नेमेचि येतो ऑस्कर सोहळा

नेमेचि येतो ऑस्कर सोहळा तसा तो ह्या वर्षीही येऊन गेला. मराठी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिलं तर ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’व्यतिरिक्त गेल्या वर्षभरात सांगण्यासारखं काहीच झालेलं नाही असा समज होणं साहजिक आहे. अर्थात, कोव्हिडच्या धक्क्यातून हॉलिवूडला सावरण्यासाठीच जणू २०२३मध्ये ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’ अवतरले होते त्यामुळे ह्या वर्षीच्या ऑस्कर नामांकनांत त्यांचा वाटा असणार हे उघड होतं. मात्र, २०२३ हे वर्ष इतरही अनेक चित्रपटांमुळे महत्त्वाचं ठरलं. आपल्याकडे (विशेषतः मराठीत) त्यांची फारशी चर्चा झालेली नसली तरीही त्यांचं प्रतिबिंब ऑस्करमध्ये कमी-अधिक प्रमाणात पडलेलं दिसतं. काही वर्षांपूर्वी #OscarsSoWhite हॅशटॅगद्वारे ऑस्कर पुरस्कारांवर टीका झाली होती. गोऱ्या वंशाच्या पुरुषांच्या गोष्टींनाच ऑस्कर नामांकनांत स्थान मिळतं ह्यावर त्या टीकेचा भर होता. त्यानंतर मतदानाचा हक्क असलेल्या सदस्यांत आणि नियमांतही काही बदल केले गेले. याचा परिणाम गेली काही वर्षं दिसतो आहे.


Past Lives (2023)

या वर्षीच्या नामांकनांत ज्या वेगळ्या लोकांच्या गोष्टींचा समावेश झाला त्यांत ‘पास्ट लाईव्ज’ एक होती. सेलिन साँग या कोरियन वंशाच्या दिग्दर्शिकेनं यात एका कोरियन वंशाच्या अमेरिकास्थित मुलीची गोष्ट सांगितली आहे. ती शाळेत असताना तिचे आईवडील कोरिया सोडून कॅनडात स्थायिक झाले असतात. कोरियात तिचा एक वर्गमित्र असतो, पण कोरिया सोडल्यानंतर त्याच्याशी काही संपर्क राहात नाही. अनेक वर्षांनंतर तो तिला शोधून काढतो आणि तिच्याशी संपर्क साधतो. अखेेर त्या दोघांची भेट होते. गोष्ट वाचून ही अगदीच घिसिपिटी रॉमकॉम असेल असं वाटू शकतं, पण तीन वेगवेगळ्या कालखंडांत उलगडणारी ही एक तरल, हळुवार कहाणी आहे. आणि न्यू यॉर्कमध्ये ठोकळेबाज टूरिस्टी ॲक्टिव्हिटीज वगैरे करणारे लोक दाखवून ते साधलं आहे हे विशेष. अशी एक छोटीशी छानशी गोड गोष्ट इतर फिल्म्सपुढे टिकणार नाही, हे अपेक्षित होतं. A24 या निर्मिती/वितरण कंपनीची ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर...’ गेल्या वर्षी ऑस्कर मिळवून गेली असल्यानेही त्यांच्या ह्या फिल्मला ह्या वर्षी यश मिळणं दुरापास्त होतं. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट दर वर्षी जी उत्कृष्ट दहा फिल्म्सची यादी जाहीर करते त्यात मात्र ‘पास्ट लाईव्ज’ला स्थान मिळालं. भारतात ही फिल्म थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन गेली आणि आता ‘लायन्सगेट’वर उपलब्ध आहे. ट्रेलर इथे.


