रॅट रेसचा विळखा
तुम्हाला आपण फार असहाय आहोत, अगतिक आहोत असे वाटते का? कुणीही आपली दखल घेत नाही अशी भावना अधूनमधून येत असते का? या जगात आपला निभाव लागणार नाही हा विचार येत असतो का? अस्तित्वासाठीची स्पर्धा, स्पर्धेतून स्वार्थ, भीती, व इतरांचा दुस्वास इत्यादीमुळे आपण मानसिक स्वास्थ्य हरवून बसलो आहोत असे वाटत असते का?
असे काही वाटून घेणारे तुम्ही एकटेच नाही. हे जे वाटणे आहे ते मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे असेही वाटून घेण्याचे कारण नाही. आताची बदलत असलेली परिस्थितीच या मानसिकतेचे, असमाधानीवृत्तीचे प्रमुख कारण असावे असे काही तज्ञांचे मत आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यातील नवउदार भांडवलशाही (neo-liberal capitalism) व त्यातून होत असलेले बाजारीकरण तुम्हा – आम्हाला हद्दपार करण्याच्या बेतात आहे. या गोंधळलेल्या परिस्थितीतून मार्ग शोधणे – किंवा निदान त्याबद्दल विचार करणे – यात गैर काही नाही. स्वतःची आयडेंटिटी जोपासण्याचे प्रयत्न करणे यातही काही चूक नाही.
मुळात आपण सामाजिक प्राणी आहोत. पिढ्यान पिढ्या जोपासलेल्या अनेक गोष्टीतून व जीवनमूल्यामधून आपल्याला एक आयडेंटिटी प्राप्त झालेली असते. समाज आपल्या आयडेंटिटीला आकार देत असतो. आपण normal आहोत की abnormal हे समाज ठरवत असतो. तरीसुद्धा समाजाबरोबर जावे की त्याच्याशी फटकून वागावे या निवडीचे स्वातंत्र्य आपल्याला असते.
यापूर्वीच्या समाजातील बदल फारच संथगतीचे होत गेल्यामुळे काही अपवाद वगळता मागच्या पिढीतल्यांना स्वतःच्या आयडेंटिटीबद्दल फारसे विचार करण्याची गरज पडली नसेल. परंतु गेल्या 30 - 40 वर्षात समाज स्थितीत फार मोठा बदल झाल्यामुळे आपण नेमके कुठे आहोत हेच कळेनासे झाले आहे.
आजच्या समाजाच्या सर्व व्यवहारावर बाजारीकरणाची गडद सावली आहे. बाजारीकरणाच्या आक्रमकतेमुळे एकामागून एक असे सर्व क्षेत्र भांडवली व्यवस्थेत बंदिस्त होत आहेत. बाजारीकरणातच सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्यांची उत्तरं दडलेली आहेत असे त्याच्या पुरस्कर्त्यांची खात्री आहे. राज्यकर्ते जितके नियंत्रण कमी करू शकतील, जितके कर कमी करू शकतील, तितक्या प्रमाणात समाजविकास होत राहील असे त्यांना वाटत आहे. सार्वजनिक सेवांचे खाजगीकरण व्हावे, सार्वजनिक हितासाठीच्या कामांना कात्री लावावी, उद्योगव्यवस्थेला पूर्णपणे नियंत्रण मुक्त करावे, रोकडसुलभता असावी, भांडवलाच्या अंतरराष्ट्रीय हस्तांतरणाला नियमांच्या चौकटीतून मुक्त करावे ही मानसिकता व त्याकडे वाटचाल प्रबळ होत आहे. मार्गारेट थॅचर व रोनाल्ड रीगन यांच्या काळापासून हे लोण पसरत असून कुठल्याना कुठल्या स्वरूपात ती जगभर पाय पसरत आहे. या बाजारीकरणाला अपवाद असलेला एकही देश या पृथ्वीवर नसावे अशी आताची स्थिती आहे.
खरे पाहता बाजारीकरणाचा डोलारा प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या मूल्ये जन्मजात असतात या तत्वावर व मानवजात स्वार्थी व अप्पलपोटी असणार या क्रिश्चियन गृहितकावर उभा आहे. व आतापर्यंतची समाजव्यवस्था या गोष्टींचे नियंत्रण करत असल्यामुळे त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांची झळ सामान्यापर्यंत पोचली नव्हती. आता मात्र या (अव)गुणांचे उदो उदो होत आहे. नियंत्रणाऐवजी प्रोत्साहन मिळत आहे. स्वयंप्रेरित अनिर्बंध स्पर्धेतूनच व भांडवली नफेखोरीतूनच नवीन शोध, इनोव्हेशन्स, आर्थिक वाढ, होत होत शेवटी मानवाचे कल्याण होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.
`लोक आपल्या अवस्थेला स्वतःच कारणीभूत आहेत. गरीबीत रहायचं की नाही हे त्यांनीच ठरवायचं आहे. वर यायचं असेल तर त्यांनी शासनाच्या आधाराची अपेक्षा करता कामा नये.'
