Skip to main content

पोस्ट ट्रुथ आणि उत्क्रांती

संकल्पना

पोस्ट ट्रुथ आणि उत्क्रांती

- राजेश घासकडवी

किशनने कहा अरजुन से
न प्यार जता दुशमन से
युद्ध कर

'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?'

वयम् पंचाधिकम् शतम्

…युधिष्ठिराने कृष्णाच्या सल्ल्याने द्रोणाचार्यांना 'नरो वा कुंजरो वा' म्हटलं. आत्तापर्यंत 'केवळ सत्यच सांगणार' असा लौकिक असलेल्या धर्मराजाचा, चार अंगुळे वर तरंगणारा रथ जमिनीवर आला.

महाभारत काळात 'पोस्ट ट्रुथ' हा शब्दप्रयोग अर्थातच नव्हता. पण 'व्यासोच्छिष्टम् जगत सर्वः' उगीच म्हणत नाहीत. पोस्ट ट्रुथ संकल्पनेचे अनेक पैलू महाभारतात जागोजागी दिसतात. कारण ते पैलू कालातीत आहेत. माणूस म्हणून आपण जे कोण आहोत त्या आपल्या अस्तित्वाचाच, आपल्या ओळखीचाच ते अविभाज्य भाग आहेत. हे उत्क्रांतीचं देणं आहे. हे पैलू कुठचे आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ते अपरिहार्यपणे मनुष्याच्या रक्तातच कसे भिनले आहेत हे आपण पाहू.

त्यासाठी पोस्ट ट्रुथची तोडकीमोडकी का होईना, अपुरी का होईना काहीतरी कामचलाऊ व्याख्या करायला हवी. सहा आंधळ्यांची मतं एकत्र करून हा हत्ती नावाचा प्राणी काहीतरी दोरीसारखं, काहीतरी खांबांसारखं, आणि इतरही कशाकशासारखं बाळगून आहे हे समजावून घ्यायला हवं. मग ते भाग कसे जोडले गेले आहेत याचा साधारण अंदाज बांधला, त्याचं चालणं तपासलं की 'हे चार जाड पायांनी चालणारं, सोंड-सुळे-शेपटी वागवणारं प्रचंड ध्यान आहे' असं म्हणता येईल. एवढं समजलं, तरीही हा प्राणी कुठे राहातो, कसा जगतो याबद्दल ठोकताळे बांधता येतील. त्याची सोंड म्हणजे नाक आहे असं समजून, 'कदाचित तो पाण्याचे फवारे उडवू शकत असेल' अशी तपासण्याजोगी भाकितंदेखील करता येतील.

तर या पोस्ट ट्रुथच्या हत्तीचे हाताला लागणारे अवयव कुठचे? त्याचे मुख्य गुणधर्म कुठचे? बिनआंधळ्यांना हत्तीचं वर्णन दोन शब्दांत करायला सांगितलं तर कदाचित 'मोठ्ठा प्राणी' असंच करतील. तसंच दोन शब्दांत पोस्ट ट्रुथचं वर्णन करायचं झालं तर 'अस्मिताधिष्ठित सत्यानुनय' असं करता येईल. मी इथे 'दोन शब्द' म्हणत संस्कृत भाषेतले समास वापरून जास्त आणि कठीण शब्द वापरण्याची चलाखी केलेली आहे, हे वाचकांच्या लक्षात आलेलं असेलच. पण हत्तीपेक्षा अमूर्त संकल्पनेविषयी मी बोलत असल्यामुळे तेवढं चालून जावं. मात्र 'मोठ्ठा प्राणी' यातून जे स्पष्ट चित्र उभं राहातं, त्या स्पष्टतेचा मागमूसही या वर्णनात नाही, ही खरी तक्रार हवी.

'अस्मिताधिष्ठित सत्यानुनय' म्हणजे नक्की काय? थोडक्यात 'माझ्या अस्मितांसाठी जे सोयीस्कर आहे तेवढंच मी सत्य म्हणून स्वीकारणार' ही मनोवृत्ती आणि त्यातून निपजणारी वागणूक.

चला, या पोस्ट ट्रुथ नावाच्या प्राण्याचं सकृद्दर्शनी वर्णन तर झालं. पण हे फारच व्यक्तिगत पातळीवरचं, व्यक्तीकेंद्रित वर्णन झालं. या व्याख्येची, मांडणीची अवस्था त्रिशंकूसारखी आहे. धड ना जमिनीवर ना धड स्वर्गात. मध्येच कुठेतरी अधांतरी अडकलेली. या मांडणीतून आपल्याला 'व्यक्ती असं का वागतात?' या प्रश्नाचं पायाभूत उत्तर मिळत नाही. त्याचबरोबर 'सर्व व्यक्ती असं वागल्या तर त्याचे सामाजिक परिणाम काय दिसतील?' या वरच्या पातळीबद्दलही काही उमजत नाही. तूर्तास आपण या त्रुटी भरून काढण्यासाठी 'आधी कळस मग पाया रे' या न्यायाने परिणामांकडे पाहू. इमारत बांधताना आपल्याला हे करणं शक्य नसतं, पण आधीच तयार असलेल्या इमारतीचा अभ्यास करताना आपल्याला ते स्वातंत्र्य घेता येतं.

सगळेच जण एकाच पद्धतीने वागत असतील तर काही गमतीदार परिस्थिती निर्माण होतात. उत्क्रांतीच्या भाषेत त्याला सर्व्हायव्हली स्टेबल स्ट्रॅटेजी म्हणतात. उदाहरणार्थ, ज्या शहरात सगळ्याच गाड्यांनी जोरात हॉर्न वाजवण्याची पद्धत आहे तिथे पुरेशा जोरात आवाज केला नाही तर पादचारी लक्ष न देण्याची शक्यता असते. त्या शहरांत ध्वनिप्रदूषण वाढतं. याउलट जिथे अकारण हॉर्न वाजवण्याची प्रथा नाही तिथे छोट्याशा आवाजानेही कार्यभाग साधतो. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांत पादचारी किंवा वाहनचालक म्हणून तगून राहाण्याच्या स्ट्रॅटेजी वेगळ्या असतात. प्रत्येक व्यक्ती कशी वागते हे इतर समाज, आणि पर्यायाने त्यातली प्रत्येक व्यक्ती कशी वागते, यावरून ठरतं. म्हणून 'अस्मिताधिष्ठित सत्यानुनय' या नियमानुसार प्रत्येक व्यक्तीने वागायचं ठरवलं तर किंवा बहुतांश व्यक्ती त्यानुसार वागत असतील, तर इतरही त्यानुसार वागतात. किंबहुना ते तसे वागत आहेत या गृहितकानुसार प्रत्येकाला वागणं फायद्याचं ठरतं.

हे फारच धूसर व्हायला लागलं आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे आपण एखादं उदाहरण घेऊ. 'मी एक पुरुष आहे, आणि समाजात स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसं वागावं याबद्दलच्या माझ्या ठाम भूमिका आहेत. इतकंच नाही तर त्या भूमिकांना पाठबळ देणारे अनेक पुरुष आणि काही स्त्रियाही माझ्या माहितीच्या आहेत. तेव्हा तीच भूमिका सत्य आहे. जर कोणी व्यक्ती, विशेषतः एखादी स्त्री, या भूमिकेला विरोध करत असेल, तर त्याचा अर्थ उघड आहे. ती स्त्री फेमिनाझी आहे. स्त्रियांनी दारू पिणं, सिगरेटी ओढणं आणि कोणाहीसमोर मांड्या फाकवणं हाच स्त्रीवाद यावर तिचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे माझी विधानं योग्य आणि तिची त्याज्य आहेत.'

कप्पेबंद, संकुचित विचारसरणीचा पायाच, आपल्यापेक्षा किंचितही वेगळ्या विचारसरणीची व्यक्ती ही कप्पेबंद, संकुचित विचारसरणीची असल्याचा समज करून घेण्यात असतो. काळ्या आणि पांढऱ्याच्या मध्यभागी काही नाहीच असं मानणारी विचारसरणीच राखाडी भागात राहाणारं जग जणू काही काळं किंवा पांढरंच आहे अशी प्रतिमा निर्माण करते. आणि या प्रतिमेची पुन्हा पुन्हा उजळणी झाल्यावर मधलं जग या दोन ध्रुवांमध्ये वाटलं जातं. पोस्ट ट्रुथ विचारसरणीचा हा एक मोठा गुणविशेष आहे. काहीशा वेगळ्या विचारसरणींच्या रंगपटांवरच्यांचं काही मर्यादित खोबणींमध्ये विभाजन. यातूनच 'आपण सगळे, किंचित वेगवेगळे' हा दृष्टिकोन जाऊन 'आपण विरुद्ध त्या खोबणीतले आणि पलिकडच्या खोबणीतले ते' या दृष्टिकोनाला प्राबल्य मिळतं.

