बखर....कोरोनाची
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरिता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई)
म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.
ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.
म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच , या धाग्यावर ?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना ?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात
बखर कोरोनाची
पुढील भाग इथे
स्वत: प्रथम पाहिलेल्या
स्वत: प्रथम पाहिलेल्या/अनुभवलेल्या गोष्टी/घटना कुठून आणणार?
होणारे बदल आपल्याला दिसतातच
होणारे बदल आपल्याला दिसतातच की.साधं घ्या, आपण लॉक डाऊन कधी अनुभवला होता का आत्तापर्यंत ? ( हां, मुंबई दंगलीच्या वेळी तुम्ही स्वतःहून घरात बसला असाल कदाचित , पण ते वेगळे)
याचा आजूबाजूला काय परिणाम होत आहे हे दिसतंच की आपल्याला.
आणि पुढच्या महिन्यात कदाचित अजून वेगळं दिसणार आहे.
हे तर बघू लिहू शकतोच की आपण ?
नाही ?
२५ मार्च : वॉशिंग्टन डीसीचं
२५ मार्च : वॉशिंग्टन डीसीचं एक उपनगर. काही नोंदी.
- व्हर्जिनिया राज्यातल्या शाळा १३ मार्चला बंद झाल्या. २२ मार्चला अशी घोषणा झाली की या शैक्षणिक वर्षाकरता शाळा आता उघडणार नाहीत. कॉलेजेसचं नक्की काय ते माहिती नाही.
- प्रेसिडेंट ट्रंपने मार्चच्या पहिल्या आठवड्यात करोनाव्हायरस अजिबात गंभीर वगैरे नाही अशा स्वरूपाची विधानं केली. त्याच्या पुढच्या आठवड्यात जेव्हा इटलीची परिस्थिती आकडेवारीसकट येऊ लागली तेव्हा त्याला ती बडबड बंद करावी लागली. आणि उपराष्ट्राध्यक्ष पेन्स च्या नेतृत्वाखाली एक टीम बनवायचं ठरलं. त्यानंतर प्रत्येक दिवशी पत्रकार परिषद घेतली जात आहे. रोजचे आकडे येत आहेत. मृतांचे आकडे वाढत आहेत. प्रतिदिवशी मेलेल्यांची संख्या वाढते आहे. ३-४ दिवसापूर्वी चारशेच्या आतबाहेर असलेली संख्या ४ दिवसात हजाराचा आकडा पार करून गेलेली आहे. इटलीमधे साडेसात हजार पार झालेली आहे. चीनची संख्या आता वाढत नाही. ती साडेतीन हजारावर थांबलेली आहे.
- भारतात तीन आठवडे - म्हणजे १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने तिथल्या नातेवाईकांबद्दल विशेष करून वृद्ध मातापित्यांबद्दल काळजी वाटते. रोजचे फोन चालू आहेतच.
- करोनाव्हायरसची महामारी ओसरल्यानंतर जग महामंदीत जाईल हे जवळजवळ निश्चित वाटतं आहे.
- अमेरिकेत किमान आतापर्यंत अन्नटंचाई किंवा दुकानं प्रदीर्घ काल बंद अशी परिस्थिती नाही. गॅसोलिनचा साठा पुरेसा दिसतो आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
आभार सर.
आभार सर.
असेच हवे होते.
आपण वॉशिंग्टन डी सी जवळून हे लिहीत आहात हे इतरांना संदर्भ कळावा म्हणून नमूद करून ठेवतोय.
ग्लुकोजचा एक पुडा
पुण्यातल्या सधन वस्तीत ग्लुकोजच्या एका पुड्यावरून भांडणं होतील असं कधी वाटलं नव्हतं. मी वाण्याकडे असताना एक बाई (वय सुमारे ३०) कारमधून उतरल्या आणि ग्लुकोजचा पुडा मागू लागल्या. वाण्यानं तो दिला. त्या 'मला आणखी पुडे हवेत' म्हणाल्या. वाणी म्हणाला 'आता संपले.' त्या बाईंनी बोट दाखवून पुडे दाखवले आणि मागू लागल्या. वाणी समजुतीच्या सुरात सांगू लागला की एकाच व्यक्तीला इतके पुडे देणं योग्य नाही. बाई ऐकेचनात. अखेर मी मध्ये पडून त्या बाईंना खडसावलं, त्यांचं शिक्षण, 'चांगल्या घरातलं असणं' वगैरे काढलं तेव्हा त्या नरमल्या आणि एकच पुडा घेऊन परतल्या.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
...
आमच्या येथे अनेक ग्रोसरी आणि तत्सम स्टोअरांनी सुओ मोटु काही अतिमागणीच्या वस्तूंवर (टॉयलेट पेपर, पेपर टॉवेल, फेशियल टिश्यू, भांड्यांचा साबण) प्रतिग्राहक दोनची मर्यादा घालून दिली आहे. तरीसुद्धा, उपरोल्लेखित बहुतांश चिजांच्या आयला (aisleचे मराठी अनेकवचन) रिकाम्या असतात त्या रिकाम्याच.
तरी अजून (अतितुरळक अपवाद वगळता) अन्नपदार्थ, दूधदुभते वगैरेंच्या खरेदीवर मर्यादा आणलेल्या फारशा पाहिलेल्या नाहीत. त्याही आयला अनेकदा झपाट्याने रिकाम्या होताना दिसतात खऱ्या, परंतु रिप्लेनिशसुद्धा होतात, नि ज्या दिवशी रिप्लेनिश होतात निदान त्या दिवसभर तरी मिळण्याची शक्यता सहसा बऱ्यापैकी दाट असते. म्हणजे, टायमिंग साधले, तर या चिजा (अन्नपदार्थ, दूधदुभते) मिळूही शकतात. थोडक्यात, अन्नपदार्थांचा तुटवडा असू शकेल, परंतु टंचाई (अथवा दुर्भिक्ष्य) म्हणण्याइतकीही परिस्थिती दाहक आहे, असे म्हणवत नाही.
(टॉयलेट पेपरचे मात्र तसे नाही. इट सिंप्ली कॅनॉट बी ऑब्टेन्ड फॉर लव्ह ऑर फॉर मनी. अनलेस, तुमचे आणि तुमच्या तमाम पितरांचे कंबाइन्ड पूर्वसंचित एखादे क्षणी अचानक, क्षणार्धापुरतेच, उफाळून आले, तर गोष्ट वेगळी. कर्मधर्मसंयोगाने असा कपिलाषष्ठीचा योग (वाक्प्रचार बरोबर वापरले ना?) माझ्या बाबतीत परवाच एकदा जुळून आला. बोले तो, तमाम ग्रोसरी स्टोअरे, वॉलमार्ट, फार्मश्या धुंडाळून नि जंग जंग पछाडून टॉयलेट पेपरच्या आयला रिकाम्या पाहण्याची सवय डोळ्यांना झालेली होती (नि अजूनही आहे). त्यात वॉलमार्टात एक ऑनलाइन पिकअप ऑर्डर २४ भेंडोळ्यांची कधीपासून देऊन ठेवलेली आहे, ती गेले कित्येक दिवस 'शिप्ड' परंतु 'डीलेड' स्टेटस दाखवीत आहे - जगाच्या अंताअगोदर होपफुली येईल बहुधा. परंतु, परवा एकदा फार्मसीत दुसऱ्याच कारणाकरिता (बोले तो, प्रिस्क्रिप्शने आणण्याकरिता) गेलेलो असताना टॉयलेट पेपरच्या आयलीत टॉयलेट पेपर दिसला! आदल्याच आठवड्यात त्याच फार्मसीतली तीच आइल रिकामी होती. दिसला म्हटल्यावर ताबडतोब १२ भेंडोळ्यांचा एक पॅक विकत घेतला. काही दिवसांपूर्वी बायकोनेही कुठूनतरी १२चा एक पॅक पैदा केला होता. त्यामुळे, आता समजा वॉलमार्टास आणखी जरी उशीर झाला, तरी तूर्तास निश्चिंत आहे. चालायचेच.)
माझे मत विचाराल (परंतु कशाला विचाराल? असो.), तर हा जो काही तुटवडा, टंचाई, दुर्भिक्ष्य जे काही आहे, ते कृत्रिम आहे. बोले तो, एखाद्या वस्तूची मागणी पुरविण्याकरिता जेवढा पुरवठा सामान्यतः लागतो, त्या पुरवठ्याच्या पातळीत आजमितीससुद्धा काहीही फरक पडला असण्याबद्दल मी प्रचंड साशंक आहे. मात्र, दुर्भिक्ष्य येईल, या भीतीने लोक एखाद्या वस्तूचा सामान्यतः जेथे एक नग विकत घेत असत, तेथे अचानक पाच नग विकत घेऊ लागून दुर्भिक्ष्य आणीत आहेत. लोकांनी वस्तू विकत घेण्याचे प्रमाण सामान्य परिस्थितीत असायचे तेवढेच ठेवले, तर कोणालाही काहीही कमी पडायचे काही कारण दिसत नाही. परंतु मनुष्यस्वभावास इलाज नाही. चालायचेच.
(आणि हो, आमच्या इथल्या पटेल ब्रदर्सच्या शाखेत पार्ले-जीचे पुडे अद्यापही एका डॉलरास पाच किंवा सहा (चालू रेट नक्की तपासावा लागेल; परंतु, बदललेला नाही.) या दराने, नि मुबलक मिळतात.)
----------
बाकी, ग्रोसरी स्टोअरे, वॉलमार्टासारखी जनरल स्टोअरे वगैरे (मालाचा काही अंशी तुटवडा नॉटविथस्टँडिंग) सुरळीत चालू आहेत. फार्मशा सुरळीत चालू आहेत. आवश्यक सरकारी आस्थापने सुरळीत चालू आहेत. रेष्टारंटे सरकारी आदेशानुसार केवळ पिकअप आणि डेलिव्हरीसाठी चालू आहेत; आत बसून खायला मनाई आहे. मॅक्डॉनल्ड्ज़, बर्गर किंग वगैरेंसारख्या फास्ट फूड जॉइंट्सचे तेच - फक्त ड्राइव्ह-थ्रू. सबवे (सँडविच)सारख्या फ्रँचाइज़-तत्त्वावर चालणाऱ्या चेन्सपैकी काही छोट्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद केलैली आहेत, आणि ज्यांनी उघडी ठेवलेली आहेत, ते फक्त टेकआउट ऑर्डरी स्वीकारत आहेत. ऊबर-ईट्स, ग्रबहबसारख्या फूड डेलिव्हरी सुविधा सुरळीत चालू आहेत. ऊबरसारख्या वाहतूक सेवा सुरळीत चालू आहेत. पिझ्झा हट, डॉमिनोज़ वगैरे मंडळी व्यवस्थित घरपोच सेवा पुरवीत आहेत. थेटरांची चौकशी केली नाही, परंतु बहुधा बंद असावीत. खाजगी आस्थापनांत अनेक ठिकाणी घरून काम करण्याचे आदेश आहेत. गॅसस्टेशने (मराठीत: पेट्रोलपंप) सुरळीत चालू आहेत; किंबहुना, पेट्रोल तुलनेने बरेच स्वस्त झाले आहे. (परवापरवापर्यंत जे अडीच ते पावणेतीन डॉलर प्रतिगॅलन मिळायचे, ते पावणेदोन प्रतिगॅलनपर्यंत उतरलेले दिसत आहे.) रस्त्यांतून तत्त्वतः संचारबंदी नाही; रस्त्यांतून संचार केल्याबद्दल नि वाहने चालविल्याबद्दल पोलीस अडवीतही नाहीत, नि मारहाण तर मुळीच करीत नाहीत. मात्र, रस्त्यांतून रहदारीचे प्रमाण अतितुरळक आहे; रस्ते ओस पडले आहेत.
उद्यानांसारख्या 'अत्यावश्यक' कॅटेगरीत न मोडणाऱ्या सार्वजनिक सुविधा बंद आहेत.
हॉस्पिटलांची परिस्थिती थोडी गंभीर आहे. रुग्णाव्यतिरिक्त कोणास (व्हिजिटर्स वगैरेंस, अगदी रुग्णाच्या जवळच्या आप्तांस नि कुटुंबीयांससुद्धा) हॉस्पिटलांत प्रवेशबंदी आहे. अगदी ॲडमिट करतेवेळीसुद्धा रुग्णास हॉस्पिटलच्या इमारतीबाहेरच बाहेरच्या बाहेर ॲडमिट करून आत नेले जात आहे, नि रुग्णाबरोबर आलेल्या आप्तांना बाहेरच्या बाहेर परत पाठविले जात आहे. (ॲडमिट होणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत) व्हेंटिलेटर्सचा तुटवडा आहे; त्यांच्या वापराबद्दल प्राधान्यक्रम ठरविले जात आहेत. तातडीने आवश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या जात आहेत.
तर असे चालले आहे एकंदरीत सगळे.
-----------
(डेटलाइन: मेट्रो अटलांटा. किंवा, (बहुतांशी) अटलांटाच्या ईशान्येकडील अटलांटाच्या बाहेरचे एक उपनगर.)
(उपरोल्लेखित 'पटेल ब्रदर्स' मात्र अटलांटाच्या साधारणतः उत्तरेकडील अटलांटाच्या बाहेरच्या दुसऱ्या एका उपनगरातले.)
----------
अपडेट: पटेल ब्रदर्स (संयुक्त संस्थानांतील तमाम शाखा) उद्यापासून (सोमवार ३० मार्च २०२०) बंद ठेवण्यात येत आहेत. ९ एप्रिलला पुन्हा उघडण्याचा सध्याचा तरी बेत आहे असे म्हणताहेत. पुढे काय होते बघू.
https://www.patelbros.com/coronavirus
या वेळी रोचक ही श्रेणी बदलून
या वेळी रोचक ही श्रेणी बदलून माहितीपूर्ण श्रेणी दिली आहे याची नोंद घेण्यात यावी, न बा.
अडीच महिन्यानंतर
अडीच महिन्यानंतर या परिस्थितीत काही बदल झाल्यासारखे वाटते आहे का , न बा ?
आता काय परिस्थिती दिसते तुमच्याकडे सांगाल काय ?
कोरोना
जानेवारीच्या सुरवातीला याबद्दल चीन मधून बातम्या येत होत्या पण बाकीच्या जगाला त्याचं गांभीर्य तितकसं जाणवलं नसावं. आपल्या उंबरठ्यावर हे प्रकरण आल्यावरही नेटकरी त्याबद्दल चेष्टेच्या सुरातच बोलत होते. पण जेंव्हा दैनंदिन जीवनच त्याने झाकोळून टाकले तेंव्हा कुठे ते लोकांनी सिरियसली घ्यायला सुरवात केलीये. आणि हा व्हायरसही प्रत्येक देशांत वेगवेगळा प्रताप दाखवतोय. यावर आत्ताच नोंदी करण्यापेक्षा, त्याचा अवतार संपल्यावर, त्यावर समग्र अनुभवांच्या गाठोड्यानिशी बखर टाईप लिहावं असं वाटतं! असं वाटण्यातही, आपण याही वयांत यांतून जिवंत राहू, असा अनाठायी आत्मविश्वास डोकावतो, असे कोणी म्हणू शकेल.
अस्वलनोंदी
आयडिया अतिशय आवडली आहे.
हाच प्रतिसाद पुढे वाढवत राहीन जमेल तसं.
स्थळ - सिएटलजवळ.
---------------------------------------------
जानेवारी २१ २०२०
काहीतरी नवा विषाणू चीनमधे पसरत आहे असं ऐकलं. फारसा फरक पडला नाही.
.
जानेवारी २५ २०२०
हाँगकाँगमधे रहाणाऱ्या मित्रमैत्रिणींनी पहिल्यांदा परिस्थितीची जाणीव करून दिली. हाँगकाँगमधल्या शाळांना सुट्टी द्यायचं ठरलं, हाँगकाँग सरकारने इमर्जन्सी घोषित केली.
तेव्हा ह्या व्हायरसने सुरू झालेल्या त्रासाची वैयक्तिक जाणीव झाली.
( आज २५ मार्चपर्यंत हाँगकाँगमधल्या शाळा बंदच आहे. लोकही घरूनच काम करताहेत)
.
१ ते १४ फेब्रुवारी १ २०२०
चीनमधे गेलेली आमची एक टीममेट परत आली ती तापाची लक्षणं घेऊनच. आम्ही थोडे घाबरलो होतो (तिच्याकरिता.) १४ दिवस घरी राहून, डॉक्टरांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत ह्यावर शिक्कामोर्तब करून ती पुन्हा हापिसात परतली. तेव्हा आम्हाला हायसं वाटलं. तिथवर वुहानमधला हाहा:कार कानी पडत होता. इतर अनेक ऑफिसातले चिनी लोक परत येऊन घरी स्वत:ला १४ दिवस बंदिवासात ठेवत होते.
पण अमेरिकेत तरीही फारसं काही बदललं नव्हतं.
.
२८-२९ फेब्रुवारी २०२०
आमच्या घरापासून जेमेतेम १/२ तास अंतरावर असलेल्या शहरात कुणी मनुष्य कोरोना व्हायरसने मृत्यूमुखी पडल्याची बातमी ऐकली. तारीख मागेपुढे असेल, पण २८-२९ फेब्रुवारीला टर्निंग पॉईंट होता. लोकांनी धावाधाव करून दुकानं रिकामी केली. अतिउत्साही लोकांनी मास्क वगैरे लावून दुकानांत आणखी गोंधळ माजवला.
इथवरही "भय"भीत म्हणावं तसं काही वाटत नव्हतं. पण लीप वर्षाचा २९ फेब्रुवारी कायमचा लक्षात राहील आता.
this was the beginning.
.
मार्च पहिला आठवडा (१-५)
टप्प्या टप्प्याने सगळं बंद व्हायला सुरूवात झाली. आधी कंपन्यांनी घरून काम करावं का ह्यावर खलबतं सुरू केली, मग घरून काम करायला परवानगी मागायची गरज नाही हे सांगितलं आणि मग सरतेशेवटी घरूनच काम करा- असा वटहुकूम काढला.
दुसऱ्या दिवशी रस्ते ओस पडले. ट्रॅफिक जवळपास शून्य. (मार्च ५)
स्थानिक प्रशासनाला ह्याच सुमारास परिस्थितीचं गांभीर्य समजायला सुरूवात झाली असावी, कारण दैनिक बुलेटिन येऊ लागली.
घराबाहेर घालवलेला एकूण वेळ : आठवड्यात १० तास.
.
मार्च दुसरा आठवडा
लाईफ केअर सेंटरच्या बातम्या रोज येतच होत्या. आमच्या काऊंटीतच केसेस जवळपास १०० च्या वर आणि मृत्यू २०पर्यंत पोचले होते. संपूर्ण अमेरिकेतले जवळपास ९०% लोकं इथेच करोनाग्रस्त होते. शाळा बंद करण्यासाठी जोरदार सह्यांच्या मोहीमा सुरू झाल्या. लोकं आता घाबरली होती.
इथवर कोरिया/इटली/इराणच्या बातम्या यायला लागल्या. अख्खा देश कुणी लॉकडाऊन कसा करू शकतं? इटली लॉकडाऊन केल्याची बातमी ऐकली तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं होतं. (मला आज (मार्च २५ला) हे लिहिताना अजिबात आश्चर्य वाटत नाहीये कारण गेल्या १५ दिवसांत इतकं काही झपाट्याने बदललं आहे. )
आता परिस्थिती किती गंभीर होऊ शकते हे सामान्य लोकांना कळलं. काऊंटीतली मृत्यूसंख्या ४०पुढे पोचली असावी.
घराबाहेर घालवलेला एकूण वेळ : आठवड्यात २ तास, फक्त खरेदीसाठी. दोन्ही वेळा सॅनिटायझरने हात, हँडल वगैरे पुसलं. गाडीच्या स्टिअरिंग व्हीललाही पुसलं.
.
मार्च तिसरा आठवडा
शाळा बंद. सिनेमे, रेस्टॉरंट, रिटेल दुकानं बंद.
लोकांनी घराबाहेर पडू नये ह्यासाठी स्थानिक सरकारने माहितीचा भडिमार केला. नेमकी ह्याच दिवसांत स्प्रिंग-ब्रेक म्हणून हवा छान होती, त्यामुळे लोकं तरीही बाहेर पडलेच.
पण एकूण सामसूम.
काऊंटीचा मृत्यूदर आता ७०वर गेला असावा. एकूण करोनाग्रस्त लोकच ५०० पेक्षा जास्त. हे सगळं एका काऊंटीत.
.
हे सगळं बघून व्हॉट्सॅपवर भारतातल्या मित्रांना, नातेवाईकांना वगैरे काळजी घ्या, घराबाहेर पडू नका वगैरे फोन केले. लोकांनी फारसे गंभीरपणे घेतले नाहीत, पण त्यांनी चौकशी केली.