बाजारीकरणात अमाप भांडवलाबरोबर मेरिटचेही फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असते. बौद्धिक क्षमता, परिश्रमातील सातत्य, व इनोव्हेटिव्ह माइंड ज्याच्यांकडे आहे त्यानाच कुठल्याही स्पर्धेतील यशाची किल्ली मिळू शकते, याबद्दल कुणाचेही दुमत नसते. त्याचप्रमाणे या गोष्टी असणाऱ्यांना वाटेल ती किंमत देऊन विकत घेता येते याचीसुद्धा सोय येथे होत असते. याचा परिणाम जीवघेण्या स्पर्धेत होत आहे व बहुतेकांना या रॅट रेस मध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे ज्यांना संधी मिळते वा जे संधीच्या शोधात आहेत त्यांचेच हे जग आहे. आणि इतरांना येथे स्थान नाही.
परंतु वास्तव फार वेगळे आहे. ही रॅट रेस सर्वांना समान संधी देऊ शकत नाही. काही (मोजके चाणाक्ष) स्मार्ट अगोदरच या शर्यतीच्या विनिंग लाइनजवळ उभे आहेत. व शिट्टी वाजवली की तेच सर्वांच्या अगोदर पोचतात व शर्यत जिंकतात. बाजारावरील नियंत्रण दूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तेंव्हापासूनच समान संधी नाकारली गेली हे विसरता येत नाही. उत्कर्षाच्या शिडीच्या खालच्या पायरीपाशीच बहुतेक जण घुटमळत आहेत, एकमेकाचे पाय ओढत आहेत. व यातूनही काहींना वरच्या पायरीवर जाणे शक्य झाले तरी त्यांना वर येऊ न देण्यासाठी काही अडथळे उभे करणारे ठिकठिकाणी आहेत. रशियातील कम्युनिस्ट राजवट संपल्यानंतरसुद्धा त्या देशातील सर्वांना समान संधी उपलब्ध नव्हती. कारण काही मूठभर लोकांच्या हातात अमाप संपत्ती एकवटली होती व त्यांचे केजीबीशी लागेबांधे होते. व हेच मूठभर लोक बाजारीकरणाचे गोडवे गात होते. खरे पाहता उदारीकरणाच्या सिद्धांतानुसार विलक्षण बुद्धीमत्ता, सर्जनशीलता किंवा अविश्रांत परिश्रम असलेल्यांच्याकडेच संपत्ती हवी. परंतु यापैकी कुठलेही गुणविशेष या श्रीमंतांच्या जवळ नव्हते.
बुद्धीमत्ता वा परिश्रमांची फळंसुद्धा फार काळ टिकत नाहीत. पहिल्या पिढीतील उद्योजकांनी स्वतःच्या हिकमतीवर व इनोवेशनच्या जोरावर उद्योगधंदे उभारून संपत्ती गोळा केली असली तरी नंतरच्या कालखंडात स्पर्धेची झळ लागणार नाही याची शाश्वती देता येत नाही. इनोवेशन्स सतत होत असतात. त्यामुळे नवीन उद्योग धंदे उदयास येत काही उद्योग धंद्याना कालबाह्य ठरवतात. त्यामुळे बापाच्या पैशाच्या जोरावर उद्योजकांची पुढली पिढी टिकून राहील याची खात्री देता येत नाही. कुठल्याही कालखंडात नाविन्यतेला, त्याच्या उपयुक्ततेला अग्रक्रम दिला जातो. अमेरिका वा ब्रिटन सारख्या प्रगत भांडवली देशातसुद्धा याचा प्रत्यय येत असतो.
नवउदार भांडवलशाहीच्या पुरस्कर्त्यांनी आणि त्यांनी पाळलेल्या तथाकथित विचारवंत व विशेषज्ञांनी मेरिटच्या जोरावर समाजहित साधण्यासाठी, सर्वांना समान पातळीवर आणण्यासाठी व समान संधीसाठी प्रयत्न करावेत. केवळ पैशाच्या जोरावर आपापल्या मुलाबाळांना अत्याधुनिक शिक्षण देवून आपण किती इनोवेटिव्ह आहोत असे शेखी मिरवण्यात हशील नाही. परंतु हे विधान त्यांना अजिबात पटण्यासारखे नाही. म्हणूनच सर्व उद्योगधंद्यांना भाडोत्रीपणाचे स्वरूप येत आहे.
या गोष्टींना एक वेळ दुर्लक्ष केले तरी बाजारीकरणाच्या अपयशाला व्यक्तीच्या नाकर्तेपणाला जबाबदार धरले जाते. श्रीमंतांचे सगळे बरोबर व गरीबांचेच काही तरी चुकते, आर्थिक व नैतिक दृष्ट्या त्यांच्यातच उणीवा असल्या मुळे प्रगती रखडत आहे, असे दोषारोप गरीबावर केले जातात. त्यांच्या दृष्टीने गरीब जनता या आधुनिक समाजाला लागलेली कीड आहे, ते सर्व बांडगुळं आहेत, ही मानसिकता जोपासली जात आहे.
