ऐसीच्या दिवाळी अंकांबद्दल
सुप्रिया देवस्थळी यांचा लेख दिवाळी अंकात प्रकाशित झालेला सगळ्यांत शेवटचा लेख. पहिला लेख प्रकाशित झाल्यानंतर १०+ दिवसांनी हा लेख प्रकाशित झाला. आणि तरीही चौथा हिट – सर्वाधिक वाचनं असलेला – लेख हा आहे.
सुप्रिया देवस्थळी यांच्याकडेच चौकशी केली तर समजलं की हा लेख सनदी अधिकाऱ्यांच्या अनेक गटांमध्ये फिरला. एरवी ज्यांना ‘ऐसी’ माहीतही नव्हतं त्यांच्यापर्यंतही दिवाळी अंक पोहोचला. अंकाचा विषय ‘समाजमाध्यमं’ असाच असताना, समाजमाध्यमांचं हे अंग ‘मेटा’ आहे, असं म्हणताना ही कोटी करायची नव्हती, तरी ती टाळता येईना!
सध्याची लोकप्रियता
या वर्षी, अंकाची सगळे लेख मिळून सध्या, प्रकाशन सुरू झाल्यापासून १७ दिवस झालेले असताना, एकूण वाचनं २५ हजारपेक्षाही जास्त आहेत. म्हणजे सरासरी वाचनं = ६५०+, मिडियन ५४४.
गुरगाव फाईल्स सगळ्यांत लोकप्रिय आहे - १७०५ वाचनं
यात फेसबुकचा वाटा किती, याचा थोडा अंदाज ऐसीच्या पानावरून आला. ऐसीच्या फेसबुक पानावरच्या लिंका सात हजार लोकांपर्यंत पोहोचल्या; (त्या सगळ्यांनी लेख वाचले असं मानलं तर) २/३पेक्षा अधिक वाचनं फेसबुक-बाह्य ठिकाणांहून आली. या सात हजारांत सगळ्यांत लोकप्रिय आहे ती अमित वर्माची मुलाखत.
दिवाळी अंकाच्या वाचकवर्गाबद्दल
फेसबुकनुसार, ऐसीच्या पानावर येणारे अनेक लोक पुण्या-मुंबईतले आणि त्या आजूबाजूच्या भागांतले आहेतच; शिवाय मराठवाडा, विदर्भ, आणि महाराष्ट्राबाहेरचेही आहेत. ऐसीचा वाचकवर्ग बाकी देशांच्या तुलनेत भारतात (अर्थातच) सगळ्यांत मोठा आहे. त्याशिवाय अमेरिका (पुन्हा अर्थातच), यूके, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, यूएई, बांग्लादेश आणि सौदी अरेबियातूनही ऐसीचा दिवाळी अंक वाचला गेला आहे. ऐसी वाचकांमध्ये २५-३४ हा वयोगट सगळ्यांत मोठा आहे, त्या खालोखाल ३५-४४ वर्षांचा वयोगट आहे. १८-२४ आणि ६५+ वयाच्या लोकांमध्येही ऐसीचा दिवाळी अंक बऱ्यापैकी पोहोचला आहे.
टिकाऊपणा
लेख लिहितेवेळी दिवाळी अंकातल्या सगळ्या लेखांची मिळून २५ हजारपेक्षा जास्त वाचनं झाली आहेत. कमीत कमी वाचनं झालेला लेखही २००+ वेळा वाचला गेला आहे. तुलना म्हणून मराठी पुस्तकांची एक आवृत्ती ३०० ते ५०० प्रतींची असते. ऑन डिमांड, मागणीनुसार छापली जाणारी पुस्तकं आणखी कमी छापली जातात आणि हिट लेखकांच्या पुस्तकांच्या एका आवृत्तीत १००० प्रती निघतात. दिवाळी अंकांच्याही ५००-१००० अशा प्रती निघतात; मॅजेस्टिक संचाच्या वगैरे आणखी जास्त छापल्या जातात.
छापील दिवाळी अंक नवीन वर्षं सुरू होईस्तोवर बऱ्यापैकी मागे पडलेले असतात. तुलनेसाठी गेल्या पाच दिवाळी अंकांच्या वाचनाचे आकडे बघू. हा आकडा दरवर्षी वाढतच जातो. खालचा आलेख पाहा.