आपण चांगले इतर वाईट, म्हणून आपल्याला कळलेलं, आपल्या समाजाचं सत्य हेच 'खरं' सत्य, अशी ही भूमिका आहे. यात एक अध्याहृत गृहितक हे आहे की या भूमिकांपलिकडचं सत्य अशी काही गोष्टच अस्तित्वात नसते. व्यक्तिनिरपेक्ष, समाजनिरपेक्ष, भूमिकानिरिपेक्ष सत्य असं काही नसतंच. सर्वच सत्य हा विश्वासाचा मामला आहे. माझे विश्वास खरे, इतरांचे खोटे. म्हणून माझं सत्य खरं, आमचं सत्य खरं. इतरांचं खोटं का? कारण ते आमच्याविरुद्ध आहेत. खऱ्याच्या विरुद्ध जाणारं ते खोटंच! काळं आणि पांढरं यांच्या मधला विभाग नाकारला की पांढरं नाही ते काळं हे उघडच नाही का? त्यामुळे आम्ही पांढरा बाळगलेला आहे, याचा अर्थच इतरांकडे काळा आहे. 'आपण आणि इतर' हे ध्रुवीकरण हे पोस्ट ट्रुथ वातावरणाचं मोठं अंग आहे.

गोरे लोक काळ्यांपेक्षा व इतर वर्णांपेक्षा श्रेष्ठ. ब्रिटिश लोक हे इतर युरोपियांपेक्षा वरचढ. हिंदूंची पिछेहाट होत असून या हरामखोर मुस्लिमांचं लांगूलचालन गेली पासष्ठ वर्षं झालेलं आहे. ही तीन गृहितकं गेल्या पाच वर्षांत अमेरिका, ब्रिटन आणि भारतात झालेल्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाबाबत देण्यात येतात. या ध्रुवीकरणामागे 'आपण विरुद्ध ते (हरामखोर)' हीच विचारसरणी आहे.

किशनने जेव्हा अर्जुनाला दुश्मनांशी प्यार जताऊ नकोस, मुकाट्याने युद्ध कर, असं सांगितलं, तेव्हा दुश्मन कोण हे ठरलेलं होतं. पांडवांची बाजू सत्याची होती आणि कौरव व्हिलन होते, असं पांडवांच्या विजयानंतरचा इतिहास सांगत असला तरी व्यासाने ते इतकं निःसंग्दिग्ध ठेवलेलं नाही. पांडव वनवासात असताना 'सुयोधन उत्तम राज्य चालवून आपल्या प्रजेला सुखी ठेवतो आहे' अशी काळजी युधिष्ठिराने व्यक्त केलेली आहे. व्यासाला अर्थातच या काळ्या-पांढऱ्यामधल्याची जाण होती. पण त्याने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांना, 'आपलाच पक्ष सत्याचा' असं वाटत होतं. त्यामुळे 'दुश्मन कोण?' या प्रश्नाचं उत्तर 'आपल्याविरुद्ध उभे राहातात ते' इतकं सोपं होतं. हे उत्तर मिळालं की ते कोण आहेत याचा विचार न करता लढणं, आणि पर्यायाने दुश्मनांना नष्ट करणं हाच एक पर्याय उरतो. योद्ध्याचं ते कर्तव्य आहे, हीच शिकवण कृष्ण देतो.

आपल्या समाजाचं सत्य तेच आपलं सत्य यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारे आसपास दिसतात. पण त्याहीपलिकडे या विश्वासांचा गैरफायदा घेत, ते बाळगणाऱ्यांच्या भावना भडकवणारे नेतेही या पोस्ट ट्रुथ वातावरणाचे अविभाज्य अंग बनतात. पण नेते हे केवळ उपस्थित प्रक्षोभाचे, विचारांचे, अस्मितांचे प्रतिध्वनि असतात. जर त्यांच्या आवाजात अनेकांच्या भावनेला हात घालण्याची क्षमता नसेल तर नेतृत्व या शब्दाला काही अर्थ राहात नाही. पण या भावनांना आवाहन करता येण्यासाठी मुळात त्या मनामनांमध्ये असायला लागतात. हिटलरने ज्यूंविरुद्ध अख्खा समाज आणि नंतर राज्याची यंत्रणा उभी केली, ती पोकळीतून निर्माण केली नाही. जर्मन समाजाच्या मोठ्या भागात ज्यूद्वेष आधीच खदखदत होता. त्याने त्या द्वेषाला खतपाणी घातलं, जोपासलं, फुलवलं. पण मुळात ती रोपटी आणि सुपीक जमीन होतीच.

थोडक्यात, पोस्ट ट्रुथ वातावरणासाठी दोन मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. १. आपण विरुद्ध ते ही भावना, आणि परक्यांची भीती. २. सत्याची सापेक्षता आणि आपल्या समाजाला सोयीचं सत्य निवडण्याकडे कल. या दोन्ही गोष्टी उत्क्रांतीतून आपल्याकडे आलेल्या आहेत. कशा ते आपण पुढे पाहू.

आपण विरुद्ध ते

चिंपांझी हे आपले जवळचे भाऊबंद. मेंदूचा आकार लहान आहे म्हणून तंत्रज्ञान आणि भाषा याबाबतीत आपल्या मागे आहेत, हे सोडलं तर इतर अनेक बाबतीत माणूस आणि चिंपांझींच्या लागण्यात साम्य आहे. तेही टोळ्यांनी राहातात. टोळीचा मुख्य नर नायक (अल्फा मेल) असतो. गंमत म्हणजे तो सर्वात शक्तिवान म्हणून नायक बनत नाही, तर टोळीत आपली गँग तयार करू शकतो म्हणून बनतो. टोळीतली राजकारणं प्रत्येकासाठी महत्त्वाची असतात. अख्खी टोळी मिळून आपला इलाका जपते. यात मुख्य भाग म्हणजे इतर टोळ्यांमधून जर कोणी चुकून किंवा जाणूनबुजून आपल्या इलाक्यात शिरलं तर त्याला ठार मारणं. यापलिकडे जाऊन इतर टोळ्यांवर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करणं हेही चिंपांझींमध्ये चालतं. आणि हे हल्ले केवळ एखाददोन घटनांपुरते मर्यादित नसतात. सत्तरच्या दशकात जेन गुडॉलने सतत चार वर्षं चाललेल्या युद्धाचं वर्णनकेलेलं आहे. यात विरुद्ध कळपावर हल्ला करण्याऐवजी एकट्यादुकट्याला धरून निर्घृणपणे ठार करण्याची वर्णनं आहेत.

मानवाचा इतिहासही टोळीमध्ये राहाण्याचा इतिहास आहे. सिंह जसा आपल्या शक्तीमुळे एकटा जगू शकतो तसं माणसाचं नाही. टोळीमध्येच माणसाची शक्ती दडलेली होती. जसजसा माणसाचा मेंदू मोठा झाला, अधिक परिणामकारक आयुधं हाती आली तसतसा टोळीत असण्याचा फायदा वाढत गेला. आणि टोळीतून बाहेर पडण्याचे तोटे वाढत गेले. कारण सगळ्याच टोळ्या अधिकाधिक टोळीकेंद्रित व्हायला लागल्या. ज्या झाल्या नाहीत त्या मेल्या, किंवा त्यांचा विकास झाला नाही. त्या काळात व्यक्तीकेंद्री बनवणारी जनुकं झडून जाणं सोपं होतं. टोळीबरोबर राहाण्याची इच्छा, क्षमता निर्माण करणारी जनुकं फोफावली.

टोळी म्हणजे 'आपण' आणि टोळीबाहेरचे 'ते' असं ध्रुवीकरण साहजिकच झालं. आता आपण आणि ते वेगळे कसे ओळखायचे? अर्थातच एकत्र वाढल्यामुळे मैत्रीची नाती निर्माण होतात. मैत्री नसली तरी चेहरे पाहून ओळख होतेच. शंभरच्या अलिकडे लोकसंख्या असेल तर सगळे सगळ्यांना ओळखतात. त्याहीपलिकडे, एकाच टोळीतले लोक एकमेकांचे दूरचे का होईना नातेवाईक असत. त्यामुळे काहीएक सारखेपणा त्यांच्यात असे. त्यामुळे आपल्यापेक्षा रंगाने, चेहरेपट्टीने, अंगकाठीने वेगळी ती परकी, हे समीकरणही मांडता येत असे. मेंदूचा आणि भाषेचा पुरेसा विकास झाल्यावर आपल्या पंचक्रोशीतल्या टोळ्यांना नावं देणं, त्यांचे गुणधर्म, पेहराव लक्षात ठेवणं यातूनही परके कोण यांची नोंद ठेवणं सोयीचं झालं. शेतीच्या शोधानंतर टोळ्या स्थिरावल्या. मोठ्या झाल्या. आता सगळे सगळ्यांना ओळखत नसल्यामुळे टोळ्यांची नावं महत्त्वाची ठरायला लागली.