American Fiction (2023)

गोऱ्या लोकांना वाटणाऱ्या अपराधगंडापोटी ‘वेगळ्या’ लोकांच्या गोष्टींना हल्ली प्रतिनिधित्व मिळू लागलंय ह्याचीच खिल्ली उडवणारा ‘अमेरिकन फिक्शन’ही ह्या वर्षी ऑस्करस्पर्धेत होता. पर्सीव्हल एव्हरेटच्या कादंबरीवर (Erasure) आधारित असलेल्या या फिल्मला पाच नॉमिनेशन्स होती, पण केवळ आधारित पटकथेच्या पुरस्कारावर समाधान बाळगावं लागलं. विनोदी आणि गंभीर बाज सांभाळण्याची कसरत यात जमलेली आहे त्यामुळे आवर्जून पाहावा. (भारतात ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध). जेफ्री राईटने यात साकारलेला थेलोनियस (मंक) एलिसन केवळ अद्भुत आहे. मंक हा काळ्या वंशाचा कादंबरीलेखक आणि साहित्याचा प्राध्यापक असतो. त्याच्या कादंबऱ्या खपत नाहीत, कारण तो काळ्या वंशाचा असल्यामुळे त्याच्याकडून ‘काळ्या’ कादंबऱ्या अपेक्षित आहेत, मात्र मंकला तशी कादंबरी लिहिणं मान्य नाही. तो स्वतः एका प्रिव्हिलेज्ड कुटुंबात वाढलेला आहे. त्याचे वडील डॉक्टर होते, भाऊही डॉक्टर आहे, आणि बहीणही. आपल्यावरच्या वांशिक अपेक्षांच्या ओझ्याला कंटाळून, केवळ गंमत म्हणून, टोपणनाव वापरून मंक एक ‘काळी’ कादंबरी लिहितो (म्हणजेच : ड्रग्ज, गुन्हेगारी, वगैरेंच्या गर्तेत आयुष्य पणाला लागलेला काळा नायक, त्याची रस्त्यावरची रावडी भाषा, रॅप आणि तत्सम फॉर्म्युले वापरून लिहिलेली ठोकळेबाज कादंबरी) पण ती गंमत साहित्यविश्वात फारच गांभीर्यानं घेतली जाते. त्यातून उडणारे गोंधळ आणि गमती ह्या कथानकाचा मुख्य भाग आहेत, तर मंकच्या व्यक्तिगत आयुष्यातले उतारचढाव दाखवत नायकातले अवगुण किंवा त्याच्या घोडचुकाही फिल्ममध्ये सूचित केल्या आहेत. गुंतागुंतीचं कथानक आणि हुशार विनोद असलेली ही फिल्म बॉक्स ऑफिसवर फारशी चालली नाही, आणि ऑस्करच्या मतदारांनाही ती अंमळ जडच गेली असावी. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या टॉप टेन यादीत मात्र समाविष्ट. ट्रेलर इथे.


The Holdovers (2023)

अलेक्झांडर पेनचा एक चाहता वर्ग (किंबहुना कल्ट) आहे. काहींसाठी तो ‘साइडवेज’मुळे, तर काहींसाठी ‘नेब्रास्का’मुळे. नर्मविनोदी, खेळकर, आंबटगोड आणि जाता जाता थोडा गंभीरपणा करणाऱ्या त्याच्या गोष्टी काही बिग बजेट ब्लॉकबस्टर नसतात. ‘द होल्डओव्हर्स’ ह्याला अपवाद नाही. पॉल जिआमाटीनं ह्यात एका छोट्या बोर्डिंग स्कूलमध्ये क्लासिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाची भूमिका केली आहे. आयुष्यात कसलीही आकांक्षा नाही, आणि केवळ विद्यार्थ्यांवर खडूसपणा करण्यात ज्याला आनंद मिळतो असा हा शिक्षक आहे. ख्रिसमसची सुट्टी आहे, पण काही विद्यार्थी काही कारणांमुळे शाळेतच राहिले आहेत. त्यांचा ‘सांभाळ’ करण्याची जबाबदारी ह्या शिक्षकावर पडते. जिचा होतकरू मुलगा नुकताच व्हिएतनाम युद्धात मरण पावला आहे अशी एक (काळ्या वंशाची) कँटीन मॅनेजरही शाळेत सुट्टी घालवते आहे (या भूमिकेसाठी डाव्हाइन जॉय रँडॉल्फला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचं ऑस्कर मिळालं). हे सगळे मिळून जी काही धमाल उडवतात तो फिल्मचा खेळकर भाग आहे, पण आपल्या आयुष्याचं आता पुढे काहीच विशेष होऊ शकत नाही ह्याची जाणीव जसजशी त्या शिक्षकाला होऊ लागते तसतशी फिल्म गंभीर होत जाते. सत्तरच्या दशकात घडणाऱ्या फिल्मला सत्तरच्या दशकातल्या फिल्म्सचा ‘लूक’ आहे. त्या काळातली (किंवा आधीची) गाणी वापरूनही बहार आणली आहे. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या टॉप टेन यादीत समाविष्ट. भारतात ही फिल्म थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन गेली. ट्रेलर इथे.