घराबाहेर घालवलेला एकूण वेळ : आठवड्यात १-२ तास, फक्त खरेदीसाठी. नेहेमीप्रमाणे सॅनिटायझरने हात, हँडल वगैरे पुसलं. लोकं खूपच कमी दिसत होते.
५०% लोकं मास्क, ग्लोव्हज घालून फिरत होते.
.
मार्च चौथा आठवडा
भयाण.
इटलीच्या बातम्या डोक्यातून जात नाहीत.
न्यूयॉर्कमधे अचानक करोनाग्रस्तांचं प्रमाण काहीच्याकाही वाढतं आहे. भारतातही लागण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
रात्रभर झोप लागली नाही. भारतात लॉकडाऊन सुरू होईपर्यंत जीवात जीव नव्हता.
इथे आता रोजचं झालं आहे असं वाटतंय. काऊंटीतले मृत्यू १००पर्यंत गेले असावेत.
एकूण काउंटीतले करोनाग्रस्त १०००.
घराबाहेर घालवलेला एकूण वेळ : आठवड्यात १-२ तास, फक्त खरेदीसाठी. नेहेमीप्रमाणे सॅनिटायझरने हात, हँडल वगैरे पुसलं. लोकं खूपच कमी दिसत होते.
५०% लोकं मास्क, ग्लोव्हज घालून फिरत होते. घरी आल्यावर सामान पुन्हा सॅनिटाईझरने पुसलं.
आंघोळ केली. साबण जास्त लावला.
...
क्रमश:
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अस्वल राव,
अस्वल राव,
मला या आणि अशाच नोंदींची अपेक्षा होती.आणि रोचक.झकास.
आता जगाच्या कुठल्या भागात आपण राहता हे सांगितलंत तर तसा संदर्भ राहील.
आपण अपडेट करणार आहातच ना या /अशा नोंदी ?
क्रिप्या करणे.
आभारी तर आहेच.
नक्की.
जमेल तशा अपडेट करीनच.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अस्वल राव ,
अस्वल राव ,
एक आठवडा झाला जवळजवळ तुमचा अपडेट येऊन.
काही फरक पडलाय का ?
अपडेट देणार का ? वेळ होईल तसा ? आभार
सामसूम आहे.
सामसूम आहे.
संपूर्ण एकांतवासाने बाहेरचं काही जाणवत नाहीये, काही लक्षणीय घडलं की मग एकत्रित लिहितोच)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहिताना हिस्टरी ऑफ द सेल्फ टाळता येणं शक्य नाही. किंबहुना वेगवेगळ्या सेल्फांच्या दृष्टिकोनांतूनच प्रेझेंट घडतो. हे वेगवेगळे तुकडे नंतर एकत्र करून कॅलिडोस्कोपमधून फिरवले की प्रेझेंटचे वेगवेगळे काचपैलू दिसतात.
माझ्यासाठीचा या काळातला प्रवास अंधार - प्रकाशाची चाहूल आणि मग पुन्हा अंधार असा झाला, आज २६ मार्चला अजूनही चालू आहे. आत्ताही अंधारातच जखडणं नशिबी आहे.
माझी भारतात परत यायची प्रस्तावित तारीख आणि करोना व्हायरसचा प्रभाव कर्मधर्मसंयोगाने एकत्रच. मला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यायचं होतं. पण काही कारणाने ते पुढे गेलं. करोनाही जानेवारीतच सुरू होऊन वाढत गेला.
माझी तारीख पुढे जाऊन ७ फेब्रवारी ठरली, तेव्हा करोनाबद्दल मला काहीच माहिती नव्हती. न्यूयॉर्क - मुंबई - न्यूयॉर्क हे चायना एअरचं तिकिट ५०० डॉलरला, आणि त्यात दोन दिवसाचा बीजिंग स्टे होता. म्हणजे फुकट चायना ट्रिप!
दुर्दैवाने तिकिट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोरोनाविषयी काही ऐकलं. आणि दोनतीन दिवसांनी चीनने सर्वच पब्लिक प्लेसेस बंद केल्या. मग धावपळ करून १४ फेब्रुवारीला मुंबईत पोचण्याचं तिकिट काढलं.
भारतात पोचण्याआधी मी आमच्या मोठ्या घरात कोंडल्यासारखा राहात होतो. कंटाळा, डिप्रेशन, चिंता यामुळे स्वतःवरच घातलेला कर्फ्यू हेता. आणि हे कधी संपणार याबाबत अनिश्चितता होती.
भारतात पोचल्यावर मात्र अगदी लख्ख प्रकाशात आल्यासारखं झालं. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे इथे मुक्ती होती. दरवेशी बाहेर पडताना हाडांत रुतणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत नव्हता. ढगाळ राखाडी वातावरणाऐवजी स्वच्छ सूर्य, ऊन आणि हिरवी पानं होती. इतरही अनेक गोष्टी.
महिनाभर छान चाललं होतं. मी माझ्या मुलाला घेऊन दररोज पोहायला जायचो, बाहेर खायचो, भारतातल्या गमती दाखवायचो. लोकांना भेटणं, मुंबईला जाऊन येणं वगैरे सगळं छान होतं.
पण १० मार्चच्या आठवड्यात गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या. करोनाचा प्रसार भारतातही आहे, आणि सध्या आकडे दहावीसचाळीसच असले तरी झपाट्याने वाढू शकतात हे कळलं.
मग आपोआपच पोहायला जावं का? असा प्रश्न पडला. एकदोनदा गेलो नाही. पण लवकरच इथेही पब्लिक स्पेसेजवर बंदी यायला लागली. मग हॉटेलात जाऊन खाणं, किंवा सहजच बाहेर जाऊन कॉफी पिऊन येणं हेही कमी झालं, थांबलं. घरापासून चालत किती जायचं याचा व्यासही घटताना जाणवला. रिक्षा वगैरे थांबलीच. पुन्हा एकाच घरात कोंडून घेतल्याचा फील यायला लागला. हे सगळं आठदहा दिवसांच्या काळात हळूहळू टप्प्याटप्प्याने घडलं. भारतात पोचलो तेव्हा जवळपास बटण दाबून दिवा लावावा तसा उजेड झाला होता. पुन्हा अंधार होताना मात्र संध्याकाळीची सावकाश रात्र व्हावी तसं झाल.
गुर्जी, तुमचा प्रतिसाद वाचून
गुर्जी, तुमचा प्रतिसाद वाचून बरं वाटलं.
तुम्ही प्रवासात होतात, म्हणजे फारच वेगळा अनुभव असेल.
पुढले अपडेट्सही देत रहा..
==================
भूतकाळातील आस्वल्य.
लॉकडाउन व्हायच्या आधी एक दिवस
लॉकडाउन व्हायच्या आधी एक दिवस मी एका मारवाड्याच्या दुकानात सकाळी लवकर दूध घ्यायला गेलो होतो. तिथे एक महाशय तंबाखू, चुनापुडी आणि संभाजी बिडी बंडल याचे प्रत्येकी १० १० चे स्टॉकसाठी विकत घेत होता.
काय काय दर्दी लोक असतात राव.
त्यात एकाने आर.एम.डी गुटखा का नाही ठेवत म्हणून विचारणा केली.
हे सगळं घडले सकाळी सकाळी साडे सहाच्या सुमारास जेव्हा नुकतेच दुधाच्या पिशव्यांचा टेम्पो उतरवत होता.
लोक कशाची सोय करतील याचा नेम नाही
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
मीपण्
काय काय दर्दी लोक असतात राव.
ॲक्चुअली. माझ्या अपार्टमेंटाच्या ग्राउंडफ्लोरला कमर्शिअल गाळे आहेत. त्यात एकात मोठे वाईन शॉप आणि एक बीर शॉपी आहे. बहुतेक तिसऱ्या आठवड्यात मेहुणा आलेला. सोलापुरला कारने जाण्यासाठी रुमाल बांधून. रात्री थांबला. पार्टी करावी असा विचार होता. बायकोने तो प्लान हाणून पाडला. जेवण हाणून गप झोपलो. दुअसऱ्या दिवशीपासुन दारु दुकाने बंदची नोटीस लागली. सहज बाहेर जाऊन येतायेता रिलायन्स स्मार्टगिरी(सौदागरात नवीन झालेले असलेने) करुन आलो. महिन्याचे सामान १५ ला भरतो साधारण. ते उशीरा आणले. तेथेही कपड्याचा सेक्शन बंद होता. लोकं मास्क मिरवत होते. येताना गर्दी अजिब्यात नव्हती रात्री ९.३० ला. जरा घाबरलो. ४-५ दिवसात आटपेल वाटलेले. २२ ला मोदीकाकांनी सांगायच्या आतच बरीच दुकाने बंद झालेली. तीन चार दिवस आधीच बायकोलाही घरुन काम मिळालेले. सोलापुरात फारसे काही नसलेने तेथील काम निम्म्या प्रमाणात ऑनलाईन चाललेले होते. २३-२४ पासून खरी गेम सुरु झाली. किराणा, भाजी, डेअरी आणि बेकरी वगळता सर्व चिडीचुप बंद. २४-२५ पर्यंत पानपट्टीवाले मागच्या बाजुने सिगरेट, तंबाखू आणि पुड्या देत होते. काहीजणांकडे टपरीवाल्याचा फोन नंबर असलेने त्याला रस्त्याच्या कडेला डिलिव्हरी मिळत होती. अर्थातच तीनचार रुपये एक्स्ट्रा लावून. सफाईकामगारांना त्याने आक्खा विमल पानमसाल्याचा पुडा हळूच देताना पाहिला. ५००ची हिरवी नोट घेतली बहुधा त्याने. मार्लबोरो ॲडव्हान्स ३० रुला विकली जात होती. एक पोलीस गायछआपचा आक्खा पुडा विथ चुनापुड्या(आता त्या फ्री देतात गायछापवाले) विकत घेऊन गेला. एक मुलगा ॲक्टिव्हाच्या सीटखालील डिकित सिगारेट आणि विमलच्या पुड्या ठेवून ओळखीच्या घरी डिलिव्हऱ्या देत होता. पुढे हँडलला मात्र पिशवीत भाजी आणि ब्रेड होता. ही पिशवी आता बाहेर फिरायचा परवाना झाल्यात जमा आहे. आज उद्या हेही बंद होईल कारण काही पोलीस आणि मनपावाले हटकताना दिसू लागलेत. शौकीनांना छंद करायवयाला जरा मुरड घालावीच लागेल. पब्लिक मात्र बरेच शिस्तशीर वागत आहेत. दुकानात गर्दी नाही. पण धंदा होत आहे. एक दोघे सलग दिसतात. बंद पडत आलेल्या एका चिल्लर सुपरमार्केटला ह्या लॉकडाउनने संजीवनी मिळालीय. भाजीवाले भाज्या जराश्या कमी आहेत पण रेग्युलर रेटला देताहेत. दर्जा प्रचंड खराब आहे. जवळचा पेट्रोलपंप आठवडा झाला बंदच आहे. घरी दोन गाड्या आहेत. दोन्हीत अंदाजे ३-४ लिटर पेट्रोल आहे. पँट शर्ट घालून १० दिवस झालेत. टीशर्ट थ्रीफोर्थ हेच रुळले आहे. घरातले वायफाय १९ ला रिचार्ज केलेय. टीव्हीचे रिचार्ज संपून ६ महिने झालेत. बायको लॅपटोप घेऊन बसल्याने आणि माझ्या कामाचा टोटलच बोऱ्या वाजला असलेने स्वयंपाकातले प्रयोग नेहमीप्रमाणेच चालू आहेत.
हे झाले सध्याचे. मात्र गेले चार पाच महिने स्लीप डिस्कमुळे घरात लॉक डाउन असल्यासारखाच होतो. जानेवारी संपताना जरा बरे वाटू लागलेले. फेब्रुवारी सुरुवातील टीशर्ट डिझाईनच्या जरा टूर्नामेंतस वगरे कामे आलेली. शिवजयंती जरा समाधानकारक झालेली. आता स्कूल युनिफोर्मात लक्श घालावे असे वाटून फिराफिरी चालू केलेली ती बंद झाली. सोलापूरचे प्रॉडक्शन सध्या संपूर्ण बंद असलेने नवीन डिझाईन नाहीत गेले ८ दिवस. येत्या १४ एप्रिलला आंबेडकर जंयम्तीचे डिझाईन कर म्हणून ऑर्डर आलेली. दुसऱ्याच दिवशी होल्डवर गेली. हे अजुन महिनाभर चालणार. म्हणजे ते काम नसणारच. म्हणजे गेले ५ महिने विनापगार विनामोबदला. आताही तग धरणे हेच ध्येय. अर्धांगी खंबीरपणे उभी म्हणून हा वेळ निभावेल असे वाटते. पुढे मात्र काय होईल ते मात्र लोकांच्या शहाणपणावर आणि मोदीकाकाच्या उपायावर अवलंबून आहे. कोरोनाच्या इतक्या बातम्या एकल्यात की आता काहीच एइकावेसे वाटत नाही. काय होईल त्याचाही भरोसा वाटत नाही. शांतपणे आला दिवस ढकलणे चालू आहे. दोन कॅन्व्हास पेंट करायला घेतलेत. पण ब्रश हातात घेतला की नकोसे वाटते काम करायला. लॅपटोपवर काही डिझाईन्स करावे म्हणले तर मला ऑऱ्डर असल्याशिवाय डमी डिZआईन करायची सवय नसलेने होत नाहीत. मिपाचे दोन बॅनर तेवढे करुन दिले.
बघू आता. काय हुईल ते हुईल.
झकास अभ्या शेठ!!!
झकास अभ्या शेठ!!! अज्ञातवासातून बाहेर आलायसा लय बेष्ट झालंय.
येत जावे .
अभ्या शेठ ओ !!!
अभ्या शेठ ओ !!!
काय म्हणताव ?
अडीच महिन्यांनंतर आता काय दृश्य दिसतंय लिहिणार का शेठ ?
काय बदललं म्हणायचं?
काय सांगायचं बापटाण्णा?
काय बदललं म्हणायचं?
दृष्य म्हनत असताल तर सगळे आधीप्रमाणेच चाललेय. जणू १८ मार्चला पॉज केलेलं पिक्चर पुन्हा सुरु झालंय. आता ते धूसर आहे हे आहेच पण रस्त्यावरचे चालू सिग्नल, धावणारी वाहनं, लोकांची गजबज, उघडी दुकानं आणि विमानांचे आवाज जाणवून देताहेत की चालू आहे सगळं.
भाजी मिळत आहे. मधल्या दोन महिन्याच्या कालावधीत पानपट्टीवाल्यांनी भाजीची दुकाने उघडली होती. नेहमीचा चेहरा पाहताच " काय करणार पोट तर चालवायला करावेच लागते" ह्या नांदीनंतर हळूच भाजीच्या पोत्याखालचा गायछाप, विमल आणि गोल्डफ्लेकचा ऐवज दिसतो. दुप्पट रेटने विकला जातो. चारपाच दिवस झालेत आता तेही भाज्या बिज्या बंद करुन टपऱ्या उघडत आहेत. चड्ड्या थ्रीफोर्थाची गर्दी कमी दिसतेय. मास्क वाले आहेतच पण न वापरणारेही दिसताहेत. दारु दुकानावर तुरळक गर्दी असते. आधी कोरोनापूर्व काळात असायच्या त्याच्या निम्मीच म्हणा हवे तर. किराणा दुकानाचीही गर्दी ओसरलीय. मारवाडी बंधू आता जरा मास्क काढून दुकानाबाहेर उभे राहण्याची मजा अनुभवू शकत आहेत. सकाळी ९ ला सुरु होणारा दिवस रात्री ९ ला चिडीचुप होऊन संपतो. नेहमी गजबजणारे शिवार गार्डन, कस्पटे वस्ती, कोकणे चौक हे रेस्टॉरंटस सोडून बाकी सर्व खुले आहेत पण लोकांची गर्दी नेहमीपेक्षा चतुर्थांश पण नाही. पेट्रोल लाईन न लावता मिळाले. आधी कार्ड स्वॅप बंद होते, फक्त कॅश ते ही आता चालू झालेले. कपड्यांची, गाड्यांची शोरुमे सुरु झाली आहेत पण लोक तुरळक आहेत. महापालिकेची रस्त्याची जेथुन थांबली तेथुन कामे सुरु आहेत. कामावरचे मराथवाड्यातले बंजारा कामगार सोडले तर बाकी लोकल दिसत आहेत. बरेच बिहारी युपी कामगार निघुन गेल्याने पार्सल देणारी किचन्स आणि इतर सेवा जसे की सलून्स, गाड्या वॉशिंग, पंक्चर, पाणीपुरी आदी बंद आहेत.
ह्या सगळ्या चालू गोष्टींच्या अपवादाला रेल्वे बंद आहे, एसट्या बंद आहेत. कार सोलापुरला अडकली आहे, बाईक घेऊन जाऊ शकतो पास काढून सोलापूरला पण भीती वाटते. भीती हिच की आपण इम्म्युनिटि आणि वयामुळे तगलो पण शरीरात आहेच बसलेला कोरोना. सोलापूरला गेलो आणि आईवडिलांना तो द्यायची इच्छा नाहीये. त्यांना नाही सोसवणार. तीन वर्षाखाली आईची अँजिओ झालेलीय. बाबांना डायबेटीस बीपी दोन्हीही आहे. तीन महिने ते निभावताहेत जिवाच्या कराराने. कोरोनाआधी तिकडच्या घराचे पाणी कनेक्शन बिघडलेले. तीन महिने त्यांनी शेजारुन पाणी घेऊन दिवस धकलताहेत. कारण महानगरपालिकेचा कुणी रिस्पॉन्सच देत नाहीये. पाठपुरावा करायची ताकत नाहीये त्यांची. माझ्याकडून जमेल तेवढे करायचे प्रयत्न केले. नाही होत. त्यांचे फोनवरुन सांगणे नको येउस असेच असते. त्यांना भीती मला क्वारंटाईनला राहावे लागेल म्हनून. आता तसे काही नाहीये हेही त्यांना पटत नाही.
सोलापुरातले माझ्या व्हेंडरने काम सुरु केले पण ऑर्डर आहेतच कुठे? चार सीझन आणि कामे आमची. स्कूल युनिफॉर्म, मंडळ आणि उत्सवाचे टीशर्ट, टूर्नामेंटस आणि स्पोर्ट्स इव्हेंटचे युनिफॉर्म आणि इतर चिल्लर गारमेंट ट्राकपॅन्ट आणि जर्सी सारखे. चारही गोष्टींचे भविष्य येत्या वर्ष दीडवर्षात अंधाराचे आहे. शाळाच सुरु होणार नाहीयेत. काय अन कसे शिकवायचे ह्याचाच पत्ता नाही तेम्व्हा युनिफॉर्म कोण बघनार. स्पोर्टस आणि सामाजिक इव्हेंटस सरकार काही होऊ देणार नाही. एकूणच येत्या वर्षभरात ऑर्डर न के बराबर. ऑनलाईनचा मार्ग चोखाळायचा आहे पण त्याची तयारी करतानाही धसकाच आहे. आधीचा अनुभव नाही त्याचा. नुकसानीत अजुन इन्व्हेस्टमेंट म्हनजे जुगारच आहे.
सोलापुरातील एका मित्राचे लग्नपत्रिकाचे शोरुम/फ्रन्चायझी होते. दरवर्षी त्याचा डिदस्ट्रीब्युटर वीस पंचवीस लाखाच्या पत्रिका छापून घ्यायचा अन तो विकायचा. गेल्या वर्षभरातच लग्नपत्रिकावर व्हॉटसपचे अतिक्रमण झालेने धंदा निम्म्यावर आलाय. मुख्य लग्नाचा सीझन गेलाय. आता येत्या काळात कुणी शंभर पत्रिका छापून तरी लग्न करेल असे वाटत नाही. दुकानाचे भाडे, नुकतेच केलेले इंटेरिअर असा महिना तीस चाळीस हजाराचा खर्च आहे. उत्पन्न २०२० मधले अद्याप शून्य. घर घ्यायला निघाला होता. कॅन्सल केले. घरातली थोडीफार पुंजी अन सोने काढून संसार चालवतोय. त्याच्यासोबत जगणारा डीटीपी ऑपरेटर मित्र त्याच्याहूनही भयाण परिस्थितीत आहे. कुणी कर्ज देत नाही अशा वेळात. ते फेडायाला पुढे काय ते ही कळत नाही. पुण्यात आलो नसतो तर मीही थोडाफार असाच झगडत राहिलो असतो. इथेही आगामी काळात ते चुकलेले नाही. बघू कसे आणि काय होते ते.
