Skip to main content

फोन अ "फ्रेंड"

साधारणतः माहित नसलेल्या नंबरकडून फोन आला तर मी उचलत नाही किंवा मी मी नाहीच असं सांगून वाटेला लावते. पण आत्ता एका मित्राचा फोन येईल असं वाटत होतं म्हणून हा अनोळखी नंबरकडून आलेला फोन शिस्तीत उचलला आणि व्यवस्थित "हॅलो" म्हटलं.
समोरचा: जय श्रीक्रिष्ण
मी: (आपलं काय जातंय म्हणायला?) जय श्रीक्रिष्ण
समोरचा: (गुजराथीत काहीतरी बोलला आणि) केम छो?
मी: मजा मा
स: (गुजराथीमधे मेगाबायटी निबंध लिहीला. मला समजलं ते असं, आयुर्वेदीक आणि हर्बल औषधोपचारांसंदर्भात न्यू जर्सीमधे काहीतरी सेमिनार आहे. आपल्या गुजराथी लोकांना त्याचा फार फायदा होतो. जगप्रसिद्ध तज्ञ, डॉक्टर्स तिथे बोलणार आहेत. त्याचं आमंत्रण, जाहिरात, तिकीटविक्री इथे फोनवर सुरू आहे.)
मी: (शक्यतोवर गुजराथी हेल काढायला प्रयत्न करत) मने गुजराथी आवडतो नथी। (पुढचा सगळा संवाद हिंदी/इंग्लिशमधे झाला.) प्लीज, तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमधे बोलाल तर मला समजेल. (सात्त्विकपणाचा मला अचानक अटॅक का आला कोण जाणे!)
सः आपल्या आशियायी लोकांना डायबेटीस, बीपी अशा गोष्टींचा त्रास होतो. त्यावर आयुर्वेदीक आणि हर्बल औषधोपचारांसंदर्भात .... (तेच सगळं हिंदीतून सांगितलं, आणखी चार-आठ नावं सांगितली. नावांवरून काही गुजराथी, काही हिंदीभाषिक आणि काही इंग्लिश नावं वाटली. पण आता गुजराथीच्या जागी आशियाई लोकं म्हणत होता. पुन्हा एक जीगाबायटी साऊंडबाईट आली.)
मी: तुम्ही सगळं म्हणता हे ठीक आहे, पण मला असे काहीही विकार नाहीत.
स: काहीच नाही? आठवून पहा बघू.
मी: नाही हो, काहीही नाही. दुर्दैवाने मी अतिशय पर्फेक्टली हेल्दी आहे.
सः तुमचं नाव काय?
मी: संहिता जोशी (हे थोडं आंग्लाळलेल्या उच्चारांमधे आल्यामुळे सन्हिता जॉशी असा उच्चार आला)
सः बरं मग सन्हिता, हे अभीर जॉशी तुमचे कोण?
मी: माझा नवरा.
सः त्यांना तर डायबिटीस आहे ना.
मी: छ्या! कोणी सांगितलं तुम्हाला हे?
सः (कोणत्यातरी विमा कंपनीचं नाव घेतलं, जिच्याशी आमचा काहीही संबंध नाही) त्यांच्या डेटाबेसमधून आम्हाला हे समजलं.
मी: खोटं बोलतात ते!
स: असं कसं? अमेरिकन सरकार खोटं का बोलेल?
मी: काहीही! अमेरिकन सरकार खोटं बोलत नाही हे तुम्हाला कोणत्या उल्लूने शिकवलं?
स: लपवायचं काय त्यात? आहे डायबेटीस तर करा कबूल!!
मी: आता तुम्हाला दु:ख होऊन तुमचं बीपी वाढू नये म्हणून हवं तर मान्य करते की आम्हाला दोघांना डायबिटीस, बीपी, आणि काय काय आजार ... सगळं आहे.
सः आमच्या रेकॉर्डसाठी, तुमचं वय, उंची आणि वजन किती आहे?
मी: (आता मयत रि किडे फोनवर पण का? हरकत नाही.) जेवढं असायला हवं तेवढंच आहे.

