ठरवले. पण ते साधे काम नव्हते. ती ट्रंक दोन पोर्टर्सना भारी होती. पण त्या वेळी अंगात काय संचारले कोण जाणे. एक नाही नि दोन नाही, हुप्पा-हुय्या करून धडाधड सामान खाली उतरवले.

तेथून सामान store roomमध्ये नेऊन टाकायचे. या सामानाला कस्टम्स भरायची नाही असे सांगण्यात आले, कारण ते transit passengersचे होते. पण store roomपर्यंत न्यायला प्रत्येक नगाला पाचशे लिरा ते मागत होते! ‘पुन्हा आम्हीचि आमुचे हमाल’ झालो! store roomपर्यंत कसेबसे सामान नेऊन टाकतोय तो तेथील पोलिस अधिकारी ‘customs first, then here’ एवढेच बोलला. अधिक विचारण्यांत अर्थच नव्हता कारण त्याला याखेरीज काहीच इंग्लिश येत नव्हते. store room ते customs room पर्यंत अवघे वीस-तीस यार्डांचे अंतर होते. पण आता मात्र आमची हद्द झाली होती. इतक्यांत एक इंग्लिश येणारा हमाल आला. डागासाठी हजार लिरांच्या खाली एक लिरा तो कमी करायला तयार नव्हता. छे! म्हणजे इतके कष्ट करून पुन्हा दुप्पट दमड्या मोजायच्या! इलाजच नव्हता. कस्टम्स अगदीच थातुरमातुर. निव्वळ एक उपचार. बॅगा व ट्रंक उघडल्याही नाहीत. ते सारे ठीक, पण आमची मात्र वाट लागली होती.

कस्टम्समध्ये आमच्या आधीचा नंबर एका सयामी कुटुंबाचा होता नि त्यांच्याबरोबर होती ती सोज्ज्वळ मुलगी, त्या मलेशियन माणसाबरोबरची! तिला मी भारतातील मुलगी समजलो होतो. तो मलेशियन बोटीतच होता, मी जाणार होतो जिनोआला नि ही मुलगी नेपल्सलाच उतरली होती! वावगे असे काहीच झाले नव्हते, कारण मला आस्था होती, तरी मी पूर्णपणे निर्विकार होतो. माझी एक फजिती झाली एवढेच! (ही वाक्ये खास माझ्या आईसाठी लिहिली होती.)

नेपल्सला अगदी मुंबईसारखे उकडत होते. सकाळी दोन-तीन तास अंगमेहनतीचे काम केल्यावर केबिनमधल्या सुखवस्तु रहाणीचे महत्त्व कळले. लगेच आम्ही तिघे केबिनमध्ये परतलो, उरलेल्या स़रफचंदांचा फडशा पाडला नि मग नेपल्समध्ये भटकायला तयार! सुधाकर तीन दिवस येथेच रहाणार असल्याने त्याला खोली बघून द्यायची होती. अमेरिकन एक्सप्रेसच्या ऑफिसमधून चिपातल्या चीप हॉटेलचा पत्ता घेतला, व ती जागा धुंडाळत एकदाचे तिथे जाऊन पोहोचलो. रस्ते क्रॉस करताना फार मजा यायची. युरोपमध्ये सर्रास left hand drive. आपल्याकडे आपण आधी उजवीकडे बघतो व निम्मा रस्ता पार केल्यावर डावीकडे. येथे त्याच्या नेमके उलटे. त्यामुळे गंमत अशी व्हायची की सुरुवातीला लक्ष देऊन डावीकडे बघितले तरी नेहमीच्या सवयीप्रमाणे निम्मा रस्ता पार झाल्यावरही डावीकडेच बघत रहायचो आणि एकदम् एखादी मोटार अंगावर यायची. पण इथले मोटारचालक समजूतदार असावेत. ते मुद्दाम गाडी थांबवून आम्हाला जाऊ द्यायचे. आम्ही गेलो त्या हॉटेलमधला मॅनेजर खूपच खेळकर भेटला. सुधाकरला प्रथम त्याने तीन दिवसांचे दहा हजार दोनशे लिरा सांगितले. ते मी Indian – foreign – student – poor – no foreign exchange असे शब्द वापरून नऊ हजारांवर आणले. किती द्यायचे ते ठरल्यावर आता प्रश्न होता कसे द्यायचे, लिरांत की पौंडांत की डॉलर्समध्ये. मग त्यातल्या त्यात सोयीस्कर मार्ग आम्ही शोधून काढला, व त्या मॅनेजरसमोर हिशोब मांडला. आम्हाला साधा ६२० x १३ = ८०६० हा गुणाकार करायचा होता. तो मी चटकन केला. त्याने wrong, wrong असे म्हणून माझे उत्तर खोडून टाकले. त्याला तेराचा पाढा येत नव्हता, म्हणून त्याने प्रथम ६२० x ३ = १८६० असे गुणले व त्यात ६२० x १० = ६२०० मिळवले. शेवटी उत्तर तेच आलेले पाहून तो माझ्यावर काय खूष झालाय! ‘Oh, how did you do that?’ असे म्हणून मला पुन्हा चटकन गुणून दाखवायला लावले.

हे सगळे आटोपायला दुपारचे पावणेचार झाले. अरे, चार वाजता तर बोटीवर चहाची वेळ असते! झपाझप चाललो नि कटाकटी चारला डॉक्समध्ये येऊन पोचलो. सुधाकरला आता बोटीवर जावे तर पंचाईत व न जावे तर फुकटचा चहा मुकणार असे झाले. शेवटी हिय्या करून नेलेच त्याला बोटीवर. सुधाकरला म्हटले शेवटची वसुली सोडू नकोस. पाच वाजता बोट सुटणार होती. त्यामुळे सव्वाचार-साडेचारलाच ते शिड्या वगैरे काढू लागले. त्यांचे आवाज येऊ लागताच सुधाकरची ही घाबरगुंडी उडाली. त्याला मी आणि नारायणने कसाबसा बाहेर नेऊन सोडला नि पळतपळत परत आलो. त्यामुळे त्याला रीतसर निरोप देताच आला नाही. पण उगाच घाई केली असे झाले, कारण पाचला पाच मिनिटे असेपर्यंत खाली उतरायची शेवटची शिडी शाबूत होती.

नेपल्सची धकाधक पाहिल्यानंतर जिनोआला तर जास्तच गर्दी उसळणार याची पूर्ण कल्पना आली, कारण बोटीतले उरले-सुरले सगळेच प्रवासी तिथे उतरणार. नारायण सरदेसाई युरोपमध्ये फिरून मग लंडनला पोचणार. रात्रीच सर्व सामान बांधून ठेवले. सगळ्या वस्तु जागच्या जागी ठेवताना घरी याच वस्तु आपण कशा लावत बसलो होतो याची आठवण येत होती. त्या वेळी जरा काही लागले की माझे ‘आई, हे बघ ना बसत नाही,’ ‘मामा, हे याच्यात कसे माववायचे रे,’ ‘मीरा, हे बांधून टाक पाहू,’ असे सारखे चालायचे. आता फक्त माझा मी. तसे फारसे लावायचेही नव्हते. पण का कोण जाणे जेव्हा गोष्टी fluxमध्ये असतात, तेव्हा माझे डोके जरासे चढते, नि मग एक लांबसा नि:श्वास टाकला की खाली येते. सकाळी उठताच लक्षात आले की लॉइड त्रिस्तिनो या बोटीच्या कंपनीने देऊ केलेली सुरक्षा सेवा (escort service) आपण घेतलीय. पण पर्सरच्या ऑफिसमधील एकंदर उदासीन वृत्ति पाहून मला काय सुरक्षित सोबत मिळणार याबद्दल शंकाच वाटू लागली. नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट वगैरे आटोपून डेकवर आलो, तो जिनोआ दिसू लागले. टग बोट आता आमच्या जहाजाला ओढत होती. धक्क्यावर गर्दीही जमली होती. दुसऱ्या महायुध्दानंतर परागंदा होऊन ऑस्ट्रेलियात गेलेले बरेच इटालियन शेतकरी परत मायभूमीत येत होते. त्यांच्या मनात काय काहूर माजले असेल याची कल्पना येत होती, त्यांच्या एकाच वेळी हसऱ्या व रडव्या होणाऱ्या चेहऱ्यांवरून. बोट धक्क्याला लागली, नि हातांचा, रुमालांचा, हातात जे काही असेल त्याचा फडफडाट सुरू झाला. आपली माणसे दुरून ओळखल्याचा आनंद गप्प कसा बसणार? दोघाचौघांच्या गटापैकी कोणाला तरी एकाला कोणी तरी अगोदर ओळखू यायचे व मग ते बघ, तो खांब दिसतोय ना त्याच्या डावीकडे, मेरी बघ ना फुलाफुलांचा स्कर्ट घालून आलीय नि जॉन गळ्यात कॅमेरा टाकून तिच्या जवळपास हिंडतोय, अशासारखी कुजबुज ऐकू येत होती.