रुखूटुखू
घडतंय ते आसपास आणि तरी दूरस्थ. माझ्यातडे फक्त केरफरशी करण्यासाठी बाई येते, यायची. सोसायटीत येणाऱ्या सगळ्याच कामगारांना ३१ तारखेपर्यंत येऊ नका सांगितलंय. ते आता आणखी पुढे गेलं. ती दहा बारा मिनिटांत काम उरकून जायची. दिवसाकाठी कोणीतरी दुसरं घरी येतं या कारणासाठी मी तिला ठेवलंय. तर आता केरफरशी करण्यात अर्धा तास सहज जातो. जास्तच.
दूधवाला येतो. किराणा आहे, पण भाजीची नड आहे. मी नेहमी चिरलेल्या भाज्या आणते ते दुकान घरापासून दोन अडीच किमीवर आहे. मला चालायला आवडतं, पण ज्या प्रकारे टीव्हीवर रस्त्यावर दिसेल त्याला / तिला रट्टे मारताना दाखवताहेत त्यामुळे बिचकायला होतंय.
जवळपास (तरी 1 किमी) म्हणजे रस्त्याच्या कडेला भाज्या विकणाऱ्यांकडे मी आजवर दोन कारणांसाठी गेले नाही. रस्ता अडवणाऱ्यांना सोयीनुसार आश्रय देणं योग्य नाही आणि रस्त्यावरचं प्रदूषण. आता ते तरी तिथे असतील का हा प्रश्न आहेच.
बिगबझारचा एक संदेश आलाय घरपोच सेवेचा. मोजक्या चार गोष्टी आणून देतात का पाहायचं.
बाकी work from home चालूच आहे. संगणकावर तपासत सूचना लिहिण्यात फार वेळ जातो.
परवा पहिल्यांदाच भावाच्या वाढदिवसाला त्याच्याकडे गेले नाही.
हैद्राबाद
तुम्ही तेलंगणात आहात का ? तर काही प्रश्न आहेत.तिथे असाल तर विचारतो , सांगा.
22 तारखेपासून आम्हाला
22 तारखेपासून आम्हाला डेस्कटॉप्स घेऊन घरी पिटाळण्यात आलं. वफ्रॉहोचा हा पहिलाच अनुभव. कितपत काम होऊ शकेल याची शंका होती, पण अनुभव असा आला की काम होतेय पण सुसुत्रता नाही. संवाद खुंटल्यासारखा होतोय. आणि मुख्य म्हणजे खुप जास्त स्ट्रेस येतोय, ऑफिसला जात होतो तेव्हा जितके काम असे त्यापेक्षा आता कमी काम असूनसुद्धा स्ट्रेस खुप जास्त जाणवतोय. अर्थात पुढे काय होईल याची चिंता हा एक भाग आहेच पण घरात कोंडून घातल्यासारखे झाल्याने करमतच नाहीये आजिबात. मळभ दाटून यावे असे झालेय. हे किती महिन्यांकरिता आहे हे अजून कळत नाही.
बाकी, ग्रोसरी आणायला गेलो तर रवा, मॅगी आजिबात संपलेली. केव्हा मिळेल माहित नाही.
वाचन, सिरीज बघणे, सिनेमे बघणे होईल असे वाटलेले पण मूडच येत नाही. विचित्र फिलिंग येते आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
पण अनुभव असा आला की काम होतेय
तंतोतंत.
अगदी.
घरून काम करणं म्हणजे डोक्याला ताप आहे.
वेडेवाकडे मानसिक ताण सतावताहेत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अडीच महिन्यानंतर
अडीच महिन्यानंतर आता काय परिस्थिती पुम्बा ?
काय दिसतंय तुम्हाला ?
वाणी (क्र)
माझा वाणी आज सामान देताना किंचित खोकला. तेव्हा त्याच्या तोंडावरचा मास्क त्यानं खाली ओढला होता. मी त्याला म्हटलं असं करत जाऊ नका, तर मला म्हणाला ठसका आला होता, तोंडावर मास्क असताना ठसका आला तर गुदमरायला झालं. म्हणून मास्क बाजूला केला. #ये_मेरा_इंडिया
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
करोना तीन महिन्याचा होत नाही तोच...
आण्णाप्पा धुळाप्पा संकेश्वरे: वय ७५, शिक्षण: नाही, धंदा: शेतमजुरी. सकाळी सात वाजता दोन भाकरी, दूध, मिरच्यांचा खर्डा अशी न्याहारी मुरगाळून आण्णाप्पा शेतावर जायला बाहेर पडतो. त्याची बायको, मुले त्याला बाहेर जाऊ नको असे म्हणून त्याची मिनतवारी करतात, पण तो ‘करोना का फिरोना’ असे म्हणून बाहेर पडतो. उसाची तोडणी सुरू असते. उस तोडणी कामगार, त्यांच्या बायका, मुले, तोडणीवरचे मुकादम, सगळे एकाच ठिकाणी. एकत्रच. मोळ्या बांधून त्या ट्रकमध्ये भरल्या जातात. तिथेच कुणी खोकतो, नाक शिंकरतो. धुळीत मुले खेळतात. बायका दमून सावलीला बसतात, पदराने घाम पुसतात. विहीरीवरून भरून आणलेल्या घागरीतून एकाच तांब्याने कधी वरुन तर कधी तोंड लावून घटाघटा पाणी पितात.
गावातले दुकान. बंद. पोलिसांची जीप संचारबंदी, जमावबंदी असे बरेच काही सादवून जाते. जीप निघून जाते. धुरळा खाली बसतो. दुकान उघडते. बायाबापड्या डाळ, तेल, मीठ घेऊन जातात. गावातल्या रिकामटेकड्या रिटोळ लोकांचे टोळके अड्डा जमवते. एखादा सिगरेट पेटवतो. एखादा तंबाखूचा बार मळतो. समोरच्या धुळीत एक तेजस्वी पिंक हाणतो.
तालुक्याचे ठिकाण. रस्त्यावर कमी गर्दी आहे. नाक्यावर पोलीस उभे आहेत. एस. टी. सेवा बंद आहे. गावाकडून येणार्या वडापमधून आजारी वाटणारा एक म्हातारा, त्याच्याबरोबर असलेली काळजीने खंगलेली त्याची बायको आणि कंटाळलेला वाटणारा त्याचा मुलगा हे उतरतात. पोलीस दंडुके सरसावत त्यांच्याकडे धावतात. तरणा मुलगा मग्रूरीने काहीतरी बोलतो. पोलीस दंडुका उगारतात. म्हातारी अजीजीने हात जोडते. म्हातारा उन्हाकडे बघून झीट आल्यासारखा करायला लागतो. म्हातारी काहीतरी विचारते. पोलीसांपैकी एकजण एका दिशेला हात दाखवतो. थकलेल्या म्हातार्याला एका अंगाला ती म्हातारी आणि एका अंगाला तो मुलगा असे धरून चालवत नेऊ लागतात. म्हातार्याला उचकी लागली आहे. ऊन मी म्हणत असते.
‘हम बादशा आदमी है. बादशा कौन होता है जानते हो? जो किसी की मर्जी का गुलाम नही होता. सब अल्लाह का फरमान है. जीना उसीकी मरजी, मरना उसीकी मरजी. लेकीन याद रख्खो काफिरों, जो अल्लाह के बंदोंपर लाठी चलायेगा, करोना उसीपर कहर बरपायेगा’ कुणीतरी तावातावानं बोलत असतो. आजूबाजूचे लोक माना डोलावतात.
‘मास्क घाला मास्क’ बूट घालून, हातात काठी घेऊन चालायला बाहेर पडलेले एक आजोबा दुसर्या आजोबांना सांगत असतात. ‘धूळ श्वासामार्फत आत नाही गेली पाहिजे. अहो, अशा कित्येक साथी पचवल्या आहेत माणसानं. प्लेगचं उदाहरण घ्या. त्या वेळी काय कमी लोक मेले? आं?’
‘खाली दिलेला मंत्र आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आहे. या मंत्राची सलग साखळी तयार व्हावी याकरिता तुम्ही तो मंत्र पठण करून पुढे दहा जणांना पाठवा (मला सोडून) न पाठवू शकल्यास मला परत सेंड करा म्हणजे साखळी तुटणार नाही.*ॐ नमो भगवते सुदर्शन वासुदेवाय , धन्वंतराय अमृतकलश हस्ताय , सकला भय विनाशाय , सर्व रोग निवारणाय , त्रिलोक पठाय, त्रिलोक लोकनिथाये , ॐ श्री महाविष्णु स्वरूपा, ॐ श्री श्रीॐ औषधा चक्र नारायण स्वहा !!*’
‘गरम पाण्याने बरं का....’
‘हळद आणि दूध’
‘व्हिनेगारचा वास घेत राहा. बास. सगळे व्हायरसेस..’
‘नागरमोथा आणि गोमूत्र..’
‘का.......ही करू शकणार नाही आपल्याला. अहो, आध्यात्मिक बळ असलेला देश आहे आपला. अमेरिका बघा, इटली बघा...करा म्हणावं अजून नंगानाच...’
‘पोर्नहब प्रीमियम फ्री झालं म्हणे आजपासून. खरं काय रे?’
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अहाहा ! एकही मारा लेकीन ...
अहाहा ! एकही मारा लेकीन ...
झकास रावसाहेब ,
बाकी तेजस्वी पिंक आवडलीच (स्वातंत्र्य समरातील धगधगत्या अग्निकुंडानंतर हेच ते)
येत जा हो सवडीने !
बाकी कोरोनाच्या सर्वव्यापी फेकल्या जाणाऱ्या लिंकांमध्ये हे चित्र खास आणि महत्वाचे !!
आभार.
अण्णा बापटांना मम म्हणतो.
अण्णा बापटांना मम म्हणतो.
रिटोळ
अण्णा बापटांना अनुमोदन!
तेजस्वी पिंकेसोबतच 'रिटोळ'ही पाहून आनंद झाला. (बहुतेक) नेमाड्यांच्या एका कादंबरीत, अशाच एका वर्णनात हा शब्द येऊन गेल्याचं आठवतं.
क्लास
क्लास
परदेशी
भारतात सध्या काही लाख परदेशी लोक अडकलेले असावेत. काही विद्यापीठांतून परदेशी विद्यार्थ्यांना 'कुठेही जा पण इथे (कँपसवर) राहू नका' असे सांगून हाकलले जाते आहे असे कळते. परदेशी टुरिस्टांना हॉटेलांमध्येही असा अनुभव येतो आहे. काही उच्चपदस्थ लोकांना त्यांच्या वकिलातींतर्फे विशेष विमानांनी बाहेर काढले गेले, पण सामान्य परदेशी नागरिकांना अशी सुविधा उपलब्ध नव्हती. ज्यांचे स्थानिक लोकांशी पुरेशा जिव्हाळ्याचे संबंध नाहीत आणि ज्यांना राहायला जागा नाही अशा कित्येक जणांचे हाल कुत्रा खात नाही असे चित्र आता तरी दिसते आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वाणी (क्र)
माझ्या वाण्याकडे नेहमी पराठे, ठेपले, इडल्या, पुरणपोळ्या, पोळ्या वगैरे तयार आणि ताजे साहित्य असते. आता हे सर्व गायब आहे, कारण ते पुरवणारे लोक कुठे तरी पुणे जिल्ह्यातच, पण शहराबाहेर आहेत. सगळे काही घरगुती उद्योगाप्रमाणे चालत असल्यामुळे त्यांचा माल व्यावसायिक टेम्पोमधून येत नाही, तर घरचेच / ओळखीतलेच कुणी तरी पोचवते. मात्र आता अशी खाजगी वाहतूक पोलीस अडवत आहेत त्यामुळे माल येणे शक्य नाही. त्यांचा रोजगार ठप्प असल्यामुळे आर्थिक परिस्थिती लवकरच हातघाईची होणार बहुतेक.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
८ मार्च रोजी मुंबईत राजेश
८ मार्च रोजी मुंबईत राजेश घासकडवी यांची भेट झाली त्य दिवशी भेटीदरम्यान किंवा आधी नंतर करोना विषयी काहीही बोलणे झाल्याचे आठवत नाही. सर्व व्यवहार सुरळित चालू होते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
२५ जानेवारीला चीनचा गुढीपाडवा
२५ जानेवारीला चीनचा गुढीपाडवा होता. या सुमाराला हॉंगकॉंगमधून मोठ्या प्रमाणावर माणसं चीनला जाऊन येतात - घरच्यांना भेटायला किंवा नववर्षाचा आनंद लुटायला. हॉंगकॉंगमधील कुटुंबीय चिंतेत.
२५ फेब्रुवारीला - हॉंगकॉंगमध्ये परिस्थिती आटोक्यात आहे, रोगप्रसाराचा वेग कमी झालाय, पण अजूनही wfh चालू असल्याचे भावाने कळवले. तिथल्या लोकांच्या मनात सार्सच्या भयंकर आठवणी असल्याने लोक शिस्तीत वागले, स्वतःहून बंधनं घातली, पाळली असं म्हणाला.
तरी भारतात आम्ही निवांत होतो. बाळकोबासह मी दिल्लीला गेले होते, २५ला कलकत्त्याला परत आले. कोरोनापेक्षा दंगे, ट्रम्पभेट या सगळ्याची चिंता होती.
यानंतर एकाच आठवड्यात भारतातील चित्र पालटलं. तरीही गांभीर्य लक्षात आलं नव्हतं. रोजचे व्यवहार, ऑफिसं चालूच.
१४ मार्चला भाऊ भारतात येणार होता, १२ तारखेला मी त्याला तिकीटं कॅन्सल करायला लावली. या वेळपर्यंतही भारतातील परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज सगळ्यांना आला नव्हता. ओळखीचे एकजण वैद्यकीय कारणासाठी वेल्लोरला, एकजण उगाच तिरुपतीला, आणखी एकजण कौटुंबिक समारंभासाठी ऊज्जैनला, एकजण मुलीकडे ग्वाल्हेरला गेले या सुमारास. वेल्लोरला व ग्वाल्हेरला गेलेले अजून तिकडेच अडकून पडलेत.
१४ मार्चला आमचं विद्यापीठ बंद झालं ते अजून बंद आहे. होळीसाठी बरेच विद्यार्थी घरी गेले होते, जे परतले नाहीत ते कुटुंबाबरोबर सुरक्षित. जे हॉस्टेलला परतले होते, त्यांचे हाल कारण 2 दिवसांनी हॉस्टेल बंद केलं. विशेषतः उत्तर बंगालमधील विद्यार्थी(नी). उत्तर बंगालात काय परिस्थिती आहे देव जाणे, अनेक मजूर परत आलेत, त्यांची कोणाची चाचणी झालेली नाही. कारण चाचणी केंद्रच नाही. शिलिगुडी सेफ आहे असं अजूनही तिथल्या लोकांना वाटतंय. क्रिकेट खेळणं वगैरे चालू आहे लोकांचं.
..रुमाल
अडीच महिन्यानंतर आता काय बदल
अडीच महिन्यानंतर आता काय बदल दिसत आहेत तुम्हाला हे लिहाल का कृपया ?
आता इकडे लक्ष द्या! प्लीज!
हे ताजे फोटो आहेत, माझ्या घराखालच्या मैदानातले! यातला कुणी मुंबईत रोजंदारी करतोय, कुणी गोव्यात-बंगळुरू येथे छोट्या-मोठ्या नोकरीवर आहे. कोरोनाच्या भीतीने/किंव काही कामानिमित्त ही मंडळी उत्तरप्रदेश, बिहार, तेलंगण, आंध्र, राजस्थान इत्यादी राज्यांतील आपल्या गावाला जायला निघाली होती. कुणी कोरोनाच्या भीतीमुळे, तर कुणी काही कामानिमित्त/लग्नासाठी/आईवडील आजारी आहेत म्हणून!
इथल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून यांची ट्रेन निघणार होती. अनेकांची आसने आरक्षित होती, पण मुंबईत पोहोचायला विलंब झाला म्हणून ट्रेन पकडता आली नाही!
मैदानाभोवतालच्या झाडांच्या सावलीत पथारी/सतरंज्या टाकून किंवा तसंच, आपापल्या बॅग्सची उशी करून ही मंडळी झोपून आहेत. यांची खायची प्यायची सोय काही स्थानिकांच्या माध्यमातून होते आहे. झाडांच्या भोवती कचरा, घाण असल्याने डास चावतात, म्हणून SCLRच्या पुलावर झोपायला जात होते दोन दिवस, काल पोलिसांचे ओरडे/क्वचित तडाखे खाऊन पुन्हा झाडांखाली येऊन विसावलेत. जवळजवळ १२० एकटे पुरुष आणि ४०-४२ परिवार SCLR च्या पुलाखाली आहेत. यात स्त्रिया आहेत, चिमुरडी बाळं आहेत. त्यांचे शरीरधर्म निभावण्यासाठी त्यांना काहीही सुविधा उपलब्ध नाही. टिळक टर्मिनसच्या आवारात प्रतिक्षालये, फलाट बंद आहेत. यांच्या मलमूत्रविसर्जनासाठी निसर्ग हाच आसरा आहे. स्थानिकांना यातून त्रास होण्याची शक्यता आहेच.
अर्थात,प्रशासन, रेल्वे, स्थानिक नेते-पक्ष व पोलिस अतिशय मेहनत करून यावर तोडगा काढायचा प्रयत्न करत आहेत! त्यांना दोष देऊन अजिबात चालणार नाही, त्यांनी त्यांचं काम चोख केलं आहे. संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी जमा होऊ न देणे गरजेचे आहेत. व्यवस्थेला , यंत्रणांना मानवी-प्रशासकीय मर्यादा आहेत.
यातून आदर्श काही घडेल अशी शक्यता नाही! यासाठी कुणा एका व्यवस्थेला, सरकारला, नेत्यांनाही दोष देऊन चालणार नाही! फार कठीण काळ आहे! भयावह, भकास , आर्जवी चेहरे करून ही मंडळी बोलतायत!
देव, नियती, व्यवहारवाद, हिंदुत्ववाद, भोंदूत्ववाद, सेक्युलॅरिसम, फेक्युलरीजम, मानवता, पुरोगामी, प्रतिगामी सारे सारे आपापल्या जागी नीट आहेत, योग्य आहेत, अयोग्यही आहेत, खोटे आहेत, खरे आहेत ! सर्वांना झोडायला हवं, गोंजारायला हवं, पुजायला हवं, हाणायला हवं! पण त्या आधी यांची सोय आपण सर्वांनी, प्रशासनाने, समाजाने, देऊळ-मशीद-गुरुद्वारा-धर्मशाळा इत्यादी सर्वांनी लावावी!
हे संकट ओसरल्यावर आपण साऱ्या विचारसरणी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, संघ-कम्युनिस्ट, काँग्रेस-भाजप, मंदिरे, मशिदी यांच्या कुस्त्या लावू, तिकीट लावून! त्यातून येणारा निधी वापरू , त्यांच्या संघांच्या, सेवादलांच्या, चॅनलांच्या, पक्षांच्या, नेत्यांच्या जाहिरातीचे होर्डिंग लावू, त्यांना १००८ सुवासिनी बोलावून ओवाळू! तुमच्या ढेरपोट्या दुखऱ्या भावनांचे ओहोळ धरण लावून साठवून ठेवू तुमच्या जलक्रीडांसाठी!
आता इकडे लक्ष द्या! प्लीज!
किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||
(No subject)
पोस्ट आवडली.
पोस्ट आवडली गुरुजी !!
पोस्ट आवडली गुरुजी !!
सर,मधल्या काळात बरच काही घडून
सर,मधल्या काळात बरच काही घडून गेलंय.
अपडेट लिहिणार का ? मुंबईतून किंवा खोपोलीतून , जिथे कुठे असाल तिथून ?