स: हा नंबर तुमचा घरचा आहे का? (अमेरिकेत नंबरावरून मोबाईल का ल्यांडलाईन ते भारतात समजतं तसं समजत नाही.)
मी: मी का सांगू?
सः तुमच्या नवर्‍याचा मोबाईल नंबर मिळेल का?
मी: नाही.
स: का नाही?
मी: का द्यावा ते सांगा?
सः त्यांचं वय, वजन, उंची?
मी: (आता काय त्याच्यावर लाईन मारणार हा!) जेवढं असायला हवं बरोब्बर तेवढंच.
स: तुम्ही आत्ता माहिती दिली नाहीत तर मी रोज फोन करेन तुम्हाला. त्यापेक्षा आत्ताच काय तो नंबर देऊन टाका.
मी: करा रोज फोन. मला फोनवर गप्पा मारायला फार आवडतं. मला थोडीच त्याचे पैसे पडतात. करा फोन, मला चालेल. (वेडपट माणूस! मला धमकी देत होता. याला काय माहित माझी गॉसिप डबल्सची पार्टनर आहे, दुपारच्या जेवणाला फोनवर माझी एका मैत्रिणीबरोबर लंच डेट असते. याच्याबरोबर चहा प्यायचा, मला काय!)

सः बरं, मग तुमच्या कुटुंबात कोणाला डायबेटीस, बीपी ...
मी: नाही.
सः नक्की आठवून पहा.
मी: नक्की, आठवलं. नाही. (आता घरात दोनच माणसं रहातात ही काय माझी चूक आहे?)
सः मित्रमंडळात कोणाला?
मी: सगळे लोकं रोज सकाळी लवकर उठतात, व्यायाम करतात, चांगलं, ताजं, स्वच्छ अन्न खातात आणि रात्री लवकर झोपतात. कोणालाही, काहीही प्रॉब्लेम नाही. झाला तर ... (सगळे साले एक नंबर चोर आहेत. कोणी लवकर उठतं तर लवकर झोपत नाही. व्यायाम करणारा आज सकाळी, तर उद्या दुपारी धावायला जातो. सगळे साले लाईफस्टाईल विकारांना बळी पडणारेत. पण मी कशाला त्यांना त्रास देऊ? किंवा ही फुक्कटची करमणूक त्यांना कशाला हव्ये?)
सः नक्की माझा नंबर द्या.
मी: हो तर. तुम्ही एवढं चांगलं काम करताय, निश्चितच!

सः तुमचं वय, वजन आणि उंची सांगाल का?
मी: नाही.
सः तुम्ही आशियाच्या कोणत्या भागातल्या आहात?
मी: ओळखा पाहू.
स: असं कसं ओळखणार?
मी: अरेच्चा! कसं म्हणजे? बघा, मला किंचित गुजराथी समजलं आणि बोलता आलं. माझ्या हिंदी बोलण्याचाही काही एक अ‍ॅक्सेंट आहे. माझं नाव तुम्हाला माहित्ये. आणखी किती हिंट देऊ?
स: तुम्ही .... दिल्ली, हरयाणा बाजूच्या असणार.
मी: ठीक आहे. हस्तिनापूर समजा. (आता मी स्वत:ला महाभारत काळात ढकलते आहे आणि हा विनोद आहे हे या ठोंब्याला कसं समजणार!)
सः समजा म्हणजे?
मी: समजा म्हणजे समजा. मी खोटंही बोलत असेन, खरंही सांगत असेन.
सः मग तुम्ही सांगा मी कुठचा आहे ते?
मी: (च्यायला, ढगात गेलास) मी कशाला विचार करू? मला थोडीच काही फरक पडतो तुम्ही कुठलेही असलात तरी!
स: मग मला का विचारता तुम्ही कुठच्या ते ओळखायला?
मी: माहिती तुम्हाला हव्ये ना माझी? मग तुम्ही डोकं लढवा. तुम्ही विचार करा. मला अजिबात रस नाही तुम्ही कुठचे हे ओळखण्यात.
स: मग माझं वय ओळखा!
मी: पुन्हा तेच. मला काय करायचंय. तुमचं वय काही का असेना. मला काहीही, काडीमात्र फरक पडत नाही.
सः मग मला का सांगता ओळखायला?
मी: कारण तुम्हाला या भोचक चौकशा आहेत. मला नाहीयेत. मला तुमच्या वयातही काही रस नाही.

