व्हायरस, करोनाव्हायरस, आणि इतर काही – डॉ. योगेश शौचे

व्हायरस, करोनाव्हायरस, आणि इतर काही – डॉ. योगेश शौचे

डॉक्टर योगेश शौचे यांचा थोडक्यात परिचय : मायक्रोबायोलॉजिस्ट. पुण्यातून मास्टर्स आणि बंगलोरच्या ’इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून पीएचडी. गेली अनेक वर्षं ’नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस’ या संस्थेत ज्येष्ठ संशोधक म्हणून कार्यरत. शेकडो रिसर्च पेपर्स प्रकाशित. शिवाय, ’नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबियल रिसोर्सेस’ (NCMR) ही संस्था संकल्पनेपासून त्यांनी एक हाती उभी केली आणि आज ती एक विख्यात संस्था आहे. या संस्थेकडे सुमारे दीड लाख जीवाणू आणि कवकं (fungi) यांचा साठा आहे. याशिवाय ते अतिशय चांगले शिक्षक आहेत.

‘ऐसी अक्षरे’तर्फे डॉक्टर योगेश शौचे यांचे स्वागत आणि त्यांचे आभार. आजच्या या संवादाचे विषय थोडक्यात खालीलप्रमाणे.

  • भूषण पानसे यांनी संकलित केलेल्या सर्वसामान्यांच्या विषाणूंविषयीच्या शंका.
  • पुण्याच्या आसपासच्या परिसरातल्या करोनाव्हायरसचे नमुने गोळा करून त्यांनी जे काम केले आहे त्याविषयी.
  • करोनासंदर्भात इतर काही प्रश्न.
  • NCMRविषयी माहिती.
  • ‘बायोबँकिंग’ म्हणजे काय.

सुरुवातीला आपण मुख्य मुद्दा, म्हणजे विषाणू, कोरोनाचा विषाणू आणि हे सगळं काय घडत आहे याकडे येऊयात.

सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलतः जो माहीत असणं जरुरीचं आहे तो भाग म्हणजे जीवसृष्टीमधला माहितीचा प्रवाह. जीवनाला जरुरी असणाऱ्या ज्या सगळ्या प्रक्रिया घडतात त्या घडण्यासाठी माहिती कशी साठवली जाते, आणि त्या माहितीचा उपयोग आणि प्रवाह कसा जातो हे आपल्याला सुरुवातीलाच जाणून घेणं अत्यावश्यक आहे.

Virus Structure

सजीवांमधल्या बहुसंख्य प्रक्रिया या प्रथिनांमुळे किंवा एन्झाइम्समुळे जैव-रासायनिक प्रक्रिया होत असतात. (एन्झाइम्स हीही एका विशिष्ट प्रकारची प्रथिनंच असतात.) पण या प्रक्रियांना लागणारी माहिती असते, ती जेनेटिक मटेरियल, म्हणजे DNAमध्ये साठवलेली असते. सजीवांच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत माहितीचं जे संक्रमण होतं ते DNAच्या माध्यमातून होतं. आणि या प्रक्रियांचं कार्य प्रथिनांच्या माध्यमातून चालतं. या दोघांना जोडणारा जो दुवा आहे त्याला म्हणतात RNA. पेशींमध्ये DNAमध्ये असलेल्या माहितीचं रूपांतर RNAमध्ये (कॉपी) केलं जातं आणि मग त्या RNAमध्ये साठवलेल्या माहितीनुसार पेशींमध्ये प्रथिनं तयार केली जातात. हे ते तीन महत्त्वाचे दुवे आहेत : DNA, RNA आणि प्रथिनं. आणि यांच्याद्वारे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या एकूणएक प्रक्रिया, म्हणजे पेशींची वाढ, आपली वाढ, आपली उंची वाढणं वगैरे या सगळ्या प्रक्रिया या तीन पायऱ्यांमधून होतात. हे बेसिक समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.

विषाणूंचं वर्गीकरण या दोन जेनेटिक मटेरियलवर अवलंबून आहे. सर्वसामान्यपणे सर्व सजीवांमध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल असतं. फक्त काही अपवादांमध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल असतं. आणि बरेचसे विषाणू या ‘अपवादांमध्ये’ मोडतात. म्हणून ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे.

विषाणूंचं वर्गीकरण अनेक प्रकारांनी केलं जातं. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे त्यांचं जेनेटिक मटेरियल काय आहे; कशा पद्धतीने त्यांच्यातल्या माहितीचं संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केलं जातं, हा वर्गीकरणाचा एक प्रकार आहे. काही विषाणूंमध्ये हे जेनेटिक मटेरियल DNA (डी-ऑक्सि रायबोन्यूक्लिइक आम्ल) असतं. आणि DNAच्या स्वरूपानुसारही वर्गीकरण होतं – डबल स्ट्रँडेड, म्हणजे दोन धागे असलेले किंवा सिंगल स्ट्रँडेड म्हणजे एकच धागा असलेले. म्हणजे DNA किंवा RNA जेनेटिक मटेरियल, आणि DNA असेल तर एक धागा असलेला DNA किंवा दोन धागे असलेला DNA, यानुसार वर्गीकरण होतं.

Virus Classification

एक धागा असलेल्या DNA विषाणूंचं उदाहरण म्हणजे parvoviruses. दोन धागे असलेल्या विषाणूंचं एन्व्हलप असलेले आणि नसलेले हे पुढचं वर्गीकरण. दोन धागे आणि एन्व्हलप असलेल्या विषाणूंचं उदाहरण म्हणजे पॉक्स (देवी) विषाणू, हरपीज (नागीण) विषाणू आणि दोन धागे असलेल्या आणि एन्व्हलप नसलेल्या विषाणूंचं उदाहरण म्हणजे अडिनो, पॅपिलोमा इत्यादी.

हे झालं DNA विषाणूंच्या बाबतीत. दुसरा वर्ग म्हणजे ज्यांचं जेनेटिक मटेरियल RNA आहे ते विषाणू. यांच्यात बरेच गुंतागुंतीचे प्रकार येतात. यातला पहिला म्हणजे ज्यांच्या RNAचे दोन धागे असतात. याचं उदाहरण म्हणजे रिओव्हायरस. दुसरा प्रकार म्हणजे ज्या RNA विषाणूंमध्ये कार्य करण्यासाठी त्यांच्या RNAवरच्या माहितीचं DNAमध्ये रूपांतर होणं जरुरी असतं त्यांना रेट्रोव्हायरस म्हणतात. आपल्याला माहीत असलेला HIVचा विषाणू, हा या रेट्रोव्हायरसपैकी आहे. तिसरा प्रकार म्हणजे ज्याला प्लस स्ट्रँडेड किंवा पॉझिटिव्ह स्ट्रँडेड RNA व्हायरसेस म्हणतात ते. प्लस स्ट्रँडेड म्हणजे काय, तर या विषाणूंमध्ये RNAतल्या माहितीचं थेट रूपांतर प्रथिनांमध्ये होऊ शकतं. यात परत दोन प्रकार, एन्व्हलप्ड आणि अनएन्व्हलप्ड. अनएन्व्हलप्ड मध्ये कॅलिसी आणि पिकोव्हायरसेस येतात. एन्व्हलप्ड आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हवा असलेला कोरोना, फ्लावी आणि टोगा विषाणू येतात.

निगेटिव्ह स्ट्रँडेड आरएनए व्हायरसेस म्हणजे ज्याचं डायरेक्टली प्रथिनात रूपांतर होऊ शकत नाही. त्याचा कॉम्प्लिमेंटरी RNA – प्रतिकृती आधी तयार केली जाते आणि मग त्या प्रतिकृतीचं रूपांतर प्रथिनांमध्ये होतं. अशांना निगेटिव्ह स्ट्रँडेड RNA व्हायरसेस म्हणतात. त्याची उदाहरणं म्हणजे बनियाव्हायरस, मिक्सोव्हायरस, ऑर्थो- आणि पॅरामिक्सो व्हायरस इत्यादी.

Assembly and Release

विषाणूंचं जेनेटिक मटेरियल काय / कशा पद्धतीचं आहे, हा विषाणू वर्गीकरणाचा एक प्रकार झाला. वर्गीकरणाचा दुसरा प्रकार म्हणजे त्यांच्या आकारानुसार (इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली हा विषाणू दिसतो कशा आकाराचा) केलेलं वर्गीकरण.
यात स्पायरल, इकोसाहेड्रल, हेलीकल, रेडियल, पॉलीहेड्रल आणि कॉम्प्लेक्स, इत्यादी येतात. हे सोबत दिलेल्या चित्रात दिसेल. कॉम्प्लेक्स म्हणजे त्याला हेड आहे, टेल आहे, टेल फायबर्स आहेत. हे एन्व्हलप्ड विषाणू आहेत. त्यांची उदाहरणं म्हणजे हेलिकल असलेले rhabdovirus, इकोसाहेड्रल असलेले polioma, picorna विषाणू, त्यानंतर कॉम्प्लेक्स असलेले bacteriophages इत्यादी.

Virus Shapes

कोरोना विषाणू म्हणजे त्याला बाहेरून मेम्ब्रेन असते, त्याच्यावर स्पाईक प्रथिन असतं. हर्पीज व्हायरस (ज्यात HIV-एड्स रोगाचे विषाणू समाविष्ट आहेत), रेबीज व्हायरस हे बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे असतात., फ्लॅव्हो- किंवा इबोला व्हायरस हे हेलिकल आकारामध्ये असतात. टोबॅको मोझाइक व्हायरस हा वनस्पतीला (तंबाखूच्या पानांना) इन्फेक्ट करणारा विषाणू आहे, हाही हेलिकल आकारामध्ये असतो.

Virus Shapes
Virus Shapes

ज्याप्रमाणे विषाणूच्या आकारानुसार वर्गीकरण केलं जातं, तसंच त्याची वाढ कुठे आणि कशी होते यानुसारही वर्गीकरण करता येतं. म्हणजे विषाणूची वाढ पेशींच्या केंद्रकामधे होते की सायटोप्लाज्मामध्ये होते यानुसार वर्गीकरण. याबरोबरच विषाणू कोणत्या प्राण्यामध्ये कोणत्या पेशींमध्ये इन्फेक्शन व वाढ करतात यानुसारही वर्गीकरण होतं. बॅक्टेरिओफाजेस हे फक्त जीवाणूंमध्ये इन्फेक्शन करतात. प्लांट व्हायरसेस फक्त वनस्पतींमध्ये इन्फेक्शन करतात. पोलिओ, रेबीज, रेट्रोव्हायरस हे प्राणी (आणि माणूस) यांच्यात इन्फेक्शन करतात. काही विषाणू हे फक्त कीटकांमध्ये इन्फेक्शन करतात. उदाहरणार्थ बॅक्युलोव्हायरसेस, ग्रॅन्युलोव्हायरसेस इत्यादी.