दिवाळी अंकांची वाढती वाचनसंख्या
२०२०च्या दिवाळी अंकाच्या सगळ्या धाग्यांची मिळून २ लाखांहून अधिक वाचनं झाली आहेत. कमीत कमी वाचला गेलेला धागाही दोन हजारांहून अधिक वेळा वाचला गेला आहे.
पण लेखनाच्या गुणवत्तेचं काय?
याच वर्षीच्या दिवाळी अंकात प्रसाद शिरगांवकरांनी दोन मुद्दे उपस्थित केले आहेत –
"तुम्ही सोशल मीडियावर जे काही लिहिता त्याला साहित्यबिहित्य म्हणतात हे फारच थोर आहे!" अशा आशयाचा शेरा पारंपरिक साहित्य वर्तुळात वावरणाऱ्या अनेकांकडून मी गेली अनेक वर्षे अनेकदा ऐकला आहे. मराठीतला पहिला डिजिटल दिवाळी अंक प्रकाशित होऊन २५ वर्षं झाल्यानंतरही, आणि ह्या पंचवीस वर्षांच्या काळामध्ये अनेक डिजिटल दिवाळी अंक, हजारो ब्लॉग्स, शेकडो वेबसाइट्स आणि असंख्य ई-बुक्स, पॉडकास्ट आणि मराठी युट्युब चॅनल्स आल्यानंतरही, पारंपरिक साहित्य क्षेत्रांमधली मंडळी डिजिटल पद्धतीने किंवा डिजिटल माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याला साहित्य वगैरे मानायला तयार नाहीत! अर्थात, कोणीही मान्यता देण्यासाठी डिजिटल साहित्यनिर्मिती कधी थांबली नव्हती आणि कोणी मान्यता न दिल्याने ती बंदही होणार नाही."
"आठ-दहा हजार वर्षांच्या ज्ञात नागरी मानवी इतिहासात 'छापील माध्यमांमधलं साहित्य' ही केवळ दोन-तीनशे वर्षांची एक छोटीशी संक्रमणाची अवस्था होती कदाचित. छापील युगाआधी साहित्य मौखिक आणि performing arts स्वरूपाचं होतं."
ऐसीच्या अंकांत, आणि नेहमी ऐसीवर लिहिणाऱ्यांतले आदूबाळ, देवदत्त, सई केसकर, नंदन, ३_१४ विक्षिप्त अदिती, हे लोक आंतरजालावर आधी लिहायला लागले; आणि आता त्यांचं लेखन (अ)नियमितपणे छापील माध्यमांमध्ये दिसतं. मराठी संकेतस्थळांवर लिहिते झालेले लोक बाहेरच्या जगाचं लक्ष वेधून घेतायत आणि त्यामुळे ते छापील माध्यमांतही लिहिते होतायत.
पुढे काय?
इंटरनेटसारख्या माध्यमांवर दीर्घ लिखाण होत नाही; लोक झटपट रीळ बघण्याच्या आहारी गेले आहेत; हल्ली लोकांचा वाचनाचा दमसास कमी झाला आहे; मराठी भाषेत लिहायचा आणि वाचायचा लोक कंटाळा करतात – अशा अनेक तक्रारी सतत ऐकायला मिळतात. ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर अजूनही दीर्घ लिखाण केलं जातं. ते छापील नसल्यानं पटकन फोनमधून फिरवता येतं आणि विनामूल्य वाचता येतं. या वर्षी समाजमाध्यमांच्या निमित्तानं आम्ही दीर्घ लेखन, चित्रफिती, आणि जनरेटिव्ह एआयनं केलेलं लेखन आणि चित्रकला ही सगळी माध्यमं एकाच ठिकाणी एकत्र आणून लोकांना या सगळ्याच गोष्टी एकावेळी बघण्याची संधी दिली. याचं कारण, लोकांनी न कंटाळता नवीन नवीन विषयांवर वाचन करत राहावं हीच ऐसीची तळमळ आहे.
आम्हांला यातून जाहिराती किंवा कोणत्याच माध्यमातून कोणत्याच प्रकारची अर्थप्राप्ती होत नाही. आम्ही लेखकांना मानधन मात्र देतो. म्हणजे हा आतबट्ट्याचाच व्यवहार आहे. आणि आम्ही तो केवळ आमच्या हौसेपोटी करत आलो आहोत.
ऐसी अक्षरे दिवाळी अंकाचं हे तेरावं वर्ष. अंकाला दर वर्षी येत राहिलेल्या अशा भरघोस प्रतिसादामुळे आम्हांला असे आणखी प्रयोग करण्याचा हुरूप येत असतो. त्यासाठी जगभरातल्या आमच्या हजारो वाचकांचे अनेक आभार!