वरच्या वर्णनातून लक्षात येईल की आपण ज्याला आज अस्मिता म्हणतो, ते दुसरंतिसरं काही नसून टोळीवृत्ती आहे. जाती, धर्म, भाषा, लिंग, वर्ण या निकषांवर 'आपण आणि ते' अशी विभागणी करून 'त्यां'चा द्वेष, दुस्वास करणं किंवा प्रसंगी त्यांचा नायनाट करण्यासाठी तयार होणं हे आपल्या जनुकांमध्येच आहे.

सत्याची सापेक्षता

जीएंच्या 'विदूषक' कथेत सत्य म्हणजे काय, ते कसं दिसतं याबाबत मोठा ऊहापोह केलेला आहे. त्यातली नायिका म्हणते, 'ओल्या रेतीवर चालताना माझ्या पावलांच्या खुणा उपटून त्यात पाणी साठावं, आणि त्यात चंद्रबिंब दिसावं, तसं मला सत्य दिसतं. ते माझं आणि केवळ माझंच असतं.'

ही कथा विसाव्या शतकात लिहिली म्हणून त्यांना कोणाच्यातरी तोंडी असा संवाद घालायला लागला. नाही तर स्वतः शोधलेल्या, अनुभवलेल्या सत्यापेक्षा वेगळ्या जातकुळीचं, व्यक्तिनिरपेक्ष असं सत्य असतं ही कल्पनाच तशी गेल्या एकदोन सहस्रकांपूर्वीची. तिने जोर धरला तो गेल्या शतका दोन शतकांतच. त्याआधी जगाचं आकलन म्हणजे आईवडिलांनी दिलेली शिदोरी, आणि पुढच्या आयुष्यात टक्केटोणपे खात कमावलेलं संचित. जेमतेम शंभरातल्या एखाद-दोघांना लिहितावाचता यायचं. जे काही तुटपुंजं ज्ञान होतं, ते मुख्यतः तंत्रज्ञान असायचं - शेती, लोहारकाम, सुतारकाम, घरकाम इत्यादी. त्यामुळे ज्ञानप्राप्ती ही आपल्या कोणातरी जवळच्याकडून - कुटुंबातल्या किंवा टोळीमधल्या व्यक्तीकडून - व्हायची. त्यांची उक्ती लक्षात ठेवणं आणि कृतीचं अनुकरण करणं हाच ज्ञानमार्ग. त्यामुळे सत्य हे टोळीकेंद्रित, टोळीचं सत्य असे. यात समूहाचं शहाणपण असेच - जगण्यासाठी काय करावं, समाजात कसं वागावं, कुठच्या मोसमात होडी बाहेर काढावी, कुठची फळं विषारी - अशा अनेक उपयुक्त गोष्टी त्यात असत. त्यामुळे टोळीचं म्हणणं न ऐकणारांचं भलं होण्यापेक्षा बुरं होण्याचीच शक्यता अधिक. अशा परिस्थितीत उत्क्रांतीच्या नैसर्गिक निवडीतून टोळीकेंद्रित सत्यावर ठाम विश्वास ठेवणारे मेंदू टिकले नाहीत तरच नवल.

आपण विरुद्ध ते आणि टोळीचं सत्य हेच अंतिम सत्य ही दोन्ही तत्त्वं वेगळी म्हणून मांडलेली असली तरी ती एकमेकांशी संबंधित आहेत. एकमेकांना पूरक आहेत - जिराफाची मान लांब होणं आणि त्याचे पुढचे पायही उंच होणं हे जनुकीयदृष्ट्या वेगळं असेल कदाचित पण त्यातून जिराफासाठी एकच ध्येय साध्य होतं, तसंच. या दोन्हींमुळे आसपास पसरलेल्या टोळ्यांमध्ये ध्रुवीकरणाचं प्रमाण वाढतं, परके म्हणजे शत्रू आणि आमचं खरं त्यांचं खोटं ही भावना बळावते. या बाबतीत कट्टर असणाऱ्या टोळ्या कणखर राहिल्या, युद्धांसाठी पुरेशी शक्ती आणि क्रौर्य गोळा करू शकल्या. अर्थातच टिकून राहिल्या.

आज आपण लहानलहान टोळ्यांत राहात नाही. काही मोजक्या पण महाकाय टोळ्यांच्या क्लबचे मेंबर असतो. टोळीशी असलेली निष्ठाही पूर्वीइतकी कठोर असण्याची गरज नसते. इतर टोळ्यांच्या हातून आपण मारले जाऊ, याची शक्यताही खूपच कमी झालेली असल्यामुळे काहीसे सैलावलो आहोत. शिक्षण, कायदासुव्यवस्था, प्रवास यामुळे सर्वच टोळ्यांनी हत्याकांडांचं प्रमाण कमी केलं आहे. गावकीची वाळीत टाकण्याची शक्ती शहरीकरणामुळे कमी झालेली आहे.

हा बाहेरच्या वागणुकीचा सुंभ जळाला असला तरी मनातला पीळ अजून शाबूत आहे. अजूनही पूर्वग्रह चिवट आहेत. 'अमुकतमुक जातीची लोकं घाणेरडी असतात' असे समज शिल्लक आहेत. हिमनगाच्या टोकासारखे ते दिसतात. इंटरनेट क्रांतीमुळे मात्र गेल्या दशकात ही परिस्थिती ढवळून निघालेली आहे. शहरात सहज न सापडणारी आपली भावकी, आपली टोळी, फेसबुकावर किंवा ट्विटर ग्रुपमध्ये सहज सापडते. आपल्या अस्मितांना सुखावणारी तेवढी सत्यं मांडता येतात, वाचता येतात. घरबसल्या आपल्याला काहीकाळ त्या जंगली, रानटी टोळीचा एक भाग असल्याचा अनुभव घेता येतो. त्यांच्या कर्कश आवाजात आपला आवाज सामील करून घेता येतो. या आदीम आनंदांपोटी आपल्याला टोळीप्रवृत्ती वाढताना दिसते. या जन्मजात असलेल्या टोळीनिष्ठेपोटी या आंतरजालाला चिकटलेले सोयीस्कर सत्यांचे तुकडे घेऊन आपल्याला टोळीच्या सत्याचं हवं तसं मिथक विणता येतं. आपण केलेला अन्याय 'मग, तेव्हा तुम्ही तसं केलं होतंत त्याचं काय?' हा कृष्णाचा प्रश्न विचारून न्याय्य ठरवता येतो. आपल्यावर केलेल्या टीकेवर विचार करण्याऐवजी 'त्यांनी असं केलं, त्यांना का नाही जाब विचारत?' अशा ढालींनी तिचे वार परतवता येतात. टोळीतल्या दुफळ्या तात्पुरत्या मिटवून इतर टोळ्यांविरुद्ध 'पंचाधिकम् शतम्' म्हणता येतं. 'आपली टोळी, आपलं सत्य' या न्यायाने बहुतेक वेळा आपला नेता खोटं बोलतो, विसंगत वागतो हेच लक्षात येत नाही. जेव्हा ते येतं, तेव्हा धर्मराजालाही नाईलाजाने चांगल्या कामासाठी खोटं बोलावं लागलं होतं, अशी स्वतःची समजूत घालता येते.

उत्क्रांतीतून आपल्याकडे आलेल्या टोळीमानसिकतेच्या हिमनगाचा मोठा भाग इतका काळ पाण्याखाली दडलेला होता. इंटरनेट क्रांतीने या समुद्राचं पाणीच अचानक जड करून ढवळलेलं आहे. त्यामुळे हा झाकलेला भाग - अस्मितांच्या उथळ प्रदर्शनांसकट, कट्टरतेसकट, क्रौर्य आणि हिंस्रतेसकट घुसळून वर आलेला दिसतो आहे. हा वाढता कोलाहल अजूनच कर्कश होणार अशी नजीकच्या काळात तरी चिन्हं आहेत. दशकांनंतर काय होईल कोण जाणे.

विशेषांक प्रकार

बॅटमॅन Tue, 17/10/2017 - 21:30

टोळीवृत्ती हीच चिरंतन असते याबद्दल तहे दिलसे सहमत. ॲकॅडेमियातील डाव्यांच्या टोळभैरवी वृत्तीबद्दलचे काही रोचक लिखाण या निमित्ताने आठवले.

https://www.theatlantic.com/politics/archive/2016/04/conservatives-disc…

चिंतातुर जंतू Wed, 18/10/2017 - 19:52

In reply to by चिमणराव

पोस्टट्रुथ शब्द/ संकल्पना नक्की कोणत्या घटनेनंतर चर्चेत येऊ लागला?

