नैसर्गिक शेती - भाग १
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
-----
नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.
...
"नैसर्गिक" शेती म्हणजे काय, याकडे वळण्यापूर्वी मुळात शेती ही अनैसर्गिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. माणसाने आपल्या आजूबाजूच्या निसर्गावर वरचढ होण्याची सुरूवात झाली ती आगीच्या शोधापासून. पण यापासून वरच्या पातळीवर उडी मारली गेली ती माणूस भटके जीवन सोडून शेती (यात पशुपालनही आले) करू लागला, आणि वसाहतींमध्ये स्थिरावला तेव्हा. अर्थात औद्योगिक क्रांतीनंतर तर माणूसरूपी उंटाने निसर्गाचा सगळा तंबू काबीज करून पार खिळखिळा करून टाकला आहे.
कित्येक एकर जमिनीवर निसर्गात मूलतः असलेली जैवविविधता दूर करून एकाच विशिष्ट वनस्पतीची किंवा प्राण्याची पैदास करणे म्हणजे शेती असे व्यापक अर्थाने म्हणता येईल. त्याहीपुढे जाऊन निसर्गात सापडणाऱ्या उपयुक्त वनस्पती किंवा प्राण्यांच्या पुनरुत्पादन क्रियेत ढवळाढवळ करून माणसाने आपल्याला सर्वात फायदेशीर ठरतील अशी वाणे निर्माण केली आहेत, आणि त्यांचीच पैदास आपण शेतीतून करत असतो. अगदी ज्यांना आपण देशी वाणे म्हणतो, तीही शेतीच्या सुरूवातीच्या काळात माणसाने निरीक्षणांतून केलेल्या निवडींतून तयार झालेली वाणे आहेत. उदा. उभ्या पिकात काही रोपांना भरदार कणसे लागली, तर त्यातलेच काही दाणे पुढच्या वर्षीचे बी म्हणून वापरले गेले, जास्त दूध देणाऱ्या गायींचाच वंश जास्त निगुतीने वाढवला गेला, इ. तेव्हा कितीही नैसर्गिक वगैरे म्हटले तरी शेती म्हणजे मुळात निसर्गाच्या व्यवहारात केलेली एक प्रचंड मोठी ढवळाढवळ आहे, हे प्रथम मान्य करायला हवे.
---
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
एखाद्या माणसाचे एखाद्या
:D एखाद्या माणसाचे एखाद्या विषयाबाबत जरा नाव झालेले असेल, तर त्याला त्या किंवा जगातल्या सगळ्याच विषयांबाबत सगळे ज्ञान असेलच असे नाही! त्यामुळे या चर्चेतून मलाही काही नवीन शिकायला मिळेलच. किंबहुना तसे वाटल्यामुळेच लिहिण्याचा उत्साह आहे.
असो. पण माझा मुद्दा नेमका हाच आहे की - विषमुक्त (किंवा आणखी काही मुक्त किंवा युक्त) म्हणजे "नैसर्गिक" नव्हे. तसे असेल तर विषारी सापांना काय म्हणणार? आणि विष ही संकल्पनाही तसे पाहिले तर सापेक्षच आहे. एकाचे विष हे दुसऱ्याचे वरदान ठरू शकते (कसे, हा मुद्दाही पुढे मालिकेत येईल). शिवाय सापाचे विषही रक्तात गेले तर विषारी आहे, प्यायले तर नाही. (शंकराने हालाहल पचवले म्हणून त्याचे महात्म्य आहे, पण तुम्ही आम्ही सुध्दा जगातल्या विषारीतल्या विषारी सापाचे विष पचवू शकतो, हे फार थोड्या लोकांना माहीत आहे!)
मेघना ताई , बर्याच दिवसांनंतर
मेघना ताई , बर्याच दिवसांनंतर उत्तर देतो आहे, मी लेखिका गोंधळलेली आहे हे का म्हंटले. लेखिका स्वत: म्हणते आहे,
"नैसर्गिक" शेती म्हणजे काय, याकडे वळण्यापूर्वी मुळात शेती ही अनैसर्गिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
या शिवाय त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत,
आता तुम्हीच सांगा माझा सारखा सामान्य माणूस काय निष्कर्ष काढेल. शिवाय लेखिकेचे दुसर्यांप्रती काय मत आहे. हे हि स्पष्ट आहे. विद्वान व्यक्ती गोंधळू शकत नाही का? लेखमाला वाचल्या वर एवढेच म्हणेल जर शीर्षक 'निसर्ग आणि शेती' असे असते तर निश्चित मी तसा प्रतिसाद दिला नसता. पण प्रतिसाद का दिला हे याचा विचार न करता दुसर्याचे डोके काढणे याला काय म्हणावे
मीही लिहिणार आहे इथे
मीही लिहिणार आहे इथे बरेच.धागा कोणत्या वळणाने जातोय हे पाहतो.
