सोशल मीडियावर सरकारी अधिकारी
सोशल मीडियावर सरकारी अधिकारी
- सुप्रिया देवस्थळी
मी गेली २३ वर्षं केंद्र सरकारच्या नोकरीत आहे. यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा मी २००१मध्ये उत्तीर्ण झाले आणि माझी Indian Civil Accounts Serviceमध्ये निवड झाली. सरकारी सेवेत असताना यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मी अनेक वर्ष मार्गदर्शन करत आहे. एक दिवस ह्या स्पर्धा परीक्षांबद्दल घरात बोलणं सुरू असताना माझ्या १७ वर्षांच्या मुलीने मला एका तरुण अधिकाऱ्याच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्टचा दाखला दिला. तिचं बोलणं ऐकल्यावर मला अचानकच जाणवलं की अनेक सरकारी अधिकारी समाजमाध्यमांवर खूप सक्रिय आहेत आणि त्यांचा मोठा प्रभाव तरुणांवर आहे. ह्यात तरुण अधिकारी मोठ्या प्रमाणात असले तरी मध्यमवयीन अधिकारी पण बरेच आहेत. मग मला हा सगळा ऑफिसर्स आणि समाजमाध्यम कॅनव्हास बघावासा वाटला. त्यातून मला जे जे जाणवलं ते मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
इन्स्टाग्राम, एक्स, लिंक्डीन, यूट्यूब, फेसबुक, टेलिग्राम, व्हॉट्सॲप अशा सर्वच माध्यमांवर अधिकाऱ्यांचा वावर आहे. एक अधिकारी अनेक माध्यमांवर लीलया पोस्ट करत असतात. ह्या पोस्ट म्हणजे फक्त मजकूर नव्हे, ह्या पोस्टमध्ये फोटो असतात, वैयक्तिक आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांचे फोटो असतात, ऑफिसात काम करतानाचे फोटो असतात, कामाच्या ठिकाणचे व्हिडिओ पण असतात. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने पूरग्रस्त भागाला भेट दिली असेल तर त्याच्या सरकारी लवाजम्यासहित पाण्यातून वाट काढत जातानाचा व्हिडिओ असतो. एखादा पोलीस अधिकारी असेल तर एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी पाहणी करतानाचा त्याचा व्हिडिओ. एवढंच नव्हे तर रुबाबात गॉगल लावून, कमरेला पिस्तूल लटकवून पोलिसांच्या वेशात गाडीतून उतरतानाचा व्हिडिओसुद्धा असू शकतो.
ह्या प्रकारच्या पोस्ट टाकण्यामागे काय उद्देश असावेत? एक उद्देश आपण ज्या अधिकारी पदावर आहोत ते सर्वांना दाखवणे. ह्या पदामुळे मिळणाऱ्या सत्तेचा अभिमान असतो आणि त्यातूनच सत्तेची प्रतीकं (सरकारी गाडी, दिमतीला असणारी माणसं) दाखवावीशी वाटतात. मुळातच आपल्या समाजात सरकारी नोकरीचं आकर्षण खूप आहे, त्या नोकरीमुळे मिळणाऱ्या गाडी बंगला ह्यांचं कौतुक आहे. त्यामुळे हा सर्व तामझाम दाखवणाऱ्या पोस्टना लाइक मिळणार हे नक्कीच. हे तामझाम दाखवणाऱ्या ऑफिसर्सना फॉलो केलं जाणार हेही नक्की. आपल्या पोस्टना हजारोंत लाइक मिळणं किंवा आपले लाखोंनी फॉलोवर्स असणं हे कोणाला आवडणार नाही? ह्या गटातल्या अधिकाऱ्यांची आपसांत स्पर्धा लागली तर नवल नाही. अमुक अमुक आयएएएस ऑफिसरचे ५ लाख फॉलोवर्स आहेत मग माझे पण असेच लाखोंत फॉलोवर्स असावेत असं वाटणं साहजिक आहे.