आम्ही जिनोआ इतके सुरळीतपणे सोडू असे स्वप्नातही वाटले नव्हते. ही सुरक्षा सेवा फारच कार्यक्षम होती. बोटीतून धक्क्यावर व धक्क्यावरून रेल्वे स्टेशनवर आम्ही आणि आमचे सामान जणू घरंगळत गेले. कस्टमचा वगैरे काही वांधा नाही. कुलुपे लावलेल्या आमच्या सुटकेसेस customs officeमध्ये गेल्या व लेबले लावून परत आल्या. आमची गाइड होती एलेना. आम्हाला वाटले रेल्वे स्टेशनपर्यंत पोचवून ती परतणार. पण तिनेच कापऱ्या स्वरात सांगितले, ‘We shall be together up to London, so always be in a group. Do not leave me. Please be always with me.’ त्या इटालियन कन्यकेला इंग्लिश खूपच चांगले येत होते. तरी त्यांत झिलई नव्हती. तिला वाटायचे ते ती सरळ बोलून टाकायची. ‘Do not leave me’ असे तिने म्हटल्यावर ‘तुला ग आम्ही कसे सोडू’ असा एक अभिप्राय आला! तिने sweet seventeen केव्हाच पार केले होते. तिच्यात लाजरेपणा नव्हता. एक प्रकारची अदब होती नि जबाबदारीची फार मोठी जाणीव होती. त्यानेच ती अस्वस्थ होती. प्रत्येक जागा सोडताना ‘Are we all together?’ असे विचारायची. तिच्या चालण्यातला झोक काही औरच होता. हवाई सुंदरीचा पोषाख, काहीशी तिरकी टोपी, खांद्यावर पिटुकली एअरबॅग लटकावून दिलेली, निळे डोळे, आखूड पण दाट सोनेरी केशसंभार नि नितळ सोनकेळ्यासारखे पाय, त्वचेवर एक सुरकुती नाही की रंगाची छटा वेगळी नाही. पण तिच्या सौंदर्यात मादकपणा नव्हता, ते soothing होते. स्टेशनवर गाडी सुटायच्या आधी दहा मिनिटे एक जरा वयस्कर तरुण (वय वर्षे तीसच्या जवळपास) आला. एलेना आमच्याकडे बघतबघतच मागे फिरली नि थोडे बाजूला जाऊन ती दोघे अगदी गहिवरून बोलली, दोनच मिनिटे. एक मुका, एक आलिंगन नि खलास! तो तरूण दिसेनासाही झाला. इतक्यात एलेनाचे आई-वडील आले. त्यांच्याशी ती काही बोलत असतानाही आमच्यातील काही बिनडोक जण ‘आपली गाडी कुठे कुठे उभी रहाणार? आम्हाला झोपायला मिळणार का?’ अशा प्रश्नांनी तिला भंडावून सोडत होते. ती मात्र तितक्याच आपुलकीने उत्तरे देत होती. बोलून चालून ती गाइड होती, व तिच्यावर आम्हा तीस नवख्यांची जबाबदारी टाकली होती. मला तर तो क्रूरपणा वाटला. त्यांतून ती होती हळवी. आमची आम्हाला जितकी काळजी, तिच्यापेक्षा तिला जास्त! आणि विशेष म्हणजे आमच्यापैकी धाडसी लोकांनी केलेल्या चेष्टा ती फार खेळकरपणे घेत होती. तिच्या सौंदर्याची तारीफ करणारा कोणी शेरा मारला, तर आपण जणू तो ऐकलाच नाही असे ती दाखवायची. इतकी निर्व्याज!

जिनोआ सोडले नि बोगद्यांना सुरुवात झाली, दर पाच मिनिटांना एक बोगदा. जराश्याने इटालीचा ग्रामीण परिसर दिसू लागला, गारठा वाढू लागला, झाडे निमुळती होऊ लागली नि इतक्यांत मिलानो स्टेशन आले. आम्हाला गाडी बदलायची होती, नि शयनिका असलेल्या डब्यात (couchette) जाऊन बसायचे होते. आमच्या कंपार्टमेंटमध्ये जॅकी व सँड्रा ही भारतीय ख्रिश्चन मायलेक, रोहित फणसळकर, मी आणि प्राशर असे होतो. प्राशर मूळचा भारतीय नागरिक, इंडोनेशियात स्थायी झालेला, पण आता इंग्लंडमध्ये राहणारा. मिलानो सोडले नि सहाच्या सुमाराला दोमो दोस्सोला (Domo d’Ossola) हे इटालीतील शेवटचे रेल्वे स्टेशन लागले. एकेका बास्केटमधून आम्हाला डिनर मिळाले – रोल्स्, वेफर्स, चीज, ॲपल, पेअर, हॅम व वाइन. लॉइड त्रिस्तिनो या आमच्या बोटीच्या कंपनीकडून मिळणारे हे शेवटचे अन्न. त्यानंतर आपले आपण पैसे टिकवायचे. हे डिनर सर्वांनी पुरवून पुरवून खाल्ले. हॅम व वाइन यांचा मी लिलाव केला नि भरपूर चीज, वेफर्स मिळवले.

खरे म्हणजे इटालीतून स्वित्झरलंडमध्ये आम्ही केव्हा प्रवेश केला ते मुळीच कळले नाही. थोड्या वेळाने सुट्टीवर आलेल्यांची (holiday makers) एक रंगीबेरंगी वस्ती एका मोठ्या सरोवराकाठी दिसली. डोंगरांच्या दऱ्यांतून व डोंगरमाथ्यांवरही लहान-लहानशी घरे दिसू लागली. शहरांतील मोठाड इमारती या इवलाल्या टुमदार घरांपुढे मला अगदी बटबटीत वाटतात. अंधार जसजसा पडू लागला तसतसा गारवा कापरं भरू लागला, नि डोंगराच्या कुशीतून इलेक्ट्रिकचे दिवे मिणमिणू लागले. झाले, आमच्या वाट्याला एवढेच स्वित्झरलंड. यापुढे नुसता अंधार, फक्त स्टेशन किंवा शहर वाटेत आले की एकदम झगझगाट. पण संध्याकाळच्या त्या दोन गार तासांनी स्वित्झरलंड माझ्या मनात कायमचे कोरून ढेवले. रात्रीच्या वेळी थोडाथोडा पाऊसही पडू लागला. डोंगरमाथ्याच्या खाली आलेले ढग अगदी बर्फाळ वाटत होते. पण कालिदासाने लिहून ठेवलेले सत्य अबाधितच राहिले, कुठेही कसेही ढग दिसले की सुखी माणसाच्या मनात एक प्रकारचे काहूर माजतेच : मेघालोके भवति सुखिनोप्यन्यथावृत्तिचेताः|

रात्री सुमारे दहा-साडेदहाच्या सुमारास आमच्या शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये पंधरा-वीस इंग्लिश मुली चढल्या. आमच्या बरोबरचा प्राशर, जो तीन वर्षांपासून लंडनर आहे, आमचा म्होरक्या बनला. ओळख काढत काढत चार-पाच जणींशी हस्तांदोलने ठोकली व लंडनच्या हवामानावर चर्चा घसरली. पण लवकरच आम्हाला कळले की त्या मुली भुकेल्या आहेत – दुपारच्या लंचनंतर त्यांनी काही खाल्ले नाहीये – गारठलेल्या आहेत. त्यांना उभे रहायलाही जागा नव्हती! मग काय, आमचे स्त्रीदाक्षिण्य कांही औरच पातळीवर चढले. आम्ही आमचा उरलेला शिधा – wine, ham – आणला आणि मोठ्या उदार अंतकरणाने त्यांना खाऊ घातला. त्या सारख्या ‘you are so kind’ असे म्हणत होत्या. शेवटी त्यांना ‘Please do not repeat this sentence again, in India we say no such thing!’ असे चक्क सांगावे लागले. पण यांत हिन्दुस्तानाची विनाकारण लाज काढली गेली हे आमच्या नंतर लक्षात आले. एकाच कागदी पेल्यातून प्रत्येकीला थोडी थोडी वाइन ओतून देताना नि हॅमचे तुकडे करून देताना मला आपण केवढी उंच उडी मारतोय असं वाटलं. पण ती विचार करत बसायची वेळ नव्हती. त्यांत गैर वाटण्यासारखे काही नव्हते. ती फक्त माणुसकी होती. (ही वाक्येदेखील आईसाठी होती.) त्यांना लवकरच झोपायला कुशन्स मिळाल्या नि आम्ही आमच्या कंपार्टमेंटमध्ये परतलो.