Virus Under Electron Microscope
a. Electron micrograph image of tobacco mosaic virus (TMV), a rod-like virus. b. X-ray reconstruction of turnip yellow mosaic virus (TYMV), which has a spherical shell. c. Cryoem reconstruction of a bacteriophage T4, a bacilliform or prolate virus. d. Electron micrograph image of the nucleocapsid of the human immunodeficiency virus HIV-1.

अशा प्रकारे विषाणूंचं त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मानुसार वर्गीकरण करता येतं. विषाणूंचा प्रसार कसा होतो, हवेतून, की विष्ठेतून की लैंगिक संपर्कामधून की रक्तामधून यानुसारही वर्गीकरण केलं जातं.

आता आपण सध्या सगळ्यांच्या कुतुहुलाचं केंद्र असलेल्या कोरोनाव्हायरसेसकडे वळूयात.

Coronavirus Structure

सगळे कोरोनाव्हायरसेस हे कोरोनाव्हिरीडी या वर्गात येतात. त्यांना कोरोना म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांच्यावर असलेल्या स्पाइक प्रथिनांच्या आकारामुळे हे विषाणू ‘मुकुटा’सारखे दिसतात, म्हणून कोरोनाव्हायरस. कोरोनाव्हिरीडीपैकी सात प्रकार माणसाला इन्फेक्ट करू शकतात. आत्ता ज्याचा प्रादुर्भाव आहे तो सातवा कोरोनाव्हिरीडी वर्गातला विषाणू आहे. यापूर्वी याच कुटुंबातल्या सहा व्हायरसेसची इन्फेक्शन्स होऊन गेलेली आहेत. २२९ इ,एन एल ६३, ओ सी ४३, एच के यु १, नंतर सार्स म्हणजे २००८-९मध्ये ज्याची साथ आली होती तो आणि त्यांनतर आलेला मर्स, हे आधी येऊन गेलेले सहा कोरोना व्हायरसेस. सार्स कोविड-२ हा यातला सातवा प्रकार. या सार्स कोविड-२ची रचना – त्याला बाहेरचं आवरण म्हणून एक मेम्ब्रेन असतो, त्यात एक मेम्ब्रेन प्रोटीन असतं, शिवाय या मेम्ब्रेनवर स्पाइक प्रोटीन असतं. या मेम्ब्रेनच्या आत RNA हे जेनेटिक मटेरियल व एक रायबो न्युक्लीओ प्रोटीन असतं. त्याच्या जेनेटिक मटेरियलमध्ये मेम्ब्रेन प्रथिनाच्याकरता, किंवा रायबोन्यूक्लिओ प्रथिनाकरता किंवा बाहेरील स्पाइक प्रथिनाकरता वेगवेगळे जीन्स असतात.

Coronavirus Structure

आता या विषाणूबद्दल आपल्याला आज काय माहिती आहे याकडे वळूयात.

हा आजार जेव्हा निर्माण झाला तेव्हा आपल्याला याबद्दल फारच थोडी माहिती होती. कारण हा विषाणू जरी कोरोनाव्हिरीडी वर्गामधला असला तरीही त्याची रचना आधी ज्ञात असलेल्या या वर्गातल्या विषाणूंच्यापेक्षा वेगळी आहे. पण गेल्या सहा आठ महिन्यांमध्ये याविषयी सगळ्या जगातून फार मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. यामुळे या कालावधीत छोटे मोठे असे सुमारे २४,००० शोधनिबंध त्याविषयी प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी होती त्यापेक्षा खूपच जास्त माहिती आपल्या हातात आली आहे. आज जवळजवळ ८०,००० ते ९०,००० सार्स कोविड-२ विषाणूंच्या जीनोमचा सिक्वेन्स जगभरातून केला गेलेला आहे. हा विषाणू कसा वाढतो, कसा पसरतो याबद्दल आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळाली आहे. सुरुवातीच्या काळात आपल्याला आठवत असेल तर हा विषाणू माणसाच्या शरीराबाहेर कुठल्याही पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहू शकतो याची काहीही माहिती नव्हती. फेब्रुवारीमध्ये पहिला शोधनिबंध या विषयावर प्रकाशित झाला की हा विषाणू विविध पृष्ठभागावर, म्हणजे कागद, प्लास्टिक, धातू यावर किती तास जिवंत राहू शकतो? वेगवेगळी आर्द्रता असताना तो किती काळ जिवंत शकतो? याचा प्रसार कसा होत आहे याबद्दलही नवनवीन माहिती आपल्याला मिळत आहे

परंतु याच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यावर त्याचं स्वरूप काय असेल? अँटीबॉडी आहे म्हणजे प्रतिकारशक्ती निर्माण झालेलीच आहे का? रोगप्रतिकार शक्ती किती काळ राहू शकते? हा आजार एकदा होऊन गेला तर आयुष्यभरात परत होणार नाही का? का असा आजार झालेल्या माणसाला परत इन्फेक्शन होऊ शकतं का? अशा प्रकारची माहिती आपल्याला अजून कळलेली नाही. वेगवेगळ्या भागातले जनसमूह याच्या संसर्गाला बळी पडण्याची शक्यता किती आहे? म्हणजे आपल्याच देशात जी विविध जेनेटिक व्हॅरिएशन्स आहेत त्यांचा, किंवा देशात वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांचा रिस्पॉन्स वेगळा असेल का? काही विशिष्ट लोकांमध्ये हा आजार होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं का? काही लोकांमध्ये कमी असू शकतं का? याविषयी आपल्याला पुरेशी माहिती उपलब्ध नाही. तशी माहिती मिळायला अजून बराच काळ जावा लागेल.

आता आम्ही स्वतः केलेल्या अभ्यासाबद्दल :

आम्ही जो अभ्यास केला त्यात कोविड-१९ बाधित रुग्णांच्या ९० नमुन्यांचं जीनोम सिक्वेन्सिंग केलं. आज जीनोम सिक्वेन्सिंगचं शास्त्र अत्यंत प्रगत व सोपं झालेलं आहे त्यामुळे हे करणं शक्य झालं. या विषाणूचा जीनोम सुमारे २३,००० बेसेसचा बनलेला आहे. आजच्या घडीला या तेवीस हजार बेसेसचा अभ्यास करणं सहज शक्य झालेलं आहे.

Coronavirus Genome

या अभ्यासामुळे या विषाणूच्या RNAमध्ये किती वेगाने आणि कसा बदल होतोय? तो बदल कुठल्या दिशेने चालला आहे? वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या विषाणूचा प्रभाव आहे का? अशा तऱ्हेची बरीच माहिती आपल्याला मिळू शकते. आणि या सर्व माहितीचा फायदा या रोगाचा प्रसार रोखण्यात होतो. म्हणून ही माहिती मिळविणं आवश्यक आहे.

भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने एक देशव्यापी प्रकल्प चालू केला आहे. या प्रकल्पात भारताच्या विविध भागातून १,००० कोविड-१९ विषाणूंचा जेनेटिक सिक्वेन्स मिळवायचा असं उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प आहे. आम्ही केलेला अभ्यास हा याच प्रकल्पाचा एक भाग होता. या हजार सिक्वेन्सपैकी महाराष्ट्राच्या काही भागातून आपण नमुने घेऊन ९० कोविड-१९ विषाणूंचा सिक्वेन्स आपण मिळवून दिला. यात बी.जे. मेडिकल कॉलेज, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज आणि डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च यांच्या परवानगीने आपल्याला हे नमुने मिळाले.

सध्याच्या अभ्यासामध्ये जे नमुने घेतलेले होते ते पुणे सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांमधून एप्रिल आणि मे महिन्यात घेतलेले होते. या नमुन्यांमधून आपण या विषाणूच्या जीनोमचा सिक्वेन्स केला होता.

जगभरात आता या विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सचे वेगवेगळे ग्रुप्स तयार झाले आहेत. उदाहरणार्थ १९ A, १९ B, २० A, २० B, २०C . जीनोम सिक्वेन्समधील बदलावरून हे प्रकार ठरविलेले आहेत. ज्या वर्षी हा बदल आढळला त्याचं वर्ष यात लिहिलं जातं. उदाहरणार्थ १९ A आणि १९ B हे दोन्ही २०१९मध्ये सापडलेले आणि २०A, B आणि C हे तिन्ही २०२० मधे सापडलेले प्रकार. यापैकी २० C हा महाराष्ट्रातल्या नमुन्यांमध्ये आढळला नाही, व उर्वरित भारतातल्या काही नमुन्यांमध्ये आढळला. महाराष्ट्रातल्या अभ्यासलेल्या नमुन्यांमध्ये मुख्यतः २० A आणि २० B हे सापडले. १९ A हा अतिशय कमी नमुन्यांमध्ये सापडला. २० A आणि २० B हे प्रकार प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेत आढळणारे प्रकार, हे आपल्या महाराष्ट्रातल्या नमुन्यांमध्ये सापडले.

दुसरं म्हणजे आज जगभर D ६४१G या एका म्युटेशनची जोरात चर्चा चालू आहे. (आता हे असे आकडे सामान्य माणसाला थोडे गोंधळात टाकतात म्हणून हा खुलासा) याचा अर्थ म्हणजे यातल्या एका विशिष्ट प्रथिनातल्या ६४१व्या बेस मध्ये झालेला बदल/म्युटेशन एवढाच आहे. या म्युटेशन किंवा बदलाचा विषाणूच्या आक्रमकतेवर काय परिणाम होतो आहे याविषयी काहीही माहिती अजून पुढे आलेली नाही. (वर्तमानपत्र किंवा इतर मीडियातून यावर एक भयावह चित्र निर्माण केलं जात आहे) जगभरच्या बऱ्याच नमुन्यांमध्ये हा बदल सापडत आहे. याप्रमाणेच हा बदल आपल्या बऱ्याच नमुन्यांमध्ये सापडला आहे. याप्रमाणेच अजून एका बदलाची चर्चा जोरात सुरु आहे, तो म्हणजे C ५७००A हा बदल. या बदलाच्याही बाबतीत विषाणूंवर काय परिणाम होतो यावर आत्ता काही सांगता येत नाही.

