मदत हवी आहे - भारतीय इंग्रजी रंजक पुस्तकं
केवळ हलकंफुलकं वाचण्यात रस असणार्या एका परदेशी मित्राला काही भारतीय लेखकांच्या इंग्रजी लिखाणासाठी शिफारशी हव्या आहेत. कुणी काही सुचवू शकेल का?
कृपया तातडीनं पुस्तकं सुचवा. मी या बाबतीत ढ आहे (पक्षी: भारतीय + इंग्रजी + रंजक हे मिश्रण! कोणतेही दोन गुणविशेष निवडले तर मला काही तरी झेपेल, पण हे तीन म्हणजे 'डेडली कॉम्बिनेशन' आहे.)
रस्किन बाँड
रस्किन बोंड माझ्या मते भारतीय लेखक आहे. तो भारतीय वंशाचा नसला तरी त्याची अख्खी हयात भारतात गेलेली आहे; शिवाय 'साहित्य अकादमी', पद्म पुरस्कार वगैरे त्याच्या खाती जमा आहेतच. त्यामुळे 'वंशशुचिता' बाजूला ठेवून या नियमातून मी त्याला सूट देईन. वंशशुचितेपेक्षा 'भारतीयत्व' असा काहीतरी निकष ठेवायचं माझ्या मनात होतं, पण मग रश्दी, रोहिंटन मिस्त्रीसारख्या लेखकांचा अपवाद करायला लागला असताच. एकंदरीत, निकष सैल आहेत हे नोंदवू इच्छितो. त्यामुळे तुमच्या मते 'भारतीय लेखन' म्हणून जे सुचवायचं असेल ते खुशाल सुचवा.
बाकी मुद्द्यांना जमेल तेव्हा उत्तरं देईन.
Inscrutable Americans
Inscrutable Americans -- लेखकः अनुराग माथुर. एक जॉजाऊ नावाच्या तालुक्याच्या-गावातील मुलगा अमेरिकेला जातो त्याचे अत्यंत खुमासदार, विनोदी वर्णन असलेले पुस्तक आहे. मी भेट द्यायचे असल्यास हे अनेकदा दिले आहे. बर्याच जणांना आवडते.
नाहितर मग एव्हरग्रीन आर. के. नारायण (स्वामी, मालगुडी बरोबरच द इंग्लिश टिचर, द एकोनीमिस्ट वगैरे ) आहेच :)
३ थरार कादंबर्या
श्री. संजय सोनवणी यांच्या ३ कादंबर्या एकदम थरारपूर्ण आहेत.
अॅमेझॉनवर या ३ इंग्रजी कादंबर्या उपलब्ध आहेत.
अॅमेझॉनवर या तिन्ही कादंबर्यांचे कस्टमर रिव्ह्यूज पण आहेत. त्यांची तुमच्या मित्राला नक्की मदत होईल :)
डेडलीच
हा खरोखर डेडली प्रश्न आहे. अगदी अमेरिकेतल्या एका विद्यापीठात वसाहतोत्तर साहित्याच्या वर्गात विचारल्या सारखा. वरवर अगदी साधा वाटणारा, पण किती किती मूलभूत प्रश्न उभा करणारा!
वांशिक अट का? जास्त ऑथेंटिक वाटेल म्हणून? भारतीय वांशिक म्हणजे नक्की काय? हा तर आर्यांच्या उगमस्थानापासून ते आजच्या भारताच्या सीमेवरच्या सगळ्या वादांना समावून घेणारा प्रश्न. रोहिंटन मिस्त्री, रश्दी सारखे वांशिक-पण-पर्देशस्थ किंवा ऑफ-इंडियन-ऑरिजिनचे चालतील का? का खराखुरा देशी पाहिजे, म्हणजे खराखुरा नक्की काय हे सांगणे पाठोपाठ आलेच. हे उचित आहे, म्हणजे देशी वातावरण हे नक्की काय हे समजून पुस्तक सुचविता येईल...