माहितीमधल्या टर्म्स
सॉरी… (“ज्येना ब्रँड” उसासा/रँट)
ऑनलाईन, अछापील लेखन हाच वर्तमानकाळ आणि भविष्य आहे. कोणीही उगीच "हल्ली, आजकाल" वगैरे शब्द वापरून टिपिकल "ज्येना ब्रँड" उसासे टाकत असतील तर त्यांनी हे सत्य लवकर स्वीकारणे बरे.
ऑनलाइन विरुद्ध छापील हा मुळात मुद्दाच नाही. किंबहुना, “हल्ली”, “आजकाल” जे छापील दिवाळी अंक निघतात, तेच अनेकदा सुमार असतात; नवसाक्षरांनी नवसाक्षरांकरिता काढल्यासारखे वाटतात. (“आमच्या वेळेला” जे छापील दिवाळी अंक निघत, तेदेखील फार दर्जेदार असतच, अशातला भाग नाही, परंतु तरीसुद्धा, गेला बाजार माफक मनोरंजक तरी असत. अगदीच काही नाही, तरी त्यांतल्या व्यंगचित्रांकडे पाहून हसावेसे तरी वाटे; आजकालची छापील दिवाळी अंकांतली व्यंगचित्रे पाहून अनेकदा अंगावरून झुरळ गेल्यासारखे वाटते, आणि कथा वगैरे वाचून मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता वाटू लागते.)
शिवाय, त्यातल्या त्यात “प्रस्थापित” जे छापील अंक असतात, त्यांत जाहिरातींचाच भरणा अधिक असतो. (अर्थात, त्यांचा नाइलाज असू शकेल म्हणा यात!) लेख शोधूनशोधून गाळूनगाळून वाचावे लागतात, मग ते डोळ्यांतही भरत नाहीत नि मनातही भरत नाहीत, मनात भरेपर्यंत वाचण्याचा उत्साह जातो, आणि एवढे करून चुकून वाचलेच, आणि मजकूर जर सुमार निघाला, तर आणखीनच पचका होतो. (ऑनलाइन अंकांपैकी निदान हौशी अंकांमध्ये तरी हा (जाहिरातींचा) उच्छाद अद्याप नाही.)
त्या मानाने, दर्जेदार, वाचनीय लिखाण (विशेषेकरून ‘नेहमीच्या यशस्वी’ लेखकांचे) ऑनलाइन दिवाळी अंकांतून सापडण्याची शक्यता “आजकाल”, “हल्ली” तुलनेने खूपच अधिक!
सांगण्याचा मतलब, “छापील दिवाळी अंक” हा बेंचमार्क खचितच नव्हे. आणि, “छापील विरुद्ध ऑनलाइन” हा तुलनेचा (नि तज्जन्य उसाशांचा) निकष होऊ शकत नाही.
बाकी, “अछापील, ऑनलाइन लेखन हेच भवितव्य आहे” वगैरे दाव्यांबद्दल इतकेच म्हणता येईल, की, शक्य आहे, आणि तसे झाल्यास त्यात आश्चर्यकारक आणि/किंवा वावगे असे काहीच नाही. काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर माध्यमे बदलणे स्वाभाविक आहे, आणि, दोन्ही माध्यमांची आपापली वेगवेगळी डायनॅमिक्स आहेत; कदाचित, दोन्ही माध्यमे बाजूबाजूला नांदतीलही, किंवा कदाचित ऑनलाइन माध्यम छापील माध्यमाला मागे टाकेल. (काहीही झाले, तरी ऑनलाइन माध्यम यापुढे कोठेही जात नाही, It is here to stay, याबद्दल दुमत नाही.) मात्र, हा निव्वळ तांत्रिक मामला झाला, बरेवाईटपणाचा निकष नव्हे.
(तूर्तास इतकेच. अधिक जमल्यास पुन्हा केव्हातरी.)
ऑनलाइन विरुद्ध छापील हा मुळात
ऑनलाइन विरुद्ध छापील हा मुळात मुद्दाच नाही.
तो मुद्दा आहे. छापील आणि ऑनलाईन यांच्यात बाय डिझाईन असा फरक आहे की ऑनलाईन प्रकाशन हे अधिक व्यापक आणि स्वतंत्र लिहिण्याची थेट संधी प्रत्येकाला देते आणि बरे वाईट मानणे वाचकांवर सोडते. छापीलमधले अनेक एजंट यात कमी होतात, किंवा नाहीसेच होतात.