संपादकीयात ऑक्सफर्ड डिक्शनरीचा दुवा आहे तिथे पाहा.

मारवा Wed, 18/10/2017 - 21:54

यांची एक जबरदस्त फिरकी घेतल्याचा व्हीडियो बघितलेला आहे.
हा दुवा
https://www.youtube.com/watch?v=pFJaZjYat1w
खरे तर अजुन डिटेल व्हीडियो आहे बघितलेला पण तो काय सापडत नाही.
पोस्ट ट्रुथ वरुन उत्तम दर्जाची झुंज झालेली आहे इतके नक्की शोधावे लागेल्

राज्यसभा टिव्हीवर सरोकार कार्यक्रमात पोस्ट ट्रूथ संकल्पनेवर फार उत्तम चर्चा झाली होती. तीबद्दलच म्हणता आहात का?
त्या शोची लिंक सापडली की देतो.

टवणे सर Fri, 20/10/2017 - 08:02

उत्क्रांती, मनुष्याची नैसर्गिक जडणघडण व टोळीत/समुहात राहण्याच्या आपल्या आदीम वृत्तीला आजच्या हायपर-कनेक्टेड जगात मिळालेली नवी 'हवा' याचे फारच छान विवेचन लेखकाने केले आहे. आवडला हा लेख.

मारवा Sat, 21/10/2017 - 16:21

लेखातील मांडणी सुस्पष्ट असल्याने आवडला. पोस्ट ट्रुथ म्हणजे नक्की काय समजण्यास मदत होते.
'अस्मिताधिष्ठित सत्यानुनय' म्हणजे नक्की काय? थोडक्यात 'माझ्या अस्मितांसाठी जे सोयीस्कर आहे तेवढंच मी सत्य म्हणून स्वीकारणार' ही मनोवृत्ती आणि त्यातून निपजणारी वागणूक.

ही व्याख्या फार आवडली. पण एक संशय असाही आहे की जे पोस्ट ट्रुथ संकल्पनेचा वापर करतात त्यांना ही व्याख्या पुर्णपणे कदाचित मान्य होणार नाही. पोस्ट ट्रुथ चे समर्थक सर्वसाधारणपणे एका प्रचारीत सत्या सोबतच पुढे मागे एक समांतर सत्याचे अस्तित्व ही असते ज्याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक केली जात असते वा त्याला दडपले जात असते असे ही मानतात. म्हणजे टोळी केंद्रीत जसा विचार वरील लेखात व्यक्त झालेला आहे तितकीच पोस्ट ट्रुथ ची व्याप्ती कदाचित अभिप्रेत नसावी तो जरी एक महत्वाचा भाग असला तरी.
दुसरा मोदी सरकार विरोधात खास करुन हा जो पोस्ट ट्रुथ संकल्पनेचा प्रसारमाध्यमातुन वापर केला जातो तो कुठेतरी
१- काही प्रमाणात दांभिक मला वाटतो.
२- लुजर्स लोकांनी पोस्ट ट्रुथ सारखी मौल्यवान संकल्पना हायजॅक करुन गैरवापर केल्यासारखा ही वाटतो.
३- लोकशाही मुल्यांना पोस्ट ट्रुथ च्या संकल्पनेचा बेजबाबदार वापर केल्याने धोका निर्माण होतोय असे वाटते.
पोस्ट ट्रुथ ला मुळ सत्यातल्या मुख्य प्रवाही सत्यातील फटी सुटलेले दुवे जोडुन पुर्ण सत्याला मदत होइल इतपत दिलेले महत्व ठिक वाटते.
पण आम्ही म्हणु ते पोस्ट ट्रुथ हे जरासे गंमतीदार व धोकादायक ही वाटते. विरोधी पक्षाचे लोकशाही यंत्रणेतील महत्व ही पोस्ट ट्रुथ चे अस्तित्व मान्य असण्यातुनच आहे.
अमेरीकेने इराक मध्ये रासायनिक शस्त्रे आहेत चा प्रचार मला पोस्ट ट्रुथ चे उत्तम उदाहरण वाटते.
टोळी च्या मानसिकतेच्या बाबतीत सहमत आहे. डोनाल्ड ठाकरे असोत वा राज ट्र्म्प आपण आणि ते सर्वत्र अनुभवास येतेच.
-

राजेश घासकडवी Sat, 21/10/2017 - 16:56

In reply to by मारवा

'आम्ही म्हणू ते पोस्ट ट्रुथ' याचा अर्थ मी असा घेतो आहे की पोस्ट ट्रुथ या शब्दाचा गैरवापर काही लोक करून स्वतःच पोस्ट ट्रुथी वागणूक करत आहेत. हे शक्य आहे. मात्र म्हणून ही संकल्पनाच बाद ठरत नाही.

'मोदी सरकार पोस्ट ट्रुथी आहे' हा आरोप फारच थोडे लोक करतात. कारण हा शब्दच फार लोकांना माहीत नाही. पण हिंदूंच्या अस्मितेला खतपाणी घालण्याचे प्रयत्न धोरणात्मक, प्रतीकात्मक आणि अंडर द टेबल पातळीवर चालू नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? इतिहासाच्या पुस्तकांचं पुनर्लेखन, पुराणातल्या विमानांवरच्या कॊन्फरन्सेस, विचारवंत वर्गाचं तुच्छीकरण, माध्यमांवर ताबा तसंच माहिती देणार्या पत्रकारांना प्रेस्टिट्यूट म्हणून शिव्या देणं, ट्रोलसेना बाळगून आपल्या विरुद्ध लिहिणारांवर हल्ले वगैरे अनेक गोष्टी पोस्ट ट्रुथ वर्णनात फिट्ट बसतात. इतर देशांतही हेच चालू आहे, भारतात आधीच्या सरकारांनीही असल्या गोष्टी केल्या. आणि या सगळ्यामागे 'आपलं म्हणणं सत्य म्हणून पुढे आलं पाहिजे, त्यांना खोटं पाडलं पाहिजे' हीच प्रबळ भावना असे.

मारवा Sat, 21/10/2017 - 18:32

In reply to by राजेश घासकडवी

पण हिंदूंच्या अस्मितेला खतपाणी घालण्याचे प्रयत्न धोरणात्मक, प्रतीकात्मक आणि अंडर द टेबल पातळीवर चालू नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का?
माझे असे म्हणणे अजिबात नाहीये. मोदी सरकार याहुन ही गंभीर प्रकार उदा. न्यायपालिकेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न कॉलेजियम ला रीप्लेस करण्याच्या आक्रमक प्रयत्नांतुन करत आहे जे बहुधा पहील्यांदाच होत आहे.

हे शक्य आहे. मात्र म्हणून ही संकल्पनाच बाद ठरत नाही.


मी स्वत: वरील प्रतिसादात पोस्ट ट्रुथ ही मौल्यवान संकल्पना आहे असे म्हणालो आहे.
माझा आक्षेप असा आहे की पोस्ट ट्रुथ या संकल्पनेचा काही प्रसारमाध्यमांकडुन एका हत्यारासारखा गैरवापर करण्यात येत आहे.
तो बीजेपी मोदी सरकार विरोधात आहे म्हणुन आक्षेप नसुन तो लोकशाही मुल्यांच्या विरोधात काही ठीकाणी जात आहे. जनतेच्या निर्णय विवेकक्षमते वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे यावर आक्षेप आहे.
तुम्ही एकदा लोकशाही मुल्ये स्वीकार केल्यावर जणु कोट्यवधी लोकांना सत्य माहीतच नाही केवळ आम्हीच सत्याला जाणले आहे अशा अविर्भावात जे मांडले जात आहे ते गडबड आहे.
शिवाय त्यामागेही राजकीय प्रेरणा असल्याने म्हणजे तो राजकीय प्रेरीत मिडियाकडुन येत असल्याने त्यातला इन्टेलेक्च्युअल विरोध ही शंकेच्या परीघात येतोच. म्हणजे हे कळत नाही की हा राजकीय विरोध आहे की ऑथेंटीक इन्टेलेक्च्युअल विरोध आहे. आता गणेश देवींचा विरोध मला ऑथेंटीक वाटतो बरखा दत्त चा नाही.
सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट या संकल्पनेचा गैरवापर करण्यात आला तसाच पोस्ट ट्रुथ चा ही गैरवापर निश्चीतच होतोय आणि टारगेट वर मोदी सरकार आहे की नाही हे महत्वाचे नसुन लोकशाही मुल्ये आहेत हे महत्वाचे आहे.
.