स: मग तुम्हाला कशात रस आहे?
मी: (बरा सापडला बकरा!) मला तारे बघण्यात रस आहे, मला फ्रेंच शिकायची आहे, मला चित्रपट बघायला आवडतात, मला कामू, सार्त्र आणि सिमोन दी बोव्हार वाचायचे आहेत.
सः तुम्ही तारे मोजल्येत का कधी? (मी याला माझ्याबद्दल खरं खरं सांगत्ये, याचं काहीतरी भलतंच!)
मी: मी म्हटलं, मला तारे बघायला आवडतात.
सः मी मोजले आहेत तारे!
मी: Good for you!
सः मला माहित्ये किती तारे आहेत ते!
मी: Good for you!
सः तुम्ही का नाही मोजत?
मी: आधीच लोकांनी ते काम केलेलं आहे. मी पुन्हा तेच कशाला करू?
सः सांगा पाहू किती तारे आहेत ते?
मी: एकावर अकरा शून्य एवढे तारे आपल्या दीर्घिकेत आहेत. आणि तेवढ्याच दीर्घिका आपल्या विश्वात आहेत. म्हणजे आपल्या विश्वात एकावर बावीस शून्य एवढे तारे आहेत.
स: नक्की का?
मी: माझ्याकडे खगोलशास्त्राची पदवी आहे. Too bad, I cannot show you the degree over phone.

सः पण तुम्ही त्याला बेड का म्हणत आहात?
मी: बेड? मी बेडबद्दल गप्पा तुमच्याशी कशाला मारू?
स: बेड नाही हो, बेड, बी ए डी बेड.
मी: एय्य?
सः असो. तुम्हाला सिंगरिंग आवडतं का?
मी: सिंगरींग? (अरारा, अमेरिकेत फोन मारतोय, निदान कोकाट्यांकडे शिकोणी घेऊनतरी यायचं!)
सः हो, हो. सिंगरींग.
मी: मला कल्पना नाही तुम्ही कशाबद्दल बोलता आहात याची! हा शब्द मला आत्तापर्यंत शिकवलेला नाही.
सः साधा शब्द आहे हा.
मी: बरं, बरं. तुमचं इंग्लिश मला झेपत नाही.
सः मलाही तुमचं इंग्लिश समजत नाही.
मी: हो शक्य आहे. मी भारत आणि इंग्लंडात इंग्लिश बोलायला शिकले. अमेरिकेत नाही.

स: तुमचं वय, वजन आणि उंची सांगणार आहात का नाही? (ज्या माहितीमुळे खरोखर व्यक्तीबद्दल मतं बनवावीत ती माहिती बाजूलाच, गाडी पुन्हा "asl"वरच.)
मी: का हो, डेटला नेणार आहात का मला?
सः छ्या! माझं लग्न झालंय, तुमचंही झालंय.
मी: मग? त्याचा काय संबंध?

स: मी तुमच्या दारासमोर येऊन उभा राहिलो तर?
मी: तर काय? पब्लिक प्रॉपर्टीत येऊ शकताच. मी काय करणारे?
सः मी तुमच्या दारावर आलो तर काय?
मी: दार उघडणं, न उघडणं माझ्याच हातात आहे ना!
सः तुमचा नवरा आलाय का मी आलोय हे तुम्हाला कसं समजणार?
मी: त्याच्याकडे किल्ली आहे घराची! तो येईल सरळ दार उघडून. मग मला बरं समजणार नाही कोण आलंय ते!
सः तुमच्याकडे पाहुणे येत नाहीत का?
मी: आम्ही बोलावले तर येतात.
सः मग मी आलो तर?
मी: तुम्ही 'बिन बुलाये मेहमान' असणार, मी दारच उघडणार नाही किंवा वाटेला लावेन.
स: असं वागतात का पाहुण्यांशी?
मी: फोन न करता, न बोलावता आले तर हो; असंच वागतात.

