Dead Man's Hand - 6

आधीचे भाग - , , , ,

मोबाईलवर अनोळखी नंबर दिसताच उदयच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं. कोणाचा फोन असावा?

"हॅलो...."

"......"

"येस, थिस इज उदय इनामदार, व्हू इज धिस?"

"उदय, मी......"

"व्हॉट अ सरप्राईज..... ओह रिअली? ग्रेट..... "

"......"

"शुअर! आय विल बी देअर अ‍ॅट अराऊंड एट!"

******

रात्रीचे अकरा वाजत आले होते. रोहित झोपण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. कदमांचं नाव पाहताच तो क्षणभर चमकलाच. काय झालं असावं? या विचारातच त्याने फोन उचलला.

"बोला कदम....."

"सर....."

"आर यू शुअर कदम?.... ओके, तुम्ही स्पॉटवर जा, मी निघतोच...."

फोन कट् करुन रोहितने दीर्घ नि:श्वास सोडला आणि बाहेर पडण्याची तयारी करण्यास सुरवात केली. कदमनी फोनवर सांगितलेली बातमी अगदीच अनपेक्षित अशी होती. ही केस दिवसेदिवस अधिकच गुंतागुंतीची होत चालली होती. सगळी खबरदारी घेऊनही धीरज आणि कौशलपाठोपाठ जेमतेम आठवड्याभराने त्यांचा तिसरा मित्रं प्राणाला मुकला होता. परंतु यावेळेस प्रथमदर्शनी तरी मृत्यू वेगळ्या प्रकारे आलेला दिसत होता....

उदय इनामदार कार अ‍ॅक्सिडेंटमध्ये मरण पावला होता!

******

बांद्र्याच्या मोतीमहल रेस्टॉरंट मध्ये एका बाजूच्या टेबलवर ते दोघं बसले होते. त्यांच्या वेशभूषेवरुन ते मुस्लिम होते हे सहज ओळखू येत होतं. त्याने पांढर्‍या शुभ्र रंगाचा पठाणी कुर्ता आणि पायजमा घातला होता. ती सर्वांग झाकून टाकणार्‍या काळ्या बुरख्यात होती. तिचे केवळ डोळेच दिसू शकत होते. बुरख्यातून अधून - मधून बाहेर येणार्‍या तिच्या हातावरुन तिने निळ्या रंगाचा कुर्ता घातलेला असावा असा अंदाज करता येत होता. गेल्या तासाभरापासून दोघं तिथे बसलेले होते. दोघंही दबक्या आवाजात काहीतरी चर्चा करत होते. तो तिला काहीतरी समजावून सांगण्याच्या प्रयत्नात होता, पण तिला ते पटत नव्हतं.

त्याच्याशी बोलत असतानाच डोळ्यांच्या कोपर्‍यातून कोपर्‍यातल्या टेबलावर बसलेल्या तिघांवर तिची नजर जात होती. मध्येच ते तिघं उठून बाहेर गेल्यावर ती उठली आणि वॉशरुमच्या दिशेने निघून गेली. परत येताना सहजच तिने त्यांच्या टेबलकडे दृष्टीक्षेप टाकला. अद्यापही ते तिघं परतलेले नव्हते. काही क्षण ती त्यांच्या टेबलपाशी थबकली. मनात दडलेल्या अप्रिय स्मृती उसळी मारुन वर येत होत्या. बुरख्याआड दडलेल्या तिच्या चेहर्‍यावर अंगार फुलला होता. त्या टेबलावर बसलेल्या तिघांच्याही नरडीचा घोट घेण्यासाठी तिचे हात शिवशिवत होते. कसाबसा स्वत:वर ताबा ठेवत ती आपल्या टेबलपाशी परतली.

जेमतेम पाच - सात मिनिटांत ते तिघंजण परतले. त्यांच्या गप्पा आणि पिण्याचा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरु झाला. पंधरा - वीस मिनिटांनी ती उठली आणि त्यांच्याकडे एक क्रुद्ध कटाक्षं टाकून बरोबर असलेल्या त्या तरुणाबरोबर निघून गेली.

******

रात्रीचे अकरा वाजून गेले होते.

भाईंदर लोकलने बांद्रा स्टेशन सोडलं तसा तिने जीन्सच्या खिशातून मोबाईल काढून बंद करुन टाकला.
काही क्षण विचार केल्यावर दुसर्‍या मोबाईलवरुन तिने एक कॉल लावला.

"मी बोलते आहे, रोशनी!" समोरुन फोन उचलला जाताच ती म्हणाली, "मला बोरीवली स्टेशनवरुन पिकअप कर!"

******

ताज लॅण्ड्स एन्डमधून उदय बाहेर पडला तेव्हा तो अगदी रिलॅक्स मूडमध्ये होता. पोर्चमध्ये उभ्या असलेल्या मैत्रिणीला हात करुन त्याने पार्कींग लॉटमधून आपली कार बाहेर काढली आणि शीळ घालत तो आपल्या मार्गाला लागला. बर्‍याच दिवसांनी तिची भेट झाल्यामुळे तो खुशीत होता. तिच्याशी गप्पा मारताना ती महिनाभर मुंबईत राहणार असल्याचं कळल्यावर बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा भेटण्याचं त्याने तिच्याकडून कबूल करुन घेतलं होतं! त्याला एकदम किरण आणि रिझवानची आठवण झाली. दुपारपासून संध्याकाळी साडेसात - आठपर्यंत तो त्यांच्याबरोबर मोतीमहलमध्ये बसला होता. तिला भेटायला जाण्याचा विषय निघाल्यावर दोघांनी त्यावरुन त्याची भरपूर खेचलीही होती. 'साल्यांनो, एकदा फक्तं ती तुमच्यासमोर आली की लाळ घोटत फिराल तिच्या मागे!' स्वत:शीच पुटपुटत त्याने कारला वेग दिला.

माऊंट मेरी रोडच्या चौकात टर्न मारताना आपलं डोकं जड होत असल्याचं त्याला जाणवलं. दुपारपासून आणि संध्याकाळी बरीच ड्रिंक्स झाली होती. ताजमध्ये तिच्याबरोबर डिनर घेतानाही त्याने दोन - तीन लार्ज पेग मारले होते. या सगळ्याचा हा परिणाम होता. घरी पोहोचल्यावर गरम पाण्याने शॉवर घ्यायचा आणि सकाळी उशीरापर्यंत झोप काढायची असं त्याने आधीच ठरवून टाकलं. पुढच्या चौकात लेफ्ट टर्न मारत असतानाच त्याच्या मोबाईलचा मेसेजचा टोन वाजला. एका हाताने स्टीअरींग कंट्रोल करत त्याने फोनच्या स्क्रीनवर नजर टाकली. ज्या नंबरवरुन मेसेज आला होता तो नंबर अनोळखी दिसत होता. इनबॉक्समध्ये जात त्याने तो मेसेज ओपन केला मात्रं.....

Game over. Your time is up – Swapna.