(पुढील भाग)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान समीक्षा. होडलोव्हर्स नक्की बघायचा आहे. The Anatomy of a Fall ही. तरीही यावर्षी नामांकन मिळालेले बरेच सिनेमे आधीच बघितले होते त्यामुळे रेड कार्पेट फॅशनीबरोबरच सिनेमासाठीही समारंभ बघितला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘इरेजर’ वाचलेली आहे, पण तिच्यावर सिनेमा निघाल्याचं ठाऊक नव्हतं. (चिंजंचं जग वेगळं, माझं वेगळं.) पण बघेन.

जी एक गोष्ट मला सतत खटकते ती इथेही दिसली. ‘American Fiction’ च्या पोस्टरवर ‘Erasure’ किंवा तिचा लेखक ‘Percival Everett’ यांचा नामोल्लेखसुद्धा का नाही? मूळ कादंबरी आणि ती लिहिणारा हे घटक इतके नगण्य आहेत असं हे सिनेमा काढणारे लोक का समजतात?
----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सलग सिनेमा बघण्याची हौस आली की बरेचदा काय बघायचं ह्याचं उत्तर शोधण्यातच दोनापेक्षा अधिक मिनीटं गेली की मी तो प्रयत्न सोडून देते; आणि दुसरं काही तरी करायला लागते. येत्या काही आठवड्यांची सोय तरी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखांत व प्रतिक्रियांमध्ये उल्लेखलेले सर्व चित्रपट बघण्यात येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> सत्तरच्या दशकात घडणाऱ्या फिल्मला सत्तरच्या दशकातल्या फिल्म्सचा ‘लूक’ आहे.

चिंजंची चूक काढण्यातला आनंद आगळाच असतो. सिनेमातल्या (बहुतांश!) घटना १९७० च्या डिसेंबरमध्ये घडतात. तांत्रिकदृष्ट्या हे साठचं दशक आहे.

सिनेमा ठीक वाटला, पण ‘साईडवेज’ जसा जमला आहे तसा नाही.
——

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सिनेमातल्या (बहुतांश!) घटना १९७० च्या डिसेंबरमध्ये घडतात. तांत्रिकदृष्ट्या हे साठचं दशक आहे.

बरोबर. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अमेरीकन फिक्शन पाहीला. मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला आस्कर पुरस्कार देने एक बाजु आहे पन भारतात किती लोक english पिच्चर बघु शकतात ...?

मला सैराट आवदला कारण कि तो मराठी मातीतला आहे म्हनुन

आता प्राईम सिनिमा नेटफ्लिक्ष वगैरे गोष्टी चालू झाल्या आहेत पण सर्व सामान्य जनतेला दोन वेळच्या भाकर ची काळजी पडलेली असते म्हणून मला असे वाटते कि पिच्चर पेक्षा जास्त पुस्तकं कामाची आहेत

आधी पोटोबा मग सर्व काही

चुक असेल तर जावू द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा का दिला जातो,सामान्य जनतेला बिलकुल माहीत नाही.
ऑस्कर मिळवणारे सिनेमा ची नाव कोणालाच माहीत नसतात.