अमेरिकेतलं एक उपनगर : साधारण
अमेरिकेतलं एक उपनगर : साधारण १५ मार्चच्या आसपास
काही दिवसांपूर्वी पटेल स्टोअर्स मधे मी आणि पत्नी गेलो होतो. कार पार्क करून स्टोअर मधे शिरताना दिसलं की एकही शॉपिंग कार्ट उपलब्ध नाही. लोक दारात शॉपिंग कार्टकरता ताटकळत होते. मी बायकोला "तू आत जा नि शॉपिंगचं पहा मी कार्ट घेऊन आलो" असं म्हणालो. ती आत आणि मी पार्किंग लॉटमधे. सुदैवाने १० मिनिटांनी रिकामी शॉपिंग कार्ट मिळाली. आत गेलो. आत साधारण दादर स्टेशनवर सकाळी ९ वाजता असायची तितपत गर्दी होती. बायको दिसणं शक्य नव्हतं. तिला फोन लावला. (सुदैवाने ) तिने उचलला. तिला म्हणालो की मी आत आलेलो आहे. तिने ऑलरेडी एक छोटं बास्केट मिळवू शॉपिंग सुरु केलं होतं. आतली लाईन इतकी मोठी होती की त्या लाईनमधे साधारण चाळीसेक मिनिटं लागणार हे उघड होतं. (उपमा पुन्हा तीच : दादर स्टेशनवर तिकीट काढायचं असताना जितकी लाईन असायची तितकीच मोठी. फरक इतकाच की इथे घे-तिकीट-आणि-पटकन-नीघ असं असणार नव्हतं. प्रत्येक माणसाची ओसंडून भरलेली शॉपिंग कार्ट.) त्यामुळे मी आत शिरल्या शिरल्या चेकआऊटच्या लाईन मधे. पत्नी येऊन येऊन सामान डंप करत होती. आजूबाजूला बरीच गर्दी. (जय करोना.) असं करून साधारण तासाने बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर "आम्हाला तुमची कार्ट हवी" असं सुमारे चार लोक म्हणाले. तेव्हा पहिलं जो बोलला त्याला म्हणालो की तुम्ही घ्या पण मला कृपया सामान गाडीत नेण्याची उसंत द्या.
असा एकंदर खूप्खूप रम्य अनुभव.
"पटेल स्टोअर्स मधे जाऊ या " या पत्नीच्या विनंतीला मान देऊन तिथे गेलो होतो. आता ती त्याचं परत नाव काढत नाही. ज्यास्ती-त्रास-दिलास-तं-पटेलला-नीन असं तिला म्हणण्याचा मोह मी आवरता घेत असतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
व्हर्जिनिया वृत्तांत
व्हर्जिनिया वृत्तांत मस्त जमत आहे सर.
असेच येऊदे अजूनपण.
राजधानी से सावधान
राजधानीतले लोक तात्यांच्या जवळ राहिल्यामुळे का काय, फारच गंमतीशीर वागत आहेत. आमच्या भारतीय वाण्याकडे पहिल्या दिवशी गर्दी होती - पहिला दिवस जेव्हा आस्टिनात पहिले दोन रुग्ण सापडले - १३ मार्चचा शुक्रवार. आता फार गर्दी नसते.
पहिल्या दिवशी जरा जास्त गर्दीत आम्ही उभे होतो. मला फ्रीजरमध्ये दहीवडे सापडले. बऱ्या अर्ध्याच्या रोषाला बळी न पडता मी दोन पाकीटं उचलून आणली. "तुला खायचे नसतील तर खाऊ नकोस, मी खाईन" असं बाणेदारपणानं म्हणाले. (आज संध्याकाळी त्याला 'बेक्ड पटेटो' खायचा आहे. मी दहीवडे हादडेन.) पैसे भरून निघायला एरवी फार तर पाच मिनीटं थांबावं लागतं. त्या दिवशी १५-२० मिनीटं थांबावं लागलं.
आमच्या समोर रांगेत उभी असलेली भारतीय (ठेंगणी) बाई पायघोळ, तंग, काळा झगा घालून आली होती. ती दर मिनिटाला दोनदा अस्वस्थ होऊन ढकलगाडीत काही तरी सामान आणून ठेवत होती. तिचे हिंदी उच्चार बरे होते, पण इंग्लिश बोलायला लागली की, ही कॉल सेंटरमध्ये काम करत असावी, अशी शंका परतपरत येत होती. बऱ्या अर्ध्याचं तिच्याकडे लक्षही नव्हतं. ती घाबरून काय वाटेल त्या गोष्टी विकत घेत होती (तिच्या नवऱ्याचं मत, माझं नाही), हेही त्याला दिसत नव्हतं. कारण तो एकीकडे इंटरनेटवर गोप्रोबद्दल वाचत होता. दुकानाच्या रिकाम्या फळ्या आणि माणसांची तौबा गर्दी एरवी समृद्धीच्या देशात कधी दिसणार! त्याला दुकानात कुल्लाकागद न मिळाल्याचं दुःख नव्हतं; पुरेसं दस्तावेजीकरण न केल्याचं दुःख होतं. अजूनही त्याची परिस्थिती बदललेली नाही. फक्त कामंधामं असल्यामुळे गोप्रो कॅमेऱ्याबद्दल तो बोलत नाही.
गेल्या शनिवारी, २० मार्चला तिकडे दुपारी गेलो तर फार काय, अजिबातच गर्दी नव्हती. तिथे मिळणारं सगळं सामान जागेवर होतं. डाळी, कडधान्यं, गूळ, साखर, तेल, मिरची. अमेरिकी दुकानात बटाटे मिळाले नव्हते ते भारतीय वाण्याकडे मिळाले. एकच अपवाद, काळे वाटाणे. शाकाहारी, मेक्सिकन जेवणात उकडलेल्या काळ्या वाटाण्यांना पर्याय नाही! त्याचे काही कॅन आणून ठेवले आहेत.
बरा अर्धा आता 'आधी भारतीय दुकानात मिळतंय का बघू' म्हणायला लागला आहे. शिवाय भारतीय दुकान घराजवळ आहे. जितम् मया!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवांतर - भारतीय किराणा
अमेरिकेत गेली अनेक वर्षं मी पुढील ठिकाणाहून भारतीय किरणा माल मागवतो आहे. ५ दिवसांत सामानखोका दारापाशी येतो.
https://www.ishopindian.com/
का???
तुमच्या गावात, नाहीतर किमानपक्षी गाडीने चक्कर मारून येण्याजोग्या अंतरावर एखादे भारतीय किराणा मालाचे दुकान नाही???
कुठे राहता तुम्ही? नॉर्थ डाकोटा किंवा तत्सम इन-द-मिडल-ऑफ-नोव्हेअर ठिकाणी?
हे लोक शिपिंग कॉस्ट्समध्ये वाट लावत असतील!
जोवर देशी किराणा मालाच्या दुकानात प्रत्यक्ष जाणे शक्य आहे, तोवर अशा दुकानांतून मागवणे कधीही वर्थ असणे शक्य नाही.
(अनलेस, प्रत्येक वेळेस घाऊक भावातच (जसे, दोन महिन्याची संपूर्ण ग्रोसरी एका वेळेस) विकत घेत असाल, तर गोष्ट वेगळी. पण इतक्या काटेकोरपणे करणे कठीण आहे. आणि, का करायचे?)
असो.
अवांतर: का??? @'न'बा
व्यनि धाडला आहे.
अमूकराव , अभ्यास कमी पडलाय इथे...
अमूकराव , तुमचा नेमका या बाबतीतील अभ्यास कमी पडलाय ना ?
आदरणीय न बा यांनी कधी कुणाचा व्य नि स्वीकारलाय असा विदा तुम्हाला एकतरी मिळालाय का ?
त्यात हे सोसल डिस्टनसिंगचे दिवस ..
इथे लिहा हवं तर, नाहीतर खरडफळ्यावर , ते पोचू शकेल कदाचित त्यांना.
काय न बा , काय चूक बोललो का मी ?
मुक्तसुनीत सर,
मुक्तसुनीत सर,
गेल्या एका आठवड्यात काही बदल दिसतोय का जगाच्या सत्ता केंद्राजवळ ?
कोलकत्ता येथून...
कोलकत्ता येथून आलेला एक प्रतिसाद (लेखक नाव प्रकाशित करू इच्छित नाही) खालीलप्रमाणे:
लोकांची छुपे/उघड भेदाभेद वृत्ती जात नाही हेच खरं
रोज गावाकडून भाजी घेऊन येणारा मुसलमान भाजीवाला काल येऊ शकला नाही पण आज आला. त्याने मला ब्रेड आणि चहा मागितला कारण तो घरातून तीन वाजता बाहेर पडतो आणि आता सगळी हॉटेल्स बंद आहेत. त्याने स्पष्ट सांगितले की तुमच्यासारखी एखाददोन घरं सोडली तर मला पाणी सुद्धा मिळायची मारामार असते. लोकांना माझ्या हातून भाजी चालते पण एरवी सोडा आत्ता लॉक डाउन मध्येही मला कुणी खायला दिलं नाही.. गोड बोलून कटवलं
यात त्याचा सामाजिक वर्ग आणि धर्म याचा समान वाटा आहे माझ्यामते
आर्थिक बोलायचं तर तो स्वतः शेतकरी आहे आणि फारसा गरीब नाही
>>>>मला पाणी सुद्धा मिळायची
>>>>मला पाणी सुद्धा मिळायची मारामार असते. >>>> अरेरे!!! साक्षात दत्तगुरु कोणत्याही रुपाने मध्यान्हकाळी आपल्याकडे भिक्षा मागायला येतात - ही श्रद्धा असलेला आपला समाज आणि एखाद्या भुकेल्याला ही वागणूक?
मूल्याधारीत शिक्षण व अध्यात्म - अगदी वेगळे हे पटवणारी परिस्थिती आहे.
कारुण्यातील विनोद...
नाही म्हणजे, माणुसकी म्हणून त्या कष्टाळू भुकेल्या गृहस्थास खाणे, पिण्यास पाणी किंवा चहा वगैरे देणे योग्यच आहे, नव्हे दिलेच पाहिजे, नि जरूर द्यावे, परंतु...
...साक्षात दत्तगुरू मुसलमान होऊन आपल्या दारी येत असतील ही कल्पना अंमळ फारफेच्ड वाटते.
असो चालायचेच.
नबा , अहो एकनाथांचे गुरु,
नबा , अहो एकनाथांचे गुरु, जनार्दनस्वामी यांनाही दत्तगुरु, मलंगाच्या वेशात येउन भेटले होते. त्यांच्या म्हणजे दत्तगुरुंच्या सांगण्यावरुन, व जनार्दनस्वामींच्या दुजोऱ्यातून, एकनाथांनी कुत्रीचे दूध काढून दत्तात्रेयांना प्यायला दिले. व उरलेले उष्टे दूध, स्वत:प्याले होते. त्या क्षणी दत्तात्रेयांनी, एकनाथांना दर्शन दिले.
आश्चर्य आहे!
नाही म्हणजे, सत्यनारायण हे मुसलमानी प्रथेतून जन्माला आलेले दैवत आहे, इतपत ऐकून होतो. (खरे खोटे एक तो सत्यनारायण जाणे, नि दुसरा तो अल्ला जाणे.) परंतु, दत्तसुद्धा???
हे कधीच लिहून येत नाही
हे कधीच लिहून येत नाही कालीपुजक बंगालात. आमचा ओफीसमधला सहकारी सांगतो की आम्ही घराबाहेर 'अशा लोकांसाठी'(यावर जोर देऊन) करवंट्या ठेवतो. हे लोक आले कामाला तर त्यांना पाणी ,चहा त्यात वरून ओततो. त्यातूनच पितात आणि करवंटी जागेला ठेवतात.
बखरीतल्या नोंदी वाचून समाधान
बखरीतल्या नोंदी वाचून समाधान झाले.
आठ मार्च रविवारपर्यंत भारतात काहीच विशेष बातम्या नव्हत्या. मग इतर देशांतून परत आलेले लोक इकडे मिसळले तसे भीतीदायक वातावरण वाढायला लागले. या महिन्यात भारतात पर्यटन थंडावलेले असते. म्हणजे लोक शहरांतून आपापल्या घरी जात असतील होळीला वगैरे तसे फक्त. वाहने बंद झाल्याने ते आपल्या घरीच अडकले असते. आम्ही सात तारखेला कर्नाटकातून परत आलो. आता विचार येतो की अडकलो असतो लँड ओफ कॉफीत तर कानडी शिकुनच परत आलो असतो.
मी बाहेर पडत नाही दहा दिवस
मी बाहेर पडत नाही दहा दिवस झाले. मला फरक पडत नाही. शिवाय ज्येष्ठ नागरिकांना हटकताहेत विशेषकरून. "काय नडलं आहे का पाय मोकळे करायचं?"
मुलगी बँकेत जाते तेव्हा वाटेत दोनतीनदा तरी विचारतात. कार्ड दाखवावे लागते. गुढी पाडव्याच्या सुटीनंतर एक माणूस पासबुक भरायला आला होता.पन्नास रुपये भरले. काल फक्त दुकानदार आले होते गल्ल्याची रोख भरायला. मोजे घालून नोटा मोजायला वेळ लागतो. मशिनशिवाय हातानेही मोजतात.
दुकानांसमोर शिड्या/वर्तुळं काढली आहेत. त्यातूनच रांगेत अंतर ठेवून पुढे सरकायचं. सापशिडी.
वाचतोय
साधारण दशकएक भरानंतर "करोनोत्तरी" दिवाळी अंकासाठी फर्स्ट हँड रेफरन्स मटेरिअल आहे.
काश्मीरमधून, प्रेमपूर्वक !!
लॉकडाऊन ही उर्वरित देशाकरिता (आणि) जगाकरिता नवीन गोष्ट !!!
दुर्दैवाने काश्मीर निवासी लोकांना ही नेहमीची/रुटीन गोष्ट...
लॉकडाऊन झाल्यावर त्यात जगत कसे राहावे याबद्दल काश्मिरी लोकांकडून येणारे फॉरवर्ड्स रोचक आहेत म्हणावे ...
एक असाच फॉरवर्ड इथे
एक कश्मीरी दोस्त का मेसेज़ आया है
लिखा है,
कर्फ्यू है एहतियात से रहिएगा
पानी कम गिराइएगा, नमक कम खाईएगा।
जाफरान की भी चाय बनाई जा सकती है
आटे में नमक डाल कर
पानी उबालकर भी रोटी खाई जा सकती है।
चावल की पीछ मे छोंक से
एक वक्त की सालन चलाई जा सकती।।
दो कुन्बे एक चुल्हे पर खाना पकाए
साझी लकड़ी जलाएँ ,साथ बैठ खाऐ।।
ऐसे करके बरकत रहती है
चावल की पिपि,तेल की कुप्पी
ज़्यादा दिन चलती है।।
माँ जी की दवाई ख़त्म हो तो
पानी में हल्दी घोलने से आराम आएगा।
अब्बा जी को गुनगुना घी गुटनो में लगाइएगा।।
बच्ची गूमने की ज़िद करें तो
बॉलकनी में कंधे पर घुमा आइएगा।।
खिडकी में से पड़ोसी से बात करते रहना।
कुछ कमदिल होते है, दिलासे देते रहना।
उधार लेने देने में शरम नहीं है,
देहशत के बाद अमन में लौटाते रहना।
किसी नाके पर पुलिस पुछे तो
हाँ जी, ना जी में कहना।
आधार, वोटर, लेसंस खीसें में रखना।
और कई बातें हैं जो तुमे सिखानी है
कुछ दिन की बात है,
आपको कौन सा हमारी तरह
कर्फ्यू में ऊमर बितानी है..
- Copied
शंका
उपरोद्धृत कवित्वाचा उगम कश्मीरबाहेर (किंबहुना जम्मू-कश्मीर आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेशांपासून कोठेतरी भरपूर दूर) आणि कश्मीरशी कोणत्याही प्रकारे रक्त/वंश/संस्कृतिसंबंध नसलेल्या कोणापाशी असण्याचे ऑड्ज़ कितपत असावेत?
----------
(गंमत आहे. खालचा 'कोरोना कंट्रोल , सांस्कृतिक मार्ग !!'वाला मेसेज बकवास आहे, हे लगेच लक्षात येते. (जे ठीकच आहे.) मात्र, 'एक कश्मीरी दोस्त का मेसेज़ आया है' असे सुरुवातीस लिहिले, की त्यापुढे काहीही बकवास (आणि कोणीही) ठोकून दिली, तरी लगेच विश्वास बसतो. चालायचेच.)
कोरोना कंट्रोल , सांस्कृतिक मार्ग !!
बाकी कोरोना कंट्रोल व्यवस्थित चालू आहे.
काही समाजसेवी संस्था लोकांचा अभिमान जागृत व्हावा व त्यांना बरे वाटावे याकरिता काही मेसेजेस जोरात फिरवत आहेत, एक उदाहरण खाली.
Donald Trump calls Narendra Modi for Indian intervention in USA after IG and FB live videos of people at 5 PM on 22 Mar 2020 went viral. Based on Modi's deep scientific understanding of the situation, the entire country came together for spiritually cleansing Bharat of Coronavirus during the Revati phase of the Nakshatra.
Trump had supported Modi by providing a hotline of NASA satellite that monitor the cosmic hum, to the PMO. Modi was himself present in the Government War Room during the national chanting along with the Cabinet Ministers. Trump witnessed the spectacle via videoconferencing.
Insiders say that Trump got emotional when he realised how the world's only superpower had failed in containing the virus when all they had to do was to look up to the spiritual capital of the world.
Both geostationary as well as Polar orbiting satellite clusters were able to pick up the disturbance on their Doppler sensors as the collective prayers of 1.3 billion Indians matched the resonant frequency of the diurnal multipath propagation over the Indian subcontinent. Scientists say that if the vibrations were so strong enough to be picked up by satellites, it would definitely have created a ducting effect in the lower troposphere which would either trap the virus in a "continental duct" or would have columned the virus towards the stratosphere.
India can now breathe easy. The next week's curfew is just to avoid a few rogue virus spores that avoid the duct. On 31 Mar, the Nation will come together again and hymn the last remain traces away. The time chosen is such that Mars will be at the most acute angle with the Longitude in the Sub-Continent. This will not just provide better ducting but also provide maximum separation from "Shani"
Yet again, India has proved it's worth to the world. What people laugh as "Jugaad" is actually ingenious and simple solution that have been passed on to us through generations.
USA is now frantically planning to organise a nationwide chanting as soon as possible. Trump has also directed UN to make Om an internationally protected symbol.
*Proud to be Indian*
*Jai Hind!!*
..
पण तो 22 मार्चच्या आदल्या दिवशी फिरणारा मेसेज तर तुफ्फान विनोदी होता. माझ्या अंदाजाप्रमाणे तर तो उपहासात्मक आहे "डोलांड ट्रम्प" वरून. पण अगदी सिरियसली फॉरवर्ड होत आहे. मस्त करमणूक झाली वाचून.
बखर माझीही
जेव्हा ह्या नवीन रोगाबद्दल माहित झालं होतं, साधारण फेब्रुवारीच्या शेवटाला, तेव्हा एक मीम फार प्रसिद्ध होत होतं. प्रत्येक सहस्रकाच्या २०च्या वर्षी एक महामारी येतेच म्हणे. असावी. फार गांभीर्याने घेण्यासारखं काही नाही, म्हणून ते टाळलं.
माझा मित्र ऑस्ट्रेलियाला जाणार होता. म्हणाला, चल जिमीजची चक्कर टाकून येऊ. मी, तो आणि अजूनेक मित्र गेलो. ह्यावेळी ते वटवाघूळ आणि जिवंत उंदीर खाण्याचे व्हिडीओ फिरत होते. डुक्कर खायची प्रचंड इच्छा असूनही टाळलं. तीन जंगी बर्गर, चिकन फ्राय्ज, आइस टी, फिश ॲण्ड चिप्स वगैरे चापून आलो. हे सुरू होण्याआधी दोघांनीही चिनी लोक जिवंत वळवळणारे उंदीर खात असलेले व्हिडीओ दाखवून वात आणला.
काम सुरुच होतं. भारतात साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीच पत्ता नव्हता करोनागिरोनाचा. हे लोण युरोपात आणि हम्रिकेत पसरलं आणि वाट लागली. आई आणि मी जाऊन १५ किलो तांदूळ घेऊन आलो होतो. आई म्हणते, प्यानिक बाइंग नको बा उगीच. महिन्याभराचं भरून ठेवा काय ते.
मास्क गिस्क दिसायला सुरुवात झालेले. विद्यार्थी काही जास्तच सॅनिटायझर वापरु लागले होते. म्हटलं बराय.
टॉप टीअर ऑफिसेसनी वर्कफ्रामहोमच्या आर्डरी काढल्या. बाकी चालू.
दुसऱ्या आठवड्यात बहुतेक करोना दाराशीच ठाकला. लोक भन्नाट पॅनिक बाईंग. डेटॉल, मास्क, सॅनिटायझर बंद. कुठेच मिळत नव्हतं. तरी पब्लिक रस्त्यावर बिन्धास्त फिरत होतं. तशी भिती वगैरे काही नाही. सगळं सुरळीत सुरू.
तिसरा आठवडा. उठाबाबांनी लॉकडाऊन म्हटलं. ह्याचा अर्थ काहीही कळत नव्हता म्हणून एक दिवस कामाला जावं लागलं. मास्क विकत घेऊन ते घालण्याची सक्ती करण्यात आली. पण त्याच दिवशी अजित पवारांनी सज्जड दम भरला प.प. घेऊन. काम बंद. घरी रवाना. अभ्यास जोमाने सुरू केला. एक्तीसपर्यंत लॉकडाऊन का काय ते म्हणे. पब्लिक प्यानिक बाइंग मॅक्स. अंड्यांचे भाव दुप्पट. चिकनमटणाच्या दुकानासमोर रांगाच रांगा. गर्दी!
