“कृती करा, आणि आपल्याला काय आवडतं हे शोधा” – अमित वर्मा

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

"कृती करा, आणि आपल्याला काय आवडतं हे शोधा" – अमित वर्मा
- नंदन आणि सोफिया

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा भारतीय समाजमाध्यमांचा परिघ हा बव्हंशी ब्लॉगविश्वापुरता आणि काही मोजक्या संकेतस्थळांपुरता मर्यादित होता - तेव्हा 'इंडिया अनकट' ह्या नावाने ब्लॉग लिहिणाऱ्या अमित वर्माचं नाव समाजमाध्यमांत गाजत होतं. राजकारण, समाजकारण, क्रीडा, संस्कृती यांबद्दलची मार्मिक भाष्य वा टिप्पणी त्याच्या ब्लॉगवर वाचायला मिळे. ह्या नवीन माध्यमाची ताकद ओळखून वाचकांशी थेट संवाद साधणं; जिव्हाळ्याच्या विविध विषयांसोबतच तामिळनाडूत त्सुनामीने घडवलेल्या विध्वंसाचं आणि मदतकार्याचं थेट तिथे जाऊन वर्णन करणं आणि प्रसंगी, लोकप्रिय नसणारी मतंही संयत ठामपणे मांडणं ही त्याच्या ब्लॉगची वैशिष्ट्यं.

बदलत्या काळाबरोबर आणि समाजमाध्यमांतील संवाद साधण्यासाठी उपलब्ध झालेल्या नवीन मार्गांबरोबर स्वत:ला बदलत अमितने 'The Seen and the Unseen' नावाचं ऑडिओ पॉडकास्ट (प्रसिद्ध फ्रेंच लेखक बास्तियाच्या निबंधावरून प्रेरित) सुरू केलं. दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या ह्या पॉडकास्टनं नुकताच ४०० भागांचा टप्पा ओलांडला. आजच्या वेगवान, झपाट्यानं बदलत्या काळात वाचकांना/प्रेक्षकांना सारं काही झटपट, चटपटीत हवं असतं हा आरोप नवीन नाही; आणि त्यात तथ्यही आहेच. मात्र अशा परिस्थितीत, ह्या पॉडकास्टने रूढ असलेली वेळेची मर्यादा झुगारून आठ तासांहूनही अधिक लांबीचे अनेक एपिसोड्स तयार केले (वानगीदाखल, प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्याशी साधलेला संवाद) - आणि सखोल, काहीएक ठेहराव असणाऱ्या "कंटेंट"च्या – अर्थात समाजमाध्यमांवरील साहित्याच्या – शोधात असणाऱ्या श्रोत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

समाजमाध्यमांतील 'निरागस' दिवसांपासून सुरुवात करून सध्याच्या कंठाळी चर्चेच्या अवकाशात तगून राहिलेल्या; काहीशा एकमितीय असलेल्या ब्लॉगपासून ते पॉडकास्ट आणि यूट्यूब चॅनल ह्या नवीन साधनांनाही आत्मसात करून नवीन प्रयोग करणाऱ्या लेखकाची ही वाटचाल ही एका अर्थी, बदलत गेलेल्या भारतीय समाजमाध्यमांचं प्रतिबिंबच मानता येईल. साधारण याच मुख्य विषयावर अमित वर्माशी साधलेला हा संवाद.

अमित वर्मा

'इंडिया अनकट' ब्लॉग सुरू करण्यामागची पार्श्वभूमी काय, आणि त्यानंतर तो ब्लॉग कसा बदलत गेला?

'India Uncut' ब्लॉगची सुरुवात करताना, मी मुख्य प्रवाहातला पत्रकार होतो. 'CricInfo' नावाच्या संकेतस्थळावर व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम करत होतो, आणि माझं मुख्य काम क्रिकेट-पत्रकारितेत होतं. पण, त्याच वेळी इतर क्षेत्रं आणि विषयही मला खुणावू लागले. मी अनेक प्रकारचं लेखन करत होतो आणि शेवटी, देशातील प्रमुख वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन करू लागलो. मात्र, त्या वेळी, २००३ साली, ब्लॉगिंग या नव्या माध्यमानं माझं लक्ष वेधून घेतलं. कारण मला जे लिहायचं असेल ते लिहिता येत होतं; मला फक्त क्रिकेटच्या विषयावरच अडकून राहण्याची आवश्यकता नव्हती. शिवाय यात इतरही अनेक पैलू होते, जे केवळ पाच वर्षांपूर्वी उपलब्ध असलेल्या इतर माध्यमांमध्ये नव्हते.

म्हणजे, जर १९९०च्या दशकाबद्दल विचार केला तर, वृत्तपत्रांसाठी लिहायचं असेल तर मला साधारणतः ८००० शब्दांचा एक स्तंभ लिहावा लागला असता, तो एका विशिष्ट विषयावर आधारित असावा लागला असता. मग मी तो Times of India किंवा Indian Express सारख्या वृत्तपत्रांना पाठवला असता. त्यासाठी मला संपादकांची संमती घ्यावी लागली असती; त्यांच्या खासगी आवडीनिवडी, पूर्वग्रह इत्यादी चक्रातून पार पडावं लागलं असतं, आणि मग तो प्रकाशित झाला असता. ही संपूर्ण प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि अकार्यक्षम होती. त्या काळच्या मॉडेलमध्ये मुख्य प्रवाहातल्या मोठ्या माध्यम-कंपन्या असायच्या; त्या अनेक लोकांकडून लिखाण करवून घ्यायच्या; मग वाचकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी लेखनाचं संकलन करायच्या; आणि नंतर ते जाहिरातदारांना विकायच्या. आणि या सर्व प्रक्रियेतून लेखकाला मानधन म्हणून फक्त एक लहानसा हिस्सा मिळायचा.

त्याच्या जोडीला, लेखकांना वाचकांशी थेट संवाद साधण्याचा कोणताही मार्ग नव्हता; हा संवाद मुख्य प्रवाहातील माध्यमांद्वारेच व्हायचा; आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच ते शक्य होत असे. पण कालांतरानं हे सगळं बदललं, आणि या दोन्ही बदलांनी खूप मोठा फरक घडवला.

पण मी ब्लॉगिंगची सुरुवात का केली याकडे परत जाताना : त्यामागे अनेक कारणं होती. पहिलं म्हणजे, ब्लॉगमुळे मी विशिष्ट फॉर्ममध्ये अडकलेलो नव्हतो. साधारणपणे एखादं वृत्तपत्रातील संपादकीय (ऑप-एड) ७००-८०० शब्दांचं असण्याची मर्यादा होती. पण ब्लॉगिंगमध्ये, ते ८०, ८००, ८००० शब्दांचंही असू शकतं. मी ८० शब्दांचं म्हणतो, कारण त्या काळात सोशल मिडियामुळे ब्लॉगिंगचे वेगवेगळे पैलू वेगवेगळे झाले नव्हते. उदाहरणार्थ, नंतर ट्विटरनं मायक्रोब्लॉगिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे सूचक वाक्यानं लक्ष वेधण्याचं काम घेतलं. पण त्या काळात असं नव्हतं; सगळं काही ब्लॉगवरूनच होत असे. त्यामुळे आपल्याला ज्या स्वरूपात (फॉर्ममध्ये) लिहायचं आहे, ते लिहिता येत होतं. किमान किंवा कमाल शब्दांचं बंधन नव्हतं.

दुसरं म्हणजे, 'न्यूज सायकल'ला शरण जाण्याची गरज नव्हती. मी एखादं वेगळं पुस्तक वाचतो आहे, मला कोणत्यातरी विशिष्ट विषयावर लिहायचं आहे, तर मी लिहू शकत होतो. लोकांना काय आवडेल, याबद्दल मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्या संपादकांचं मत काय आहे; याला काहीही महत्त्व नव्हतं.

तिसरं म्हणजे, कुठलेही (झारीतले) शुक्राचार्य मध्ये नव्हते; मी जे काही प्रकाशित करू इच्छितो, ते थेट प्रकाशित करू शकत होतो. मला जे लिहायचं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नव्हती.

चौथी गोष्ट अशी की, मी माझी लिखाणाची वारंवारता स्वतः ठरवू शकत होतो. आधी, जर मी स्वतंत्र स्तंभलेखक असेन आणि दोन महिन्यांनी एखादी गोष्ट लिहून एक्स्प्रेसला पाठवली, तर ती त्यांच्या वेळेनुसार प्रकाशित होई. पण ब्लॉगवर, मला हवं तितकं, हवं तेव्हा लिहू शकत होतो.

झालं असं की मी लिहायला सुरुवात केली ती कुठलाही संकोच न बाळगता. माझी मूळ धारणा अशी होती की, हे कोणी वाचणारच नाही. त्यामुळे मी लिहीत होतो आणि मला काही तरी दीर्घकाळ टिकणारं लिहायचं होतं. हे अचानक चर्चेत आलं कारण २००४च्या डिसेंबरमधली त्सुनामी! मी काही स्वयंसेवकांसोबत तमिळनाडूच्या प्रवासाला गेलो होतो आणि तिथून जवळजवळ थेट ब्लॉगिंग करत होतो. त्यामुळे ब्लॉग जगभरात वेगानं व्हायरल झाला आणि त्यानंतर मला एक मजबूत पाठीराख्यांची फौज मिळाली! पण सुरुवातीला अशी काहीच अपेक्षा नव्हती. यामुळे मला माझा स्वतःचा आवाज सापडायला मदत झाली.