ऑस्कर एक प्रकारची व्यापारी संस्था आहे ते दर्जा च्या नावाखाली विचित्र कलाकृती ना सन्मान देतात.

आम्ही जगापेक्षा,बहुसंख्य लोकांपेक्षा खूप वेगळे आहोत हेच त्यांना दाखवायचे असते.
. साधे उदाहरण.
Five star hotel मधील चहा आणि सामान्य लोकांच्या घरात बनणारा चहा .
ह्यांची तुलना केली तर सामान्य घरात च उत्तम चहा बनतो..पण जाहिरात कंपन्या five star मधील चहा ल जास्त गुण देवून आपण काही तरी वेगळे आहोत हे दाखवत असतात.
तेच ऑस्कर मध्ये घडते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एंडी हार्डीची मालिका म्हणजेच मिकी रुनीची धमाल

बरीच वर्षे झालीत (जवळ-जवळ 21 वर्षे) ऑस्कर सोहळा लाइव बघितला नाही...
75वा ऑस्कर सोहळा बघितला होता, त्याची आठवण लिहून काढली होती... परत देताेय...

75 व्या ऑस्कर सोहळ्यात कर्क डगलस सोबत माइकल डगलसला बघतांना मोठी मौज वाटत होती. बाप-लेक दोघं स्टेज वर होते. लेकाला दोनदा ऑस्कर मिळालंय, पण मला मात्र याने हुलकावणी दिली, ही खंत कर्कने बोलून दाखविली. नंतर नाॅमिनीचं नाव वाचून झाल्यावर माइकल नी लिफाफा आपल्या बापाला दिला.

ते लिफाफा उघडूं लागले, तर माइकल म्हणाला-लिफाफा उघडण्या अगोदर म्हणावं लागतं-

‘एंड दि ऑस्कर गोज टू...’

तिकडे दुर्लक्ष करुन ‘एंड दि विनर इज...’ म्हणत कर्कनी लिफाफा उघडून कागद अलगद बाहेर काढलां, त्याचे दोन तुकडे केले. एक माइकलला दिला आणि माइक समोर दोघे एकत्रच ओरडले-’शिकागो...’

काही वर्षांपूर्वीच छोटया पडद्यावर कर्क डगलसचा ‘स्पार्टाकस’ बघितला होता. सर लाॅरेंस ऑलिव्हिए समोर स्पार्टाकसच्या भूमिकेत कर्क डगलस शोभून दिसला होता. फार पूर्वी त्याचा ‘दि बोल्ड एंड दि ब्यूटीफुल’ बघतांना नकळत गुरुदत्तचा ‘कागज के फूल’ हा चित्रपट आठवला होता. विन्सेंट व्हेन गॉगच्या जीवनावर आधारित ‘दि लस्ट फॉर लाइफ’ देखील अप्रतिम होता. यात त्याचा सोबत एंथनी क्वीन होता...ही सगळी हॉलीवुडची दादा मंडळी...

पण त्यादिवशी त्या सोहळ्यातील ऑस्कर एलबम मधे मिकी रुनी, मारग्रेट ओ ब्रायन ला बघून अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. तेवढ्या वेळांत मिकी रुनी चे एंडी हार्डी सीरिजचे चित्रपट डोळ्यासमोर तरंगून गेले. ‘दि ह्यूमन कॉमेडी’ मधे पोस्टाची तार घरापर्यंत नेऊन त्यातील मजकूरा प्रमाणे वागणारा, ‘ब्वायज टाऊन’ मधे हाॅलीवुडचा दादा कलाकार असलेल्या स्पेंसर ट्रेसी समोर धिटाईने वागणारा छोकरा, ‘पपांनी आपल्या पहिल्या प्रेमपत्रांत तुला काय लिहिलं होतं’ (हे थेट आपल्या आईलाच विचारणारा) अशी मिकीची कितीतरी रुपे मला आठवली.

