मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (5)
मी होलोग्रामसदृश प्रतिमा असेन का?
आपल्या अवतीभोवती असलेल्या वस्तूंकडे नजर टाकल्यास समोरची भिंत, बसलेली खुर्ची, बाहेरचे झाड, तुम्ही स्वत: हे सर्व खरेखुरे असून त्या अस्तित्वात आहेत याबद्दल तुमच्या मनात अजिबात शंका असणार नाही. परंतु जगातील या गोष्टी, तुम्ही आम्ही सर्व, व हे जग एखाद्या होलोग्राम आकृतीप्रमाणे त्रिमितीतील प्रतिमा तर नाहीत ना? काही तरी विचित्र विधान असे वाटत असले तरी जगन्मिथ्या, हे जग मायावी आहे. असे आपले भारतीय तत्त्वज्ञ फार पूर्वीपासून सांगत आले आहेत, हे आपण विसरू शकत नाही. आपल्या सर्वसामान्य समजुतीलाच धक्का देणारे व आपल्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारे हे विधान असेल, यात शंका नाही.
भारतीय तत्त्वज्ञानाला काही काळ बाजूला ठेवले तरी 70च्या सुमारास स्टीफन हॉकिंग यांनी केलेल्या संशोधनातूनसुद्धा आपल्या अस्तित्वाविषयी संशय घेण्यास नक्कीच वाव आहे. त्यांच्या संशोधनानसार कृष्ण विवरातून वस्तुमानाचे हळूहळू विकीरण होऊ लागते. व हे विकीरण माहितीविरहित असते. जेव्हा ताऱ्याचे कृष्णविवरात रूपांतरण होते तेव्हा त्यातील माहितीचे काय होते हा प्रश्न वैज्ञानिकांना त्या काळी सतावत होता. वैज्ञानिकांच्या मते माहिती कधीच नष्ट होऊ शकत नाही.
नंतरच्या संशोधनात कृष्णविवरातील माहितीचा आशय कृष्णविवरात नष्ट पावलेल्या वस्तूच्या पृष्ठभागावर साचलेला असतो, हे लक्षात आले. तंतुसिद्धान्ताच्या (string theory) वैज्ञानिकांनी ही माहिती द्विमितीत कशी सामावते याचे स्पष्टीकरण दिले. व या माहितीसंग्रहाच्या मर्यादेवर भर दिला.
जरी येथे हा प्रश्न सुटल्यासारखा वाटत असला तरी काही शास्त्रज्ञांनी यात आणखी भर घातली. ताऱ्यांमधील त्रिमितीत असलेल्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील माहिती द्विमितीत खरोखरच रूपांतरित होत असल्यास हेच तत्त्व आपण संपूर्ण विश्वालाच लागू का करू नये? यावर शास्त्रज्ञ भर देऊ लागले. या विश्वाची लांबी सुमारे 4200 कोटी प्रकाशवर्षे आहे. महास्फोटानंतरच्या या कालावधीतील सुरुवातीचे प्रकाशकिरण अजूनही विश्वाच्या क्षितिजापर्यंत पोचले नसतील. त्यामुळे द्विमितीतील पृष्ठभाग त्रिमितीतील विश्वाचे संकेतीकरण (encoding) करत असतील. आपल्या क्रेडिट कार्डवरील होलोग्रामप्रमाणे संपूर्ण विश्वभर ही संकेतीकरणाची प्रक्रिया कार्यरत असावी, असे अंदाज वैज्ञानिक करू लागले.