मी दररोज सरासरी पाच पोस्ट्स लिहिल्या आणि हे पाच वर्षं चाललं. त्यामुळे २००३ ते २००८-०९ दरम्यान, मी सुमारे ८,००० पोस्ट लिहिल्या, आणि नंतर ते हळूहळू फक्त माझा कंटेंट/लेखन संग्रहित करायचं ठिकाण बनलं. ह्या पाच वर्षांच्या प्रवासात मी मनमोकळेपणानं लिहू लागलो आणि माझे विचार जगासमोर मांडू शकलो. हळूहळू ते अनेक लोकांपर्यंत पोहोचलं. जगभरातून लोक मला लिहायला लागले.

(मला आठवतं की एकदा न्यूझीलंडमधल्या एका भारतीय स्थलांतरितानं मला लिहिलं होतं की त्याच्याकडे भारतीय वर्तमानपत्रं वाचण्याइतपत संयम नाही – कारण ती फार सामान्य दर्जाची असतात – तुमचा ब्लॉग हेच माझं माहितीचं साधन आहे.)

आमच्यातील बहुतेक जणांनी मराठी किंवा इंग्रजी ब्लॉगर्स किंवा ब्लॉगवाचक म्हणून सुरुवात केली. २०००च्या दशकात ब्लॉगिंग हे मोजक्या, प्रामुख्याने महानगरी, सुशिक्षित वर्तुळापुरतं मर्यादित होतं. ते आता बरंच विस्तारलं आहे. एक ब्लॉगर, एक पत्रकार आणि एक लेखक म्हणून – आणि आता एक पॉडकास्टर म्हणून – तुम्ही हे बदल घडताना पाहिलेत. तुमच्या मते, गेल्या २० वर्षांत समाजमाध्यमं कशी बदलली? आणि या बदलांतले सर्वांत विलक्षण आणि निराशाजनक बदल कोणते?

सर्वप्रथम, मला वाटतं की आपण ज्या जगात आहोत त्यामध्ये सोशल मिडिया हे प्रचंड सकारात्मक पाऊल आहे; पण त्यासोबतच त्याचे काही अहेतुक, अनपेक्षित पण अत्यंत नकारात्मक परिणामदेखील झाले आहेत; तेही विचारात घेणं आवश्यक आहे. प्रथम मी सकारात्मक बाजूंवर बोलतो. पूर्वी कुणी लेखक किंवा साहित्यिक म्हणून काम करायचं ठरवलं तरी त्या व्यक्तीकडे निर्मितीची साधनं नव्हती. त्या वेळी मुख्य प्रवाहातल्या प्रकाशन संस्थांना शरण जावं लागे; त्यांना खूश ठेवावं लागे. दुसरं म्हणजे, प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट स्वरूपात लिहावी लागे – लेख ८०० शब्दांचा असावा, जर दृकश्राव्य माध्यम असेल तर, प्रत्येक गोष्ट ठरावीक वेळेच्या चौकटीत बसवावी लागे. टीव्ही मालिका असेल तर २४ मिनिटांची (२४ + ६ मिनिटं जाहिराती) किंवा हॉलिवूड चित्रपटासाठी ९० मिनिटं आणि बॉलिवूड चित्रपटासाठी तीन तास, वगैरे.

निर्मितीची साधनं आणि स्वरूपं खूपच मर्यादित होती आणि ती मर्यादा ओलांडणं कठीण होतं. साहित्यिकांना थेट कमाईही करणं शक्य नव्हतं. मी आधी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, जर मुख्य प्रवाहातील माध्यमात लिहिलं तर ते जाहिरातदारांना विकणार; आपल्याला त्याचा एक छोटासा भाग मिळायचा. जाहिरातदार किंवा वाचकांशी थेट अर्थव्यवहार नव्हताच.

तर चौथी बाब अशी, साहित्यिकांचा वाचकसमुदायाशी थेट संवाद नव्हता. जर मी 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये लिहिलं आणि कोणी तरी माझं लेखन वाचलं तर त्यांना वाटेल, "हां, अमित चांगलं लिहितो." दोन महिन्यांनंतर ते 'एक्सप्रेस'मध्ये माझं दुसरं लेखन वाचतील आणि त्यांना माझं नाव धूसरपणे आठवेल, आणि नंतर ते कालांतराने विसरून जात. आज मात्र हे सगळं अनेक परीनं बदललं आहे.

सर्वप्रथम, आज आपल्याकडे सर्व माध्यमांमध्ये निर्मितीची साधनं आहेत. केवळ ब्लॉगलेखनच नव्हे, तर YouTubeसारखं दृश्य-श्राव्य माध्यमदेखील! फॉर्मची मर्यादा आता राहिली नाही. लोकप्रिय होण्याची इच्छा असल्यास काही लोक प्रसिद्धीच्या अल्गोरिदमशी जुळवून घेतात, पण मी तसं कधीच केलं नाही आणि करण्याची गरजही भासली नाही. तुम्हाला तसं करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या मनाचं ऐकू शकता आणि तुम्हाला जे करायचं आहे तेच करू शकता; आणि त्याबद्दल अजिबात चिंता करण्याची गरज नाही.

तिसरं म्हणजे, आता आपण थेट आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकतो आणि थेट कमाई/अर्थसंकलन करू शकतो.
मुख्य प्रवाहातील माध्यमं आणि त्यात तुमचं लिखाण वाचकांच्या नजरेस आणणारे जाहिरातदार यांची आता गरज राहिलेली नाही.

२००९मध्ये केव्हिन केलीनं 'थाऊजंड ट्रू फॅन्स' नावाचा एक निबंध लिहिला होता. त्यात त्यानं असं मत मांडलं होतं की, समाजमाध्यमांच्या जमान्यात 'स्केल करण्याची' – अर्थात वाचकवर्ग, चाहते यांची संख्या सातत्यानं वाढती ठेवण्याची – गरज नाही. पूर्वी जर यशस्वी व्हायचं असेल तर खूप मोठा चाहतावर्ग मिळवावा लागे आणि त्यात फक्त एखाद टक्का लोक यशस्वी होत. इतर क्षेत्रांत सामान्य दर्जाच्या लोकांनाही यशस्वी होता येतं; एक सामान्य दर्जाचे इंजिनियर, बँकर, डॉक्टर हे बऱ्यापैकी पैसे कमावू शकतात.

मात्र २० वर्षांपूर्वी सामान्य लेखक म्हणजे गरिबीने आणि उपासमारीने गांजलेले, असं चित्र होतं. टॉपवर पोहोचावंच लागायचं – मॅडोना, मायकेल जॅक्सन, किंवा स्टीव्हन स्पीलबर्ग व्हावं लागायचं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

केलीचं म्हणणं असं आहे की, आता पोट भरण्यासाठी सर्वोच्च पदावर पोचलंच पाहिजे असं नाही. मुख्य धारेचा प्रवाह आता नाहीसा होत चालला आहे, क्षीण होतो आहे; मार्केट इतक्या विविधांगांनी विस्तारलं आहे की जर हजार 'खरे चाहते' मिळाले, जे वर्षाला शंभर डॉलर द्यायला तयार असतील तर, वर्षाला एक लाख डॉलर कमावता येतात! २००९मध्ये हे जरा अशक्य वाटलं असतं, पण केलीचं म्हणणं भविष्यसूचक होतं.

आज ही गोष्ट प्रत्यक्षात आली आहे. Substack ह्या व्यासपीठावर असे अनेक लोक आहेत, ज्यांची वर्गणी वर्षाला शंभर वा अधिक डॉलर आहे; आणि ते त्यातून लाखो डॉलर कमावत आहेत. २००९मध्ये कविकल्पना वाटणारी ही बाब आता प्रत्यक्षात उतरली आहे.

अलीकडेच, बॅरी वीस नावाच्या पत्रकाराने The New York Times सोडून Substack सुरू केलं. मी नुकतंच बातमीत वाचलं की, त्याची किंमत आता शंभर दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे – केवळ मौखिक प्रसिद्धीमुळे जमवलेला चाहतावर्ग!

तीन-चार वर्षांपूर्वी ली जिन नामक चिनी स्त्रीनं केलीच्या निबंधाला पुरवणी जोडली. तिचं शीर्षक होतं 'अ हंड्रेड ट्रू फॅन्स'. तिचं म्हणणं असं की, वर्षाला शंभर डॉलर्स देणाऱ्या हजार लोकांची गरज नाही; तुम्हाला फक्त शंभर लोक हवेत, जे दरवर्षी हजार डॉलर्स देतील, आणि तरीही तुम्ही दरवर्षी शंभर हजार डॉलर्स कमवू शकता.