या व्यतिरिक्त असा एक निष्कर्ष आढळला की इतरही काही बदल जीनोममध्ये आहेत. पुणे नाशिक आणि सातारा यातल्या नमुन्यांमध्येही विभागानुसार जीनोममध्ये काही विशिष्ट बदल आढळले आहेत. काही फक्त पुण्यातच, काही फक्त साताऱ्यात आणि काही फक्त नाशिकमध्येच दिसले होते. याचं संभाव्य कारण असं आहे की एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊन असल्याने या जिल्ह्यांमधली लोकं प्रवास करून इतर जिल्ह्यात जात नव्हती त्यामुळे जे स्थानिक बदल घडले ते त्या त्या भागातच मर्यादित राहिले असा अंदाज आहे.

आता या सगळ्या माहितीवरून पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

जो पॅटर्न आपल्याला एप्रिल-मे महिन्यात दिसला, म्हणजे उदाहरणार्थ D ६४१G आणि C ५७००A ही म्युटेशन्स मोठ्या प्रमाणावर आढळली आहेत, ते चित्र पुढे कसं दिसत आहे. जे (इतरही) बदल आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यात विशिष्ट भागापुरते सापडले होते ते तसेच राहतात का, की त्यातही काही विशिष्ट बदल घडून येत आहेत हे तपासण्यासाठी सध्या जून आणि जुलै महिन्यातले नमुने घेऊन त्यावर अभ्यास चालू आहे. आता पुणे, सातारा, नाशिकबरोबरच नागपूर, गोंदिया, सोलापूर, औरंगाबाद आणि मुंबई या भागातून नमुने मिळवून त्यात जून जुलैमध्ये काय चित्र दिसत आहे हे बघणं चालू आहे. संपूर्ण राज्यभर चित्र साधारणपणे सारखंच आहे की त्यात काही विभागानुसार, जिल्ह्यानुसार वेगळेपणा आहे याचा अभ्यासही चालू आहे.

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या आजाराशी संबंधित मृत्युदर जास्त आहे, काही भागात तो कमी आहे. या कमी किंवा जास्त मृत्युदराचाही या विषाणूच्या जनुकीय बदलांशी काही परस्परसंबंध आहे का नाही याविषयीही या प्रकल्पाअंतर्गत अभ्यास चालू आहे. यामुळेच नागपूर आणि गोंदिया येथून नमुने घेण्यात आले आहेत.

ही आत्तापर्यंत सांगितलेली हा विषाणू म्हणजे काय, या प्रकल्पात काय अभ्यास चालू आहे त्यातून काय निष्कर्ष निघू शकतात वगैरेची थोडीशी पार्श्वभूमी मी आत्तापर्यंत मी सांगितली. आता आपण प्रश्नांकडे वळूयात.

प्रश्न : या विषाणूला inactivate कसं करता येतं?

डॉ. शौचे : शरीराच्या बाहेर जर विषाणू असेल तर हिट, काही विशिष्ट प्रकारची केमिकल्स उदा. आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं सोडियम हायपोक्लोराइट या व्यतिरिक्त डिटर्जंट्स इत्यादी (डिटर्जंटमुळे विषाणूचं बाहेरचं कवच, मेम्ब्रेन नष्ट होतो, ज्यामुळे विषाणू नष्ट होतो), वेगवेगळ्या प्रकारची रेडिएशन्स, अल्ट्रा-व्हायोलेट रेडिएशन, गामा रेडिएशन यामुळे यामुळे विषाणू inactivate करता येतो. शरीराच्या आतमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती विषाणूला नष्ट करते, किंवा विषाणूला inactivate करणारी किंवा त्याच्या वाढीला प्रतिबंध करणारी काही औषधे आहेत त्यांचा उपयोग करता येतो.

प्रश्न : या विषाणूमध्ये हे जनुकीय बदल / म्युटेशन्स होत आहेत त्यामुळे तयार होत असलेल्या प्रस्तावित औषधे व लशी यांच्या परिणामकारकतेवर काही वाईट / चुकीचा इफेक्ट होऊ शकतो का?

डॉ. शौचे : याविषयी आत्ता काही सांगता येणं अवघड आहे. (म्हणजे जीवाणूंमध्ये म्युटेशन होऊन औषधाला प्रतिरोध (ड्रग रेझिस्टन्स) होतो तसा काही बदल या विषाणूत घडला तर औषधांच्या परिणामकारकतेत बदल होऊ शकतो) परंतु आत्ता सापडलेल्या म्युटेशन्सच्या बाबतीत असं काही घडेल का तर याचंही उत्तर आता सांगता येणार नाही असंच असेल.

प्रश्न : दुसरी लाट येईल का आणि ती जास्त घातक असेल का?

डॉ. शौचे : अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगांच्या, मग ते जीवाणूजन्य असोत की विषाणूजन्य असोत, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कदाचित चौथ्या पाचव्या लाटा येतच असतात, आणि मग काही काळाने तो जीवाणू किंवा विषाणू हा endemic होऊन जातो. म्हणजे हा जीवाणू किंवा विषाणू त्या जनसमूहामध्ये कायमचा राहतो आणि अत्यंत कमी प्रमाणात तो त्या जनसमूहात अधूनमधून आजार निर्माण करत राहतो. याला आपण म्हणतो की हा विषाणू किंवा जीवाणू endemic झाला आहे. हे चित्र (मोठ्या संसर्गजन्य रोगांमध्ये / साथींमध्ये) नेहमीच दिसून येतं. आपल्या नजीकच्या भूतकाळात जर विचार केला तर SARS काय किंवा स्वाईन फ्लू काय, हे दोन्ही आपल्याकडे एंडेमिक झाल्याचं चित्र दिसत आहे. अतिशय थोड्या प्रमाणात याचे रोगी अजूनही दिसून येतात.

थोडक्यात, या या विषाणूचं पुढे काय होणार या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर दुसरी, तिसरी चौथी लाट येणार आहे. एवढेच नव्हे तर अजून दहा वर्षांनीसुद्धा या विषाणूमुळे अत्यंत किरकोळ प्रमाणात काही इन्फेक्शन्स झालेली दिसणार आहेत.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशी एक भीती व्यक्त केली जात आहे की दुसरी लाट येईल ती अतिशय जास्त संहारक असेल आणि या भीतीचं समर्थन करण्याकरता १९१८च्या स्पॅनिश फ्लूच्या साथीचं उदाहरण देण्यात येत आहे. माझ्या मते हे उदाहरणच चुकीचं आहे. स्पॅनिश फ्लूची दुसरी लाट आली होती आणि ती अतिशय संहारक होती ही वस्तुस्थिती आहे. परंतु ती लाट जास्त संहारक असण्याची कारणं फार वेगळी होती.

ही दुसरी लाट आली तेव्हा पहिलं महायुद्ध संपत आलेलं होतं. आणि एक सर्वसाधारण ठोकताळा किंवा निरीक्षण असं आहे की संसर्गजन्य रोग / महासाथ येते तेव्हा त्या रोगामध्ये सौम्य स्वरूपाचा आजार निर्माण करणारा विषाणू किंवा जीवाणूंचा प्रकार असतो तो जास्त पसरतो. विषाणू किंवा जीवाणूच्या ज्या प्रकारामुळे तीव्र आजार होतो, त्याचा प्रसार कमी होतो. याचं सोपं कारण म्हणजे ज्यांना तीव्र स्वरूपाचा आजार होतो ते रोगी एक तर मरून जातात किंवा त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केलं जातं त्यामुळे ते रोगी समाजामध्ये मिसळून जास्त रोग पसरवण्याची शक्यता फार कमी असते. याच्या उलट म्हणजे ज्यांना सौम्य स्वरूपाचा आजार झालेला असतो ते रोगी जिवंत राहतात, समाजात मिसळतात आणि समाजात रोग जास्त पसरवतात या कारणाने त्याचा प्रसार जास्त होतो.

युद्धभूमीवर परिस्थिती वेगळी असते. ज्या जवानांना युद्धभूमीवर गंभीर स्वरूपाचा आजार झाला त्यांना युद्धभूमीवरून परत पाठवलं गेलं. हे रुग्ण नंतर विविध मार्गानी, म्हणजे अगदी जहाजानेसुद्धा प्रवास करून जगातल्या वेगवेगळ्या जागी परतले. यामुळे ज्यांना गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता तेच आपापल्या घरी गेल्याने गंभीर स्वरूपाचा आजार जगभर पसरला. याउलट ज्या सैनिकांना सौम्य स्वरूपाचा आजार झाला होता त्यांना परत पाठवून न देता त्यांना युद्धभूमीवर कायम ठेवण्यात आलं त्यामुळे तो सौम्य स्वरूपाचा आजार करणारा विषाणू जगभर पसरला नाही. स्पॅनिश फ्लूची दुसरी लाट जास्त संहारक ठरली याचं हे कारण आहे.

यामुळेच दुसरी लाट जास्त संहारक असणारे हे सांगण्यासाठी स्पॅनिश फ्लूचं उदाहरण दिलं जातं ते माझ्या मते चुकीचं आहे. जेव्हा दुसरी तिसरी चौथी लाट येते तेव्हा ‘सर्वसाधारणपणे’ त्याची तीव्रता पहिल्या लाटेपेक्षा कमी तीव्र असते, जास्त तीव्र नसते.

प्रश्न : एक प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात आहे की हे विषाणू बदलतात कसे आणि का? म्युटेशन कशी होतात, किंवा मगाशी आपण सांगितलंत ते, म्हणजे पुण्यातला वेगळा, वूहानमधला वेगळा, युरोपमधला वेगळा, युरोपमधला आपल्याकडे आला याला काही इव्होल्यूशनरी प्रेशर्स कारणीभूत असतात का एन्व्हायरॉन्मेंटल कंन्डीशन्स मधल्या बदलामुळे हे होतं? म्युटेशन होण्याचा संबंध नक्की कशाशी आहे? आणि यातच एक दुसरा एक प्रश्न आहे. गेले काही दिवस मलेशियातून आलेला विषाणू (६४१जी) दहापट जास्त संहारक आहे असे दावे केले जात आहेत तर या दोन्हींविषयी काय सांगू शकाल?