हे अंदाज व त्यासंबंधीचे वैचारिक प्रयोग विचित्र वाटत असले तरी क्रेडिट कार्डवरील होलोग्रामप्रमाणे विश्व असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. भौतिकीतील सैद्धांतिक शास्त्रज्ञांना काळ-अवकाश हे सुद्धा संगणकांच्या स्क्रीनवरील आकृतीप्रमाणे आहेत, असे वाटते. द्विमितीत असलेला पृष्ठभाग त्रिमितीतील वस्तूंची माहिती संग्रहित करून सांकेतिक लिपीत पूर्णपणे साठवू शकत नाही म्हणून तिचा आकार थोडासा मोठा करून होलोग्राममध्ये वापरले जात असावे. होलोग्राफिक विश्व हे दुसरे तिसरे काही नसून त्रिमितीतील चित्रपटाप्रमाणे असेल. वरवरून बघितल्यास स्क्रीनवरील वस्तू गुळगुळीत, सपाट व लांबी-रुंदी-खोली असलेल्या त्रिमितीत आहेत असे वाटतात. परंतु स्क्रीनजवळ जाऊन बघितल्यास तेथे फक्त द्विमितीतील हजारो बिंदू दिसतील. आपल्या विश्वातील प्रत्येक वस्तू व त्यासंबंधातील घटना यासुद्धा स्क्रीनवर दाखवत असलेल्या एखाद्या त्रिमिति चित्रपटाप्रमाणे असूही शकतील, असे यावरून म्हणता येईल.
अजूनपर्यंत तरी होलोग्राफिक विश्व ही संकल्पना गृहीतकावस्थेतच आहे. काही विशिष्ट स्थितीत ही संकल्पना खरी वाटत असली तरी प्रत्यक्ष प्रयोग करून पुरावे शोधावे लागतील. सिद्धान्ताला बळकटी द्यावे लागेल. वैज्ञानिकांना मात्र पुरावे नक्कीच सापडतील यावर विश्वास आहे.
खरोखरच यासंबंधीची पुरावे सापडल्यास आतापर्यंत आपण सिद्ध करून स्वीकारलेल्या सर्व गोष्टींना आह्वान दिल्यासारखे होईल. जे आपल्या समोर दिसत आहे ती प्रतिमा असून हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या कुठल्या तरी वस्तूवर प्रकाश किरणांचा मारा करून त्यांचे टेलीकास्टिंग केल्यामुळे विश्वाच्या पृष्ठभागावर त्या दिसत आहेत, हे पचनी पडण्यास कठिण आहे. अजूनपर्यंत हे किरण (वा किरणसदृश काही तरी) कुठून येत आहेत व या जगातील वस्तू त्रिमितीत कसे काय दिसू शकतात हे गूढ वाटत असले तरी आपण 3D चित्रपट नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण या होलोग्राफिक विश्व-सिद्धान्तालाही नाकारू शकत नाही.
कदाचित आपल्या आयुष्यात यामुळे काही फरक पडत नसला तरी ‘जगन्मिथ्या’ हा प्रकारच अंगावर शहारे आणणारा असेल!
क्रमशः
या पूर्वीचे
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1)
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (2)
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (3)
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (4)
प्रतिक्रिया
जगजितसिंग्
जगजितसिंग यांच्या गझल्स ऐकताना, लोकांना आपल्या चार पाच प्रेयसींची आठवण येऊन रडु येते आणि गझल संपल्यावर, आपल्याला कोणी प्रेयसीच नव्हत्या हे वास्तव ध्यानात येऊन पुन्हा रडु येते असा जो विनोद कायप्पावर फिरतो आहे त्यांत तथ्य आहे म्हणायचे.
. (काही 'विचारप्रयोग')
'टिनटिन' मालिकेतील (बहुधा 'लँड ऑफ ब्लॅक गोल्ड'मधील; चूभूद्याघ्या.) एक (म्हटले तर काहीसा culturally insensitive) प्रसंग या निमित्ताने आठवला.
आमचे थॉम्(प)सनद्वय वाळवंटात वाट चुकलेले असतात. फिरूनफिरून त्याच वाटेने परतपरत जात असतात. प्रचंड तहान लागलेली असते, त्यात तीनचार दिवस झोप नसते. त्यात पुन्हा 'इथे वाळवंटात मृगजळे असतात, जपून राहिले पाहिजे' अशी उपरती दोघांपैकी एकाला होते. मग काय, काहीही दिसले, तरी त्याला तो 'मृगजळ' मानू लागतो.