बाजारीकरण माणसांना स्वायत्तता व स्वातंत्र्य देत त्यातून मानवजातीचे कल्याण होत राहणार, अशी स्वप्नं दाखवत होत होती. परंतु त्या अपेक्षा फोल ठरत आहेत. त्याऐवजी माणसांना कस्पटासमान लेखण्यातच धन्यता मानले जात आहे. त्यामुळे संवेदनशील माणूस बाजूला फेकला जात आहे. एकाकी ठरत आहे. कामाच्या ठिकाणी असेसमेंट, मॉनिटरिंग, मेजरिंग इत्यादींचा अतिरेक होत असून नियोजनाची सर्व सूत्रे लांब असलेल्या कुठल्यातरी अनामधेयाकडून हलत असल्यामुळे रॅट रेसमध्ये यशस्वी होत असलेल्यांना सर्व सोई-सुविधा, सवलती, उत्तेजनार्थ बक्षीस, पदोन्नती व मागे राहिलेल्यांना शिक्षा, दंड, पदावनती किंवा प्रसंगी पदच्युती यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारच्या धोरणामुळे कामाच्या ठिकाणी भीतीयुक्त वातावरणाची किंवा मॅनिप्युलेट करत पुढे पुढे राहण्यासाठीच्या वृत्तीची वाढ होत आहे. स्वायत्तता, उद्योजकता, नाविन्यतेचा शोध घेण्याची आकांक्षा, निष्ठा या गोष्टी हळू हळू नष्ट होत असून त्याऐवजी औदासीन्य, भीती, मत्सर, स्वार्थीपणा इत्यादी प्रकारच्या भावना रुजत आहेत. व्यवस्थापनाच्या शिस्तीच्या बडग्यामुळे वरिष्ठांना खुश ठेवणे, त्यांना आवडतील तसेच अहवाल, खोटे खोटे आकडेवारी सादर करणे यावर भर दिला जात आहे. अशा वेळी रशियाच्या भ्रष्ट राजवटीत सेंट्रल ब्युरोच्या अंदाजाप्रमाणे आकडे कमी जास्त केलेल्यांची आठवण येते.
हेच पाशवी बळ बेरोजगारांनासुद्धा छळत आहे. बेरोजगारीच्या तापदायक व्यथेबरोबरच यांना या वेगवेगळ्या पातळीवरील छक्के पंजे समजून घेण्यातही वेळ व श्रम खर्ची घालावे लागत आहे. मुळात नवउदारभांडवलवादातच comparison, evaluation व quantification अंतर्भूत आहेत. त्यामुळे कागदावर जरी आपल्याला हवे ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले तरी प्रत्यक्षात आपल्याकडे काहीही नाही. परिस्थिती आपल्याला निर्वीर्य व निःशक्त बनवत आहे. सर्व राजकीय पक्ष या प्रक्रियेत सामील झालेले आहेत. त्यामुळे बेरोजगारांना राजकीय पाठबळही मिळेनासे झाले आहे. स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ऑटोनामीच्या मुखवट्याखाली दबलेले असून बिनचेहऱ्याच्या मनमानी करणाऱ्या नोकरशाहीच्या हातात समाज नियंत्रणाची सूत्रे दिलेली आहेत.
हा बदल व ही विदारक परिस्थितीच वैयक्तिक जीवनात अनेक मनोविकारांना जन्म देत आहे, असे तज्ञांचे मत आहे. स्वतःची हेटाळणी, विषण्णता, व्यक्तिमत्व विकृती, बेशिस्त जीवनशैली इत्यादींना ती जन्म देत आहे. व्यक्तिमत्व विकृतीत चिंता व समाजाविषयी भीती असल्यामुळे इतरांकडे सदोष दृष्टीने बघितले जाते. कारण इतर सर्वजण त्याच्याशी स्पर्धा करणारे किंवा त्याचे मूल्यांकन करणारे आहेत अशी भीती त्यांच्या मनात असते. त्याच्या दृष्टीने या इतरांना समाजात मान्यता असल्यामुळे आपण किस झाडकी पत्ती हा न्यूनगंड रुजत आहे.
एकलकोंडेपणा आणि विषण्णता यांना हैराण करत आहेत. कामाच्या ठिकाणी त्यांचे स्वत्व पिळवटून टाकले जात आहे. जे शेवटच्या पायरीवर आहेत त्यांना अपराधीपणाने ग्रासले आहे. स्वतःबद्दल सांगण्यासारखे काहीही शिल्लक नसते. यश मिळाले की फुगवून जायचे व न मिळाल्यास स्वतःलाच दोष द्यायचे. गंमत म्हणजे या यशापयशात त्यांचा दूरान्वयानेही काडीचा संबंध नसतो.
जर या जगात तुम्हाला, आपण बाजूला सारले जात आहोत, आपले स्वत्व हरवत आहे, या जगात अयशस्वी ठरत आहोत असे टोचत असल्यास अजूनही तुमच्यात संवेदनशीलता शिल्लक आहे म्हणण्यास वाव आहे. खरे पाहता इतरांनी दुर्लक्ष केलेल्या काही मूल्यांना तुम्ही मानता यातच तुमचा मोठेपणा आहे. त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्यामुळे आपण गर्वाने ताठमानेने जगण्यालाच जगणे म्हणतात असे जगाला ओरडून सांगू शकतो.