१) अगोदरच्या विश्वाच्य मालिकेत सर्वाइअवल-- यासाठी प्रकार सजीव स्वत: क्लुप्त्या लढवतात,नै० शे०मध्ये मनुष्य आणखी ढवळाढवळ करतो.
२) वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न अधिक निर्माण व्हावे म्हणून अधिक उत्पन्नाच्या जातीच वाढवण्याकडे कल.साध्या भारतीय गायीऐवजी परदेशी भरपूर दुध देणाय्रा गायी ठेवणे.
३)एकाच वळूचे बीज फ्रीज करून वापरत राहिले तर विविधता नष्ट होईल.
कित्येक एकर जमिनीवर निसर्गात
कित्येक एकर जमिनीवर निसर्गात मूलतः असलेली जैवविविधता दूर करून एकाच विशिष्ट वनस्पतीची किंवा प्राण्याची पैदास करणे म्हणजे शेती असे व्यापक अर्थाने म्हणता येईल.
प्रियदर्शिनी मॅडम, तुम्ही मांडलेला मुद्दा एकदम सॉलीड आहे. मस्त निरिक्षण आहे तुमचे. हॅट्स ऑफ्फ टू यू !!!
छान लेख!
मूळात शेतीच अनैसर्गिक आहे यात प्रश्नच नाही.
राहुल सांकृत्यायन यांच्या वोल्गा ते गंगा यातील एक उतारा पहा-
"आणि या धरणीचं वक्षःस्थळ या पाप्यांनी चिरून टाकलं. आणि काय केलं बरं?"
"हां, ऋषी केली, शेती केली. गहू पेरला, जव पेरला, तांदूळ पेरला. आज पर्यंत कुणी असं केलेलं ऐकिवात नव्हतं. आमच्या पूर्वजांनी आपल्या मातेचे वक्ष असे चिरले नव्हते. धरणीमाता आमच्या जनावरांना गवत द्यायची आणि आम्हाला गोड फळे द्यायची.
आता आम्ही पेरल्यावर तसे पेरदार गवत मिळत नाही. आमची जनावरे आता पूर्वीसारखी धष्टपुष्ट नाहीत. पूर्वी एक गाय अख्ख्या टोळीला खायला पूरत असे. आता ना तश्या गाई ना घोडे ना मेंढे! जंगलातली हरणे आणि कोल्हीही आताशा तितकी मोठी नसतात. माणसांचे आयुष्यही पूर्वीपेक्षा कमी होऊ लागलेय. हा भूमातेचा प्रकोप नाही तर काय?"
"वत्सा, आमचे पूर्वज गहू खात नव्हते. इथल्या जंगलात गहू आपोआप उगवतो पिकतो. आमचे घोडे आणि गाई या गव्हावर धष्टपुष्ट होत. माणसाला खाण्यासाठी विविध गोड फळे, अनेक प्रकारचे प्राणी आहेत. हा सगळा आहार धरणीमाता आम्हाला आनंदाने देत होती. तळपट होवो त्या (मद्र) लोकांचे ज्यांनी ही जुनी वाट सोडून नवी वाट शोधून काढली."
" या शेतीला हरणे आणि डूकरांनी त्रास देऊ नये म्हणून माणसे एका जागी राहू लागली. शेते म्हणजे माणसांना बांधून ठेवणारे खुंटे झाले. पण वत्सा, माणसे एका जागी बांधून रहायला का जन्मली? जी गोष्ट देवांनी केली नाही ती या मद्रांनी आणि त्यांच्या पशूंनी करून दाखविली."
ही गोष्ट राहुलजींनी इ. स. पूर्व २५०० मधली म्हणून लिहिली आहे.
छान. अगदी मुळापासून सुरूवात.
छान. अगदी मुळापासून सुरूवात.
"कित्येक एकर जमिनीवर निसर्गात मूलतः असलेली जैवविविधता दूर करून एकाच विशिष्ट वनस्पतीची किंवा प्राण्याची पैदास करणे म्हणजे शेती असे व्यापक अर्थाने म्हणता येईल."
फूलशेती वगैरे वगळता या विशिष्ठ वनस्पती अन्ननिर्मितीसाठी असतात हे त्यात मिळवता येईल काय? व तसे केले नसते तर पुरेसे अन्न मिळवता आले असते का, हेही.
"तेव्हा कितीही नैसर्गिक वगैरे म्हटले तरी शेती म्हणजे मुळात निसर्गाच्या व्यवहारात केलेली एक प्रचंड मोठी ढवळाढवळ आहे, हे प्रथम मान्य करायला हवे." मान्य. बाकी कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा वापर हे न करता जर हे केले तरी ही ढवळाढवळ अक्षम्य ठरेल काय?