भारतीय चित्रपटांमधे बाल कलाकारांच्या मानसिकतेची जाण ठेवून काढलेले चित्रपट बोटांवर मोजण्या इतकेच असतील. त्यांत देखील सुरवातीपासूनच केंद्र स्थानी नायक-नायिकाच. आयुष्याची पस्तीशी गाठली, तरी ती नायिकाच. त्या मानाने हॉलीवुडच्या मेट्रो गोल्डविन मेयर (एमजीएम) कंपनीने काढलेले एंडी हार्डी सीरिज चे चित्रपट अमेरिकेत कमालीचे लोकप्रिय ठरले.

1937 ते 1958 च्या दरम्यान या मालिकेचे एकूण 16 चित्रपट आले. 1937 साली ‘ए फैमिली अफेयर’ पासून या मालिकेची सुरवात झाली व 1958 साली ‘एंडी हार्डी कम्स होम’ वर थांबली. खरं म्हणजे या दोन्हीं चित्रपटांची गणती या मालिकेत केली जात नाही. ही मालिका सुरु झाली ती 1938 साली आलेल्या ‘यू आर ओन्ली यंग वन्स’ आणि 1946 साली ‘लव लाॅफ्स एट एंडी हार्डी’ सोबतच संपली.

योजना नव्हती: खरंं म्हणजे एमजीएम ची एंडी हार्डी वर मालिका (सीक्वल्स) काढण्याची काहीच योजना नव्हती. पण ‘ए फैमिली अफेयर’ मधील एंडी हार्डीच्या भूमिकेत मिकी रुनी शोभून दिसला, त्याचा अभिनयामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला. या यशामुळे एमजीएम ने पुढे मालिका तयार करण्याचं ठरवलं. ‘ए फैमिली अफेयर’ हा चित्रपट आयरानिया रावेरोल च्या ‘स्कीडिंग’ नाटकावर आधारित होता. यात जज हार्डींची भूमिका लियॉनाल बेरीमोर व मिसेस हार्डीची भूमिका स्प्रिंग ब्यिंगटन नी साकारली होती. हा चित्रपट हिट ठरल्यामुळे पुढचा चित्रपट ‘यू आर ओन्ली यंग वन्स’ आला, त्यांत याच भूमिका क्रमश: लेविस स्टोन आणि फे. होल्डन नी साकार केल्या. सोबत मिकी रुनी, सिसिलिया पार्कर व सारा हेडन देखील होते. याशिवाय एंडीची गर्ल फ्रेंड पाली बेनेडिक्ट बनली होती एन रदरफोर्ड. या टीम मधील मिकी रुनी व मिसेस हार्डी (फे. होल्डन) शेवट पर्यंत या चित्रपटांत त्याच भूमिकेत वावरले, इतर पात्र मात्र बदलत गेले.

सुरवातीचे चित्रपट कुठल्याच पात्रावर (कैरेक्टर) केंद्रित नव्हते. त्यांचं कथानक ठळक पणे हार्डीच्या फैमिली भोवती केंद्रित होतं. पण मिकी रुनी च्या असामान्य प्रतिभेमुळे, त्याने साकारलेली एंडी हार्डीची भूमिका अमेरिकन टीन एजर्स मधे खूपच लोकप्रिय ठरली. हा व्रात्य, खोडकर, थोडासा आगाऊ असलेला ‘छोकरा’ किशोरवयीन मुलांमधे खूपच लोकप्रिय ठरला. म्हणून मग चौथ्या चित्रपटापासून एंडी केंद्रीय पात्र ठरला व त्याचं नाव चित्रपटाच्या शीर्षकातच सामील करण्यांत आलं.