संदर्भः Paul Verhaeghe, यांचा What About Me?
George Monbiot यांचा deviant-and-proud
माहितीमधल्या टर्म्स
लेख दोनदा वाचला. या लेखावर
लेख दोनदा वाचला. या लेखावर फारशा प्रतिक्रिया आलेल्या/येत नाहीत हे अपेक्षितच आहे.
दोन प्रकारचे उंदीर असतात असे मला वाटते
१. जे इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी धडपडतात
२. जे आपल्या टॉक्सिक सोशल सर्कलमध्ये स्वीकृतीसाठी/सन्मानासाठी धडपडतात.
बहुतेक लोक दुसर्या गटात मोडतात. माणूस हा सोशल प्राणी आहे. अगदी जंगलात राहतानाही कोणाच्या गळ्यात जास्त कवड्यांच्या माळा यावरुन स्पर्धा होत नसेल असे नाही. पझेशन्स=कर्तृत्व असं साधं समीकरण असल्यावर दुसर्या परिणामांची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
१. या नव/न-नवभांडवलशाहीला
१. या नव/न-नवभांडवलशाहीला 'यशस्वी' पर्याय कोणता हे कळत नाही.
२. भांडवलशाहीतून (खरेतर समाज व्यवस्थेतून 'इनहेरिटन्स*' हा भाग कसा काढून टाकायचा)?
*इनहेरिटन्स मध्ये मृत्युपश्चात प्रॉपर्टी मिळणे याबरोबरच श्रीमंत पालकांच्या मुलांना "तयारीच्या वर्षां"मध्ये मिळणारे फायदेही अंतर्भूत आहेत.
भांडवलशाहीतून (खरेतर समाज
भांडवलशाहीतून (खरेतर समाज व्यवस्थेतून 'इनहेरिटन्स*' हा भाग कसा काढून टाकायचा)?
याच्यावर विचार झालेला आहे.
---
*इनहेरिटन्स मध्ये मृत्युपश्चात प्रॉपर्टी मिळणे याबरोबरच श्रीमंत पालकांच्या मुलांना "तयारीच्या वर्षां"मध्ये मिळणारे फायदेही अंतर्भूत आहेत.
श्रीमंतांच्या मुलांना मिळणारे पैसे व इतर फायदे ("तयारीच्या वर्षां"मध्ये) हे अनफेअर आहेत असा तुमचा मुद्दा आहे असे दिसते.
श्रीमंतांची मुलं व त्यांचं जीवन (for the purpose of THIS analysis) ३ स्टॅजेस मधे डीव्हाईड करा - (oversimplification)
१) जेव्हा ती जन्मास येतात तेव्हा
२) ती earning सुरु करतात तेव्हा
३) व त्यांना पालकांची संपत्ती इन्हेरिटन्स मधे मिळते तेव्हा
यापैकी कोणात्या स्टेज मधे ती श्रीमंत असतात व कोणत्या स्टेज मधे ती गरीब असतात ?
------
Should the concept of parenting be changed in such a way that
१) rich parents, despite their financial capacity, should be discouraged/dissuaded from providing anything beyond basic stuff such as - say - food, shelter, nurturing, love, healthcare etc.
२) Poor parents should be provided financial support so that they can compensate for the lack advantage ?
The problem
with the rat race is, even if you win, you’re still a rat!
नानावटी साहेब, उत्तम लेख. या नवभांडवलवादी व्यवस्थेचा अाणखी एक पैलू म्हणजे या व्यवस्थेत फक्त अाणि फक्त तरूणांनाच स्थान असल्याने वृध्दांना फक्त एक लायबेलिटी म्हणून जीवन कंठावे लागेल, असे वाटते. भलेही तरूणपणी कमावलेले पैसे साठवले तरी समाजात काही उत्पादक काम करत जगता येईल काय, ही शंकाच अाहे.
- स्वधर्म
जबरदस्त संगती
थत्तेसर. पण हा विचार जे रॅटलोक करत असतील, त्यांना हे अापण काही महारॅट लोकांच्या इच्छेप्रमाणे करत अाहोत, असे जाणवत असेल असे वाटत नाही. बरेच ‘फायर इन द बेली’वाले कार्पोरेट नोकरदार अगदी निष्पापपणे अॅंम्बिशियस असतात. अापला फायदा, ग्रोथ इ. दुय्यम असून शेअरहोल्डरसाठीच सगळा खेळ अाहे, हे अनेकांना समजतच नाही. अापल्याला एक व्यक्ती म्हणून व समाज म्हणून याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल.
पोटाची खळगी
भरल्यानंतरच असे विचार सुचतात, हे सत्य अाहेच. त्यात काही चुकीचं अाहे असं नाही. पण अाता कितीही कमावले तरी एवढे अापल्याला सुरळीतपणे जगायला पुरतील, याची खात्री कुणालाच वाटेनाशी झाली अाहे. पाच हजार कमावणारा चिंतेत अन पन्नास हजार कमावणारा, पन्नास लाख कमावणाराही तेवढाच चिंतेत दिसतो. हे रॅटरेस व्यवस्थेचं नावाप्रमाणे मुख्य लक्षण अाहे.
