अगं बाई अरेच्चा २ अर्थात एक सुण्दर चीत्रपट
शीर्षकातली चूक मुद्दाम केली आहे, कारण काहीच नाही, एक प्रतीकात्मक विरोध म्हणून. आपण प्रतिकात्मक निषेध्/विरोध करण्यात तसे चँपियन आहोत. परवाची कलबुर्गींची हत्याच घ्या- जाऊ दे, भरकटलो वाटतं.
.
तर "अगं बाई! अरेच्चा भाग २" पाहिल्यावर मन सुन्न झालं.
हा चित्रपट नक्कीच एडिटिंग, काही खास लोकांसाठी असलेले निवडक खेळ, पैसे देऊन बोलावलेल्या पत्रकारांचे रिव्हयूज -असल्या भानगडीतून गेलाच असेल ना?
तेव्हा कुणालाच सांगावसं वाटलं नाही की "बघवत नाही रे चित्रपट, भिकार आहे"
किंवा "एकाही जोकवर हसायला येत नाही हो, काहीतरी करा"
किंवा "महा गचाळ बनवलाय हो चित्रपट.. जरा बघा काही बदलता आलं तर.." ?
=====
सोनाली कुलकर्णी असं का करते? इतका भयानक अभिनय ती नैसर्गिकरित्या कशी करू शकते? काय कल्पना नाही.
बेडेकर लोणचं म्हणजे बेश्ट असं एके काळी म्हणत. मग बरीच लोणची आली. बेडेकरांचं लोणचं काही खास उरलं नाही. तरीही त्या गेलेल्या काळातल्या क्वालिटीला स्मरून आपण अजूनही "बेडेकर म्हणजे काय? प्रश्नच नाही" असं म्हणतोच ना? तेच इथे लागू.
.
हिरो बरा आहे. मागून बघितला तर "अशी ही बनवाबनवी" मधल्या शंतनूसारखा दिसतो. काय पिक्चर होतं राव! काय पिक्चर. त्यात जेव्हा अशोक सराफ मी "प्रेमानं म्हणालो, प्रेमाचं नाही" म्हणतो ते कमाल आहे. अर्थात अश्विनी भावेमुळेच. असो. भरकटेन मी.
.
तर हिरो बरा आहे, प्रामाणिकपणे काम केलंय असं वाटलं.
बाकीचे लोक मात्र पाट्या टाकतात. मुंबईतल्या रिक्षांप्रमाणे आजकाल प्रसाद ओक आणि भरत जाधव कुठेही दिसतात. त्यांना माझा नमस्कार. लहानांना आशीर्वाद.
बाबा कसे आहेत? त्यांना मीठ कमी खायला सां-भरकटलो पुन्हा, सॉरी.
पण एक एकसंध मिनिटभरही ह्या चित्रपटाबद्दल विचार करता येत नाहीये मला..
तर निव्वळ सहनशक्ती वाढवायला म्हणून शेवटपर्यंत पाहिला. असो. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला- खास करून पटकथा लेखकाला कोणी ओळखत असेल तर माझी ही कविता त्यांच्यापर्यंत पोचवा. मला चित्रपट बघून साधारण काय वाटलं ते ह्यात सांगायचा प्रयत्न चित्रपटाच्याच शैलीत केला आहे.
.
प्रतिध्वनीतून गर्जत आला सोटे सैतान
लुळयालेंबळ्या चित्कारांनी सजले आव्हान
मूढ नर्तकी डोळस डोळा पडे पापणीचा
वाजव पुंगी-नको ढोलकी! आग्रह मुरलीचा
पिंपळपक्षी सुरुंगचित्ती मनोर मालाड
अभक्ष्य भक्षण विरूद्ध वैष्णव माडाचे झाड
अब्बा-डब्बा-जब्बा अक्षर सतत गुंगवी का?
विमान घेऊन सदैव उडतो मल्ल्यांचा भाचा
झगमग करण्या दिवाच नसतो गल्लीला ठोका
मिशी मावळे तरी न दिसला गलेलठ्ठ बोका
नितळचावरे पाऊल हसते सुसज्ज अंधारी
दुधाऐवजी पलंगावरी चहा अणिक खारी
कैवल्याचा तुकडा तोडे लिंबाची फोड
पाण्यामध्ये रूसून बसला किडलेला माड
थांब वाचका नकोच वाचू तू पुढली ओळ
मनात ठेवी तूच तुझा तो शंका कल्लोळ
इतकं लिहून मी माझा रिव्यू संपवतो. धन्यवाद.
समीक्षेचा विषय निवडा
प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती
धन्य आहात! कविता खल्लास आहे. ती वाचून जॅबरवॉकीचा मराठी भावानुवाद आठवला:
जबडोबा
प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती
बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.
बाळा! भिउनी जबडोबाच्या दात-नखांना सांभाळा
जबजब पक्षी मक्कड कुक्षी मागे असती, पळा! पळा!
नायक तलवारीला हलवे शत्रू फारा दिवसांचा
तमझाडाच्या खाली बसुनी विचार करितो क्षणिकाचा.
तितुक्या वेळी भडकत डोळे कडकत जबडोबा आला
सरकत झाडीमधुनी घुसला, बुडबुड तोंडी करी साला.
असा हाणला! तसा मारला! घावाने केले तुकडे!
जबडोबाचे डोके घेउनी नायक परते घराकडे.
"जबडोबाची मात जाहली का रे माझ्या प्रिय पोरा?
शुभ दिन आला! तमस निघाला!" आनंदी हसती जोरा.
प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती
बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.
बेडेकरांचा भडंग मसाला मिस
बेडेकरांचागोरेबंधू भडंग मसाला मिस करते.____
भावना पोचल्या.