चौथा आठवडा. मोदी येऊन बेसिकली म्हणाले की "ए येडे, तेरे बाप का शादी है क्या रे? लोकहो, तुमाले अक्कलच ना. मी दिनभर सांगजो, सांभाशिन सांभाशिन ऱ्हा पोट्टेहो त तुमी फटाके सोडून ऱ्हायले. ढोल बजवून ऱ्हायले. आता अजि इक्कीस दिन बसा घराइले बुडं लावून."
मग काय सगळंच बंद. घोस्ट्टाऊन. रस्त्यावर एक टक्का लोक्स. तरी पब्लिक व्यायाम करणे जॉगिंग करणे वगैरे करतंच आहे. दूध, भाज्या, फळं मिळतायत आणि ती घ्यायला गर्दी होतेच आहे. दोन डझन अंडी घेऊन ठेवली. दुप्पट भावाने मिळाली.
पाचवा आठवडा. किरकोळ दुकानेही बंद. डेअऱ्या-बेकऱ्या बंद. चक्क व्होडाफोन ग्यालरी सुरू, एक पेट फूड शॉप सुरू. मेगा मार्ट्स बंद. फक्त फार्मस्या आणि इस्पितळे सुरू. अगदी नगण्य प्रमाणात, पण पब्लिक बाहेर फिरतंच आहे. माझ्या घरासमोर बारकासा सर्व्हिस रोड असल्यामुळे मीही संध्याकाळी अर्धा तास फेरी मारून येतो. आल्यावर कोपरापर्यंत हात, तोंड धुतो. वजन वाढत चाललंय. व्यायाम पब्लिक आहेच सकाळी.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
अडीच महिन्यांनंतर आता काय करत
अडीच महिन्यांनंतर आता काय करत आहेत चौदाव्या ?
काय चित्र दिसतंय लिहिणार का ?
वेगळं काही नाही
वर लिहिलेत तेच अनुभव आलेत. थोडी भर
ग्रोसरी दुकानात सकाळी सकाळी गेलं की सामान मिळण्याची शक्यता वाढते. भारतीय दुकानात सामान जास्त दिसतंय.
मी गेली दोनेक वर्ष एकाआड एक आठवडा घरून काम करत होतो त्यामुळं work from home तयारी होतीच. माझ्या अनेक ग्राहकांना हा बदल मात्र जड गेला.
१३ तारखेला म्यानेजरीण बाईंनी
१३ तारखेला म्यानेजरीण बाईंनी "तुम्हाला म्हणून सांगते, पुढच्या आठवड्यात बुधवार, गुरवार, शुकिरवार डब्ल्लू एफ एच आहे, म्हणजे यक दिवस फक्त ऑफिसात यायचं, this is over and above monthly work from home days approved", त्याच्या आनंदात टिमने सोमवारी सुट्ट्या WFH टाकून अक्खा आठवडा सार्थकी लावायचा प्रयत्न केला. पण मॅनेजमेंटने फक्त गुरुवार शुक्रवार WFH दिल्याने चरफडत बुधवारी ऑफिसात जावं लागलं. चीन सारखे आप्ल्याला बंद केले तर सर्व्हर्स निट चालतात का हे पाहायला हा एक्सरसाईझ आहे असं कळवण्यात आलं.
गुरुवार (१९/०३) - सकाळी ११:०० : सगळं बंद झालं तर घरी सामान पाहीजे म्हणून सासूबाईंशी वाद घालून त्याने सामान घेतलं, सासूबाईंनी मला वेळ नाही तू आण म्हणून सांगितलं. त्यांना ऑफिसात जायचं होतं. आमची गाड्यासोबत नाळ्याची यात्रा असल्याने हायपरसिटीमध्ये जाउन त्याच्या घरचं सामान आणलं. गाडी होतीच म्हणून किराणा थोडं अधिकचं घेतलं कारण नौऱ्याच्या कंपनी कडून त्याला ऑनबोर्डिंग आलेलं. त्याचं शिप पनामा मध्ये होतं.त्याच्या सोबत न्यायला त्याने ड्राय स्नॅक्स , बिस्कीटं अधिकची घेतली. दोन किलो खाली दळून मिळत नाही म्हणून सासुबाईंनी नाचणी, बाजरी, ज्वारी दोन दोन किलो दळून घे आणि त्यातली थोडी तुझ्या घरी घेउन जा सांगितले. गहू पाच किलो दळून घेतला. आता जायच तर दोन दिवस मस्त ठूसून घेतो म्हणून नौऱ्याने मॅगी, ड्रेसिंग्स, मेयोनिज, मिल्कमेड, केक मिक्स जमा केले. साखर पाच किलो मिळत होती म्हणून तेही घेउन टाकलं. आतापर्यंत लॉकडाउन, आपल्यापर्यंत काही आलय असं वाटत नव्हतं. सगळं सुरळीत सुरू. जाता जाता नौऱ्याने सॅनिटायझर घे सांगितलं, दुकानात ते संपलं होतं. घरी येउन नौऱ्याचे मित्र आलेले, तो त्यांच्याशी गप्पा मारत बसलेला, त्यातल्या एका मित्राचे मालाडला दुकान आहे, त्याच्या मोबाईलवर दुकान बंद करतात आहेत म्हणून मेसेज आला सन्ध्याकाळी सहाच्या सुमारास. माझे उशिरा कॉल्स असल्याने मी पळते म्हणून मी घरी गेले. सासूबाई आल्या नव्ह्त्या, नाचणी बाजरी उद्या बघू नौऱ्याच्या घरीच ठेवली. पाणीपुरी खायची इच्छा होती पण उशीर झाला म्हणून घरी पळाले. कॉल्स आवरून झोपायला अकरा वाजले.
शुक्रवार सकाळ ९:०० : आईने घरात बटाटे नाहीत आणून ठेव म्ह्णून सांगितले. मला ऑफिसची कामं असल्याने टाळाटाळ केली. तो पर्यंत जनता कर्फ्यू वर पोस्ट यायला लागल्या होत्या. दिवसऑफिसच्या कामात गेला, आता पर्यंत जनता कर्फ्यूच्या पोस्टवर पोस्ट आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याच्या बातम्या यायला लाग्ल्या,
संध्याकाळी ५:०० - जवळच्या सुपरमार्केटात जाउन मॅगी, गुळ, बिस्कीटे, शेवया, आणल्या. बाकी सगळं आहे घरी म्हणून आईने सांगितलं. सुपरमार्केट, भाजी, फळवाले, मेडिकल सोडून सगळं बंद होतं
८:००: सासरेबुवानी अगं आज आली नाहीस, येतेस का आत जेवायला म्हणून विचारलं रिक्शाने घरी गेले, कांदिवली ते गोरेगाव १९ मिनिटात पार, लिंकरोडवर शुकशुकाट आणि अंधार होता (मेट्रोमुळे रस्त्यावरच्या दिव्याचा उजेड नीट येत नाही), सवय नसल्याने विचित्र वाटलं.
१२:०० : नौरा घरी गाडीने सोडायला आला.
शनीवार (२१/३) सकाळ : ८:३०: घरासमोर भाजीवाल्या मावशींकडे तोबा गर्दी होती. आईने सगळं बंद करतात आहेत बटाटे आणून ठेव म्हणून बाजारात पिटाळले, सोबत बँकेत चेक टाकायचा होता म्हणून एस बी आय मध्ये गेले. गर्दी नव्हती, बंदूकवाल्या मुच्छड सिक्यूरीटी वाल्याने एक टिकलीएवढा सॅनिटायझर हातावर दिला. माझ्या मागे अजून पाच सहाजण आले. माझा चेक भरून होईपर्यंत बाकिच्याना बँकेबाहेर अंतर राखून उभे केले होते, एकेकाला आत सोडलं जात होतं. पोलीस रस्त्यावर गर्दी करू नका म्हणत गाडीने फिरत होते. काहीतरी बिनसतय एवढं कळत होतं. बाकी सगळी दुकानं बंद. बटाट्याच्या वखारीत गेले तर २ वाजे पर्यंत दुकान उघडं आहे, नंतर बंद करणार असं सांगितलं तोपर्यंत नौऱ्याने गोरेगावची मंडई बंद आहे म्हणून कळवलं. सासूबाईंना फोन करून मला इथे मिळतय भाजी कांदेबटाटे घेऊ का विचारलं त्यांनी उगाच तुला त्रास म्हणून नको म्हंटल पण नौऱ्याने थोडं रागवल्यावर पाच किलो बटाटे, अर्धा किलो लसूण, आणि तुला हवी ती भाजी घे सांगितलं, आईला आधीच सांगितल्यामुळे आईने त्यांच्यासाठी, शेंगा, कच्ची केळी, चवळीचा पाला, वांगे, दुधी, मका घेतला, मावशींकडचा माल ११ वाजता संपला होता. संध्याकाळी आरामात त्यांच्याकडे जाईन म्हंटल्यावर आईने आता दुपारी जा आणि सात पर्यंत घरी ये म्हणून सांगितलं. आळशीपणा करत वेळ काढला दिड वाजता मस्त तण्णावून दिली.
दुपारी : २:३० : सासूबाईंच्या फोनने जाग आली, घरी नौऱ्याच्या अक्का अलेल्या, माझी बहीण नायरला एमडी करतेय, तिच्यासाठी काही पाठवायचं आहे का अक्कांसोबत म्हणून त्या विचारत होत्या, मी नाही म्हणून सांगितलं. उठलेच आहे तर सामान पोचवून येते म्हणून उबर ऑटो केली. रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट होता, मंडईच्या आसपास फक्त जाग होती. पोलीस फिरत होते. कांदिवलीच्या इस्ट वेस्ट फ्लाय ओव्हर जवळ सिग्नलला थांबलेलो. एका माणसाने रिक्षावाल्याला तुम्ही काही खाल्लं आहे का असे विचरले, त्यानी हो म्हंटल्यावर शेजारच्या रिक्षावल्याला विचारलं, त्याने नाही म्हंटलं असावं बहुदा, त्याला त्या माणसाने दोन पार्लेजीचे छोटे पुडे, दोन केळी आणि पाण्याची बाटली दिली.
मी १८ -२० मिनिटात गोरेगावला पोचले.
सासूबाई आणि अक्कांशी गप्पा मारत बसलेले. अक्का साडेचारला गेल्या.
५:३० : सासरेबुवा संत्री आणि टोमॅटो घेउन आले. नौरा ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेला.
७:०० : नौरेबुवा काळोख झाला तरी उगावले नाही म्हणून शोधायला गेले तर ग्राऊंडमध्ये फतकल मारून गप्पांचा फड रंगला होता. त्याला म्हंटल मी चल्ले घरी आई ओरडतेय तसा तो उठला आणि घरी आला, मी सोडतो म्हणाला.
९:०० - आईचे चार पाच फोन येऊन गेलेले, आता रागपट्टीवाला फोन आला "येतेस की नाही घरी.." वाला. सासूबाईंनी इडलीचं वाटायला ठेवलेलं. भावासाठी मेदूवडे करून पाठवते म्हणाल्या मग आई काही बोलली नाही.
९:३०- येताना ए टी एम मधून पैसे काढून आण म्हणून सासूबाईंनी नौऱ्याला सांगितले, यु बि आय, कोटक, एच डी एफ सी मध्ये खडखडाट होता. रस्त्यात इंडीयन बँकेचं ए टी एम दिसलं लोक होते रांगेत, २० मि. मध्ये पैसे मिळाले.
९:४५ : कांदिवलीच्या मंडई मध्ये भाजीवल्याना पोलिस हाकलत होते. कढिपत्ता नव्ह्ता तो घ्यायला मी पटकन समोर दिसणाऱ्या भाजीवल्याकडे गेले त्यानी नाहीये सांगितलं, १० मिनीटाच्या पायपिटीनंतर दहा रुपयाचा २ महिने पुरेल एवढा कढिपत्ता घेतला. नौरा गाडीत वैतागलेला, कढीपत्त्यासाठी जिव चालला का तुझा करून त्याने ऐकवली. दिवसाची सांगता भांडणाने झाली. त्याच्या खुनशीत निरोप न घेता आप आपल्या घरी गेलो.
रविवार : २३ / ३: जनता कर्फ्यू, आता पर्यंत कोरोनाचं टेंशन यायला लागलं. रस्त्यावर चिडिचूप शांतता. पाच वाजता सगळ्यांनी टाळ्या, ताटं आणि जे मिळेल ते वाज्वून गल्ली दणाणून सोडली. नशिबाने कोणी मिरवणूका काढल्या नाहीत.
सन्ध्याकाळी ७:३० - वैताग आलेला घरी बसून म्हणून दुध आणायला बाहेर पडले. झोंबी लँडचा फिल होता. एक दोन पोलीस गाड्या सोडता १ २ लोकं होते. ३१ मार्च पर्यंत लोकल बंद, बस बंद. हा काय वैताग आहे वाटायला लागलं. या सगळ्यात नौऱ्याचं ऑनबोर्डींग कॅन्सल झालय.
सोमवार : अजून काही काही सुपरमार्केट उघडी होती, अजून काही काही सटरफटर आणून ठेवले. पॅनीक बायींगचा अंदाज यायला लाग्ला. कोरोनावाले लोकं वाढायला लागले. कामवल्या बाईला लागण झाली, झोपडपट्टीत पोलीस शोध घेतायेत ऐकूनच डिप्रेस वाटायला लागलं. आजपासून अजिबात कोरोनाचे अपडेट्स वाचायचे नाही असं ठरवलं. काम असल्याने दिवस इतका वाईट नाही गेला.
मंगळवार सकाळ ११:०० - संध्याकाळी बाबाजी देशाला उद्देशून भाषण करणार म्हंटल्यावर काहीतरी विपरीत घडतय याचा अंदाज यायला लाग्ला. संध्याकाळ ८:०० - बाबाजींनी लॉकडाउन केल्यावर अचानक वर्दळ दिसायला लागली. सगळे पिश्व्या घेउन रस्त्यावर उतारले. आम्ही पण ब्रेड, अंडी, आणून ठेवली. भाव दुप्पट. सगळीकडे गर्दी आणि पोलीस सगळ्याना हटवत होते. लोक जे मिळेल ते खरेदी करत सुटले होते. आईने अजून काही आणू नका आधी घरात व्हा म्हणून दम दिल्यावर आम्ही आमचं पॅनीक बायिंग आवरतं घेऊन घरात आलो.
रात्री नौऱ्याला माझ्याशी भांडून गेलास आता बस लॉकडाउन मध्ये म्हणून गिल्ट दिला.
उद्या पाडवा.
-----------------------
बाकीचं नंतर लिहिते.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
रोचक
आणखी नवीन प्रतिसादात लिहा गौराक्का. मस्त चाललं आहे हे!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एका ग्रोसरी स्टोअरवाल्याची कैफियत
दुवा.
(आजच्या हफपोस्टमधून/इन्स्टाग्रामवरून साभार.)
२० जानेवारी २०२० ची संध्याकाळ
२० जानेवारी २०२० ची संध्याकाळ मी सॅम जेप्पीचे शब्द ऐकत होते की फेब्रुवारीत काय एनर्जी शिफ्ट्स आहेत. -
(Streamed live on Jan 20, 2020 - https://www.youtube.com/watch?v=1wc_6A8wOKc) सॅम जेप्पी , ज्योतिषी सांगत होता - फेब्रुवारी व मार्च मध्ये महत्वाच्या एनर्जी शिफ्टस होताहेत. इन्टेन्स एनर्जी प्रेडिक्शनस. मार्चमध्ये एक्झॅक्ट तसे ग्रहमान आहे जसे ९/११ च्या वेळेस होते.
हे ऐकून, मला भीती वाटली होती ती अतिरेकी हल्ला परत होण्याची.
पण प्रत्यक्षात काय झाले - कोरोनाने ९/११ सारखेच जगभर पडसाद उमटले, व्हायरसमुळे, नरसंहार झाला.
पण मी काही गंभीरतेने घेतले नाही. गंभीरतेने घेउन घेउन तरी काय करणार होते - तर खफवरती पूर्वसूचना दिली असती.
२२-२३-२४ जानेवारी - शनि धनुमधुन, मकरेत प्रवेश करता झाला. ३ वर्षांकरता.
हे त्याचे शब्द. ५१:०० - या व्हिडीओवरच्या टाइमलाइनवरती त्याचे शब्द!
मूळ नक्षत्र हे धनु राशीत येते. काली ची अपरुटिंग एनर्जी म्हणजे हे नक्षत्र. धनु ही राशी अध्यात्म ओरिएंटेड असते म्हणजे देव -देव नसून, हायर ट्रुथ शोधणारी. केतु व मंगळ या नक्षत्रात आहे. तो म्हणतोय Lifting the veil एनर्जीचा सामना म्हणजे मायापटल उखडणारी, आपल्याला सत्याचा सामना करावयास लावणारी एनर्जी आहे या सुमारास.
_________________________________
ज्योतिष फक्त पुस्तक शिकून येत नाही त्याकरता डिव्हाइन ब्लेसिंग्स लागतात. तुम्ही काळाच्या स्फटिक गोलकात वाकून अदमासा घेताय हे खायचे काम नाही. सॅम हा नित्योपासनेवर भर देतोच. माता अमृतानंदमयी त्याच्या गुरु आहेत. तो खूप भरभरुन बोलतो त्यांच्याविषयी.
कसं जमवतात?
... सध्या अमेझॉननं जीवनावश्यक वगळता बाकी वस्तूंच पुरवठा करणं मागे टाकलंय म्हणतात. कसं जमवताहेत तुमचे ज्योतिषी?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ज्योतिष - थोडं राशी,ग्रह
ज्योतिष - थोडं राशी,ग्रह कुंडली आणि वैयक्तिक परिणाम वाचले आहेत ते थोडे दिशा दर्शवतात असं वाटतं पण हे सर्व देशाला, राष्ट्राला कसं लावतात हे काही कळत नाही.
स्थळ: न्यूयॉर्क
1 ते 10 मार्चदरम्यान मी एका कॉन्फरन्ससाठी चिलीत होतो. त्यावेळी चिलीत एक संशयित रुग्ण होता बहुतेक. सँतियागो विमानतळात प्रत्येकाचे तापमान मोजत होते. ह्या दिवसांत चिलीत बहुतांशी उद्योग नेहमीप्रमाणे सुरू होते. कॉन्फरन्समधल्या काही लोकांनी चिलीतल्या दुर्बिणींना भेटी देण्याच्या बेत केला होता, तर तोपर्यंत त्या बाहेरील लोकांसाठी बंद करण्यात आल्या होत्या. मी चिलीत पोचल्यावर तीन दिवसांतच आमच्या विद्यापीठाने इथून पुढे विद्यार्थ्यांनी कामानिमित्त परदेशात जाऊ नये असा फतवा काढला होता.
11 मार्चला अमेरिकेत आल्यावर विमानतळावर बरीच विशेष तपासणी होईल असे वाटले होते, पण प्रत्यक्षात साधे तापमानही मोजले नाही. विमानतळाहून घरी येण्यासाठी केलेला सबवेचा प्रवास शेवटचा. तोपर्यंत इच्छा असेल तर घरून काम करू शकता असे ईमेल आले होते. डिपार्टमेंटमध्ये बरीच सामसूम होती. रस्त्यावर मात्र बऱ्यापैकी वर्दळ होती. माझ्याकडचा तांदूळ संपत आला होता आणि नेहमी ज्या भारतीय किराणा संकेतस्थळावरून सामान मागवतो त्यांनी "आमच्याकडे फार गर्दी आहे, नंतर या" असे सांगितल्याने खरेदीसाठी जवळच्या दुकानांत गेलो. एक दोन दुकानांत शोधाशोध करून तांदूळ, गव्हाचे पीठ वगैरे गोष्टी मिळाल्या. त्या शुक्रवारी संध्याकाळी आजूबाजूच्या बारमध्ये तुडुंब गर्दी दिसत होती.
14-15 मार्चच्या वीकेंडला अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास घरी जा असे सांगण्यात आले. माझ्या घरासमोर एक हॉस्टेलची मोठी इमारत आहे जिच्यातून भरपूर विद्यार्थी सामानासह घरी जाताना पुढचे काही दिवस दिसत होते. सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता विद्यापीठ बंद असेल आणि घरूनच काम करण्यास सांगितले गेले. त्या रविवारी मी हापिसातून मॉनिटर, कीबोर्ड, झाडे वगैरे गोष्टी उचलून घरी घेऊन आलो.