भयानक हादरला तो! अचानक एखादं भूत दिसावं तशी त्याची अवस्था झाली! डोळे फाडफाडून तो मोबाईलच्या स्क्रीनवर उमटलेल्या त्या अक्षरांकडे पाहत होता. स्वप्नाचा मेसेज .... ओह् माय गॉड! याचा अर्थ, तो इन्स्पे. प्रधान बरोबरच बोलत होता. स्वप्नानेच धीरज आणि कौशल दोघांचाही खून केला आहे! कौशलला खलास करण्यापूर्वी तिने त्यालाही मेसेज पाठवला होता असं तो प्रधान म्हणतो. आणि आता तिचा मेसेज .... माय गॉड! याचा अर्थ आता मी .... बाप रे! त्या कल्पनेनेच त्याचा थरकाप उडाला. हातातला मोबाईल कधी गळून पड्ला हे त्याला कळलंच नाही. आधीच त्याचं डोकं जड झालं होतं. चॅपल रोडवरुन त्याने लीलावतीच्या मागच्या गल्लीत कार वळवली तेव्हा सर्वांगाला मुंग्या येत आहेत असं त्याला वाटू लागलं. आपले हात - पायही जड होत आहेत असा त्याला भास झाला. 'कसंही करुन एकदा घरी पोहोचलो की बस्सं!'

हा विचार त्याच्या डोक्यात येतो आहे तोच चौकातला सिग्नल लाल झाला. त्याच्यापुढे काही अंतरावर असलेल्या बेस्टच्या बसच्या ड्रायव्हरने ब्रेक मारला. बस थांबत असल्याचं लक्षात येताच त्याने ब्रेकवरचा पाय दाबला, पण .....

आपला पाय.... ब्रेक दाबला का जात नाही? कार थांबत का नाही?
जीवाच्या आकांताने तो ब्रेक दाबण्याचा प्रयत्नं करत होता, पण त्याच्या पायातली शक्तीच जणू नाहीशी झाली होती .....
भयाने त्याचे डोळे विस्फारले. पुढे असलेली बस प्रचंड वेगाने जवळ येते आहे असा त्याला भास झाला .....
अवघ्या सेकंदात हा प्रकार घडला होता .....
दुसर्‍याच क्षणी कार धाडकन त्या बेस्टच्या बसवर आदळली!
त्याला शेवटची जाणीव झाली ती डोक्यावर जोरदार आघात झाल्याची....
अर्था क्षण स्वप्नाचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळून गेला.
उदयची शुद्ध हरपली.

******

रोहित बांद्रा पश्चिमेला लीलावती हॉस्पिटलच्या चौकात पोहोचला तेव्हा बारा वाजले होते. हॉस्पिटलच्या मागचा रस्ता केसी रोडला मिळत होता त्या चौकात सिग्नलला उभ्या असलेल्या बसवर उदयची कार आदळली होती. बांद्रा पोलिस स्टेशनचे सब् इन्स्पे. मुकणे कारचा पंचनामा करत असतानाच कदम आणि त्यांच्यपाठोपाठ रोहित तिथे आले. त्याला पाहताच मुकणेंना आश्चर्याचा धक्काच बसला. एका रोड अ‍ॅक्सिडेंटच्या इन्क्वायरीसाठी तो स्वत: येईल हे त्यांना अपेक्षितच नव्हतं!

"सर... तुम्ही?" खाडदिशी सॅल्यूट ठोकत त्यांनी आश्चर्याने विचारलं.

"मुकणे, फॅक्ट्स काय आहेत?"

"अ‍ॅक्सिडेंटची केस आहे सर! बस सिग्नलला उभी असताना कार मागून येऊन आपटली आहे. बहुतेक कारचे ब्रेक्स फेल झाले असावेत असा माझा अंदाज आहे. अर्थात गाडीची तपासणी झाल्यावरच कळेल. कारचा ड्रायव्हर ऑन द स्पॉट गेला आहे."

"अ‍ॅक्सिडेंट कसा झाला काही कळलं?"

मुकणेंनी उत्तरादाखल बसच्या ड्रायव्हरला त्याच्यासमोर हजर केलं.

"माझं नाव शंकर मोरे आहे साहेब. गेल्या दहा वर्षांपासून मी बेस्टमध्ये ड्रायव्हर आहे. रात्री साडेदहाची ८६ नंबर घेवून मी बांद्रा स्टेशनहून निघालो साहेब. बसमध्ये जेमतेम दहा - बारा लोक होते. लीलावतीपर्यंत काही त्रास झाला नाही. चौकात सिग्नल पडल्यामुळे बस थांबवण्यासाठी मी ब्रेक मारला. बस जेमतेम थांबत असतानाच मागून ती गाडी आली धाडदिशी बसवर आपटली! बसला जोराचा हादरा बसला. केवळ नशीब म्हणून कोणाला फारसं लागलं नाही साहेब! मी, कंडक्टर बेळे आणि काही पॅसेंजर खाली उतरुन त्या गाडीकडे गेलो. गाडीचं बॉनेट पार चेमटलं होतं, पण ड्रायव्हर मात्रं जागेवरच होता. मग मी आमच्या साहेबांना आणि पोलीसांना फोन केला. माझी काहिही चूक नव्हती साहेब, तो स्वत:च येऊन बसला धडकला होता."

"हा मोरे सांगतो ते खरं आहे साहेब." कंडक्टर बेळे त्याला दुजोरा देत म्हणाला.

"तुम्हाला अ‍ॅक्सिडेंटची खबर कशी मिळाली?"

"आम्हाला अकराच्या सुमाराला कंट्रोलरुमकडून मेसेज आला. त्यानंतर पंधरा मिनिटांतच आम्ही इथे पोहोचलो सर! कारचा ड्रायव्हर तेव्हाही कारमध्येच होता. स्टीअरींग व्हील आणि सीटच्या दरम्यान तो अडकलेला होता. त्याला बाहेर काढण्यास आम्हाला खूप त्रास झाला सर, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो आधीच आटपलेला होता."

रोहितने ड्रायव्हर मोरेबद्दल खुणेनेच मुकणेंकडे चौकशी केली. मुकणेंनी नकारार्थी मान हलवली. बस ड्रायव्हरची यात काहीच चूक नाही हे तो समजून चुकला. त्याचं स्टेटमेंट घेण्याची सूचना देत तो मृतदेहाकडे वळला.

उदयचा मृतदेह कारमधून बाहेर काढून एका बाजूला कापडावर ठेवण्यात आला होता. प्रथमदर्शनी तरी त्याच्या शरीरावर कोठेही जखम झाल्याचं दिसून येत नव्हतं. कपड्यावर कुठेही रक्ताचे डाग दिसत नव्हते. दोन्ही हातांच्या मुठी आवळलेल्या होत्या. डोळे अद्यापही उघडे होते. मृत्यूनंतरही डोळ्यांत भितीची छाया दाटलेली दिसत होती. डोक्यावर जोराचा आघात झाल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याला मृत्यू आला असावा असा त्याचा अंदाज होता. अर्थात मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टेमनंतरच कळू शकणार होतं.

"सर...."

तो उदयच्या मृतदेहाचं निरीक्षण करत असतानाच कदमनी हाक मारली. त्यांच्या हातात उदयचा मोबाईल होता. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहूनच काहीतरी गंभीर प्रकार असावा याची त्याला शंका आली. कदमनी पुढे केलेला मोबाईल त्याने हाती घेतला आणि स्क्रीनवर नजर टाकली. मेसेजच्या इनबॉक्समध्ये आलेला पहिलाच मेसेज....