या मालिकेतला आपला हा पहिलाच लेख आहे. पुढील लेखांमध्ये याबाबतीत अधिक येईल अशी आशा करतो.
सुरुवात आकर्षक आहे. सातींनी
सुरुवात आकर्षक आहे. सातींनी दिलेला उताराही रोचक आहे. बहुतेक मध्ययुगीन व आधुनिक दु:खांच्या मुळाशी शेतीचं तंत्रज्ञान आहे हे मला पटतं.
स्लॅश ॲन्ड बर्न वगैरे प्रकार शेतीच्या अगदी सुरुवातीपासून असावेत बहुधा.
मुळात नैसर्गिक कशाला म्हणावे इथपासूनच घोळ चालू होतो. आपण समजतो तितकी आपल्याला फ्री-विल नाही पण विचारशक्ती मात्र आहे. त्यामुळे निसर्गाचा भाग असल्याने माणूस करेल ते सगळं नैसर्गिक म्हणायचं की फारशी विचारशक्ती नसलेल्या प्राण्यांसारखं राहणे याला नैसर्गिक म्हणायचं यातच गोंधळ आहे.
नैसर्गिक कशाला म्हणायचे
नैसर्गिक किंवा अनैसर्गिक वर्तन नेमके कशाला म्हणता येईल, हा खरेच विचार करण्याजोगा प्रश्न आहे. याबाबत मला सुचलेले उत्तर असे –
सजीवांसमोर निसर्गचक्रामुळे वेगवेगळी आव्हाने उभी रहातात. त्यांच्या आजुबाजूची परिस्थिती सतत बदलत असते, आणि त्या परिस्थितीवर ते कशी मात करतात, किंवा तिचा कसा वापर करून घेतात, यांवर त्यांचे तगणे अवलंबून असते. माणसाखेरीज इतर सर्व सजीव निसर्गाच्या या आव्हानांना आणि संधींना केवळ आपल्या अंगभूत क्षमतेनुसार आणि आनुवांशिक गुणधर्मांनुसार सामोरे जातात. ही पूर्णतः तात्कालिक प्रतिक्रिया असते, आणि प्रत्येकवेळी तीच परिस्थिती पुन्हा आली, तरी पुन्हा नव्याने त्यावर प्रतिक्रिया दिली जाते. उदा. पाऊस पडू लागला तर आडोसा शोधणे आणि पावसाने एखाद्या पाणवठ्यावर भरपूर पाणी जमा झाले, तर पाणी असेपर्यंत तिथे मुक्काम ठोकणे. माणूस मात्र आपल्या बुध्दीच्या आधारे नैसर्गिक आव्हानांवर कायमची उपाययोजना शोधत जातो, तर संधींपासून कायमस्वरूपी फायदा मिळवण्यामागे असतो. उदा. पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी छत्रीचा वापर करणे, आणि एखाद्या पाणवठ्याच्या क्षेत्रात ठराविक काळात भरपूर पाऊस पडतो हे पाहिल्यावर ते पाणी अधिक काळ टिकून रहावे यासाठी बंधारे वगैरे बांधणे. निसर्गचक्राच्या कलाकलाने जगत-तगत रहाणे म्हणजे नैसर्गिक, तर बुध्दीचा वापर करून निसर्गचक्राच्या आव्हानांची तीव्रता कमी करणे, आणि संधींपासून दीर्घकालीन फायदा मिळवणे हे वर्तन अनैसर्गिक म्हणता येईल. अर्थात अनैसर्गिक या शब्दाला जो नकारात्मक अर्थ आहे, तो कितपत बरोबर आहे, हा याच्या पुढचा प्रश्न आहे!
कमीतकमी!
ज्या भागात शेती आहे त्या भागातल्या एकंदर पर्यावरणात (इकोसिस्टीम) कमीतकमी ढवळाढवळ म्हणजे नैसर्गिक शेती असे वाटते .
अन्यथा गवत कापून तिथे आंब्याची कोय जरी पेरली तरी ती एकप्रकारची ढवळाढवळच असते.
एका बाजूला संकरित बियाणे/ भाजीपाल्याची वाणे, रासायनिक खते/संप्रेरके, कीटकनाशके , यंत्रे इतकेच नव्हे तर वातावरण (ग्रीन हाऊस) इत्यादी सगळे काही प्रचलित इकोसिस्टीमच्या बाहेरून आणून केलेली शेती ही अनैसर्गिक शेती म्हणता येईल.
याउलट त्या त्या भागातच उपलब्ध असलेल्या वनस्पतींची वाणे/बियाणी वापरणे, त्याभागात रहाणार्या वनस्पती आणि प्राणिज कचर्याचा वापर केलेली खते वापरणे, त्या भागातले पक्षी येतील अशी व्यवस्था करून कीटकांपासून शेती वाचविणे ही निसर्गाच्या जवळ जाणारी शेती म्हणता येईल.