सोमवारपासून रेष्टॉरंटे केवळ पार्सल/डिलीव्हवरीसाठी उघडी आहेत. गेल्या दोन आठवड्यांत दोन वेळा दूध वगैरे सामान आणण्याचा अपवाद वगळता घराबाहेर पडलेलो नाही. न्यूयॉर्कमधली गर्दीची प्रसिद्ध स्थळे ओस पडल्याचे फोटो जालावर पाहिले. बाकी बातम्या जालावरूनच कळताहेत. आत्ता प्रतिसाद लिहिताना अमेरिकेत एक लाखापेक्षा अधिक तर न्यूयॉर्क शहरात जवळजवळ 27 हजार कन्फर्म्ड केसेस आहेत.
बाकी पूर्वाशियाई लोकांना मोठ्या प्रमाणात वंशभेदाचा सामना करावा लागतो आहे आणि ट्रंप त्याला सतत चायनीच व्हायरस असा उल्लेख करून फूस देतोय. माझ्या कोरियन मैत्रिणीवर दोन आठवड्यांपूर्वी एका माणसाने "हा विषाणू घेऊन आपल्या घरी परत जा" असे म्हणत शारीरिक हल्ला केला. ह्या आठवड्यात ती मैत्रीण दक्षिण कोरियात परत गेली आहे.
कल्जि घेने.
हे अत्यंत दुर्दैवी आहे. असा हल्ला एखाद्या व्यक्तीवर होतो, पण संपूर्ण समाजगटाला त्याची दहशत जाणवत राहते.
परवाच एका फेसबुक समूहावर, जिथे लोक मराठी प्रतिशब्दांबद्दल चर्चा करतात, तिथेही 'चिनी व्हायरस' असा उल्लेख वाचला. जिथे भाषेबद्दल लोक आग्रही असतात, असणं अपेक्षित आहे तिथेही हा वंशभेद.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मिहीर शेठ,
मिहीर शेठ,
तुम्ही तर धगधगत्या न्यू योर्कात बसला आहात विद्यार्थी म्हणून .
कसे काढलेत गेले अडीच महिने, काय भोगलत या काळात ( च्यायला न्यू यॉर्क मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला हे नेहमी वेगळ्या अर्थाने विचारायला लागत असे )
लिहिणार का जरा , या खडतर अडीच महिण्याबद्दल ?
न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहरातली परिस्थिती आता बऱ्यापैकी सुधारली आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात जेव्हा कोविड इथे भरात होता तेव्हा रोज पाच-सहा हजार नवीन रुग्ण आणि सात-आठशे मृत्यू होत होते, ते आकडे आता रोज सुमारे तीनशे नवीन रुग्ण आणि तीसच्या आसपास मृत्यू इतका खाली आला आहे. न्यूयॉर्क सध्या रिओपनिंगच्या पहिल्या फेजमध्ये आहे. सध्य इथे हवाही छान असल्याने बागांमध्ये, रस्त्यांवर लोक दिसू लागले आहेत. लोकांना सोशल डिस्टन्सिंग करून फिरता यावं म्हणून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते गाड्यांना बंद करून पादचाऱ्यांसाठी खुले केले आहेत. माझ्या आसपासच्या परिसरात सुमारे ८०-९० टक्के लोक मास्क घालून दिसतात. अनेक ठिकाणी बारच्या बाहेर आता लोक घोळक्याने उभे राहून दारू पिताना दिसतात. त्यामुळे न्यूयॉर्कच्या काही भागांना न्यू ऑर्लिअन्सचं रूप आलं आहे. आता इथे कोणतीही व्यक्ती कोविडची चाचणी मोफत करून घेऊ शकते. दुसरी लाट फार मोठी येऊ नये अशी आशा आहे.
सुरुवातीला मी घरातून अजिबात बाहेर पडत नसे. किराणा सामान आणण्यासाठीही जवळच्या चोवीस तास उघडे असणाऱ्या दुकानात रात्री एक वाजता वगैरे जात असे. (काही दिवसांपूर्वी असाच एकदा रात्री साडेअकरा वाजता दूध आणायला गेलो. नेहमी उघडं असणारं दुकान बंद दिसल्यावर फार विचार न करता घरी आलो. घरी आल्यावर रेडिट/ट्विटर पाहिल्यावर त्या दिवशी रात्री अकरा वाजता संचारबंदी सुरू झाल्याचं कळलं! ते असो.) ह्या काळात कॉलेजातल्या मित्रांसोबत क्विझ खेळणे किंवा कटान, कोडनेम्ससारखे बैठे खेळ झूमवर खेळणे ह्याला भरपूर जोर आला होता. आता लोकांचा हे करण्यातला उत्साह जरा मावळलाय. सध्या घरी एकटाच असल्याने ओळखीच्या लोकांची तोंडे प्रत्यक्ष आयुष्यात फारशी दिसत नाहीत. त्यामुळे जुलैमध्ये त्याच्या घरून इथे येईन असं म्हणालेला रूममेट परत येण्याची आतुरतेने वाट बघतोय.
कसबा गणपती
आता काही दिवस झाले ग्रामदैवताचं दर्शन होत नसल्याने दोन दिवसापूर्वी आतला सीसीटीव्ही (जो आधीपासून होताच) दाखवणारा एक छोटा स्क्रीन बाहेर लावला, मग लोकं येताजाता पुन्हा तिथे दर्शनाला थांबू लागली, पोलिसांनी आता तो स्क्रीन बंद करायला लावला...पुणे कसबा २६ मार्च २०२०
बखर खेडुताची
जनता कर्फ्यूच्या आदल्या दिवशी २१ मार्चला सेकंड होम (इगतपुरी जवळचं एक खेडं) ला तिघे पोचलो. रिफायनरीतल्या चाकरीमुळे फुफुसात ठाण मांडून बसलेली काजळी खरवडण्याचा माफक हेतू ठेवून अधी मधी जातो तसा तिथे आठवडाभर सहकुटुंब र्हायच्या तयारीने गेलो होतो.
वाटेत अन् मुक्कामी पब्लिकचे सर्व वेव्हार नेहमीसारखे चालू होते. २४ मार्चला पंप्र गुगली टाकेपर्यंत बिंधास होतो. २५ च्या दुपारपर्यंत कुलुपबंदीची टोटल गावकर्यांना लागली नव्हती. मात्र दुपारी गावफुडार्यांनी वेशीवर अडथळे उभारून प्रवेशबंदी केली. आता हाताशी वाणसामान व गॅस मर्यादित असल्याने सकाळी इंस्टंट वाघबकरी अमृततुल्य चहा, नाश्त्याला फाटा, वरण/भात/बटाटा भाजीचे लंच, बटाटा भाजी/भात/वरणाचे डिनर असं २१ दिवसाचे पॅकेज डिझाईन केलंय. दूध/अंडी/भाज्यांसाठी १-२ ठिकाणी वशिले लावलेयत.
मात्र अवकाळी पावसानं आलेला गारवा, बंद पडलेली गावकर्यांची कंठाळी भजनं / बांगा, घराभवतीच्या बागेत फुलून आलेले सोनचाफा, मधुमालती, रातराणी, मोगरा, कंठ फुटू लागलेल्या कोकिळा, रात्री गच्चीतून चांदण्या मोजता येतील इतका भवतालचा अंधार या सगळ्यामुळे कुलुपबंदी सुसह्यच नव्हे तर आवडू लागेल की काय अशी भीती वाटू लागलीय.
लिहा कायतरी
मग आम्हालाही आवडेल कुलुपबंदी
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
पुढं काय झालं यात्री बुआ ?
पुढं काय झालं यात्री बुआ ? अडीच महिने कुठे आणि कसे काढले आणि आता काय दिसतंय लिहिणार का ?
कोडी सोडवा
निरनिराळ्या w.a. गटांत शब्दकोडी, चित्रांतल्या चुका शोधा, पोशाखांवरून चित्रपट ओळखा अशा कोड्यांचा भडिमार चालू आहे.
एक द्विधा परिस्थिती
बायको बी.ए.एम.एस. डॉक्टर आहे. पुण्यात हडपसर मध्ये घरापासून जवळ स्वतःची प्रॅक्टीस आहे. थोडी जनरल थोडी आयुर्वेदीक. मागच्या आठवड्यात शनिवारपर्यंत दवाखान्यात जाणे सुरू होते. मास्क लावून मेडिकल ग्रेड सॅनिटायझर वापरून काम चालले होते. रविवार जनता कर्फ्यु आणि आठवड्याची सुट्टी. त्यामुळे दवाखाना बंद होता. सोमवारी संचारबंदी लागू झाली. संध्याकाळ नंतर गोष्टी बदलायला लागल्या. असोसिएशनच्या ग्रुपवर मेसेजेस येऊ लागले. दवाखाने चालू ठेवायचे का नाही याबद्दल बरेच कन्फ्युजन होते. चालू ठेवले तर स्वत:ला संसर्गाची भीती, त्यामुळे घरातल्यांना देखील धोका आणि इतर पेशंट्सना संक्रमित होण्याची शक्यता असा तिहेरी पेच. शिवाय दवाखान्यात गर्दी होऊ शकते ते वेगळेच. तर दुसऱ्या बाजूला कर्तव्य. ज्या पेशंट्सना इतर आजार आहेत त्यांचे काय. त्यांना मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये जाणे लगेच शक्य नाही. गेले तरी तिथली गर्दी वाढून तिथल्या सोयींवर ताण येणार. पेशंट्सना संसर्गाची शक्यता ज्यास्त. चर्चेबरोबरच आणखी मास्कस, डिस्पोजेबल गाऊन, कॅप्स, यांची चौकशी सुरू होती. सप्लायर्सकडे माल आहे का. नसेल तर आणखी कोण पुरवतील का याची चाचपणी चालू होती. इतर जवळच्या डॉक्टर्स बरोबर फोन सुरू होते.
मंगळवारपर्यंत सरकारी सूचना आल्या दवाखाने उघडे ठेवण्याबाबत. नंतर बंद दवाखान्यांवर कारवाई होऊ शकते या सूचनाही आल्या. अजूनही येताहेत. पण त्याच बरोबर दिल्ली, राजस्थान मध्ये डॉक्टर्स मुळे संसर्गाच्या बातम्या देखील आल्या. आपल्या हेल्थकेअर व्यवस्थेची चांगली जाणीव असल्याने भीती अजूनच आहे. आता फक्त पेशंटनाच आत यायची परवानगी, नातेवाईकांना घेऊन येऊ नका म्हणून फोनवरून सूचना, पेशंटची बसायची खुर्ची जमेल तितकी लांब, तपासणी पूर्णपणे बंद, जमेल तेवढे फोन कन्सल्टेशन, ऑनलाइन पेमेंट, घरी आल्यावर देखील बरीच काळजी घेऊन मग घरात नेहमीसारखा वावर, अशा पद्धतीने सकाळच्या वेळी २-३ तास गरज असेल तेव्हा दवाखाना चालू केला आहे. शक्य तितके खबरदारीचे उपाय सुरू आहेत. घरी ९ वर्षाची मुलगी असल्याने या सगळ्याला एक भावनिक किनार आहे. ती जवळ येते, बिलगते. एका बाजूला काळजी तर दुसऱ्या बाजुला कर्तव्याला चुकत असल्याची भावना अशी विचित्र कुतरओढ.
- ओंकार.
आता अडीच महिन्यांनंतर काय
आता अडीच महिन्यांनंतर काय परिस्थिती लिहिणार का ओंकार ?
कचरा गोळा करून गाडीवर टाकणारी
कचरा गोळा करून गाडीवर टाकणारी बाई परवा आली तेव्हा तिला विचारलं काय चाललय?
" गाडी कधीही येते त्यामुळे घेत नाही. तिकडे मोठ्या रस्त्याला ओरडतात."
--–----
ओला कचरा नेऊन गाडीवर टाकायला पाहिजे. सुका वेगळा जमा करून नंतर कधीही टाकता येतो.
ओला कचरा झाडात टाकण्याचे प्रयोग केले होते ते आता पुन्हा सुरू करणार.
गाडगीळ काका, सध्या काय चित्र
गाडगीळ काका, सध्या काय चित्र दिसतंय , हेच असं नाही, पण एकंदरीतच , लिहिणार का ?
पुढे चालू
पाडवा : २५ / ३
सकाळी ९:०० - आणलेलं गोकुळचं दुध नासलं खिरीचा बेत कॅन्सल. आज गोड फक्त शिरा. जरीचा खण काढून गुढी तयार केली. आंब्याची टहाळी काही नव्हती, आईसाहेबांनी आधिच आम्ब्याच्या रोपाची पाच सहा पानं काढून घेतल्यामुळे आत त्या रोपाला हात लवणं धोक्याचं होतं तरी चुकारपणा करून एक थोडं पिवळं पडलेलं पान काढल. अंदाज बांधल्याप्रमाणे टॅनुल्याने लगेच आरडाओरडा केला. तरी ते तांब्याला बांधलं आणि गुढी उभारली. नौऱ्याला विडियोकॉल वरून गुढी दाखवली. ते बुरसट अजूनी झोपलेलच होतं मग अम्मा अप्पा सगळ्यानाच गुढी दाखवली.
दुपारी १:३०: आज मटर पनीर, पोळ्या, मस्त मिर्ची फोडणीचं वरण, भात, केशर आणि केळी घातलेला शिरा चापला.
२:०० : नौऱ्याची बहिण प्रायव्हेट हॉस्पिटलात इमरजन्सी मेडिसिन मध्ये डॉक्टर आहे, तिला तो नवी मुंबईहून घेऊन आला काल. आता तिचा घसा बसलाय आणि सर्दी झालीये. नौरा फुल अँक्झाईटी मध्ये. हे श्रिमंत लोक डायरेक्ट प्रायव्हेट मध्ये, तेही इमरजन्सी केअरसाठी येतात, कारण गव्हरमेंटवर विश्वास नाही. एका पेशंटला सर्दी तापाची लक्षणं होती ज्याची केस नौऱ्याच्या बहिणीकडे होती. तिला सगळा गिअर वगैरे होत. त्याच्या टेस्टचा रिझल्ट काही आला नव्हता. ती पण टेंशन मध्ये.
५:३० : दोघांना (नौ आणि ब) पॅनीक अटॅक्स आणि डिप्रेशन. फोनवर बोलण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीये मी.
९:०० : त्या पेशंटचे रिझल्ट निगेटिव्ह आले. थोडंस हायसं. हिचा घसा अजून बरा नाहीये, घरच्याना अजून एक्स्पोझ केलं म्हणून ती गिल्टमध्ये आहे.
११:०० : नौरा बऱ्यापैकी नॉर्मल झालाय, रात्रीपर्यंत गप्पा मारल्या.
गुरुवार : २६/३ :-
६:०० - आई टॅनुला उठवते आहे. दुध आणायला. गेलं बिचारं, आपण चादर ओढून अजून झोपलो.
७:३० - उठले, टॅनू अजून लोळतोय, इक्या लवकर उठून काय करणार म्हणून ९ पर्यंत लोळि लोळि.
बाबांच्या सिगारेटी संपल्या आहेत. आज अक्खा दिवस कामात जाणार. एकूण कामातपण लोकांची चिडचिड जाणवतेय. ॲनालिस्ट आणि माझं दुपार पर्यंत भांडण झालं. डिझाईननुसार काहीही करत नाही, इमेज क्वालिटी खराब आहे म्हणून लास्ट मिनिट डिझाईन चेंजेस सांगतेय. मूर्ख बया. कंटेट टिमच्या एकीला सुधा बुली करतेय. ती बिचारी आली रडत आत काय करू, तीला सांगितलं मेल टाक बिंधास्त सर्व्हर मायग्रेशनमुळे सिस्टीम डाउन आहे. साडे आठ नऊ पर्यंत ॲनालिस्ट बयेला, कार्ड इमेज आणि बॅनर मध्ये फरक सांगता सांगता जिव मेटाकुटिला आला. कंटेंटच्या दोघिंच्या सेम कंप्लेंट होत्या ह्या बयेबद्दल. मॅनेजरशी उद्या स्काईप मिटींग शेड्युल केली. काम बंद. बसून बसून ढु दुखतय. कोणीतरी बाबाना एक सिगरेटचं पाकीट आणून दिलं. भाव डबल.
१०:३० : जेवले, थोडा contagion बघीतला प्राईमवर आणि गप झोपले.
१२:०० : नौऱ्याचे कॉल्स आले दोन. तिसरा उचलला, त्याला काही झोप येत नव्हती मग ३ पर्यंत गप्पा मारल्या.
शुक्रवार : २७/३
सकाळी :१०:०० - च्यायला लई लेट झाला. ११:०० चा कॉल आहे. पटपट आवरून लॅपटॉपवर बसले. आज झाडू पोछाला सुट्टी. काल रात्री नौऱ्याला दोरीच्या ऊड्या मारायच्या कबूल केल्यात. संध्याकाळी बघू. दिडवाजता एक ब्रेक घेऊन जेवले. ब्रेड, अंडी आणून ठेवलेले ते संपवायचेत. फ्रिज आवाज करतोय. बिघडू नये आत म्हणजे झालं. पाठ दुखतेय. पण अजून सगळं हलवायचं म्हणजे वैताग आहे. ढू खाली उशी ठेवली. पाच वाजता कॉलच्या वेळी, ढू लई दुखायला लागली मग एका ढू वरुन दुसरा करून ६ ला कॉल संपला.
६:१५ - हॉलमध्ये गेले. समोरचे काका लपून छपून अंडी ब्रेड बिस्कीट विकतात आहेत. लोक आहेत रस्त्यावर पण नेहमी इतकी नाही. तुरळक अगदी. दोऱिच्या उड्या मारल्या. नौरेका खौफ और क्या. बाबा एक सिगरेट दोन तिन झुरके मारून विझवून ठेवतायेत.
७:३० - नवीन प्रोजेक्ट एस्टीमेशन करायचय, यु एस वाला कॉन्ट्रॅकटर ऑनलाईन दिसला, त्याला कॉन कॉल वर येतोस का विचारलं, तो भारतीय आहे पण यू एस ला स्थायीक झालेला. ॲनालिस्ट बयेने जी लिस्ट दिलेली त्यापेक्षा कितीतरी जास्त स्कोप आहे असं दिसतय. २९ एप्रिलला लाईव्ह शक्य नाही. ती वैतागली, न विचारता क्लायंटला सांगायला सांगितलं कोणी, मूर्ख! शक्यच नाही म्हंटल्यावर निगोशिएशन चालू केलं, आता खरच पेशन्स संपत आला माझा त्यात तिला साडे आठला जायचं होतं, मी त्यानंतर नोट्स काढल्या कॉन्ट्रॅक्टरशी दुसरा एक इश्यु डिस्कस केला.
९:१५ - लॅपटॉप बंद करणार तो पर्यंत हिचा पिंग. हुड म्हणून दुकान बंद. वर्क फ्रोम होम म्हणजे मजाक बनवून ठेवलाय
११:०० - जेवण आटोपून लोळतेय. नौऱ्याचा कॉल, नौऱ्याच्या बहीणीचा पण, एका घरून कॉन कॉल करतायेत. हद्द आहे आळशीपणाची. थोडा टाईमपास करून मग contagion बघितला, थोडा पकाऊ आहे. मग झोपले.
-----------------------------------
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
इकडं लग्न होऊन बाई नवर्याच्या घरी राहायला गेली आणि तिकडं लोक्स
इकडं लग्न होऊन बाई नवर्याच्या घरी राहायला गेली आणि तिकडं लोक्स अजुन कन्यादान चघळतायेत. धन्य आहे
तसं म्हणायला गेलं तर लग्न
तसं म्हणायला गेलं तर लग्न अजून झालेलं नाहीये. अदरवाईज नौऱ्याला विडियोकॉल करून गुढी का दाखवू मी.
खरच धन्य आहे. तुमची!
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
माफी द्या
माफी द्या बरकां ! कन्यादानात 'होणारा नौरा" असा स्पष्ट उल्लेख होता मात्र या धाग्यावर फक्त "नौरा" असा उल्लेख वारंवार आढळला. हल्लीचे व्याकरण समजण्यात म्हणा किंवा बिटविन द लाईन्स वाचण्यात आम्ही मागच्या पिढीतील माणसे कमी पडतोय असे वाटते.
आता होणारा काय आणि असलेला काय
आता होणारा काय आणि असलेला काय, सतत हो. न. असा उल्लेख करायचा शुद्ध कंटाळा केलेला आहे मी.
नौऱ्याला कॉल करून गप्पा मारते वगैरे लिहील्यामुळे लोकं व्याकरणाच्या / बिटवीन द लाईन्सच्या भानगडीत न पडता समजून घेतील अशी आशा होती. असो..
श्रेणी देण्याची आमची कुवत नसल्यामुळे, वरच्या कमेंटला "कुजकट" अशी श्रेणी देउन आणि त्याही वरच्या कमेंटला निरर्थक दिलेल्या श्रेणीचा निषेध नोंदवून खाली बसतो.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
विषय काय , तुमचं चाललंय काय ? ओ !!