त्यामुळे ऑनलाईन लेखन आणि वाचन हेच भविष्य आहे. वावगे असण्याचा प्रश्नच नाही. आणि दावाही नाही.
उलट ते उत्तम होते आहे. मी ९९ टक्के ई फॉरमॅट मधील लेखनच वाचतो. कागदी पुस्तक किंवा वर्तमानपत्र घेऊन अनेक वर्षे झाली.
उसासे टाकणारे अनेक जण जणू छापील होते म्हणून चांगले होते असे टिपिकल टीका करताना दिसतात. हल्ली आजकाल या शब्दांशी काही वैर नसून त्याला चिकटून काहीतरी तक्रार येण्याबद्दल नावड आहे.
…
तो मुद्दा आहे. छापील आणि ऑनलाईन यांच्यात बाय डिझाईन असा फरक आहे की ऑनलाईन प्रकाशन हे अधिक व्यापक आणि स्वतंत्र लिहिण्याची थेट संधी प्रत्येकाला देते आणि बरे वाईट मानणे वाचकांवर सोडते. छापीलमधले अनेक एजंट यात कमी होतात, किंवा नाहीसेच होतात.
“दोन्ही माध्यमांची आपापली डायनॅमिक्स आहेत” अशा अर्थाचे जे विधान मी केले, त्यात निदान अंशतः तरी हाच रोख होता.
परंतु, हा तांत्रिक मुद्दा झाला. (आणि, त्यामुळे उद्या ऑनलाइन माध्यमाने कदाचित छापील माध्यमाला जर मागे टाकले, तर आश्चर्य वाटायला नको, हे ठीकच.) मात्र, (दोन्ही) माध्यमांतील मजकुरांचा बरेवाईटपणा मोजण्याचा हा मानदंड ठरू नये, नव्हे काय?
(सांगण्याचा मतलब, छापील माध्यमांतील लिखाण हे ज्याप्रमाणे चांगले किंवा भिकार कसेही असू शकते, त्याचप्रमाणे, ऑनलाइन माध्यमांतील लिखाण हेसुद्धा चांगले किंवा भिकार कसेही असू शकते. माध्यम आणि दर्जा यांचा अर्थाअर्थी, थेट संबंध नसावा. सबब, कोठल्याही एका माध्यमाच्या नावाने उसासे टाकण्यात मतलब नाही, इतकेच म्हणायचे होते.)
——————————
छापील आणि ऑनलाईन यांच्यात बाय डिझाईन असा फरक आहे की ऑनलाईन प्रकाशन हे अधिक व्यापक आणि स्वतंत्र लिहिण्याची थेट संधी प्रत्येकाला देते
हे ऑनलाइन माध्यमांतील सामान्य लिखाणाबद्दल झाले. ऑनलाइन दिवाळी अंकातील लिखाणाची गोष्ट किंचित वेगळी असावी, नव्हे काय?
ऑनलाइन दिवाळी अंकातील लिखाण हे (छापील दिवाळी अंकांप्रमाणेच) मागविलेले असते, आणि (पुन्हा, छापील दिवाळी अंकांप्रमाणेच) त्यावर संपादकीय संस्कार झालेले असतात, अशी माझी समजूत होती.
अगदी.. आदूबाळची कथा हा मेन
अगदी.. आदूबाळची कथा हा मेन कोर्सचा आणखी एक मुख्य भाग. त्याची वाट पाहतो. पूर्वी छापील दिवाळी अंक आला की त्यात आपल्याला हवी ती नावे, उदा अवचट वगैरे आहेत ना हे आधी बघितलं जायचं. तसंच. अर्थात ऐसी अंक हळूहळू प्रकाशित होत असल्याने कधी कधी वाट बघावी लागते.
इतरही लेखक अर्थातच उत्तम..
वरून नबा यांच्या टिपण्या म्हणजे चटकदार मिरचीचे लोणचे. यातील काहीही नसेल तर अपूर्ण वाटेल.
कुतूहल (काहीसे अवांतर)
ऐसीचा वाचकवर्ग बाकी देशांच्या तुलनेत भारतात (अर्थातच) सगळ्यांत मोठा आहे. त्याशिवाय अमेरिका (पुन्हा अर्थातच), यूके, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, यूएई, बांग्लादेश आणि सौदी अरेबियातूनही ऐसीचा दिवाळी अंक वाचला गेला आहे.