वाटेत एके ठिकाणी दोन अरब वाळवंटात नमाज पढत असतात. उपरती झालेला आमचा थॉ. दुसऱ्या थॉ.ला म्हणतो कसा, की नाही म्हणे, ते मृगजळ आहे! आणि मी तुला ते सिद्ध करून दाखवतो. म्हणून जातो तरातरा चालत आणि त्या नमाजमग्न अरबांपैकी एकाच्या उत्तान ढुंगणावर एक सणसणीत लाथ ठेवून देतो.
दुर्दैवाने, तो अरब 'मृगजळ' असण्याबद्दल आमच्या थॉ.त नि त्या अरबात मतभेद असतात.
सांगण्याचा मतलब, प्रभाकर नानावटी हे जर होलोग्रामसदृश प्रतिमा असतील, तर मग 'न'वी बाजूंनी (किंवा आणखी कोणीतरी, किंवा 'न'वी बाजू नावाच्या होलोग्रामसदृश प्रतिमेने नाहीतर 'आणखी कोणीतरी' नावाच्या होलोग्रामसदृश प्रतिमेने म्हणा, हवे तर.) प्रभाकर नानावटी या होलोग्रामसदृश प्रतिमेच्या पेकाटात एक सणसणीत लाथ घातल्याने निदान प्रभाकर नानावटी या होलोग्रामसदृश प्रतिमेस तरी काही फरक पडू नये, नाही काय? (काय होईल, फार फार तर? लाथ आरपार जाईल, आणखी काय होईल?)
प्रभाकर नानावटी हे कदाचित होलोग्रामसदृश प्रतिमा नसू शकतील, एवढे दाखवून देण्यास, मला वाटते, एवढासा 'विचारप्रयोग' पुरेसा नसावा काय?
---
हे विश्व जर होलोग्रामसदृश प्रतिमांचा समुच्चय असेल, तर यांपैकी प्रत्येक प्रतिमा ही पोकळ असली पाहिजे. (प्रतिमेच्या आत काही असण्याची गरजही नाही एक तर, आणि, दुसरे म्हणजे, प्रतिमा प्रोजेक्ट करणारा प्रोजेक्टर१ हा प्रतिमेबाहेर आहे, हे लक्षात घेता, त्या प्रतिमांच्या 'आतल्या' गोष्टींचे तपशील प्रोजेक्ट करणे हे अशक्य होऊन बसेल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.))
आता, समजा, प्रभाकर नानावटी हे अशी एखादी होलोग्रामसदृश प्रतिमा जर असले, तर त्यांच्या कवटीसदृश हे जे काही दिसते आहे, ते पोकळ आहे, असे मानणे सयुक्तिक ठरेल काय?
---
इत्यलम्|
--------------------------------------------------
१ हा प्रोजेक्टर खुद्द होलोग्रामसदृश प्रतिमा असेल वा नसेल याच्या तपशिलात तूर्तास नको शिरू या.
विषय विज्ञान विषयी आहे
सामान्य लोकांना थोडे तरी समजावे म्हणून विज्ञन विषयी लेख सामान्य लोकांना समजेल अशी उदाहरणे देवून लिहिले जातात.
लेखक काही संशोधक नाही त्यांनी फक्त भाषांतर केले आहे.
न वी बाजू ह्यांनी उपस्थिती केलेले प्रश्न हास्यास्पद आहेत..
भाषांतर करून लेखकाने हा लेख लिहिला आहे आणि सामान्य लोकांना समजावे म्हणून तशी उदाहरणे दिली आहेत.
ओरिजनल कॉन्सेप्ट विज्ञान च्या भाषेत लिहिली तर .
0.1% लोकांना पण समजणार नाही.