चिमणराव Sat, 21/10/2017 - 17:58

>>विचारवंत वर्गाचं तुच्छीकरण,>>

पण हे असं कधी आपलं होणारच नाही असा समज विचारवंतांनी बाळगला होता. सत्य म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टी. त्या डुबल्यानंतर जो विचारजंत वर्ग होता तो यांना तुच्छ मानू लागला. किरण नगरकरांच्या भाषेत विष मंथनातून बाहेर येणे हे सत्य. शंकराने ते रिचवल्यावर मिळालं बळ. पण नंतर बरेच राहू अमृत पिऊन तट्ट झाले असते तर जे वातावरण निर्माण झालं असतं ते पोस्टट्रुथ.

राजेश घासकडवी Sat, 21/10/2017 - 18:51

In reply to by चिमणराव

विचारवंत वर्गाला तसंही फार मानाचं स्थान नसतं. अगदी चिं. वि. जोश्यांनीही 'लिबरल हा हतबल असतो' असं म्हटलेलं होतंच. टिळक आणि आगरकर वादात टिळकांचाच जय झाला. या लेखातही 'उत्क्रांतीतून व्यक्तिनिष्ठ सत्य बाळगण्याचाच कल निर्माण झाला' असा युक्तिवाद आहे.

बाकी ते शंकर, राहू, केतू वगैरे रूपक नीट कळलं नाही.

चिमणराव Sun, 22/10/2017 - 05:14

>>शंकर, राहू, केतू वगैरे रूपक>>
'उत्क्रांतीतून व्यक्तिनिष्ठ सत्य बाळगण्याचाच कल निर्माण झाला' किंवा 'उत्क्रांती म्हणजेच व्यक्तिनिष्ठ सत्य बाळगणारी एका स्पिशिजची टोळी.
फुलपाखरे फार झाली- त्यांना खाणारे पिक्युलेट पक्षी- त्यांना फसवण्यासाठी अथवा खाऊ नये म्हणून विषारीपणा ,भडक रंग.
देव दानवांच्या टोळ्या ( माफ करा)- इथे एकाला नव्हे तर टोळीतल्या प्रत्येकाला अमृत हवे-वाटा मिळवण्यासाठीची भांडणे आणि खटपट असे रुपक.

गब्बर सिंग Mon, 23/10/2017 - 20:00

पोस्ट ट्रुथ बद्दल माझं प्रमुख जे म्हणणं आहे ते अधोरेखित केलंत त्याबद्दल धन्यवाद. पोस्ट ट्रुथ मधे नवीन काहीही नाही. पोस्ट ट्रुथ हे काही मे-२०१४ पासून किंवा जाने-२०१७ पासून सुरु झालेले नाही. ते आपल्या जनुकांमधेच आहे. व हे युगानयुगे चालत आलेले आहे. व यापुढे सुद्धा चालू राहील.

धनंजय Tue, 24/10/2017 - 02:30

In reply to by गब्बर सिंग

हे असेच होते आणि आहे. हे असेच चालू राहील.

हा सारांश "Everything Should Be Made as Simple as Possible, But Not Simpler" उक्तीच्या "But Not Simpler" क्षेत्रात पोचलेला आहे.
हाच सारांश भौतिकशास्त्राच्या सर्व गणितांना/नियमांचा मानता येतो. म्हणजे आर्किमिडीसपूर्व, न्यूटनपूर्व, न्यूटनोत्तर सर्व प्रकारच्या शास्त्रांचा सारांश "भौतिक घटना या अशाच घडतात आणि अशाच घडत राहातील" असा काढता येतो. परंतु वेगवेगळ्या काळच्या सिद्धांतांचा आणि गणितांचा आधार घेऊन वेगवेगळी यंत्रे रचता येतात, आणि अन्न-वस्त्र-निवारा मिळण्यात फरक पडू शकतो.

"हे जे उपजत जाणिवेने (जेनेटिक इन्स्टिन्क्टने) असेच चालू होते, त्याच्या तपशिलांत कालांतराने फरक पडतो -- तसे घडण्याची परिस्थिती वेगळी काळा-काळात वेगळी कशी, आणि त्यामुळे तपशिलवार फरक सुसंगत कसे? याबाबतचे ज्ञान कालातीत नव्हे, तर वाढणारे असते. "या परिस्थिती-तपशील जोडीतील कुठला बदल मला फायदेशीर आहे? कुठला बदल करणे माझ्या आवाक्यात आहेत? अशा प्रकारचे वैयक्तिक आणि सामूहिक निर्णय नवीन-नवीन ज्ञानाबरोबर बदलत राहातील.

राजेश घासकडवी Tue, 24/10/2017 - 04:19

In reply to by गब्बर सिंग

माझं म्हणणंही धनंजयप्रमाणेच आहे. मी तेच थोडं वेगळं उदाहरण देऊन सांगून पाहातो.

'हिंसेला मानवी उत्क्रांतीचा पाया आहे. टोळीची जाणीव, आपण विरुद्ध ते ही जाणीव यांचीही मुळं उत्क्रांतीत शोधता येतात. तेव्हा टोळ्यांमधली युद्धं ही कायमच होत आलेली आहेत, यात काहीच नवीन नाही.'

मात्र हाच युक्तिवाद करत जर कोणी पहिल्या महायुद्धाच्या वेळी करत म्हटलं असतं 'ह्या, महायुद्ध महायुद्ध म्हणण्यात काहीच अर्थ नाही. महायुद्ध काही 1914 पासून सुरू झालेलं नाही, ते कायमच चालू आहे.' तर ते अपुरं ठरेल. युद्धं करणं हे माणसाच्या रक्तात असलं, तरी महायुद्ध का झालं याची स्वतंत्र आणि वेगळी कारणं असतात. सगळंच सोपं करून इतर युद्धं आणि महायुद्ध यात फरकच नाही असं म्हणणं म्हणजे वैचारिक आळस ठरतो.

गब्बर सिंग Tue, 24/10/2017 - 07:56

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जी, मुद्दा बळकट आहे तुमचा. सिरियसली.

---

थोडक्यात, पोस्ट ट्रुथ वातावरणासाठी दोन मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. १. आपण विरुद्ध ते ही भावना, आणि परक्यांची भीती. २. सत्याची सापेक्षता आणि आपल्या समाजाला सोयीचं सत्य निवडण्याकडे कल. या दोन्ही गोष्टी उत्क्रांतीतून आपल्याकडे आलेल्या आहेत. कशा ते आपण पुढे पाहू.

जिना यांनी पाकिस्तानची मागणी केली व त्यातून फाळणी घडली. त्यात आपण (मुस्लिम) विरुद्ध ते (हिंदु) अशी भावना प्रबल व पायाभूत होती. व दुसरं म्हंजे आपल्या समाजाला (मुस्लिमांना) सोयिस्कर असं सत्य निवडण्याकडे कल पण होता की ब्रिटिश जेव्हा भारत सोडून जातील तेव्हा स्वतंत्र भारतात .... मुस्लिम हे हिंदूंचे गुलाम होतील व म्हणून अखंड भारतातील मुस्लिमांनी त्यांचं म्हणणं ऐकावं.

मला म्हणायचंय ते हे की - पोस्ट ट्रुथ मधे नवीन काही नाही. २०१४ च्या पूर्वी सुद्धा ते होते. किंवा २००० च्या पूर्वी सुद्धा.

तुम्ही असहमत असाल तर ते का ? ते मांडा.
.

राजेश घासकडवी Wed, 25/10/2017 - 22:03

In reply to by गब्बर सिंग

मी वरती दिलेलं उत्तर 'बरंचसं पटलं' म्हणून पुन्हा तोच प्रश्न विचारण्याचा उद्देश कळला नाही.

बाकी फाळणीच्या आधी कित्येक दशकं, शतकं 'आपण विरुद्ध ते' ही भावना हिंदुमुसलमानांत होती हे मान्यच आहे. किंबहुना ती दोन्ही गटांत आहे हे दोन्ही गटांनी मान्य केलं होतं, आणि कृतीतून दाखवून दिलं होतं. उदाहरणार्थ, 1937 च्या निवडणुकांचे निकाल भारत विरुद्ध पाकिस्तान/बांग्लादेश असेच लागलेले होते.

इतिहासात अनेक ठिकाणी, अनेक वेळी आपण विरुद्ध ते आणि त्यानुसार सोयीस्कर सत्यमांडणी/निवड हे दिसलेलंच आहे. हिटलरच्या काळात आर्यन विरुद्ध ज्यू अशी भावना होती, एकतर्फी सत्याचा प्रसार झाला, आणि त्याचे परिणाम आपल्याला ठाउक आहेतच. त्या कालखंडालाही पोस्ट ट्रुथचे गुणधर्म/निकष लागू पडतातच.