धर्मराज महाराज अहो इथे धाग्याचा विषय काय आणि तुमचे हे प्रश्न काय , काही ताळमेळ आहे का ?
जरा .....
गौराक्का, अडीच महिन्या नंतरचा
गौराक्का, अडीच महिन्या नंतरचा अपडेट द्याल का ?
आठवडी खरेदी
मंदीत संधी. गेल्या शनिवार-रविवारी 'लोकसत्ता'साठी लिहिलेला लेख आज प्रकाशित झाला आहे. तो फारच शिळा वाटतोय. दुवा
आमच्यात शनिवारी सकाळी उठून फार्मर्स मार्केटात जाण्याची सवय आहे.
सकाळी साडेसहाला उठून अमेरिकी वाण्यासमोर रांग लावण्याचा इरादा होता. ब्रेकफास्टचे ओट्स संपत आले आहेत. तंबूत घबराट माजली होती, पण बऱ्या अर्ध्याला सांगितलं नव्हतं. त्यानं घरून काम करणं फारच मनावर घेतलं आहे. दुपारी १२ला उठून कामाला लागतो. कधी झोपतो कोण जाणे. पण झोपत असणार, कारण सकाळी तिर्री मांजर मला उठवते तेव्हा तो गपगार असतो.
उठायला उशीर झाला. सव्वासातला जाग आली. थोडं वाचायचा प्रयत्न केला, पण काही संगत लागत नव्हती. आणखी झोपले. दुकानाशी पोहोचले तर पावणेआठ झाले होते. तीन मिनीटं चालून रांगेच्या उघड्या टोकाला पोहोचले. रांग पार करत असताना बरोबर एक उतार-मध्यमवयीन गोरा माझ्याशी बोलायला लागला. "तुला सत्तरीच्या दशकातल्या पेट्रोलच्या रांगा आठवत नसणार. तू लहान दिसतेस." मी 'हो' म्हणाले. मी अमेरिकेत जन्माला आलेली नसेन असं त्याला वाटलंच नाही. राज्य टेक्सास असलं तरी शहर ऑस्टिनच आहे!
आम्ही रांगेत उभे राहिलो. त्याला आणखी एक समवयस्क मिळाला. रांगेत उभं राहून वाचण्यासाठी मी पुस्तक आणलं होतं. एकीकडे बेजच्या सिद्धांताबद्दल The Book of Whyमध्ये डोकं खुपसायचं होतं, पण म्हाताऱ्यांच्या गप्पांमुळे कुतूहल चाळवलं. दोघं बराच वेळ ७०च्या दशकातल्या रांगांबद्दल बोलत होते. म्हातारे फार गोष्टीवेल्हाळ होते. एकच गोष्ट रंगवून रंगवून एकमेकांना सांगत होते.
मथितार्थ असा - तेव्हा गाड्या एकमेकींना खेटून उभ्या करता येत होत्या. मध्ये कोणी घुसण्याची भीती कमी होती. तेव्हा ताशी ५० मैल ह्यापलीकडे वेग वाढवता येत नव्हता.
मी मनाची तयारी केली होती; आता दोनेक तास इथेच जाणार. पण तासाभरात सगळं काम आटोपलं. ब्रेकफास्टचे ओट्स मिळाले. जितम् मया।
शिवाय सकाळी लवकर गेल्यामुळे डिशवॉशरचा साबण, कपड्याचा साबण आणि मुख्य म्हणजे शाकाहारी, मेक्सिकन जेवणासाठी सगळ्यात महत्त्वाचे काळे वाटाणे मिळाले. एक पौंडाच्या चार पिशव्यांपलीकडे एका वेळेस विकत घेता येणार नाही, अशी पाटी होती. मी चार पिशव्यांवर झडप घातली. बऱ्या अर्ध्यानं गेल्या ५ तासांत त्या पिशव्या घेऊन स्वतःचं दोनदा बोरनहाण करून घेतलं. सुदैवानं पिशव्या फुटल्या नाहीत. "आता फक्त ॲक्शन केलीस तरी काय चाललंय ते मला समजेल", असं म्हणाले. मग त्यानं बोरनहाणासारखे हवेत हात हलवून, तोंडातून लाळ गाळल्याचा उत्तम अभिनय करून दाखवला.
अमेरिकी दुकानातून फार्मर्स मार्केटात पोहोचले. पावाच्या दुकानासमोर नेहमीसारखी रांग होती, फक्त ह्या वेळेस लोक सुरक्षित अंतर राखून होते. समोर उभी असलेली बाई गप्पा मारायला लागली. "अगदी रशियात गेल्यासारखं वाटतंय नाही!" माझ्या तोंडावर आलं, "नाही हो, मी कधी रशियात आणि तेवढ्या दुर्भिक्षात राहिलेले नाही." खरंच त्या स्टॉलसमोर नेहमी गर्दी असते. आणि आम्ही मार्केट सुरू होताहोता तिकडे पोहोचलो होतो. स्टॉलमध्ये चिक्कार पाव होता. थोडं थांबायला लागलं तरी पाव मिळणार हे स्पष्ट दिसत होतं. पण तिच्या हो-ला-हो केलं. ती बोलत होती. "माझा नवरा खुश आहे. घरून काम करता येतंय. घरी कोणी येत नाही. त्याला कोणी छळायला जात नाही." मी म्हणाले, "हो, हो. मलाही असंच आवडतं. कामाच्या मीटिंगाही चिकार होत आहेत. त्यामुळे कंटाळाही येत नाही."
तर ती पुढे बोलत होती. "पण मला पोरांबद्दल वाईट वाटतं..." मी हो-ला-हो करत म्हणाले, "हो ना, बारकी पोरं कंटाळत असणार. त्यांना परिस्थितीचं गांभीर्यही नीट उमगत नसेल." तिनं माझं म्हणणं पुढे वाढवलं. "काही धड अनुभवच नाहीत ह्या पोरांना. प्रॉम नाही, ग्रॅज्युएशन नाही." आता मला तिच्या सुंदर, मठ्ठपणाचं रहस्य काय हे समजल्यासारखं वाटलं. मी म्हणाले, "खरं आहे हो. बरं एवढं शिकून नोकऱ्यांचं काय होणार आहे, काय माहीत. मी सध्या आरामात आहे, कारण आमच्याकडे ह्याच आठवड्यात येत्या तीन महिन्यांचं प्लॅनिंग झालं. त्यात मुख्यतः ह्या परिस्थितीमुळे काय बदल करायचे ह्याचा विचार झाला. येते तीन महिने नोकरी नक्की असेल." मग तिनं अर्थव्यवस्था गाळात गेल्ये वगैरे सुरुवात केली.
पाव विकत घेतला. कार्ड दिलं; दुकानदारानं दाखवलं - मीच तुझ्याजागी आंडुगुंडू सही करतो. तेवढंच लांब राहता येईल. मी म्हणाले, "बरंच केलंस. आणि काळजी घे स्वतःची. मला घरून काम करता येतं, तुला ती सोय नाही." त्यानं क्षणभर काहीच प्रतिक्रिया दिली नाही; मग त्याच्या चेहऱ्यावर खरा आनंद दिसला.
खरेदी संपवून मी गाडीत बसले. फेसबुक उघडलं. भारतातल्या विस्थापित-मजुरांचे भकास चेहरे आणि त्यांच्या अवस्थेबद्दलच्या बातम्या सगळ्यात वर होत्या.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
द स्पेक्टेटर : डॉ जॉन ली यांच्या लेखाबद्दल ........
करोनाव्हायरस नेमका किती धोकादायक आहे? अजूनही हे निश्चितपणे सांगता येत नाही
- उपलब्ध माहितीचा अन्वयार्थ अन्य प्रकारे करायला वाव आहे.
(संपादक : हा लेख आता स्वतंत्र धाग्यावर प्रकाशित करण्यात आला आहे.)
पण हा जॉन ली'चा लेख वेगळा
पण हा जॉन ली'चा लेख वेगळा टाकायला हवा ना? बखरीत नको. कसं?
जानेवारीत रबरी हातमोजे आणले
जानेवारीत रबरी हातमोजे आणले होते रंगकामासाठी. पण फार घट्ट होते, वापरले नाहीत. पडून होते. मुलीच्या बँकेत रबरी हातमोजे दिलेत डॉक्टर/नर्सेस वापरतात तसले. ते वापरायची सवय नसल्याने त्रासदायक वाटतात. मग मी आणलेले नेले. खूप छान आहेत. सर्वांना हवे आहेत.( पण आता दुकानं उघडतील तेव्हा गरज संपलेली असेल.
साथींची दृश्यात्मक तुलना
या निमित्ताने जगातील आतापर्यंतच्या साथींची दृश्यात्मक तुलना इथे पाहता येईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ऐसीच्या फेसबुक मैत्रीणीकडून
#सूचना_नको_ना
आमच्या विदर्भात एक म्हण आहे "जिले सासू नशीन..ती नवऱ्याची सासुरवाशीन"..म्हणजे जिला सासू नाही तिला नवरा हाच सासुरवास... १००% खरी आहे हो म्हण...सासू म्हणजे "सारख्या सूचना" आणि सून म्हणजे "सूचना नको ना" दुर्दैवाने सासूचा सहवास आम्हाला फार वर्षे लाभला नाही पण त्यांच्या हयातीत ही त्यांनी कधीच आम्हा ३ सुनांना सासुरवास केला नाही मग अती सूचना, हस्तक्षेप तर फार दूरची गोष्ट.. पण म्हणूनच मातोश्रींचा हा कोटा पूर्ण करायला पूत्र सरसावला असावा असा मला doubt आहे.. बेजार झाले रे बाबा सूचना ऐकून मी...
आमचे लग्न ठरले तेव्हा म्हणे माझा नवरा आणि त्याचा परममित्र कागद पेन घेऊन बसले होते.. २ column केले..एक मुलीचे advantages आणि दुसरे disadvantages.... जेव्हा advantages चे पारडे बरेच जड झाले तेव्हा लग्न करायचे ठरले (ही गोष्ट त्याच मित्राने नंतर मला खाजगीत सांगितली) पण बहुधा सूचना देण्यासाठी हक्काचा श्रोता मिळतोय याच agenda वर आमचे लग्न झाले असावे असा दाट संशय आहे मला..
माझ्या व्यवसायाच्या बाबतीत ही असाच अनुभव.... admission किंवा counselling साठी त्याच्यासमोर फोन आले आणि मी नीट सांगत नाहीये असे काही त्याला वाटले तर मागून एवढया सूचना येतात की mouthpiece वर हात ठेवून शेवटी मी खुणेने विचारते, "तूच बोलतोस का माझ्या ऐवजी?"
आम्ही घरात इनमीन तीन माणसे.. लेक आता परदेशात.. ती होती तर बरे होते, सूचना ५० ५०% वाटल्या तरी जायच्या पण आता सगळा attack माझ्यावरच..मला तर फारफार वाटतं की या प्रिय बापूंच्या सूचनांना कंटाळून शिक्षणाच्या गोंडस नावाखाली ती परदेशात पळून गेली असावी...थोडीशी सुटली बिचारी...थोडीच हा, कारण wapp, fone, video calls मधूनही सूचनांचा भडीमार होतच असतो तिच्यावर...
त्यातच आता ही नवीन #कोरोना महामारी आली.. virus किती dangerous आहे.. precaution better हे सगळे मला ही माहितेय हो... पण सुचनांचा महापूर आलाय जणू "दूध पिशवी धुवुन घे, भाजी मिठाच्या पाण्यात टाकून धू, अंडी पण धुवून फ्रीज मध्ये ठेव, साल काढून खायची फळे पण धुवून पुसून घे, sanitizer घरात २ ३ ठिकाणी ठेव, मला एका ज्यादा बाटलीत गरम पाणी देत जा, तुझे डाएटचे फॅड सध्या बंद ठेव, भरपूर खा, immunity वाढवायचीये" ; हे राम... वात आलाय सूचना ऐकून खरंच... नशीब की सगळे सरकारी अधिकारी (माझ्या नवऱ्यासारखे) कामावर आहेत, अन्यथा.. कोरोना बाधीत direct नसला तरी indirect patient म्हणून यादीत नक्कीच माझा नंबर असता...
भरीसभर म्हणून माझ्या बाबांचे आजारपण निघाले..दवाखान्यात ऍडमिट करावे लागले.. मग दुपारी माझी ड्युटी हॉस्पिटलमध्ये...आता तर सूचना डबल झाल्या.. पेपर हॉस्पिटल ला नेलास तर तिकडेच ठेव..सतत् मास्क वापर, आलीस की डायरेक्ट बाथरूम मध्येच जा.. तिथले कपडे डेटॉल ने धू.. बाहेर तिथे फिरू नकोस...डॉक्टरना जरूर भेट..बाबांची औषधे मला wapp कर.. इ. इ.इ. कधीकधी ना मला सारखे वाटते की चार बुकं तरी शिकलोय का आपण खरंच? की अडाणीच आहोत? पण जाऊ देत.. चार पावसाळे जास्त बघितलेल्या माणसाचे ऐकलेच पाहिजे ना...
नेमका ६ ८ दिवसांपूर्वी लेकीचा एक फोन आला, तो तिच्या बाबांनीच घेतला..."बाबा टेक्सास मध्येही गंभीर आहे आता परिस्थिती...आज शेवटचे साखरेचे पाकीट मिळाले वॉलमार्टला मला.. आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला जावेच लागेल ...बघू पुढे मग".. झाले... बापाची वाढलेली चिंता आणि त्यामुळे वाढलेल्या सूचना... "गाडीचे स्टेअरिंग नीट पुसत जा गं.. केबिन च्या हँडलला पण रुमालाने ढकल..चिकन सूप पित जा..घरी रोज व्यायाम कर.." आणि अजूनही बरेच बरेच काही..शेवटी आवरते घेत तिनेच फोन ठेवून दिला..
'मरो तो कोरोना, आणि सूचना नकोना' अशी स्थिती आहे सध्या इकडे...
(असे असले ना मंडळी तरी या सुचनांच्या पाठी आहे बापाचे हळवे काळीज आणि नवऱ्याची अव्यक्त माया..याच सूचनांचे पांघरूण घेऊन मी आणि माझी लेक खुशाल आहोत.. याच सूचना ढाल आहेत आमच्या..म्हणूनच नवरा नसला ना की मी स्वतःच स्वतःला सूचना देते की बाई आज तुला सूचना द्यायला कुणी नाहीये तर जरा जपून आणि मग बिनघोर होते.. आदत सी हो गई है अभी)
सूचना द्यायला तिथे कुणी असेल नसेल, तरी स्वतःची नीट काळजी घ्या मंडळी... सर सलामत तो पगडी पचास.. आयुष्य positive ठेवा पण तुमचे रिपोर्ट्स negative येऊ देत..
कोरोना विरुद्ध लढाई साठी खूप खूप शुभेच्छा
-- ऐसीच्या फेसबुक मैत्रीण ममता जोशी-सावजी
बखर
हा लेख कोरोनाची बखर फार चांगल्याप्रकारे मांडतो. लेख व्यक्तीसापेक्ष अनुभवांपेक्षा जरा वैश्विक-राष्ट्रीय पातळीवर आहे, जरासा अमेरिकेच्या पॉंईट ऑफ व्ह्यू ने लिहलेला आहे. बखरीबरोबरच भविष्याचे सुतोवाचही केलेले आहे, ते ही वाचनीय.
How Will the Pandemic End.
(मराठीत कोणीतरी चांगला अनुवाद करायला हरकत नाही.)
-Nile
भारतीय तज्ज्ञांकडून, भारतीय परिस्थितीविषयी
भारतीय तज्ज्ञांकडून, भारतीय परिस्थितीविषयी -
Coronavirus: From conspiracy theories to community transmission, two Indian experts answer questions
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दोन किस्से
समतोल आहाराच्यायची कटकट !!
एक साठोत्तरी सुखवस्तु जोडप्यासाठी जीवनात सगळ्यात अवघड समस्या घराबाहेर गेलं की कार पार्किंग कुठं करायचं हीच होती.कारमध्ये बसल्यापासून उतरायचं ठिकाण येईपर्यंत पत्नी संथ संवादाची पराकाष्ठा करत ,ए sss चॅन ssss दू ,तू गा ss डी कुठं पाssss र्क करशील ? चॅनदूला उत्तर देण्याची घाई नसल्यानं तो कार पार्क करून झाल्यावरच कशी पार्क केली याचं उत्तर द्यायचा.यांच्या घरासमोर चहा आणि पानटपरी असल्यानं दोन बेघर माणसं तिथं पडीक असतात.कोरोनोत्तर जगात टपरी बंद झाल्यानं त्यांना खाऊ कोण घालणार अशी कार पार्किंगपेक्षा भीषण समस्या उभी राहिली.मग चॅनदूच्या बायकोनं त्यांच्यासाठी चहा करायचा कठोर निश्चय केला.चॅनदूने चहा सोबत चार बिस्किटं देऊन आपला खारीचा वाटा उचलला.होमलेसांच्या लंचसाठी बाईंनी सोप्पीशी खिचडी करायचं ठरवलं. चॅनदु म्हणे कि ,आग ए ,मी किनाई बाहेर जाऊन अंडी घेऊन येतो बरंका ,त्यांना आहारात प्रोटीन मिळायला नकोत का ? तू बटाट्याच्या भाजीत अंडी घाल हां. आपण त्यांना खिचडी आणि भाजी देऊया.चॅनदुने चक्क चालत जाऊन अंडी आणून आहारातल्या प्रोटीनची समस्या सोडवून टाकली.चॅनदुचा फूड पिरॅमिडचा अभ्यास प्रोटीन पलीकडं गेला नसल्यानं बिस्कीटं नकोत, फळं, कोशिंबिरी वगैरे समतोल आहारयुक्त प्रश्न उद्भवले नाहीत.पण मग चॅनदु ,त्यांच्या सी व्हिटॅमिनचं काय रे ? त्यांना स्कर्व्ही ,बेरीबेरी होईल ना अशानं ?असं विचारायची उबळ दाबून टाकली. चॅनदुला फक्त नॅन्दोस पेरीपेरी गार्लिक सॉस माहिती होता.त्यांनी डिनरला काय शिजवून घातलं याची उत्सुकता दडपुन, या बाईसाहेब कैच्या कैच किटो प्रयोग करून होमलेसांना जगू देतील कि नाही, या दहशतीत आम्ही सर्व कुशलमंगल असावं अशी कामना करतो आहे.