सकाळी उजाडता पॅरिस आले. गाडी अर्धा तास थांबणार होती. तेव्हा आमची गाइड एलेना हिची परवानगी काढून आम्ही (म्हणजे मी, राहुल, प्राशर, जॅकी व सँड्रा) रेस्तोराँमध्ये जायला निघालो. एलेना पुन्हा पुन्हा ‘Come back soon’, असं सांगत होती. रेस्तोराँमध्ये प्रथम रोहितने ‘फ्रेंच पैका’ बदलीत घेतला. एक फ्रँक म्हणजे जवळ जवळ एक रुपया. कॉफी केक झाली. सिगरेटी फुंकणाऱ्यांनी तो कार्यक्रम उरकला. जॅकीला काही फ्रॅंक्सचे ब्रिटिश शिलिंग पाहिजे होते त्यासाठी exchange counterवर परत गेलो. त्या हिशोबात वेळ तर गेलाच पण रोहितला स्वत:च्या काही पेनीही घालाव्या लागल्या. मी त्यांना घाई करत होतो, पण तेवढ्यात कुठलीशी एक शिट्टी वाजली नि जॅकी एकदम पळत सुटली. इतरांनी एक स्मित हास्य केले! या हास्यात वरवर ‘किती भित्री आहे ती’ असे दाखवायचे असले तरी ‘खरंच गाडी सुटली असती तर?’ अशी गर्भित भीति खासच होती! झपाझप चालू लागलो नि प्लॅटफॉर्मवर जाऊन पहातो तो गाडी तिथे नाही! भलतीच पंचाइत झाली. सँड्राला थोडे फ्रेंच येत होते. तिने एका पोर्टरला विचारले तर त्याने ‘gone’ म्हणून सांगितले. पोटात गोळा उठला! आमची तिकिटे आमच्या जवळ होती, पण त्या मायलेकींची तिकिटे गाडीतच होती. माझ्या मनात आता विमानाने लंडन गाठावे लागणार असे येऊ लागले. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर पाहिले तर एक लंडनला जाणारी गाडी होती, Milano-London अशी पाटीवाली. त्या प्लॅटफॉर्मवर टाकलेली १५-२० पावले चांगली लक्षात आहेत माझ्या. एकदा वाटे हीच आपली गाडी, एकदा वाटे छे, ही नव्हे आपली. कुणाला विचारावे तर फ्रेंच येईना! इतक्यात लांबवर एक पागोटे दिसले मला. मी व जॅकी पळत सुटलो. जरा जवळ जाताच कळले की आमच्याबरोबरचा सरदारजी होता तो! म्हणजे आमची गाडी अजून सुटली नव्हती, म्हणजे मला विमान गाठावे लागणार नव्हते, म्हणजे त्या मुलींची जबाबदारी आमच्यावर नव्हती, म्हणजे आमचे सामान सुरक्षित होते, आणि म्हणजे पॅरिसमधली ती कॉफी फार महागात पडली नव्हती! जीव भांड्यात पडला! मी व जॅकी दोघांनी एकदम् एकमेकांचे हात धरले, स्वाभाविकपणे, उत्स्फूर्तपणे.

इतक्यांत एलिना तेथे आली. तिला आमचे पासपोर्टस पाहिजे होते. तिच्याकडून आमचे फोटो न पहाण्याचे वचन घेतले नि पासपोर्टस तिच्या हवाली केले. ‘हा कुणाचा पासपोर्ट, हा कुणाचा ...’ असे करत तिने आमच्याच देखत फोटोंची पाने उघडली नि `वा काय छान आलाय फोटो’ असे म्हणणारे स्मित केले.

पॅरिसहून कॅलेपर्यंत रेल्वे. कॅलेहून इंग्लंडमधील डोव्हरपर्यंत लाँच. येथेही परत एम्बार्केशन कार्डे भरा! इंग्लिश चॅनेल त्यावेळी बरीच क्षुब्ध होती. ओकारीसाठी प्रत्येक सीटवर भांडे ठेवलेले होते. वरच्या मजल्यावर बसायला जागाच नव्हती. तळमजला गाठला. पण तेथे फारच कुंद वातावरण! म्हणून मी चक्क डेकवर जाऊन उभा राहिलो. एलेनाला बोटीचा प्रवास फारसा झेपत नाही असे दिसले. तिने खायला घेतलेला सॅन्डविच तसाच राहिला नि ती पेंगायला लागली. तासाभरात डोव्हर दिसू लागले. आता एलेनाला उठवावे तरी पंचाइत व न उठवावे तरी पंचाइत. तिला बरे वाटत नसले तरी आमच्यापैकी तीच एक माहितगार. पण तीच चटकन उठली, नि आमच्या सामानापाशी (एकूण ६० नग) जाऊन जोराच्या वाऱ्यात उभी राहिली. ‘मी रहातो येथे उभा. तू आंत काही व्यवस्था करायची असली तर बघ’ असं तिला मी सांगितलं. यात स्त्रीदाक्षिण्य नव्हते, फक्त माणुसकी होती.

एलेनाच्या सरळ बोलण्याने डोव्हरच्या इंग्लिश कस्टम अधिकाऱ्यांनाही जिंकले. तपासणी काहीच झाली नाही. रेल्वेने लंडनकडे कूच केले. लंडन येऊ लागले तसतसे एक टप्पा गाठल्याचे समाधान तर वाटत होते, पण आता सगळे पांगणार याचे वाईट वाटत होते. मुंबईपासून सगळे एकत्र होतो ना! कुणा ना कुणाची बहीण, भाऊ स्टेशनवर येणार होते. माझ्या मित्राचा भाऊ प्रमोद नवाथे देखील यावा अशी माझीही आशा व अपेक्षा होती. समजा तो आला नाही तर काय करायचे याबद्दल मी ब्रिटिश कौन्सिलच्या एका प्रतिनिधीजवळ बोलून ठेवले होते. पण मी रेल्वेतून खाली उतरताच प्रमोद माझ्या दिशेने येताना दिसला. त्याला एक निसटती मिठी मारली. एकदम हलकं वाटलं. एलेनाने आमचा आणि आम्ही तिचा निरोप घेतला तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले होते.

सर्वांना यथायोग्य.

तुझा
बालमोहनअखेरीस, वरील पत्रात उल्लेखल्याप्रमाणे सुधाकर देशमुखबरोबर नेपल्सहून न्यू यॉर्कला पाठवलेल्या माझ्या ट्रंकेची कहाणी सांगतो. क्युनार्ड लाइन या ब्रिटिश कंपनीच्या मॉरिटानिआ नामक बोटीने मी २५ ऑगस्टला इंग्लंडमधील सौदहॅम्टनहून निघालो. ती बोट न्यू यॉर्कला १ सप्टेंबरला सकाळी पोचली. तिथे सुधाकरने यायचे असे ठरले होते. बरेच शोधूनही सुधाकर काही मला सापडला नाही. त्याच दिवशी दुपारी आमच्या त्रिकूटापैकी नारायण सरदेसाई लंडनहून विमानाने यायचा होता, व त्याचेही स्वागत करायला सुधाकर जाणार होता. म्हणून मी दहा मैलांवरच्या जे. एफ. केनेडी विमानतळावर गेलो. सुधाकर तर तिथे नव्हताच पण नारायणही त्या विमानातून उतरला नाही! मग सुधाकर येणार होता त्या एस. एस. झिऑन नामक बोटीच्या झिम लाइन्स या इस्रायली कंपनीकडे चौकशी केली. त्यांच्या बॅगेज व कस्टम्स अशा दोन्ही विभागात देशमुख किंवा लिमये अशा कोणत्याच नावावर काहीच नव्हते. Travelers Aid Company यांच्याकडेही विचारणा करून झाली. नवीन देशातील माझे नवे आयुष्य असे सुरू झाले.