हे समजण्यासारखे आहे, कारण या देशांमध्ये मराठीभाषक स्थलांतरितांची संख्या बऱ्यापैकी आहे. (पहिली पिढी, अर्थात; दुसऱ्या पिढीपासून पुढे दिवाळी अंक हा प्रकार कितपत वाचीत असतील, याबद्दल साशंक आहे. मात्र, येथे तो मुद्दा नाही.)
कुतूहल असे आहे, की इस्राएलमध्ये मराठीभाषक ज्यू समाजाची संख्या बऱ्यापैकी आहे, असे ऐकून आहे. Any hits?
कुतूहल #२
ऐसी वाचकांमध्ये २५-३४ हा वयोगट सगळ्यांत मोठा आहे, त्या खालोखाल ३५-४४ वर्षांचा वयोगट आहे. १८-२४ आणि ६५+ वयाच्या लोकांमध्येही ऐसीचा दिवाळी अंक बऱ्यापैकी पोहोचला आहे.
ही माहिती कशी मिळवलीत? (अंक कोठूनकोठून वाचला गेला, ही माहिती IP/Location tracking वापरून मिळवता येते, हे समजू शकतो. ती नेहमी अचूक असेलच, असे नाही, परंतु येथे तो मुद्दा नाही. मात्र, Demographic information कशी मिळू शकते? Also, does that imply any privacy/ethical concerns? (हा अर्थात पुढचा प्रश्न झाला.))
नाही...
आयपीवरून भौगोलिक माहिती (फार तर) समजेल. VPN वापरणारे लोक असतील तर ती माहितीही फार विश्वासार्ह नसेल. पण वयोगट समजणार नाही.
त्या तुलनेत गूगल, मेटा वगैरे मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांकडे आपली बरीच जास्त माहिती असते. बरा अर्धा जेव्हा (अमेरिकी हिशोबात) बुटक्या पुरुषांसाठी कपडे शोधतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी फेसबुक माझ्याकडे त्याची 'चुगली' करतं. या अंकातच विजय घासकडवीची मुलाखत आहे; तो त्याबद्दल तपशिलात बोलला आहे.
एक तर ऐसी चालवून पैसे मिळवण्याची कुणाचीही इच्छा नाही. वाचकांना आणि आम्हांलाही काही नवनवीन विषयांवर वाचायला मिळावं हा हेतू आहे. त्यामुळे आयपी अड्रेस (बहुतेक) डेटाबेसात जात असले तरी ते बघण्याचा, किंवा ते वापरून काही माहिती शोधण्याचा विचार करत नाही.
.
ग्राफ मध्ये एक्स ॲक्सिस वर वर्षे उलटी आलीत. त्यामुळे लेख न वाचता निव्वळ ग्राफ पाहून वाचनसंख्या घटली आहे असे वाटेल एखाद्याला.
वाचन संख्या हा निकष आपल्यापरीने ठिक. पण रोजचे ॲक्टीव्ह युजर्स (दररोज येणारे नियमित वाचक) माझ्या मते फार फार तर ५०-१०० पेक्षा जास्त नसावेत. नियमित वाचकाच्या व्याख्येत थोडी लवचिकता दाखवली (दर दिवसाला वि. दर आठवड्याला वि. दर महिन्याला) आणि दिवाळी वा इतर विशेषांकासाठी अधनं मधनं येणारे वाचक (इतर प्लॅटफॉर्म वरून लिंक वापरून) धरले तर ती संख्या नक्कीच जास्त असेल तरीही वर्षाकाठी २०००-३००० च्या आतच असावी. गुगल ॲनालिटिक्सवर ते आकडे कळतीलच.
काडेचिराईतपणा?
त्यामुळे लेख न वाचता निव्वळ ग्राफ पाहून वाचनसंख्या घटली आहे असे वाटेल एखाद्याला.
साधारणपणे, क्ष अक्षावर उजवीकडे सरकल्यानंतर य अक्षावरचे आकडे वाढले की य-अक्षावर चढती भांजणी आहे, असं समजलं जातं. क्ष-अक्षावर वर्षं लिहिण्याजागी, किती वर्षं मागे गेलं हे लिहिलं तर y = mx+c या समीकरणात m हा आकडा धन असेल; जे ह्या आलेखातूनही दाखवलं आहे.