नव्याने अधिकारी झालेले अनेक जण आपल्या यशोगाथा सांगायला उत्सुक असतात. विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनलेल्यांचे अनुभव ऐकण्यात रस असतो. मग मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना मायक्रोनोट्स कशा काढल्या, अभ्यासाचं वेळापत्रक कसं ठरवलं, मुलाखतीच्या तयारीचा भाग म्हणून मॉक इंटरव्ह्यू किती आणि कुठे दिले असे अनेक तपशील हे अधिकारी पुरवतात. ह्यातून त्या अधिकाऱ्यांना आपला यशाचा प्रवास इतरांशी शेअर केल्याचा आनंद मिळत असणार आणि उमेदवारांना जी स्फूर्ती आणि प्रेरणा अपेक्षित असते ती मिळत असणार. स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या पोस्टना पर्सनल टच असतो, इमोशनल अपील असतं.
आपल्या कामासंबंधी पोस्ट करणारे अधिकारी असतात. सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल ह्यातून माहिती दिली जाते. किंवा देशापुढे असणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांबद्दल पोस्ट केलेली असते. कोविड काळात एका ऑफिसरने स्वतः लस घेतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्याबरोबर लस घेणं हे कसं महत्त्वाचं आहे ह्याबद्दल माहिती दिली होती. अशा पोस्टचा लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच उपयोग झाला असणार. माझ्या माहितीतल्या एक ऑफिसर नियमितपणे साड्या, हातमागावर विणल्या जाणाऱ्या गोष्टी अशा विषयांवर लिहितात. त्यांना फॉलो करणाऱ्या अनेक जणी म्हणतात की ह्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या साड्यांची माहिती मिळते आणि ते साड्यांचे प्रकार वापरायला प्रेरणा मिळते.
समाजमाध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे प्रत्येकालाच व्यक्त व्हावंसं वाटायला लागलं आहे आणि त्यामुळे समाजमाध्यमांवर पोस्ट्सचा महापूर आलेला आहे. अधिकारी हा समाजाचाच भाग असतो. विशेषतः तरुण अधिकाऱ्यांना समाजमाध्यमांच्या ग्लॅमरचा मोह पडला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. आपला ब्रँड किंवा आपली इमेज बनवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर हा त्याच मोहाचा एक भाग असतो.
ऑफिसर्सनी समाजमाध्यमांवर सक्रिय राहावं की राहू नये, वैयक्तिक पोस्ट टाकाव्या की टाकू नयेत, आपल्या अधिकारपदाचं प्रदर्शन करावं की करू नये असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. ह्या प्रश्नांची उत्तरं साधी सरळ सोप्पी नाहीत. अनेक वेळा अधिकारी समाजमाध्यमांवर ज्या पोस्ट टाकत असतात त्या त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवरून टाकत असतात. त्यामुळे तिथे काय लिहावं आणि काय लिहू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. पण ह्यात मेख अशी आहे की पाहणारा माणूस प्रत्येक वेळी वैयक्तिक अकाउंट आणि ऑफिशियल अकाउंट असा फरक पाहीलच असं नाही. त्याहीपुढे जाऊन ऑफिसर लोकांना ऑफिसर म्हणूनच समाजात पाहिलं जातं. त्यांनाही वैयक्तिक आयुष्य असतं ह्याचा विचार केला जाईलच असं नाही. त्यामुळे ऑफिसर्सना समाजमाध्यमांवर काही पोस्ट करताना थोडं तारतम्य बाळगावं लागतंच. कोणी हे तारतम्य पाळत