कदाचित आढ्यताखोरी वाटू शकेल, पण खरं सांगायचं तर माझ्याकडे दोन्ही आहेत – हजार खरे चाहते आणि शंभर खरे चाहतेसुद्धा. दररोज एक डॉलर देतील असे एक लाख चाहते मला कधीच मिळणार नाहीत. एक सर्जनशील व्यक्ती म्हणून आपली बलस्थानं आणि मर्यादा काय हे ओळखायला हवं. बहुसंख्य लोकांसाठी मी अपरिचित असेन; पण मी जे कंटेंट निर्माण करतो, ते मनापासून आवडणारे मोजके लोक असणं हे माझ्या दृष्टीने पुरेसं आहे. स्टार्टअप्सच्या संदर्भात पॉल ग्रॅहॅमने केलेलं हे विधान – It is better to be loved by a few than liked by many – मी माझ्या समाजमाध्यमांच्या संदर्भातील कामासाठीही उपयुक्त मानतो.

जेव्हा माझ्या ऑडिओ पॉडकास्टचा (The Seen and the Unseen) एपिसोड प्रथम तयार होत असे; तेव्हा मला वाटे की या भागाला यूट्यूबवर दोन कोटी प्रेक्षकांनी पाहावं – पण किमान लाखभर लोकांनी तरी हा भाग डाऊनलोड करून पूर्णपणे ऐकावा. शेवटी यूट्यूबवर काय, लोक जेमतेम काही मिनिटं उडतउडत पाहतील – mile wide, inch deep छाप बघणं. तिथे लोकांनी सखोलपणे, गुंतून पाहणं ही अपेक्षाच अनाठायी. पण आश्चर्य म्हणजे, ह्या पॉडकास्टच्या संदर्भात नेमकं उलटं घडलं. मी गेल्या वेळी आकडेवारी पाहिली, त्यानुसार सरासरी सत्राची वेळ ही ४० मिनिटांची होती. पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी समाजमाध्यमांवर तुलनेनं नवीन होतो, तेव्हा जर मला कुणी सांगितलं असतं की इंटरनेटवर तुझं ऑडिओ पॉडकास्ट सरासरी चाळीस मिनिटं ऐकलं जाईल तर मी हे सांगणाऱ्या व्यक्तीला वेडात काढलं असतं!

पण आज, असा मी एकटाच नाही. चांगल्या लाँग-फॉर्म पॉडकास्टसाठी जी चिकाटी आणि सखोलता लागते, त्यासाठी पैसे मोजायला लोक तयार असतात. आपण अनेकदा विचार करतो की रोजच्या धकाधकीतून वेळ काढून, वर लोक पैसे कसे देतील? आता असं पाहा : जर मी दोन तास बसून एखादं पुस्तक वाचलं, तर त्याचे पैसे मी पुस्तकाच्या किंमतीबरोबर वेळेच्या स्वरूपातही मोजत आहे. वेळ म्हणजे पैसा! तुम्ही माझं पॉडकास्ट तासभर ऐकता, याचा अर्थ तुम्हाला त्याची किंमत आहे. मला त्यातलं काही मूल्य 'कॅप्चर' करायला तुमची काही हरकत नाही - ते कसे करायचे हा मुख्य प्रश्न! १९८० आणि ९०च्या दशकांत आपल्याकडे जुनं तंत्रज्ञान होतं; मुख्य प्रवाहातली माध्यमं आपला वाचण्याचा, पाहण्याचा वेळ जाहिरातदारांना विकत होती. सिनेमा असेल तर प्रदर्शक आणि वितरणाच्या व्यवस्थेवर अवलंबून राहणं भाग होतं – त्याचा एक अतिशय छोटासा भाग निर्मात्यांना परत येई. आज तशी परिस्थिती नाही. जुन्या, मुख्य प्रवाहातल्या व्यवस्थांची मक्तेदारी आता संपल्यात जमा आहे.

म्हणूनच 'कंटेंट क्रिएटर्स'साठी हा काळ मला अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक वाटतो. अभिव्यक्तीच्या स्वरूपाचं – फॉर्मचं – बंधन नाही; हाताशी आधुनिक साधनं आहेत; कुणाही 'गेटकीपर' वा द्वारपालाच्या करड्या नजरेची तमा बाळगण्याचं कारण नाही. अगदी मनाला येईल तितकं आणि त्या स्वरूपात आपण अभिव्यक्त होऊ शकतो. 'द सीन अँड द अनसीन' ह्या पॉडकास्टचे काही भाग आठ तासांहून अधिक लांबीचे आहेत. समाजमाध्यमपूर्व काळात जर अशा प्रकारच्या निर्मितीची मी नुसती इच्छा जरी व्यक्त केली असती, तरी तत्कालीन 'द्वारपालां'नी माझी रवानगी वेड्यांच्या इस्पितळात केली असती. दस्तुरखुद्द मलाही, पाच वर्षांपूर्वी, हा शुद्ध वेडेपणा वाटला असता!

पण मी आठ वर्षांपासून हे पॉडकास्ट करत आहे. त्याच्या भागांची लांबी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नवनिर्मितीची प्रक्रिया ही अशीच असते. दिवसेंदिवस ती बदलत, वाढत जाते आणि एके दिवशी ती आपली एक हक्काची जागा (niche) तयार करते. अशा स्वरूपाच्या निर्मितीचे वाचक, प्रेक्षक तिच्या अस्तित्वापूर्वीही असतात. आपल्याला आवडतं ते काम समरसून करा, नवीन निर्मितीसाठी आसुसलेल्या लोकांपर्यंत पोहोचा आणि त्याचं योग्य ते मूल्य थेट त्या ग्राहकवर्गापासूनच मिळवा!

आता समाजमाध्यमांच्या नकारात्मक बाजूविषयी बोलायचं झालं तर, आपण साऱ्यांनीच ट्विटरवरचे ट्वीट्स-रिट्वीट्स आणि फेसबुक/इन्स्टाग्रॅमवरचे लाईक-डिसलाईक पाहिले आहेत. होतं काय की, पहिलं म्हणजे समाजमाध्यमांवर अतिशय एकांगी प्रचाराला वाव मिळतो. राजकीय चर्चेचा धुरळा सहज उडू शकतो, कारण आपण ज्या बाजूचे आहोत त्यांच्या आसऱ्याला गेलो की वाटणारी आपलेपणाची भावना (sense of belonging) आणि आपल्या मतांना मिळणारा दुजोरा (validation) ह्या गोष्टी सहज, सुखदपणे आपल्याला त्या कोशात गुंगवून टोकाच्या भूमिकेकडे ढकलतात. मग आपल्या टोळीत आपलं महत्त्व वाढवण्याचा हमखास उपाय म्हणजे सभ्य चर्चा वगैरे बाजूला ठेवून, दुसऱ्या बाजूवर सतत हल्ला चढवणं; शिवाय आपल्या टोळीतले काही लोक पुरेसे कट्टर नाहीत असं ठरवून त्यांच्यावरही हल्लाबोल करणं! हळूहळू मग सहभागी झालेले सगळेच लोक अधिकाधिक कर्कश, अधिकाधिक टोकाची भूमिका घेणारे होऊ लागतात. आपल्याशी जे जे सहमत नाहीत, त्यांच्याशी केवळ आपले मतभेद नसतात – तर आपल्या नजरेत, ती बाजू म्हणजे मूर्तिमंत वाईटपणाच!

सुदैवानं सोशल मिडियावरचं हे टोकाचं ध्रुवीकरण, अजून तरी, एका आक्रमक अल्पसंख्य गटापुरतं सीमित आहे. मला खात्री आहे की मूक-बहुसंख्य लोक (silent majority) अजूनही समजूतदार आहे. या जगातल्या गुंतागुंतीची आणि बारकाव्यांची त्यांना कल्पना आहे. समाजमाध्यमांवर याबाबत ते नेहमीच व्यक्त होत नसले तरी! यामुळे आपण ट्विटरवर ज्या प्रकारचे उथळ, केवळ आपल्या मताला दुजोरा शोधत हिंडणारे लोक पाहतो त्यांच्या अगदी विरुद्ध असा एक वर्ग 'द सीन अँड द अनसीन'चे पॉडकास्ट्स पाच किंवा सहा किंवा दहा तासही ऐकतो. हा असा वर्ग आहे की त्याचा हेतू केवळ आपल्या मतांना पुष्टी मिळावी हा नसून, एखाद्या विषयाचे विविध पैलू समजून घेणं हा आहे.

अमित वर्मा द सीन अँड द अनसीन

'द सीन अँड द अनसीन' पॉडकास्टमध्ये तू शहरी, अभिजात वर्गाच्या पलीकडे सोशल मिडियाचा (उदाहरणार्थ, टिकटॉक) प्रसार होण्याबद्दल, आणि एकंदरीतच समाजमाध्यमांच्या लोकशाहीकरणाबद्दल चर्चा करतोस. हा बदल तुला प्रथम कधी जाणवला की काळाच्या ओघात त्याची हळूहळू कल्पना आली?