वरती जो प्रश्न विचारलेला अाहे, (कोणत्या प्रकारचे नोकर कामावर ठेवाल?) तो काय सांगतो? म्हणजे माणसाचा धंदा किंवा काम हेच सर्वात महत्वाचं ठरत चाललंय काय? थोडेफार काम करून, मजेत सुरक्षित जगणं अाधिकाधिक अवघड बनत चाललं अाहे काय? असे विचार अाले. पुन्हा, हे माझ्या भरल्या पोटीच हं. माणसाची अोळख ही त्याच्या व्यावसायिक, अार्थिक अास्तित्वानेच जास्तीत जास्त ठरणे, त्यापेक्षा इतर अोळखी (identities) अाक्रसत जाणे, हे होत अाहे. पूर्वी माणसाचा धंदा, नोकरी यासाठी उपजिविका हा शब्द वापरत. यातला ‘उप’ महत्वाचा, प्रत्येकाची जिविका वेगळीच असे.
हे वाचलेच असेल.....
हे वाचले असेल तर रॅट रेस नको म्हटले तरीसुद्धा.....
किंमत
किंमत: मुख्य किंमत वेळ! कितीतरी वेळ पोटापाण्याचे काम करण्यात जातो. इतर अावडीच्या गोष्टी करायला, रिकामे बसायला, कुणाकडे बसायला जायला वेळ दिवसेंदिवस कमी कमी होत जाउन परिणामत: मित्र, कुटुंब, सामाजिक संस्था यांच्याशी संवाद कमी होतो. याचे कारण म्हणजे कंपनीत काम वाढत चालले अाहे व मी कमी काम करतो, मला ग्रोथ बस्स झाली अशाप्रकारचा विकल्प दिसत नाही. वुइ मस्ट ग्रो, असा सार्वत्रिक रेटा अाहे, थांबलेला माणूस दिसत नाही.
दुसरी किंमत: प्रचंड असुरक्षितता. अगदी मार्केट लीडर म्हणवणार्या कंपन्यादेखील दोन पाच टक्के मार्केट शेअर कमी झाला तर खालपासून वरपर्यंत हडबडून जाताना पाहतो. सहाजिकच व्यक्तीलापण निर्धास्तपणे जगता येत नाही.
अोळख: कुणाशीही संभाषण पहिल्या पाच मिनिटातच करियर, नोकरी, प्लॅटच्या किमती किंवा नविन गाड्या यावर घसरते. कंपनीच कसं चाललंय, मार्केट काय म्हणतंय, ही मुख्य उत्सुकता. क्वचित राजकारण, पण तिथेही सगळं नकारात्मकच बोलणं होतं. छंद, साहित्य, संगीत, नवे विचार, पुस्तके यात रस कमी होत जातो. सहाजिकच अापले इतर पैलू कमी महत्वाचे असून कुठे काम करतो, काय काम करतो हीच अापली अोळख वाटू लागते.
हे सगळं रॅटरेस व्यवस्थेशी जोडलेलं वाटतंय. तुमचा अनुभव ऐकायला अावडेल.
माझा अनुभव सांगतो पण
माझा अनुभव सांगतो पण वेळ नक्की कमी होतोय का? निदान माझ्या सर्कलमध्ये आधीच्या पिढीतही लोक भरपूर व्यस्त होते. माझ्या आईबाबांचे दिवसातले ३ ते ४ तास बसप्रवासात जात. माझ्या नातेवाईकांतील मुंबई वगैरे परिसरातील सर्वांचे जवळपास ४ तास प्रवासात जात. यात कोणालाही शनिवारी सुटी नव्हती. त्यामुळे आठवड्याचे सहा दिवस कामाचे होते.
त्या तुलनेत माझ्या पिढीतल्या बहुतेक सर्वांना दोन दिवस सुट्या आहेत. किमान ६०-७० टक्के वेळा त्या सुट्या वापरायलाही मिळतात. रात्रंदिवस लोक मोबाईल-संगणकाला चिकटलेले दिसतात तेव्हा ते काम करत असतातच असे नाही.
कितीतरी वेळ पोटापाण्याचे काम
कितीतरी वेळ पोटापाण्याचे काम करण्यात जातो. इतर अावडीच्या गोष्टी करायला, रिकामे बसायला, कुणाकडे बसायला जायला वेळ दिवसेंदिवस कमी कमी होत
२ दिवसापूर्वीच "तनु वेड्स मनु" मधल्या 'पप्पी"ची मुलाखत ऐकत होते. त्याने त्याचे आवडते गाणे म्हणुन "दिल ढुंडता है फिर वही फुरसत के रातदिन" सांगितले. त्यावरची त्याची ट्टिप्पंणी चांगली होती. तो म्हणाला, सर्वांनाच नॉस्टॅल्जिक होयला आवडते, "फुरसत" आत्ता ही आहे, पण ती आपल्याला जाणवत नाही".
