जरा जाऊन येतो...
परवा मी मुंबईला अमेरिकेच्या व्हिसासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. रात्रीच्या मुक्कामासाठी बरोबर मोकाशी यांचे पुस्तक नेले होते. त्यातील ‘आता आमोद सुनासि आले’ ही कथा वाचत होतो आणि तिने मला खिळवून ठेवले. त्यात एकाच्या मुलाच्या मृत्यनंतर निर्माण झालेल्या मानसिक अवस्थेचे वर्णन, आणि समांतर अशी दुसरी घटना, जेथे एक गाय व्यायते आहे, अडली आहे, आणि त्यावेळेस होणाऱ्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे, ताण-तणाव यांचे वर्णन असलेली ही कथा न संपवता झोपूच शकलो नाही. गेली ७-८ वर्षे मी मोकाशी यांची पुस्तके जमेल तशी मिळवून वाचतोय. त्यांचा परिचय मला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रांच्या संग्रहाचे खंड वाचताना झाला. त्यात त्यांनी मोकाशी यांच्या कथा, लघुकथा याबाबतीत अनुकूल मत(जे अतिशय दुर्मिळ आहे) नोंदवले होते. मला वाटते त्यांनी ‘देव चालले’ या पुस्तकाबद्दल लिहिले होते. त्यामुळे खरे तर त्यांच्या पुस्तकांकडे वळण्यास सुरवात केली. गेल्या आठवड्यात त्यांचे ‘जरा जाऊन येतो’ हे पुस्तक हाती लागले होते. त्यातीलच वर उल्लेखलेली कथा आहे. हा कथा संग्रहच आहे, पण तो सरोजिनी बाबर यांनी निवडलेल्या कथांचा. त्या आधी कुठे प्रकाशित झाल्या होत्या की काय याचा उल्लेख नाही. हे जरा वेगळेच वाटले. आधी वाचलेले कथासंग्रह मोकाशी यांनीच तयार केलेले होते. परत या संग्रहाला सरोजिनी बाबर यांची छान प्रस्तावना आहे. १९८७ मध्ये प्रकाशीत झालेल्या या पुस्तकाचे निमित्त काय होते हेही समजले नाही. पण प्रस्तावनेतून त्यांच्या बाबतीत, तसेच त्यांची जडण घडण कशी झाली हे समजते.
ते कायम पुण्यात राहिले, त्यांचा छोटासा स्वतंत्र व्यवसाय होता. १९३८-८१ या काळातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय जीवनानुभव यावर सहसा आधारित या कथा आहेत. अतिशय तरल, ललित लेखनाच्या अंगाने जाणाऱ्या, वेगवेगळया शैलीचे घडवणाऱ्या, अतिशय छोट्या छोट्या विषयांच्या, किंवा शुल्लकशा अश्या विषयांच्या आसपास फिरणाऱ्या या कथा आहेत. उदा. ‘आपला-तुपला चहा’ या कथेत विषय असा आहे की एका व्यक्तीला महिनाभर वस्तीला आलेल्या पाहुण्यांनी जेरीस आणले असते. ते बाहेर गेल्यानंतर, त्याला हवा असलेल्या एकांत मिळालेला असतो, पण तो अनुभवता त्याची मानसिक अवस्था म्हणजे ही कथा. ह्या संग्रहात ‘वाया दिवस बालपणीचे’, तसेच ‘डोंगर चढण्याचा दिवस’ हे दोन ललितलेखही आहे, ते या कथासंग्रहात कसा आला हे समजत नाही, पण हरकत नाही. ‘डोंगर चढण्याचा दिवस’ हा लेख वाचून माझ्या सारख्या कायम डोंगर-किल्ले चढणाऱ्याला गंमत वाटली. मीही माझ्या ट्रेकिंगचे अनुभव लिहीत असतो, इतरांचे लेख वाचत असतो, पण हे अगदी वेगळेच वाटले.