नाहीत, कोणी पाळतात. स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांना मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पोस्टमध्ये बहुतेक वेळा सरकारी सेवांचं उदात्तीकरण केलेलं असतं. गाडी-बंगला ह्या म्हटलं तर वरवरच्या गोष्टी आहेत. सरकारी नोकरीत जबाबदारी असते, ताणतणाव असतात, पगार खाजगी क्षेत्रात असतात तेवढे नसतात. अनेक वेळा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत अती विश्वास मुलांना दिला जातो. हे अजिबातच योग्य नाही. प्रत्येक उमेदवार स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतोच असं नाही. ज्याची मुळातच क्षमता नाही त्याला वृथा आत्मविश्वास देऊन त्या उमेदवाराचंच नुकसान होणार असतं. अधिकाऱ्यांची वागणूक कशी असावी ह्याचे नियम ठरवलेले आहेत. त्यांना Conduct Rules असंही म्हणतात. हे नियम अनेक वर्षांपूर्वी केले गेले. ह्यात अनेक मुद्दे आहेत, उदाहरण सांगायचं झालं तर कुठच्याही राजकीय स्वरूपाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी सहभागी होणं अपेक्षित नाही. कुठच्या खाजगी कंपनीचा व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करणं अपेक्षित नाही. सरकारवर टीका करणारं काही बोलणं किंवा लिहिणं अपेक्षित नाही. हे नियम जेव्हा तयार केले गेले तेव्हा समाजमाध्यमं नव्हती. समाजमाध्यमांवर अधिकाऱ्याचं वागणं किंवा वावर कसा असावा ह्याबद्दल ठोस नियम अजून नाहीत. अर्थात मुळातल्या नियमांमागे जो विचार आणि उद्दिष्ट आहेत तीच इथे पण लागू आहेत तरीही समाजमाध्यमांचे काही विशेष आहेत आणि त्यामुळे त्यासंबंधी काही नियम तयार होणं हे आता गरजेचं व्हायला लागलं आहे.
समाजमाध्यमं हे अनेक लोकांशी त्वरित संवाद साधण्याचं प्रभावी साधन आहे. सरकारी अधिकारी सामान्य लोकांसाठी काम करत असतात त्यांनाही आपल्या कामाचा भाग म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता असतेच. सरकारी कामांची, योजनांची माहिती लोकांपर्यंत चटकन पोचवण्यासाठी समाजमाध्यमं उपयोगाची असतात. त्यामुळे ह्या समाजमाध्यमांचा योग्य वापर करण्यावर अधिकाऱ्यांनी भर देणं आवश्यक आहे.
(छायाचित्रे समाजमाध्यमांवरून साभार)
प्रतिक्रिया
कायद्या चे राज्य,राज्यघटनेचे तंतोतंत पालन करणे
कायद्याचे राज्य निर्माण करणे आणि राज्य घटनेचे तंतोतंत पालन करणे .
हे सरकार चे काम आहे कारण भारतात सरकार लोकनियुक्त असते.
त्या नंतर कायद्याचे राज्य आणि राज्य घटनेचे तंतोतंत पालन करणे ह्याची जबाबदारी .
न्याय व्यवस्था.
प्रशासकीय अधिकारी ह्यांची आहे.
प्रशासकीय अधिकारी सोशल मीडिया वर येवून.
१) ठराविक विचाराचा प्रचार करत असतील.
२) त्यांच्या कामाची जाहिरात करत असतील.
३) आयएएस,आयपीएस परीक्षांचे मार्गदर्शन करत असतील.
.
४) स्वतचं विचार धर्म,जात,भारत सरकार ची धोरणे, कायदा ह्या विषयी व्यक्त करत असतील.
आणि हे भारतीय कायद्यात बसत नसेल ,भारतीय राज्य घटना अशी परवानगी देत नसेल .
तर मात्र गंभीर विषय आहे
!
हं…
(मार्मिक हं, राजेशबापू!)
स्तुतीसुमने कुणाला नको आहेत?
स्तुतीसुमने कुणाला नको आहेत?
पुन्हा त्यात गुलाब घ्या, चाफा घ्या, कमळ ?