कुणाशीही संभाषण पहिल्या पाच मिनिटातच करियर, नोकरी, प्लॅटच्या किमती किंवा नविन गाड्या यावर घसरते. कंपनीच कसं चाललंय, मार्केट काय म्हणतंय, ही मुख्य उत्सुकता
हे अजिबात सार्वत्रीक नाही. तुमच्या आजुबाजुची लोक हे बोलत असतील तर तुम्ही वेगळा ग्रुप निवडा, चॉइस तुमचा आहे.
हे अजिबात सार्वत्रीक नाही.
हे अजिबात सार्वत्रीक नाही. तुमच्या आजुबाजुची लोक हे बोलत असतील तर तुम्ही वेगळा ग्रुप निवडा, चॉइस तुमचा आहे.
अनु राव फॅन क्लब स्थापन करणं गरजेचं आहे. व आधीच कुणी स्थापन केलेला असेल तर ताबडतोब सदस्यत्व मिळवणं गरजेचं आहे.
----
हे जे विचाराचे पॅटर्न्स आहेत त्याचा उगम (हिंदु) धर्मातच असावा. ह्युस्टन स्मिथ नावाच्या तत्वज्ञानाच्या प्राध्यापकानं वर्ल्ड रिलिजन्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्यात त्यानं खालील पॅरा लिहिलेला आहे. हिंदु धर्माची "महती" वर्णन करताना -
Wealth, fame, power are exclusive and hence competitive, hence precarious. Unlike mental and spiritual values they do not multiply when shared; they cannot be distributed without diminishing one's own portion. If I own a dollar, that dollar is not yours; while I am sitting on a chair, you cannot occupy it.
आणि शेवटी आध्यात्मिक शक्ती नावाची एक देवता दाखवायची. संदिग्धता हा जिचा स्थायीभाव असतो. व ती परमोच्च आहे असे सांगायचे. नान्यम जाने नैव जाने न जाने. आणि आरडाओरडा सुरु करायचा की रॅट रेस चालू आहे.
( मार्केटदेवता आठवली असेलच अनेकांना. )
चॉइस
>> हे अजिबात सार्वत्रीक नाही. तुमच्या आजुबाजुची लोक हे बोलत असतील तर तुम्ही वेगळा ग्रुप निवडा, चॉइस तुमचा आहे.
ह्यापेक्षा वेगळे आस्थाविषय असणारे गट असतात का? हो.
चॉइस तुमचा आहे का? नक्की सांगता येत नाही. अशा गटात सामील होण्यासाठी तुमच्यापाशी सांगण्यासारखं काही तरी इंटरेस्टिंग असेल, तर ते शक्य होईल. मात्र, मला अनेकदा असा अनुभव येतो की ज्यांना अशी आस असते ती माणसं स्वतः पुरेशी इंटरेस्टिंग असतातच असं नाही. त्यामुळे नुसती इच्छा असून भागत नाही.
असे फॉर्मली डीफाईंड ग्रुप
असे फॉर्मली डीफाईंड ग्रुप नसतात हो चिंज. मी असे कुठल्या चर्चामंडळात, किंवा आस्वाद ग्रुप बद्दल बोलत नव्हते.
तुमच्या कामाच्या जागेवर, नातेवाईकात, लहानपणापासुनच्या ओळखीत नक्की करीयर, गाड्या, पैसे हे सोडुन दुसरे काहीतरी बोलणारे लोक असतात. आपण पण तसे असलो पाहीजे, तरच तुमचे त्यांच्याशी जमेल. आणि आयुष्यात असे ४-५ लोक असले तरी बास आहे ना. खूप कशाला पाहीजेत?
तुम्ही पण पैसे, गाड्या, करीयर वगैरे बोलणारे असाल तर तसेच लोक जमा होतील तुमच्या आजुबाजुला.
चॉईस नक्कीच आपला असतो. फक्त ग्रुप आणि मित्रांबद्दल नाही, तर आपल्या आयुष्यातली बरीच दु:खे आपण निवडलेली असतात अश्या पण मताला मी आले आहे.
व्यक्तीगत नाही, सर्वसाधारण
काय दिसते त्याबद्दल बोलत होतो. तुंम्ही जसे वर्तुळ म्हणता तसे माझ्यापुरते माझे अाहेच, पण नविन घरी रहायला गेल्यावर भेटणारे, जाॅब बदलल्यावर भेटणारे बहुतेक लोकांशी संभाषणात हे विषय लगेचच येतात. अापण म्हणता ही सारं काही अार्थिकतेशी जोडण्याची गोष्ट सार्वत्रिक मुळीच नाही. वानगीदाखल नुकताच लोकसत्ताचा अगदी अलीकडचा अग्रलेख पाहा. गेल्या अनेक वर्षात कला शाखेला जाण्याचे हुशार मुलांचे प्रमाण कमी होते, ते अलिकडे वाढत अाहे. का? तर तिकडे ‘बरी’ अार्थिक प्राप्ती होइल, या अाशेनेच. पैसा किंवा तथाकथित प्रगती सोडून अापल्या अावीच्या क्षेत्रात जाणं जास्त जोखमीच होत चाललंय का?
चॉइस
तो म्हणाला, सर्वांनाच नॉस्टॅल्जिक होयला आवडते, "फुरसत" आत्ता ही आहे, पण ती आपल्याला जाणवत नाही".