Game over. Your time is up – Swapna.

एक्झॅक्टली तोच मेसेज.... तेच शब्दं....
मेसेज पाठवणार्‍याचा नंबरही तोच....
ज्याला मेसेज आला होता त्याचं भवितव्यंही तेच....

रोहितने प्रश्नार्थक मुद्रेने कदमांकडे पाहीलं. त्याच्या नजरेचा अर्थ फक्तं त्यांनाच कळू शकत होता.

"माऊंट कारमेल रोडच्या जंक्शनवर फोन असताना मेसेज आला आहे. त्यानंतर जेमतेम दोन - तीन मिनिटांनीच त्याचा अ‍ॅक्सिडेंट झाला असावा. त्यानंतर बांद्रा स्टेशनवर पोहोचेपर्यंत तिचा फोन सुरु होता. अकराच्या सुमाराला बांद्रा स्टेशनवर पोहोचल्यावर मात्रं फोन बंद झाला आहे."

रोहितने मनगटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली. साडेबारा वाजून गेले.

"जवळपास दीड ते पावणेदोन तास झाले आहेत कदम!" नि:श्वास सोडत तो म्हणाला, "ती स्लो ट्रेनने गेली असली तरी आरामात विरारपर्यंत पोहोचली असेल! पण.... उदयवर वॉच ठेवलेल्या आपल्या माणसाने तिला पाहीलं कसं नाही...."

"फोन ऑफ करण्यापूर्वी तिने उदयला आणखीन एक मेसेज पाठवला आहे!" कदम सावकाशपणे म्हणाले, "हा मेसेज म्हणजे एक फोटो आहे सर! किलवरचा एक्का!"

"किलवरचा एक्का?" रोहित गोंधळून गेला, "इंट्रेस्टींग! आधीच्या सिक्वेन्सचा विचार केला तर बदाम किंवा चौकटची अठ्ठी असेल असा माझा अंदाज होता! पण किलवरचा एक्का ..... "

आपलं वाक्यं अर्धवट सोडून तो ड्रायव्हर, कंडक्टर वगैरेंच्या जाब-जबाबाचं काम सुरु होतं तिथे आला. मुकणे कंटक्टर बेळेचं स्टेटमेंट लिहून घेत होते. सर्वांना आपल्यासमोर बोलावत त्याने विचारलं,

"अ‍ॅक्सिडेंट झाल्यानंतर लगेच इथे एखादी मुलगी आलेली तुमच्यापैकी कोणी पाहिली? तिचे केस लांब होते आणि कदाचित तिने काळ्या रंगाचा मोठा कोट घातलेला असावा."

सर्वजण चकीत होऊन त्याच्याकडे पाहत राहीले. परंतु त्यांच्यापैकी कोणालाही अशा वर्णनाची मुलगी अ‍ॅक्सिडेंटच्या आसपास दिसल्याचं आठवत नव्हतं. तो आणि कदम काय ते समजून चुकले.

"तुमचं सगळं काम आटपलं की इन्क्वेस्ट आणि स्टेटमेंट्स क्राईम ब्रँचमध्ये माझ्या ऑफीसमध्ये पाठवा. दुसरं म्हणजे बॉडी पीएमला डॉ. भरुचांकडे पाठवा आणि तसा त्यांना माझा निरोप द्या. उदयची कारही फॉरेन्सिक अ‍ॅनालिस्ट्सकडे पाठवण्याची व्यवस्था करा. चला कदम, जरा बांद्रा स्टेशनवर चक्कर मारु या!"

मुकणे गोंधळून गेले होते. रोहितच्या सूचनेवर त्यांनी होकारार्थी मान हलवली खरी, पण एका साध्या अ‍ॅक्सिडेंटच्या केसमध्ये सीआयडींनी आणि त्यातही अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या केसेस हाताळण्याबद्दल लौकीक असलेल्या प्रधानसाहेबांनी इतका रस का घ्यावा हे त्यांना कळत नव्हतं. त्यांची अस्वस्थता त्याच्या अचूक ध्यानात आली होती.

"वरकरणी हा अ‍ॅक्सिडेंट दिसत असला तरी इट् इज अ व्हेरी वेल प्लॅन्ड मर्डर!" तो शांतपणे म्हणाला, "आणि या खुनाच्या मागे कोण आहे हे देखिल आम्हांला माहीत आहे. इनफॅक्ट हा लागोपाठ तिसरा खून आहे आणि उरलेल्या दोघांच्या जीवालाही धोका आहे!"

मुकणे आ SS वासून त्याच्याकडे पाहतच राहीले.

कदम आणि नाईकांसह रोहित बांद्रा स्टेशनवर आला. मात्रं तिथे चौकशी करुन फारसं काही निष्पन्न होणार नाही याची त्याला कल्पना होती. पूर्वीच्या दोन्ही वेळेस बोरीवली आणि अंधेरी स्टेशनवर त्यांच्या हाती काही लागलं नव्हतं आणि इथेही तोच प्रकार झाल होता. बांद्रा स्टेशनच्या परिसरात कसून चौकशी करुनही स्वप्नाबद्दल काही माहिती मिळाली नाही. कोणताही चान्स सोडायचा नाही या हेतूने बांद्रा टर्मिनस गाठूनही त्याने चौकशी केली, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.

स्वप्नाने पुन्हा एकदा झुकांडी दिली होती!

******

ताज लॅण्ड्स एन्डच्या लाऊंजमध्ये एका सोफ्यावर मासिक चाळत रोहित कोणाची तरी वाट पाहत बसला होता.

कौशलच्या मृत्यूनंतर किरण, रिझवान आणि उदय यांच्यावर चोवीस तास नजर ठेवण्याची त्याने व्यवस्था केली होती. मात्रं तरीही उदयला मृत्यूने गाठलं होतं. वरकरणी हा अपघात असल्याचं वाटत असलं, तरी त्याच्या मोबाईलमध्ये आलेल्या स्वप्नाच्या मेसेजवरुन हा खून असल्याबद्द्ल त्याला कोणतीही शंका नव्हती. आदल्या रात्री बांद्रा स्टेशनवर स्वप्नाबद्द्लची चौकशी निष्फळ ठरल्यावर त्याने क्राईम ब्रँचचं ऑफीस गाठलं होतं आणि उदयवर नजर ठेवण्यासाठी नेमलेल्या आपल्या माणसाला ऑफीसमध्ये बोलावून त्याची चांगलीच हजेरी घेतली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आदल्या दिवशी दुपारी उदय, किरण आणि रिझवान बांद्र्याच्या मोतीमहल रेस्टॉरंटमध्ये बसले होते. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमाराला उदय ताज लॅण्ड्स एन्डला आला होता, आणि दोन तासांनी, साडेदहाच्या सुमाराला बाहेर पडला होता. तिथून बाहेर पडल्यावर आपल्या कारने तो लीलावती हॉस्पिटलपर्यंत गेला होता आणि तिथेच त्याचा अ‍ॅक्सिडेंट झाला होता. उदय हॉटेलमधून बाहेर पडला तेव्हा एक मुलगी त्याला सोडण्यासाठी बाहेर आली होती आणि तो कारमध्ये बसून निघून गेल्यावर ती पुन्हा हॉटेलमध्ये परतली होती. त्याच मुलीची रोहित वाट पाहत होता.