(थोड्याशा) शहाणपणाने मी सुधाकरला माझा न्यू यॉर्कमधला तात्पुरता पत्ता देऊन ठेवला होता. मी, सुधाकर व नारायण अशा तिघांनी न्यू यॉर्कमध्ये दोन-तीन दिवस एकत्र घालवायचे मनसुबेही रचले होते. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मला न्यू यॉर्कचा मुक्काम लवकर हलवावा लागला व माझी ट्रंक मिळायच्या आधीच मी रॉचेस्टर विद्यापीठाकडे प्रयाण केले. त्या ट्रंकेत अत्यावश्यक अशा काही गोष्टी नव्हत्या म्हणून बरे. रॉचेस्टरला आल्यावर मी सुधाकरला त्याच्या पर्ड्यू विद्यापीठाच्या पत्त्यावर अस्वस्थतापूर्ण पत्र पाठवले. त्याचे उत्तर जास्तच अस्वस्थताजनक होते. त्याची बोट न्यू यॉर्कला दोन दिवस उशिरा आली होती. शिवाय नारायणची फ्लाइट चुकल्याने तोही वेळेवर आला नव्हता. नंतर त्या दोघांनी माझ्या न्यू यॉर्कमधील पत्त्यावर चौकशी केली तर मी निघून गेलेलो. सगळा गोंधळ! शेवटी टाइम्स स्क्वेअर जवळील रेल्वे एक्सप्रेस एजन्सी या कंपनीच्या ऑफिसमध्ये एका मध्यरात्री, व नंतर दुसऱ्या एका ऑफिसमध्ये रात्री दोन वाजता पोचून त्यांना माझी ट्रंक रॉचेस्टरला पाठवावी लागली. ती माझ्यापर्यंत पोचायला तीन आठवडे लागले. मध्यंतरीच्या काळात मी ट्रंकेबद्दल विचारले असता सुधाकरने मला एका पत्रात लिहिले होते, ‘मला ट्रंकेने इतका त्रास दिला होता की तिच्यापासून मुक्त होण्यात मी फारच तत्परता दाखविली. ... मी रागावलो अजिबात नाही, पण काळजीत मात्र निश्चित आहे. ... ट्रंक मिळताच Air Mail ने मला कळव म्हणजे मी निश्चिंत होईन. ... अजूनही मला तू माझ्याकडे ट्रंक दिलीसच कशाला याचे उत्तर मिळत नाही.’ त्याचे म्हणणे सर्वस्वी योग्य होते. केवढा हा उपद्व्याप करावा लागला होता. या प्रसंगावरून मी कायमचे ठरवून टाकले की स्वतःला नेता येईल इतकेच सामान घेऊन प्रवास करायचा, वाटेत काही अडचण आलीच तर आवश्यक तेवढे सामान ठेवून बाकीच्याची विल्हेवाट लावायची, पण ते कुणाहीबरोबर कुठेही पाठवायचे नाही. ही खूणगाठ मी पाळली आहे.
– – –
बालमोहन लिमये

(balmohan.limaye@gmail.com)

Balmohan Limaye 2020

लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर आता गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus). पवईलाच रहिवास.

बालमोहन लिमये यांचे इतर लिखाण

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फारच रोचक. वाचताना खूप मजा आली. धन्यवाद.

बाकी आईला लिहिण्याच्या पत्रात बरेच बोल्ड उल्लेख... नात्यातला चांगला मोकळेपणा दिसतो त्यात.. Smile

जाता जाता. त्या गाईड मुलींना तुम्हा तरुणांनी (तुमच्यातील काही तरुणांनी) बरेच हॅरास केले असावे. ती ऐकलेच नाही अशा रीतीने दुर्लक्ष करत होती हा निरागसपणा नसावा. ती मजबूरी असावी नोकरीची. आजही बहुसंख्य स्त्रिया ऐकून न ऐकल्यासारखे करतात. कारण तोच एक पर्याय असतो. भारतीय तरूणांबद्दल तिचे एक जनरल मत बनून गेले असेल मनात.

अनेक ठिकाणी परदेशात किंवा देशातही असे निरीक्षण आहे की आपले भारतीय तरुण किंवा अगदी चाळीशीतले पुरुष देखील एअरहोस्टेसपासून हॉटेलात गाणाऱ्या बँड मधील मुलीपर्यंत सर्वांशी अनाहूत जवळीक साधतातच साधतात . हात मिळवणे, सौंदर्य अभिप्राय न मागता, आपल्या सोबत ड्रिंक / टेबल शेअर करणे ऑफर, सोबत डान्स करण्याची मागणी.

असो.

तो विषय वेगळा. आपले पत्र आणि लेख वाचून पुलंच्या अपूर्वाईइतकाच किंवा अधिक आनंद मिळाला. आणखी लिहा असेच अनुभव. धन्यवाद.

फारच रोचक. वाचताना खूप मजा आली. धन्यवाद.

बाकी आईला लिहिण्याच्या पत्रात बरेच बोल्ड उल्लेख... नात्यातला चांगला मोकळेपणा दिसतो त्यात.. Smile

आपले पत्र आणि लेख वाचून पुलंच्या अपूर्वाईइतकाच किंवा अधिक आनंद मिळाला. आणखी लिहा असेच अनुभव. धन्यवाद.

असेच म्हणतो.

बाकी…

सकाळी उठताच लक्षात आले की आपण सुरक्षा सेवा (escort service) मागून घेतलीय.

एकंदरीतच बऱ्यापैकी निरागस जमाना असावा तो. त्या काळात, gay म्हटल्यावर ‘आनंदी’ असा अर्थ प्रतीत व्हायचा (निदान, आमच्या प्राथमिक शाळेत तरी आम्हाला तसे शिकविले होते), pansy हे एका फुलाचे नाव होते, नि escort service असे सुरक्षा सेवेला(च) म्हणत. कालाय तस्मै नमः। चालायचेच.

(१ जून १९६४ पासून ‘नये पैसे’ हे नाव रद्द झाले होते.)

माझा जन्म १९६६चा. माझ्या लहानपणी ‘नये/नवे पैसे’ हे नाव, तथा त्याचे np हे लघुरूप, (वर्तमानपत्रांतून, शालेय पाठ्यपुस्तकांतून, वगैरे) सर्रास वाचल्याचे मला चांगलेच आठवते.

बाकी,

१. १९६४ साली लिहिलेले पत्र, transcribe करण्याकरिता आजमितीस (२०२३ साली) उपलब्ध असणे,
२. ते (निदान फोटोवरून तरी) मिंट कंडिशनमध्ये असणे, आणि
३. ते प्रेषकाजवळ सापडणे,

हे सर्व अंमळ रोचक. विशेषतः ३.वरून असा प्रश्न पडला, की पत्र लिहून झाल्यावर लेखक ते पोष्टात टाकण्याचे विसरला असावा, की आईला बोटीवरून लिहिलेल्या पत्राचीसुद्धा Office Copy (तीसुद्धा ह्युएन त्सँग पद्धतीने बनविलेली (पक्षी: हाताने उतरवून काढलेली), नि हुबेहूब तशाच स्टेशनरीवर काढलेली) ठेवण्याची प्रथा लेखकांच्यात असावी? (ते पत्र आईने (व नंतर मी) जपून ठेवले होते, हे स्पष्टीकरण नंतर, बऱ्याच उशिरा वाचले.)

(आणि हो… लिमयेकाकांचे हस्ताक्षर सुवाच्य आहे, याचा उल्लेख करायचे विसरलोच.)

आई-बाबांनी विमानाच्या प्रवासावर बंदी घातली होती, म्हणून मुख्यतः बोटीने जावे लागले

यामागील लॉजिक समजत नाही. म्हणजे, विमानाच्या प्रवासावर बंदी ही विमान आकाशातून पडण्याच्या शक्यतेच्या भीतीमुळे म्हणावी, तर मग त्याच न्यायाने, जहाजास जलसमाधी मिळू शकत नाही काय? (जयंती, रामदास, झालेच तर टायटॅनिक… ही नावे मला वाटते त्या काळातसुद्धा सर्वपरिचित असावीत. (चूभूद्याघ्या.))

शिवाय, मुंबई-न्यूयॉर्क युरोपमार्गे विमानप्रवास हा आजमितीस ९ + ९ = १८ अधिक स्टॉपओव्हरचा वेळ म्हणजे फार फार तर २४ तासांचा. १९६४ सालची विमानप्रवासाची गती तथा टप्प्यांची मर्यादा (मुंबई-कराची-एडन-बैरूत किंवा कैरो-पॅरिस किंवा फ्रँकफुर्ट-लंडन एवढे फक्त (ऐकीव माहितीनुसार) लंडनपर्यंत, नि तिथून पुढे न्यूयॉर्कला कसे, ते परमेश्वरासच ठाऊक.) वगैरे हे घटक जरी लक्षात घेतले, तरीसुद्धा, तो प्रवास तीन ते चार दिवसांहून अधिक तो काय असणार? उलटपक्षी, जहाजाने या प्रवासास किमान काही आठवडे तरी लागत असणार. म्हणजे, विमान कोसळणे अथवा जहाजास जलसमाधी या दोन्ही दुर्घटनांकरिता उपलब्ध असणारा कालावधी लक्षात घेता, शक्यता अधिक कशाची, नि किती पटीने? (गणिताचे निवृत्त प्रोफेसर तुम्ही आहात. तुम्हीच घाला बोटे, मोजा, नि सांगा पाहू!)