सः तुम्ही तुमच्या नवर्‍याचा फोन नंबर देणार नाहीच ना?
मी: कसं ओळखलंत!
स: पण का?
मी: माझं प्रेम आहे त्याच्यावर! उगाच का त्याचा छळवाद करू?
स: मग मी तुम्हाला रोज फोन करेन.
मी: होऽऽऽ .. करा की! मला फोनवर गप्पा मारायला फार आवडतं. तसंही या वेळेला ऑनलाईन कोणीही नसतं, ना फेसबुकावर, ना जीटॉकवर, ना स्काईपवर. मला भयंकर कंटाळा आलेला असतो दिवसाच्या या वेळेस!

सः तुमचा फेसबुक आयडी काय? आपण फेसबुकावर मैत्री करू शकतो.
मी: हं ... हे मैत्री वगैरे अतीच झालं. आपण परिचित असू शकतो.
स: ठीक आहे. तुमचा फेसबुकाचा आयडी काय?
मी: तुम्हाला माझं नाव माहित्ये. शोधा की!
सः इमेल अड्रेस?
मी: काय राव? (ढ आहे लेकाचा! फेसबुकही धड वापरता येत नसेल तर ट्यँव ट्यँव कशाला करतोय?) माझं नाव टाकून शोधता नाही येणार मला फेसबुकावर?
स: प्रोफाईल फोटो तुमचाच आहे ना?
मी: माझ्या बुटांचा आहे. (खरोखर बुटांचाच आहे, शेजारचाच फोटो.)
सः बूटांचा? पण ते फेसबुक आहे ना?
मी: Facebook काय, footbook काय same difference!
स: पण बुटांचा का टाकला?
मी: मी 'उल्टी खोपडी' आहे ना, म्हणून! (मला 'हेराफेरी'तला परेश रावलच समोर येत होता. गुजराथी+मराठी काँबिनेशन आणि वर म्याडपणा.)
सः हो पण मग डोक्याचा मागच्या बाजूने फोटो काढून टाकायचा. बुटांचा का?
मी: खरंतर मला antiparallel म्हणायचं होतं, पण हिंदीत 'उल्टी खोपडी' हा शब्दप्रयोग रूढ आहे ना म्हणून.
सः अस्सं अस्सं ...

आणि यापुढे एकदम आवाज बंद झाला, फोन ठेवण्याचा नसावा. मधेच फोन बंद झाला. या प्रगतीशील देशांत फोनसुद्धा धड चालत नाहीत. पुन्हा पाचेक मिनीटांनंतर फोन वाजला. यावेळेस डिस्प्लेवर Unknown caller असं दिसलं. आता मी मोठ्या आशेने फोन उचलला. आणि खरंच पुन्हा तोच तो गुज्जुभाई होता.

स: फोन का ठेवलास?
मी: मान्य आहे मी घरात एकटीच आहे. पण समोरून कोणी बोललेलं ऐकायला येत नाहीये तर फोन कानाशी धरून हात दुखायला लागतो थोड्या वेळाने. मग बंद केला. पण मी असं मुद्दामच केलेलं असू शकतं. (बरा सापडला पिळायला!)
सः नाही हो, फोनच असेल.
मी: तुम्हाला काय माहित? तुम्ही माझा फोन रोज वापरता का?
सः नाही, नाही. आपण आजच पहिल्यांदा बोलतोय.
मी: Tell me about it. पण माझा फोन मी रोज वापरते. आणि मला माझ्याबद्दल जास्त माहिती असणार का तुम्हाला?
सः हं, हात दुखतो तर.
मी: होय तर!
(तेवढ्यात मला किंचित ठसका लागला. एवढा वेळ बोलून घशाला कोरड पडली होती. नेमकं घशात काहीतरी अडकलं.)
सः बघा, तुम्हाला खोकला झालाय. आमच्याकडे तज्ञ डॉक्टर येणार आहेत. तुम्ही त्यांच्याकडून औषधोपचार घ्या.
मी: घशात काहीतरी अडकलं तर माझं शरीर खोकून ते बाहेर काढेल. अगदीच नाही जमलं तर मी गळा कापून ते बाहेर काढेन किंवा व्हॅक्यूम क्लीनरने बाहेर काढेन. तेवढ्यासाठी न्यूजर्सीपर्यंत यायचं म्हणजे अतीच होतं हां.
सः .... आवाज बदलला. हॅलो मॅडम.
मी: नमस्कार. तुम्ही आवाज बदलला का आख्खा माणूसच बदलला.
सः मी नूर बोलतोय. याचा मॅनेजर.
मी: बोला, बोला. काय म्हणताय? कसं काय? बायकापोरं मजेत?