२०१५ साल हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्यावर्षी अंतर्नाद मासिकाच्या दिवाळी अंकात मोकाशी यांच्या पत्नीनी लिहिलेल्या आठवणीचा लेख आला आहे. तो त्यांनी दि बा मोकाशी यांच्या मृत्युनंतर १२ वर्षांनी लिहिला होता(१९८१ मध्ये मोकाशी गेले, लेख १९९३चा आहे, आणि १९९४ मध्ये त्यांच्या पत्नीदेखील निर्वतल्या). त्यांच्या मुलीने तो लेख मासिकासाठी दिला होता. तसेच मासिकाने कथा स्पर्धा देखील आयोजित केली होती. त्यांच्या पत्नीच्या लेखात सहजीवनाच्या, कथांच्या जन्माच्या, त्यांच्या लकबी, सवयी इत्यादींचे वर्णन आहे. मी सुरुवातीला उल्लेखलेल्या कथेचे बीज त्यांनी चौक गावात अनुभवलेल्या एका घटनेचे रूपं होते हे (आता परत) वाचून गंमत वाटली. या संग्रहात ‘रोमच्या सुताराची गोष्ट’ नावाची एक गमतीदार कथा, ज्यात, एकाचे गोष्ट सांगणे विविध कारणांमुळे अडते, अडखळते, आणि ती सांगून संपवणे होतच नाही. ह्या कथेचे मूळ मोकाशी पती-पत्नी यांच्या एका हट्टात, खटक्यात आहे हे नमूद केले आहे. पण मला ती गोष्ट, म्हणजे रोमच्या सुताराची, पूर्णपणे काय आहे हे माहीत नाही.
त्यांची इतर काही पुस्तकं मी वाचली आहेत. आदिकथा, वणवा, अठरा लक्ष पावलं इत्यादी. त्यांच्याबद्दल लिहीन कधीतरी परत. पण जी ए कुलकर्णी यांनी प्रशंसलेली ‘देव चालले’ हे पुस्तक काही मिळत नाहीये अजून. त्यांचे अजून एक पुस्तक म्हणजे वात्सायन ही कादंबरी, जी त्याच्या जीवनाचा पट मांडते, तसेच त्याने कामसुत्रे कशी कशी लिहिली याचा देखील तो पट आहे. दि बा मोकाशी यांची कायमच स्त्री पुरुष यांच्या भावविश्वाचा, सहजीवनाचा वेध त्यांनी त्यांच्या कथांतून घेतलेला आहे. या दृष्टीकोनातून हे पुस्तक वाचायला हवे. पाहुयात कसे जमते ते.
समीक्षेचा विषय निवडा
आमोद सुनासि
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b37121&language=ma…
They seem to be selling single stories! $ 0.53!!!
आमची मस्त दोस्ती होती .
माझे दिवंगत वडील आणि लेखक मंगेश पदकी यांच्या दि बां बरोबरच्या मैत्रीमुळे मी दि बां ना अनेकदा त्यांच्या रेडिओ दुरुस्तीच्या दुकानात भेटलो आहे. (माझे वय सुमारे पाच-सहा वर्षे असेल) आमची मस्त दोस्ती होती . त्यांचे तोंड कायम पानाने रंगलेले असायचे . अंगात साधा पांढरा पायजमा आणि शर्ट असायचा. त्यांच्याकडचे एक रिकामे जुने मोठेसे रीळ ते मला बसायला खुर्ची म्हणून देत. त्यावर बसून मी या दोन साहित्यिकांची साहित्यविषयक चर्चा मन लावून ऐकत असे. त्यांचे लेखन मी सर्व वाचलेले आहे. आमोद सुनासी वाचून अजूनही अंगावर रोमांच येतात.
परवा मी मुंबईला अमेरिकेच्या
परवा मी मुंबईला अमेरिकेच्या व्हिसासाठी गेलो होतो.>>>>>
hyaa vaakyaachaa aani tyaa khaali asalelyaa lekhaachaa ekamekaanshi sambandh kaay?
hyaa vaakyaachyaa aivajee lekhakaanee "paravaa mee Udgeeralaa gelo hoto" he vaakya lihile asate tar lekhaachyaa pariNaamaat kaay farak baDataa?
बरोबर आहे तुमचे म्हणणे. मी ते
बरोबर आहे तुमचे म्हणणे. मी ते अगदी सहजपणे, एखाद्याशी जसे आपण बोलतो तसे लिहिले आहे. कृपया गैरसमज नसावा. पण लेखाच्या परिणामाचा मी विशेष विचार केला नाही, जसे वाटले तसे लिहिले...मनमोकळेपणाने. हा ललित लेख आहे की समीक्षा ह्या विचारात मी पडलो होतो लेख प्रकाशीत करताना. पण तुमचा मुद्दा चांगला आहे. लेखाचा , त्यातील वाक्यांचा, काय आणि कसा परिणाम होवू शकेल, काय अपेक्षित आहे, आवश्यक काय आहे, काय नाही, ह्याचा विचार लेख लिहिताना झाला पाहिजे..हे मी आज शिकलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मजोदार वाटतय. आमोद सुनासि
मजोदार वाटतय. आमोद सुनासि बद्दल इकडे Anand More यांचा लेख झाला होता.