Skip to main content

मुक्तीद्वार

भगव्या देहाचे मुक्तीद्वार
पाठीवर घेऊन
तो चढत जातो
पहाडी वाट
जाणिव नेणिवेच्या
अनुभुतीची बीजं
विखरुन देत वाटेवर
जात पंथ
धर्म वर्ण
रंग लिंगांतुन
मुक्त होण्यासाठी
स्वताला निर्विकाराने
भारण्यासाठी

पहाडाच्या टोकावर
तो वाट पहातो
मुक्तीद्वार उघडण्याची
बघ मी समाजमितीच्या
सगळ्या संकल्पना
सोडुन आलोय
आदिम होऊन आलोय

तरी ते उघडत नाही
मग देतो ढकलुन
निमिषार्धात
पहाडाच्या टोकावरुन
गडगडत
धडधडत
ते पायथ्याशी येतं

तितक्यात कुठुनसं
भयशुन्य फुलपाखराचं
अस्तित्व लहरत येतं
आणि त्यामागे
कुतुहलाचे पाय घेऊन
एक लुतभरलं कुत्रं
स्वताचं आत्मभान
द्विधा करणारी
खाज विसरुन
वेड्यासारखं झेप घेतं

तडजोडीचं नेमकेपण
नाकारणारी
अंतप्रेरणेची मुळं
आवेगानं दार उघडतात
नी दोघांना सामावून
घेतात
आणि तिथल्या तिथे
ध्यानस्थ ऋषीच्या
डोळ्यांसारखं
दार शांतपणे मिटतं

तो पाहतो उंचावरनं
स्वानुभुतीच्या
व्युहरचनेतनं
स्वयंभु अभावांची
तिरीप येते
आत्मा शरीर मन
चाचपून घेते

तो खाली उतरतो
शांतपणे
मंदपणे
हसत हसत
श्राप भोगत
सिसिफसत

राजेश घासकडवी Sun, 26/02/2012 - 07:42

कविता वाचून जीएंची एखादी रूपक कथा वाचत असल्यासारखं वाटलं. सिसिफसच्या शापाच्या कथेचं तुम्ही मांडलेलं इंटरप्रिटेशन थोडं शब्दबंबाळ वाटलं. साधारण अर्थ लागला तो असा.

आयुष्याचा पर्वत चढताना नक्की शिखरावर कसं जायचं हा प्रश्न असतो. स्वतःचं शरीर भगव्या कपड्यात गुंडाळून स्थितप्रज्ञतेकडे जाण्याचा प्रयत्न काही करतात. अशा बंधनांत स्वतःला ठेवून मुक्ती मिळण्याऐवजी खरी मुक्ती पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या स्वच्छंदीपणात, निरागसतेत आणि कुतुहलात असते. हे उशीरा लक्षात आल्यामुळे पुन्हा स्वतःच्या आयुष्याचं ओझं पर्वतावर ढकलत नेण्याचा शाप सिसिफसप्रमाणे माथी येतो.

नगरीनिरंजन Sun, 26/02/2012 - 08:55

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी नसते तर आमचं काय झालं असतं?
आता अर्थ समजला आहे तर असा अर्थ असलेली कविता लिहीणार्‍या कविचे फारच कौतुक वाटतेय.

हरवलेल्या जहाज… Sun, 26/02/2012 - 13:01

राजेशजी आणि नगरीनिरंजन शतश: आभार. राजेशजी योग्य विवेचन केलंय.

Nile Sun, 26/02/2012 - 13:17

थोडासा उपमांमध्ये गोंधळलो होतो, पण गुर्जींचा प्रतिसाद वाचल्यावर सावरलो.

चिंतातुर जंतू Thu, 01/03/2012 - 17:25

>>"लुतभरलं" चा अर्थ काय? हा शब्द मझ्यासाठी नवीन आहे.

लूत (p. 722) [ lūta ] f A cutaneous disorder, a form of Herpes. - मोल्सवर्थ