त्यावेळी विदेशी चलन घेण्यासाठी फक्त चाळीस रुपये बरोबर नेता येत असत. मी मात्र जास्तीचे डॉलर व पौंड नेण्याची खास परवानगी काढली होती.

ही भानगड नीटशी कळली नाही. असो.

निळे डोळे, आखूड पण दाट सोनेरी केशसंभार नि नितळ सोनकेळ्यासारखे पाय, त्वचेवर एक सुरकुती नाही की रंगाची छटा वेगळी नाही. पण तिच्या सौंदर्यात मादकपणा नव्हता

हे सर्व आईला लिहिण्याच्या पत्रात आणि तेही १९६४च्या इसवीत लिहू शकणाऱ्या लिमयेकाकांना आमचा साष्टांग प्रणिपात! (आमची पुढची पिढी त्या मानाने अगदीच ह्यॅः निघाली.) होतकरू तरुण पत्रलेखकांनी त्यांचा कित्ता गिरविण्यासारखा आहे.

सुएझ कॅनाल सुरू होताना बोटीवरचे काही जण खाली उतरले व कैरो या इजिप्तच्या राजधानीजवळचे पिरॅमिड्स बघायला गेले. तिकडे हवा खूपच गरम व कोरडी असेल म्हणून मी बोटीवरच राहिलो. शिवाय या ट्रिपसाठी दहा डॉलर्स मोजावे लागले असते. तो कॅनॉल संपता संपता इजिप्तमधील पोर्ट सैद बंदरात आमची बोट उभी राहिली, व तेथे ते लोक परत बोटीवर चढले. (माझ्यासारख्या अशी संधी सोडणाऱ्याला काय म्हणावे?)

अं… मराठी???

ओफ्! उजवीकडे आशिया आणि डावीकडे आफ्रिका. झोप चाळवली की माणूस जसा उठतो, तसे उठू पहाणारे खंड. उजवीकडे मला दिसत होता सौदी अरेबियाचा पांढरा गाऊन अन डावीकडे जवळपास नासरचा घुमणारा आवाज व लांबवर कांगोच्या लुमुंबाचे भूत!

पुढे कोठेतरी लेखकाने आपल्या वाट्याला आलेली वाईन बार्टर केल्याचा उल्लेख आहे, त्यामुळे, ‘तशातला’ प्रकार बहुधा नसावा. (चूभूद्याघ्या.) कोठल्याही बाह्य मदतीशिवाय असले काहीबाही भास होणे… क्रेडिटेबल आहे! लेखकाचा हेवा वाटतो.

हे सगळे आटोपायला दुपारचे पावणेचार झाले. अरे, चार वाजता तर बोटीवर चहाची वेळ असते!

यावरून एक अवांतर शंका. बोटीवर कालगणना कशी करतात? म्हणजे, प्रस्तुत प्रसंगी बोट इटलीतील बंदरात थांबलेली असल्याकारणाने, ही चार वाजण्याची वेळ ही इटलीप्रमाणे असणार. (Central European Time? चूभूद्याघ्या.) परंतु, प्रवासाचे इतके दिवस दररोज दुपारी चार वाजता जर चहा पाजीत असतील, तर मग भर समुद्रावर दुपारचे चार वाजलेले मोजतात, ते नक्की कोणत्या वेळेप्रमाणे?

असो. लेख आवडला. मजा आली.

gay म्हटल्यावर ‘आनंदी’ असा अर्थ प्रतीत व्हायचा

अगदी अगदी.. लहानपणी म्हणजे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस "इव्हिनिंग इन गे महाराष्ट्रा" हे मधुर गाणे आनंदी महाराष्ट्र या अर्थानेच प्रसिद्ध होते. ते बहुधा आकाशवाणीने बनवले होते पण चुभुद्याघ्या. त्यात सगळेच लोक गे आणि रोमँटिक असल्याचे म्हंटले होते.

तुलनेत हल्ली सुमन श्रीधर हिने ते पुनरुज्जीवित केले. पण सेक्शन ३७७ निमित्ताने. त्यात "कम अँड सी अवर चौपाटी, अँड ईट अवर चपाती, तंदूरी चिकन आला रे ." या ओळीची या सुमनने पारच काशी घातली. पण असो.

अगदी अगदी.. लहानपणी म्हणजे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस "इव्हिनिंग इन गे महाराष्ट्रा" हे मधुर गाणे आनंदी महाराष्ट्र या अर्थानेच प्रसिद्ध होते. ते बहुधा आकाशवाणीने बनवले होते पण चुभुद्याघ्या. त्यात सगळेच लोक गे आणि रोमँटिक असल्याचे म्हंटले होते.

हे कोणते गाणे म्हणे? आश्चर्य आहे, मी कधी ऐकले नाही. (१९८०च्या दशकात मी बराच काळ महाराष्ट्राबाहेर होतो खरा, परंतु तरीही, सुरुवातीची काही वर्षे नि शेवटची काही वर्षे महाराष्ट्रातच होतो.)

तुलनेत हल्ली सुमन श्रीधर हिने ते पुनरुज्जीवित केले.

हा सुमन श्रीधर प्रकार काय आहे?

असो.

हे कोणते गाणे म्हणे?

हे गाणे

हा सुमन श्रीधर प्रकार काय आहे?

सुवर्णा कपूर कोण म्हणून विचारणारे तुम्हीच का?

इथे बघा.

ती गायिका आहे आणि मागे अति मद्यपान केल्या सारख्या आवाजात तिने हवा हवाई, पुकारता चला हूं मै, जाता कहां है दिवाने, तुम जो मिल गये हो.. अशी गाणी एका सिनेमात गाऊन प्रसिद्धी मिळवली होती.

नव-महाराष्ट्रगीताची दोन्ही वर्जन्स पाहिली. छान आहेत पण विदर्भाला अनुल्लेखाने मारलेच शेवटी!

विदर्भाचे जाऊ द्या, विदर्भ सातआठशे किलोमीटर अंतरावर आहे मुंबईपासून, पुष्कळ दूर आहे. पण मुंबईबाहेर एक मोठा महाराष्ट्र आहे, याचीसुद्धा फारशी दखल घेतलेली दिसत नाहीये त्या गाण्यात. (माथेरान, महाबळेश्वर वगैरे ओझरते उल्लेख आहेत खरे, परंतु ते तेवढेच. कदाचित मुंबईकराला महाराष्ट्राबद्दल तितपतच ऐकून माहीत असावे.) महाराष्ट्राच्या नावावर खपविलेले अत्यंत मुंबईसेंट्रिक गाणे आहे हे. मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे! टिपिकल बाँबे ॲटिट्यूड.

(विदर्भवाले म्हणतात वेगळा विदर्भ व्हावा म्हणून. मी म्हणतो विदर्भवाले विदर्भाचे काय हवे ते करू द्यात, परंतु मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी जरूर व्हावी, तातडीने व्हावी. त्यातून मुंबईचेही नि महाराष्ट्राचेही, झाले तर भलेच होईल. मुंबईला उर्वरित महाराष्ट्राशी काहीही देणेघेणे नाहीये, आणि चाळीसएक टक्के लोक मराठी बोलतात, याव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्राशी फारसे (सांस्कृतिक, भावनिक वगैरे) साधर्म्यही नाहीये. एवढ्या फ्लिम्झी भरवश्यावर तिला उर्वरित महाराष्ट्रावर काय म्हणून लादायची??? आंध्र आणि तेलंगण जर वेगळे होऊ शकतात, नि त्याने दोहोंचेही काहीही जर बिघडत नाही, तर मग मुंबई, महाराष्ट्र, आणि विदर्भ, अशी तीन वेगळी राज्ये करण्यात अडचण नक्की काय आहे? (मराठवाड्याबद्दल मराठवाडावाल्यांना काय ते ठरवू द्यात.))

बाकी, तंदुरी चिकन हे महाराष्ट्रीय कधीपासून झाले?

नव-महाराष्ट्रगीताची दोन्ही वर्जन्स पाहिली. छान आहेत

मला दोन्ही भिकार वाटली. त्या मूळ आवृत्तीत ती पारशी बाई 'गे मराष्ट्रा', 'मराष्ट्रियन वे' वगैरेंमध्ये महाराष्ट्राचा नामोल्लेख ज्या आघाताने, ज्या उच्चारानिशी करते, तो ऐकून, ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत (मार्गे छत्रपती श्री शिवाजीमहाराज) एकजात सर्व मराठी दिग्गजांना फेफरे यावे! (माझा अबकड मुलगासुद्धा, भयंकर मराठी बोलतो, परंतु, गेला बाजार तसल्या आघाताने तरी नाही बोलत! आणि, त्याला निदान एक्स्क्यूज तरी आहे; यांचे काय?)