डॉ. शौचे : म्युटेशन्स कशी होतात याची चर्चा आपण फक्त या (कोरोना विषाणू) विषयांच्या मर्यादेत करूयात. सर्वसाधारण चर्चा करायला नको.

मी अगदी बेसिकपासून सुरुवात करतो. या विषाणूचं जेनेटिक मटेरियल RNA आहे. गुणांचं संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करण्यासाठी या RNAच्या एका प्रतीच्या दोन प्रती केल्या जातात. विषाणूचं विभाजन होऊन जे नवीन दोन विषाणू तयार होतात त्या प्रत्येकाच्यात RNAची एक-एक प्रत जाते. (हीच पद्धत सर्व सजीवांमध्ये होते, मग जेनेटिक मटेरियल RNA असो किंवा DNA असो) सर्वसाधारणपणे पुनरुत्पादनाचा हा भाग आहे. परंतु DNAच्या जेव्हा दोन प्रती तयार केल्या जातात त्याची यंत्रणा थोडी वेगळी असते. RNA च्या दोन प्रती तयार करण्याची यंत्रणा वेगळी असते. आणि माणसासारख्या खूप उत्क्रांत झालेल्या सजीवांमध्ये किंवा अगदी जीवाणूंमध्येही एका DNAच्या दोन प्रती तयार करण्याची यंत्रणा खूप विकसित झालेली असते. विकसित म्हणजे एका DNAच्या दोन प्रती तयार होताना कमीत कमी चुका होतील अशी व्यवस्था उत्क्रांत सजीवांमध्ये असते. एवढेच नव्हे तर त्यातून चूक झालीच तर ती दुरुस्त करण्याची यंत्रणाही यांच्यामध्ये अस्तित्वात असते. त्याला DNA रिपेअर म्हणतात. अशा फूलप्रूफ योजनेमुळे एका प्रतीच्या दोन प्रती निर्माण होताना चुका होतात, पण अतिशय कमी होतात.

याउलट कोरोनासारख्या विषाणूमधे जेव्हा एका RNAच्या दोन प्रतिकृती तयार होतात, तेव्हा ही प्रतिकृती तयार करणारी योजना तेवढी एफिशियंट नसते. ही यंत्रणा चुका करत जाते. या चुका दुरुस्त करण्याची यंत्रणा विषाणूमधे नसते. आणि विषाणूची वाढ तशीच चुका करत आणि झपाट्याने होत असते. म्हणजे काही अब्ज विषाणू हे एका रोग्याच्या शरीरात तयार होत असतात. त्यामुळे या झालेल्या आणि होत असलेल्या चुका मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने वाढत जातात. तर या अशा पद्धतीने विषाणूच्या RNAमध्ये होत असणाऱ्या बदलांनाच आपण म्युटेशन म्हणतो. यापैकी काही बदल (म्युटेशन्स) विषाणूच्या वाढीला घातक असतात. असे बदल झालेले विषाणू पुढे नष्ट होतात. त्यांची पुढे वाढ होऊ शकत नाही. ज्या विषाणूंमध्ये असे झालेले बदल (स्वतःकरता) घातक नसतात, ते विषाणू आणि ते बदल पुढे संक्रमित होतात. कुठल्याही सजीवांमध्ये DNA किंवा RNA यात बदल घडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि निसर्गामध्ये ही कायम होतच असते. हे बदल जर सजीवाच्या वाढीला मारक नसतील तर ते बदल पुढे संक्रमित होत राहतात. आणि मग काही वेळेस परिस्थितीनुसार, ज्याला सिलेक्शन म्हणतात, म्हणजे काही बदल पुढे जात जास्त चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रसार होतो. हे बदल का घडत जातात याचं उत्तर.

मग यातले काही बदल संक्रमित होतात काही होत नाहीत. जर ते त्या विषाणूला फायदेकारक असतील, तर झपाट्याने त्याचा प्रसार होतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काही बदल असे होतात ज्यामुळे त्या विषाणूची आक्रमकता कमी होते असे बदल कदाचित जास्त वेगाने प्रसार पावतात कारण तो विषाणू जास्त वेगाने पसरतो.

आता त्या ६४१जी याबद्दलच्या बातम्यांबद्दल. एक तर हा बदल जगभर आढळलेला आहे (आत्ताच मलेशियात सापडलेला वगैरे नाही) तो विशिष्ट बदल असलेल्या नमुन्यांचं प्रमाण जगभर जास्त आहे. पण आजतागायत तो विषाणू जास्त संहारक आहे किंवा त्याच्यामुळे रोगी मारण्याची संख्या जास्त आहे अशा तर्‍हेची कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. त्या विशिष्ट बदलावर एक शोधनिबंध प्रकाशित झालेला आहे त्याच्यात त्यांनी असं दाखवलेलं आहे की असा विषाणूचं इन्फेक्शन झालेल्या रोग्यांच्या शरीरात या विषाणूची संख्या खूप मोठी आहे, म्हणजे ज्याला आपण व्हायरसचं टायटर म्हणतो (एका मिलिलिटरमध्ये किती विषाणू असतात) ते या रोग्यांच्या शरीरात खूप जास्त आहे असं आढळलेलं आहे. याचा अर्थ काही तो विषाणू जास्त संहारक आहे असा होत नाही.

शिवाय, ज्यांच्यात विषाणूचं खूप जास्त प्रमाण होतं त्यातले काही जण तर asymptomatic म्हणजे कुठलीही लक्षणं बाहेरून न दिसणारे, धडधाकट असणारे रोगी होती, तरीही त्यांच्यात विषाणूचं टायटर जास्त होतं. तात्पर्य, विषाणूचं टायटर खूप जास्त आहे याचा अर्थ त्या रोग्याला अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार झाला आहेच असं गृहीत धरणं चुकीचं आहे. आजार गंभीर होण्याची इतर अनेक कारणं आहेत, (उदाहरणार्थ) कोमॉर्बिडिटीज आहेत का, म्हणजे तो रोगी अतिस्थूल आहे का, त्याला मधुमेह आहे का, त्याला उच्च रक्तदाब आहे का इत्यादी अनेक कारणं असू शकतात. विषाणूचं टायटर आणि आजाराचं गांभीर्य याचा एकमेव परस्परसंबंध नाहीये.

प्रश्न : म्हणजे याला वर्तमानपत्रवाल्यांनी केलेली एक ‘सनसनाटी’ बातमी म्हणावे का?

डॉ. शौचे : हो. (दुर्दैवाने) वर्तमानपत्रे (आणि इतर मीडियाने) कोरोनाच्या बाबतीत अशा अनेक बातम्या सनसनाटी केलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला त्याचं खंडन करत बसणं (शास्त्रज्ञांना) शक्य नसतं.

प्रश्न : महानगरांमधे आता केलेले सिरो सर्व्हे हे करण्यामागचं उद्दिष्ट आणि या सिरो सर्व्हेचं इंटरप्रिटेशन याबद्दल काही माहिती सांगू शकाल का?

डॉ. शौचे : आम्ही कुठल्याही महानगरी सिरो सर्व्हेत सहभागी नव्हतो त्यामुळे मी अधिकारवाणीने याविषयी जास्त सांगू शकत नाही. परंतु सर्वसाधारणपणे असे जे सर्व्हे केले जातात – उदाहरणार्थ आत्ताच पुण्यात जो सर्व्हे झाला तो अँटीबॉडी बेस्ड सर्व्हे होता किती लोकांमध्ये (करोना विषाणूच्या विरुद्ध) अँटीबॉडीज सापडतात ही माहिती घेण्यासाठी तो सर्व्हे होता. आता हे जाहीर झालं आहेच की पुण्यातल्या काही भागांमध्ये ५० टक्क्यांहून जास्त लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या, दिल्लीत हेच प्रमाण २० की २३ टक्के होतं, मुंबईत चाळीस टक्के होतं. या निष्कर्षांमध्ये दोन प्रमुख caveats आहेत. पहिली caveat विषयी आपल्याला ह्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. ती माहिती खरं तर द्यायला पाहिजे. आम्ही त्या दिवशी चर्चाही केली होती की अँटिबॉडीज लोकांमध्ये सापडतायत त्या कशामुळे? यात एक शक्यता अशीही आहे की (विशेषतः आपल्या परिस्थितीमध्ये) या लोकांना करोनासदृश दुसऱ्या कुठल्या विषाणूचं इन्फेक्शन पूर्वी कधी तरी होऊन गेलं होतं, म्हणून त्यांच्या शरीरात त्या अँटीबॉडी आहेत. आणि दुसरी शक्यता अगदी उघड आहे की त्या लोकांना सध्या ज्याची साथ आहे त्याच कोरोना विषाणूचं इन्फेक्शन होऊन गेलं आहे आणि हे लोक पूर्णपणे asymptomatic होते. आणि यामुळे यांच्या शरीरात या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. आता या दोन्हीपैकी कुठली आणि किती शक्यता आहे हे आपल्याला सांगता येत नाही. दुसरी शक्यता जास्त गृहीत धरली जाते आणि त्याच्याच आधारावर लोकांनी निष्कर्ष काढले आहेत. परंतु पहिली शक्यताही पडताळून पाहायला पाहिजे म्हणून आमची चर्चा झाली होती.

नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजी मध्ये अतिशय जुन्या जुन्या सिराचं संकलन आहे. भरपूर सिरो सर्व्हे करून त्यांनी सिरमचे नमुने गोळा करून ठेवलेले आहेत. या नमुन्यामध्ये जर ह्या अँटीबॉडी आहेत का ते बघितलं तर पहिली शक्यता पडताळून बघणं शक्य होईल. पन्नास वर्षांपूर्वी गोळा केलेल्या नमुन्यांमध्येही जर ह्या अँटीबॉडी सापडल्या तर हे सहज कळेल की आपल्या इथल्या लोकांना कुठल्या तरी करोनासदृश विषाणूचं इन्फेक्शन पूर्वी होऊन गेलेलं आहे (आणि या ५० टक्के, पूर्णपणे सध्याच्या काळात आलेल्या साथीच्या विषाणूच्या विरोधात तयार झालेल्या अँटीबॉडी नाहीत)

दुसरी शक्यता की या लोकांना asymptomatic इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे. ही शक्यता नाकारता येत नाही, पण त्याच्यातला पुढचा भाग असा, जो त्या सिरो सर्व्हेच्या रिपोर्टमध्येच नोंदवला गेला आहे की अँटीबॉडी असणं म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा इन्फेक्शन होणार नाहीच असं सांगता येणं अवघड आहे. यामुळे सिरो सर्व्हेचे रिपोर्ट्स हे पुरेश्या काळजीपूर्वक पद्धतीने बघावेत (त्यात दिलेल्या caveats सकट बघावेत)

प्रश्न : म्हणजे या सर्व्हे रिपोर्टमध्ये अँटीबॉडीज रीऍक्टिव्ह आहेत का न्यूट्रलायझिंग आहेत हे पुरेसं स्पष्ट नाहीये का?

डॉ. शौचे : बरोबर. त्यामुळे त्या व्यक्तीला (कोरोना) विषाणूचं परत इन्फेक्शन होईल किंवा कसं याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही. अर्थात सिरो सर्व्हेच्या रिपोर्टमध्ये त्यांनी तसं स्पष्ट म्हणलं आहे : अँटिबॉडी असल्या तरी याचा अर्थ (कोरोना) विषाणूचं इन्फेक्शन परत होऊ शकतं किंवा कसं हे सांगता येत नाही.

प्रश्न : विविध पृष्ठभागांवरती विषाणू किती काळ राहतो याविषयी आपण काही बोलला होतात, त्याबद्दल एक विचारायचं आहे. जेव्हा कोरोना महासाथीची सुरुवात झाली तेव्हा असं दिसून आलं की सॅनिटायझर्सचा प्रचंड वापर, हाताला लावायची औषधं आणि अल्ट्रा-व्हायोलेट प्रकाशाचा वापर हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. या गोष्टींनी किती फरक पडतो आणि या गोष्टींचा वापर कितपत योग्य आहे? आणि याचा एकंदरीत दूरगामी परिणाम काय होईल? कारण इतका प्रचंड वापर आत्तापर्यंत कधी केला गेलेला नव्हता. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? इज इट इफेक्टिव्ह?

डॉ. शौचे : मी आता इथे माझं वैयक्तिक मत सांगतो. ही महासाथ आली त्या वेळेला हा विषाणू कुठल्या पृष्ठभागावर किती काळ राहतो याची आपल्याला पूर्ण माहिती नव्हती. सुरुवातीला एक अभ्यास झाला त्यातून काही माहिती पुढे आली. मला आता त्यातले सगळे निष्कर्ष अगदी तपशीलवार आठवत नाहीत, म्हणजे कुठल्या पृष्ठभागावर विषाणू किती तास जिवंत राहू शकतो वगैरे. परंतु त्या अभ्यासामुळे एक अवाजवी भीती सगळीकडे पसरली आणि लोकांनी बाजारातून आणलेल्या भाज्या उकळत्या पाण्यातून वापरणं किंवा अगदी अतिशयोक्तीचं बोलायचं तर मीठसुद्धा पाण्यात धुवून मग वापरायचं इतक्यापर्यंत हे गेलं होतं. माझ्या मते हे सगळं अतिशय अतिरेकी होतं. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण जेव्हा तो अभ्यास केला गेला होता तेव्हा विषाणूंची एक डेन्सिटी वापरली गेली होती. एका विशिष्ट डेन्सिटीत विषाणू एखाद्या पृष्ठभागावर पसरवून मग विषाणू किती काळ जिवंत राहतो हे बघितलं गेलं होतं. हेच मुळात unrealistic होतं. ती संख्या unrealistic होती. प्रत्यक्ष व्यवहारात इतक्या जास्त संख्येने (जीवाणू किंवा) विषाणू एखाद्या पृष्ठभागावर सापडत नाहीत. म्हणजे असं बघा : एखाद्या माणसाने मुद्दाम एखाद्या पृष्ठभागावर थुंकून किंवा खोकून काही विषाणू पसरवले असतील तरच एवढी संख्या सापडू शकते. ती सुद्धा अशा परिस्थितीत की ज्यावेळी त्या पृष्ठभागावर इतर काहीही नसताना हे केलं तरच शक्य. नैसर्गिक परिस्थितीत तुम्ही हे जर केलंत तर म्हणजे समजा एक टेबल आहे, त्यावर कुणी थुंकला तर तिथे फक्त हा विषाणू नसतो, तिथे अनेक प्रकारचं ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक मॅटर असतं, काही (सूक्ष्म) केमिकल्स वगैरे असतात. त्याचा परिणाम कसा होईल याचा या अभ्यासांत विचार नसतो. हे अभ्यास लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये केलेले असतात आणि प्रत्यक्ष व्यवहारातल्या कंडिशन्समध्ये ते केलेले नसतात. त्यामुळे त्याला काही मर्यादा असतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे की काही वेळा विषाणू त्या अभ्यासात उल्लेख केलेल्या काळापेक्षा कदाचित जास्त काळही जिवंत राहू शकतो किंवा काही वेळा कमी वेळही जिवंत राहू शकतो.

आणि दुसरं म्हणजे सॅनिटायझर्स या नावाने जे काही बाजारात आलं त्याची परिणामकारकता किती आहे याचा काहीही अभ्यास उपलब्ध नाही. म्हणजे लोकांनी काय वाट्टेल त्या वस्तू, म्हणजे हर्बल सॅनिटायझर्स वगैरे म्हणून जे बाजारात आणलं, किंवा डी आयोनायझर्स – यांचा खरोखरच विषाणूंवर किती परिणाम होतो, म्हणजे अगदी कोरोना नाही पण त्याच्याशी संबंधित इतर कुठलाही विषाणू किती मारला जातो? ९० टक्के का ९९ टक्के? आणि किती काळाने मारला जातो? या विषयीचा कुठलाही अभ्यास प्रकाशात आलेला नाही. त्यामुळे यात अनेक संशयास्पद प्रॉडक्टस बाजारात आले. अक्षरशः हजारो दावे केले गेले की त्यातल्या प्रत्येक दाव्याचं नाव घेऊन, हा खरा, हा खोटा असं सांगणं अशक्य आहे. शेवटी आपला कॉमन सेन्स वापरूनच या बाबतीत पुढे जायला पाहिजे. गरम पाणी वगैरेचा जो अतिरेकी प्रचार गेला त्याबद्दल बोलायचं झालं, तर एकदा विषाणूने तुमच्या घशातल्या पेशींमध्ये आपलं बस्तान बसवलं तर गरमच काय पण उकळतं पाणी जरी प्यायलं तरी त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आणि विषाणू नष्ट करायचा असेल तर ज्या तापमानाचं आणि जितक्या प्रमाणात पाणी तुम्हाला प्यायला लागेल त्यानी आधी तुमच्या घशाची आतली त्वचा जळून, सोलवटून निघेल. हे आपल्याला नकोय ना? आपण कुठेतरी तारतम्य आणि कॉमन सेन्स ठेवून या सगळ्या उपचारांचा विचार करायला पाहिजे.

प्रश्न : माझा एक याच्याशी संबंधित प्रश्न आहे. न्यू झीलंडमध्ये आता जी सेकंड वेव्ह आली आहे त्याच्या बद्दल लोकांचा विचार चालू आहे की ही कुठून आली असेल, कारण त्यांच्याकडे काही महिने संसर्ग नव्हता. तर त्यात असं म्हटलं जातंय की कोल्ड स्टोरेजमधून कदाचित तो आला असू शकेल. तर यात कितपत तथ्य वाटतं?

डॉ. शौचे : बरोबर आहे. न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये काही ठिकाणी त्यांनी हे सगळं (संसर्ग आटोक्यात आणणं) अतिशय पद्धतशीरपणे केलं. न्यू झीलंडमध्ये इन्फेक्शन्स फार कमी झाली होती. तंत्रज्ञान कसं वापरता येतं त्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी त्यांच्याकडच्या सगळ्या इन्फेक्शन्सचे नमुने घेऊन त्याचं जेनेटिक मॅपिंग करून ठेवलं आहे. त्यामुळे ते आता या नवीन आऊटब्रेकमधील नमुने घेऊन त्याचा जीनोम सिक्वेन्स काढून ते बघू शकतात. जर या नवीन इन्फेक्शन्समधील विषाणूचा सिक्वेन्स हा आधीच्याशी १०० टक्के जुळला तर त्याचा अर्थ हे ‘री-इन्फेक्शन’ झालेलं आहे (पूर्वी अमेरिकेत हे घडलेलं आहे). जर जीनोम सिक्वेन्स जुळला नाही तर त्याचा अर्थ हे इन्फेक्शन बाहेरून आलं आहे असा होईल. अमेरिकेत एका ठिकाणी असाच जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करून हे दाखवता आलं की ते इन्फेक्शन बाहेरून आलेलं होतं. दुसऱ्या एका ठिकाणी असाच अभ्यास करून हे दाखवून देता आलं की इन्फेक्शन हे स्थानिक पातळीवरचं आहे आणि इथेच ते पसरत आहे.

प्रश्न : जेव्हा तुम्ही स्पॅनिश फ्लूबद्दल बोलत होतात तेव्हा एक प्रश्न पडला होता. सध्या जागतिकीकरण झालं आहे असं म्हणतात. सप्लाय चेन्स ही मोठ्या प्रमाणावर जागतिक झाल्या आहेत, माणसं ही सारखी इकडून तिकडे जात येत असतात आणि अर्थात वस्तूही. म्हणजे सध्या लॉकडाऊनमुळे काही निर्बंध आहेत त्याच्यामुळे ते थोडं थांबलं आहे, पण आता हे परत चालू होईल तेव्हा मग (युद्धातून सैनिक परत आले तेव्हा झालं तसं) सेकंड वेव्ह येईल असं म्हणतात, यात कितपत तथ्य वाटतं?