"मि. प्रधान?"

रोहितच्या कानावर आवाज आला तसं त्याने वर पाहिलं आणि त्याच्या क्षणभर त्याचा श्वास वरच्यावर अडकला...

त्याच्यासमोर उभी असलेली तरुणी अप्रतिम सुंदर होती. ड्रॉप डेड गॉर्जिअस! फारतर २५ - २६ वर्षांची असावी ती! गोरापान रंग, गोल चेहरा, किंचीत निळसर झाक असलेले घारे डोळे, धारदार नाक आणि गुलाबी ओठ... तिने घातलेला काळा स्कर्ट आणि क्रीम कलरचा टॉप तिला शोभून दिसत होता. मोकळे सोडलेले केस खांद्यापर्यंत रुळत होते. मंद पर्फ्युमचा येणारा वास सोडता तिने इतर कोणताही मेकअप केला नव्हता. मुळात तिला त्याची गरजच नव्हती. उलट मेकअप केल्यास तिच्या निरागस रुपाला बाधाच आली असती. एकापेक्षा एक फिल्मस्टार्स आणि मॉडेल्सना पाहिलेला रोहितसारखा पोलीस अधिकारीही तिच्या नैसर्गिक सौंदर्याने भारावून क्षणभर स्वत:ला विसरला होता.

"मि. प्रधान...." तिने दुसर्‍यांदा हाक मारली तसा तो एकदम भानावर आला.

"अं...येस! सॉरी... आय अ‍ॅम रोहित प्रधान!"

"सौम्या वर्मा" त्याच्यापुढे हात करत ती म्हणाली. तिचा हात हातात घेताना रोहितला क्षणभर पुन्हा एकदा तरुण व्हावंस वाटलं!

"येस मि. प्रधान! व्हॉट कॅन आय डू फॉर यू?"

'"मिस् वर्मा, मी एक पोलीस ऑफीसर आहे. एका केसच्या संदर्भात मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, इफ यू डोंट माईंड?"

"पोलीस ऑफीसर?" तिच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्हं उभं राहीलं, "वेल... आपण कॉफी शॉपमध्ये बसलो तर चालेल? तिथे शांतपणे बोलता येईल अ‍ॅन्ड वी कॅन हॅव कॉफी अ‍ॅन्ड ब्रेकफास्ट टू, इफ यू डोन्ट माईंड?"

"प्लेझर इज ऑल माईन!"

असल्या सुंदर मुलीबरोबर बसून कॉफी पिण्यास कोण नकार देईल? दोघं कॉफीशॉप मध्ये आले आणि एका कोपर्‍यातलं टेबल पकडून बसले. कितीही प्रयत्नं केला तरी त्याची नजर तिच्याकडे जातच होती. तिची प्रत्येक हालचाल अतिशय सहज, अत्यंत ग्रेसफुल होती. वेटरने ब्रेकफास्ट आणि कॉफीचे मग्ज आणून ठेवले.

"येस मि. प्रधान, नाऊ प्लीज गो अहेड!" टोस्टचा तुकडा मोडत अगदी सहजपणे ती म्हणाली.

"मिस् वर्मा, तुम्ही उदय इनामदारना ओ़ळखता?"

"यू मे सिंपली कॉल मी सौम्या! उदय... येस आय नो हिम!"

"हाऊ कम्स... इफ आय मे आस्क?"

"वेल! मी न्यूयॉर्कला ज्या कंपनीत काम करते तिथे तो ऑनसाईट असाईनमेंटवर तीन महिन्यांसाठी आला होता. त्या प्रोजेक्टवर एकत्रं काम करतानाच आमची ओळख झाली. इनफॅक्ट, लास्ट नाईट वी हॅड डिनर टुगेदर इन द रेस्टॉरंट हियर!"

"आय सी! तुम्ही न्यूयॉर्कला राहता?"

"ऑफकोर्स! फॉर लास्ट एटीन इयर्स! बॉर्न इन मुंबई बट नाऊ सेटल्ड इन युनायटेड स्टेट्स!"

"मुंबईला कधी आलात?"

"कपल ऑफ वीक्स अ‍ॅगो फॉर व्हेकेशन!"

"मुंबईत तुमचे कोणी रिलेटीव्हज नाहीत?"

"मी हॉटेलमध्ये राहते म्हणून?" तिने मिस्कीलपणे विचारलं.

"जस्ट अ क्युरीऑसिटी!"

"अ क्युरीअस पोलीस ऑफीसर. व्हेरी डेंजरस प्रपोजिशन!" तिचा स्वर अजूनही मिस्कीलच होता, "फ्रँकली स्पिकींग, रिलेटीव्हज् आहेत, पण मला उगाच कोणाच्याही घरी राहयला आवडत नाही. एकतर दे हॅव टू अ‍ॅकोमोडेट अ‍ॅन्ड अ‍ॅडजेस्ट फॉर मी आणि दुसरं म्हणजे माझी स्वत:ची प्रायव्हसी मला फार महत्वाची वाटते. आय लाईक टू हॅव माय ओन शेड्यूल. कोणाकडे राहयला गेलं की ते शक्यं होत नाही!"

"इंट्रेस्टींग! कमिंग बॅक टू द पॉईंट! उदय इनामदार बद्दल आणखीन काय सांगू शकाल?"

"उदयबद्दल? ही इज अ फ्रेंड लाईक एनी अदर! तो थोडासा शो ऑफ करत असतो, थोडासा सुपिरीअरीटी कॉम्प्लेक्स आहे त्याला, बट् अदरवाईज ही इज ओके पर्सन!" सौम्या अचानक गंभीर झाली, "व्हॉट्स द मॅटर मि. प्रधान? इज ही ऑलराईट?"

"काल रात्री उदय तुमच्याबरोबर डिनरला आला होता?" रोहितने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्षं केलं.

"येस! अराऊंड एट थर्टी! आम्ही एकत्रं डिनर घेतलं. ऑल्सो हॅड अ कपल ऑफ ड्रींक्स. खूप दिवसांनी भेटल्यामुळे तो बराच वेळ बोलत बसला होता. ऑलमोस्ट टेन थर्टीला तो गेला. आय वेन्ट आऊटसाईड टू सी हिम ऑफ!"

"तो गेल्यावर तुम्ही काय केलंत?"

"ऑफकोर्स, आय वेन्ट बॅक टू माय रुम!" तिने त्याच्यावर नजर रोखली, "व्हॉट्स द मॅटर मि. प्रधान? तुम्ही उदयबद्दल इतकी डिटेल इन्क्वायरी का करत आहात? आय होप ही इज फाईन."

"अनफॉर्चुनेटली, ही इज नॉट!" रोहित शांतपणे म्हणाला, "काल तुमच्याबरोबर डिनर घेऊन निघाल्यानंतर, ही मेट विथ अ ट्रॅजिक फेटल अ‍ॅक्सिडेंट. आय रिग्रेट टू इन्फॉर्म यू सौम्या, उदय इज नो मोअर!"