मला वाटत नाही, हा बदल अजून हव्या तितक्या प्रमाणात घडून आला आहे. टिकटॉक माझ्या दृष्टीनं, ह्या संदर्भात, एक कलाटणी देणारी बाब आहे (inflection point). खरं तर, टिकटॉकचं आगमन आणि त्यावर बंदी ह्या दोन्ही निरनिराळ्या कारणांसाठी महत्त्वाच्या घटना आहेत. भारतात जेव्हा स्वस्त मोबाईल डेटा/ब्रॉडबँड सर्वदूर पसरला त्याच सुमारास, टिकटॉकची लोकप्रियता भारतात वाढली. जिओ, अंबानी आणि सरकारबद्दल बाकी तुमचं मत काही असो, जिओनं हे मार्केट काबीज केल्यामुळे, अचानक इंटरनेट उपलब्धतेच्या संदर्भात जी काही विषमता होती, ती बव्हंशी दूर झाली. देशभरात जवळजवळ विनामूल्य ब्राँडबँड उपलब्ध झालं. आणि तेव्हाच टिकटॉकही उगवलं. त्याचं आगमन अतिशय खळबळजनक होतं, याचं मुख्य कारण म्हणजे ज्या प्रकारची साधनं (creator tools), टिकटॉकने निर्मात्या, वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिली होती.

समजा कुणी एका लहान गावी राहत आहे आणि त्यांचा लैंगिक कल बहुसंख्यांहून निराळा आहे. त्यांची स्वत:विषयीची पहिली धारणा 'मी असा कसा वेगळा!' ह्या धर्तीवरची असते – मी एक 'फ्रीक' आहे, माझ्यासारखे इतर कुणीच नाहीत – आणि अचानक त्यांना टिकटॉकवर असे अनेक क्रिएटर्स आढळतात जे, त्यांची नाळ ज्याच्याशी जुळू शकेल असं कंटेंट, असे रील तयार करत आहेत. त्यांना ज्या गोष्टींबद्दल आस्था आहे, त्या गोष्टींविषयी बोलत आहेत; आणि त्यांना अचानक जाणवतं की, 'अरे, या जगात माझ्यासारख्या व्यक्तीलाही एक जागा आहे.'

एक दिवस मग असा जादुई क्षण येतो की, जेव्हा ते कॅमेरा फिरवून स्वत:कडे रोखतात आणि स्वत:च निर्माते (creator) होतात. सुरुवातीला ते कदाचित इतर लोकांसारखंच साचेबद्ध, रेकॉर्डेड पार्श्वभूमीवर ओठ हलवून (लिप-सिंकिंग) बोलण्याचे रील्स तयार करतात – पण ते फक्त सुरुवातीलाच! मग ते काही तरी नवीन करून पाहतात! मला वाटतं, ही असोशी, ही मोकळीक जी मी टिकटॉकमध्ये पाहिली, ती मला इतक्या वर्षांनंतरही इतर प्लॅटफॉर्मवर दिसत नाही. टिकटॉकमध्ये जे मला आढळलं, तो अत्याधुनिक सर्जनशीलतेचा दाखला होता. जगभरातल्या सगळ्यांना – ज्यांत स्त्री-पुरुष, विविध लैंगिकतेचे लोक, विविध जातींचे लोक आले – त्या सर्वांना शेवटी एक आपलं वाटावं, असं व्यासपीठ सापडलं होतं.

चित्रपट किंवा एकंदरीतच मनोरंजन-क्षेत्राकडे पाहिलं, तर त्यांचं मॉडेल हे टॉप-डाऊन स्वरूपाचं होतं. प्रत्येक गोष्ट बॉलिवूड किंवा प्रादेशिक चित्रपटकेंद्रातल्या उच्चभ्रूंनी ठरवलेली असे. एक तर ते जुन्या जमान्यातले निर्माते असायचे किंवा परदेशात शिकून, बेगडी संकल्पना घेऊन परतलेली त्यांची पुढची पिढी. वास्तविक, या देशाची जडणघडण कशी आहे, त्यातल्या नागरिकांना काय हवं आहे याची सुतरामही कल्पना त्यांना नसे; आणि ते माहीत करून घेण्याचा कुठला मार्गही नसे. आधुनिक तंत्रज्ञानाने हे सारं पार बदलून टाकलं, आणि माझ्या मते, निदान भारतात तरी, टिकटॉक ह्या उलथापालथीचा एक भाग होतं.

मला वाटतं, विशेषतः गंभीर, सखोल संवाद वा चर्चांच्या संदर्भात अद्याप बरंच काम बाकी आहे. मला इंग्रजी जितकी अवगत आहे, त्याच्या निदान ८०% तरी इतर कुठली भारतीय भाषा येत असती तर माझी निर्मिती, माझं कंटेंट मी त्याच भाषेत तयार केलं असतं. खरं सांगायचं तर, इंग्रजीत आपल्याला जगभरातला कंटेंट उपलब्ध असतो, पण भारतीय भाषांमध्ये गंभीर चर्चेचं प्रमाण कमी आहे.

तुमच्या प्रकाशनात, तुम्ही मराठीत गंभीर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात हे मनाला फार उभारी देऊन जाणारं आहे. पण मराठी किंवा हिंदी किंवा तमिळ मुलांच्या दृष्टीनं विचार केला तर, त्यांच्यासाठी माझ्या माहितीनुसार इंटरनेटवर पुरेशा विचारप्रवर्तक, जगभरातल्या कल्पना अंतर्भूत झालेल्या असतील, अशा चर्चा होताना दिसत नाही. भारतीय भाषांमध्ये कल्पनांची कसदार बाजारपेठ नाही आणि मला वाटतं, की तसं होणं आवश्यक आहे. मला खात्री आहे की तुम्ही जे करत आहात ते भविष्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे. जर कोणी हे वाचत असेल तर मी त्यांना विनंती करेन की जर का जरी तुम्हाला इंग्रजी भाषा चांगली येत असली, तरीही जर तुम्हाला त्याशिवाय जी भाषा येत असेल त्यात तुम्ही कंटेंट बनवा, त्याची खरी गरज आहे. जेव्हा तुम्ही ती गरज भागवता तेव्हा तुम्हाला मिळणारे कौतुक, तुम्हाला वाचकांकडून किंवा दर्शकांकडून किंवा श्रोत्यांकडून गुंतवणूक किंवा जे काही मिळेल, ते खरोखर अर्थपूर्ण होईल.

लोक सहसा लक्ष कमी झालं आहे, reduced attention span याबद्दल तक्रारीच्या उत्तरादाखल म्हणतात, की दर्जेदार कंटेंटची अव्यक्त भूक आहे, आणि तसा कंटेंट तयार केला याचे कारण विकलं जात नाही. हा अंधविश्वास म्हणायचा का 'मागणी तसा पुरवठा/कंटेंट-निर्मिती-प्रेरित' अल्गोरिदममुळे आहे?

छान प्रश्न! मी माझ्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगतो, माझा पॉडकास्ट प्रवास आठ वर्षांपूर्वी सुरू झाला, आणि त्या क्षेत्राबद्दलच्या चुकीच्या समजुतीं/आकलनासकट. मला तेव्हा असं वाटलं की लोकांचं लक्ष कमी वेळ टिकतं. पहिल्या १५ सेकंदांत लोकांना खिळवून ठेवावं लागतं आणि पॉडकास्ट १०-१५ मिनिटांपेक्षा जास्त असू नये. पण लवकरच मला कळलं की ते पूर्णपणे चुकीचं होतं. पॉडकास्टच्या संदर्भात हे समजण्यासाठी तीन मुख्य कारणं होती.

पहिलं कारण असं होतं की लोक तीन वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये पॉडकास्ट ऐकतात आणि प्रत्येक वेळी ते त्यात पूर्ण गुंतलेले असतात. लोक पॉडकास्ट ऐकतात जेव्हा ते व्यायाम करत असतात – उदाहरणार्थ, धावताना, किंवा जिममध्ये. ते पॉडकास्ट ऐकतात जेव्हा ते प्रवास करत असतात – लोकल ट्रेनमध्ये, गाडी चालवताना, किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना. किंवा ते पॉडकास्ट ऐकतात जेव्हा ते घरातली कामं करत असतात, भांडी घासणं, घर साफ करणं वगैरे.

ही तिन्ही वापराची कारणं अर्थातच स्मार्टफोनमुळे शक्य झाली आहेत. या वेळी लोक पूर्णपणे गुंतलेले असतात; त्यांना असं कंटेंट ऐकण्याची इच्छा असते ज्यासाठी त्यांना सतत चॅनल बदलण्याची गरज भासत नाही. उदाहरणार्थ, जर मी यूट्यूबवर काही तरी बघत असेन, तर सहजपणे दुसरीकडे बघू शकतो, कोणाशी बोलू शकतो, टेबलवरचं पुस्तक उचलू शकतो. लक्ष विचलित होणं खूप सोपं आहे! पण जर बाहेर पळत असताना लक्ष विचलित होणार नाही.

दुसरं कारण म्हणजे लोकांमध्ये जास्त वेगानं ऐकण्याची क्षमता असते. आपला मेंदू मिनिटाला ५०० शब्दांपर्यंत भाषा समजू शकतो, तर आपण साधारण १५० ते २०० शब्द प्रतिमिनिट बोलतो. त्यामुळे जास्त वेगाने ऐकणं सोपं असतं. सुरुवातीला मला वाटलं, 'अरे, असं केल्यावर कानाला त्रास होईल आणि याचा काय फायदा!'

तर 1.2x किंवा 1.5x वेगावर न्या आणि तुम्हाला ज्या गतीत ऐकणं सोयीचं वाटतं, त्या गतीवर ठेवा, आणि तुम्हाला जाणवेल की तुमचा मेंदू त्या गतीशी जुळवून घेतो. तुम्ही कोणतेही बारकावे, कोणतीही शांतता, विराम चुकवत नाही. सगळं मिळतं. मेंदू आपोआप जुळवून घेतो. हे दुसरं कारण आहे.