.... आणि पुन्हा एकदा या प्रगतीशील देशातल्या फोनकॉलने मान टाकली. दोन मिनीटांत पुन्हा फोन वाजला तर कॉलर आयडीवर राजेश घासकडवी असं नाव दिसलं. "या मेल्या राजेशला आत्ताच फोन करायचा होता! तेवढ्यात या आयुर्वेदिकवाल्याचा फोन आला तर राजेशला वाटेला लावता येईल", असा विचार करून मी ही सगळी गोष्ट फोनवर राजेशला सांगायला लागले. Orthogonal conversation म्हणजे काय याचा नमुना त्याला फोनवरच रंगवून रंगवून सांगितला.

आता हातात झेंडूचं फूल घेऊन बसले आहे. एकेक पाकळी खुडत ... तो उद्या फोन करेल, करणार नाही, करेल, करणार नाही....

नंदन Fri, 21/09/2012 - 09:25

चर्चा रंजक आहे. पुढच्या खेपेला फोन केला की त्याला 'मोकलाया दाही दिशा' जरूर ऐकवा :)
बाकी तुम्हांलाच बरे हे सगळे नमुने भेटतात.

अशोक पाटील Fri, 21/09/2012 - 10:45

In reply to by नंदन

" 'मोकलाया दाही दिशा'....."

~ व्वा...व्वा....नंदन जी....काय धमाल याद दिलीत तुम्ही या अदिती फोन संभाषणाच्या निमित्ताने. सांप्रत जगात कुणीही कसल्याही दु:खाने पिडीत असेल, नैराश्याच्या गर्तेत असेल, दुनिया फाट्यावर मारण्याच्या आविर्भावात असेल....तर त्याला [किंवा तिलाही] 'मोकलाया दाही दिशा' ची गुटिका द्यावी.....त्यावर आलेल्या प्रतिसादांसह....विशेषतः वि.खे. यांच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण शेर्‍यासह.... ती गुटिका प्राशन केल्यानंतर नक्की ती व्यक्ती 'आनंदीआनंद गडे, जिकडेतिकडे चोहिकडे....' ची टाळ लावणार हे नक्की.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/09/2012 - 09:33

त्याने उद्या फोन केला पाहिजे. माझा अंदाज आहे की हा नूर नामक मनुष्य (होय, नूर हे नाव पुरूषाच्या आवाजात आलं) हा त्या मूळ मनुष्याचा मित्र असणार. आणि मुलगी बरी मिळाली गप्पा मारायला म्हणून आलेला असणार. उद्या पुन्हा फोन केला तर मी भाग दोनसुद्धा लिहेन. फोनवरच गप्पा मारतोय ना! छळायचं मनसोक्त.

एकदा घराचा विमा विकणार्‍याला मी डायोजिनसची गोष्ट आणि सिनीसिझम म्हणजे काय शिकवत होते. उद्या याचा फोन आला नाही तर त्या संवादातूनही भाग दोन लिहीता येईल.

बाकी तुम्हांलाच बरे हे सगळे नमुने भेटतात.

आता तू नाही का भेटलास! भेटलाच आहेस तर "मोकलाया"चं हिंदी किंवा गुजराथी भाषांतर दे पाहू.

अशोक पाटील Fri, 21/09/2012 - 10:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'नूर' हे मुस्लिम नाम मेल जेन्डरसाठीही वापरण्यात येते....पण त्याला एखादे दुसरे सफिक्स असते...उदा. 'नूरमहंमद....नूरअस्लम...नूरशाह....नूरबक्ष' इ.इ. [नूर = तेजस्वी, असा अर्थ असल्याने ते नाम सर्वत्र वापरात आहे.]
'शौकत' हे आणखीन् एक फसवे नाम....दोन्ही गटांत आढळते.

