यातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग.
याआधीचे भाग :१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ । ९ | १०
याच महिन्यात आलेला, विकास बहल दिग्दर्शित, कंगना रानावतची प्रमुख भूमिका असलेला, "क्वीन".
काही मित्रमैत्रिणींनी याबद्दल सांगितलं होतं. यावेळी संधी न दवडतां सिनेमा पाहिला. सल्ला दिलेल्या मित्रमैत्रिणींचा आभारी आहे.
----------स्पॉईलर अलर्ट : चित्रपटकथेचा काही भाग इथे येतो. चित्रपट पाहू इच्छिणार्यांनी हा भाग वाचू नये. ---------
चित्रपटाचा जीव म्हण्टला तर खूप लहान आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी नाकारलेली गेलेली मुलगी "रानी" आपल्या, आधीच ठरलेल्या "हनिमूनला" - पण एकटीच - जाते. नव्या देशात, नव्या अनुभवांमधून तिचा जणू पुनर्जन्म होतो. तिच्या या आनंदयात्रेचा हा सिनेमा.
----------स्पॉईलर अलर्ट समाप्त. ---------
चित्रपटाला एका परीकथेचं अंग आहे असं वाटतं. इथे परीकथा म्हणाजे चमत्कार किंवा नेत्रदीपक व्हिज्युअल्स असं काहीही नाही. तर एखाद्या गावातल्या मुलीला अशी सफर एकटीला करायला मिळावी, आणि तिच्यातून सुरवंटाचं फुलपाखरू व्हायला मिळावं हीच एक परीकथा आहे - किमान भारतातल्या संदर्भांत. सुरवंटाचं फुलपाखरू होणं हा म्हण्टला तरी क्लीशेच. त्यामुळे अशा परीकथेला नको तितकं निरागस आणि गोग्गोड होण्याचा धोका असतो. तो इथे निश्चितच टाळला आहे. रानीला भेटलेले लोक, त्यांची आयुष्यं, त्यांचे दृष्टीकोन या सार्यामधे जिवंतपणा, रसरशीत आणि ताजेपणा जाणवतो.
चित्रपटातला विनोद हे त्याचं मोठं बलस्थान आहे. अचकट विनोद, "आयटम साँग", सेक्स कॉमेडी यांची भेळ म्हणजे एकंदर आजकालचा बॉलीवूडचा कॉमेडीचा फ्लेवर दिसतो. "क्वीन"मधला विनोद यापासून फारकत घेतलेला, हलकाफुलका आणि तरीही मनमुराद हसवणारा आहे. खरं सांगायचं तर सटल् असणार्या या विनोदीपटाने बॉक्स ऑफिसवर चांगल्यापैकी पैसे कमवावेत हेदेखील एक सुखद आश्चर्य. (अर्थातच हा काही "पाचशे कोटी पायजेतच" अशी प्रतिज्ञा वहाणारा बूम आणि धूमपट नव्हे हेदेखील नमूद केलेले बरे. तसे चित्रपट खानावळीच्या ग्राहकांकरता लखलाभ.)
चित्रपटाचं आशयसूत्र म्हण्टलं तर बरंच लहान असताना, व्यक्तिरेखांना आकार नि जिवंतपणा आणणं हे जे अभिप्रेत असतं ते इथे आलं आहे. "आणि ते सुखाने नि आनंदाने एकत्र नांदू लागले" या टीप्पीकल स्टिरिओटाईपला गेल्या पांच दहा वर्षांत बर्यापैकी धक्के बसलेले आहेतच. "क्वीन" याही बाबत आनंददायक.
याआधीच्या काळात हिंदी सिनेमात परदेशचित्रण म्हणजे यश चोप्रा प्रणित तोकड्या कपड्यांतल्या नायिकांना स्विस पर्वतराजीत नायकाबरोबर गाणे गातानाचा दिखाऊपणा असं समीकरण होतं. (चोप्रांचा हा फॉर्मुला गेल्या पंचवीस वर्षांत इतरानीही उचलून पुनःपुन्हा वापरलाच.) त्यामुळे परदेशचित्रण ही जी डोकेदुखी वाटायला लागली होती त्यालाही हा सिनेमा पूर्णपणे तडा देतो. पॅरीस व अॅमस्टरडॅमचं चित्रण "हे पहा पॉश एरिया" असं न येता चित्रपटाला साजेशा नैसर्गिकपणे येतं.
कंगना रानावतचे सिनेमे मी या आधी पाहिले होते आणि तिचं काम नेहमी चांगलं होत असलं तरी एकदंर चित्रपट मला तोकडे वाटले होते. ("फॅशन" सकट. "फॅशन" चांगला होता. पण नाही म्हण्टलं तरी मधुरभांडारकरी फॉर्म्युलाईकच.) या चित्रपटात मात्र बाईंनी भारी काम केलंय आणि जरादेखील दिखाऊपणा नसल्याने कोंदणही सुरेख जमून आलेलं आहे.
असो. सिनेमा आवडला. जमल्यास इतरांनीही पहावा.