तिसरं कारण म्हणजे लोकांना खोलवर जाऊन समजून घेण्याची इच्छा असते. जग बहुधा वरवरचं कंटेंट पुरवतं; जग असं मानतं की लोकांचं लक्ष कमी वेळ टिकतं, आणि ह्या समजुतीला धरून असलेलं कंटेंटच चालतं. लोक सतत स्क्रोल आणि स्वाइप करत असतात, आणि हे आपल्यापैकी बहुतेकांसाठी खरं आहे. कधी कधी आपल्याला सघनता, खोली हवी असते, पण बहुतेक वेळा जगाचं स्वरूप असं असतं की त्यात मैलभराची रुंदी असते आणि इंचभराची खोली. जेव्हा आपण त्यांना काही तरी सघन काही देऊ करता, तेव्हा देवाणघेवाण (engagement) खूपच जास्त असते.

माझ्या मते, हा एक धडा आहे जो इतर माध्यमं शिकली नाहीत. कमी काळासाठी लक्ष खिळवून ठेवणारं कंटेंट दिल्यामुळे माध्यमांची ग्राहकसंख्या नक्कीच वाढत असेल, पण त्यामुळे ह्या लोकांची गुंतवणूक, माध्यमाप्रती निष्ठा फारच कमी असतात. दुसरीकडे, जेव्हा कमी संख्येने का होईना, पण अर्थपूर्ण आणि दर्जेदार कंटेंट पुरवला जातो, तेव्हा लोकांची गुंतवणूक आणि निष्ठा खूपच जास्त असतात. कोणाशी तरी जोडलेलं जाणवण्याची भावना आणि जवळीक अधिक असते.

एकदा मी अभिनंदनसोबत एक पॉडकास्ट एपिसोड केला होता, ज्याबद्दल, एकाने मला लिहिलं की त्यांना आमचं संभाषण ऐकत असताना असं वाटलं की एका सोफ्यावर बसून दोन घनिष्ठ मित्रांसोबत गप्पा मारत आहोत; ही माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे; ती एक समृद्ध देवाणघेवाण आहे. मला वाटतं हे एक उत्तम काम आहे, आणि हेच ते लोक आहेत जे कंटेंटसाठी पैसे देतील. हेच ते लोक आहेत जे तुम्हांला मदत करतील. तर मोठ्या प्रमाणात असलेले पण उथळ engagement तसं काही करू शकत नाही.

मला माझ्या अनुभवाबद्दल बोलूनच कमी लक्षवेधीतेचा (short attention span) सिद्धांत फेटाळून लावायचा आहे असं नाही. विचार करा, सिनेमा हे माध्यम स्वतःच काय सांगतं. पूर्वी सरासरी हॉलिवूड चित्रपट ९० मिनिटांचा असायचा. आज, ओटीटीवरचा नवीन शो खूपच आवडला तर आपण सहा-सात तासांत, एकाच बैठकीत तो बघतो, आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसही चुकवतो. बिंजिंग! लोकांमध्ये तेवढी क्षमता आहेच. फक्त आपल्याला त्यांच्यावर अविश्वास दाखवायची आणि सोपी वाट निवडायची सवय असते. आपण अल्गोरिदमच्या प्रवाहात वाहून जातो, पण कधी कधी आपल्याला स्वतंत्र विचार करणं आवश्यक असतं. आत्तापावेतो, लोकांना फार वेळ लक्ष द्यायचं नसतं, हे म्हणणं फोल आहे, हे सांगण्यासाठी पुरेसे प्रतिवाद आहेत.

पारंपरिक माध्यमांसारखी समाजमाध्यमांची अर्थव्यवस्थाही स्थिरावेल असं तुला वाटतं का? (उदाहरणार्थ, आकार पटेल यांची टीव्ही चॅनलांच्या आकड्याबद्दलची निरीक्षणं आणि आशावाद – की बारकावे दाखवणारी माध्यमं तयार होतील?)

मला खरंच माहीत नाही. खरं सांगायचं तर हे अज्ञात अज्ञातांच्या (unknown-unknowns) क्षेत्रात आहे. कंटेंट वापरण्याची एक पारंपरिक पद्धत आहे, आणि आता कंटेंट शोधण्याची, कंटेंट वापरण्याची आणि कंटेंट क्युरेट करण्याची पद्धत, हे सगळंच पूर्णपणे बदललं आहे. मुख्य प्रवाह पूर्णपणे असंबद्ध (irrelevant) आहे. जुन्या संस्थांची जागा घेण्यासाठी नवीन संस्था पुढे आलेल्या नाहीत. म्हणजे संरचनेच्या दृष्टीनं, म्हणजे फक्त केवळ "रेट्रो टाईम्स ऑफ इंडिया" त्यासारखा विशिष्ट ब्रँड नाही तर संरचनेच्या दृष्टीनं, एखाद्या गोष्टीच्या कार्यप्रणालीच्या दृष्टीनं. खरं तर मूलभूत नवीन काहीच आलेलं नाही.

माझं वाटतं की, नवीन युगाची पहिली लाट येऊ घातली आहे. ह्या पहिल्या लाटेत वैयक्तिक निर्मात्यांचं (creators) सबलीकरण झालं आहे; त्यांपैकी काही जण आपला ब्रँड तयार करून त्याचं मजबूत व्यवसायात रूपांतर करत आहेत; उदाहरणार्थ, बॅरी वाइस 'सबस्टॅक'वर करत आहे. पुढे काय येईल, जग कसं दिसेल, पुन्हा मोठ्या मुख्य प्रवाहातल्या संस्था अस्तित्वात येतील का, जरी त्यांची रचना निराळी असेल तरीही, किंवा क्रिएटरांच्या अर्थव्यवस्थेत किंवा बातम्यांच्या अर्थव्यवस्थेत त्यांचं काहीच महत्त्व नसेल का, हे आपल्याला माहिती नाही. मी ह्या बाबतीत फार जास्त ज्ञान पाजळू इच्छित नाही.

माझा नेहमी creators सल्ला असतो की काही तरी, वेगवेगळ्या गोष्टी करून पाहा; काय जुळून येतं ते कधीच ठरवता येत नाही. मला खरंच असं वाटतं की थोर नवीन कल्पना छोटे गावांतल्या तरुणांकडून येण्याची शक्यता जास्त आहे; या लोकांकडे प्रचंड इच्छा आहे, आणि त्यांचे माध्यमाच्या जगाबद्दल पूर्वग्रह नाहीत.

तू अनेकदा डिग्लोसिया आणि रुजलेल्या कॉस्मोपॉलिटॅनिझमच्या संकल्पनेवर चर्चा करतोस!
अरे! तू खरंच माझं पॉडकास्ट ऐकलं आहेस! तुझ्या प्रश्नांमुळे मी अगदी भारावून गेलो आहे. Thank you.

भाषिक वैविध्य टिकवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर काही प्रमाणात होऊ शकतो असं तुला वाटतं का?

मला वाटतं ते होऊ शकतं, आणि तसं घडेलही. याचं एक उदाहरण; तू नक्कीच ऐकलं असशील कारण तुला ह्या संज्ञा माहीत आहेत. माझा एक एपिसोड होता विनेश सिंघलबरोबर. तो stage.in चालवतो. त्याने stage.inला Netflix for Bharat म्हणून सादर केलं. पण Netflix for Bharat याचा अर्थ हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा भाषांतलं कंटेंट नव्हे, तर हरियाणवी, भोजपुरी आणि अशा भारतीय बोलीभाषांमधलं कंटेंट. "जेव्हा मी हरियाणाच्या छोट्या खेड्यात वाढलो", तो मला सांगत होता, "तेव्हा जवळच्या गावात शाळेत इंग्रजी शिकणं, हे माझ्या आयुष्यातलं पहिलं सगळ्यात मोठं आव्हान होतं." आणि त्याच्या समोरचं दुसरं मोठं आव्हान होतं, हिंदी शिकणं. तुम्हांला वाटेल की हरियाणवी खेड्यात वाढलो म्हणजे त्याला हिंदी आली पाहिजे; पण तो हरियाणवी बोलायचा.

माझा मित्र अजय शाह, ज्याला "महान सपाटीकरणाचा आवाज" म्हणतो, त्यानुसार इतिहासात अन्न, कपडे आणि भाषांच्या बाबतींत सगळं एकसारखं, सपाट होत जातं; बोली भाषा नाहीशा होतात आणि मोठ्या भाषांमध्ये विलीन होतात. उदाहरणार्थ, एक प्रसिद्ध विधान आहे की भाषेत आणि बोली भाषेत फरक इतकाच आहे की भाषेला एक सैन्य असतं. अनेक सुंदर बोलीभाषांचा मुख्य भाषांद्वारे ताबा घेतला जातो. मला वाटतं की हे आता उलटं घडणार आहे. हे stage.in हरियाणवी, भोजपुरी, मैथिली चॅनलसह अफाट यशस्वी झालं आहे. मला वाटतं की भविष्यात लोक त्यांच्या बोलीभाषेबद्दल संकोच सोडून देतील.