नवीन आवृत्तीतले उच्चार खरे तर त्या मानाने बरे वाटले, परंतु त्यातील त्या सुमन व्हॉटेव्हरचे हावभाव (उगाच) बीभत्स आहेत.

असो. लिमयेसरांच्या लेखावर बरेच (नको तितके!) अवांतर झाले. आता थांबवतो.

माझ्या त्यावेळच्या पासपोर्टच्या शेवटच्या पानावर 6.8.64 रोजी 5 पौंड रोख आणि 15 पौंडांचे व 250 डॉलर्सचे ट्रॅव्हलर्स चेक्स बडोदा बॅंकेने दिल्याचा उल्लेख आहे. बहुतेक माझे मामा माधवराव जोगळेकर यांनी खटपट करून कुठल्या तरी योजनेखाली मला मिळवून दिले असावेत.

तर मग भर समुद्रावर दुपारचे चार वाजलेले मोजतात, ते नक्की कोणत्या वेळेप्रमाणे?

रेखांशांनुसार सगळ्या जगाचे 24 कालपट्टे (time zones) पाडतात, प्रत्येकी 15 रेखांशांचे, एक तासाच्या फरकाने. बोट एका पट्ट्यामधून दुसऱ्या पट्ट्यामध्ये गेली की बोटीवरच्या घड्याळात एक तासाचा फरक करायचा असतो. पण तो करायचा की नाही ते बोटीचा कप्तान ठरवतो. साधारणपणे असा फरक फक्त मध्यरात्री करतात, त्यामुळे सकाळी उठल्यावर प्रवाशांनी आपले घड्याळ लावून घेतले की झाले.

माझ्या दोन्ही (तुलनेने महत्त्वाच्या) शंकांचे निरसन जातीने केल्याबद्दल आभारी आहे. (तेवढी त्या विमानप्रवासभयासंबंधीच्या शंकेसंदर्भातसुद्धा जर टिप्पणी केलीत, तर उपकृत राहीन; परंतु, अर्थात आपली मर्जी.)

----------

रेखांशांनुसार सगळ्या जगाचे 12 कालपट्टे (time zones) पाडतात, प्रत्येकी एक तासाच्या फरकाने.

१२, की २४? (आणि, खरे तर, भारत/श्रीलंका, नेपाळ, यांसारखी राष्ट्रे ही काहीश्या आडनिड्या (UTC+5:30 भारत/श्रीलंका, UTC+5:45 नेपाळ) कालपट्ट्यांत आहेत, हे लक्षात घेता, कदाचित त्याहूनही अधिक?)

कालपट्टे 24 असतात, चुकून 12 लिहिले गेले. आताच दुरुस्ती केली आहे.

विमानाच्या प्रवासावर बंदी ही विमान आकाशातून पडण्याच्या शक्यतेच्या भीतीमुळे म्हणावी, तर मग त्याच न्यायाने, जहाजास जलसमाधी मिळू शकत नाही काय?

कुठल्या गोष्टीचे कुणाला किती भय वाटेल याचा काही नेम नसतो. माझ्या आई-वडिलांना विमानप्रवासाचे भय जास्त होते इतकेच. अमेरिकेत दोन वर्षांचे शिक्षण घेतल्यावर मला भारतभेटीसाठी एक महिन्याचीच उसंत होती. मग मी पेच टाकला की मला विमानाने येणेच शक्य आहे; नाहीतर मी येतच नाही. पुत्रभेटीच्या आनंदापुढे विमानप्रवासाच्या भयाने माघार घेतली.

कुठल्या गोष्टीचे कुणाला किती भय वाटेल याचा काही नेम नसतो. माझ्या आई-वडिलांना विमानप्रवासाचे भय जास्त होते इतकेच.

हे मात्र खरे. भय या प्रकाराला rationale लागत नाही.

बाकी, जहाजप्रवासाचा एक अ-योजित फायदा नक्की झाला असणार – गंतव्यस्थळी पोहोचल्यावर जेटलॅगचा त्रास झाला नसणार!

हे कालपट्टे फक्त रेखांशांवर अवलंबून असतात, सलग 15 रेखांशांचा एक कालपट्टा; त्यातील कुठला देश कोणती वेळ पाळतो ते बघायचे नाही..

आभार.

होतकरू तरुण पत्रलेखकांनी त्यांचा कित्ता गिरविण्यासारखा आहे.

सध्याचे कोणी होतकरू तरुण कधी पत्रलेखक होतील असा संभव वाटत नाही.

तेही खरेच.

(आणि, एसएमएसला अशी (प्रस्तुत पत्रातल्यासारखी) भाषा शोभत नाही, हाही भाग आहेच.)

छान लेख.

लेख फार आवडला.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

>>समुद्रावरचा सूर्यास्त मी कधीच पाहिला नव्हता. समुद्र तरी असा किती वेळा पाहिला होता म्हणा! सूर्यास्त पाहिला होता तो फक्त पुण्याच्या हनुमान टेकडीवरून. सूर्यास्ताच्या आधी दोनच मिनिटे मी त्या बाजूच्या डेकवर पोहोचलो. बघतो तर सूर्य कितीतरी लांबुडका होता! सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी चंद्र-सूर्य मोठे व अंडाकृती होतात म्हणे! सूर्यबिंब ज्या डोंगरावर टेकले, तो डोंगर गोलाकार होता. त्यामुळे निम्मा-शिम्मा सूर्य खाली गेल्यावर सूर्याची कोर (crescent) दिसू लागली. मग तिची झाली वक्र रेषा, मग लहानशी सरळ रेषा, मग एक ठिपका, आणि मग काहीच नाही.

>> याआधी समुद्र आणि आकाश कुठे मिळतात हे नेमके सांगता येत नव्हते. आकाशाचा व समुद्राचा रंग वेगवेगळा, पण ते एकमेकांना मिळू लागले की त्यांना जणू आपापल्या रंगांचे भानच रहात नसावे! पण आता ‘तांबड्या समुद्रा’मध्ये अगदी क्लिअरकट सीमारेषा दिसतेय. स्काय ब्लू आकाश आणि नेव्ही ब्लू समुद्र. सुवेझ कॅनॉलमधील पाण्याचा रंग तर चक्क मोरपंखी होता. मधूनमधून लाटांचे पांढरे चकचकणारे शेंडे दिसायचे. ते बोटीच्या जवळ यायला लागले की त्या पांढऱ्या चकत्या वाढू लागतात, पुढे त्यांचा एक पांढरा प्रवाहच बनतो. हा पांढरा फोम कलर फारच बहारदार दिसतो : गोलाई असलेला, कलाकुसरीचे बुदबुद बाळगणारा, आणि विशेष म्हणजे त्याला फिकट हिरव्या रंगाची कमान. बोट पाणी कापत पुढे गेली की आपला मार्ग अशा रंगांच्या छटांनी रेखून टाकते. बोटीच्या मागच्या बाजूला आहे प्रोपेलर. त्यावरच्या डेकवर उभे राहून समुद्राकडे नजर टकली की पांढऱ्या रंगातून गडद निळ्या रंगाकडे आपण कसे जातो हे कळतदेखील नाही. पण हा नुसता वरवरचा फरक नाही, हा आहे खळखळता बदल.

किती दिवसांनी असं काही वाचलं.
लेख फार आवडला.

लेख आवडला. स्वातंत्र्यपूर्व काळात "बॅरिस्टर" होण्यासाठी तरूण वयात लंडनला गेलेल्या तरुणांना प्रवासाचा साधारण असाच अनुभव असावा. मला वाटायचे बोटीने जायचे म्हणजे "वास्को-द-गामा स्टाईल" वळसा घालून थेट लंडन पर्यंत जात असावेत. तरीही सध्य काळातत या प्रवासाची फक्त कल्पना करता येते. मौज-मजा हौस म्हणून क्रूज वर दिवस घालवणे वेगळे. गतकाळातले बरेच संदर्भ या लेखाच्या निमित्ताने मिळाले. युरो चलन पूर्व विनिमय दर, कशाही फेकता येतील, कमी प्रयत्नांनी हलवता येतील अशा आजच्या जमान्यातल्या प्रवासी बॅगा विरुद्ध अवजड ट्रंका, आजकालच्या एअरबीनबी च्या जमान्यात हॉटेल वा तात्पुरत्या निवार्‍याची सोय शोधण्याचे माध्यम, कस्टम, रेल्वे प्रवास इ. पत्रलेखनामुळे निदान या सगळ्याची व्यवस्थित नोंद राहिली. आमच्या काळात इंटरनॅशनल कॉलचेही अप्रूप गेले होते. आजकालसारखे व्हॉट्सअ‍ॅप कॉल नसले तरी गुगलचॅट वर व्हिडीओ कॉलही करता येत होता. बाकी तुमच्या मातोश्रींना लिहिलेले पत्र हृदय आहे. अ‍ॅपलमोहन वाचून खुदकरून हसू आले. स्थळ-काळ कुठलेही असो, मित्र म्हटले की थट्टा मस्करी आलीच.