डॉ. शौचे : मी मगाशी म्हटलं तसं, फक्त सेकंडच नाही तर थर्ड, फोर्थ लाटा येणार आहेतच. कुठल्याही संसर्गजन्य रोगाचं हे लक्षण आहेच. आपण जरी आपला स्वतःचा इतिहास बघितला किंवा आपल्या इथे आलेल्या प्लेगचा इतिहास बघितला तर लक्षात येईल की प्लेगच्या लाटा किमान तीन वर्षं येत राहिल्या होत्या आणि मग तो एंडेमिक झाला. दुसरी तिसरी चौथी लाट वगैरे येणार आहेच, परंतु माझं म्हणणं असं आहे की याबद्दल सध्या जी एक भीती पसरवली जात आहे, की हिवाळ्यात दुसरी लाट येईल आणि ती जास्त तीव्र असेल, या भीती पसरवण्याला काहीही अर्थ नाही. म्हणजे, हिवाळ्यातली लाट अति तीव्र असेल आणि आत्ताच्या दसपट मृत्यू तेव्हा घडतील वगैरे उगाच भीती पसरवण्याला काहीही शास्त्रीय आधार नाही आणि ती पसरवली जाऊ नये. आत्तापर्यंतचा संसर्गजन्य रोगांचा इतिहास बघितला तर हे लक्षात येतं की लाटा येणार आहेत आणि दोन पाच वर्षांनी हा विषाणू एंडेमिक बनणार आहे. मग तेव्हा कोरोना कुणाला आठवणार पण नाही.

प्रश्न : पण मग काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूचं तसंच झालं होतं का? म्हणजे अर्थातच ते कोरोनाइतकं मोठं झालं नाही पण त्या वेळेला थोडा काळ का होईना पुण्यात एक असं दहशतीचं वातावरण आलेलं होतं. तर स्वाईन फ्लू आता एंडेमिक झाला असं म्हणावं का?

डॉ. शौचे : हो, स्वाईन फ्लू आता एंडेमिक झालाच आहे. म्हणजे पुण्यातली सुरुवातीची केस जर घ्यायची झाली, तर एक व्यक्ती भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती. त्या औषधोपचाराला अजिबात प्रतिसाद देत नव्हत्या. तेव्हा डॉक्टरांना पहिला कयास स्वाईन फ्लूचा होता, म्हणून तपासणाऱ्या डॉक्टरनी त्यांचा नमुना NIVला पाठवला आणि आश्चर्याचा भाग म्हणजे ते कोरोनाचं इन्फेक्शन निघालं, स्वाईन फ्लूचं नाही. पुण्यात काय किंवा इतरही ठिकाणी अजूनही स्वाईन फ्लूच्या तुरळक केसेस येत असतातच. आता स्वाईन फ्लू लोकांच्या विस्मरणात गेल्यामुळे सध्या एखादी केस जरी आली तरी कुणी वर्तमानपत्रात त्याची अशी बातमी देत नाही की पुण्यात स्वाईन फ्लूचे चार रोगी सापडले, वगैरे. आता बातमी होत नाही कारण त्याची दहशत आता गेलेली आहे.

प्रश्न : म्हणजे याचा अर्थ असा का की पुण्यात दरवर्षी अजूनही स्वाईन फ्लूचे रोगी सापडतात?

डॉ. शौचे : हो.

प्रश्न : NIV किंवा अशा कुठल्या संस्थेकडे त्याची आकडेवारी असते का?

डॉ. शौचे : जेव्हा NIVकडे त्याचा नमुना टेस्टिंग करण्याकरता जातो तेव्हा त्याचा रिपोर्ट त्यांच्याकडेही राहतो. अजून एक गोष्ट म्हणजे सॅम्पल टेस्टिंगला का जातं? एखाद्याला जर स्वाईन फ्लू झाला, आणि तो त्यातून बरा झाला तर त्याचं सॅम्पल काही टेस्टिंगला वगैरे कुणी पाठवत नाही. आपल्याकडे अशी व्यवस्था आजच्या घडीला नाहीये की प्रत्येक वेगळ्या सॅम्पलचं टेस्टिंग आपण करतो. आता समजा तुम्हाला एखादं इन्फेक्शन झालं, म्हणजे अगदी जखमेतलं इन्फेक्शन असू देत किंवा अगदी न्यूमोनिया असू देत. डॉक्टर तुम्हाला त्याला लागू पडणारे अँटिबायोटिक देतात, तुम्ही बरे होता आणि मग तुम्हाला कशामुळे इन्फेक्शन झालंय, कसलं इन्फेक्शन झालंय हे तुम्ही बघत नाही. बरे झालो, विषय संपला असं आहे. इन्फेक्शन्स झाल्यावर ते कुठल्या जीवाणूमुळे झालं आहे आणि तो जीवाणू कुठल्या अँटिबायोटिकला किती रेझिस्टंट आहे हे बघणं हे आपल्याकडे होत नाही.

हे सगळं केव्हा होतं, जेव्हा अँटिबायोटिक पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, पेशंट बरा होत नाही तेव्हा मग ब्लड कल्चर, अँटिबायोटिक रेझिस्टन्स पॅटर्न बघतात. तसंच या केसमध्ये असतं की एकदा पेशंट बरा झाला की मग कुणी स्वाईन फ्लू झालाय का कोरोना झालाय का सार्स झालाय बघायला पण जात नाही. जेव्हा पेशन्ट / रोग प्रतिसाद देत नाही, तेव्हा टेस्ट होते. त्यामुळे स्वाईन फ्लू किंवा सार्सच्या बऱ्याच केसेस टेस्ट न होताच बऱ्या होऊन जात असतील सध्या. जेव्हा बऱ्या होत नाहीत तेव्हा टेस्टिंग होतं. हा सगळ्यात मोठा इश्यू आहे यातला.

प्रश्न : आत्ता अनेक ठिकाणी असं दिसतंय की काही लोकांना काही लक्षणं दिसतात, त्यांच्या संपर्कात कुणी पॉझिटिव्ह पेशन्ट येऊन गेला असेल तर. पण डॉक्टर तर असं सांगत आहेत की जोपर्यंत तुम्हाला ट्रीटमेंटची भासत नाहीये तोपर्यंत तुम्ही जर शक्य असेल तर स्वतःच्या घरी आयसोलेट व्हायचा प्रयत्न करा. आणि अगदी टेस्ट करायलासुद्धा जाऊ नका. नक्की रोग किती पसरलाय हे कळायला यामुळे अडचण होत असावी. तर डॉक्टर असं का सांगत असावेत?

डॉ. शौचे : खरं तर माहीत नाही. टेस्टिंगला जाऊ नका असं खरं तर सांगू नये. पण अर्थात हे दिसणाऱ्या लक्षणावर अवलंबून पण असू शकतं. कुठल्या परिस्थितीत टेस्टिंगला जावे याच्याही काही गाईडलाईन्स आहेत. त्या रिव्हाईज झाल्या आहेत का हे मला माहीत नाही. पूर्वीच्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला किमान दोन इंडीकेटीव्ह लक्षणं असतील तरच टेस्टिंगला जायला सांगत होते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही प्रायव्हेट लॅबमध्ये जाऊन टेस्ट करून घेऊ शकताच. आज आता त्या गाईडलाईन्स बदलल्या आहेत. माझ्या माहितीतल्या अनेक लोकांना अतिशय कमी लक्षणं असूनही ते कोरोना पॉझिटिव्ह होते, म्हणजे फक्त नाक वाहणं, काहींना फक्त लूज मोशन, काही केसमध्ये फक्त सायनस ब्लॉक होणं, आणि अजिबात ताप नाही, आणि ही अशी लक्षणं केवळ दोन तीन दिवस आल्यानंतर रोगी त्रासमुक्त झाला होता. बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यावर असं लक्षात येतंय की बऱ्याच लोकांना अशी माईल्ड लक्षणं येऊन इन्फेक्शन निघून जात आहे. काही लोकांमध्ये इतकी लक्षणं तरी दिसतात. काही लोकांमध्ये लक्षणं दिसतही नाहीत.

डॉ जोशी : डॉक्टर असं का सांगत असावेत याचं दुसरं एक कारणही आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अगदी प्रायव्हेट लॅब्सनासुद्धा हे सगळं हॅन्डल करणं अवघड जातंय. आता माझी गोष्ट सांगतो. माझ्या लॅबमध्ये टेस्टिंगच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, सर्व स्टाफ पूर्णपणे ट्रेन झाला आहे परंतु गेल्या पूर्ण आठवडाभर आमच्याकडे टेस्ट किट्सच नाहीत. म्हणून आम्ही सगळी तयारी करूनही काहीही करू शकत नाही. म्हणून एखाद्या डॉक्टरने माझ्याकडे तपासणीला रोगी जरी पाठवला तरी मला त्याला परत पाठविण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये.

प्रश्न : पुढचा प्रश्न हा अँटीबॅक्टेरीअल आणि अँटीव्हायरल औषधांबद्दल आहे. पूर्वी आम्हाला शाळेत असं शिकवलं जायचं की अँटिबायोटिक्स आल्यामुळे फार मोठी क्रांती झाली. जीवाणूंमुळे होणारी इन्फेक्शन्स त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कंट्रोल करता आली वगैरे वगैरे. आणि तसं अँटीव्हायरल काही उपलब्ध नाही. नंतर मात्र असं सांगितलं जायला लागलं की HIV असेल किंवा स्वाईन फ्लू असेल, त्यासाठी अँटीव्हायरल ड्रग म्हणून काहीतरी असतं. तर यात नक्की फरक काय आहे? म्हणजे ही अँटिबायोटिक्सइतकी परिणामकारक नसतात का? की काय असतं?

डॉ. शौचे : उत्तम प्रश्न आहे. आधी प्रश्नाच्या पहिल्या भागाबद्दल सांगतो. सध्या अँटिबायोटिक (प्रतिजैविके) यांच्याकडे जरा विचित्र दृष्टीने बघितलं जातं. म्हणजे त्यात काही वाईट आहे, किंवा तो शत्रू आहे असल्या विचित्र पद्धतीने. हे अशा दृष्टीने बघण्याचं काहीही कारण नाही.

