पॉलिटिंगल भाग १ : शपथविधी
शपथविधीनिमित्त थोडी गंमत

उधोजीराजांनी महालात जोरदार एंट्री केली. 'कोण आहे रे तिकडे?'.
मिलिंदोजीः मीच हाये. आनखी कोन असनार!
उधोजीराजेः तूच का पुन्हा! बाकीचे कुठे गेले?
मिलिंदोजीः बाकीचे गेलेत वानखेडेवर. गावजेवन हाये म्हने. बुंदीचे लाडू, पाकातल्या पुऱ्या, बासुंदी... झालंच तर..
उधोजीराजीः खामोश! सपशेल खामोश! अरे काय ही मर्दमावळ्यांची अवस्था! कांदा-मिरची-भाकरी खाऊन, भीमथडीच्या तट्ट्यावर मांड टाकून यवनाला जेरीस आणणारे आमचे मावळे आज गनिमांच्या पंगतीला बसणार? हर हर!
मिलिंदोजी: नाव काढू नका त्या मिरचीचं आनि तट्टांचं! ती तसली मिरची खाऊन, दिवसदिवस तट्टावर मांड टाकून बसल्यावर कुठं कुठं दुखायचं! सांगायची सोय राहिली नव्हती.
उधोजीराजेः झालं का तुझं मिरचीपुराण चालू. पुन्हा एकदा खामोश!
मिलिंदोजी: बरं राह्यलं!. मी म्हनत होतो तुमच्या आवडीची ताकातली भेंडी सुद्धा आहे पंगतीला!
उधोजीराजेः (तोंडातली लाळ आवरत) आम्ही अन्नासाठी कोणाचेही मिंधे होणार नाही! आमच्या सन्मानाशी तडजोड नाही म्हणजे नाही! आमच्या मुदपाकखान्यात आजच ताकातल्या भेंडीची ऑर्डर द्या
मिलिंदोजीः ग्यास संपलाय!
उधोजीराजेः खामोश! मी कशासाठी आलो होतो हे काय चाललंय. (मिलिंदोजींना हातातला फोन दाखवत) हे बघ!
मिलिंदोजीः आयफोन 6 का? वाटलंच! माझ्या गळ्यात मारलाय मोटो-जी !
उधोजीराजे: फोन नाही. व्हॉट्सअॅपवर सकाळीच आलेला मेसेज बघ.
मिलिंदोजी लक्षपूर्वक वाचतातः
गुड मॉर्निंग महाराष्ट्र
जस्ट चिल महाराष्ट्र
राक अँड रोल
तेवढेच बोल
चावडीवरती वाजतोय ढोल
सकाळ म्हणजे मॉर्निंगं
रस्त्यावरती वॉकिंगं
दादोजी आणि शिवबांनाही
रस्त्यावरती पार्किंगं
आता वेक अप सारे रान
लावणी आहे आमुची छान
आता बर्न अप सारे रान
हेच आहे आमचे गान
मिलिंदोजी: (हताश होत) आदित्यची नवी कविता काय! चांगलीच म्हनायची!!
उधोजीराजेः त्याला कुठलं जमतंय एवढं मराठी लिहायला! आमच्या एका खबऱ्याने पाठवलेला गुप्त संदेश आहे. प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर वाच
मिलिंदोजीः गु ज रा ते चा स र दा र आ ला आ हे. हे तर सकाळपास्नं टीवीवर दाखवताहेत. यात कसला गुप्त संदेश!
उधोजीराजेः खामोश! जीभ हासडून टाकीन. आताच वानखाड्यावरील शामियान्यात येण्याचे निमंत्रण आम्हाला मिळाले. त्यात हा संदेश! आईभवानीच्या कृपेने साक्षात शिवबांना जी संधी मिळाली नाही ती आम्हाला मिळतेय. शिवबांनी फक्त अफजुल्याचा काटा काढला. आम्ही अफजुल्या आणि आदिलशहा दोघांचाही आज काटा काढणार. झालंच तर कविराज रामदासपंत आठवल्यांनाही धडा शिकवून येणार.
मिलिंदोजीः अहो पन...
उधोजीराजेः (दोन्ही हात आकाशाकडे पसरून आशीर्वाद मागत) हे आईभवानी मला आशीर्वाद दे. शामियान्यात झेड सेक्युरिटी असल्याने तुझी भवानी तलवार नेता येणार नाही पण वाघनखं लपवून नेईन. हा मी निघालो!
मिलिंदोजीः माझ्या शुभेच्छा हायेतच. तेवढी वाघनखं अंगरख्याच्या वरच्या खिशात ठेवा. मागच्या येळेला तुमानीच्या मागच्या खिशात लपवली आणि नंतर मलम लावायला वैद्य मिळाला नाही!
टीपः चित्र जालावरुन साभार
ह्या ह्या ह्या ह्या. मस्त
ह्या ह्या ह्या ह्या. मस्त लिहिलंय.
उधोजींनी काय करून घेतलंय स्वतःचं...