स्वातंत्र्यपूर्व काळात "बॅरिस्टर" होण्यासाठी तरूण वयात लंडनला गेलेल्या तरुणांना प्रवासाचा साधारण असाच अनुभव असावा. मला वाटायचे बोटीने जायचे म्हणजे "वास्को-द-गामा स्टाईल" वळसा घालून थेट लंडन पर्यंत जात असावेत.

सुएझ कालवा १८६९च्या नोव्हेंबरअखेरीस वाहतुकीसाठी खुला झाला, ही बाब लक्षात घेता, स्वातंत्र्यपूर्व काळात बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेलेले हिंदुस्थानातील तरुण काय किंवा इतर कारणांसाठी इंग्लंडला गेलेले हिंदुस्थानातील नेते काय, यांच्यापैकी दादाभाई नौरोजी, झालेच तर फिरोजशहा मेहता, यांच्यासारखे खूपच अगोदरच्या काळातले मोजके लोक (तेव्हा सुएझ कालवा नसल्याकारणाने) कदाचित केप ऑफ गुड होपला वळसा घालून गेले असू शकतीलही, परंतु, तेवढे वगळता, नंतरच्या काळातली बहुतांश मंडळी (गांधी, जीना, सावरकर, नेहरू, पटेल, टिळक) ही सुएझमार्गे गेलेली नसण्याचे काहीच कारण दृग्गोचर होत नाही. (चूभूद्याघ्या.)

हम्म. पॉईंट आहे. या लोकांनी निदान असे प्रवास अनुभव लिहायला पाहिजे होते. आणि कदाचित असतीलही ते खाजगी पत्रांमध्ये. दस्तऐवज चाळणार्‍या इतिहास अभ्यासकांना कदाचित याची कल्पना असावी.

सुंदर लेख
असंच सुंदर अनुभव कथन अमर्त्य सेन यांच्या Home in the World: A Memoir या आत्मचरित्रात येतं... सेन पहिल्यांदा जेव्हा केम्ब्रिजला मुंबईतुन बोटीमार्गे गेले...मोठ्या बदलाला सामोरं जाताना वाटणारी हुरहूर... निसर्गाचं अनोखं रूप इ.

थँक्स. सेन यांच्या आर्ग्युमेंटेटीव्ह इंडियन्स या पुस्तकाची गुहांनी लिहिलेली चिकित्सा वाचली होती. पण या पुस्तकाबद्धल माहित नव्हते.

थोडक्यात, खाली कोल्हटकर यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी १९६४ पर्यंत बोटीने प्रवास होत होता.

Terrific article by Limaye sir, had too much fun reading it!!

अतिशय रोचक लेख
" त्यावेळी विदेशी चलन घेण्यासाठी फक्त चाळीस रुपये बरोबर नेता येत असत. मी मात्र जास्तीचे डॉलर व पौंड नेण्याची खास परवानगी काढली होती."
हे म्हणजे नक्की कसे काय जमवले ? काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे काय ?

A great vivid description of your travel. So truthful as well as magical and mind engaging that while reading one feels he/she is actually in the travel with you.

Suresh B Katakkar

बालमोहन ह्यांच्या आजपर्यंतच्या ख्यातीला साजेसाच हा लेख आहे. १९६३-६४ साली इकडून तिकडे जाणारे बहुसंख्य विद्यार्थी बोटीनेच प्रवास करीत असे दिसते. माझा एक मित्र प्रमोद तलगेरी त्याच सुमारास जर्मनीला शिक्षणासाठी गेला आणि तोहि जिबुतीमार्गे बोटीनेच गेला. (काही महिन्यांपूर्वी त्याचे दु:खद निधन झाले.)

ह्या लेखावरून आठवण झाली ती म्हणजे भाषाशास्त्राचे प्रख्यात अभ्यासक आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे एक संस्थापक पां.दा.गुणे हे १९१० साली भाषाशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी ते जर्मनीमध्ये लायप्झिक येथे गेले होते त्याच्या वर्णनाचे ‘माझा युरोपातील प्रवास‘ हे पुस्तक. हा सर्व प्रवास समुद्रमार्गेच झाला. तेथे असतांना त्यांनी स्विट्झर्लंड, वेनिस, रोम असाहि प्रवास केला. ह्या सर्व भागांमध्ये मीहि अलीकडेच प्रवास केला असल्याने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.

अवांतर.
गुणे यांचे पुस्तक शोधताना ही दोन पुस्तके सापडली.

भालचंद्र नेमाडे यांनी संपादन केलेले, तुकाराम गणू चौधरी यांचे "जर्मन रहिवास : १९२२-१९२५ मधील जर्मनीचा अनुभव" (१९२२-२५ हा पहिल्या महायुद्धानंतरचा जर्मनीमधला फारच खडतर कालावधी होता).

आणि दुसरे म्हणजे, वसंत सावंत यांनी लिहिलेले, "प्रवासवर्णन : एक वाङमय प्रकार", यात वेगवेगळ्या कालखंडातल्या मराठीतल्या प्रवास वर्णनांची दखल घेतली आहे.

गुणेंखेरीज यात पंडिता रमाबाई, लो. टिळक, न. चिं केळकर, श्री. टिकेकर यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांची चिकित्सा आहे.

आमचा जगाचा प्रवास. पार्वतीबाई चिटणवीस. श्रीलंका, पेनांग, जपान असे पूर्वेकडून बोटीचा प्रवास करत अमेरिका गाठली. साल बहुधा १९१०. एक वर्षाची रजा घेऊन या रसिक जोडप्याने एकशे बारा वर्षांपूर्वी केलेला प्रवास.

https://archive.org/download/in.ernet.dli.2015.366173/2015.366173.Aamach...

Very interesting article with lot of useful information.

Very interesting article

या भागाशी सहमत आहे. परंतु,

with lot of useful information

व्याकरणदृष्ट्या, हे with a lot of useful information असे पाहिजे; परंतु, ते सोडून देऊ. (तसेही, आर्टिकले एक तर खाऊन टाकण्याची, किंवा the हे आर्टिकल वारंवार, नको तेथे घुसडण्याची, मराठी सवय सनातन आहे.) मात्र:

या सदरात मुबलक उपयुक्त माहिती तुम्हाला नक्की कोठे आढळली बुवा? मुंबईहून लंडनला सुएझमार्गे जहाजाने कसे जावे, ही? आजमितीस मुंबईहून लंडनला प्रवासी जहाजे जात असावीत, याबद्दल साशंक आहे.

नाही, म्हणजे, या सदरात भरपूर माहिती आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, ही माहिती १९६४च्या इसवीत कदाचित उपयुक्त असेलही, नसेलही; परंतु, यातील बहुतांश माहिती ही आजमितीस बहुधा dated (आणि म्हणूनच निरुपयोगी) ठरावी. (चूभूद्याघ्या.)

अर्थात, लिमयेसरांचा उद्देश (पु.लं.प्रमाणेच) प्रवासवर्णन लिहिण्याचा असावा; टूरिष्टखात्याचे गाइड लिहिण्याचा नव्हे. त्यामुळे, हा दोष आहे, असे निदान मी तरी म्हणणार नाही. (ही commentary आहे; जे पाहिले, अनुभवले, त्यावरची टिप्पणी आहे. उपयुक्त माहिती तर राहोच, परंतु, कोणत्याही प्रकारची माहिती देण्याचा यामागे उद्देश नसावा. (चूभूद्याघ्या.) विनाकारण तो उद्देश त्यांजवर का लादा?)

(Unless, तुम्ही 'निळे डोळे, आखूड पण दाट सोनेरी केशसंभार नि नितळ सोनकेळ्यासारखे पाय, त्वचेवर एक सुरकुती नाही की रंगाची छटा वेगळी नाही' तथा 'मादकपणा नसलेले soothing सौंदर्य' वगैरे 'माहिती'बद्दल बोलत असाल, तर. परंतु, ही माहितीसुद्धा dated असून, होतकरूंस आजमितीस अजिबात उपयोगाची नाही, असा दावा करण्याचे धाडस करू इच्छितो.)

