Skip to main content

शोध माझ्यातला

शोध माझ्यातला

मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
समजण्या मला काय गवसले
अन काय हरवले माझ्यातले
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

शुद्ध हवा घेतली का कधी?
निर्मळ पाणी चाखले का कधी?
खळाळता निर्झर कधी का पाहीला?
घाम त्वचेतून कधी का वाहीला?

लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर?
निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर?
मदत का कधी कुठे केली?
न ठेवता आशा परतीची?

घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी?
धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी?
पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
भुकेने कधी जीव तळमळला असे झाले कधी?

एकांती बसता कोणताच विचार नाही मनी
लागली समाधी त्यावेळी जिवंत जागेपणी?
रूप रंग गंध हुंगले कधी श्वासात
असे झाले कधी हरवून गेलो त्यात?

दिला का कधी ठोसा एखाद्या उन्मत्त ठगाला?
मार जरी खाल्ला तरी एकतरी फटका लगावला?
चिड आली का सार्‍या दुनियेची, इतरांच्या वागण्याची?
खरेच का, सबूरीने वागण्याची खोटी रीत जगण्याची?

ज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे
उत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे
का माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पडू नाही दिले?
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

- पाभे