मग तो m हा जो काही आकडा येईल, त्याला ३६५नं भागलं की दिवसाला दिवाळी अंकाची वाचनं किती वाढतात, हे दिसेल.
उजव्या बाजूला (फोनवर खाली) आवागमन नावाचा ब्लॉक आहे. त्यात Popular Content नावाची लिंक आहे. त्यात Popular Today ही एक टॅब आहे. त्यात आजच्या दिवसात कुठले धागे सगळ्यांत जास्त वाचले गेले तेही दिसतं.
हे वाचणारे लोक किती, म्हणजे किती स्वतंत्र आयपी अड्रेस आहे, हे शोधता येईल. पण त्यातून नक्की मिळवायचं काय आहे, असा प्रश्न पडला. मुळात हा सगळा खटाटोप कशासाठी करायचा, असा प्रश्न मला पडला तर माझं, व्यक्तिगत उत्तर अत्यंत स्वार्थी आहे. ऐसी आणि अंकाच्या निमित्तानं मला काही तरी नवीन समजतं.
वर्गणी
मला इतकेच सुचवायचे आहे की, कालागणीक संकेतस्थळाची/ऑनलाईन दिवाळी अंकाची लोकप्रियता मोजण्यासाठी वाचनसंख्येपेक्षा वाचकसंख्या हे मोजमाप चांगले आहे. आणि वाचकसंख्येमध्येही खरेखुरे वाचक हे चांगले मोजमाप आहे. कारण आयपी अॅड्रेस वरून वा गुगल अॅनालिटिक्स वा क्लाउडफायर वरून मिळणार्या वाचकसंख्येचाही फारसा उपयोग नाही कारण क्राउलर्स आणि हॅकर्सचे सर्व्हर्स नुसतेच वाचनसंख्या वाढवत नाहीत तर आभासी वाचकसंख्याही वाढवतात. यासाठी आजकाल सगळ्या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळांनी त्यांच्या संकेतस्थळाचे काही लेख/बातम्या फक्त देणगीदारांपुरताच मर्यादीत ठेवले आहे. मराठी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळासाठी भले देणगी द्यावी लागत नसली तरी फेसबुक/गुगल अकाउंटने लॉगिन करणे भाग पाडले आहे. असे केल्याने त्यांना खरेखुरे वाचक समजतात आणि त्यानुसार देणगी स्वरुपावर संकेतस्थळ चालवता येऊ शकेल का नाही हा अंदाज बांधता येतो.
मुद्रीत दिवाळी अंकासाठी जास्त खर्च येत असावा आणि वाचकही पैसे देऊन खरेदी करतात. ऑनलाईन (ऐसी वा इतर) दिवाळी अंकाचे लेख (वा इतर लेख वाचण्यासाठी) वाचण्यासाठी लॉगिन करणे (गुगल/फेसबुक) बंधनकारक ठेवले (आणि कोण कोण आलय? हे काढून टाकले) तर नेमकी वाचक संख्या कळेल आणि त्यानुसार दिवाळी अंकासाठी वर्गणी लावता येईल का नाही हा निर्णय घेता येईल.
Login
इथे जे लॉगइन करून येतात असाही एक वाचकवर्ग आहे. नियमितपणे ऐसी आयडीवरून इथे वावरणारे "खरे" वाचक आणि लेखक आहेतच. त्या अनुषंगाने रोज किती लॉगइन होतात, आलेले सदस्य किती काळ या संकेतस्थळावर घालवतात वगैरे विदा काढता येईलच.
आणि अर्थात असे लॉगइन करून येणारे आणि इथे भरपूर वेळ घालवणारे वाचक वाढवणे हे कोणत्याही संकेतस्थळाचे ध्येय असणारच. पण दिवाळी अंक असे वाचक वाढण्यास निमित्त ठरते हेही खरं.
दरवर्षी एक अनोखी थीम, इतर
दरवर्षी एक अनोखी थीम, इतर अनेक दर्जेदार लेख, कथा आणि सर्व प्रकारच्या लेखनाचा उत्कृष्ट समावेश यामुळे ऐसीचा दिवाळी अंक अतिशय वाचनीय होत असतो. ऑनलाईन, अछापील लेखन हाच वर्तमानकाळ आणि भविष्य आहे. कोणीही उगीच "हल्ली, आजकाल" वगैरे शब्द वापरून टिपिकल "ज्येना ब्रँड" उसासे टाकत असतील तर त्यांनी हे सत्य लवकर स्वीकारणे बरे.