अँटिबायोटिक्समुळे आपल्या आयुष्यात किती फरक पडला आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. अँटिबायोटिक्स आल्यामुळे आज आपलं जीवनमान प्रचंड बदललं आहे. साधं एक लक्षात घ्या, अँटिबायोटिक्स जर नसती तर आज सहजतेने आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शस्त्रक्रिया होऊ शकल्या नसत्या. म्हणजे अगदी साधं मोतीबिंदूचं ऑपेरेशन असू देत किंवा अत्यंत गुंतागुंतीची मेंदूवर केली जाणारी शस्त्रक्रिया असू देत – अँटिबायोटिक्स उपलब्ध नसती तर या शस्त्रक्रिया (आज ज्या सहजतेने होतात) तशा शक्यच झाल्या नसत्या. कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया, ज्यात काही ‘कापाकापी’ करायला लागते, त्यात जीवाणू इन्फेक्शन होऊ नये म्हणून अँटिबायोटिक द्यावंच लागतं. यामुळे अँटिबायोटिक्सचा शोध हा ‘मिरॅकल’ किंवा क्रांतिकारीच मानला जावा. अँटिबायोटीक्सच्या शोधामुळे वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीत आमूलाग्र बदल झाले याबद्दल अजिबात शंका नाही. गेल्या काही दशकांमधे अँटिबायोटिक्सचा गैरवापर झाल्यामुळे अँटिबायोटिक रेझिस्टन्सचा प्रश्न उभा राहिलेला आहे.

आता प्रश्नाच्या दुसऱ्या भागाबद्दल : विषाणूंच्या बाबतीत हे का सहजतेने उपलब्ध नाही याचं मुख्य कारण म्हणजे जीवाणू आणि विषाणू यांच्या जैवशास्त्रीय रचनेतला फरक. जीवाणूंची लाईफ सायकल संपूर्णपणे वेगळी असते. जीवाणू स्वतंत्रपणे जगू शकतात. स्वतःचं पुनरुत्पादन, स्वतःचं अन्न मिळवणं, त्याचं पचन करून स्वतःची वाढ करणं इत्यादी सर्व क्रिया ते स्वतंत्रपणे करू शकतात. पण विषाणू जो असतो तो स्वतंत्रपणे काहीही करू शकत नाही. त्याच्या वाढीसाठी तो पूर्णपणे होस्टवर अवलंबून असतो, जो काही त्याचा होस्ट असेल त्याच्यावर – वनस्पती, बकरी, माणूस, जो कोण असेल त्यावर. विषाणू आपल्या होस्टच्या पेशींवर हल्ला करतो, पेशींच्या आतमध्ये जातो आणि त्या पेशींच्या यंत्रणेवर कब्जा करून तो स्वतःची वाढ करतो. तो स्वतःहून होस्ट नसेल तर काहीही करू शकत नाही. त्यामुळे असं औषध शोधून काढणं, जे त्याच्या होस्टवर काहीही वाईट परिणाम न करता त्या विषाणूची वाढ थांबवेल हे फार अवघड काम. यामुळेच अँटिबायोटिक्सएवढी अँटीव्हायरल् औषधे सहज उपलब्ध नाहीत. अजून म्हणजे जैविक उत्क्रांतीमधील भाग बघायला गेलं तर अँटिबायोटिक्स आली कुठून, ती आली निसर्गातून. निसर्गात ती कशी आली? तर एका जीवाणूने दुसऱ्या जीवाणूला मारायला अँटिबायोटिक तयार केलं. ते त्या जीवाणूने का तयार केलं? तर स्पर्धा कमी करण्यासाठी त्याने ते केलं. आता हेच, या जीवाणूंची अँटिबायोटिक तयार करण्याची क्षमता आपण आपल्या फायद्यासाठी इतर जीवाणूंना मारण्यासाठी वापरतो. विषाणूंमध्ये हे होण्याची शक्यता नाही. माणसात आजार निर्माण करणारे विषाणू, निसर्गात एकमेकांशी compete करायला कुठे जाणार? त्यामुळे निसर्गातून अशा प्रकारची अँटीव्हायरल्स तयार होत नाहीत. आपल्याला ती शोधून, केमिकल सिंथेसिस करून प्रयोगशाळेत तयार करायला लागतात. आणि हा exercise खूप गुंतागुंतीचा आहे. या कारणामुळे जीवाणूंविरोधी प्रतिजैविकांप्रमाणे विषाणू विरोधी औषधे फारशी सहज तयार झाली नाहीयेत.

प्रश्न : आणि ती तेवढी परिणामकारकही नाहीत का?

डॉ. शौचे : काहीकाही आहेत ना परिणामकारक. उदाहरणार्थ स्वाईन फ्लूचं बघायला गेलो, तर टॅमीफ्लू हे परिणामकारक ठरलं. स्वाईन फ्लू अतिशय परिणामकारक पद्धतीने कंट्रोल झाला याचं एक मुख्य कारण हे औषध होतं.आणि इतरही काही विषाणूविरोधी औषधं आहेत ती परिणामकारक आहेत. HIVच्या बाबतीतही आज त्याचा प्रसार कमी होत आहे याचं एक कारण त्याविरोधी औषधं हे आहे.

प्रश्न : प्राथमिक जीवशास्त्राच्या अभ्यासात आपल्याला दोनच वर्ग समजले होते. सजीव आणि निर्जीव. पण जसजशी विषाणूंबद्दल माहिती सामान्य लोकांना होत जात आहे, आणि जसजसं हे होतं आहे तसतसं मला या विषाणू प्रकाराबद्दल एक गूढ वाटायला लागलं आहे, की ही एक निर्जीव असणारी वस्तू एकदम सजीव होते काय आणि इतका धुमाकूळ घालते काय... तर हे नक्की काय आहे?

डॉ. शौचे : मान्य आहे. हा प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे. विषाणूला जिवंत मानावे की निर्जीव मानावे यावरही खूप चर्चा केली जाते. विषाणू कसे उत्क्रांत झाले असावेत, म्हणजे सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीचा ४०० कोटी वर्षांचा जो इतिहास आहे यात विषाणू इतक्या गुंतागुंतीच्या पद्धतीने कसे उत्क्रांत झाले असतील आणि ते सजीव की निर्जीव हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. याबद्दल विषाणूतज्ञांमध्येही एकमत नाही. आता याहूनही एक गुंतागुंतीची गंमत सांगतो. विषाणूला किमान इतर सर्व सजीवांच्या शरीरात असतं तसं DNA /RNA हे जेनेटिक मटेरियल तरी असतं आणि त्याबरोबर प्रथिन पण असतं. पण निसर्गात अजून एक कॅटेगरी आहे. त्याला प्रियॉन्स म्हणतात. हे फक्त एक प्रथिन असतं. त्याबरोबर जेनेटिक मटेरीअल नाही. त्याच्यामुळेही रोग होतात. काहीतरी पद्धतीने प्रियॉन्सचं पुनरुत्पादन पण होतं. हे सगळं कसं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाला अजून सापडलेलं नाहीये. हे सजीव की निर्जीव, ते निसर्गात कसे उत्क्रांत झाले असावेत हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. मला माहीत नाही पण Nature is amazing एवढेच म्हणू शकतो आत्ता. बऱ्याच अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला कदाचित सापडणारही नाहीत.

प्रश्न : व्हायरसेसच्या बाबतीत ancestors हा शब्द ऐकला. काय आहे हे? याची काय माहिती देऊ शकाल?

डॉ. शौचे : इथे कुठल्या अर्थाने आपण म्हणत आहात त्याची मला कल्पना नाही, परंतु उत्क्रांतीच्या संदर्भात या शब्दाला महत्व आहे. आजची जी सजीव सृष्टी आहे, ती कशी उत्क्रांत झाली असावी, त्याचा जो common ancestor आहे त्या संबंधी हा शब्द वापरला जातो. आत्ताची जी गुंतागुंतीची उत्क्रांत सजीव सृष्टी आहे त्याचा पूर्वज आहे जीवाणू. म्हणजे साधारणपणे ४०० कोटी वर्षांपूर्वी तयार झालेला एकपेशीय prokaryotic जीवाणू पृथ्वीवर तयार झाला किंवा आला. तो सगळ्या सजीव सृष्टीचा, आपल्या सगळ्यांचा ज्ञात पूर्वज. आता यात विषाणूंना कुठे जागा आहे ते अजून माहीत नाही.

---

NCMRविषयी माहिती.