सर्वश्रेष्ठ चित्रपट: ‘लव फाइंड्स एंडी हार्डी’ पासून या मालिकेची खरी सुरवात मानली जाते. या चित्रपटा पासूनच एंडीच्या व्यक्तिरेखेचं महत्व वाढलं, अाणि ते 1946 पर्यंत अबाधित होतं. त्याच प्रमाणे हा चित्रपट या मालिकेतील सर्वश्रेष्ठ चित्रपट समजला जातो. यात मिकी रुनी सोबत जूडी गारलैंड व लाना टर्नर देखील होत्या.

फर्स्ट फैमिली: 15 ऑगस्ट 1941 साली हॉलीवुडच्या ग्राउमन्स चाइनीज थिएटर मधे झालेल्या एका सोहळ्यांत या मालिकेतील प्रमुख कलावंत व सदस्यांनी एका फलकाचं उद्घाटन केलं. त्यावर लिहिलं होतं-

‘I, Mayor Fletcher Bowron, on behalf of the citizens of this community, Do hereby proclaim the family of Judge James K. Hardy, The first Family of Hollywood.’

हा फलक थिएटरच्या भिंतीवर लावण्यांत आला होता. पुढे 1943 साली एंडी हार्डी मालिकेच्या चित्रपटांना विशेष अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यांत आलं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

आज होल्डओव्हर्स पाहिला. खुपच आवडला. पास्ट लाईव्हज सुद्धा आवडला. चिजंना धन्यवाद, इतक्या सुंदर चित्रपटांची ओळख करुन दिल्याबद्दल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल ‘अमेरिकन फिक्शन’ पाहिला. मला आवडला पण इतकी वेगवेगळी उपकथानकं त्यात नीट मावत नाहीत असं वाटलं (समलिंगी भाऊ, हार्टअॅटॅक येऊन मेलेली बहिण, अल्झायमर्स झालेली आई, मेड). आणि शिवाय ह्या सगळ्या गर्दीमुळे मुख्य सूत्राला (म्हणजे ‘फक’ ही कादंबरी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रहसनाला) वाव कमी पडतो. सिनेमाऐवजी ही सीरियल असायला हवी होती.

ह्या सगळ्या थीमचं ‘सांस्कृत्यांतर’ करणं शक्य आहे. उच्चमध्यमवर्गीय आणि उच्चशिक्षित घरातून आलेला गौतम खैरमोडे नावाचा प्राचीन मराठीचा प्राध्यापक असतो. मेलेली ढोरं खाणारे महारवाड्यातले लोक नामांतराच्या दंगलीत कसे भरडले जातात ह्या विषयावर तो एक बनावट आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहितो, ती गाजल्यावर त्याची कशी पंचाईत होते, इत्यादि इत्यादि.

-----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

इतकी वेगवेगळी उपकथानकं त्यात नीट मावत नाहीत असं वाटलं (समलिंगी भाऊ, हार्टअॅटॅक येऊन मेलेली बहिण, अल्झायमर्स झालेली आई, मेड).

मला ते काहीसं असं दिसलं - मंक स्वतःच्या काळेपणाला नाकारू पाहतो आहे, असा एक धागा कथेत आहे. उदा. तो फोनवर बोलत असताना कॅब घेऊ पाहतो तो प्रसंग, किंवा आपली पुस्तकं आफ्रिकन अमेरिकन साहित्यात टाकलेली पाहून तो चिडतो तो प्रसंग. यात एक भाग त्याच्या वडिलांचाही आहे. उदा. तो आणि त्याचे वडील दोघांनाही गोऱ्या मैत्रिणी असतात, वगैरे. एकीकडे प्रिव्हिलेज्ड, काळेपणाला नाकारून त्रस्त असणारे वडील आणि मंक, तर दुसऱ्या टोकाला आपल्या काळेपणात अतिशय कम्फर्टेबल असणारी आणि आनंदी असणारी मेड आणि तिचा प्रियकर येतात. तिच्या लग्नाच्या दिवशी आयत्या वेळी उपटलेला भाऊ पाहताच मंकची चिडचिड, आणि मेडचं त्याला सहजपणे समारंभात सामावून घेणं, वगैरे भाग त्यात येतो. मंकच्या जगण्यात ज्या समस्या आहेत त्यांचं उत्तर त्या मेडकडे पाहिल्यास त्याला अगदी सहज सापडावं, पण ते त्याला दिसत नाही.