"एक्सक्यूज मी?" आपण काय ऐकलं तेच तिला क्षणभर कळलं नाही, "यू गॉट टू बी किडींग मि. प्रधान! हाऊ इज दॅट पॉसिबल? अहो तो काल माझ्याबरोबर इथे बसला होता डिनरला.... ओह् गॉड... नो!"

रोहित एकटकपणे सौम्याकडे पाहत होता. उदयच्या मृत्यूची बातमी ऐकून तिला चांगलाच धक्का बसलेला स्पष्टं दिसत होता. तो काहीच बोलला नाही. काही क्षण ती तशीच सुन्नपणे बसून राहिली. मगमधली कॉफी कधीच थंड होऊन गेली होती. त्याने वेटरला खूण केली. वेटरने थंड झालेले मग्ज उचलून नेले आणि पुन्हा दोन नवीन मग्जमध्ये वाफाळणारी कॉफी आणून ठेवली.

"आय अ‍ॅम सॉरी सौम्या! माय जॉब इज सच दॅट ऑलमोस्ट ऑलवेज आय हॅव टू ब्रेक द बॅड न्यूज! आय नो उदयच्या मृत्यूचा तुम्हाला फार मोठा शॉक बसला आहे पण प्लीज, पुल युवरसेल्फ अप! जे काही झालं ते....."

"इट्स ओके मि. प्रधान!" ती त्याचं वाक्यं अर्ध्यावर तोडत म्हणाली, "आय अ‍ॅम ऑलराईट! एक्सक्यूज मी प्लीज!"

ती वॉशरुमच्या दिशेने निघून गेली. पाच मिनीटांनी परत आली तेव्हा पूर्वीप्रमाणे नॉर्मल होती. रोहितने मनातल्या मनात तिला मानलं. अनपेक्षितपणे बसलेल्या धक्क्यातून ती इतक्या लवकर सावरेल अशी त्याला अपेक्षा नव्हती.

"सॉरी मि. प्रधान! इट वॉज अ बोल्ट आऊट ऑफ द ब्ल्यू! पण हे झालं कसं?"

"इथून निघाल्यावर दहा मिनिटांतच, लीलावती हॉस्पिटलजवळ त्याची कार एका बसवर क्रॅश झाली. ही वॉज डेड ऑन द स्पॉट!"

"सो सॅड! काल डिनरनंतर तो त्याच्या मोबाईलचा चार्जर इथेच विसरुन गेला होता. ते लक्षात आल्यावर मी त्याला फोन केला, पण माझ्याकडे दुसरा चार्जर आहे आणि मी नंतर तो चार्जर कलेक्ट करेन, त्यानिमित्ताने पुन्हा आपली भेट होईल असं त्याने मला सांगितलं. आय विश तो चार्जर घेण्यासाठी परत आला असता तर कदाचित त्याचा अ‍ॅक्सिडेंट झाला नसता!"

"सौम्या, उदय काल बराच वेळ तुमच्याशी गप्पा मारत बसला होता असं तुम्ही म्हणालात. वॉज ही टेन्स ऑर वरीड?"

"नॉट टेन्स सर्टनली, बट ही वॉज अपसेट! इन अ मंथ ऑर सो, ही हॅड लॉस्ट टू ऑफ हीज क्लोज फ्रेंड्स, त्यामुळे तो खूप अपसेट होता. बट अदरवाईज ही वॉज नॉर्मल अ‍ॅज यूज्वल!"

"तुम्ही स्वप्ना देशमुख नावाच्या मुलीला ओळखता?"

"स्वप्ना देशमुख...." ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्नं करत म्हणाली, "आय नो वन स्वप्ना, पण ती स्वप्ना वैद्यनाथन आहे! शी लिव्ह्ज निअर जर्नल स्क्वेअर इन जर्सी सिटी! ही स्वप्ना देशमुख कोण?"

"उदयची गर्लफ्रेंड!" रोहितने खडा टाकला.

"गर्लफ्रेंड?" सौम्या उडालीच! तिची रिअ‍ॅक्शन इतकी नॅचरल होती की त्याच्या चेहर्‍यावर नकळत स्मितरेषा चमकून गेली., "कमाल आहे! काल दोन तास माझ्याबरोबर बसला होता, पण एका शब्दाने बोलला नाही!"

"ऑलराईट मिस् सौम्या!" तो उठत म्हणाला, "आय शॅल लिव्ह नाऊ! थँक्स अ लॉट फॉर द कॉफी! नाईस मिटींग यू!"

"प्लीज कन्व्हे माय कन्डोलन्सेस टू हिज फॅमिली मि. प्रधान!"

त्याने पुढे केलेल्या हातात हात देत ती म्हणाली. दोघं कॉफीशॉपमधनं बाहेर पडले. ती आपल्या रुमवर निघून गेली.

******

रोहित क्राईम ब्रँचमध्ये परतला तेव्हा कदम त्याची वाटच पाहत होते. उदयचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणे डॉ. भरुचांना उदयच्या पोटात सोडीयम थिओपेन्टल आढळलेलं होतं. त्याचा मृत्यू अ‍ॅक्सिडेंटमुळे डोक्यावर बसलेल्या आघातामुळे झालेला असला तरी त्यापूर्वी त्याला पॅरॅलिसीसचा अ‍ॅटॅक आला होता! त्याच्या पायातली शक्ती नाहीशी झाल्यामुले कारचे ब्रेक्स दाबणं त्याला अशक्यं झालं होतं आणि कार बसवर आदळली होती. मात्रं सोडीयम थिओपेन्टल त्याच्या पोटात नेमकं कधी गेलं असावं हे निदान करण्यास डॉ. भरुचा असमर्थ ठरले होते.

"सगळं अगदी तसंच आहे कदम! तेच ड्रग, तसाच मृत्यू... फरक इतकाच की यावेळेस उदय घरी पोहोचण्यापूर्वीच ड्रगचा इफेक्ट झाला आणि त्यामुळे त्याची कार क्रॅश झाली! अ‍ॅन्ड आय थिंक स्वप्नाला तेच अपेक्षित असावं, कारण त्याची कार क्रॅश होण्यापूर्वी काही मिनिटं तिने त्याला मेसेज केला आहे. आय अ‍ॅम शुअर ती त्याला फॉलो करत असणार! त्याचा अ‍ॅक्सिडेंट झाल्यावर ती बांद्रा स्टेशनला गेली आणि तिथून मुंबईबाहेर पडली असावी!"

"पण सर, स्वप्नाने उदयला ते ड्रग दिलं कसं आणि कुठे?"