खर्रा खुर्रा किस्सा
माझ्या मैत्रिणीच्या ऐंष्योत्तरी आईचा संचारबंदी प्रकरणावर काहीकेल्या विश्वास बसत नाहीये.जनता कर्फ्यूच्या दिवशी या मावशी खुशाल चौकात फेरफटका मारून आल्या होत्या.एकवीस दिवसांची संचारबंदी जाहीर झाल्यावर तर कयामतच आली.नेहेमी एकट्याच राहणाऱ्या या मावशींना दोन वर्षांपूर्वी नागपुरी खर्रा म्हणजे तंबाखू,सुपारी,काथ,चुना आणि काही घटक पदार्थ मिसळून खूप घोटून केलेला पदार्थ खायची सवय लागली. त्याचं व्यसनात रूपांतर व्हायला काही वेळ लागला नाही.दिवसातले कित्येक प्रहर मावशी खर्रा खाऊन सुषुम्नावस्थेत रममाण होऊ लागल्या.निर्व्यसनी म्हातारी या वयात खर्ऱ्याच्या नादाला लागलेली पाहून नातलग कानकोंडे होऊ लागले. त्यामुळे मावशींच्या दैनंदिन निर्वाणाला आसुरी आनंदाची झालर लागली.संचारबंदीच्या फटक्यानं पान टपऱ्या बंद झाल्या होत्या. खर्रा पुरवठा बंद झाल्यामुळ समाधी अवस्थेनं मावशींचा त्याग केला.त्यांना विथड्रॉवल सिंड्रोम मुळे दुकानं उघडी आहेत,मुलीची मैत्रीण म्हणजे अस्मादिक घरी येऊन खर्रा देते आहे असे आभास होऊ लागले.चिडचिड होऊ लागली म्हणून त्यांच्या वृद्ध भावानं भर उन्हात धापा टाकत जाऊन तंबाखू आणून दिला. त्यांनी त्या पुडीकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकून खर्ऱ्याप्रति आपली कडवी निष्ठा अढळ ठेवली.संचारबंदीमुळं आईच्या घरी अडकून पडलेल्या मैत्रीणीला एकवीस दिवस शांततेत कसे काढता येतील याची चिंता कोरोनापेक्षा जास्त भयंकर वाटू लागली.त्या चिंतेची दैनिक लागण आमच्या तासंतास चालणाऱ्या दूरध्वनी संवादातुन मला बाधित करू लागली.जवळच राहणारी माझी मदतनीस येऊ नको सांगूनही फक्त माझ्याकडे येते आहे.तुमच्या वस्तीतले लोक संचारबंदीत काय करताहेत याची मी चौकशी केली, तेंव्हा बायका घरकाम आणि वार्षिक वाळवणाची कामं उरकताहेत आणि पुरुष बिड्या फुकत किंवाखर्रा चघळत बसताहेत असं समजलं.माझे कान टवकारले आणि खर्रा कुठं मिळतो आहे याची चौकशी सुरु केली.एरवी वीस रुपयाला मिळणारी खर्रा पुडी आता ब्लॅकमध्ये पन्नास रुपयाला मिळते आहे असं कळलं.तात्काळ मैत्रिणीला आनंदाची बातमी दिली.तुला नेण्याची व्यवस्था करता येत असल्यास खर्रा घेऊन ठेवते. पोलिसांची परवानगी घेऊन अंमली पदार्थांची ने आण करणार नाही अशी एक केंद्र सरकारी कर्मचारी म्हणून मी बाणेदार नैतिक भूमिका ठेवली. मदतनीस ताईला सांगितलं ,मला खर्रा आणून पाहिजे आहे.तिला इतका धक्का बसला कि ती कळवळून म्हणाली ,ताई नाही नाही ,कशाला ?म्हटलं, अग मला नको आहे एका आजीला हवा आहे.तिचा जीव भांड्यात पडला.तिला अडीचशे रुपये देऊन पाच पुड्या आणायला सांगितल्या.मावशींना एक पुडी २/३ दिवस पुरत होती.खर्रावाल्यानं डिस्काउंट देऊन २४० रुपयात सहा पुड्या दिल्या.मैत्रिणीच्या घराजवळ घरटी रोज दहा पोळ्या संकलित करून गरजूंना वितरित केल्या जाताहेत.एक दिवसापुरता आमचा खारीचा दहा पोळ्या वाटा संकलितकरायला एक सांडणीस्वार आला.पोळ्यांच्या पिशवीत शिताफीने लपवलेल्या खर्ऱ्याच्या पुड्या तिच्याघरी थेट पोहोचत्या केल्या.मोहीम फत्ते झाल्याचा जल्लोष एकवीस तोफा धडाडून मिळाला आणि ड्रग डील इन द टाईम ऑफ कोरोना यशस्वी झाल्याचं समाधान ओसंडून वाहू लागलं.
अशीच अमुची आई असती...
अशा घातक परिस्थितीत तू पहिलं ड्रग डील केल्याचं बघून मला तुझ्याबद्दल भलताच आदर उफाळून आला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सखुबाई ,
सखुबाई ,
अडीच महिन्यानंतर नागपुरात काय दिसतंय ? लिहिणार का ?
नाहीत लक्षणे तरी...
लक्षणं दाखवत नसलेल्या लोकांकडून विषाणूचा प्रसार होतो आहे अशी ताजी बातमी आहे. आता भारताचा विचार केला तर अधिकृत आकडेवारीव्यतिरिक्त किती लोक पॉझिटिव्ह असतील?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
really??!!
>>लक्षणं दाखवत नसलेल्या लोकांकडून विषाणूचा प्रसार होतो आहे अशी ताजी बातमी आहे.
ही माहीती चीनमधून बाहेर पसरल्यानंतर जवळजवळ लगेचच समजलेली आहे.
उदाहरणार्थ. https://www.washingtonpost.com/politics/2020/04/02/georgia-gov-brian-kem...
"It may have been a game-changer, but it was a game-changer weeks or even months ago. That’s when health officials started emphasizing that asymptomatic people are transmitting the coronavirus. The idea that Kemp didn’t know this is striking. But he’s merely the latest top politician to indicate that he’s unfamiliar with the science even as he’s making life-or-death decisions for his constituents."
-Nile
आदरणीय निळे सर,
आदरणीय निळे सर,
आपण कृपया अडीच महिन्यांतरीचे आता काय परिस्थिती वगैरे लिहिणार का ?
आपला अभ्यास जोरात चालू आहे ,तर आता काय होईल हेही लिहिलेत तर 'तेवढेच ज्ञानप्रकाशात ' भर
असे असेल तर
असे असेल तर किती ही काळजी घेतली तरी रोगाचा प्रसार होणारच.
कोणताच देश पूर्ण लोकसंख्येचे सँपल गोळा करून ते चेक करू शकत नाही ह्या वर मर्यादा आहे .
आणि विषाणू शरीरात प्रवेश करता झाला की तो लगेच टेस्ट मध्ये सापडेल का? हा पण दुसरा बिकट प्रश्न आहे .
तो सुप्त अवस्थेत आहे त्या जागेवरच काही दिवस राहत असेल तर अजुन अवघड आहे रोगी शोधून काढणे.
बाजी प्रभू न सारखी महाराज गडावर पोहचे पर्यंत
खिंड रोखून धरणे एक पण शत्रू आतमध्ये आला नाही पाहिजे.
त्यांचे शत्रू मोघली फौज होती आपला शत्रू corona aahe.
त्यांनी तलवारी नी शत्रू वर मात केली आपण मास्क,santizer,साबण ,अंतर राखणे ह्या द्वारे खिंड लढवून ठेवणे जो पर्यंत उपचार सापडत नाही .
त्या साठी रोगावर उपचार शोधायचे प्रयत्न तीव्र करणे .
तोच एकमेव मार्ग खात्रीचा आहे
नेटफ्लिक्स आणि चिल
घराबाहेर पडाल, तर नेटफ्लिक्सचे स्पॉयलर्स दाखवून मारू :
Billboards that RUIN popular Netflix shows with major spoilers are being hailed as a 'brilliant' and 'genius' way to make people stay home amid the coronavirus pandemic
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कासरगोड ते पुणे – अठरा तास सलग ड्राईव!
५ मार्चला भोपाळमध्ये एका संस्थेत एक टॉक आणि इतर काही काम होतं. त्यासाठी मी ४ मार्चला कासरगोडहून बसनी निघालो आणि मंगळुरू-विमानतळावरून विमान घ्यायचं होतं. मंगळुरू शहरात उतरलो, उबर केली आणि मंगळुरू विमानतळावर गेलो. करोनाची तुरळक सजगता दिसत होती. सेक्युरिटी मंडळी मास्क घालून होती. काही प्रवासीदेखील मास्क वगैरे घालून होते. मगळुरू-मुंबई प्रवासात ही सजगता इतकी जाणवली नाही पण मुंबई विमानतळावर गर्दीही जास्त होती आणि मास्कधारकांची संख्याही प्रवाशांमध्ये जास्त होती. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही अंतर्देशीय विमानं उतरतात तसं माझंही आलं. मी रिक्षाने डोमेस्टिकला गेलो तिथून भोपाळची फ़्लाईट. भोपाळला पोचलो ४ मार्चला संध्याकाळी. दुसर्या दिवशी कामं उरकून रात्रीच्या झेलमनी मी पुण्याला आलो. मग १५पर्यंत इथेच होतो. मग कासरगोड, केरळला गेलो - असं वाटून की तिथे एप्रिलमध्यापर्यंत तरी सत्र वगैरे चालेल आणि मग सुट्टी पडेल.
नाताळातल्या सुट्टीत कासरगोडहून पुण्याला येताना गाडी चालवत आणली होती, ती इथेच होती. त्यामुळे ती केरळला चालवत नेली. करोनाच्या दहशतीत कासरगोडला घरून विद्यापीठात जाताना सार्वजनिक वाहतूक टाळता येईल म्हणून कार नेणं आवश्यक होतं. तिथे गेलो तर लगोलग विद्यापीठाचा आदेश आला, की करोनाच्या प्रादुर्भावामुळे उन्हाळी सुट्टी अलीकडे ढकलत आहोत आणि ती २१ मार्च ते ३ मे अशी राहील. प्राध्यापकांसाठी २० मार्च कामकाजाचा अंतिम दिवस राहील. झालं! म्हणजे मला परत ड्राईव करत यावं लागणार. त्यानुसार २० मार्चच्या रात्री, म्हणजे २१ मार्चच्या पहाटे ३ वाजता मी तिथून निघालो ते थेट पुण्यात रात्री ९ वाजत पोचेपर्यंत ड्राईवच करत होतो. असा पराक्रमी ड्राईव होता काय सांगू! बरं २०च्या रात्री झोपलोच नव्हतो. कारण तिकडे लॉकडाऊनची सूचना आली होती. तरी निघण्याची जय्यत तयारी होती, आणि न निघालो तर कासरगोडमधलं दीड महिने सुट्टीत अडकून पडणंही दिसत होतं. त्यामुळे निघालो ३.२०ला. रस्त्यात गाडी पंक्चर झाली ती मंगळुरूच्या पुढे उडुपी ३९ किमी असताना. तिथे कर्नाटक रिज़र्व पोलीस फ़ोर्सची वॅन होती. तो ड्राईवर झोपला होता. पावणेपाच झाले असतील. तो मध्येच उठला होता. त्याने माझी धडपड पाहिली आणि त्याने स्टेपनी बदलण्याचा ताबा घेतला. ४०-५० मिनटात बदलली. पुढे पंक्चर झालेल्या चाकाचं पंक्चर काढून घेण्यात अर्धा-पाऊण तास गेला. आलो मऽ मज़ल-दरमज़ल करीत. सोबत अन्न, फळं, पाणी, सरबत असं सारं होतंच!
शाळेत आपण परीक्षेला जसं जागून जागून अभ्यास करतो आणि कधी कधी न झोपताच परीक्षेला जातो तसा शीण मला आल्यावर झाला.
फरक हा की ही परीक्षा १८ तास चालली.
पुढे पुण्यात असताना कासरगोडच्या कडक लॉकडाऊनच्या बातम्या, बाधित रुग्णांची वाढती संख्या अशा बातम्या येत राहिल्या. मी जिथे शिकवतो त्या विद्यापीठाचं विद्यार्थ्यांचं वसतिगृह हे कोविड-१९ साठी राखीव रुग्ण्यालय म्हणून वापरणार हे कळलं, शिवाय काही प्रयोगशाळांत करोनाच्या चाचण्यांची सोयही विद्यापीठ आवारातच होणार हेही कळलं.
दारूच्या अभावी आत्महत्या आणि नंतर…
लॉकडाऊननंतर केवळ अत्यावश्यक सेवा चालू राहिल्या. त्यात दारू ही आवश्यक नाही त्यामुळे तिची विक्रीही बंद झाली. परंतु व्यसनी लोकांना लगोलग विड्रॉवल सिम्टम्स यायला सुरूवात झाली आणि ही मंडळी आत्महत्येपर्यंत गेली, एकूण ९ लोकांचा बळी गेला. हे झाल्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आणल्यास दारू विकत घेता येईल अशी तरतूद केली. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केरळच्या गटाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या निर्णयावर पुनर्विचार करावा म्हणून कळवले. अशा प्रकारे प्रिस्क्रिप्शनवर दारू घेण्यास परवानगी देणं हे अनैतिक असल्याचंही आयएमएने स्पष्ट केलं.
यावर अशी चर्चा कानावर आली – तत्त्वतः आयएमएचं म्हणणं होतं की बार बंद ठेवा, कारण इथे लोक एकत्र येतात. त्यामुळे संभाषण आणि गर्दी यातून बोलताना थुंकीचे तुषार हे रोग पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. याउलट जर लोक शांतपणे रांगेत उभे राहून सोशल डिस्टन्सिंग अनुसरून दारू विकत घेऊन घरी जाणार असतील तर यात रोगप्रसाराचा तसा धोका दिसत नाही. ही झाली एक बाजू – रोगाच्या प्रसाराच्या अंगाने!
आता द्सरी आर्थिक - आधीच लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था - एकुणातच जगाची-देशाची आणि राज्यांची - कोलमडली आणि याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. तसाही राज्याला महसूल आत्ता कशातूनच नाही. राज्यसरकारच्या कर्मचार्यांच्या वेतनातही कपात नुकतीच जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री सुरू राहिली तर तेवढाच आधार असाही विचार आहे. लॉकडाऊनच्या आधीही दारुची दुकानं बंद ठेवावीत की कसं याबाबत चर्चा होती, कारण यातून मिळणारा महसूल बघता तो नाकारणं सरकारी तिजोरीला परवडणारं नसतं.
आरोग्य आणि दारू हा मूलभूत मुद्दा या निमित्ताने प्रकर्षाने समोर आला. एकीकडे आरोग्यपूर्ण मानवी शरीरं ही उद्यम करून अर्थकारणाला हातभार लावू शकतात – तर दुसरीकडे काम करून आणि शिवाय उत्पन्नातून मद्यपान करून महसुलात भर घालणारी मंडळीही वाईट नाहीत, असाही विचार त्यामागे होऊ शकतो. थोडक्यात एकीकडे निव्वळ आरोग्यलक्ष्यी भूमिका तर दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्य आणि महसूलप्राप्ती – मात्र अनारोग्याच्या पायावर आधारलेली - असा गांधींच्या दारुबंदीपासून चालत आलेला पेच!
करोनाचं अरिष्ट समोर असताना दारू न मिळाल्याने हाल होणार्यांना रिहॅबला पाठवा, त्यांची दारू सोडवण्याचे प्रयत्न करा, हे कितपत व्यवहार्य आणि प्राधान्यक्रमात बसणारं आहे हा प्रश्न उरतोच. मोठ्या आजारासमोर इतर आजार लहान होतात, आणि आरोग्य या एका व्यापक गोष्टीकडे आपण किती रीतसर दुर्लक्ष करत होतो हे असं समोर येतंय.
काळंपांढरं
दारूबद्दल आपल्या लोकांची फार काळी-पांढरी मतं असतात. दारू पिणाऱ्यांत गरीब, आणि व्यसनाधीन लोक असतात तसेच प्रमाणात पिऊन आनंद मिळवणारे आणि दारू पिऊनही आरोग्यवंत राहणारे, कामं करणारे लोकही असतात. हा दुसरा वर्ग मोजलाच जात नाही. फार ताणात दिवस घालवल्यावर, 'आता मला काही प्यायला हवंय' म्हणणारे लोक फार दिसत नाहीत. कारण ते तशी बडबड मोठ्यामोठ्यानं करत नाहीत; ना त्यात काही बातमीमूल्य. ह्या लोकांकडून महसूल मिळतोच, शिवाय हे लोक अर्थकारणालाही हातभार लावतात. ते मोजल्याशिवाय ह्या प्रश्नाची तीव्रता आणि नैतिकताही समजणार नाही.
आजच सकाळी NBCवर बातमी होती; अमेरिकेत दारूचा खप ५५%नी वाढला आहे - म्हणजे आधीच्या दीडपट झाला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दारूच्या आहारी जाणे
दारू मिळत नाही म्हणून आत्महत्या करणारे लोक ही दारूच्या पूर्ण आहारी गेलेली लोक आहेत.
दारूच काय प्रतेक नशा आणणाऱ्या पेय किंवा पदार्थ ह्यांचे हेच वैशिष्ट आहे की त्याची सवय लागते.
ते मिळाले नाही जी नैराश्य ची भावना निर्माण होते.
आणि त्याच मुळे काही लोक आत्महत्या करण्याचे टोकाचे पावूल उचलत आहेत.
ठराविक प्रमाण पेक्षा जास्त प्रमाणात नशा येणाऱ्या पेय किंवा पदार्थाचे खूप दिवस सेवन केले की ही अवस्था येते .
प्रमाणात नशा करणाऱ्या लोक ह्या स्टेज पर्यंत पोचत नाही .
पण प्रमाणात म्हणजे किती हे ठरवणे अवघड आहे आणि इथेच खरी गोम आहे.
दारू पासून मिळणारे उत्पादन आणि दारू पासून निर्माण होणारे रोग आणि त्या वर झालेला उपचाराचा खर्च ह्याची तुलना केली तर तो नुकसानीचा व्यवहार आहे.
दारू पिल्या मुळे जी उतेजीत अवस्था येते थोड्या वेळासाठी त्या मध्ये कोटुंबिक हिंसाचार,lockdown तोडण्याची इच्या होवू शकते .
म्हणून आजच्या अवघड समयी पूर्ण दारू आणि बाकी नशेचे पदार्थ ह्यांच्या वर बंदी योग्यच आहे
मुले काय करतायेत?
मी अमेरिकेत मिडवेस्ट मध्ये राहते. आमच्या कडे शाळा गेले दोन आठवडे बंद आहेत. करोना मुळे मुलांचे सगळे जगच बदलले आहे. दोन आठवडे माझ्या मुलीने (प्राथमिक शाळा ) मस्त लोळत काढले. आता परावापासून तिचे distance learning सुरु झाले आहे. अचानक ती आता virtual जगात सामील झाली आहे. तिचा ई-मेल अकाउंट सुरु झाला, झूम अकाउंट आला. तिला शाळेतून लॅपटॉप मिळाला . आता रोज तीन तास ती लॅपटॉप पुढे बसून काही बाही शिकते. तिच्या शिक्षिका videos रेकॉर्ड करून पाठवतात आणि एका app वरून शिक्षण चालते. तायक्वांडो पण असेच ऑनलाइन. एकूणच ही मुले फार लवकर virtual जाळ्यात आली. अर्थात तिला हे सगळे शिकायला अर्धा तास पण लागला नाही. एका दिवसात ती सगळी apps आत्मविश्वासाने हाताळू लागली. माझ्या बाबांना मी गेले दोन आठवडे झूम शिकवते आहे . तिला आता तिच्या कुठल्याच मैत्रिणीला भेटता येत नाही पण त्या सगळ्या face time करतात. परवा एक झूम वर बर्थडे पार्टी पण आहे . तिला आम्ही फार कोरोना वर बोललेले आवडत नाही . मध्ये एकदा Tangled चित्रपट बघितला आणि रडायला लागली . त्यात कुणाचे तरी आई बाबा मरतात. मग तिला आमची फार काळजी वाटली . म्हणजे उघड बोलली नाहीत तरी मुले ह्या आजाराचा विचार करत असतात आणि घाबरली पण असतात. मध्ये मध्ये वेळ काढून ती घर पुसत बसते. बाकी तिला आणि आम्हाला अचानक वेळेचे घबाड मिळाल्या सारखे वाटत आहे. कामे आहेत पण वेळेची बंधने सैल झाली आहेत. त्यामुळे काहीसे मोकळे वाटते.
मी युनिव्हर्सिटीत शिकते आणि शिकवते. युनिव्हर्सिटी पण तीन आठवडयांपूर्वी बंद झाली. माझ्या युनिव्हर्सिटीने एका वीकएंड मध्ये आम्हाला सगळे कोर्सेस in-person चे onlineकरायाला सांगितले. मग तीन दिवस हाणामारी. आमच्या युनिव्हर्सिटीने online शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. आमचे ८०% कोर्सेस वर्गात शिक्षकांबरोबर असतात . त्यामुळे हे काम सोपे नव्हते. online शिकवण्याची एक वेगळी पद्धत असते . त्याच्या assignments , discussions वेगळ्या प्रकारे तयार करावी लागतात. सुदैवाने मी online कसे शिकवावे हा कोर्स आधी करून ठेवला होता तो कमी आला . Canvas learning platform पण वापरला होता त्यामुळे फार कठीण गेले नाही. पणप्रत्येक विद्यार्थाला फोन करून त्याच्याकडे आवश्यक ते तंत्रज्ञान आहे ना , त्याला ते वापरता येतेय ना, त्याने canvas , google drive , zoom kalatura , flipgrid एकमेकांना जोडले आहे ना त्याची खात्री करावी लागते. युनिव्हर्सिटीने सगळे कोर्सेस grade (A to F ) काढून फक्त पास नापास केले. मानसिक आरोग्यसासाठी झूम सेशन सुरु केली . ती सगळी फुल्ल बुक झाली आहेत.
आता काय म्हणते मिडवेष्ट
आता अडीच महिन्यानंतर काय म्हणते मिडवेष्ट ?
लिहिणार का ?
करोना आणि भारतीय प्रसारमाध्यमं
भारतीय प्रसारमाध्यमांवर आधीही सरकारी दबाव होताच, पण करोनामुळे तो आणखीच वाढला आहे. ह्यावर न्यू यॉर्क टाइम्सचं वृत्तांकन -
Under Modi, India’s Press Is Not So Free Anymore
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
केरळात होम डिलीव्हरी सुरू
अखेर केरळ सरकारनं दारूची होम डिलीव्हरी सुरू केली! ह्याला म्हणतात लोकाभिमुख सरकार.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नवे प्रतिसाद
१०० प्रतिसाद झाल्यामुळे पुढील भाग इथे वाचता येईल.