अर्थात, अभिप्राय देताना 'भरपूर उपयुक्त माहितीने युक्त' वगैरे उगाच घुसडून देण्याची मराठी राष्ट्रीय प्रथादेखील पूर्वापार चालत आलेली आहेच. (मटीरियल एक तर वाचलेले नाही, अथवा वाचलेले मटीरियल डोक्यात अजिबात शिरलेले नाही (परंतु तरीही अभिप्राय देणे प्राप्त आहे), याचे हे द्योतक असावे काय? लिमयेसर हे (आता निवृत्त का होईना, परंतु) अनुभवी तथा निष्णात प्रोफेसर (अर्थात, शिक्षक!) असल्याकारणाने, कदाचित ते याबद्दल काही टिप्पणी करू शकतील. (चूभूद्याघ्या.))

बाकी चालू द्या.

--------------------

हे self-compulsion असू शकते.

आम्ही विद्यार्थिदशेत असताना या किंवा अशासारख्या डर्टीट्रिका नेहमीच वापरीत असल्याकारणाने, आम्हांस पक्के ठाऊक! ('प्रौढत्वी निजशैशवास जपणे', वगैरे...)

"उजवीकडे मला दिसत होता सौदी अरेबियाचा पांढरा गाऊन अन डावीकडे जवळपास नासरचा घुमणारा आवाज व लांबवर कांगोच्या लुमुंबाचे भूत!"

दूरवरच्या कॉंगो देशातील पहिल्या पंतप्रधानाचा, पॅट्रीस लुमुम्बाचा १९६१ साली खून झाला. ( भयानक पद्धतीने )

ही माहिती तुम्हाला कशी होती हे कुतुहूल . मराठी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये याची पुरेशी दखल घेतली गेली होती हे कारण की अजून काही कारण ?

लुमुंबाच्या मरणाची माहिती वर्तमानपत्रांतूनच कळली असणार.

लुमुंबाच्या मरणाची माहिती वर्तमानपत्रांतूनच कळली असणार. "असणार"? हे कसे काय? 'बातमी वाचली'. असे का नाहीं? म्हणजे बातमी जी कळाली ती कुणीतरी वाचून लेखकाला सांगितली आणि त्यांना कळाली "असणार" असे आहे काय? १९६१ साली झालेल्या खुनाची बातमी १९६४ पर्यंत लक्षात राहते आणि खून झालेल्या व्यक्तीचे भूत झालेले दिसते हे पचनी पडत नाही. मुळात भूत बीत असे काहीं नसते. हे भूत दिसणे म्हणजे भूतबाधा वगैरे अंधश्रद्धा गोष्टी आल्या. १९६४ साली परदेश गमन केलेल्या उच्चविद्याविभूषित लेखकाने ही वाक्ये टाळायला हवी होती. असो. बाकीचा मजकूर ठीक आहे.

१९६४ साली परदेश गमन केलेल्या उच्चविद्याविभूषित लेखकाने ही वाक्ये टाळायला हवी होती.

हाईऽऽऽऽऽऽऽऽल हिटलर!

बाकी चालू द्या.

लुमुंबाच्या मरणाची माहिती वर्तमानपत्रांतूनच कळली असणार. "असणार"? हे कसे काय? 'बातमी वाचली'. असे का नाहीं? म्हणजे बातमी जी कळाली ती कुणीतरी वाचून लेखकाला सांगितली आणि त्यांना कळाली "असणार" असे आहे काय? >>
अर्धशतकापूर्वी लिहिलेल्या पत्रातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आपल्याला कशी माहित पडली ते इतक्या वर्षांनी स्पष्टपणे आठवत असलेच पाहिजे ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. स्मृती अंधुक होणं वगैरे प्रकार गणितज्ज्ञांच्या बाबतीत संभवतच नाहीत.

मुळात भूत बीत असे काहीं नसते. हे भूत दिसणे म्हणजे भूतबाधा वगैरे अंधश्रद्धा गोष्टी आल्या. १९६४ साली परदेश गमन केलेल्या उच्चविद्याविभूषित लेखकाने ही वाक्ये टाळायला हवी होती.>>
शंभर टक्के सहमत. त्यांचं घर आपण उन्हात बांधूया. मुळात -१चं वर्गमूळ असे काही नसते. अश्या कल्पनाविलासाला imaginary number असे गोंडस नाव देऊन complex numbers वगैरे अंधश्रद्धांचे इमले बांधणारी ही गणितवाल्यांची जमात! त्यांच्याकडून कसली अपेक्षा ठेवायची?
मला तर दाट शंका आहे की त्या वाक्यात सांगितलेल्या गोष्टींपैकी एकही गोष्ट खरी नाही. "उजवीकडे मला दिसत होता सौदी अरेबियाचा पांढरा गाऊन अन डावीकडे जवळपास नासरचा घुमणारा आवाज व लांबवर कांगोच्या लुमुंबाचे भूत!"
तांबड्या समुद्राची कमीत कमी रुंदी पंधरा मैलांपेक्षा जास्त आहे. इतक्या अंतरावरून, बोटीतून सौदी अरेबियाच्या जमिनीवरच्या कोणी पांढरा गाऊन घातला आहे की पांढरी साडी नेसली आहे हे कसं दिसलं? की सौदी अरेबियाच्या भूमीलाच प्रचंड पांढरा गाऊन घालून आच्छादले होते? तसं असेल तर गिनीज बुकातली त्या गाऊनची नोंद दाखवा.
१९६४ साली नासरचं अद्याप भूत झालेलं नव्हतं तरी इतक्या मैलांवरून जमिनीवरून त्याचा (जिवंतपणीचा) आवाज बोटीपर्यंत कसा पोहोचला? आणि हा आवाज नासरचाच हे तुम्हाला तात्काळ कसं कळलं ? बरं त्या आवाजाने कुठले शब्द/वाक्यं उच्चारली होती हे सांगणं शिताफीने टाळलं आहे. थाप पकडली जाते ती अशी!
आपले वाचक मूर्ख आहेत ह्या भ्रमात राहून वाट्टेल त्या थापा मारू नका. सौदी अरेबियाचा गाऊन, नासरचा आवाज ह्यांचे पुरावे द्या. फोटो, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे का?

शंभर टक्के सहमत. त्यांचं घर आपण उन्हात बांधूया.

येस्स्स्स्स्स्स!!!!!!! Biggrin

वनराज, माझे काम तुम्ही उत्तमप्रकारे केले आहे. मला उत्तर लिहिण्याची गरजच नाही. फक्त एवढेच म्हणतो की १९६४ सालीं मी उच्चविद्याविभूषित नव्हतो; मात्र अद्वैत तत्त्वज्ञानाने भारावून गेलेला होतो.

काय मग, लिमयेसर, उन्हातल्या बांधकामाचे ग्राउंडब्रेकिंग कधी करायचे, म्हणताय? Wink

आदूबाळचं एक वाक्य - लहान था मय - आठवलं. ते तुमच्या संदर्भात आठवेल असं अजिबात वाटलं नव्हतं. म्हणून आणखी हसायला आलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गवि ह्यांनी म्हटले आहे की "आपले पत्र आणि लेख वाचून पुलंच्या अपूर्वाईइतकाच किंवा अधिक आनंद मिळाला". पटले.
एका वेगळ्याच जगाची मुशाफिरी स्वतःच करून आल्यासारखं वाटलं.
माझ्या माहितीप्रमाणे अपूर्वाई १९६० मध्ये प्रसिद्ध झाले. १९६४ साली हे पत्र /लेख लिहिण्यापूर्वी तुम्ही ते वाचले होते का? किंवा इतर कुठले प्रवासवर्णन वाचले होते का? तुमच्या शैलीवर कुणाचा प्रभाव असा जाणवत नाही. स्वतंत्र आणि सुंदर शैली आहे. केवळ एक उत्सुकता म्हणून प्रश्न.
बाकी लेखातून मला उपयुक्त माहिती मिळाली. जर तांबडा समुद्र, सुवेझ कालवा, भूमध्यसमुद्र येथे जायचा योग्य आला (ह्या भागात क्रूझ वगैरे बहुतेक बरेच असतील) तर तिथल्या पाण्याचे रंग हा लेख वाचल्यावर मी अधिक डोळसपणे बघून त्यातली गम्मत अधिक चांगली अनुभवू शकेन असे वाटते. धन्यवाद.

खूप दिवसांनी एवढे नितळ लेखन वाचता आले