"कदम, आपण उदयवर राऊंड द क्लॉक वॉच ठेवला आहे. तो दुपारभर किरण आणि रिझवान यांच्याबरोबर होता. संध्याकाळी सात वाजता तो ताजला गेला आणि रात्री साडे दहापर्यंत सौम्याबरोबर होता. या दोनपैकी एका ठिकाणीच त्याला ते ड्रग देण्यात आलं आहे. मी आज सकाळीच सौम्याला भेटून आलो आहे. उदय एक्स्पायर झाल्यावर तिला बसलेला शॉक जेन्युईन होता. इफ शी हॅज अ‍ॅक्टेड इट अप, देन शी डिझर्व्हस् अ‍ॅन ऑस्कर! बट आय डोन्ट थिंक तिचा या सगळ्या प्रकाराशी काही संबंध आहे. ताजच्या रेस्टॉरंटचा मॅनेजर आणि त्यांना सर्व्ह करणारा वेटर यांच्याकडून तिने सांगितलेला शब्द न् शब्दं खरा असल्याचं मी कन्फर्म केलं आहे. उदय बाहेर पडला तेव्हा त्याला सोडायला ती पोर्चपर्यंत आली होती आणि त्यानंतर पुन्हा आत शिरली होती असं आपल्या माणसानेच सांगितलं आहे. नॉट ओन्ली दॅट, ताजच्या फ्रंट डेस्कवरच्या अटेंडंट्सनी आणि सिक्युरीटीनेही उदयला बाय करुन तिला आत येताना पाहिलं आहे. त्यानंतर रात्रभरात ती बाहेर पडलेली नाही. मेन एन्ट्रन्सवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्येही रात्री साडेदहानंतर ती बाहेर पडलेली दिसत नाही! नाही कदम, शी कम्स आऊट टोटली क्लीन! दुसरं म्हणजे उदय साडेआठच्या सुमाराला ताज लॅण्ड्स एन्डला आला होता. सौम्याशी भेट झाल्यावर त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जाणं, ड्रिंक्स ऑर्डर करणं आणि त्यांना ती ड्रिंक्स सर्व्ह केली जाणं यात किमान पंधरा ते वीस मिनिटं तर गेली असतीलच! साधारण पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान त्यांनी पहिलं ड्रिंक घेतलं असं मानलं, तर त्यानंतर जेमतेम दीड ते दोन तासांच्या दरम्यान - रात्री पावणेअकराला त्याला पॅरॅलिसीसचा अ‍ॅटॅक आला आहे! आता टाईम एलिमेंटचा विचार करा. धीरज आणि कौशल यांच्या पोटात ते ड्रग गेल्यावर ते पॅरॅलिटीक होण्यासाठी किमान तीन ते चार तास गेले होते. हे लक्षात घेतलं तर उदयच्या पोटात संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान ते ड्रग गेलं असलं पाहिजे! याचा अर्थ तो ताजमध्ये येण्यापूर्वीच हे ड्रग त्याच्या पोटात गेलं आहे! ताजमध्ये येण्यापूर्वी तो किरण आणि रिझवानबरोबर मोतीमहलमध्ये बसला होता. त्यांच्यापैकी कोणीही ते ड्रग त्याला दिलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण मोटीव्ह काय? ते तिघं तर अगदी खास मित्रं होते!"

"किरणवरुन आठवलं सर," कदम एकदम म्हणाले, "स्वप्नाने काल रात्री किरणला फोन केला होता. जेमतेम काही सेकंदच बोलणं झालं आहे. आज सकाळी ही इन्फॉर्मेशन मिळाली आहे सर!"

"स्वप्नाने किरणला फोन केला होता?" रोहितला आश्चर्याचा धक्काच बसला, "किती वाजता?"

"रात्री अकरा पंचावन्नला सर!" त्यावेळेस तिचा फोन बोरीवली स्टेशनच्या एरीयात होता!"

"बोरीवली स्टेशन? याचा अर्थ उदयचा अ‍ॅक्सिडेंट झाल्यावर बांद्रा स्टेशनवरुन ट्रेनने ती बोरीवलीला गेली असावी! कदम, आय स्मेल अ रॅट... इफ आय रिमेंबर करेक्ट, धीरजचा खून झाल्यावरही स्वप्ना बोरीवली स्टेशनलाच गेली होती आणि त्यावेळीही तिने किरणला फोन केला होता. आजही तिने बोरीवली स्टेशनवरुनच किरणला फोन केला आहे! कौशलचा खून झाल्यावर किरणला फोन आला नाही कारण...." रोहित सावकाशपणे म्हणाला, "कौशलचा मृत्यू झाला तेव्हा काही मिनिटांत किरण स्वत:च तिथे पोहोचला होता!"

"याचा अर्थ सर...." कदम अडखळले, "हे तिनही खून स्वप्नाने किरणच्या सांगण्यावरुन केले आहेत?"

"एनीथिंग इज पॉसिबल कदम! शक्यं आहे की किरण आणि स्वप्ना हे दोघंही यात सामिल आहेत आणि किरणच्या निर्देशावरुन स्वप्नाने खून केले आहेत. किरणचं एखादं असं सिक्रेट आहे जे त्याच्या मित्रांना माहीत आहे आणि ते त्याच्या दृष्टीने धोकादायक आहे! मे बी प्रियाचा खून आणि सेक्स स्कँडल? यू नेव्हर नो! तसं असल्यास स्वप्नाचं पुढचं टार्गेट रिझवान असू शकतो! दुसरी शक्यता म्हणजे किरणचा यात काहीच संबंध नाही आणि दरवेळेस त्याला फोन करुन स्वप्ना त्याला फ्रेम करण्याचा प्रयत्नं करते आहे. इन दॅट केस, किरण किंवा रिझवान दोघांचाही जीव धोक्यात आहे. ज्या पद्धतीने धीरज, कौशल आणि उदयला तिने मारलं आहे त्याच पद्धतीने दोघांपैकी कोणावरही हल्ला होऊ शकतो! आणखीन एक शक्यता म्हणजे या सगळ्या भानगडीत किरणचा काहीच संबंध नाही आणि हा सगळा स्वप्ना आणि रिझवान यांचा प्लॅन आहे. तसं असल्यास नेक्स्ट टार्गेट वुड बी किरण!"

कदमांचा पार गोंधळ उडाला होता. रोहितने व्यक्तं केलेल्यांपैकी कोणतीही शक्यता गृहीत धरली तरी किरण किंवा रिझवान दोघांपैकी एकाचे प्राण संकटात होते. हे सगळं स्वप्ना एकटीच करत असेल तर? रिझवानचं बरंवाईट झाल्यास किरण पेड मिडीयामार्फत पोलिसांविरुद्ध जोरदार बोंबाबोंब करणार हे नक्की! उलट स्वत: किरणला काही झालं तर त्याचे आमदार वडील संपूर्ण पोलीस खात्याला धारेवर धरणार होते आणि पोलीसांच्या दृष्टीने ते अधिकच तापदायक ठरणार होतं!

"आणखीन एक पॉसिबिलिटी आहे कदम" रोहित विचार करत म्हणाला तसे कदम त्याच्याकडे पाहतच राहीले, "हा सगळा खेळ किरण आणि रिझवानने रचला असेल आणि स्वप्ना अस्तित्वातच नसेल तर? प्रियाचा खून झाल्यापासून स्वप्नाला कोणीही पाहिलेलं नाही, शक्यं आहे त्याचवेळेस तिचाही खून झाला असावा आणि आता किरण आणि रिझवान मिळून दोघींच्या खुनातले साक्षीदार एकेक करुन संपवत आहेत?"