NCMR

NCMRची स्थापना २००७ साली झाली. पेनिसिलीन फॅक्टरीत झालेल्या हामायसिनच्या शोधानंतर आजही संपूर्णपणे भारतात शोधलं गेलेलं असं कोणतंही प्रतिजैविक नाही. तर जीवशास्त्रीय रिसोर्सेसमधून कुठलं तरी एक औषध भारतात शोधलं जावं अशी कल्पना संस्थेच्या स्थापनेमागे होती. आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, एक्सपर्टीज आहे, तर मग आपल्याकडे हे होऊ शकतं. आणि आजकालच्या काळात हा आकड्यांचा खेळ असतो – म्हणजे तुम्ही औषधासाठी खूप जास्त संख्येनं स्क्रीनिंग (म्हणजे निसर्गात आढळणारे जीवाणू अँटिबायोटिक तयार करतात का, ह्याचा शोध घेणे) कराल, तर त्यात यश मिळेल. त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीनी आपल्याकडचं एक्सपर्टीज पाहून चार फोकस एरिया ठरवले - म्हणजे मधुमेहविरोधी, इन्फ्लमेशनविरोधी, कॅन्सरविरोधी आणि इन्फेक्शनविरोधी. या चार एरियामध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग करण्याचं एक्सपर्टीज निकोलस पिरामलकडे होतं आणि मग मोठ्या संख्येने जीवाणू कोण पुरवू शकतो? तर या ९ संस्था निघाल्या आणि त्यांचं जाळं तयार झालं. त्यांनी तीन वर्षांत सुमारे दोन लाख चाळीस हजार जीवाणू निकोलस पिरामलला तेव्हा पुरवले आणि मग पिरामलनी या चार एरियामध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग केलं आणि काही लीड्स मिळवले. तेव्हा अशी कल्पना आली, की हे सगळे जीवाणू ह्या प्रकल्पापुरते वापरून नंतर ते फेकून द्यायचे असं न करता ते सगळे एका ठिकाणी एकत्र केले जावेत. पुढे जर कोणाला काहीही उपयोग करायचा असेल तर त्यांना ते उपलब्ध असावेत, म्हणून त्याच्यातून ह्या संस्थेची स्थापना झाली. २०१७पर्यंत तिचं नाव एमसीसी होतं २०१७ साली ते बदलून NCMR झालं. त्यात देशाच्या विविध भागातल्या संस्थांचं योगदान आहे – म्हणजे नागपूरची नीरी, दिल्ली युनिव्हर्सिटी, IGIB, ओडीसामधून भुवनेश्वरची ILS, चेन्नईची MSSRF, अमृतसरची गुरु नानकदेव युनिव्हर्सिटी, इंफाळची IBSD, गोव्याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, अशा सगळ्यांनी हे २,४०,००० आयसोलेट्स चं योगदान दिलेलं आहे. त्यातून NCMR निर्माण झाली. हे NCMRकडचं दोन-अडीच लाख नमुन्यांचं संकलन ह्या सगळ्या संस्थांच्या सहभागातून तयार झालेलं आहे. गेली दहा वर्षं हे केंद्र सुरू आहे. दरम्यान वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनकडून संस्थेला इंटरनॅशनल डिपॉझिटरी ऑथॉरिटी म्हणून मान्यता मिळाली. जेव्हा कुठल्याही सूक्ष्म जीवशास्त्रीय गोष्टीचं पेटंट घेतलं जातं, म्हणजे जेव्हा उपयुक्त असलेला आणि ज्याचं इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन होऊ शकेल अशी क्षमता असलेला एखादा नवीन जीवाणू शोधला जातो, तेव्हा आंतरराष्ट्रीय पेटंट कायद्यानुसार तो एका कल्चर कलेक्शन / इंटरनॅशनल डिपॉझिटरी ऑथॉरिटीकडे जमा करावा लागतो. (हे असं का हा वेगळा विषय आहे, ते कुणाला खास रस असेल तर वेगळं सांगता येईल) आणि मग जे कोण ते पेटंट / हक्क विकत घेईल त्याला ते या डिपॉझिटरी पेटंट कायद्यानुसार दिलं जातं. World Federation of culture collection ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचीही NCMR सदस्य आहे. भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने (MOEF) २००२च्या बायोडायव्हर्सिटी कायद्यानुसार काही जैवसंपदा / कल्चर्स साठवण्यासाठी designated depository म्हणून NCMRला मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त दोन वर्षांपूर्वी NCMRला एक नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. देशभर, किंवा खरं तर जगभर अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स दिसून येतोय. म्हणजे कुठल्याही प्रतिजैविकाला दाद न देणारी इन्फेक्शन्स, मग ती जखमांमधील असतील किंवा जखमा झाल्यानंतर होणारी असतील किंवा इतर काही, म्हणजे उदाहरणार्थ असा TB, ज्याच्यामध्ये आत्ता उपलब्ध असणारी कुठलीही प्रतिजैविकं निकामी ठरतात. ही समस्या खूप मोठी झालेली आहे. त्यावर संशोधन करायला, त्याच्याकरता डायग्नोस्टिक टेस्ट तयार करायला, आपल्या देशात सापडणारे असा रेझिस्टन्स असलेले जीवाणू गोळा केले जावेत आणि मग ते पुढच्या अभ्यासासाठी, म्हणजे नवीन औषधं, डायग्नोस्टिक टेस्ट तयार करायला उपलब्ध असावेत म्हणून अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स असलेल्या जीवाणूंची नॅशनल रिपॉझिटरी असावी अशी संकल्पना आली, आणि ती जबाबदारीही NCMRला देण्यात आली आहे. हे काम आम्ही गेली दोन वर्षं करत आहोत. देशभरातली जी विविध हॉस्पिटल्सची जाळी आहेत त्यांच्याशी आम्ही संलग्न आहोत. त्यांच्याकडून आम्हाला अँटिमायक्रोबियल रेझिस्टंट जीवाणू येतात. Armed Forces Medical Servicesबरोबरही आमचा टाय अप आहे. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यांच्या जाळ्यांमध्येही आम्ही सहभागी आहोत. या सगळीकडून आमच्याकडे हे जीवाणू येत असतात.

या व्यतिरिक्त आमच्याकडे Ph D प्रोग्रॅम्स, विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण, विद्यार्थ्यांकरता व्हिजिट्स, सायन्स डे वगैरे इतर गोष्टी, तसंच देशातल्या संशोधकांना लागणाऱ्या विविध सेवा, म्हणजे जीवाणू आयडेंटिफिकेशन सेवा आम्ही देत असतो.आणि काही तांत्रिक सेवा, काही जीवाणूंचं आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन, काही इतर assays हेही आम्ही देशभरातल्या संशोधकांच्या मदतीसाठी आम्ही करत असतो.

ही थोडक्यात NCMRची माहिती.

बायोबँक

कुठल्याही विशिष्ट परिस्थितीतल्या मानवी शरीराचे वेगवेगळे अवयव आणि त्यातून निर्माण झालेले टिश्यूज यांचं एकत्रित केलेलं संकलन याला बायोबँक असं म्हणतात. ही वेगवेगळ्या आजारानुसार वेगवेगळी असते. कॅन्सर बायोबँक असेल तर वेगवेगळ्या कॅन्सरच्या टिश्यूजचे नमुने त्यात असतात. आता कोविडचं उदाहरण घ्यायचं झालं तर आज कोविडची साथ सुरू झाल्यानंतर कोविडच्याही बायोबॅंक्स देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्याच्यामधे बाधित पेशंटचे विविध नमुने, डायग्नोसिससाठी नाकातून आणि घशातून घेतलेले नमुने, पेशंटचं रक्त आणि इतर जे काही स्पेसिमेन्स असतील लघवी, विष्ठा वगैरे नमुने गोळा करून ठेवले जातात. त्याला बायोबँकिंग म्हणतात. याचे काही नियम असतात – म्हणजे रोग्याला याची पूर्ण कल्पना देऊन म्हणजे हा नमुना कशासाठी घेतला जात आहे, याचा वापर कशासाठी होणार आहे वगैरे देऊन त्याच्याकडून याची परवानगी (कन्सेंट) घेतली जाते. आणि मग नंतर जेव्हा याचं संशोधन होणार असेल तेव्हा त्याचे काय नियम असतील, कोणता नमुना द्यायचा, कोणत्या स्वरूपाच्या संशोधनाकरता द्यायचा, ते विशिष्ट संशोधन करण्यासाठी परवानगी आहे किंवा नाही हे सर्व बघून मग ते नमुने दिले जातात. उद्देश असा की एखाद्या संशोधकाला यापैकी कुठल्या विषयावर संशोधन करायचं असेल तर नमुने घेण्यापासून त्याला धावाधाव करायला लागू नये; एका ठिकाणी ते मिळावेत. आणि त्या नमुन्याची सर्व माहिती (हिस्टरी) एका ठिकाणी उपलब्ध असावी. अशी ही बायोबँकिंग मागची संकल्पना आहे. मी फक्त दोन, म्हणजे कॅन्सर आणि कोविडचा उल्लेख केला, पण इतरही रोगांच्या बाबतीत वेगवेगळ्या रोगांचे नमुने घेऊन प्रिझर्व केलेल्या अशा अनेक बायोबॅंक्स जगभर आहेत. आमच्या संशोधनाच्या दृष्टीने लागणाऱ्या विष्ठा प्रिझर्व केलेल्या अनेक फीकल बायोबॅंक्स जगात आहेत. त्याचे वेगळे उपयोग आहेत. ही झाली बायोबँकिंग संकल्पना.

Dr. Shouche's Team

ऐसी अक्षरे : डॉ. शौचे सर, आमच्यासाठी वेळ दिलात आणि प्रश्नांना न कंटाळता तपशीलवार आणि सोप्या भाषेत उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचे आभार!

(समाप्त)


मुलाखतीत सहभागी प्रश्नकर्ते : अबापट, डॉ. विनायक जोशी (पॅथॉलॉजिस्ट, सोलापूर), मनीषा कोरडे, चिंतातुर जंतू, भूषण पानसे. तांत्रिक साहाय्य : भूषण पानसे, अनुपम बर्वे

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

क्लीष्ट विषय असूनही सोप्या भाषेत सांगितल्याने बराचसा समजला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न नेमके विचारले आहेत आणि उत्तरेही समर्पक.

एक प्रश्न :
जीवाणूंमधील प्रतिजैविक प्रतिकार (Antibacterial resistance) जो प्रतिजैविकांच्या बेसुमार वापरामुळे वाढत चालला आहे, त्यावर आपली संस्था काम करत आहे ही भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

जीवशास्त्रीय रिसोर्सेसमधून कुठलं तरी एक औषध भारतात शोधलं जावं अशी कल्पना संस्थेच्या स्थापनेमागे होती. आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, एक्सपर्टीज आहे, तर मग आपल्याकडे हे होऊ शकतं. आणि आजकालच्या काळात हा आकड्यांचा खेळ असतो – म्हणजे तुम्ही औषधासाठी खूप जास्त संख्येनं स्क्रीनिंग (म्हणजे निसर्गात आढळणारे जीवाणू अँटिबायोटिक तयार करतात का, ह्याचा शोध घेणे) कराल, तर त्यात यश मिळेल.

यात आत्तापर्यंत काही प्रगती झाली आहे का? कुठले नवे प्रतिजैविक शोधले गेले आहे का? किंवा प्रतिजैविक उमेदवार (antibiotics candidate) ओळखले गेले आहे का? आपल्याकडील महासंगणकांचा उपयोग याप्रकरणी होत असणार यात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. एक गडबड झाली आहे. तुम्ही चुकून अँटी बॅक्टरीअल रेझिस्टन्स लिहिलं आहात, त्या जागी अँटी बायोटिक रेझिस्टन्स हवे
२. डॉ शौचे ज्या संस्थेचे प्रमुख आहेत तिथे या प्रकारची अनेक कामे चालतात. तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे, तो त्यांना विचारून मग ती माहिती इथे लिहिण्यात येईल.
३. महासंगणकाचा उपयोग होतो का नाही याबद्दल कल्पना नाही.
तेही विचारून सांगण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! हो, अँटीबायोटिक असेच म्हणायचे होते. गूगल ऑटोकरेक्टने सुचवलेला पर्याय चटकन स्वीकारला. नीट पाहिले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्विरुक्ती कशी काय झाली माहीत नाही. क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0