मुद्दा असा आहे की मी लिहिलेले निकष हे नेसेसरी आहेत, पण सफिशियंट आहेत का? पोस्ट ट्रुथ म्हणण्यासाठी पार्श्वभूमीला कमीअधिक प्रमाणात सतत असणार्या या दोन निकषांपलिकडे इतरही काही असावं लागतं का? हे उत्तम चर्चेचे विषय आहेत. त्यांवर माझ्या लेखात काही टिप्पणी नाही. पण म्हणून 'पोस्ट ट्रुथ कायमच आहे' या overgeneralized विधानाला मी पाठिंबा देऊ शकत नाही.

पुन्हा, धनंजयचा आणि माझा आधीचा प्रतिसाद पाहावा.

सामो Mon, 23/10/2017 - 21:17

खूपच मार्मिक विश्लेषण आहे. खरच टवणे म्हणतात त्याप्रमाणे "सुस्पष्ट" मांडणी आवडली.
__________
पण मग "दया-अहिंसा-करुणा" या भावनांच्या उगमाचा थांग कसा लावायचा? उदा - ऐसीवरीलच एका लेखात हे वाचले होते "तडजोड" करणाऱ्या जमाती नष्ट झाल्या नाहीत. याउलट "तडजोड" न करणारे नष्ट झाले.

महापुरे झाडे जाती |
तेथे लव्हाळे वाचती

या उक्तीनुसार ज्यांनी म्हणुन एकमेकांना मदत केली, स्वार्थाच्याही पलिकडे पाहीले ते प्राणी तगले व त्यातून "परमार्थ/दुसऱ्यास मदत/सहानुभूती/करुणा" आदि लक्षणे वाहणारी जनुके विस्तार पावली. तडजोड/अहिंसा हे तर "टोळीखोरी" च्या विरुद्ध आहे.
मग या परस्पर विरोधी जनुकांची सांगड कशी घालायची? उदा मी मदत करणातर पण फक्त माझ्या टोळीतील लोकांना इथे दोन्ही वृत्तींचा लसावी दिसुन येतो. दोन्ही जनुके ऑप्टिमली कार्यरत होताना दिसतात.
कदाचित यातूनच सुष्ट-दुष्ट संघर्ष उद्बहवतो का? म्हणजे मला माहीत असते की युद्धखोरी ही वाईट आहे (असे वाटण्यास कारण अहिंसेचे जनुक) पण टोळीखोर जनुक विजयी ठरते व मी समजूत घालते/तो की "आपण त्यांना मारले नाही तर ते आपल्याला मारतील." (इथे अहिंसेच्या जनुकास हार मानावी लागते)

राजेश घासकडवी Mon, 23/10/2017 - 22:07

In reply to by सामो

 

तडजोड/अहिंसा हे तर "टोळीखोरी" च्या विरुद्ध आहे.
मग या परस्पर विरोधी जनुकांची सांगड कशी घालायची? उदा मी मदत करणातर पण फक्त माझ्या टोळीतील लोकांना...

तडजोड-अहिंसा यापेक्षा परोपकार-स्वार्थत्यागाची गुणसूत्रं असं मी म्हणेन. आणि टोळीभावनेशी हे जुळतं. कारण आपल्याजवळच्यांना अडीअडचणीला मदत करायची ही भावना सगळ्यामध्येच निर्माण झाली तर सगळ्यांचाच फायदा होतो. मदत करेन पण टोळीतल्यांनाच, आणि बाहेरच्यांवर संशय घेईन हे प्रभावी धोरण आहे.

टेन कमांडमेंट्समध्येही 'डोंट कव्हेट दाय नेबर्स वाइफ' असं म्हटलेलं आहे. 'एनिवन्स' नाही म्हटलेलं.

सामो Mon, 23/10/2017 - 22:09

In reply to by राजेश घासकडवी

टेन कमांडमेंट्समध्येही 'डोंट कव्हेट दाय नेबर्स वाइफ' असं म्हटलेलं आहे. 'एनिवन्स' नाही म्हटलेलं.

वकील आहात का तुम्ही? पळवाट बरोब्बर लक्षात आली. खरच मार्मिक नॅरीक्षण!

मृदुला Thu, 26/10/2017 - 17:17

सुंदर लेख. एकसंध मांडणी. (एकदा मुद्रितशोधन करून घ्या तरी.:))

> मदत करेन पण टोळीतल्यांनाच, आणि बाहेरच्यांवर संशय घेईन हे प्रभावी धोरण
तंतोतंत. टिकून राहण्यासाठी ते आवश्यकच आहे.
साधनसंपत्ती मर्यादित असते. एक तीळ सात जणात वाटून खाऊ, पण सत्तर आले तर काय कराल? अमर्याद वाटणी केली (किंवा सगळे सगळ्यांनाच मदत करत सुटले) तर नि:शेष - एक्स्टिंक्शन.

> दशकांनंतर काय होईल कोण जाणे.
सध्याच्या मानवजातीच्या सुगीच्या काळात लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून वाटण्या कमी होतील असे पाहिले तर युद्धे आभासी जगापुरती मर्यादित राहतील. अशी मला आशा आहे.

अजो१२३ Fri, 27/10/2017 - 17:18

कप्पेबंद, संकुचित विचारसरणीचा पायाच, आपल्यापेक्षा किंचितही वेगळ्या विचारसरणीची व्यक्ती ही कप्पेबंद, संकुचित विचारसरणीची असल्याचा समज करून घेण्यात असतो.

तुमच्या आशयाची मांडणी करण्याच्या क्षमतेला सलाम !!!
मी आजपावेतो पाहिलेला सर्वात क्लिष्ट आशय सर्वात सुलभ करून मांडणाऱ्या लोकांचे आपण टॉपर आहात.
---------------------------------------
विधानाशी शतश: सहमत.
============================================

काळ्या आणि पांढऱ्याच्या मध्यभागी काही नाहीच असं मानणारी विचारसरणीच राखाडी भागात राहाणारं जग जणू काही काळं किंवा पांढरंच आहे अशी प्रतिमा निर्माण करते.

हे शुद्ध संवादाच्या अभावी होतं.
=================================================

त्यामुळे 'दुश्मन कोण?' या प्रश्नाचं उत्तर 'आपल्याविरुद्ध उभे राहातात ते' इतकं सोपं होतं.

मित्र, शत्रू, सत्य, असत्य या असंबंधित संकल्पना आहेत. सत्य काय हे सर्वानुमते एकच ठरलेले, पटलेले असले तरी!!! सत्य काय यातच घोळ असला तर मग तर मित्रत्व आणि सत्यासत्य यांचा काहीही संबंध नसतो.
आपण ज्यांची बाजू घेत आहोत ते असत्यवादी आहेत, आपण सगळेच असत्यवादी आहोत असं मानणारे लोक "दुसऱ्या बाजूचे योद्धे" ठरत नाहीत. झाडून सर्वांना त्यांना गुन्हेगार म्हणावं लागतं.
म्हणून किमान कोणीतरी आपली बाजू देखील ऐकून घ्यावी असं वाटत असेल तर अगदी हरणार जरी असू आणि सत्यासत्याची फार नीट कल्पना जरी नसेल तरी स्वमुखाने स्वत:ला सत्यवादीच म्हणायला पाहिजे.
आपण सत्यवादी, आपल्या बाजूचे सत्यवादी, आपल्या विरुधचे असत्यवादी आणि त्यांच्या असत्याचे ग्यान असले तरी त्यांची बाजू काही अन्य कारणांनी घेणारे इफेक्टिवली असत्यवादी म्हणून शत्रू.
तुम्ही म्हणताय ते तितकं सोपं ठेवलं नाही तर "कोणीच कोणाचा शत्रू नसतो." हेच एक सत्य उरतं.

अजो१२३ Fri, 27/10/2017 - 17:41

ही तीन गृहितकं गेल्या पाच वर्षांत अमेरिका, ब्रिटन आणि भारतात झालेल्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाबाबत देण्यात येतात.

धृवीकरण झालं आहे हे गृहितक आहे.

हिटलरने ज्यूंविरुद्ध अख्खा समाज आणि नंतर राज्याची यंत्रणा उभी केली, ती पोकळीतून निर्माण केली नाही. जर्मन समाजाच्या मोठ्या भागात ज्यूद्वेष आधीच खदखदत होता. त्याने त्या द्वेषाला खतपाणी घातलं, जोपासलं, फुलवलं. पण मुळात ती रोपटी आणि सुपीक जमीन होतीच.

हिटलर म्हणून पुढे काहीही लिहिलेलं, वाचलेलं चालतं अशी मनुष्याच्या मेंदूची उत्क्रांती झाली असावी. ज्यू सगळे संपवावेत इतका द्वेष सामान्य लोकांना होता? आणि ज्यू आंधळे होते तो न दिसायला? ज्यू-आर्य दंगे किती झाले म्हणे १९३९ पूर्वी जर्मनीत?