"पण सर...." कदम काहीसे गोंधळून म्हणाले, "कौशलच्या केसमध्ये त्या म्हातार्‍याने आपण एका मुलीला पळून जाताना पाहिलं असं छातीठोकपणे सांगितलं आहे. आता मेकअप आणि मुलीचे कापडे वापरणं अशक्यं नाही, पण किरण किंवा रिझवान चांगले धट्टेकट्टे आहेत. यांच्यापैकी कोणीही अगदी अंधारात पाहूनही मुलगी म्हणून खपणार नाही सर! आणि दुसरं म्हणजे धीरजचे शेजारी... त्या मालवणकरांनी झगझगीत प्रकाशात एक मुलगी धीरजच्या फ्लॅट्मध्ये शिरलेली पाहिली आहे! नाही सर... स्वप्ना यात नक्कीच आहे!"

रोहित क्षणभर काहीच बोलला नाही. कदमांनी मांडलेला मुद्दा अगदी बिनतोड होता.

"यू हॅव अ व्हेरी व्हॅलीड पॉईंट कदम!" तो हलकंच स्मित करत म्हणाला, "स्वप्ना या केसमध्ये नक्कीच आहे! फक्तं ती एकटीच हे सर्व करते आहे का किरण आणि रिझवान यांच्यापैकी कोणी तिला सामिल आहे हे आपल्याला शोधून काढावं लागणार आहे!

******

रोहित अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पे. म्हात्रेंच्या केबिनमध्ये बसला होता. किरण आणि रिझवान दोघं त्याच्यासमोर बसलेले होते. उदयचा अंत्यसंस्कार आटपल्यावर त्याच्या सूचनेवरुन कदमनी त्यांना मुद्दाम बोलावून घेतलं होतं. धीरज आणि कौशल यांच्यापाठोपाठ झालेला उदयचा मृत्यू दोघांच्याही जिव्हारी लागलेला होता. दोघांपैकी रिझवान चांगलाच अस्वस्थं वाटत होता. तो स्वत: एक निर्ढावलेला बदमाष असला तरीही एकापाठोपाठ एक तीन मित्रांचा मृत्यू झाल्याचा निश्चित परिणाम त्याच्यावर झालेला होता. किरण मात्रं लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढलेला असल्याने अगदी गंभीर मुखवटा धारण करुन बसला होता. त्याचा चेहरा अगदीच निर्विकार होता. चेहर्‍यावरुन त्याच्या मनात नेमकं काय सुरु आहे याचा कोणालाही थांगपत्ता लागला नसता.

"किरण आणि रिझवान, उदयच्या अपघाती मृत्यूचं तुम्हाला जेवढं दु:खं झालं आहे तेवढंच दु:खं मलाही आहे. परंतु शेवटी हा नियतीचा खेळ आहे आणि त्यापुढे आपण सगळे हतबल असतो. असो! मी आज तुम्हाला इथे बोलावलं आहे ते उदयबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्यासाठी. तो तुमचा अगदी जवळचा मित्रं होता. इफ आय अ‍ॅम नॉट राँग किरण. तुम्ही दोघं एकाच कॉलेजमध्येही होतात राईट?"

किरणने काही न बोलता फक्तं होकारार्थी मान हलवली. तो कमालीचा सावध होता. या ऑफीसरच्या एकाही शब्दात अडकायचं नाही याची त्याने मनाशी खूणगाठ बांधली होती.

"परवा दुपारी उदय तुम्हाला भेटला होता?"

"हो! परवा शनिवार असल्यामुळे त्याला सुट्टी होती. आम्ही तिघं बांद्र्याच्या मोती महलमध्ये बसलो होतो. तो आमचा नेहमीचा मिटींग पॉईंट आहे. आम्ही सर्वजण नेहमी तिथे भेटायचो. आता आम्ही दोघंच राहीलो..." किरण काहीशा खिन्न आवाजात म्हणाला.

"उदय कितीवेळ बसला होता तुमच्याबरोबर?"

"दुपारी दोन - अडीचपासून ते संध्याकाळी साडेसात - आठपर्यंत! आमचं कोपर्‍यातलं ठरलेलं टेबल असतं नेहमी. माझ्या पप्पांची तिथे ओ़ळख आहे त्यामुळे आम्ही तिथे कितीही वेळ बसू शकतो. रात्री आठच्या सुमाराला उदयला त्याच्या कोणातरी मैत्रिणीला भेटायला ताजला जायचं होतं, म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो."

"ताजला... ताज लॅण्ड्स एन्ड का गेटवेचं ताज?"

"ताज लॅण्ड्स एन्ड! त्याची कोणीतरी मैत्रिण अमेरीकेहून आली होती आणि ताजमध्ये उतरली होती. तिनेच त्याला रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं होतं. त्यावरुन आम्ही त्याची खूप चेष्टाही केली होती. पण त्यावेळेस त्याच्याशी ते शेवटचं बोलणं ठरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं!"

"उदय निघून गेल्यावर तुम्ही दोघांनी काय केलंत?"

"आम्ही तिघंही एकदमच बाहेर पडलो. उदय ताजला निघून गेल्यावर मी रिझवानला त्याच्या जिमवर ड्रॉप केलं आणि सरळ घरी गेलो."

रोहित काहीच बोलला नाही. किरणने दिलेली माहिती सौम्याच्या स्टेटमेंटशी तंतोतंत जुळत होती. काही क्षण गेल्यावर अचानक काहीतरी आठवल्यासारखं करत त्याने विचारलं,

"परवा तुम्ही हॉटेलमध्ये असताना काही वेळासाठी... अगदी मिनिटभरासाठी का होईना, तुमच्यापैकी एकहीजण टेबलपाशी नव्हता असं झालं होतं? नीट आठवून सांगा!"

किरण आणि रिझवाननी गोंधळून एकमेकांकडे पाहिलं.

"मै समझा नहीं साब! आप क्या कहना चाहते है?" रिझवानने पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून प्रथमच तोंड उघडलं.

"तुम्ही तिघं जेव्हा हॉटेलमध्ये बसला होतात तेव्हा काहीतरी कारणाने टेबलपासून दूर गेला होतात? बाथरुमला. स्मोक करायला, फोनवर बोलण्यासाठी किंवा आणखीन काही कामानिमित्त? मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तिघंही एकाच वेळेस टेबलपासून दूर होतात का?"

"वैसे तो कई मर्तबा उठे थे साब! अकेले अकेले और तीनों एकसाथभी!"

"एकत्रं कुठे गेला होतात?"

"किमान चार ते पाच वेळेस बाहेर गेलो होतो... स्मोक करायला!"

"आय सी...." रोहित गंभीरपणे विचार करत म्हणाला, "तुमच्या आजूबाजूच्या टेबलवर एखादी मुलगी किंवा बाई बसली होती? एकटी किंवा कोणाबरोबर आलेली? कदाचित बायकी दिसणारा पुरुषही असू शकेल!"

"ऐसा तो कोई…. हां, एक कपल बैठा तो था वहांपर! पर वो लोग आपसमेंही बाते किए जा रहे थे!

"कपल.... " रोहित सावध झाला, "त्यांचं वर्णन करु शकशील?"

"नहीं साब! वो आदमी हमें पीठ दिखाकर बैठा था, और साथवाली लडकी बुर्केमें थी! उसकी केवल आंखेही दिख रही थी! लेकिन बादमें वो लोग चले गए थे साब!”