याचाच पुढचा भाग त्याचा वास्तवाशी संबंध तुटण्याचा, स्वतःला फसवण्याचा किंवा डिनायलमध्ये असण्याचा आहे. त्याचा भाऊ-बहीण-आई तिघांनाही वडिलांच्या बाहेरख्यालीपणाविषयी माहीत असतं, पण त्याला माहीत नसतं. कुटुंबाच्या वास्तवापासून मंक तुटलेला आहे, आणि आता तर बहीण-आई ह्यांच्याबाबत फार उशीर झालेला आहे. झापडं लावल्यामुळे कुटुंबातलं हे सगळं न दिसणाऱ्या मंकपेक्षा त्यांचं जग अधिक डोळस आणि सुखी आहे. आई तर असंही म्हणते की मी बाहेरख्यालीपणावरून वडिलांना सोडलं असतं तर ते आणखीच एकाकी झाले असते. खुद्द मंकही एकाकीच आहे आणि त्रस्त आहे. पुस्तकाचा खरा लेखक कोण हे आपल्या मैत्रिणीलाही न सांगणं हे तर केवळ वास्तवापासून पळणं नाही, तर एक प्रकारे क्लॉजेटेड असण्यासारखं आहे. भाऊ म्हणतो की वडिलांनी मला समलिंगी असण्यावरून नाकारलं असतं तरीही त्यांना किमान त्यांना 'खरा मी' दिसलो असतो, जे आता होणं शक्य नाही, आणि ज्याची मला खंत आहे. हाच मुद्दा मंकच्या बाबतीत खरा आहे. मैत्रिणीला आवडलेल्या पुस्तकाचा लेखक मंक आहे आणि त्यानं व्यवस्थेवर थुंकत ते लिहिलं आहे, हे न कळल्यामुळे मैत्रिणीला 'खरा मंक' दिसतच नाही. तो दिसला तर ती त्याला नाकारेल किंवा नाही, ही पुढची बाब झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

> मंक स्वतःच्या काळेपणाला नाकारू पाहतो आहे, असा एक धागा कथेत आहे.

बिलकुल मान्य. पण माझं काळेपण नाकारण्याचा (किमानपक्षी ते अगदीच चमचाभर शिल्लक ठेवण्याचा) मला ‘हक्क’ आहे, अशी काहीशी त्याची मनोवृत्ती दिसते. इस्कीलसच्या नाटकावर आधारित त्याने एक पुस्तक लिहिलं आहे असा पुसट उल्लेख सिनेमात येतो. मला ग्रीक नाटकात रस आहे, सोल म्यूझिकमध्ये नाही. माझ्या आवडीनिवडीचे विषय मी ठरवतो, कव्हरवर ‘सामाजिक बांधिलकी’ असं लिहिलेल्या चोपडीत बघून ते तुम्ही माझ्यासाठी ठरवू पाहणार असाल तर काशीत जा असं त्याचं म्हणणं आहे. ते समजण्यासारखं आहे.

एकूण काय तर मंकच्या व्यक्तिरेखेचा आणि कथानकाचाही आयाम मोठा आहे. म्हणून तर म्हणतो की सिनेमात हे सगळं नीट बसत नाही. पण ते मोठं करायचं तर प्लॅटफॉर्मचा, पैशाचा वगैरे प्रश्न येतात. तो वेगळाच विषय झाला.
---

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

नेमेचि येतो ऑस्कर सोहळा

हे नक्की कोणाचे कौतुक जाणायचे, म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0