हलकेफुलके आणि रंजक हे काँबिनेशनही डेडली. हलके म्हटले तर भगत इ. आहेतच, पण फुलके आणि रंजकही पाहिजे म्हटले तर आली पंचाइत! वर सूटेबल बॉय कोणी सुचविले, पण रंचक आवर्जून असले तरी पुस्तक हलके नक्कीच नाही, आकारानेही मेलं जडच आहे. तीच परिस्थिती विक्रम चंद्राच्या सेक्रेड गेम्स ची. ३०० पानांनी लांबले, नाहीतर चांगली हलकी-फुलकी आणि रंजक गोष्ट, वर रहस्यकथा, तपासकथा, थरारकथा वगैरेंना प्राधान्य हे ही यादीत टिक करता येते. चंद्रा स्वत: परदेशस्थ असले तरी नो प्रॉब्लेम, पुस्तकातली शहरी-देशी वातावरण छानच जमले आहे. अॅमझॉन, टिक. सेक्रेड गेम्स पेलवले तर त्याचेच लव अँड लाँगिंग इन बाँबे ही आहे.
भाषांतरित, देशी, रंजक पण नॉट-जड = बंगाली लघुकथालेखक राजशेखर बसू उर्फ परशूराम यांच्या कथा - नमुन्याखातर दोन येथे वाचता येतील. "आनंदीबाई इत्यादी" हा त्यांचा (साहित्य अकादमी पुरस्कृत) कथासंग्रह इंग्रजी अनुवादात चक्क अॅमझॉनवर आहे!
(थोडीशी 'गालात जीभ' समजून वाचावे:-))
इब्ने सफीची पुस्तके
पुस्तकातलं वातावरण प्रामुख्यानं देशी असावं.
लिखाण हलकंफुलकं आणि रंजक हवं.
रहस्यकथा, तपासकथा, थरारकथा वगैरेंना प्राधान्य.
परदेशात अॅमेझॉन वगैरे प्रमाण स्रोतांकडे उपलब्ध असलं तर उत्तम; पण अन्यथा भारतातून ये-जा करणार्यांमार्फत मागवता येईल असं असावं. (थोडक्यात, क्रॉसवर्ड, लँडमार्क किंवा फ्लिपकार्ट वगैरे ठिकाणी उपलब्ध असलं तरी चालेल.)
उर्दूचे प्रकांड विद्वान आणि विचक्षण समीक्षक शम्सऊर्रहमान फारु़क़ी ह्यांनी इब्ने सफीच्या 'जासूसी दुनिया'चे भाषांतर केले आहे. एकूण चार पुस्तके आहेत. तुमच्या निकषांवर बहुधा फिट्ट बसणारी आहेत. ऍमझॉनवर, फ्लिपकार्टवर उपलब्ध.
रंजकता
चेतन भगतच्या पुस्तकांची 'रंजकता' चांगली आहे याच्याशी सहमत.
अडीगा मला तितकासा (खरंतर अजिबात) नाही आवडला
सुधामुर्ती आणि रंजकता? बात कुछ जम्या नही! ;)
अर्थात प्रत्येकाच्या आवडीनुसार हे सापेक्ष आहे. तेव्हा हे लेखन वाईट आहेत असं नाही.. फक्त मला (फारसे) आवडत नाही
असहमत
चेतन भगतच्या पुस्तकांची 'रंजकता' चांगली आहे याच्याशी सहमत.
चेतन भगतचे केवळ 'टू स्टेट्स' वाचले आहे, परंतु त्यावरून त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या लिखाणाबद्दल फारसे चांगले मत बनू शकले नाही. निदान 'टू स्टेट्स'करिता तरी मी 'रंजक' हा शब्द वापरणार नाही; 'स्वस्त' ('चीप' अशा अर्थी, आणि तेही पुस्तकाच्या किमतीच्या संदर्भात नव्हे!) हे विशेषण योजण्याचा मोह मात्र अनावर होतो.
