मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (3)

आपण (बुद्धिमान सजीव) या विश्वात एकटेच आहोत का?

निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदीप्यमान, विस्मयकारक ठिणग्यांमधूनच – ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच – आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा.

आपले अंतर्मन मात्र या विश्वात आपण एकटे नाही असे सांगत असते. कुठल्याही इतर साधनांच्या मदतीशिवाय आपण सुमारे 2000 तारे बघू शकतो. आपल्या दीर्घिकेत सुमारे 5 कोटी तारे असण्याचा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ब्रह्मांडात सुमारे 1000 कोटी सौरमाला असाव्यात. त्यामुळे अंतरिक्षात भ्रमण करत असलेल्या असंख्य ताऱ्यांपैकी आपलाही एक तारा असे म्हणता येईल. त्यामुळे आपल्यासारख्या सजीवांची वस्ती असलेला (व कदाचित आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान असलेल्या सजीवांचे अस्तित्व असलेला) एखादा तारा कुठेतरी अंतराळात भ्रमण करत असावा. परंतु आपण आजतरी याबद्दल निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही.

फ्रँक ड्रेक या शास्त्रज्ञाने याविषयी गणितीय सूत्रस्वरूपात काही मांडणी केली होती. त्याच्या समीकरणावरून ताऱ्यांची रचना, तारकापुंजाचे भाग असलेले ग्रह – उपग्रह, ग्रहावरील सजीव प्राणी, सजीव प्राण्यातील बुद्धिमत्ता व या बुद्धिमान प्राण्याची इतरांशी संवाद करण्याची क्षमता इत्यादींचा अंदाज करता येतो. या समीकरणांची आकडेमोड करण्यासाठी काही घटकांचा आपण नक्कीच अंदाज करू शकतो. उदाहरणार्थ, आकाशगंगेत दरवर्षी 20 ताऱ्यांचा ‘जन्म’ होतो. आपण, सूर्याप्रमाणे स्वतःभोवती ग्रह – उपग्रहांचे कुटुंब घेऊन फिरणाऱ्या आणखी 560 ताऱ्यांचा वेध घेतला आहे. त्यातील 25 टक्के ताऱ्यांच्या भोवती पृथ्वीएवढेच वजन असलेले ग्रह आहेत. ही माहिती जीवोत्पत्तीनंतर तग धरून राहण्याच्या त्यांच्या क्षमतेचा अंदाज घेण्यास उपयुक्त असली तरी एवढ्यावरून जैविक घटकांचा मुळात तेथे जीवोत्पत्ती कशी झाली याचा अंदाज करणे शक्य होणार नाही.

काही तज्ज्ञांच्या मते कुठल्याही ग्रहावर जीवोत्पत्ती होऊ शकते. परंतु इतर काहींच्या मते, ग्रहावर साधे जीव असले तरी त्यांच्यात बुद्धिमत्तेचा अंश असणे फारच अपवादात्मक परिस्थितीत शक्य होईल. पॉल डेव्हिस या तज्ज्ञाच्या मते जीवोत्पत्ती इतक्या सुलभ रीतीने होणे मुळातच अत्यंत कठीण गोष्ट असून याबाबतीत आपण अजूनही अंधारात चाचपडत आहोत.

समीकरणाचा विचार बाजूला ठेवून याविषयी काही पुरावे आहेत का याचाही शोध घेता येईल. आपल्याच सौरमालेतील मंगळ ग्रहावरील सजीवांचे अस्तित्व या कामी आपल्याला मदत करू शकणार नाही. कारण त्या ग्रहावरील आणि आपल्या पृथ्वीवरचे सजीव यांच्यात, तसेच पृथ्वी व मंगळ ग्रहावरील वातावरणात खूप सारखेपणा आहे. यावरून मंगळ व पृथ्वीवरील सूक्ष्मजीवांची केव्हातरी अदलाबदल झालेली असावी, असे म्हणता येईल. परंतु तो काही पुरावा होऊ शकत नाही. शनी ग्रहाच्या टायटन (Titan) उपग्रहावर रासायनिक प्रक्रियेतून जीवोत्पत्ती झाल्याचे पुरावे सापडल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. सौरमालेतील ग्रह – उपग्रहांपैकी याच उपग्रहाच्या पृष्ठभागावर काही संयुजे व गोठविलेल्या द्रवाचे अंश सापडले आहेत. या उपग्रहावर खरोखरच जीव असल्यास ते आपल्यापेक्षा भिन्न असावेत. गुरु ग्रहाच्या युरोपा या उपग्रहाच्या पृष्ठभागाच्या खाली हिममय समुद्र असून तेथेही जीव असण्याची शक्यता वर्तवली जाते.