जसजसा माणसाचा मेंदू मोठा झाला,

प्रतिगाम्यांना ज्या प्रकारे नको तिथे ज्योतिषाकडे जायची हौस असते अगदी त्याच प्रकारे पुरोगाम्यांना उत्क्रांतीकडे जायची हौस असते. ग्रह दिसले म्हणजे ज्योतिष खरं होत नाही तसं हाडं दिसली म्हणून उत्क्रांती खरी होत नाही. ज्या ब्रँचमधे म्यूटेशनने मेंदू मोठा झाला ती ब्रँच सोडून इतर सर्व ब्रँच कुठे आहेत? त्या तितका काळ टिकल्या तर नंतर काय समस्या होती? कि मोठा मेम्डू झालेल्या लेकरांनी त्यांना संपवले? चिंपाझि आणि माणूस यांत किमान १ करोड मोठे फरक असतील. पेशीय लेवलचे फरक तर विचारायलाच नको. मग किती टप्प्यांत मेंदू मोठा झाला? असं टिकणारं म्यूटेशन हे अख्ख्या स्पेसिसमधल्या एकच प्राण्यात होतं. म्हणजे मानवी लोकसंख्या १ पासून कितींदा सुरु झाली?

अजो१२३ Fri, 27/10/2017 - 17:56

सिंह जसा आपल्या शक्तीमुळे एकटा जगू शकतो

सिंहासारख्या शक्तीचा काही संबंध नसलेल्या अनेक स्पेसिसचे प्राणी एकट्या जगतात.
==================================

चिंपांझी हे आपले जवळचे भाऊबंद.

ही गुणसुत्रीय जवळीक मोजायची तुमच्याकडे जी कोणती फुटपट्टी आहे तिच्यानं अजून चार मोजमापं करा. इतर हजारो स्पेसिस फार काही दूर नाहीत. फार घट्ट चिटकून आहे.
---------------------------
तुमचा न्याय उलटा लावायचा म्हटला तर एखादा चिंपाझी त्याच्या बांधवांना इतकं जेनेटिक साम्य असून आपण माणसांसारखं काय काय करत नाही हे सांगतोय असं कल्पा.
======================================

त्या काळात व्यक्तीकेंद्री बनवणारी जनुकं झडून जाणं सोपं होतं.

अशी काही जनुकं असतात का? आणि नेहमी नेहमी विसरता कि नविन स्पेसिस चालू व्हायला लोकसंख्या १ पासून चालू व्हावी लागते.
=================

टोळी म्हणजे 'आपण' आणि टोळीबाहेरचे 'ते' असं ध्रुवीकरण साहजिकच झालं.

माझे सगळे शत्रू भारतीय आहेत. पाकिस्तानी शून्य आहेत. जितके माझ्या सन्निधचे तितके माझे न आवडते असायची शक्यता जास्त. चिली, अर्जेंटिना इथले लोक चूकून टिवीवर इ दिसले तर मी नवलानी पाहतो. त्यांना संपवावं असं अजिबात कधी वाटलं नाही. वाचकांना राघा हळूहळू बनवून चुकिच्या गंतव्याला नेत आहेत. "ते आणि आपण वेगळे" असं लोक मानतात आणि ते वेगळे असतातच मुळी. पण "ते आणि आपण वेगळे" जी जनकथा "ते आपले दुश्मन" अशी हे प्रि-ट्रूथवादी विकतात.

अजो१२३ Fri, 27/10/2017 - 18:02

अख्खी टोळी मिळून आपला इलाका जपते. यात मुख्य भाग म्हणजे इतर टोळ्यांमधून जर कोणी चुकून किंवा जाणूनबुजून आपल्या इलाक्यात शिरलं तर त्याला ठार मारणं. यापलिकडे जाऊन इतर टोळ्यांवर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करणं हेही चिंपांझींमध्ये चालतं.

जशी कोणतीच मनुश्याची प्रजाती नरभक्षि नाही तशी चिंपांझींची पण नाही. मग फक्त "मेंदूचा आकार वाढला" या कारणाने ते एकमेकांना मारतात असे वाटतेय. देवाने आपण एकमेकांना मारावं म्हणून मेंदूचा आकार वाढवला कि काय? विनोदी प्रकार!!!
======
मेंदूने त्यांच्यापेक्षा अप्रगत माकडे असे करत नाहीत आणि ते करतात असं का, थोडक्यात...?

अजो१२३ Fri, 27/10/2017 - 18:09

वरच्या वर्णनातून लक्षात येईल की आपण ज्याला आज अस्मिता म्हणतो, ते दुसरंतिसरं काही नसून टोळीवृत्ती आहे. जाती, धर्म, भाषा, लिंग, वर्ण या निकषांवर 'आपण आणि ते' अशी विभागणी करून 'त्यां'चा द्वेष, दुस्वास करणं किंवा प्रसंगी त्यांचा नायनाट करण्यासाठी तयार होणं हे आपल्या जनुकांमध्येच आहे.

विशुद्ध नास्तिकी विचारांचा उत्तम नमुना. फक्त "आणि हे बरोबर आहे" असं लिहिणं उरलंय.
=====================
यात लिंग कसं आलं?
==============================
टोळ्याच करणं जनुकांत असेल तर १३० कोटी, १२० कोटी, इ इ आकाराचे देश कशे उभे राहतात म्हणे? निकष निवडून टोळि बनवायची म्हटलं तर मला दिलेल्या ७०० कोटी लोकांसाठी ७०० कोटी निकष लावून दरमाणशी एक टोळी उभं करण्याचं पोटेंशियल मी दाखवून देऊ शकतो.
==============
धर्म, जात इ इ जीन्सना कळतात कि काय? जिन्सना जे काय कळतं ते नक्की काय असतं ज्यांचं रुपांतर धर्म असं होतं?

अजो१२३ Fri, 27/10/2017 - 18:28

तिने जोर धरला तो गेल्या शतका दोन शतकांतच.

गेल्या दोन शतकांत वैद्न्यानिक सत्याशिवाय दुसरं सत्य नसतंच असं म्हणून २००० वर्षांची कमाई मातीत घातली गेली.
============================

या बाबतीत कट्टर असणाऱ्या टोळ्या कणखर राहिल्या, युद्धांसाठी पुरेशी शक्ती आणि क्रौर्य गोळा करू शकल्या.

बौद्ध धर्माचा प्रसार असाच झाला?
बाह्य क्रौय????? जेनेटिक स्ट्रेंग्थ, पर्यावरणाची मेहेरबानी यांचा काही संबंध नाही?
=======================

अशा परिस्थितीत उत्क्रांतीच्या नैसर्गिक निवडीतून टोळीकेंद्रित सत्यावर ठाम विश्वास ठेवणारे मेंदू टिकले नाहीत तरच नवल.

म्यूटेशन्स रँडम असतात म्हणून उत्क्रांती रँडम असते. एकदा नैसर्गिक सिलेक्शन म्हटले उत्क्रांती एकदिक्त होते. म्हणून तसं म्हणता येत नाही. पुढचं आर्गुमेंट फोल आहे.
================================

इतर टोळ्यांच्या हातून आपण मारले जाऊ, याची शक्यताही खूपच कमी झालेली असल्यामुळे काहीसे सैलावलो आहोत.

पुरोगाम्यांना ज्या सैनिकांच्या जीवाची कदर नाही त्यांना सगळा तो ताटकळपणा घेतला आहे म्हणून बाकीचे सैलावले आहेत. बाकी सगळं अजून बेकार झालं आहे.

शिक्षण, कायदासुव्यवस्था, प्रवास यामुळे सर्वच टोळ्यांनी हत्याकांडांचं प्रमाण कमी केलं आहे.

कायदेशीर हत्यांना हत्या म्हणत नाहीत अशी व्याख्या बदलल्यानं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मजूरांच्या आत्महत्या, युद्धे , अतिरेक, इ इ वाढतच आहे. दरडोई वाढत आहे.

गावकीची वाळीत टाकण्याची शक्ती शहरीकरणामुळे कमी झालेली आहे.

अणुबॉम्ब मुळे सगळे मरायची शक्यता शहरात वाढली आहे. शिवाय शहरात तुम्ही गावातून गेलात तर तुम्हाला ९९% स्लममधेच राहावं लागतं, फक्त त्याला वाळी असं अधिकृत नाव नाही.

राजेश घासकडवी Fri, 27/10/2017 - 18:48

खूप प्रश्न आहेत. एका विशिष्ट प्रश्नाचं उत्तर देतो.

ज्यू-आर्य दंगे किती झाले म्हणे १९३९ पूर्वी जर्मनीत?