तो म्हणाला ...सोडा त्याचं...फुरसत हा शब्दच रॅट रेसवादी लोकांना माहित नाही. नोकरदार असो किंवा व्यावसायिक, पूर्वीच्या एका सर्कलमधल्या ४-५ लोकांना एकत्र भेटून दाखवा म्हणावं. अगदी जीवश्च कंठश्च नात्याच्या लोकांना. कधी कुठे कसं यात प्रचंड वेळ घेतील. एखादा ड्रॉप होईल. एखादा लगेच १० मिनिटानी पांगेल. एखाद्याला भ्रमणस्वातंत्र्य नसेल. कुठे आर्थिक स्तर काय करायचं त्यामधे कडमडेल. त्यात ही ते किती वेळ मोबाईलवर बोलत असतील, कामे वाटेला लावत असतील. अनप्लॅन्ड अशी कोणती कृती करू शकणार नाहीत. लोक आपल्या निघायची वारंवार जाणिव करून देतील.
फुरसत शब्दाला अनंत पैलू आहेत. फुरसतीत केलेल्या गोष्टीनं एक प्रचंड उत्कट नातं, बंध, जिव्हाळा उत्पन्न होतो. मग जी जाणवतच नाही ती फुरसत कशी? फुसरतीत वाचलेल्या पुस्तकातल्या प्रत्येक पात्राची एक मनोमूर्ती बराच काळ मनात रेंगाळते. त्यांचे शब्द, वर्तने आपल्याला पोक करतात. फुरसतीत भेटलेल्या व्यक्तिचा आपल्याला खोल नि भावनिक परिचय होतो. रिकामे बसणे हे केवळ थोरांनाच नीट जमू शकेल. प्रार्थना, मनन, योग, चिंतन, इ ना जर काही अर्थ असेल तर रिकामे बसणे ही एक तसलीच उच्च साधना असावी.
=============================================================================================================
तुमच्या आजुबाजुची लोक हे बोलत असतील तर तुम्ही वेगळा ग्रुप निवडा, चॉइस तुमचा आहे.
आजूबाजूचे लोक हे उपजिविकेचा पार्ट नि पार्सल आहेत. हे प्रॉस्पेक्टींग भयंकर अवघड काम आहे. या सगळ्या चर्चांपासून मुक्ति मिळावी म्हणून आपण कोणताही कलाग्रुप जॉइन केला तरी रिकाम्या वेळात ते लोकही हेच बोलतात. मुळात करीयर, घर, पैसा ही डोक्यावर बसलेली प्रचंड मोठी भूते आहेत. सगळे नमस्कार अंततः कृष्णाला जातात म्हणतात तशे सर्व चर्चा अंततः या भूतांकडे जातात. हे टाळणारे लोक मिळणे माझे नशीब आहे, चॉइस नाही.
उप
पूर्वी माणसाचा धंदा, नोकरी यासाठी उपजिविका हा शब्द वापरत. यातला ‘उप’ महत्वाचा, प्रत्येकाची जिविका वेगळीच असे.
वाक्य खूप आवडून गेलं.
आपला पैसा नि प्रतिष्ठा कशी मॅक्सिमम व्हावी याची अतिशय सुस्पष्ट जाण मला आजच्या पिढीत दिसते. ज्यांना सचिनसारखा क्रिकेटर बनायचं आहे त्यांना सचिनसारखा बंगला देखिल हवा आहे. तो मिळाला नाही, वा तसलं काही मिळालं नाही तर वेळेत क्रिकेटला डच्चू देण्याची त्यांची "आत्ताच" मानसिकता आहे.
हे सगळं ज्यांना उमगलं नाही, कमवू शकत असून ज्यांनी कमवले नाही, मोठ्या अर्थिक लाभांसाठी छोटे छोटे त्याग केले नाहीत, त्यांना "अजूनही अक्कल न आलेले" वा "मागे राहिलेले" अशा वर्गांत बसविले जाते.
----------------------------------------------------------------------------------------------
उपजिविका चालवणे हेच जीवन बनणे मानवतेच्या र्हासाचे लक्षण आहे. त्याचेही टेंशन असणे अजूनच!
लेखाच्या अनुषंगाने
लेखातील आशयाशी संबंध असलेला एक दुसरा लेख वाचला
https://www.linkedin.com/pulse/goldman-sachs-weak-attempt-work-life-bal…
लेख फारसा पटला नाही
पण अतिशहाणा आज पैशाला मारे डौलाने नाही म्हणाल अन उद्या म्हातारपणी काय करायचं? मुलांना कॉलेजात कसं घालायचं.
You can say "No" to money by leaving a high-paying job that doesn't align with your values or desired lifestyle.
अन मग काही वर्षांनी आपल्या values आपल्याला ऑटोमॅटिक desired lifestyle देतील काय?
.
मी असं नाही म्हणत की तुम्ही या लेखाशी सहमत आहात, मी म्हणतेय मी सहमत नाही.
.