बुरखाधारी मुलगी.... रोहित विचारात पडला. ती मुलगी कोणीही असू शकत होती. कदाचित स्वप्नाही! अचानक किरणवर नजर रोखून त्याने विचारलं,

"बाय द वे किरण, उदयचा अ‍ॅक्सिडेंट झाला त्याच रात्री बाराच्या सुमाराला तुम्हाला एक फोन आला होता ना? कोणाचा फोन होता सांगू शकाल?"

किरण क्षणभरच का होईना पण दचकला, पण एका झटक्यात त्याने स्वत:ला सावरलं.

"तो एक ब्लँक कॉल होता प्रधानसाहेब! मागेही एक - दोन वेळा रात्री - अपरात्री मला तसा ब्लँक कॉल आला होता. मी फोन उचलून हॅलो-हॅलो करतो आहे, पण समोरुन कोणी बोलतच नाही!"

"राँग नंबर.... आर यू शुअर तो राँग नंबर होता किरण?"

"तुम्हाला काय म्हणायचं आहे?"

"मला तो नंबर दाखवू शकाल?"

किरणने आपल्या फोनचं कॉल रजिस्टर रोहितसमोर ठेवलं. किरणला आलेल्या फोनचा नंबर पाहून त्याने पुन्हा एकदा खात्री करुन घेतली. किरणच्या हातात फोन परत देत त्याने विचारलं,

"किरण हा नंबर कोणाचा आहे तुम्हाला माहीत आहे?"

किरणने नकारार्थी मान हलवली. रिझवानने त्याच्या फोनमधला तो नंबर पाहिला, पण तो नंबर त्यालाही अनो़ळखी होता.

"हा नंबर.... " रोहितने वाक्यं अर्धवट सोडलं. मग तो एकदम म्हणाला, "ठीक आहे! यू मे गो नाऊ! पण आम्हाला कळवल्याशिवाय मुंबई सोडून जाऊ नका. आणि पुन्हा तुम्हाला त्या नंबरवरुन फोन आला तर ताबडतोब मला फोन करा!"

किरणने क्षणभर त्याच्याकडे रोखून पाहिलं. रोहितशी नजरानजर होताच तो काहीसा गडबडला, पण वरकरणी अगदी प्रसन्नपणे हसून त्याने पुढे केलेलं कार्ड हातात घेऊन तो रिझवानसह बाहेर पडला.

******

उदयच्या मृत्यूला चार दिवस उलटून गेले होते....

उदयची कार फॉरेन्सिक ब्यूरोच्या तज्ञांनी इंच न इंच तपासून काढली होती. कारमध्ये स्वत: उदय व्यतिरिक्त अजून दोघांचे ठसे आढळून आले होते. अधिक तपास केल्यावर तो आपली कार सर्विसला देत असलेल्या गॅरेजमधल्या दोघा मेकॅनिक्सचे हे ठसे असल्याचं निष्पन्न झालं. कदमनी दोन्ही मेकॅनिक्सकडे तपशीलवार चौकशी केली, परंतु त्यातून काहीच हाती लागलं नाही. सीआयडींची किरण आणि रिझवानवर चोवीस तास नजर होती, पण त्यांच्याबाबतीत काहिही वावगं आढळत नव्हतं. रिझवानच्या घरचा आणि जिमचा फोन पोलिसांनी टॅप केला होता. त्याचा मोबईलही ट्रेस केला जात होता. किरणचाही फोन टॅप करण्याचा रोहितचा प्लॅन होता, मात्रं खुद्दं एका आमदाराच्या घरचा फोन टॅप केला आणि हे प्रकरण उघडकीला आलं असतं तर ते सीआयडींवर चांगलंच शेकेल या भीतीने कमिशनर मेहेंदळेंनी ही परवानगी नाकारली होती. किरणचा मोबाईल फोन ट्रेस करण्यास त्यांची परवानगी मिळवतानाही त्याच्या नाकी नऊ आले होते पण अखेर कमिशनरसाहेब राजी झाले होते.

कदमनी बांद्र्याच्या मोतीमहल रेस्टॉरंटमध्येही बारकाईने चौकशी केली होती. ते सर्वजण तिथे नेहमी येत असल्याने हॉटेलचा स्टाफ त्यांना व्यवस्थित ओळखत होता. किरण आणि रिझवानच्या स्टेटमेंटप्रमाणे ते तिघंही दुपारभर तिथंच असल्याचं स्पष्टं झालं होतं. त्या दरम्यान अनेकदा तिघं आपलं टेबल सोडून बाहेर गेलेले होते. ते तिघं तिथे असतानाच त्यांच्या बाजूच्या टेबलवर एक कपल बसलेलं होतं. त्या कपलमधल्या मुलीने सर्वांग झाकून टाकणारा बुरखा घातला होता. एकदा किरण, रिझवान आणि उदय बाहेर गेलेले असताना त्या कपलमधली मुलगी त्यांच्या टेबलपाशी घोटाळताना पाहिल्याचा एका वेटरने दावा केला होता! ते तिघं बाहेर पडण्यापूर्वी सुमारे अर्धा तास ती मुलगी आणि तिचा जोडीदार निघून गेले होते. त्यांनी बिलाचे पैसे कॅशने दिले असल्याने क्रेडीट कार्डच्या डिटेल्स मिळण्याचा प्रश्नंच आला नाही. पोलीसांनी जंगजंग पछाडूनही त्या दोघांचा पत्ता लागलेला नव्हता.

स्वप्ना पुन्हा एकदा बोरीवली स्टेशनवरुन अदृष्यं झाली होती. महिन्याभरात तिसरा खून झाल्यावर सीआयडींनी संपूर्ण देशभरातील प्रमुख शहरांतल्या पोलीस डिपार्टमेंटना तिच्याविषयी माहिती पाठवून तिचा शोध घेण्याची सूचना दिली होती. तिचा मोबाईल ट्रेस केला जात होता. पुणे आणि औरंगाबादच्या तिच्या एकूण एक नातेवाईकांच्या घरावरही गुप्तपणे पाळत ठेवण्यात आली होती. इतकंच नव्हे तर त्यांचे फोनही टॅप करण्यात येत होते. महेश त्रिवेदीच्या हालचालींवरही पोलिसांची नजर होती. त्याचा मोबाईलही ट्रेस करण्यात येत होता. प्रत्येक खुनाच्या वेळेस स्वप्नाने मागे ठेवलेल्या पत्त्यांचं कोडंही अद्याप सुटलेलं नव्हतं. रोहितने आपल्या सर्व खबर्‍यांना धारेवर धरलं होतं. मोतीमहल हॉटेलमधली ती बुरखाधारी तरुणी म्हणजे स्वप्नाच असणार याबद्दल त्याला कोणतीच शंका नव्हती, पण तिला शोधायचं कुठे आणि कसं? त्याच्यासमोर एकच प्रश्नं उभा होता....

स्वप्नाचं पुढचं टार्गेट कोण?

किरण?
का
रिझवान?

******

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खुनी तरुणीचा सोबती प्रवेशलेला दिसतो. वाचतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||