'मोकलाया' चे भाषांतर....कोणत्याही भाषेत...तूच चांगले आणि परिणामकारक करू शकशील, अदिती. तुझी प्रतिभा हल्ली किती विलक्षणरितीने फुलून येत आहे, हे वरील "संभाषण' साक्षीला आहेच. यलोस्टोन कॅल्ड्रेन सफरीचा चांगलाच परिणाम झालेला दिसतोय तुझ्या कल्पकतेवर.

तर्कतीर्थ Fri, 21/09/2012 - 09:41

आमच्याकडे लॅण्डलाईन आली तेव्हा अमुक-अमुक व्यक्ती आहे का म्हणून सारखे फोन यायचे. एक दिवस कंटाळून "त्याला" आत्ताच वैकुंठावर नेलंय असं सांगितलं तेव्हा फोन आपोआप बंद झाले.

मृत्युन्जय Fri, 21/09/2012 - 10:34

हा असा खरोखर भेटला तुला? पुढच्या वेळेस त्याला भारतातल्या कुणाचातरी नंबर दे. वाटल्यास माझाच दे :)

श्रावण मोडक Fri, 21/09/2012 - 10:37

प्रगतीशील? अमेरिका प्रगत देश आहे. इतकं अंडरप्ले करून मारायची गरज नाही. ते जाऊ दे...
एकूण हा संवाद काही यमीनं केलेला संवाद वाटला नाही. हल्ली तू चिंतू, घासू, मुसु यांच्या नादाला फार लागली आहेस. पूर्वी कशी पऱ्या, धम्या यांच्याशी जोडलेली होतीस. तेव्हाची धमाल या संवादात नाही. हा संवाद म्हणजे एकषष्ठांश गोरी यमीची पाच षष्ठांशी काळी यमी व्हावी (या शब्दाला कोणाचा आक्षेप असल्यास त्यांना फाट्यावर मारले जाईल, कारण अदिती खरोखरच गोरी आहे हे मला माहितीये) तसा झाला आहे. तेव्हा, आता बदला! (च्यायला, आता 'मोठे व्हा'सारखं हे 'आता बदला' सुरू होणार!) ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/09/2012 - 22:02

In reply to by श्रावण मोडक

कसला डोंबलाचा प्रगत देश हो श्रावण!

ल्यांडलाईनचे फोन असे थोडा वेळ गप्पा मारल्यावर आपोआप बंद होतात. प्लग्ज-पॉईंट्स असतात पण त्यांना बटणं नाहीतच. सरळ प्लग उपसून बाहेर काढायचा. आपल्याकडे पंख्यांचे रेग्युलेटर्स सहज हाताला लागतील असे असतात, बटणाच्या शेजारी रेग्युलेटर. इथे तसं नाही. इथे दोर्‍या ओढायच्या. आणि ते पण आमच्यासारख्या बुटुकबैंगणांना स्टुलावर चढावं लागतं. एकेका बटणातच दोन-तीन उपकरणंही जोडलेली असतात.
पेट्रोलपंपावर टायरमधे हवा भरायची सोय असते, पण हवेचा दाब मोजायला जे उपकरण असतं ते अ‍ॅनालॉग. अगदी सुसंस्कृत, पारंपरिक पुण्यातही डिजीटल डिस्प्ले असणारी यंत्रं आहेत.
जाऊन आल्यावर हात धुवावे आणि कसे धुवावे हे पण या लोकांना समजत नाही. विशेषतः वाणसामानाच्या दुकानात आणि हॉटेलांमधे याच्या सूचना जागोजागी चिकटवलेल्या असतात.

आता बोला, कसं म्हणायचं या देशाला प्रगत देश?

नगरीनिरंजन Fri, 21/09/2012 - 10:56

मजेदार आहे संभाषण. इतक्या 'गप्पा' मारणारी मुलगी/बाई भेटली म्हणजे दुसरा भाग नक्की यायची शक्यता आहे. :-)
असो. शीर्षकावरून डायल-अ-पिझ्झा सारखी सेवा सुरू झाली की काय तिकडे अशी एक शंका तरळून गेली.