काही लोक एखाद्या भूभागात कचरा/खते/ पाणी/ वनस्पतींची जात यांपैकी काहीच गोष्टीत ढवळाढवळ न करता केवळ येईल ते उत्पन्न घेतात. आणि त्याला नैसर्गिक शेती म्हणतात.
पण याला फूड गॅदरिंग म्हणता येईल, फार्मिंग नाही.
या अतिरेकी नैसर्गिक शेतीत तर बाहेरून एच टू ओ नावाचे केमिकल आणूनही शेतीला/झाडांना घालायचे नसते म्हणे! :)
हं
ही मीमांसा "इतर कमी बुद्धिमान प्राण्यांसारखं राहणे हे नैसर्गिक" याच्या जवळ जाते. म्हणजे ओटर्स वगैरे पडलेल्या झाडांच्या खोडांमध्ये घर करतात पण मुद्दाम जागा पाहून, भविष्याचा विचार करुन झाडं पाडत नाहीत तसे काहीसे.
काही लोकांचे म्हणणे असे आहे की माणूस निसर्गाचाच भाग आहे त्यामुळे माणूस करतो ते सगळे नैसर्गिक; आणि माणसाला हिरवळ, झरे आवडतात म्हणजे तसाच निसर्ग असे नव्हे. इतर नैसर्गिक घटकांमुळे वाळवंटे बनतात तशी माणसाच्या कृतीने हरित वाळवंटे (म्हणजे मैलोन्मैल पसरलेली मोनोक्रॉप शेती) किंवा खरीच वाळवंटे बनली तरी त्यात पर्यावरण बिघडले असे म्हणता येणार नाही कारण वाळवंट हेसुद्धा पर्यावरणाचेच दुसरे नैसर्गिक रुप आहे.
आता असे म्हटल्यावर नैसर्गिक शेती म्हणजे काय याबरोबरच नैसर्गिक शेतीची गरज काय यावरही लिहीले जावे असे वाटते.
"नैसर्गिक" शेती म्हणजे काय,
"नैसर्गिक" शेती म्हणजे काय, याकडे वळण्यापूर्वी मुळात शेती ही अनैसर्गिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
मानव हा देखील निसर्गाचाच भाग असल्यामुळे त्याने केलेल्या शेतीला नैसर्गिक म्हटले पाहिजे असं वाटतं.
किंवा दुसरा एखादा शब्द वापरावा (कोणता ते आत्ता मला सुचत नाही).
पारंपरिक?
**यावर इथे आधीच चर्चा झालेली दिसते. वाचतो.
तसे नसावे.अनैसर्गिक म्हणजे
तसे नसावे.
अनैसर्गिक म्हणजे कोणत्याही प्राण्याने 'ठराविक उद्देश डोळ्यासमोर / ठराविक कारणासाठी' ठेऊन सजीवांनी केलेला निसर्गातील बदल असे म्हणता यावे. जसे प्राण्यांनी आयत्या बिळात रहाणे हे नैसर्गिक (किंवा पुर्वी माणूसही आयत्या गुहांत रहात असे). पण घरे बांधणे (किंवा पक्षांनी घरटी बांधणे, काही किटकांनी घरटी किंवा वारूळासारख्या रचना करणे) हे कृत्रिम झाले.
प्राण्यापक्षांच्या विष्ठेतून किंवा फळे खाऊन उरलेल्या बिया टाकून नवीन झाडे आली तर ती नैसर्गिक म्हणायला हवीत कारण तिथे बी टाकताना झाडे उगवणण्याचा उद्देश नाही तो केवळ आपोआप झालेला परिणाम आहे. पण शेती करणे अनैसर्गिक झाले.
एक वादग्रस्त मतः या न्यायाने संभोगामुळे मुले झाली हा नैसर्गिक भाग झाला. पण मुले जन्माला घालण्यासाठी खास ठराविक वेळी संभोग करणे, इतर स्त्री/पुरुषांबद्दल आकर्षण वाटूनही ठराविक व एकाच व्यक्तीशी (लग्न वगैरे संस्था निर्माण करून) संभोग करणे, आपल्या भावांडांमध्ये आकर्षण वाटूनही संभोग न करणे हे अनैसर्गिक झाले. थोडक्यात सगळे अनैसर्गिक बदल/कृती हे अहितकारक असतीच असे नाही. (भावंडांमध्ये संभोग थांबल्याने आलेल्या जेनेटिक वेगळेपणाप्रमाणेच) शेतीसुद्धा अनैसर्गिक असली तरी माणसाला हितकारकच ठरली आहे!
पुढच्या लेखांकांची वाट बघत
पुढच्या लेखांकांची वाट बघत आहे.