अजय सांगत होता, तो अशा लोकांना भेटतो जे त्याच्याकडे येतात आणि हरियाणवीत सांगतात की, "पहले हमे बहुत शर्म आती थी..." हरियाणवी बोलताना, कारण बाकीचे सगळे हिंदीत बोलत असत. पण आता मला काही फरक पडत नाही. आता मला अभिमान वाटतो. मला वाटतं इंटरनेटमुळे घडू शकलंय. मुख्य प्रवाहाच्या विघटनाचा परिणाम असा आहे की असे अनेक प्रवाह तयार होऊ शकतात. मला आशा आहे की हे असेच चालू राहील आणि आपण आपलं वेगळेपण जपू आणि ते साजरंही करू शकू.

चुकीच्या माहितीच्या या युगात बातम्यांचा वापर आणि मत बनवण्याच्या बाबतीत सोशल मिडियावर अवलंबून राहण्याबद्दल तुला काय वाटतं? की आपण सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत आणि काही काळाने आपण पुरेसे जागरूक आणि शहाणे होऊ?

छान प्रश्न! मला सकारात्मक वाटतं कारण, जसं या प्रश्नात मांडलंय, आपण सध्या संक्रमणाच्या अवस्थेत आहोत. आता अचानक सत्याविषयीचं एकमत नाहीसं झालं आहे. मुख्य प्रवाहातल्या मिडियावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे आपण नेहमी कुणाची बाजू चूक किंवा बरोबर ह्या युद्धात अडकलेले असतो. आपल्यालाही एक मोह होत असतो, की आपल्याला जे खरं वाटतंय, त्याच (भ्रामक) सत्याची निवड करू, आणि त्या सत्याला समर्थन देण्यासाठी पर्यायी तथ्यं उभी राहतील. आपण तीच 'तथ्यं' ऐकत, त्या echo chamberमध्ये आयुष्यभर राहू शकतो. हे नकारात्मक दृष्टिकोणातून पाहायचं झालं तर, प्रत्येक गोष्टीचे तुकडे तुकडे होतील आणि शेवटी नेहमीच कुणाचं सत्य खरं, हे युद्ध सुरू राहील.

मी जरा जास्त सकारात्मक आहे. मला वाटतं लोकांना हे कळून चुकलं आहे. "कुणाचं खरं किंवा बरोबर?" हा संघर्ष सोशल मिडियावरच्या आदर्शवादी अल्पसंख्याकांमध्ये नक्कीच चालू राहील, पण मोठ्या प्रमाणात, लोक आता शंका घ्यायला लागले आहेत. अर्थात, AI, डीपफेक आणि भविष्यात येणाऱ्या गोष्टींमुळे हा अजून मोठा प्रश्न बनतोय. पण त्या संक्रमणाच्या काळानंतरही मला वाटतं की लोक हळूहळू अधिक शहाणे होतील. यामुळे आपल्याला, ज्याला मी 'सेंस स्पीकिंग' म्हणतो, त्याबद्दल विचार करण्याची जबरदस्त संधी आहे. माहितीच्या पुरात आपण हरवून जात असताना, अर्थ निर्माण करणाऱ्या लोकांसाठी (किंवा तुमच्यासारख्या प्रकाशनांसाठी) मोठ्या प्रमाणात वाव आहे, जिथे आपण हळूहळू ती विश्वासार्हता निर्माण करू शकतो; ज्यामुळे हे जग समजून घेण्यासाठी, लोक तुमच्याकडे पाहतील.

मला आठवतं, जेव्हा कोव्हिड आला, तेव्हा इतकी माहिती, गैरमाहिती आणि परस्परविरोधी तथ्यं सगळीकडे पसरलेली होती की शेवटी मी फक्त वैज्ञानिकदृष्ट्या योग्य बोलत असलेल्या, आणि ज्यांच्यावर मला विश्वास ठेवता येईल, अशा चार-पाच लोकांवर लक्ष केंद्रित केलं आणि. त्या मर्यादित संदर्भात ते माझे 'जाणकार' होते. वेगळ्या प्रकारे, मला आठवतं जेव्हा मी 'इंडिया अनकट' करत होतो, तेव्हा काही तरी घडल्यावर लोक लगेच माझ्या ब्लॉगवर येऊन बघायचे की मी त्या विषयावर काय म्हणालो आहे. असं नाही की मी काही "महाज्ञानी" आहे, पण माझा दृष्टिकोण कानावर पडणाऱ्या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा असेल आणि त्यांना काही तरी नवीन ऐकायला मिळेल.

माझ्या मते, हळूहळू सगळं स्थिरावेल. स्टर्जनच्या नियमानुसार ९५% गोष्टी बकवास असतात. सगळ्यांना आपापली पातळी सापडेल. लोक आपापले जाणकार आणि विश्वासार्ह "बोर्ड ऑफ डायरेक्टर्स" शोधतील ज्यांच्यावर ते विश्वास ठेवू शकतील. मला नाही असं वाटत की आपण एखाद्या माहितीच्या अराजकतेत जात आहोत जिथे कोणालाच काही समजत नाही.

अमित वर्मा यूट्यूब

ब्लॉगिंगकडे परत येणारा एक वेगळा प्रश्न, 'इंडिया अनकट' दिवसांपासून ब्लॉगिंग हा प्रकारच लक्षणीय बदलला आहे, तुम्हाला असं वाटतं का की ब्लॉगिंग समुदाय सोशल मिडियाद्वारे बदलला गेला आहे? जर तू आज भारतात पुन्हा 'इंडिया अनकट' लॉन्च केला तर तो कसा स्वीकारतील?

ब्लॉगिंगचे दिवस संपले आहेत. ब्लॉगिंगचे वेगवेगळे पैलू समाजमाध्यमांवर दिसतात. मायक्रो-ब्लॉगिंग आणि लिंका ट्विटर/एक्सवर दिसतात; एक विशिष्ट प्रकारचे वैयक्तिक निबंध फेसबुकवर दिसतात; ठरावीक प्रकारचा मजकूर इन्स्टाग्रामवर असतो, इत्यादी. मी माझ्या विद्यार्थ्यांना आता सांगेन की ब्लॉग सुरू करू नका; आता कोणीही वेबसाइटवर जात नाही. कोणीही ब्राउजरवर जाऊन Indiauncut.com किंवा अगदी timesofIndia.com किंवा nytimes.com टाइप करणार नाही. लोक लिंकवर क्लिक करतात. एखादं सबस्टॅक किंवा न्यूजलेटर सुरू करणं आज खूप सोयीस्कर आहे. तिथे वाचकांनी आपला इमेल दिला तर ते आयुष्यभरासाठी आपले वाचक ठरतात.

नव्वदच्या दशकात ते होऊ शकलं नाही. लोक आज टाइम्स किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख वाचतील पण त्या समुदायाशी थेट संपर्काचा कोणताही मार्ग नाही. पण समजा न्यूजलेटर किंवा सबस्टॅक वाचल्यावर त्यांनी इमेल दिलं तर त्यांच्याशी थेट संपर्क साधता येईल. समजा एखाद्या दिवशी पॉडकास्ट सुरू केली, तर याच वाचकांना त्याबद्दल सांगता येतं. नवीन काही सुरू करण्यासाठी वाचक-दर्शकवर्ग तयार असतो. नवीन काही प्रकल्पासाठी क्राउडफंड करायचं आहे, तर त्यांच्याकडे जाता येतं. मी आजच्या तरुण लेखकांना न्यूजलेटर सुरू करण्याचा सल्ला देईन; पण मी हेही सांगेन लेखनाच्या मर्यादा घालून घेण्याची गरज नाही. व्लॉगिंग किंवा पॉडकास्टही करता येतील. तिथे इतकी माध्यमं आहेत की सगळ्याचा प्रयत्न करा आणि काय जमतंय ते आजमावून पाहा. जर मी 'इंडिया अनकट', उदाहरणार्थ, सुरू करत असेन तर त्यामागचं कारण मला व्यक्त व्हायचं होतं, हे आहे. आजही मी स्वतःला वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो; माझा यूट्यूब-शो आहे 'एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग', किंवा माझी पॉडकास्ट आणि न्यूजलेटरही आहेत. त्यावर मी फार सक्रिय नाही, पण मी स्वतःला वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. ते लेखन Indiauncut.substack.comवर आहे

वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याच्या प्रक्रियेतून तुझा दृष्टिकोण बदलला आहे का? पॉडकास्ट आलेला प्रतिसाद आणि व्हिडिओला आलेला प्रतिसाद यांत काही फरक दिसला आहे का? तुला काय आवडतं आणि यांतला तोल कसा साधता?