तिरशिंगराव Fri, 21/09/2012 - 11:55

आपल्या आशियायी लोकांना डायबेटीस, बीपी अशा गोष्टींचा त्रास होतो. त्यावर आयुर्वेदीक आणि हर्बल औषधोपचारांसंदर्भात

यावरुन आठवलं. इथे 'सकाळ'मधे बालाजी तांबे यांनी 'आयुर्वेदिक फिजिओथेरपी' नांवाचा एक भंपक लेख लिहिला आहे.

http://www.esakal.com/esakal/20120914/5563401967871554114.htm

तुम्हाला त्या फोनवाल्याला आणखी पिडायचं असेल तर आमच्या शेजारच्या बंगाल्यांचे उपाय सांगा. ते घसा धरला तर चक्क पडजिभेला व्हिक्स लावतात.

आडकित्ता Fri, 21/09/2012 - 21:00

In reply to by तिरशिंगराव

ते घसा धरला तर चक्क पडजिभेला व्हिक्स लावतात.

:हहपुवा:

(पडजीभ अन खवखव वरून एक अश्लीऽऽल श्लोक आठवला. पण तो इथे नको. त्यासाठी 'खव' ही नको ;))

आतिवास Fri, 21/09/2012 - 16:00

'समोरचा' पण ब्लॉग लिहित असेल तर त्याने काय लिहिलं असेल ते वाचायला आवडेल.
विचारा त्याला पुढच्या फोनवर :-)
आणि राँग नंबरशी एवढ्या गप्पा ..म्हणजे अवघडच आहे म्हणायचं ओळख असणा-यांचं :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/09/2012 - 22:03

In reply to by आतिवास

तो लिहीणारा असणार गुजराथी! गुजराथी संस्थळं धुंडाळणे आले. त्यापेक्षा इथलेच कोणीतरी याचा दुसर्‍या बाजूने कल्पनाविलास का लिहीत नाहीत?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/09/2012 - 22:53

In reply to by रामपुरी

तुम्हालाच हो माझ्या प्रतिभेवर एवढा विश्वास आहे; नाहीतर माझे सो-कॉल्ड मित्र! येताजाता "मला फिक्शन समजत नाही, लिहीता येत नाही." असे टोमणे मारत असतात.

मी Fri, 21/09/2012 - 23:08

झकास, एका नाटक कार्यशाळेची आठवण झाली. मस्तच :)

बिपिन कार्यकर्ते Sun, 23/09/2012 - 12:20

=)) =)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/04/2014 - 19:39

In reply to by सुशेगाद

होतं कधीकधी.

गेल्या काही दिवसातली गोष्ट. फोन येतो.

समोरचा/ची - तुमच्या गाडीची वॉरंटी संपलेली आहे, असं आम्हाला रेकॉर्ड्सवरून दिसतंय.
मी - असेल बुवा.
स - तुमची गाडी व्यवस्थित चालते आहे का?
मी - मला तरी असं वाटतं.
स - याचा अर्थ 'हो' असा घ्यायचा का?
मी - मला तरी असं वाटतं.

बऱ्यापैकी मोठा पॉझ आणि फोन बंद होतो.

निदान दोन वेगवेगळ्या लोकांशी हा असाच संवाद झालेला आहे.

तिरशिंगराव Thu, 20/03/2025 - 21:38

आज बर्‍याच दिवसांनी हा अदितीचा लेख समोर आला. आणि त्यावर नबांची कमेन्ट नाही, म्हटल्यावर तो पुन्हा वर आणतोय. शिवाय त्यावर माझा जो प्रतिक्रिया म्हणून  लेख होता, त्याचीही लिंक देतो म्हणजे नबांना एकत्रच समाचार घेता येईल. 

फुल टु बेन - https://aisiakshare.com/node/1234

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/03/2025 - 07:40

हल्ली मला कुणी फोन करतही नाहीत! मला लोकांनी वाऱ्यावर सोडलंय का काय, असा आता संशय येत आहे.