माझं मत आहे काही वर्षे घासायचं अन इतकं कमवायचं की पुढे लवकर आरामदायी आयुष्य उपभोगता येइल. तसंही होत नाहीच म्हणा. तीही युटोपियन कल्पनाच आहे.
.
पण पैशाला पर्याय नाही. कारण पैसा = सुरक्षितता , थंडीतील गोधडी! अन तो किती मिळाला की मानसिक सुरक्षित वाटतं हा वैयक्तिक थ्रेशोल्ड असतो. पण तो थ्रेशोल्ड टिकवायला खरच धावावं लागतं, ऊर फुटेस्तोवर!!
A World Without Work For
For centuries, experts have predicted that machines would make workers obsolete. That moment may finally be arriving. Could that be a good thing?
The paradox of work is that many people hate their jobs, but they are considerably more miserable doing nothing.
गेल्या काही दशकांमधे आपल्या
गेल्या काही दशकांमधे आपल्या झालेल्या प्रगतीचा एक भाग हा देखील आहे की techniques of measurement मधे प्रचंड वाढ झालेली आहे. Measuring anything using various metrics, indicators, rankings, index, ratings वगैरे. व यामुळे रॅट रेस चा संवेग जास्त झालेला आहे असे फीलींग येते - असं नाही वाटत ???
यावर @बॅटमन यांना प्रतिसाद देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. :-)
टाईमचा अंक
दोन आठवड्यापूर्वीच्या टाईम मासिकाच्या अंकाचा विषय हाच होता. डेटा माईनिंगवगैरे प्रकार आता स्वस्त झाल्यामुळे निम्नस्तरीय नोकरभरतीसाठीही वेगवेगळ्या चाचण्या सुरु झाल्या आहेत.
http://time.com/3917703/questions-to-answer-in-the-age-of-optimized-hir…
सहमत/असहमत.
प्राचीन काळीही असा प्रकार नक्कीच होत असे-जितके लोक अभिज्ञ असत त्यांमध्ये होतच असे. फक्त अशा लोकांचे प्रमाण कमी असल्याने इन जनरल त्याची धग इतकी जाणवत नसे. त्यात परत किमान भारतात तरी जन्माधारित व्यवसायवाले लोक असल्याने ती रॅट रेस सर्वंकष नव्हती. पण आपापल्या परिघात चालायचीच. या परिघातले त्या परिघात जाईल असे दरवेळेसच होत नसल्याने सद्यकालीन ऑब्झर्व्हरला जुन्या काळी तुलनेने सब शांती शांती है असं वाटू शकतं.
सबबः
१. फरक डिग्रीचा आहे, काईंडचा नाही. (पण हे अंमळ ओव्हरलि बेसिक आहे, याबद्दल वाद आहे असे वाटत नाही.)
२. फरक डिग्रीचा आहे, आणि सिग्निफिकंट आहे कारण अधिक सर्वंकष आहे. कव्हरेज आणि डेप्थ या दोहोंतही-(यद्यपि अठराव्या शतकात सामाजिक टॉपसॉईलमध्ये अंमळ डायव्हर्सिफिकेशन आलेले होते.)
. . ही रॅट रेस भविष्यात
.
.
ही रॅट रेस भविष्यात अधिकाधिक कठिण होत कशी जाणार आहे याबद्दल. तिचे स्वरूप नेमके काय व कसे असू शकेल याबद्दल. हा व्हीडीओ Yogi Berra चे वाक्य - 'It's tough to make predictions, especially about the future.' - लक्षात ठेवून बघितलात तर एक वेगळा दृष्टिकोन मिळेल.
-
-
-
Who will do well & why in future world
फार छान व्हिडिओ आहे. How do you catch & pull ppl's attention - Attention economy (https://en.wikipedia.org/wiki/Attention_economy) हे काही दिवसांपूर्वी वाचले होते.
___
Marketting & Persuation
inspiring ppl, persuading them, connecting with them, managing getting ppl's attention, interpersonal skills
super-soft skill OR super hard skills - will matter.
____
मार्क झुकरबर्ग हा सायकॉलॉजी मेजर होता. अमेझिंग!!!
____
ओह माय गॉड - How keen is the speaker in predicting girl will be chosen as a babysitter. WORTH LISTENING!!
____
उबर म्हणजे? :(
___
ती व्यक्ती वाचत नाहीये तर उस्फूर्त भाषण देतेय. कमाल कमाल आहे!
______
Please Tell me the source - From where do you get such excellent/intellectual/mind-blowing speech videos. I bet you have a great ppl network. That video is too good.
Thanks
भाषण देणारा टायलर कोवन.
भाषण देणारा टायलर कोवन. त्याचा स्वतःचा ब्लॉग आहे. http://marginalrevolution.com/ तिथूनच मिळाला. शॉल्लेट माणूस आहे.
उबर म्हंजे - https://www.uber.com/
आपले काही एथिक्स ठेवायचे की
आपले काही एथिक्स ठेवायचे की मी अमुक अमुक लेव्हलला स्टूप होणारच नाही मग समोरची व्यक्ती कशीही वागो. अन त्या एथिक्स शी प्रामाणिक रहायचे. अपार समाधान मिळते. श्रद्धेचाही खूप उपयोग होतो.