एकंदरीत हे पुस्तक वाचून लेखकाबद्दलचे माझे मत 'स्वतःला फार हुशार समजणारा, ट्रॅश लिहिणारा महामूर्ख माणूस' असे झाले; प्रामाणिक मताबद्दल क्षमस्व. (असे मत का झाले, याबद्दल लिहिण्यासारखे भरपूर आहे, परंतु त्याकरिता लघुनिबंध लिहावा लागेल, आणि तूर्तास तेवढे कष्ट घेण्याची इच्छाही नाही आणि ते 'वर्थ'ही वाटत नाही. पण झालीच उपरती तर पुढेमागे बघू.)
(उलटपक्षी, 'थ्री इडियट्स' हा चित्रपट एकंदर कथानकामुळे, त्याच्या सादरीकरणामुळे आणि मुख्यतः आमीर खानमुळे आवडला - हो, आमची आवड अश्शीच आहे, त्याला काय करणार? हा चित्रपट चेतन भगतच्या 'फाइव्ह पॉइंट समवन'वर आधारित आहे, असे ऐकून आहे. पुस्तक वाचलेले नाही, पण आता 'टू स्टेट्स' वाचल्यावर पुन्हा चेतन भगतचे कोठलेही पुस्तक वाचण्याची इच्छा होत नाही.)
('टू स्टेट्स' या पुस्तकाबद्दल मनापासून काय वाटते हे जर प्रामाणिकपणे आणि सविस्तर लिहू लागलो, तर ते पार्लमेंटरी ठरणार नाही याची भीतीच नव्हे, तर खात्री आहे.)
अडीगा मला तितकासा (खरंतर अजिबात) नाही आवडला
अडिगांचा 'पांढरा वाघ' मला बरा वाटला. रादर आवडला. पण अर्थातच तो प्रत्येकालाच आवडेल असा नाही, कोणाला न आवडणे शक्य आहे, हे समजू शकतो.
असो.
आय.आय.टी.
एकाच धाग्यावर चेतन भगत आणि किरण नगरकर यांची नावं पाहून गंमत वाटली. 'फाइव्ह पॉईंट समवन' अनेकांना त्यातल्या आय.आय.टी.च्या वातावरणाच्या हलक्याफुलक्या चित्रणामुळे रंजक वाटत असावं. 'सात सक्कं त्रेचाळीस'मधला काही भाग हा आय.आय.टी.सदृश एका संस्थेत घडतो. तिथल्या वातावरणात कादंबरीच्या नायकाची होणारी स्थिती भयावह आहे. (मी अशी खरी उदाहरणं पाहिलेली असल्यामुळे कदाचित) मला तो भाग खूप परिणामकारक वाटला होता.
५.कोणीतरी हे पुस्तक
५.कोणीतरी हे पुस्तक विद्यार्थीदशेत वाचल्यामुळे (मनातल्या मनात "हे काय सुरू आहे" असा विचार करत) वाचलं होतं. किंवा वाचवलं गेलं. त्यापुढे चेतन भगतची पुस्तकं म्हटली की "मला इंग्लिशसुद्धा येतं, मी त्याची पुस्तकं का वाचू?" असाच प्रश्न पडतो.
'तीन वेड्यां'चा पिच्चर अगदीच टुकार नाही. बसमधून प्रवास करताना वगैरे लागला असेल तर अगदी डोळे मिटून, कानात प्लग्ज घालून बसण्याची गरज नाही. बरी करमणूक आहे. विद्यार्थ्याची ग्राफिक आत्महत्या आणि प्रसूतीचा सीन अनुक्रमे पूर्ण आणि थोडे कापले असते तर बरंच बरं झालं असतं. सलमान खानला टफ फाईट देण्याचा प्रयत्न करणारे, लाटण्याचे विविध उपयोगही दाखवले नसते तरी चाललं असतं. पण डोक्याला फार ताप करून घ्यायचा नसेल तर 'तीन वेडे' तशी बरी करमणूक करतात.