खूप. (तुम्हाला 1933 म्हणायचं आहे बहुतेक...) https://en.m.wikipedia.org/wiki/History_of_the_Jews_in_Germany
इथे जाऊन पाहा कृपया. चौदाव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत अनेक कापाकाप्या झाल्या जर्मनीतच.

इतर काही प्रश्नही अपूर्ण माहितीवर आधारित आहेत का तुम्हीच तपासून पाहाल का?

अजो१२३ Fri, 27/10/2017 - 18:48

इंटरनेट क्रांतीने या समुद्राचं पाणीच अचानक जड करून ढवळलेलं आहे. त्यामुळे हा झाकलेला भाग - अस्मितांच्या उथळ प्रदर्शनांसकट, कट्टरतेसकट, क्रौर्य आणि हिंस्रतेसकट घुसळून वर आलेला दिसतो आहे. हा वाढता कोलाहल अजूनच कर्कश होणार अशी नजीकच्या काळात तरी चिन्हं आहेत. दशकांनंतर काय होईल कोण जाणे.

हे प्रि-ट्रूथ वाल्यांचं रडगाणं आहे.
वास्तविक इंटरनेटवर एक अत्यंत व्यवस्थित सुसंवाद चालला आहे. त्यात ज्या दोन टोळ्या दिसताहेत त्यांच्यात सत्कृतदर्शनी वैमनस्य दिसत असले तरी तसं काही नाही. उदा. आपण सगळ्यात हॉट दोन टोळ्या घेऊ. भक्त विरुद्ध सिक्यूलर. जनरली भक्त हिंदू, संघी, त्यातली त्यात ब्राह्मण, कमी शिकलेले, कॉस्मो नसलेले, इ इ असतात अशी प्रोफायलींग कर्ता येईल. सिक्यूलर उच्चशिक्षित, शहरी, मायनॉरिटी, त्यांचे सिंपथासर, संघविरोधी, इ इ असतात. यांच्या उच्चारवाने भांडण चाललेले असते. पण भांडण काय असते हे नीट पाहिलं तर लक्षात येईल की त्याचा विषय आहे "माझं देशप्रेम श्रेष्ठ कि तुझं?" (बघा राघा, इथे मी पॉझिटिव आणि तुम्ही निगेटिव विचार करताय.).
प्रत्येक संवादाचं असंच आहे. त्याकडे तुमचा सर्वात पहिला तारिफे काबील कोट लावून विचार करणे गरजेचे आहे.
======================================

उत्क्रांतीतून आपल्याकडे आलेल्या टोळीमानसिकतेच्या हिमनगाचा मोठा भाग इतका काळ पाण्याखाली दडलेला होता.

चार डिग्रीपासून खाली घनता कमी होत जाणारा पाणी हा जगातला फारच युनिक पदार्थ आहे. मनुष्य एक सामान्य प्राणी आहे. त्यातही तो सुसंस्कृत आहे. सबब आपल्या स्पेसिबांधवांचं भय बाळगायला नको. सर्व मनुष्य गोग्गोड आहेत म्हणावं, वसुधैव कुटुंबकम म्हणावं, सर्वांवर निरातिशय प्रेम करावं, आणि कुठे आग लागली तरी ती क्षणिक असेल असं मानून मनुष्याच्या मूल स्वरुपाचीच धास्ती घेऊ नये.
====================================
कोणत्याही नास्तीकी अपप्रचाराला (त्यांच्यामते अभ्यासाला जे मलाही मान्य आहे) कोणी बळी पडू नये म्हणून लेखन प्रपंच.

मृदुला Fri, 27/10/2017 - 19:14

>ब्रँचमधे म्यूटेशनने मेंदू मोठा
एकाच टप्प्यात म्यूटेशनने मेंदू मोठा झाला असण्याची शक्यता फार कमी.

मोठ्या मेंदूचे कारण मुख्यत्वे 'मॅनिप्युलेशन' करण्यात जे जास्त हुशार ठरले त्यांना समागमाची व संतती वाढवण्याची संधी मिळाली हे आहे. यात मिळालेल्या साधनांचा उपयोग ते उपलब्ध मनुष्यांचा उपयोग इथवर सगळे मॅनिप्युलेशन येते.

चिमणराव Sat, 28/10/2017 - 18:39

वैज्ञानिक उत्क्रांती आणि चंद्रावर( /इतर ठिकाणी) जाण्याचं सोयीचं झाल्यावरच्या सत्यपश्चात कसा वाद होईल?
जाऊ शकणारे देश, नागरीक यांना इतर अडवू शकतील का?

ॲमी Wed, 01/11/2017 - 13:35

चिंपांझी हे आपले जवळचे भाऊबंद. मेंदूचा आकार लहान आहे म्हणून तंत्रज्ञान आणि भाषा याबाबतीत आपल्या मागे आहेत, हे सोडलं तर इतर अनेक बाबतीत माणूस आणि चिंपांझींच्या लागण्यात साम्य आहे. तेही टोळ्यांनी राहातात. टोळीचा मुख्य नर नायक (अल्फा मेल) असतो. गंमत म्हणजे तो सर्वात शक्तिवान म्हणून नायक बनत नाही, तर टोळीत आपली गँग तयार करू शकतो म्हणून बनतो. टोळीतली राजकारणं प्रत्येकासाठी महत्त्वाची असतात. अख्खी टोळी मिळून आपला इलाका जपते. यात मुख्य भाग म्हणजे इतर टोळ्यांमधून जर कोणी चुकून किंवा जाणूनबुजून आपल्या इलाक्यात शिरलं तर त्याला ठार मारणं. यापलिकडे जाऊन इतर टोळ्यांवर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करणं हेही चिंपांझींमध्ये चालतं. आणि हे हल्ले केवळ एखाददोन घटनांपुरते मर्यादित नसतात. सत्तरच्या दशकात जेन गुडॉलने सतत चार वर्षं चाललेल्या युद्धाचं वर्णनकेलेलं आहे. यात विरुद्ध कळपावर हल्ला करण्याऐवजी एकट्यादुकट्याला धरून निर्घृणपणे ठार करण्याची वर्णनं आहेत.
>> भारी आहे हे!!

Result: Decisive Kasakela victory

Belligerents:
Kahama chimpanzees
Kasakela chimpanzees

Commanders and leaders:
Faben
Goliath

Strength:
7 males, 3 females
8 males, 12 females

या सगळ्या भांडणात माद्यांचा रोल काय होता?
१. १९७४ लाच गोलिअथ कडे जास्त माद्या होत्या का? म्हणजे युद्ध चालू व्हायच्या आधीच माद्यांनी 'भावी जेता' आणि त्याचा कळप निवडला होता का? की
२. माद्याची संख्या जास्त त्यामुळे एकूणच कळप मोठा असल्याने तो जेता झाला? माद्यादेखील युद्धात भाग घेत होत्या? की
३. जेता झाल्यावर दुसऱ्या टोळीतल्या माद्या यांनी पळवून आणल्या? की
४. हा जिंकतोय म्हणल्यावर हळूहळू माद्या यांच्याकडे जाऊ लागल्या?

राजेश घासकडवी Thu, 02/11/2017 - 05:12

In reply to by ॲमी

या युद्धधाबद्दल मला फारशी माहिती नाही. त्यामुळे विशिष्ट प्रश्नांच्या उत्तरांसाठी मुळातल्या पुस्तकाचं वाचन करण्याची गरज पडेल. लेखापुरता 'आपल्या सगळ्यीत जवळच्या प्रजातीची वागणूक आपणा मानवांसारखीच दिसते, तेव्हा टोळी-मानसिकता आपल्याही गुणसूत्रांतच असणं सहजशक्य आहे' इतकाच मुद्दा होता.

ॲमी Fri, 03/11/2017 - 04:12

In reply to by राजेश घासकडवी

या युद्धधाबद्दल मला फारशी माहिती नाही. >> आधी एकच मोठा कळप होता, त्यातले काही वेगळे झाले, त्यांनी आपला जमिनीचा वाटा ठरवला, फाटाफूट पूर्ण होईपर्यंत जुने बर्यापैकी शांत होते, नव्या अल्फाकडे कमी माकडं गेलेत हे कळल्यावर जुन्यानी ते बंड मोडून काढलं.

===
टोळीचा मुख्य नर नायक (अल्फा मेल) असतो. गंमत म्हणजे तो सर्वात शक्तिवान म्हणून नायक बनत नाही, .........यात विरुद्ध कळपावर हल्ला करण्याऐवजी एकट्यादुकट्याला धरून निर्घृणपणे ठार करण्याची वर्णनं आहेत.
>>हे सगळं वर्णन 'केवळ नरांची वागणूक' या दृष्टिकोनातून केलेलं वाटलं म्हणून विचारलं माद्या कुठे आहेत... मी शोधते गूगलवर...े