सौरमालेत सूक्ष्म जीव असणे, हे या विश्वात आपण एकटेच नाही याचा पुरावा ठरू शकेल. परंतु आपल्याला बुद्धिमान सजीवाची अपेक्षा आहे. गेली 50 वर्षे रेडियो टेलिस्कोपद्वारे आपण या बुद्धिमान प्राण्याचा शोध घेत आहोत. परंतु आजपर्यंत आपल्या पदरी निराशाच आली आहे. याचा अर्थ असा नव्हे की परग्रहावर जीवच नाहीत. फक्त आपण येथे आहोत, हे त्यांना माहीत नसावे. फार तर आपल्या रेडिओ लहरी किंवा आपल्या शहरातील प्रखर दिव्यांची प्रकाश किरणे त्यांच्यापर्यंत पोचत नसावीत, असे म्हणता येईल. किंवा पोचली तरी त्यातून त्यांना काही अर्थबोध होत नसावा. 1945 च्या सुमारास सुरू झालेल्या SETI (Search for Extra Terrestrial Intelligence) प्रकल्पाच्या प्रयत्नातून पाठविलेल्या प्रखर रेडिओ ध्वनिलहरी जास्तीत जास्त 70 प्रकाशवर्षाएवढ्या लांब गेल्या असतील. हे अंतर आपल्या या विश्वाच्या अफाट लांबी – रुंदीच्या तुलनेत नगण्य ठरू शकेल. या विश्वाचा विस्तार मुंबई महानगराएवढा असल्यास या रेडिओ लहरी फार फार तर आता व्हीटी स्टेशन ते बाहेरच्या फुटपाथपर्यंत पोचल्या असाव्यात, असे म्हणता येईल. त्यामुळे आपल्या विश्वातील परग्रहवासीयांना संदेश पोचण्यासाठीच्या वा त्यांचा प्रतिसाद आपल्यापर्यंत पोचण्यासाठीच्या प्रयत्नांना अजून फार मोठा पल्ला गाठावयाचा आहे.

दुसरे असे की आपल्याच सौरमालेत बुद्धिमान सजीव कुठल्या तरी ग्रह – उपग्रहावर असले तरी या पृथ्वीवर होमोसेपियन्स असतील याचा त्यांना पत्ता नसावा, असाही निष्कर्ष काढता येईल. विश्वाचा भव्य विस्तार आणि त्या प्रमाणात प्रकाशकिरणांचा वेग यामुळे बहुतेक तारे व ग्रह ‘out of range असू शकतील; किंवा एके काळी त्या ग्रहावर बुद्धिमान सजीव असावेत व ते आता नाहीत असेही म्हणता येईल. आपल्याच पृथ्वीच्या उदाहरणावरून पृथ्वीच्या 450 कोटी वर्षाच्या अस्तित्वापुढे आपला हा बुद्धिमान प्राणी केवळ 50 – 60 हजार वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे परग्रहावरील जीवसृष्टी असण्याची शक्यता व त्यांचा आपल्याशी संपर्क याबद्दल फार आशावादी असून चालणार नाही, असे तज्ञांचे मत आहे.

समजा, भविष्यात केव्हा तरी आपण त्यांच्याशी (किंवा त्यांनी आपल्याशी) संपर्क साधला, तर आपली त्यावर काय प्रतिक्रिया असू शकेल? फार फार तर NASA सारख्या संशोधन संस्था किंवा पृथ्वीवरील काही संघटित धर्मसंस्था त्यांचा स्वीकारही करतील. परंतु या गोष्टी प्रत्यक्ष घडल्याशिवाय आपण त्यावर काही टीका टिप्पणी करू शकणार नाही. कदाचित आपल्याला परजीवसृष्टीचा शोधही लागणार नाही. त्यामुळे फक्त आपल्याच पृथ्वीवर बुद्धिमान सजीव आहेत यावर समाधान मानत (परंतु मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती परजीवसृष्टी आहे असा संशय घेत) आपले अस्तित्व संपुष्टात येईल.

ही अनिश्चितता आपल्या सोबत आयुष्यभर कायमचीच राहणार हे मात्र निश्चित!

क्रमशः
या पूर्वीचे
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1)
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (2)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गोल्डीलॉक्स झोन आणि प्रख्यात शास्त्रज्ञ फर्मी यांचे उल्लेख असायला पाहिजे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0