मी 'ए मेडिटेशन ऑन फॉर्म' नावाचा निबंध लिहिला होता. आणि हे अगदी खरं की प्रत्येक फॉर्मची स्वतःची अनिवार्यता असते. पॉडकास्ट असेल तर मी ५ मिनिटांची मुलाखत किंवा ५ तासांचीही मुलाखत घेऊ शकतो; पण त्यांमागचे दृष्टिकोण पूर्णपणे भिन्न असतात. ५ मिनिटांच्या मुलाखतीसाठी मला त्या व्यक्तीबद्दल फार माहिती असण्याची गरज नाही. अर्ध्या तासाची मुलाखत घेणार असेन तर मला त्या व्यक्तीबद्दल काही प्राथमिक माहिती किंवा ते पुस्तक कशाबद्दल आहे हे माहीत हवं. जर ९० मिनिटांची मुलाखत घेत असेल तर मी पुस्तक वाचायला हवं. मी माझ्या दीर्घ स्वरूपाच्या मुलाखती घेतो तेव्हा मी त्या व्यक्तीनं लिहिलेलं प्रत्येक पुस्तक, प्रत्येक मुलाखत, मला पब्लिक डोमेनमध्ये सापडणारी प्रत्येक गोष्ट वाचतो. जर त्यांचा विषय मला व्यवस्थित माहीत नसेल तर मी बरेचदा त्या विषयावरची आणखी २० पुस्तकं वाचतो. त्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी हे प्राथमिक आकलन आवश्यक असतं.

स्टीफन कोव्ही एकदा म्हणाले की आपण प्रतिसाद देण्यासाठी ऐकतो, समजून घेण्यासाठी ऐकत नाही. जेव्हा आपण प्रतिसादासाठी ऐकतो तेव्हा त्यात आपला अहंकार असतो. जेव्हा आपण पाच-सहा तासांपेक्षा जास्त लांब पॉडकास्ट करत असू, तेव्हा समजून घेण्यासाठी ऐक‌ावं लागतं; तेव्हा आपल्या अहंकाराला तिथे स्थान नाही. समोरच्या व्यक्तीच्या प्रवासाचा धांडोळा घ्यावा लागतो; त्यांला ज्याबद्दल बोलायचं आहे, त्याबद्दल आपल्याला विचार करावा लागतो. आधीच लिहून ठेवलेल्या प्रश्नांना चिकटून राहू शकत नाही आपण. आपण त्यांच्यासोबत प्रवासाला निघालो आहोत, असं समजा. साहजिकच सखोल वाचन केलं असेल तरच त्यांच्याबरोबर तो प्रवास आपण करू शकतो.

कांटच्या तत्त्वज्ञानानुसार, काही मिळवायचं साधन म्हणजे इतर लोकांशी झालेला संवाद नाही, तर ते संभाषण हेच साध्य आहे. मला वाटतं की ही दीर्घ संभाषणं टिकवून ठेवायची तर या वक्त्यांकडे, पाहुण्यांकडे केवळ साधन म्हणून नाही तर मुळातूनच रोचक व्यक्ती म्हणून बघावं आणि आपलं कुतूहल जागृत ठेवावं. एरवी ८-९ तासांच्या गप्पा शक्य नाहीत. त्या माणसांच्या आयुष्याचा, संभाषिताचा आपणही भाग बनून जावं. दीर्घ मुलाखतींसाठी हा विचारच मुळातून निराळा आहे. यातून आपण एक चांगला श्रोता ठरावं; यातून लोकांविषयीचा आदर वाढावा.

मी पॉडकास्टिंग कोर्स शिकवत होतो तिथे एक विद्यार्थी होते. ते एक प्रसिद्ध, प्रकाशित लेखक होते. "पॉडकास्ट सुरू करायची" म्हणून ते शिकायला आले होते. त्यांना काय हवं आहे, याबद्दल त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मी त्यांना सांगितलं की १५ मिनिटांचे व्हिडिओ आणि त्यांचं यूट्यूब चॅनल त्यांनी सुरू करावं. आपल्याला काय करायचं आहे त्यानुसार आपला फॉर्म ठरवावा. तो फॉर्म व्यक्ती म्हणून आपल्याला आकारही देईल. हे पर्याय आणि त्यांतून निवड माझ्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी असं म्हणेन की वेगवेगळे प्रकार आणि फॉर्म वापरून प्रयोग करा. एक काही निवडून स्वतःवर बंधन घालू नका. बाजारात कसली चलती आहे, किंवा हेच एक चांगलं, असं काही नाही; ते शाश्वतही नाही. प्रयोग करा, त्याची मजा लुटा. जेव्हा खरोखरच एखाद्या विशिष्ट स्वरूपात तुम्हाला समाधान वाटत असेल, तेव्हा फक्त, ते स्वरूप पक्कं करा. आणि मग थांबू नका.

सोशल मिडियाच्या भविष्याबद्दल तुझ्या काय कल्पना आहेत, विशेषत: व्हर्च्युअल रिआलिटी आणि एआय सहज उपलब्ध होत आहेत, त्यासंदर्भात? आपल्याला पर्सनलाईज्ड आणि खाजगी ऑनलाईन अनुभव येतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?

मला ज्ञानवाटप करायचं नाहीये. आपल्याला कुणालाच माहीत नाही भविष्य काय हे सांगता येणार नाही. जग कसं दिसेल; कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संपूर्ण पटच कसा बदलेल यांची आपल्यापैकी कोणीही कल्पना करू शकत नाही. मी या सगळ्याबद्दल बहुतांशी आशावादी आहे. मला असं वाटतं की आपण स्वतःसाठी जो अनुभव तयार करू, क्युरेट करू शकतो – त्यात आपल्याला हव्या असणाऱ्या कला, संगीत, सिनेमे, साहित्य वगैरे आपण बघतो, ऐकतो, वाचतो – तो अधिक व्यक्तिगत असू शकतो. कुणी साहित्य, कला निर्माण करणारे आहेत, तर कदाचित त्यांना त्यांचा आपापला वाचकवर्ग, श्रोतृवर्ग सापडेल. परंतु फार कमी लोक मुख्य प्रवाहात प्रवेश करते होतील.

मला वाटत नाही की सगळं काही वाईटच होईल, डिस्टोपिया छापाचं, जिथे प्रत्येक व्यक्ती आपापल्या एको चेंबरमध्ये स्वतःच्या कहाण्या आणि स्वतःच्या वास्तवात राहून इतरांपासून, समाजापासून फटकून राहील. शेवटी, मानव हा सामाजिक प्राणी आहे. तंत्रज्ञान आणि बदलणारा समाज यांमुळे अशांतता निर्माण होईल; आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल. पण तो मार्ग आपण शोधून काढू आणि नवीन पद्धतीनं स्थैर्य शोधू. मी अधिक सकारात्मक आहे. पण या सगळ्याचं नेमकं स्वरूप काय असेल, हे आपल्यापैकी कोणालाच आत्ता कळण्याची शक्यता नाही.

तू सध्या काय ऐकत आहेस? कुठले सिनेमे आणि पुस्तकं तुझ्यासमोर आहेत? कुठल्या लेखक, पुस्तकांनी तुझ्यावर छाप सोडली आहे?

आणि सध्या 'लाईफ लेसन्स'मध्ये काय सुरू आहे?

लोक नेहमी विचारतात, 'AI हे घेणार आहे, AI ते घेणार आहे, तर महत्त्वाची कौशल्यं कोणती?' आणि हा एक बहुमोल प्रश्न आहे, कारण आता आयुर्मान आणि आरोग्यकाल वाढत जाणार. आणि माझ्या मते, जो आज २० वर्षांची व्यक्ती १२० वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगेल. म्हणजे असं नाही की १२०पर्यंत जगणं पण त्यात ५० वर्षं रोगट-आजाराची, तर निरोगी आयुष्य १२०पर्यंत. जीवनवाढीच्या विज्ञानात आणि वैद्यकात जे प्रगती होत आहे, त्यामुळं हे शक्य आहे असं वाटतं. अशा स्थितीत आपण एकच आयुष्य विचारात घेत नाही.

आधी काय व्हायचं, की आपण सगळेच शाळा-कॉलेज करायचो. काही तरी एक विषय धरून त्यात करिअर करायचो आणि तो करिअर ट्रॅक पकडून फार तर व्हाईस प्रेसिडेंट किंवा सी. ई. ओ. व्हायचो. मग नोकरीतून निवृत्ती आणि जगण्यातूनही. हा एक करिअर ट्रॅक झाला – पण आता लोकांना आयुष्यात वेगवेगळे ट्रॅक चोखाळून पाहण्याची संधी आहे. साधारण दरेक वीस वर्षांनी, आपण पूर्णपणे निराळं काही तरी करून पाहू शकतो. पण हे कधी शक्य आहे, तर जेव्हा आपण यामागचं पायाभूत कौशल्य आत्मसात केलेलं असेल. ते म्हणजे, 'शिकायचं कसं हे शिकणं'! आता यात काय काय अंतर्भूत आहे? यात केवळ मानसिकतेतला बदल गरजेचा आहे की काही साधनं वा काहीएक चौकट असणं आवश्यक आहे? तर आपण सुरुवात अर्थातच लेखन आणि संवादसाधनाच्या बाराखडीपासून करणार आहोत. गणित, quantitative intuition – म्हणजे संपूर्ण चित्र स्पष्ट नसतानाही योग्य तो निर्णय कसा घ्यावा, संभव्यता सिद्धांत (probabilistic theory) यांचीही उजळणी करणार आहोत. मानसिकता, मानसिक चौकट यांसंबंधींच्या चर्चांसोबतच तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक आरोग्याची जबाबदारी उचलण्यास मदत करणारेही विभाग (modules) यात असतील. आपण जगभरातील घडामोडींबद्दल सजग असतो, पण खुद्द आपल्या शरीरात काय चाललं आहे याकडे फारसं लक्ष पुरवत नाही. जवळपास आपण सगळेच त्यातले! वैयक्तिक आरोग्याबद्दलचा विभाग हा हेच ध्यानी घेऊन तयार केला आहे. आर्थिक बाबींबद्दलचं मॉड्युल हे सर्वांकरताच महत्त्वाचं आहे – पण मला वाटतं, स्त्रियांकरता अधिकच. कारण बव्हंशी स्त्रिया 'घरातला कर्ता पुरुष काय ते बघून घेईल!' अशा मानसिकतेत वाढलेल्या असतात, जरी त्या पुरुषाहून अधिक कमावत असल्या तरीही.