अनुवादित?
माझ्या माहितीप्रमाणे Seven Sixes Are Forty Three(1974), Ravan and Eddie (1995), Cuckold (1997) ही पुस्तकं मराठीतही वाचायला मिळतील. अनुवाद मूळ इंग्रजीतून मराठी की मूळ मराठीतून इंग्रजीत हे जाणकार सांगू शकतील. The Extras (2012) अलिकडेच प्रकाशित झाले आहे. God's Little Soldier (2006) याबद्दल काही माहित नाही.
आणखी काही शिफारशी
धाग्यात आलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त मला मिळालेल्या इतर काही शिफारशी:
A Nice Quiet Holiday - Aditya Sudarshan
Dreams for the Dying - C.K. Meena
Piggies On The Railway: A Kasthuri Kumar Mystery - Smita Jain
Monochrome Madonna - Kalpana Swaminathan
The Englishman’s Cameo - Madhulika Liddle
The 65 Lakh Heist and Daylight Robbery – मूळ हिंदी लेखकः सुरेंद्र मोहन पटनाईक. इंग्रजी भाषांतरः सुदर्शन पुरोहित.
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
वा
या पैकी एकाही पुस्तकाचे नाव आधी ऐकले नव्हते! सगळ्याच रहस्यकथा आहेत असे दिसते - या पैकी कोणत्या लेखकाबद्दल खास सिफारिश आहे का?
कल्पना स्वामिनाथन चे एक पुस्तक मी आधी वाचलंय असं वाटतं, आता नाव आठवत नाही. मढ आयलंडवरच्या बंगल्यावर मुंबईचे काही हाय-सो मंडळी एकत्र पार्टीला जमल्यावर होणारा खून, इत्यादी. अॅगथा ख्रिस्टी सारखी सुरुवात झाल्यावर मधेच कुठेतरी शोभा डे मार्गे कथानक वळले आणि मग कोसळले, एवढेच आता आठवते.
नवीन लेखक
>>या पैकी एकाही पुस्तकाचे नाव आधी ऐकले नव्हते! सगळ्याच रहस्यकथा आहेत असे दिसते - या पैकी कोणत्या लेखकाबद्दल खास सिफारिश आहे का?
मी यातलं काहीच वाचलेलं नाही. मूळ धाग्यात म्हटल्याप्रमाणे मी या कॅटेगरीत 'ढ' आहे. गेल्या काही वर्षांत 'मेट्रो रीड्स'सारख्या उपक्रमांद्वारे तरुण, शहरी वाचकांना चटपटीत (भारतीय) इंग्रजी लिखाण उपलब्ध करून दिलं गेलं. माझ्या आसपासच्या तरुण-तरुणींमध्ये ते चेतन भगतइतकं लोकप्रिय नसलं तरी बर्यापैकी वाचलं जातंय असं दिसतंय. काहीशा अशाच धर्तीवर इंग्रजीत रहस्यकथा लिहिल्या जाऊ लागल्या असंही दिसतंय. 'हिंदू'मध्ये त्याविषयी आलेला एक लेख संदर्भ म्हणूनः http://www.thehindu.com/life-and-style/metroplus/article504497.ece
जाता जाता: सुरेंद्र मोहन पटनाईक हे आपल्या अर्नाळकर किंवा गुरुनाथ नाईकांसारखे हिंदीतले कल्ट लेखक असावेत. रेल्वे स्टेशनांवर वगैरे त्यांच्या कादंबर्या (हिंदीत) विकायला असतात.
आर. के. नारायण यांची स्वामी,
आर. के. नारायण यांची स्वामी, मालगुडी डेज इत्यादी पुस्तकं चालतील का?
बाकी चेतन भगत आणि अरूंधती रॉय सोडून इतर भारतीयांना इंग्लिश येतं का? ;-)