तर याची स्त्रियांना मदत होईलच, पण खरं तर प्रत्येकाच्या दृष्टीनेच ते उपयुक्त आहे. स्पष्टच सांगायचं तर, पन्नाशी उलटली तरी मला अद्याप माझ्या वैयक्तिक आर्थिक बाबींची फारशी कल्पना नाही; हे अजयचं क्षेत्र! तो याबद्दल लोकांना शिकवतो. मीदेखील ह्या मॉड्युलमधून शिकेन. 'लाईफ लेसन्स' मागची संकल्पना हीच आहे.

*

हा लेख वाचणाऱ्या सगळ्या वाचकांना मी 'जगाबद्दल आशावादी राहा' असं सांगू इच्छितो. जे जे काही चुकीचं घडत आहे, त्याकडेच पाहून निराश होणं अगदी सोपं आहे. पण असं पाहा, अगदी तुमच्या राहत्या सोसायटीच्या वॉचमनसमोर सम्राट अकबरापेक्षाही अधिक सुविधा हात जोडून उभ्या आहेत. हा लेख वाचणाऱ्या जवळजवळ सगळ्यांनाच आपल्या आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध आहेत – आधुनिक तंत्रज्ञान असो, सुखसोयी असोत वा अगदी सक्षमीकरणही. अर्थात, अजूनही जगासमोर अनेक गंभीर समस्या आ वासून उभ्या आहेत; पण जुन्या जगापेक्षा ते कितीतरी अधिक चांगलं आहे. भविष्यातल्या मोठ्या कालावधीकडे समग्रपणे पाहिलं, तर ते अधिकाधिक चांगलं होत जाईल यात शंका नाही. म्हणूनच, मी तुम्हाला सतत आशावादी राहा असंच सांगेन. त्यासोबतच अंगी अधिक सहानुभूती बाळगा. भेटणारे लोक आणि येणारे अनुभव यांचं मोल लक्षात घ्या; आणि निव्वळ बेत आखत बसण्याच्या सापळ्यात न अडकता, तुमचा कल कृतीच्या बाजूने असू द्या (a bias for action). एखादी गोष्ट करायची असेल तर त्यात स्वत:ला झोकून द्या आणि अधिकाधिक खोलवर बुडी कशी मारता येईल, ते पहा. आपल्या सगळ्यांकडे एकच आयुष्य आहे, ते अतिविचारांत घालवू नका, कृती करा! अनेकानेक धन्यवाद!

***

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फार फार आवडलंय!

>>>
आणि निव्वळ बेत आखत बसण्याच्या सापळ्यात न अडकता, तुमचा कल कृतीच्या बाजूने असू द्या (a bias for action). एखादी गोष्ट करायची असेल तर त्यात स्वत:ला झोकून द्या आणि अधिकाधिक खोलवर बुडी कशी मारता येईल, ते पहा. आपल्या सगळ्यांकडे एकच आयुष्य आहे, ते अतिविचारांत घालवू नका, कृती करा
>>>>
Loved this!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही म्हणजे, ‘नंदन’ या आयडीचे आपण जुनेपुराणे फॅन आहोत. (नि त्यातसुद्धा बोनस म्हणजे, ‘नंदन’ हा पुरुषसदृश आयडी आहे. (चूभूद्याघ्या.)) परंतु तरीही…

लेख खूपच लांबलचक झाला आहे. इतके लांबलचक काही वाचण्याचा पेशन्स (वयोमानपरत्वे म्हणा, किंवा अन्यथा म्हणा) माझ्याजवळ नाही. (सामान्यतः नाही, आणि, दिवाळी अंक वाचताना तर नाहीच नाही.)

अर्थात, लेखकास म्हणा, किंवा ज्याची मुलाखत घेतली आहे, त्यास म्हणा (हादेखील एक पुरुषसदृश आयडी आहे, असे समजते; चूभूद्याघ्या.), यातून काही महत्त्वाचे सांगायचे असू शकते, ही शक्यता मी नाकारीत नाही. सबब, कोणीतरी त्याचा गोषवारा (शक्य तोवर एका परिच्छेदात) सोबत मांडू शकेल काय? (आगाऊ धन्यवाद!)

प्रस्तुत दिवाळी अंकात इतरही अनेक लेख आहेत, जे (१) पुरुषसदृश आयडींनी (चूभूद्याघ्या.) लिहिलेले आहेत, आणि, (२) (माझ्या दृष्टीने) नीरस, रटाळ, लांबलचक किंवा गेला बाजार मला ज्याच्यात काडीमात्र रस नाही अशा बाबतींतले आहेत. त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचे मी कटाक्षाने टाळले आहे; मात्र, ते लेख पुरुषसदृश आयडींनी लिहिलेले आहेत, या कारणास्तव नव्हे. (काही थोडे स्त्रीसदृश आयडींनीही लिहिलेले आहेत, ज्यांवरही मी कोणतेच मतप्रदर्शन केलेले नाही, परंतु तो मुद्दा सोडा.) एक तर ते सर्व (बहुतकरून) गेस्ट आयडी आहेत; (यंदाचा) दिवाळी अंक वगळल्यास इथे ते चुकूनसुद्धा फिरकत नाहीत (थँक गॉड!), सबब, त्यांना विनाकारण दुखविण्यात मला फारसे स्वारस्य नाही. दुसरे म्हणजे, त्यांच्या लेखांत थोडेबहुत उपयुक्ततामूल्य असू शकेलही (भले मला ते वाचण्याचा — आणि त्यातही विशेषेकरून दिवाळी अंक वाचीत असताना — यत्किंचितही मूड होत नसला, तरीही). (कदाचित ही मंडळी आपापल्या क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी असू शकतीलही, आणि काही महत्त्वाचे प्रतिपादन करीत असू शकतील; भले माझ्या ते डोक्यावरून जात असले, आणि/किंवा मला ते कंटाळवाणे वाटत असले, तरीही. म्हणूनच ‘उपयुक्ततामूल्या’चा उल्लेख केला.) त्यांचे लेखन मी (मला त्यात काडीमात्र रस नसण्याच्या बावजूद) सहन करू शकतो; मात्र, दिवाळी अंकात त्याचा अंमळ ओव्हरडोस होऊ शकतो, एवढेच सुचवायचे आहे. If anyone cares to listen, that is. (स्वगत: च्या**, दिवाळी अंक आहे, की academic symposium?)

कदाचित, असे बाहेरच्या तज्ज्ञांकडून मुद्दाम मागविलेले माहितीपर लेख/मुलाखती वगैरे अशा एकाच वेळेस वाचकांच्या डोक्यांवर धडाम्-कन न आदळता, वर्षभरातून हळूहळू, एकएक करून skew केल्यास, कदाचित वाचकांकरिता ते अधिक सह्य होऊ शकेल काय? (झटका वि. हलाल, किंवा हळूहळू तापमान वाढत जाणाऱ्या पाण्यातील बेडकांसारखे?) तसेही, ‘एखाद्या थीमला वाहिलेला विशेषांक’ या संकल्पनेच्या एकंदर उपयुक्ततामूल्याबद्दल दिवसेंदिवस शंका (मला) येऊ लागली आहे.

सरतेशेवटी, Is it just me, or does anyone else also feel that this entire Diwali Ank (barring very few exceptions) is utterly boring (not to say overbearing)?

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा शांत पडा की बाजूला.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

अमित वर्माची मुलाखत आणि विचार सादर करण्याबद्दल धन्यवाद.

त्यांचे हे विचार हे वयाच्या पंधरा वयाच्या पुढच्या लोकांसाठी आहेत असं म्हणेन. लहान मुलांना उत्साह, कुतुहल आशा खूप असतात.त्यांच्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे पालकांना स्वतःलाच आवडणाऱ्या गोष्टीचं नाही तर आवड नसलेल्या, माहीत नसलेल्या गोष्टीही मुलांना दाखवायला हव्यात. कारण त्यांच्यापेक्षा मुलांची आवड वेगळी असू शकते. पण मुलांना स्वतः जाता येत नाही. घडवण्याचं वय तीन ते पंधरा असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदनराव,
मुलाखत आवडली .
आता यातील जमेल ते ऐकणे आले.
एक प्रश्न असा आहे, की हे सहा ते दहा तासांचे पॉडकास्टस हे जरा जास्तीच मोठे वाटतात.
खूप ऐकले जातात का हे ?
मी नेटाने प्रयत्न करायचा प्रयत्न करणारे.
हि माहिती इथे आणल्याबद्दल खास आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली मुलाखत. अमीत वर्माचा आवाज चांगला आहे. भाषादेखिल चांगली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************